आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

३० सप्टेंबर, दिवस २७३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी २६ ते ५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३२६५ ते ३२७६
“३० सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 30 September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ३० सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३२६५ ते ३२७६ चे पारायण आपण करणार आहोत.
३० सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी २६ ते ५०,
26-17
तैसी शास्त्रांची मोकळी । या कै कोण पा वेटाळी । एकवाक्यतेच्या फळी । पैसिजे कै ? ॥26॥
त्याप्रमाणे अनेक शास्त्रे एकत्र आणून ती वाचावी कोणीं ? व वाचली तरी त्यांची एकवाक्यता कशी करणार ? 26
27-17
जालयाही एकवाक्यता । का लाभे वेळु अनुष्ठिता । कैचा पैसारु जीविता । येतुलालिया ॥27॥
कदाचित् एकवाक्यता होऊ शकली तरी, अनुष्ठानाला वेळ कोणाला आहे ? आणि जीवाच्या आयुष्याचा तरी तस काय नेम सांगावा ? 27
28-17
आणि शास्त्रे अर्थे देशे काळे । या चहूही जे एकफळे । तो उपावो के मिळे । आघवयांसी ? ॥28॥
आणि समजा, शास्त्र, द्रव्य, देश, काल, ह्या सर्वाचा जरी क्वचित् एकत्र योग आला, तरी सर्वाना तो उपाय कसा साध्य व्हावा ? 28
29-17
म्हणौनि शास्त्राचे घडते । नोहे प्रकारे बहुते । तरी मुर्खा मुमुक्षा येथे । काय गति पा ? ॥29॥
अशा अनेक प्रकाराने शास्त्रवचन पाळून कर्म करणे अशक्य ठरते, मग अज्ञ जे मुमुक्षुजन ह्यांना काय तरणोपाय आहे ? 29
30-17
हा पुसावया अभिप्रावो । जो अर्जुन करी प्रस्तावो । तो सतराविया ठावो । अध्याया येथ ॥30॥
अर्जुनाने मनातील हा अभिप्राय विचारण्यासाठी प्रस्तावना केली तोच ह्या सतराव्या अध्यायाचा मूळ विषय होय. 30
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-17
तरी सर्वविषयी वितृष्णु । जो सकळकळी प्रवीणु । कृष्णाही नवल कृष्णु । अर्जुनत्वे जो ॥31॥
तरी सर्व विषयांविषयी निरिच्छ असून सकलकलानिपुण असणारा व देवांना आनंद देणारा असा अर्जुनरूपाने अवतरलेला जो दुसरा कृष्णच असा. 31
32-17
शौर्या जोडला आधारु । जो सोमवंशाचा शृंगारु । सुखादि उपकारु । जयाची लीला ॥32॥
जो शौर्याचा आधार जो सोमवंशाचे भूषण, ज्याची लीला म्हणजे सुखालाही उपचाररूप होय. (सुख रूप) 32
33-17
जो प्रज्ञेचा प्रियोत्तमु । ब्रह्मविद्येचा विश्रामु । सहचरु मनोधर्मु । देवाचा जो ॥33॥
जो बुद्धिमंतांमध्ये बुद्धिमंत असा प्रज्ञेचा लाडका, ब्रह्मविद्येचे विश्रांतिस्थान, व देवांच्या चित्तांत नित्य असणारा सहचर असा जो अर्जुन, 33
अर्जुन उवाच ।
ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ॥17. 1॥
34-17
तो अर्जुन म्हणे गा तमालश्यामा । इंद्रिया फांवलिया ब्रह्मा । तुझा बोलु आम्हा । साकांक्षु पै जी ॥34॥
तो अर्जुन म्हणतो, हे तमालश्यामप्रभो, हे इंद्रियविषय ब्रह्ममूर्ते, आपण सांगितले खरे, पण त्यावर एक शंका येते ती अशी. 34
35-17
जे शास्त्रेंवाचूनि आणिके । प्राणिया स्वमोक्षु न देखे । ऐसे का कैपखे । बोलिलासी ॥35॥
प्राणिमात्राला शास्त्रज्ञानावाचून मोक्षाचा अनुभव अन्य कशानेही येणारच नाही असे आपण कैपक्षाने म्हणजे ” अन्यकशानेही नव्हे ” असे सांगितले ते का ? 35
36-17
तरी न मिळेचि तो देशु । नव्हेचि काळा अवकाशु । जो करवी शास्त्राभ्यासु । तोही दुरी ॥36॥
समजा; शास्त्राध्ययनाला अनुकूल असा देश लाभला नाही, आयुष्यही भरपूर नाही, असेल अध्यापक. 36
37-17
आणि अभ्यासी विरजिया । होती जिया सामुग्रिया । त्याही नाही आपैतिया । तिये वेळी ॥37॥
व अभ्यासाला आवश्यक सामुग्रीही प्राप्त अशी होण्यासारखी नसेल अशा वेळी. 37
38-17
उजू नोहेचि प्राचीन । नेदीचि प्रज्ञा संवाहन । ऐसे ठेले आपादन । शास्त्राचे जया ॥38॥
किंवा अदृष्ट अनुकूल नाहीं, बुद्धीचीही तेवढी धारणा नाही अशी शास्त्राविषयी ज्याची स्थितिअसेल, 38
39-17
किंबहुना शास्त्रविखी । एकही न लाहातीचि नखी । म्हणौनि उखिविखी । सांडिली जिही ॥39॥
किंबहुना, शास्त्राचे अमुक एक निश्चित प्रमेय आहे ह्याचा निर्णय न झाल्यामुळे ज्यांनी त्याचा विचारच सोडून दिला आहे. 39
40-17
परी निर्धारूनि शास्त्रे । अर्थानुष्ठाने पवित्रे । नांदताति परत्रे । साचारे जे ॥40॥
पण, ज्यांनी त्यांचा अभ्यास करून, यथाविधि पवित्र अनुष्ठानाने परलोक गाठून तेथे जे खरोखर नांदत आहेत. 40
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-17
तया {ऐ}से आम्ही होआवे । ऐसी चाड बांधोनि जीवे । घेती तयांचे मागावे । आचरावया ॥41॥ ऐसे
त्याप्रमाणे आपणही व्हावे अशी इच्छा मनात बाळगून जे जीवेभावे त्यांच्या मार्गाचे अवलंबन करतात. 41
42-17
धड्याचिया आखरा । तळी बाळ लिहे दातारा । का पुढांसूनि पडिकरा । अक्षमु चाले ॥42॥ पुढासूनि
म्हणजे प्रभो, धडयातील अक्षरे पाहून बाल जसा तशी अक्षरे खाली काढितो, किंवा डोळस मनुष्य पुढे घेऊन त्याच्या आधाराने जसा स्वतः असमर्थ अंधही चालतो 42
43-17
तैसे सर्वशास्त्रनिपुण । तयाचे जे आचरण । तेचि करिती प्रमाण । आपलिये श्रद्धे ॥43॥
त्याप्रमाणे, सर्वशास्त्रनिपुण अशा लोकांचे जे आचरण हे प्रमाण मानून, त्यावर जे श्रद्धा ठेवितात. 43
44-17
मग शिवादिके पूजने । भूम्यादिके महादाने । आग्निहोत्रादि यजने । करिती जे श्रद्धा ॥44॥
आणि शिवादि देवतांचे पूजन, भूमीसारखे महादान देणे, अग्निहोत्रादि यज्त्रयाग करणे इयदि कर्म जे श्रद्धेने आचरतात. 44
45-17
तया सत्त्वरजतमा- । माजी कोण पुरुषोत्तमा । गति होय ते आम्हा । सांगिजो जी ॥45॥
त्यांना, हे प्रभो, सत्व, रज, तमापैकी कोणत्या कर्माची गति प्राप्त होते ते कृपा करून सांगावे होय. 45
46-17
तव वैकुंठपीठींचे लिंग । जो निगमपद्माचा पराग । जिये जयाचेनि हे जग । अंगच्छाया ॥46॥
तेव्हां, जो वैकुंठाधिपति असून वेदरूपी कमलाचा जणु परागच, व अंगाचा आधार जसा छायेला असतो तसे ज्याच्या सत्तेवर हे सर्वं जग जगते; 46
47-17
काळ सावियाचि वाढु । लोकोत्तर प्रौढु । आद्वितीय गूढु । आनंदघनु ॥47॥
व जो प्रत्यक्ष कालरूपच असून सहजच मोठा प्रौढ, लोकोत्तर, अद्वितीय, गूढ आणि आनंदघन आहे. 47
48-17
इये श्लाघिजती जेणे बिके । ते जयाचे आंगी असिके । तो श्रीकृष्ण स्वमुखे । बोलत असे ॥48॥
आणि हे सर्व गुण जिच्या आधारावर वर्णिता येतात अशी जी शक्ति, तीही ज्यांच्या सत्तेवर नांदते, असा जो श्रीकृष्णश्रीकृष्ण भगवान तो स्वमुखाते सांगता झाला. 48
श्री भगवानुवाच ।
त्रिविध भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा ।
सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति ता शृणु ॥17. 2॥
49-17
म्हणे पार्था तुझा अतिसो । हेही आम्ही जाणतसो । जे शास्त्राभ्यासाचा आडसो । मानितोसि की ॥49॥
श्रीभगवान म्हणतात पार्था, शास्त्राभ्यासाला अनेक अडचणी असणे शक्य आहे असा तुझ्या शंकेचा भाव आम्ही जाणतो. 49
50-7
नुसधियाची श्रद्धा । झोंबो पाहसी परमपदा । तरी तैसे हे प्रबुद्धा । सोहोपे नोहे ॥50॥
केवल श्रद्धेच्या जोरावर मोक्षप्राप्ति व्हावी असे तुला वाटते, पण ही गोष्ट काही इतकी सोपी नाही. 50
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २७३ वा. ३०, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३२६५ ते ३२७६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३२६५
हेचि सुख पुढे मागतो आगळे । आनंदाची फळे सेवादान ॥१॥
जन्मजन्मांतरी तुझाचि अंकिला । करूनि विठ्ठला दास ठेवी ॥धृपद॥
दुजा भाव आड येऊ नेदी चित्ता । करावा अनंता नास त्याचा ॥२॥
अभय देऊनि करावे सादर । क्षण तो विसर पडो नेदी ॥३॥
तुका म्हणे आम्ही जेजे इच्छा करू । ते ते कल्पतरू पुरविसी ॥४॥
अर्थ
देवा तुमची सेवा करण्याने मला आनंदाची फळे मिळतात त्यामुळे तुमच्या सेवेचे दानच मी वारंवार तुम्हाला पुढे मागत आहे. हे विठ्ठला जन्मोजन्मांतरी मला तुझा अंकित करुन ठेव. हे देवा माझ्या चित्तामध्ये तुमच्याविषयी जो भक्तीभाव आहे त्या भक्तीभावाला कोणताही विचार आडवा येऊ देऊ नका आणि जरी एखादा विचार आडवा आलाच तरी हे अनंता त्याचा तुम्ही नाश करावा. देवा तुमची सेवा करण्याविषयी मला तुम्ही अभयदान दयावे आणि तुमचा एक क्षणभर देखील मला विसर पडू देऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा जी जी इच्छा आम्ही मनामध्ये करु ती ती तुम्ही कल्पतरुप्रमाणेच पूर्ण करुन आम्हाला ज्या ज्या गोष्टीची इच्छा आहे ती गोष्ट तू आम्हाला पुरवतोस. ”
3:43
अभंग क्र. ३२६६
बहुता जन्मां अंती जन्मलासी नरा । देव तू सोइरा करी आता ॥१॥
करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडी परता ॥धृपद॥
सांडि कुडी कल्पनेची वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ॥२॥
पंढरीस जावे सर्व सुख घ्यावे । रूप ते पाहावे विटेवरी ॥३॥
विटेवरी नीट आनंदाचा कंद । तुका नाचे छंदे नामघोषे ॥४॥
अर्थ
हे नरा तू आतापर्यंत खूप जन्म घेतले आहेस व शेवटी हा नरदेह तुला प्राप्त झालेला आहे त्यामुळे तू आता त्या नरदेहाच्या निमित्ताने देवाला सोयरा करुन घ्यावे. त्यामुळे हे बापा तू आता स्वहिताचा स्वार्थ साधून घे आणि वाईट कर्म केल्याने अनर्थ होतो त्यामुळे त्याचा आता तू त्याग कर. तू आता कल्पनेच्या संकल्प विकल्पाच्या अवघड वाटा टाकून दे आणि आपले स्वहित साधण्याकरता जो उत्तम मार्ग आहे चांगला मार्ग आहे तो पंढरीचा आहे त्याचा तू स्वीकार कर. आता तू पंढरीला जा सर्व सुखांचा उपभोग घे आणि विटेवर जे हरीचे रुप आहे ते पाहा. तुकाराम महाराज म्हणतात, “विटेवर आनंदाचा जो कंद तो विठ्ठल परमात्मा नीट उभा आहे त्याचा नामघोष करुन त्या आनंदाच्या छंदात मी नाचत आहे. ”
3:43
अभंग क्र. ३२६७
पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरीचे दास घेती जन्म ॥१॥
कर्मधर्म त्याचे झाला नारायण । त्याचेनि पावन तिन्ही लोक ॥धृपद॥
वर्णअभिमाने कोण झाले पावन । ऐसे द्या सांगून मजपाशी ॥३॥
अंत्यजादि योनि तरल्या हरीभजने । तयाची पुराणे भाट झाली ॥३॥
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥४॥
कबीर मोमीन लतीफ मुसलमान । शेणा न्हावी जाण विष्णुदास ॥५॥
अर्थ
काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु । भजनी अभेदू हरीचे पायी ॥६॥ @
चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥७॥ @
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवे ॥८॥ @
मैराळा जनक कोण कुळ त्याचे । महिमान तयाचे काय सांगो ॥९॥ @
यातायातीधर्म नाही विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्री ॥१०॥ @
तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणो किती ॥११॥
3:43
अभंग क्र. ३२६८
ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणति साधु ॥१॥
अंगा लावूनिया राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥धृपद॥
दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा ॥२॥
तुका म्हणे सांगो किती । जळो तयांची संगती ॥३॥
अर्थ
अहो असे कसे भोंदू येथे झाले आहेत काय माहित कुकर्म करतात आणि स्वत:ला साधू म्हणतात. अंगाला राख लावतात डोळे झाकून ध्यानस्थ बसल्याचे सोंग करतात आणि रात्रीच्या वेळी अनेक प्रकारचे हे लोक पाप करत असतात. आपल्या अंगी खूप वैराग्य आले आहे असे लोकांना दाखवतात परंतू कोणालाही कळू न देता विषयसुखाचा सोहळा हे भोगतात. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा भोंदू लोकांच्या कुकर्माची गोष्ट तर मी किती सांगू असल्यांची संगतीही नको व त्यांच्या संगतीला आग लागो. ”
3:43
अभंग क्र. ३२६९
मानू काही आम्ही आपुलिया इच्छा । ना तरि सरसा रंकरावो ॥१॥
आपुल्या उदास आहो देहभावी । मग लज्जाजीवी चाड नाही ॥धृपद॥
तुका म्हणे आम्ही खेळो सहजलीळे । म्हणोनी निराळे सुख दुःखचा ॥२॥
अर्थ
आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे ज्याला मान सन्मान दयायचा त्याला देऊ नाहीतर आमच्यासाठी राजा आणि भिकारी दोन्ही सारखेच आहेत. आम्ही देहभान हरपलेलो आहोत म्हणजेच आम्ही देहाविषयी उदास झालो आहोत त्यामुळे आमच्या जीवाला कोणत्याही गोष्टीची लाज किंवा आवड राहिलेलीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही संसारात सहजच व्यवहार करतो त्यामुळे तर सुख आणि दु:ख यापेक्षा आम्ही वेगळे होऊन राहीलो आहोत. ”
3:43
अभंग क्र. ३२७०
फिरविले देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हाती दुध प्याला ॥१॥
भरियेली हुंडी नरसी मेहत्याची । धनाजी चाटयाची सेते पेरी ॥धृपद॥
मिराबाईसाठी प्याला तो विषाचा । लाख्या कोलाटयाचा ढोल पिटी ॥२॥
कबीराचे मागी विणू लागे शेले । मूल उठविले कुंभाराचे ॥३॥
आता तुम्ही दया करा पंढरिराया । तुका विनवी पाया वेळोवेळा ॥४॥
अर्थ
तीर्थयात्रा करत असताना नामदेवराय औंढया नागनाथाला गेले तेथे देवळाच्या आवारामध्ये पश्चिमेकडे नामदेव महाराजांचे कीर्तन होते परंतू कीर्तन ऐकण्यासाठी देवाने देवळाचे तोंड फिरवून त्यांच्या सन्मुख देवळाचे तोंड केले आणि देव स्वत: नामदेवरायांच्या हातातील दूध पिले अशी नामदेवांची ख्याती जगामध्ये आहे. नरसिंह मिळत्याची हुंडी देवाने स्वत: भरली, धनाजी चाटयाने पेरणीसाठी जे बी आणले ते बी संत आले म्हणून त्यांच्या भोजनासाठी त्याने वापरले तर देवाने त्याची शेती पेरली. मिराबाईला विष देण्यात आले त्यावेळी देवाने ते स्वत: विष पिऊन टाकले आणि लाख्या नावाचा कोल्हाटी याच्या खेळामध्ये देव स्वत: ढोल वाजवित होता. कबीराच्या पाठीमागे देव शेले विणू लागत होता. गोरोबा काका भजनात तल्लीन असताना चिखल तुडवित होते त्यावेळी त्यांचे मूल त्यांच्या पायाखाली आले व ते मूल मेले ते मूल देखील देवाने जिवंत केले. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पंढरीराया तुम्ही आता माझ्यावरही अशी दया दाखवा अशी विनंती मी तुमच्या पायाजवळ वेळोवेळी करीत आहे. ”
3:44
अभंग क्र. ३२७१
निरंजनी आम्ही बांधियेले घर । निराकारी निरंतर राहिलोंसे ॥१॥
निराभासी पूर्ण झालो समरस । खंड ऐक्यास पावलो आम्ही ॥२॥
तुका म्हणे आता नाही अहंकार । झालो तदाकार नित्य शुद्ध ॥३॥
अर्थ
शुध्द ब्रम्ह स्थितीच्या ठिकाणी आम्ही घर बांधले आहे व तेथे आम्ही निराकार निरंतर अखंड रुपाने राहात आहोत. जेथे कोणत्याही प्रकारचा भास होत नाही अशा ब्रम्ह स्थितीत आम्ही समरस झालो आहोत व अखंड ऐक्यास आम्ही प्राप्त झालो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, “आता आमच्या स्वरुपामध्ये अहंकार हा राहिलेलाच नाही त्यामुळे आम्ही नित्य शुध्द झालो आहोत. ”
3:44
अभंग क्र. ३२७२
पांडुरंगे सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुद्धीभेद ॥१॥
जीवशिवा शेज रचली आनंदे । आउटाविए पदी आरोहण ॥२॥
निजी निजरूपी निजविला तुका । अनुहाते बाळका हल्लरु गाती ॥३॥
अर्थ
जीव आणि शिव यामध्ये भेद आहे हाच संदेह व बुध्दीभेद पाडूरंगाने नाहीसा केला व खरोखरच त्याने मला अनुग्रह केला. जीव आणि शीव यामधील भेद नाहीसा करुन आनंदाची शेज रचली व साडेतीन मात्रेचा ओंकाराच्या मूळ स्वरुपाच्या ठिकाणी मला त्याने स्थिर केले. तुकाराम महाराज म्हणतात, “आणि या पाडूरंगाने मला नीजस्वरुपाच्या ठिकाणी निजविले आहे व अनुहात ध्वनीचा नाद माझ्या करमणूकीसाठी तो गात आहे. ”
3:44
अभंग क्र. ३२७३
नाना मतांतरे शब्दाची व्युत्पत्ति । पाठांतरे होती वाचाळ ते ॥१॥
माझ्या विठोबाचे वर्म आहे दुरी । कैची तेथे उरी देहभावा ॥धृपद॥
यज्त्रयाग जप तप अनुष्ठान । राहे ध्येय ध्यान आलीकडे ॥२॥
तुका म्हणे होय उपरति चित्ति । अंगी सप्रेमता येणे लागे ॥३॥
अर्थ
अनेक प्रकारची गद्य, पद्य वाजून अनेक लोक वाचाळ होतात व विविध प्रकारचे मतमतांतरे निर्माण करुन शब्दांचा व्यवहारच निर्माण करतात. अरे पण माझ्या विठोबाच्या प्राप्तीचे वर्म यापेक्षा वेगळेच आहे एकदा की विठोबाची प्राप्ती झाली मग तेथे देहभाव तरी कसा राहील ? यज्ञ, याग, जप, तप, अनुष्ठान हे केल्याने देवाची प्राप्ती होत नाही आणि ध्येय, ध्यान आणि ध्याता हे तर अलीकडेच राहातात. तुकाराम महाराज म्हणतात, “आपल्या अंगामध्ये उपरती झाली पाहिजे संसाराविषयी चित्ताला विसर पडला पाहिजे आणि विठोबाविषयी अंगामध्ये प्रेम वाढले पाहिजे तेव्हाच विठोबाची प्राप्ती होईल. ”
3:44
अभंग क्र. ३२७४
नाही शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्री मंत्री अनुभव तो ॥१॥
हर्षामर्षा अंगी आदळती लाटा । कामक्रोधे तटा सांडियेले ॥धृपद॥
न सरे ते भक्ति विठोबाचे पायी । उपरति नाही जेथे चित्ता ॥२॥
तुका म्हणे सुख देहनिरसने । चिंतने चिंतन तद्रूपता ॥३॥
अर्थ
हरी प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारचे शब्दज्ञान आवश्यक नाही व कोणत्याही मंत्र व तंत्राने हरीचा अनुभव येत नाही हरी प्राप्तीचे खरे वर्म यापासून फार दूर आहे. जोपर्यंत दु:ख व आनंद याच्या लाटा अंगावर आदळतील अंत:करणामध्ये काम क्रोध जोपर्यंत आहे तोपर्यंत हरीची प्राप्ती होऊ शकत नाही. जोपर्यंत आपल्याला संसाराची पूर्णपणे विरक्ती उपरती होत नाही तोपर्यंत आपण कितीही भक्ती केली तरी ती विठोबाच्या पायाजवळ सरती होत नाही म्हणजेच मान्य होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देहाभिमानाचा पूर्णपणे निरास केल्यानंतरच सुख प्राप्त होते आणि हरीचे सतत चिंतन केल्यानेच हरीशी मनुष्य तद्रूप होतो. ”
3:44
अभंग क्र. ३२७५
शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळी उच्चारण ॥१॥
म्हणविले मागे पुढे चाले कैसे । केला सामरस्ये अभिषेक ॥धृपद॥
एकछत्र झळके उन्मनी निशाणी । अनुहात ध्वनी गगन गर्जे ॥२॥
तुकया स्वामी स्थापी निजपदी दासा । करूनि उल्हासा सप्रेमता ॥३॥
अर्थ
देव हा भक्तांच्या वंशावळीतील कुळाचा शोध घेऊन त्याचा प्रथम उच्चार करतो. मग देव आपल्या म्हणण्यानुसार आपल्या मागेपुढे कसा चालतो तो पाहा. त्याप्रकारे त्यानेही माझी वंशावळ शोधून मला ब्रम्हरसाच्या रसाचा अभिषेक घातला व ब्रम्हरसाशी त्याने मला समरस केले. मग तेथे सर्व एक छत्राखालीच झळकत असते ब्रम्हस्वरुपाशी ऐक्य झाल्यानंतर अनाहत ध्वनी गगन गर्जना करुन डंका वाजवू लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा प्रकारे मला दासाला माझ्या स्वामीने अतिशय उल्हासाने व प्रेमाने त्याच्या निजस्वरुपस्थितीत स्थापित केले आहे. ”
3:44
अभंग क्र. ३२७६
प्रवृत्तिनिवृत्तीचे आटूनिया भाग । उतरिले चांग रसायण ॥१॥
ज्ञानाग्निहुताशी कडशिले वोज । आत्मसिद्धिकाजा लागूनिया ॥धृपद॥
ब्रम्ही ब्रम्हरस सिध्द झाला पाक । घेतला रुचक प्रतीतीमुखे ॥२॥
स्वानुभवे अंगी झाला समरस । साधनी निजध्यास ग्रासोग्रासी ॥३॥
अरोग्यता तुका पावला अष्टांगी । मिरविला रंगी निजात्मरंगे ॥४॥
अर्थ
प्रवृत्ती व निवृत्ती यांचे भाग आटवून चांगले भक्ती रसायन तयार होते व ते कसाला उतरते. प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही भागांना ज्ञानरुपी अग्नीवर चांगल्या प्रकारे कढविले केवळ आत्मसाक्षात्कार होण्याकरीता. त्यामुळे उत्तम प्रकारचे ब्रम्हरसरुपी भोजन तयार झाले व अनुभवरुपी मुखाने हे रुचकर ब्रम्हरसाचे भोजन मी अतिशय प्रेमाने सेवन केले. मग ते ब्रम्हरसाचे भोजन मी सेवन करत असताना प्रत्येक घासाघासाला मला आत्मसाक्षात्काराचा अनुभव येऊ लागला व तो आत्मसाक्षात्काराचा अनुभव माझ्या अंगी समरस झाला. तुकाराम महाराज म्हणतात, “या ब्रम्हरसाच्या सेवनाने माझे सर्वांग निरोगी झाले मला समाधानाचे आरोग्य लाभले व माझे सर्वांग निजात्म रंगामध्ये रंगून गेले व सर्वत्र मी शोभिवंत दिसू लागलो. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















