२४ ऑगस्ट, दिवस २३६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी १७६ ते २०० सार्थ तुकाराम गाथा अभंग २८२१ ते २८३२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२४ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २४ August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २४ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २८२१ ते २८३२ चे पारायण आपण करणार आहोत.
२४ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी १७६ ते २००

176-15
एऱ्हवी ऊर्ध्वीचे पार्था । मुद्दल मूळ पाहता । अधीचिया मध्यस्था । शाखा इया ॥176॥
एरवी अर्जुना, संसारवृक्षाचे वरच्या बाजूचे मुख्य अज्ञानरूपी मूळ जर पाहिले तर खाली वाढलेल्या शाखात मनुष्यप्राणी ह्या मध्यावर असलेल्या शाखा होत.
177-15
परी तामसी सात्त्विकी । सुकृतदुष्कृतात्मकी । विरुढती या शाखी । अधोर्ध्वींचिया ॥177॥
परंतु चांगल्या व वाईट कर्मांनी भरलेल्या ज्या सत्वगुणी व तमोगुणी वरच्या व खालच्या फांद्या आहेत त्यारूपाने मनुष्यरूपी शाखाच वाढतात.
178-15

आणि वेदत्रयाचिया पाना । नये अन्यत्र लागो अर्जुना । जे मनुष्यावाचूनि विधाना । विषय नाही ॥178॥
अर्जुना तीन वेदरूपी पाने ह्या मनुष्यरूपी शाखेशिवाय दुसर्‍या ठिकाणी लागत नाहीत, कारण की तिन्ही वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय दुसरे कोणी पात्र नाही.
179-15
म्हणौनि तनु मानुषा । इया ऊर्ध्वमूळौनि जरी शाखा । तरी कर्मवृद्धीसि देखा । इयेचि मूळे ॥179॥
म्हणून मनुष्यतनु ह्या जरी संसारवृक्षाच्या वरच्या मूळच्या दृष्टीने शाखा आहेत तरी कर्माच्या विस्ताराला याच शाखा मुळे आहेत असे समज.
180-15
आणि आनी तरी झाडी । शाखा वाढता मुळे गाढी । मूळ गाढे तव वाढी । पैस आथी ॥180॥
आणि इतर प्राकृत वृक्षांचेही असे आहे की त्यांच्या फांद्या जसजशा वाढतात तसतशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात. आणि जसजशी त्यांची मुळे जमिनीमधे खोल बळावलेली असतात, तसतसा त्या वृक्षांचा वरचा विस्तारही अधिकाधिक फैलावतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


181-15
तैसेचि इया शरीरा । कर्म तव देहा संसारा । आणि देह तव व्यापारा । ना म्हणोचि नये ॥181॥
या मनुष्यशरीराच्या बाबतीतही त्याचप्रमाणे आहे. (ते असे की) जेथेपर्यंत कर्मे आहेत तेथपर्यंत देहाचे रहाणे आहे आणि जेथेपर्यंत देह आहे तो पर्यंत कर्मे करण्यास नाही म्हणताच येत नाही,
182-15
म्हणौनि देहे मानुषे । इये मुळे होती न चुके । ऐसे जगज्जनके । बोलिले तेणे ॥182॥
म्हणून मनुष्य देह ही (या संसारवृक्षाच्या खालच्या व वरच्या शाखांची) मुळे आहेत. यात चूक नाही असे त्या जगाच्या जनकाने (श्रीकृष्णाने) सांगितले.
183-15
मग तमाचे ते दारुण । स्थिरावलेया वाउधाण । सत्त्वाची सुटे सत्राण । वाहुटळी ॥183॥
(सत्वगुणाची वावटळ सुटल्यावर होणारी वाढ) मग ती तमाची भयंकर सुटलेली वावटळ शांत झाल्यावर सत्वाची वावटळ जोराने सुटते.
184-15
तै याचि मनुष्याकारा । मुळी सुवासना निघती आरा । घेऊनि फुटती कोंबारा । सुकृतांकुरी ॥184॥
त्याचवेळी ह्याच मनुष्याकाररूपी मुळांस सुवासनारूपी मोड निघतात व ते मोड कोंबास येऊन (म्हणजे त्यास सद्वासना दृढ होऊन जातात), नंतर त्यास (त्या कोंबास) सत्कर्मरूपी अंकुर फुटतात.
185-15
उकलतेनि उन्मेखे । प्रज्ञाकुशलतेची तिखे । डिरिया निघती निमिखे । बाबळैजुनी ॥185॥
विकासणार्‍या ज्ञानाच्या योगाने बुद्धिचातुर्याचे तीक्ष्ण अंकुर एका क्षणात विस्तारून निघतात.


186-15
मतीचे सोट वांवे । घालिती स्फूर्तींचेनि थांवे । बुद्धि प्रकाश घे धावे । विवेकावरी ॥186॥
बुद्धीचे फोक स्फूर्तीच्या बळाने विस्ताराला पावतात व विवेकाच्या जोराने बुद्धी प्रकाशाला घेते. म्हणजे बुद्धीत प्रकाश पडतो.
187-15
तेथ मेधारसे सगर्भ । अस्थापत्री सबोंब । सरळ निघती कोंभ । सद्वृत्तीचे ॥187॥
त्यावेळी मेधारस म्हणजे धारणाशक्तिरूपी रस ज्याच्या आत भरलेला आहे व जे आस्था (आदर) रूपी पानांनी सुशोभित आहेत असे सद्वृत्तीचे सरळ कोंब फुटतात.
188-15
सदाचाराचिया सहसा । टका उठती बहुवसा । घुमघुमिति घोषा । वेदपद्याच्या ॥188॥
सदाचाराचे अंकुर एकदम पुष्कळच फुटतात व ते वेद पद्यांच्या गर्जना करू लागतात.
189-15
शिष्टागमविधाने । विविधयागविधाने । इये पानावरी पाने । पालेजती ॥189॥
श्रेष्ठ पुरुष व शास्त्रे यांनी सांगितले आचरण व नाना प्रकारच्या यज्ञांचे विस्तार हीच कोणी पानांवर पाने पसरतात.
190-15
ऐशा यमदमी घोंसाळिया । उठती तपाचिया डाहाळिया । देती वैराग्यशाखा कोवळिया । वेल्हाळपणे ॥190॥
अशा यमदमांचे घोस असलेल्या तपांच्या डहाळ्या उत्पन्न होतात व त्यास वैराग्यरूपी शाखा विस्ताराने आलिंगन देतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


191-15
विशिष्टा व्रतांचे फोक । धीराच्या अणगटी तिख । जन्मवेगे ऊर्ध्वमुख । उंचावती ॥191॥
आणि जे धैर्याच्या अंकुराने तीक्ष्ण असतात असे श्रेष्ठ व्रतरूपी फोक उत्पत्तीच्या वेगाने वर टोक असलेले असे, उंच वाढतात. श्रेष्ठव्रतांच्या योगाने वरवरचे जन्म त्यास प्राप्त होतात.
192-15
माजी वेदांचा पाला दाट । तो करी सुविद्येचा झडझडाट । जव वाजे अचाट । सत्त्वानिळु तो ॥192॥
जोपर्यंत सत्वगुणाचा प्रचंड वारा सुटतो, तोपर्यंत मनुष्यरूपी शाखेच्या मधे असलेला वेदरूपी दाट पाला विद्यांची, ज्ञानांची {झडझडाट} गर्जना करतो.
193-15
तेथ धर्मडाळ बाहाळी । दिसती जन्मशाखा सरळी । तिया आड फुटती फळी । स्वर्गादिकी ॥193॥
तेव्हा धर्मरूपी शाखेच्या विस्तारात जन्माच्या सरळ वाढलेल्या फांद्या दिसतात व त्या फांद्यांना स्वर्गादिक फळाने युक्त असे अनेक आडफाटे फुटतात.
194-15
पुढा उपरति रागे लोहिवी । धर्ममोक्षाची शाखा पालवी । पाल्हाजत नित्य नवी । वाढतीचि असे ॥194॥
पुढे रंगाने तांबड्या असलेल्या वैराग्यरूपी शाखेस धर्म व मोक्षरूप लुसलुशित पालवी नित्य नवीन येऊन वाढतच रहाते.
195-15
पै रविचंद्रादि ग्रहवर । पितृ ऋषी विद्याधर । हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥195॥
नंतर याच धर्मरूपी शाखेला सूर्य, चंद्र वगैरे श्रेष्ठ ग्रह, पितर, ऋषी, विद्याधर हे आणखी आडव्या शाखांचे प्रकार विस्तार घेतात. अभिप्राय असा की धर्माचरणापासून श्रद्धेनुसार हे लोक प्राप्त होतात.


196-15
याहीपासून उंचवडे । गुढले फळाचेनि बुडे । इंद्रादिक ते मांदोडे । थोर शाखांचे ॥196॥
ह्याही फांद्यांपेक्षा वर उंच गेलेल्या इंद्रादिक मोठ्या फांद्यांचे झुबके असून त्या फांद्यांची बुडे फळांनी झाकलेली असतात.
197-15
मग तयांही उपरी डाहाळिया । तपोज्ञानी उंचावलिया । मरीचि कश्यपादि इया । उपरी शाखा ॥197॥
मग त्याही डहाळ्यांवर (इंद्रादि शाखेवर) तपाने व ज्ञानाने उंच वाढलेल्या मरीचि-कश्यपादि वरल्या शाखा आहेत.
198-15
एवं माळोवाळी उत्तरोत्तरु । ऊर्ध्वशाखांचा पैसारु । बुडी साना अग्री थोरु । फळाढ्यपणे ॥198॥
याप्रमाणे वर असलेल्या शाखांचा शाखोपशाखी अधिक अधिक होणारा हा विस्तार या फांद्यांच्या बुडाशी लहान व शेंड्यास जास्त फळे असल्यामुळे थोर असा आहे.
199-15
वरी उपरिशाखाही पाठी । येती फळभार जे किरीटी । ते ब्रह्मेशांत अणगटी । कोंभ निघती ॥199॥
अर्जुना, शिवाय या वरच्या शाखांनंतर या संसारवृक्षाला जे फळभार येतात, ते ब्रह्मदेव आणि शंकररूपी अणकुचीदार कोंब येतात. अभिप्राय असा की ब्रह्मदेव आणि शंकर हेच फळभार आणि कोंब आहेत. कोंबही तेच व फळही तेच.
200-15
फळाचेनि वोझेपणे । ऊर्ध्वी वोवांडे दुणे । जव माघौते बैसणे । मूळीचि होय ॥200॥
हा संसारवृक्ष, मनुष्यरूपी शाखेत वरच्या भागाला इतका लवलेला आहे की ती मनुष्यरूपी शाखा (सत्कर्मांच्या) फळांच्या भाराने, मूळ जे माया, त्याला पुन्हा येऊन टेकते. ब्रह्माच्या जवळ येते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २३६ वा. २४, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २८२१ ते २८३२
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २८२१
माझ्या कपाळाच्या गुणे । किंवा सरलेंसे नेणे ॥१॥
नये वचन बाहेरी । उभे तिष्ठतसे दारी ॥धृपद॥
काय सांगायास वेचे । रीते आरंभी ठायीचे ॥२॥
तुका म्हणे किती । भीड धरावी पुढती ॥३॥
अर्थ
देवा हे माझ्या भाग्याचे गुण आहेत की तुझ्याजवळचे सर्व काही संपले आहेत हे मला काही समजत नाही. देवा मी बाहेर तुझ्या दारामध्ये तिष्ठत उभा आहे तुझे कोणतेही बोलणे मला ऐकू येत नाही. माझ्याजवळचे सर्व काही संपले आहे हे तू सुरवातीलाच सांगितले असते तर तुझ्याजवळचे काही खर्च झाले असते काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता तुझी भीड तरी पुढे किती दिवस धरावी ? ”
अभंग क्र. २८२२
काही एक तरी असावा आधार । कासयाने धीर उपजावा ॥१॥
म्हणविल्यासाठी कैसे पडे रुजु । धणी नाही उजू सन्मुख तो ॥धृपद॥
वेचल्या दिसांचा कोणावरी लेखा । घालावा हा सुखासुखा आम्ही ॥२॥
नाही मनोगत तोवरी देवा । तुका म्हणे सेवा नेघेजेतो ॥३॥
अर्थ
देवा मनुष्याला कोणता तरी काही तरी एक आधार असावा नाही तर कशाच्या जीवावर धीर धरावा ? जर धनीच समोर नसेल तर आपण बोललेले इतरांना मान्य कसे होईल ? व्यर्थ गेलेल्या दिवसांचा लेखा आम्ही कोणाच्या माथ्यावर देवा घालावा ? तुकाराम महाराज म्हणतात, “हे देवा जोपर्यंत तुमच्या मनात येणार नाही तोपर्यंत तुम्ही आमची सेवा घेणार नाही हे मला समजले आहे आणि हे मात्र निश्चिंत आहेच. ”
अभंग क्र. २८२३
मनाचिये साक्षी झाली सांगो मात । सकळ वृत्तांत आपला तो ॥१॥
तुम्हा परामृष घेता सत्ताबळे । धरिता निराळे कैसी वांचो ॥धृपद॥
मी माझे सांडून यावया पसारा । आणीक दातारा काय काज ॥२॥
तुका म्हणे आम्ही तुजविण एका । निढळे लौकिकामाजी असो ॥३॥
अर्थ
देवा माझ्या मनाला ज्या गोष्टीचा अनुभव आला आहे तो सर्व वृत्तांत मी तुमच्यापुढे सांगितला आहे. देवा तुम्ही तुमच्या सत्तेच्या बळावर आमचा परामर्श आमची विचारपूस घेता त्यामुळे आम्ही वाचतो नाहीतर तुम्ही आम्हाला तुमच्यापासून निराळे धरले असते तर आम्ही कसे वाचलो असतो ? हे दातारा “मी आणि माझे” हा पसारा मी सांडून तुमच्याकडे आलो आहे तुमच्याकडे येण्यासाठी दुसरे काही कारण आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा या भवसागरामध्ये प्रपंचामध्ये संसारामध्ये आम्ही कितीही वैभवसंपन्न, आमचा कितीही लौकिक असला तरी तुझ्यावाचून आम्ही निराळेच आहोत. ”
अभंग क्र. २८२४
उरले ते भक्तिसुख । डोळा मुख पाहावे । अंतरीचे का हो नेणा । नारायणा माझिया ॥१॥
पुरवा तैसी केली आळी । बळी जगदानिया ॥धृपद॥
हाती घेउनि चोरा भाते । दावा रिते बाळका । साजते हे थोरपण । नाही दिणवत्सला ॥२॥
शाहणे तरी लाड दावी । बाळ जेवी मातेसी । तुका म्हणे पांडुरंगा । ऐसे पै गा आहे हे ॥३॥
अर्थ
देवा आता डोळयाने तुझे मुख पाहावे एवढेच एक भक्तीसुख उरले आहे. हे नारायणा तुम्ही माझ्या अंत:करणातील काहीच जाणत नाही असे का बरे ? देवा तुम्ही जगाला दान देणारे बलवान दाता आहात त्यामुळे मी जसा हट्ट तुमच्यापाशी केला आहे तो हट्ट आता पूर्ण करा. देवा तुम्ही खाऊ चोरुन घेऊन लपून ठेवता व माझ्यासारख्या अज्ञानी बालकाला हात रिकामेच असल्याचे भासवता. हे दीनवत्सला तुमच्या थोरपणाला असे वागणे साजेसे दिसत नाही. मोठे मुलं शहाणे असतात तरीपण कधी कधी लाडात येतात आणि आईच्या हातानेच जेवण करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा असाच काही प्रकार आपल्या दोघाचा म्हणजेच देव आणि भक्ताचा आहे. ”
अभंग क्र. २८२५
तरी भले वाया गेलो । जन्मा आलो मागुता । म्हणऊनि ठेलो दास । सावकास निर्भये ॥१॥
उणे पुरे काय माझे । त्याचे ओझे तुम्हासी ॥धृपद॥
सांभाळावे ते म्या काईं । अवो आई विठ्ठले । भोग जया जाईन स्थळा । तुज गोपाळा विसरेंना ॥२॥
आपले म्या एकसरे । करुनि बरे घेतले । तुका म्हणे नारायणा । आता जाणा आपुले ॥३॥
अर्थ
देवा माझा मागचा जन्म तर वायाच गेला परंतू माझे काही तरी चांगले कर्म होते म्हणूनच मी पुन्हा मनुष्य जन्माला आलो हेच फार चांगले झाले. त्यामुळेच मी सावकाश आणि कोणत्याही प्रकारचे भय न धरता निर्भयपणाने तुझा दास होऊन राहिलो आहे. त्यामुळेच देवा आता माझ्या मते जे काही उणेपुरे आहे त्याचे सर्व भार तुमच्याच खांदयावर आहे. हे आई विठ्ठले मी काय काय सांभाळावे ? हे गोपाळा मी प्रारब्धाच्या आधीन आहे त्यामुळे ते भोगताना मी ज्या जन्माला जाईन तेथे गेलो तरी तुला विसरणार नाही. देवा मी माझे एकदमच चांगले करुन घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे नारायणा आता आपले काही कर्तव्य राहिले आहे हे तुम्ही जाणून घ्यावे. ”
अभंग क्र. २८२६
घालूनी लोळणी पडलो अंगणी । सिंचा सिंचवणी तीर्थ वरी ॥१॥
वोल्हावेल तनु होईंल शीतळ । झाली हळहळ बहुतापे ॥धृपद॥
पावेन या ठाया कई झाले होते । आलो अवचिते उष्ट्यावरी ॥२॥
तुका म्हणे कोणी जाणवा राउळी । येईल जवळी पांडुरंग ॥३॥
अर्थ
देवा मी तुमच्या अंगणी पडून तुम्हाला लोटांगण घातले आहे आता तुमच्या अंगावरचे तीर्थ तेवढे माझ्या अंगावर शिंपडा. म्हणजे माझी शरीरयष्टी पुष्ट होईल आणि त्रिविधतापाने जो माझ्या शरीरामध्ये अग्नी उत्पन्न झाला आहे त्यामुळे माझी खूप हळहळ होत आहे ते देखील शांत होईल. मी संतांजवळ केव्हा आलो असतो, परंतू आता अवचितच मी त्यांचे उष्टे खाण्यासाठी आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो कुणीतरी पाडूरंगाच्या देवळात जा आणि हा सर्व घडलेला प्रकार पाडूरंगाला सांगा म्हणजे तो माझ्याजवळ येईल. ”
अभंग क्र. २८२७
धरूनि हे आलो जीवी । भेटी व्हावी विठोबासी ॥१॥
संकल्प तो नाही दुजा । महाराजा विनवितो ॥धृपद॥
पायावरी ठेविन भाळ । येणे समुळ पावलो ॥२॥
तुका म्हणे डोळेभरी । पाहिन हरी श्रीमुख ॥३॥
अर्थ
विठोबाची भेट व्हावी हेच मनात धरुन मी येथे आलो आहे. महाराजा विठोबा शिवाय दुसरा कोणताही संकल्प माझ्या मनामध्ये नाही. मी माझे कपाळ त्याच्या पायावर ठेवीन मग मला सगळेच प्राप्त्‍ झाल्यासारखे होईल. तुकाराम महाराज म्हणतात, “एकदा मी माझे डोळे भरुन हरीचे श्रीमुख पाहीन. ”
अभंग क्र. २८२८
तुम्हा उद्धरणे फार । मज दुसरी नाही थार ॥१॥
आता जैसे तैसे सोसा । काय करणे हृषीकेशा ॥धृपद॥
बरे न दिसेल ओळी । एका अन्न एका गाळी ॥२॥
लाविता आभार । तुका विसरलेती फार ॥३॥
अर्थ
देवा तुम्हाला खूप भक्तांचा उद्धार करणे आहे परंतु मला तुमच्या वाचून दुसरीकडे कोठेही थारा नाही. त्यामुळे हे ऋषिकेषा आता आमचे जसे अपराध असतील तसे तुम्ही सहन करा न सहन करून तरी तुम्ही काय करणार आहात ? देवा एकाच पंक्तीत बसलेल्यांना जेवण वाढत असताना एकाला अन्न वाढायचे आणि एकाला नाही हे चांगले दिसणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही मला पार विसरले आहात परंतु सर्वत्र असे दाखवता की माझ्यावर फारच तुम्ही उपकार केलेले आहेत.
अभंग क्र. २८२९
न कळे जी भक्ती काय करू सेवा । संकोचोनि देवा राहिलोंसे ॥१॥
जोडोनिया कर राहिलो निवांत । पायापाशी चित्त ठेवूनिया ॥धृपद॥
दिशाभुली करी स्थळी प्रदक्षणा । भ्रमे नारायणा कष्टविले ॥२॥
तुका म्हणे झालो आज्ञेचा पाळक । जीवनासी एक ठाव केला ॥३॥
अर्थ
देवा मला भक्ती कळत नाही आणि सेवा कशी करावी हे ही समजत नाही त्यामुळे संकोच निर्माण झाला व मी स्वस्थ राहिलो. देवा मी माझे दोन्ही कर जोडून आणि तुमच्या पायाजवळ माझे चित्त ठेवून निवांत राहिलो आहे. हे नारायणा दिशाभूल झाली की मनुष्य जसा एकाच स्थळाला सारख्या चकरा मारत असतो त्याप्रमाणे भ्रमानेच मनुष्याला कष्ट होतात. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुमचा आज्ञाधारक झालो आहे आणि जीवन जगण्यासाठी तुमचा एक आश्रय केला आहे. ”
अभंग क्र. २८३०
एकविध वृत्ति न राहे अंतरी । स्मरणींच हरी विस्मृति हे ॥१॥
कैसा हा नवलाव वाटतो अनुभवे । मज माझ्या जीवे साक्षित्वेसी ॥धृपद॥
न राहे निश्चळि जागविता मना । किती क्षणाक्षणा सावरावे ॥२॥
तुका म्हणे बहु केले वेवसाव । तेणे रंगे जीव रंगलासे ॥३॥
अर्थ
हे हरी माझ्या अंतरामध्ये तुमच्याविषयी एक विध वृत्ती राहातच नाही तुमचे स्मरण करु गेले पाहाता थोडयाच वेळात विस्मृती होते. या माझ्या अनुभवाचे मला तर नवलच वाटते आणि ह्या अनुभवाविषयी माझा जीवच साक्षी आहे. माझ्या मनाला कितीही जागवण्याचा प्रयत्न केला सावध करण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते निश्चल राहातच नाही किती क्षणाक्षणाला त्याला किती सावरत बसावे ? तुकाराम महाराज म्हणतात, “मी आतापर्यंत प्रपंचाचा व्यवसाय खूप केला आहे आणि त्याच रंगात माझा जीव रंगला त्यामुळेच बहुतेक असे होत असेल. ”
अभंग क्र. २८३१
आता सोडवणे न या नारायणा । तरि मी न वांचेना काळा हाती ॥१॥
ऐसे सांगोनिया झालो उतराईं । आणीक ते काईं माझे हाती ॥धृपद॥
केलियाचे माप नये सेवटासी । करितील नासि अंतराय ॥२॥
तुका म्हणे भय वाटतसे जीवा । धावणिया धावा लवकरी ॥३॥
अर्थ
हे नारायणा तुम्ही जर मला संसारातून सोडवण्यासाठी आला नाहीत तर मी या काळाच्या हातून वाचणार नाही. देवा माझी सर्व व्यथा जी आहे मी ती तुमच्याजवळ व्यक्त केली आहे व माझे कर्तव्य पूर्ण केले आहे यापेक्षा माझ्या हातात वेगळे काय आहे ? मी जो काही परमार्थ करण्याचा माप केला आहे तो शेवटापर्यंत जाईन असे मला काही वाटत नाही कारण माझ्या अंत:करणातील विकारच त्याचा नाश करतील. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा माझ्या जीवाला फार भय वाटत आहे त्यामुळे या काळाच्या हातून मला वाचवण्यासाठी धाव घेऊन तुम्ही माझ्याकडे यावे. ”
अभंग क्र. २८३२
सत्य माप वाढे । गाबाळाची चाली खोडे ॥१॥
उत्तरे ते कळे कसी । विखरोनि सर्वदेशी ॥धृपद॥
घरामध्ये राजा । नव्हे हो पट्ट पूजा ॥२॥
तुका म्हणे साचे । रूप ते दर्पणीचे ॥३॥
अर्थ
जगामध्ये सत्याला वाढते माप असते आणि जे लबाड गबाळ खोटे आहे त्याला जग नांव ठेवीत असते हीच जगाची परंपरा आहे. खरा कसाला उतरलेला माल एकदा कळाला की त्याचा प्रचार सर्व देशामध्ये होतो. घरामध्ये बसून राजा कोणी होत नसतो तर त्यासाठी त्याची पट्टपूजा म्हणजे त्याचा राज्याभिषेक व्हावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, “आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसते ते खरे नसते तर ज्याचे प्रतिबिंब असते तो खरा असतो म्हणजेच जे सत्य आहे त्याला किंमत आहे आणि असत्य वस्तूला किंमत नाही. ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading