आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१७ जुलै, दिवस १९८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ८२६ ते ८५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २३६५ ते २३७६
“१७ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १७ July
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १७ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २३६५ ते २३७६ चे पारायण आपण करणार आहोत.
१७ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ८२६ ते ८५०,
826-13
आणि आत्मा गोचरु होये । ऐसी जे विद्या आहे । ते आइकोनि डौर वाहे । विद्वांसु जो ॥826॥
(अज्ञानाची लक्षणे अध्यात्मज्ञानाची नावड)
आणि आत्म्याचा साक्षात्कार होईल अशी जी विद्या ब्रह्मविद्या आहे ती ऐकून जो (अध्यात्मशास्त्राव्यतिरिक्त इतर पढलेला) विद्वान ज्या ब्रह्मविद्येची निंदा करतो.
827-13
उपनिषदांकडे न वचे । योगशास्त्र न रुचे । अध्यात्मज्ञानी जयाचे । मनचि नाही ॥827॥
जो उपनिषदांकडे जात नाही, ज्याला योगशास्त्र आवडत नाही, आणि अध्यात्मज्ञानाचे ठिकाणी ज्याचे लक्षच लागत नाही.
828-13
आत्मचर्चा एकी आथी । ऐसिये बुद्धीची भिंती । पाडूनि जयाची मती । वोढाळ जाहली ॥828॥
आत्मनिरूपण म्हणून काही एक महत्वाची गोष्ट आहे, अशा समजुतीची भिंत (मर्यादा) पाडून ज्याची बुद्धि स्वैर भटकणारी झाली आहे,
829-13
कर्मकांड तरी जाणे । मुखोद्गत पुराणे । ज्योतिषी तो म्हणे । तैसेचि होय ॥829॥
तो सर्व कर्मकांड जाणतो, पुराणे त्याला तोंडपाठ आहेत आणि जो ज्योतिषशास्त्रात इतका निष्णात आहे की तो भविष्य करेल तसे घडते.
830-13
शिल्पी अति निपुण । सूपकर्मींही प्रवीण । विधि आथर्वण । हाती आथी ॥830॥
कलाकौशल्याच्या कामात अति निपुण असतो, पाकक्रियेत अति प्रवीण असतो, व अथर्वन वेदाचे विधि (मंत्रशास्त्राचे जारण-मारण-उच्चाटान वगैरे विधी) त्याला हस्तगत झालेले असतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
831-13
कोकी नाही ठेले । भारत करी म्हणितले । आगम आफाविले । मूर्त होती ॥831॥
कामशास्त्रात त्याला काही जाणावयाचे शिल्लक राहिलेले नाही, भारत तर त्याला पाठ असते आणि मंत्रशास्त्रही मूर्तिमंत त्याच्या स्वाधीन झालेले असते.
832-13
नीतिजात सुझे । वैद्यकही बुझे । काव्यनाटकी दुजे । चतुर नाही ॥832॥
नीतिसंबंधीची सर्व शास्त्रे त्यास अवगत असतात, वैद्यकशास्त्र जो जाणतो व काव्यात व नाटकात त्याहून दुसरा कोणी चतुर नाही.
833-13
स्मृतींची चर्चा । दंशु जाणे गारुडियाचा । निघंटु प्रज्ञेचा । पाइकी करी ॥833॥
स्मृतीचा विचार त्याला कळतो, इंद्रजाल विद्येचे मर्म त्याला कळते व वैदिक शब्दांच्या कोशाला तो आपल्या बुद्धीचा चाकर करतो.
834-13
पै व्याकरणी चोखडा । तर्की अतिगाढा । परी एक आत्मज्ञानी फुडा । जात्यंधु जो ॥834॥
तो व्याकरणशास्त्रात अति प्रवीण, तर्कशास्त्रात फार पटाईत असतो. परंतु एक अध्यात्मशास्त्रात जो खरोखर जन्मांध आहे,
835-13
ते एकवाचूनि आघवा शास्त्री । सिद्धांत निर्माणधात्री । परी जळो ते मूळनक्षत्री । न पाहे गा ॥835॥
त्या एका अध्यात्म- ज्ञानावाचून इतर सर्व शास्त्रांच्या सिद्धांतास निर्माण होण्याची तो पृथ्वीच आहे, (असा जरी तो असला) तरी पण त्याच्या त्या सर्व ज्ञानाला आग लागो. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला आईबापांनी पाहू नये, तसे तू त्याच्याकडे पाहू नकोस.
836-13
मोराआंगी अशेषे । पिसे असती डोळसे । परी एकली दृष्टि नसे । तैसे ते गा ॥836॥
मोराच्या अंगावर जशी डोळेवाली पिसे पुष्कळ असतात, परंतु मोर ज्या आपल्या दृष्टीने पहातो ती एकटी दृष्टि त्या मोरास जर नसली तर त्या पिसांवरील डोळ्यांचा जसा काही एक उपयोग नाही, त्याप्रमाणे अर्जुना, एका अध्यात्मज्ञानावाचून त्याच्या इतर ज्ञानाचा काही उपयोग नाही.
837-13
जरी परमाणूएवढे । संजीवनीमूळ जोडे । तरी बहु काय गाडे । भरणे येरे ? ॥837॥
परमाणू एवढे जर संजीवनी वनस्पतीचे मूळ मिळाले तर इतर पुष्कळशा गाडे भरून असलेल्या वनस्पतीच्या मुळ्या काय करावयाच्या आहेत ?
838-13
आयुष्येवीण लक्षणे । सिसेवीण अळंकरणे । वोहरेवीण वाधावणे । तो विटंबु गा ॥838॥
ज्याप्रमाणे आयुष्याशिवाय इतर सर्व सामुद्रिक उत्तम चिन्हे आहेत अथवा शीर नसलेल्या केवळ धडास जसे अलंकार घालावेत अथवा नवरानवरिशिवाय जसा वर्धावा काढावा, ही जशी केवळ विटंबना आहे.
839-13
तैसे शास्त्रजात जाण । आघवेचि अप्रमाण । अध्यात्मज्ञानेविण । एकलेनी ॥839॥
त्याप्रमाणे एका अध्यात्मज्ञानावाचून ते इतर सर्व शास्त्रांचे ज्ञान पूर्णपणे अप्रमाण आहे असे समज.
840-13
यालागी अर्जुना पाही । अध्यात्मज्ञानाच्या ठायी । जया नित्यबोधु नाही । शास्त्रमूढा ॥840॥
याकरता अर्जुना, असे पहा की ज्या शास्त्रमूढाला अध्यात्मज्ञानाचे ठिकाणी नित्य जागृति नाही
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
841-13
तया शरीर जे जाले । ते अज्ञानाचे बी विरुढले । तयाचे व्युत्पत्तितत्व गेले । अज्ञानवेली ॥841॥
त्याला शरीर जे प्राप्त झाले, ते अज्ञानाच्या बीजाचा अंकूरच होय. आणि त्याची विद्वत्ता ही अज्ञानाचा वेल (विस्तार) आहे.
842-13
तो जे जे बोले । ते अज्ञानचि फुलले । तयाचे पुण्य जे फळले । ते अज्ञान गा ॥842॥
तो जे जे बोलतो, ते फुललेले अज्ञानाचे झाडच आहे व, त्याची जी पुण्यकर्मे आहेत, ते अज्ञानच फळास आलेले आहे.
843-13
आणि अध्यात्मज्ञान काही । जेणे मानिलेचि नाही । तो ज्ञानार्थु न देखे काई । हे बोलावे असे ? ॥843॥
आणि ज्याने अध्यात्मज्ञानाला कधीच मानले नाही तो ज्ञानाचा विषय जे ब्रह्म त्यास पहात नाही, हे सांगावयास पाहिजे काय ?
844-13
ऐलीचि थडी न पवता । पळे जो माघौता । तया पैलद्वीपीची वार्ता । काय होय ? ॥844॥
नदीच्या अलीकडच्या काठाला आला नाही, तोच जो माघारी पळून जातो, त्याला नदीच्या पलीकडच्या बेटाची खबर काय ठाऊक असणार ?
845-13
का दारवंठाचि जयाचे । शीर रोविले खाचे । तो केवी परिवरीचे । ठेविले देखे ? ॥845॥
अथवा घराच्या दाराच्या उंबर्यातच ज्याचे मस्तक कापून खाचेत पुरले आहे, तो घरात ठेवलेले पदार्थ कसे पाहील ?
846-13
तेवी अध्यात्मज्ञानी जया । अनोळख धनंजया । तया ज्ञानार्थु देखावया । विषो काई ? ॥846॥
त्याप्रमाणे अर्जुना अध्यात्मज्ञानाशी ज्याचा मुळीच परिचय नाही, त्याला ज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म ते समजण्याला विषय होईल काय ?
847-13
म्हणौनि आता विशेषे । तो ज्ञानाचे तत्त्व न देखे । हे सांगावे आंखेलेखे । न लगे तुज ॥847॥
म्हणून आता तो ज्ञानाचे तत्व पहात नाही, हे तुला आकडे मांडून लिहून विशेष सांगावयास नको.
848-13
जेव्हा सगर्भे वाढिले । तेव्हाचि पोटीचे धाले । तैसे मागिले पदे बोलिले । तेचि हो ॥848॥
अज्ञानाची लक्षणे = ज्ञानलक्षणांच्या उलट
जेव्हा गरोदर स्त्रीला जेवावयास वाढावे, तेव्हाच तिच्या पोटातले मूल तृप्त होते. त्या मुलास निराळे वाढणे नको. त्याप्रमाणे वरती ज्ञानाचे जे वर्णन केले गेले, त्यात अज्ञानाच्या लक्षणांचा अंतर्भाव होत आहे.
849-13
वाचूनिया वेगळे । रूप करणे हे न मिळे । जेवी अवंतिले आंधळे । ते दुजेनसी ये ॥849॥
वास्तविक पाहिले तर मागे वर्णन केलेल्या पदाहून निराळे वर्णन करावयास नको. आंधळा मनुष्य जेवावयाला बोलावला असता तो दुसर्या डोळस वाटाड्याला बरोबर घेऊन यावयाचा तसेच हेही आहे असे समज.
850-13
एवं इये उपरती । ज्ञानचिन्हे मागुती । अमानित्वादि प्रभृती । वाखाणिली ॥850॥
याप्रमाणे ही अमानित्वादि ज्ञानाची चिन्हे पुन्हा उलट रीतीने सांगितली.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १९८ वा. १७, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २३६५ ते २३७६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २३६५
वैष्णव मुनि विप्रांचा सन्मान । करावा आपण घेऊ नये ॥१॥
प्रभु जाला तरी संसाराचा दास । विहित तयासी यांची सेवा ॥२॥
तुका म्हणे हे आशीर्वादे बळी । जाईल तो छळी नरकायासी ॥३॥
अर्थ
साधकाने वैष्णवाचा मुनीजणांचा व संन्यासीचा सन्मान करावा परंतु आपला सन्मान करून घेऊ नये. एखादा बलाढ्य राजा असला तरी देखील तो संसाराचा दासच असतो त्यामुळे सर्व जिंकणारे वैष्णव मुनी व सन्यासी त्यांची सेवा करणे शास्त्रविहित आहे. तुकाराम महाराज म्हणतात संत, वैष्णव आणि संन्यासी यांच्यामध्ये आशीर्वाद देण्याचे बल असते म्हणजे सामर्थ्य असते मग त्यांचा छळ जो करेल तो नरकात जाईल.
5:28
अभंग क्र. २३६६
देव वसे चित्ती । त्याची घडावी संगती ॥१॥
ऐसे आवडते मना । देवा पुरवावी वासना ॥धृपद॥
हरीजनासी भेटी । नहो अंगसंग तुटी ॥२॥
तुका म्हणे जिणे । भले संतसंघष्टणे ॥३॥
अर्थ
ज्यांच्या चित्तात देवाचे वास्तव्य आहे त्यांची संगती मला घडू द्यावी. देवा हेच माझ्या मनाला आवडते व हीच इच्छा माझी तुम्ही पुर्ण करा. हरिजनांची भेट घडावी व भेट झाल्यानंतर त्यांच्या अंग संगती चा वियोग घडू नये. तुकाराम महाराज म्हणतात जीवन जगताना संतांची संगती आयुष्यभर घडावी हे केव्हाही चांगले आहे.
5:31
अभंग क्र. २३६७
भाग सीण गेला । माझा सकळ विठ्ठला ॥१॥
तुझा म्हणवितो दास । केली उिच्छष्टाची आस ॥धृपद॥
राहिली तळमळ । तई पासोनी सकळ ॥२॥
तुका म्हणे धाले । पोट ऐसे कळो आले ॥३॥
अर्थ
माझा सर्व शीण भागच गेला आहे. कारण मी तुझा स्वतःला दास म्हणून घेतले आहे व तुझ्या उच्छिष्टाची इच्छा केली आहे. जेव्हा पासून मी स्वतःला तुझा दास म्हणून घेतले आहे तेव्हापासून माझी सर्व तळमळ निवांत होऊन राहिली आहे.
5:32
अभंग क्र. २३६८
रायाचे सेवक । सेवटीचे पीडी रंक ॥१॥
हा तो हिणाव कवणा । का हो नेणा नारायणा ॥धृपद॥
परिसेंसी भेटी । नव्हे लोहोपणा तुटी ॥२॥
तुझे नाम कंठी । तुक्या काळासवे भेटी ॥३॥
अर्थ
राजाच्या सेवकाला जर एखाद्या दरिद्री भिकाऱ्याने त्रास दिला तर, हे नारायणा मग यामध्ये कोणाचा हीन पणा झाला हे तुम्हाला कळत नाही काय ? लोखंडाची परीसा बरोबर भेट होऊन देखील लोखंडाचे सोने झाले नाही तर. तुकाराम महाराज म्हणतात तुझे नांव माझ्या कंठात असून देखील माझी काळा बरोबर भेट झाली तर यात हिन पणा कोणाचा आहे हे नारायणा ते तुम्हीच समजून घ्यावे.
5:33
अभंग क्र. २३६९
सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा । माझ्या पांडुरंगा सारिखेंते ॥१॥
न लगे हिंडणे मुंडणे ते काही । साधनाची नाही आटाआटी ॥धृपद॥
चंद्रभागे स्नान विध तो हरीकथा । समाधान चित्ता सर्वकाळ ॥२॥
तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ । विशेष तो लाभ संतसंग ॥३॥
अर्थ
माझ्या पांडुरंगा सारखे सुखरूप या जगामध्ये दुसरे कोण आहे ते सांगा ? पंढरीला सोडून इतर कोठेही जाण्याची गरज नाही हिंडण्याची गरज नाही आणि पंढरीत गेल्यावर मुंडण करण्याची गरज नाही व इतर साधना करण्याची आवश्यकता नाही. पंढरीत गेल्यानंतर चंद्रभागेचे स्नान करावे व हरिकथा ऐकावी हाच विधी आहे व त्याने सदासर्वकाळ चित्ताला समाधान मिळते. तुकाराम महाराज म्हणतात पंढरीमध्ये हरिनामाचा व जीव ब्रम्ह ऐक्याचा अवैध रुप काला आहे व हा लाभ वैकुंठाचे देखील दुर्लभ आसून हा विशेष लाभ संत संगतीने प्राप्त होतो.
5:33
अभंग क्र. २३७०
नसता अधिकार । उपदेशासी बलात्कार । तरि ते केले हो चार । माकडा आणि गारूडी ॥१॥
धन धान्य राज्य बोल । वृथा रंजवणे फोल । नाही तेथे ओल । बीज वेची मूर्ख तो ॥धृपद॥
नये बांधो गाठी । पदरा आण ऐसी तुटी । असोन कसोटी । शिष्टाचारअनुभव ॥२॥
उपदेसी तुका । मेघ वृष्टीने आइका । संकल्पासी धोका । सहज ते उत्तम ॥३॥
अर्थ
ब्रम्हज्ञान नसताना उपदेशाचा जर बलात्कार म्हणजे बळजबरी केली तर, तो प्रकार म्हणजे गारुडयाने वानराला नाचवल्या सारखा होईल. जरी कोणी सांगितले धन धान्य मिळवावे, राज्य संपादन करावे, तर हे बोल ऐकण्यास जरी समाधानकारक असले तरी ते फोलफटा प्रमाणेच आहे. आणि अधिकार नसताना ब्रम्हज्ञानाचा जो उपदेश करतो तो प्रकार म्हणजे जमिनीत ओल असताना बीज पेरणे असा होतो आणि जो जमिनीत ओल नसताना बीज पेरतो त्याला मूर्खच म्हणावे. श्रेष्ठ लोक हे वेदाने सांगितल्याप्रमाणे आचरण करतात व जगाला तसे आचरण करायला लावतात कारण त्यांच्या ठिकाणी त्याला अनुभवाचा भक्कम आधार असतो. आणि आपल्या पदरात पाप बांधले जाईल असे काही वर्तन करू नये. तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला मेघवृष्टीने उपदेश करत आहे तो तुम्ही ऐका व्यर्थ अभिमान धरून कोणाला काही सांगणे या मध्ये फार मोठा धोका असून सहज रीतीने मी जे काही सांगत आहे ते चांगले सांगत आहे व ते उत्तम आहे.
5:34
अभंग क्र. २३७१
घालुनिया मापी । देवभक्त बैसले जपी ॥१॥
तैसी होते सांडउलंडी । निजनिजांची मुर्कुंडी ॥धृपद॥
अमुपी उखते । आपण वोस आपण याते ॥२॥
देव आता जाला । उगवे संकोच वहिलाऊ ॥३॥
अखंड नेले वेठी । भार सत्याविण गाठी ॥४॥
आडकिला झोपा । रिता कलेवरचा खोंपा ॥५॥
गोदातीरी आड । करिते करविते द्वाड ॥६॥
तुका म्हणे बळे । उपदेशाचे तोंड काळे ॥७॥
अर्थ
काही मूर्ख देवभक्त देवाला विशिष्ट मापा मध्ये घालून जप करण्यास बसतात. देहाचे मुरकुंडी करून नित्य नीज देवाची पूजा करायची असते परंतु विशिष्ट मापात देवाला घालून पूजा केली तर देवाची सांडलवंड केल्यासारखे होते. अमर्यादित परमात्म्याला मर्यादित समजणे यामध्ये देवाचा कोणत्याही प्रकारचा लहानपणा येत नसून उलट आपणच आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी ओस असल्यासारखे म्हणजे आपल्याच स्वरूपाला नाहीसे केल्यासारखे होते. काही लोक आपल्या शिष्यांना सांगतात की देवाचा या या वेळी जन्म झाला या या वेळी त्याचा अवतार समाप्त झाला परंतु तसे काहीही नसून हा संकोच पहिला टाकून द्यावा. असे सांगणारे काही लोक आहेत व ऐकणारेही लोक आहेत परंतु हे दोघेही अखंड जन्ममरणाचे वेठबिगारी करतात व सत्य समजून न घेता इतर माईक पदार्थांचा भार आपल्या पदरात बांधुन घेतात. असे लोक आपल्या रिकाम्या देहरूपी झोपडीत भ्रमाचे झडप म्हणजे दार लावून आत्म्याला त्यामध्ये अडकवून ठेवतात. हा प्रकार म्हणजे कसा होतो तर एखाद्याने गोदावरीच्या तीरावरच स्नान करण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी आड किंवा विहीर खाणावी असा मूर्खपणाचा हा प्रकार होतो. तुकाराम महाराज म्हणतात काही ठिकाणी नको ते उद्देश ब�
5:34
अभंग क्र. २३७२
उंबरांतील कीटका । हेचि ब्रम्हांड ऐसे लेखा ॥१॥
ऐसी उंबरे किती झाडी । ऐशी झाडे किती नवखडी ॥धृपद॥
हे चि ब्रम्हांड आम्हासी । ऐसी अगणित अंडे कैसी ॥२॥
विराटाचे अंगी तैसे । मोजू जाता अगणित केंश ॥३॥
ऐशा विराटाच्या कोटी । सांटवल्या ज्याच्या पोटी ॥४॥
तो हा नंदाचा बाळमुकुंद । तान्हा म्हणवी परमानंद ॥५॥
ऐशी अगम्य ईश्वरी लीळा । ब्रह्मानंदी गम्य तुक्याला ॥६॥
अर्थ
उंबरातील किडकाला हे उंबरच म्हणजे सर्व ब्रह्मांड आहे असे वाटते. अशी उंबरे त्या झाडाला किती असतात आणि असे उंबराची झाडे नवखंडा मध्ये किती असतात ? आम्हाला जे दिसतं तेच आमच्यासाठी ब्रह्मांड वाटते परंतु असे अगणित ब्रह्मांड आहेत जे विराटाच्या एका केसावर आहेत. असे विराटाच्या अंगावर अगणित केस आहेत ते मोजू गेले तर मोजताही येत नाहीत. असे कोट्यावधी विराट आहेत आणि हे सर्व ज्याच्या पोटात साठवले गेले आहेत. असा हा नंदाचा बाळ मुकुंद आहे एवढा व्यापक हा परमानंद असूनदेखील स्वतःला तान्हे लेकरू म्हणून घेत आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशी ही ईश्वराची अगम्य लिला आहे परंतु केवळ ब्रम्हज्ञान झाल्यामुळे मला ही ईश्वराची लिला समजली आहे.
5:35
अभंग क्र. २३७३
ब्रम्हज्ञान तरी एके दिवसी कळे । तात्काळ हा गळे अभिमान ॥१॥
अभिमान लागे शुकाचिये पाठी । व्यासे उपराटी दृष्टी केली ॥धृपद॥
जनकभेटीसी पाठविला तेणे । अभिमान नाणे खोटे केले ॥२॥
खोटे करूनिया लाविला अभ्यासी । मेरुशिखरासी शुक गेला ॥३॥
जाऊनिया तेणे साधिली समाधी । तुका म्हणे तधी होतो आम्ही ॥४॥
अर्थ
ब्रम्हज्ञान जर एका दिवसात कळाले असते तर सर्वाचा अभिमान तात्काळ गळून गेला असता. सर्व विकारांना जिंकणार्या शुकांच्या मागे देखील अभिमान लागला होता नंतर त्यांना व्यासांनी त्यांची अंतरमुख दृष्टी केली. त्यांना मुद्दामून जनकाच्या भेटीसाठी व्यासांनी पाठविले व देहाभिमानाचे खोटे नाणे आहे हे सिद्ध केले. देहाभिमान हा खोटा आहे हे सिद्ध करून दाखवल्या नंतर शुकाचारी मेरुपर्वतावर अभ्यासासाठी गेला. तुकाराम महाराज म्हणतात मग शुकाचार्यने मेरू पर्वतावर जाऊन समाधी साधली आणि हा सर्व प्रकार ज्या काळात चालू होता त्यावेळी आम्ही तेथे उपस्थित होतो.
5:35
अभंग क्र. २३७४
सहज पावता भगवंती । परि ही विकल्पे परती । फुकाची हे चित्ती । आठवण न धरिती ॥१॥
हरी व्यापक सर्वगत । हे तव मुख्यत्वे वेदात । चिंतनासी चित्त । असो द्यावे सावध ॥धृपद॥
विरजाहोम याचि नावे । देह नव्हे मी जाणावे । मग का जी यावे । वरी लागे संकल्पा ॥२॥
कामक्रोधे देह मिळण । स्वाहाकारी कैचे पुण्य । मंत्री पूजियेला यज्ञाने । मनमुंडण नव्हेचि ॥३॥
अनन्यभक्तीचे उपाय । ते या विठोबाचे पाय । ध्याइल तो काय । जाणे चुको मारग ॥४॥
आता सांगे तुका । एक तुम्ही चुको नका । सांडीमांडी धोका । शरण रिघता गोमटे ॥५॥
अर्थ
कोणतेही कर्म सहजरीतीने केले तर ते भगवंताला सहज अर्पण होते परंतु कर्माचा कर्ता मी आहे असा जर अभास झाला, तर आपण केलेले कर्म हे हरी कडे न जाता पुन्हा आपल्याकडे येतात, आपण जर म्हटलं की हे कर्म हरीचेच आहे तर ते हरिला अर्पण होते ही आपल्या चित्तात आठवण धरत रहावी. हरी हा सर्वत व्यापक आहे आणि हाच वेदाचा मुख्य सिद्धांत आहे. त्यामुळे हरीचे चिंतन करण्यासाठी आपले चित्त नेहमी सावध असू द्यावे. संन्यासश्रम स्वीकारताना विरीजाहोम करावा लागतो या होमाचा अर्थ असा होतो की मी देह नाही मी आत्मा आहे. मग विरजा होम केला तरी ज्याने संन्यासाश्रम स्वीकारला आहे त्याने पुन्हा मी देह आहे या संकल्पावर का बर यावे ? देहामध्ये काम क्रोध आहे अंतरंग विकारांनी मलिन झाली आहे मग यज्ञकर्मात स्वहा करण्यात कसले पुण्य आहे ? वासनेचे मुंडनच झाले नाही तर यज्ञात मंत्र उच्चारून व पूजा करून काय उपयोग आहे ? हे सर्व साधने करण्यापेक्षा सर्व साधनांचे उपाय करण्यापेक्षा हरी प्राप्ती करून घेण्याचा एकच उप�
5:36
अभंग क्र. २३७५
आह्मी जाणावे ते काई । तुझे वर्म कोणे ठायी । अंतपार नाही । ऐसे श्रुति बोलती ॥१॥
होई मज तैसा मज तैसा । साना सकुमार हृषीकेशा । पुरवी माझी आशा । भुजा चारी दाखवी ॥धृपद॥
खालता सप्तही पाताळा । वरता स्वर्गाहूनि ढिसाळा । तो मी मस्यक डोळा । कैसा पाहो आपला ॥२॥
मज असे हा भरवसा । पढीये वोसी तया तैसा । पंढरीनिवासा तुका । म्हणे गा विठोबा ॥३॥
अर्थ
देवा आम्ही अज्ञानी आहोत तुझ्या स्वरूपाचे मुख्य वर्म कोणते आहे हे आम्ही कसे जाणावे ? कारण तुझ्या स्वरूपाचा अंत पार नाही असे श्रुती सांगत आहे. त्यामुळे हे ऋषिकेशा मला जसा तु हवा हवा वाटतो तसाच तु सुकुमार लहान व्हावे. आणि देवा तुझी चतुर्भुज रूप दाखवून माझी इच्छा तु पूर्ण कर. देवा तुझे स्वरूप म्हणजे सप्तपाताळा पेक्षा खाली सप्त स्वर्गाच्याही पलीकडचे आहे. असा मी लहान आहे आणि तुझे स्वरूप मी माझ्या डोळ्याने कसे पाहू शकेल ? तुकाराम महाराज म्हणतात मला माहित आहे ज्या भक्ताला जसे तुझे रूप आवडेल तसा तु होतोस. हे पंढरीनाथा विठोबा असा तु आहेस.
5:36
अभंग क्र. २३७६
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षी ही सुस्वरे आळविती ॥१॥
येणे सुखे रुचे एकाताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृपद॥
आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथे मन क्रीडा करी ॥२॥
कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥३॥
हरीकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवू रुची ॥४॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणासी ॥५॥
अर्थ
या पृथ्वीतलावरील जेवढी काही वृक्ष आहेत वेली आहेत जेवढे काही वनचर पशु आहेत ते सर्व आमचे सोयरे आहेत आणि सुस्वर कंठाने आळवणारे पक्षी देखील आमचे जिवलग आहेत. आणि जास्त प्रकारचे वृक्ष वेली वनचर पशू-पक्षी हे वनात आढळतात आणि वनात एक वेगळेच सुख आहे तेथे एकातही आहे व आम्हाला एकातवासाची खूप आवड आहे. तेथे गेले की मग कोणत्याही प्रकारचा गुणदोष आपल्या अंगी येत नाही. वनामध्ये आकाशाचे मंडप आणि पृथ्वी आमचे आसण आहे तेथेच आम्हाला खूप करमते कधी कधी तर आम्ही तेथे आनंदाने क्रीडा ही करतो म्हणजेच खेळ खेळतो. देहा निर्वाहाकरता आमच्याजवळ गोधडी व पाणी पिण्यास एक कमंडलू आहे आणि वेळेची ज्ञान करून देण्याकरता आम्हाला वाऱ्याच्या गतीवरून वेळेचे ज्ञान होते. हरिकथा हे आमचे भोजन आहे त्याचा आम्ही विस्तार करू आणि हरिकथेची वेगवेगळे प्रकार करून आम्ही आवडीने सेवन करू. तुकाराम महाराज म्हणतात वनात आम्ही एकटे असल्यामुळे आम्ही आमच्या मनाशी संवाद करतो आणि परमार्थ विषयी आम्ही आमच्याशी संवाद साधून चर्चा करत असतो.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















