८ सप्टेंबर, दिवस २५१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ५५१ ते ५७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३००१ ते ३०१२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“८ सप्टेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 8 September
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ८ सप्टेंबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३००१ ते ३०१२ पारायण आपण करणार आहोत.
८ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ५५१ ते ५७५,

551-15
पै नेणतयाप्रती । रुपेपणाची प्रतीती । रुपे न होनि शुक्ती । दावी जेवी ॥551॥
किंवा, ज्याप्रमाणे, शुक्ति स्वतः रूपे न होता नेणत्याला रुप्याचा भास होण्यास कारण होते 51
552-15
का नाना अलंकारदशे । सोने न लपत लपाले असे । विश्व न होनिया तैसे । विश्व जो धरी ॥552॥
नित्य प्रकट असणारे सोने अलंकाररूपाने स्थित असले म्हणजे नेणत्यांना लपाल्यासारखे होऊन त्यांना फक्त अलंकारच दिसतात; याप्रमाणे उत्तम पुरुष आपण केव्हांही विश्व न होता नेणत्यांच्या दृष्टीला दिसणाऱ्या विश्वाचा आधार आहे. 52
553-15
हे असो जलतरंगा । नाही सिनानेपण जेवी गा । तेवी दिसता प्रकाशु जगा । आपणचि जो ॥553॥
हे असो. जल व त्यावरील लाटा ह्यात जशी भिन्नता नसते (पाण्याच्या अस्तित्वावरच लाटांचे अस्तित्व असते) त्याप्रमाणे, उत्तम पुरुषाच्या अस्तितेवरच नांदनारे जगत् (अन्वयदृष्टीने) त्याहून वेगळे नाही 53
554-15
आपुलिया संकोचविकाशा । आपणचि रूप वीरेशा । हा जळी चंद्र हन जैसा । समग्र गा ॥554॥
केवळ चंद्राच्या संकोच विकासावरच जसा त्याच्या प्रतिबिंबाचा संकोच विकास अवलंबून आहे, त्याप्रमाणे आत्म्याचे प्रगट होणे अगर स्वरूपावस्थान असणे ह्यावर विश्वाचा प्रकटपणा अगर लोप अवलंबून आहे. 54
555-15
तैसा विश्वपणे काही होये । विश्वलोपी कही न जाये । जैसा रात्री दिवसे नोहे । द्विधा रवि ॥555॥
तसाच विश्वस्थितीत तो काही होतही नाही अगर विश्वाच्या लोपाने तो कोठे जातही नाही. (आहे तसाच असतो ) ह्याला उदाहरण, रात्र आणि दिवस हे सूर्याच्या ठिकाणी भेद उत्पन्न करू शकत नाहीत. 55


556-15
तैसा काहीचि कोणीकडे । कायिसेनिहि वेची न पडे । जयाचे सांगडे । जयासीचि ॥556॥
याप्रमाणे तो कशांतही नसतो, कशानेहि न्यूनता पावत नाही; म्हणून तो कसा आहे हे सांगणे झाल्यास त्याच्यासारखाच तो आहे असे म्हणावे लागते. 56
यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः ।
अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥15. 18॥
557-15
जो पापियाचा आपणपेचि आपणया । प्रकाशीतसे धनंजया । काय बहु बोलो जया । नाही दुजे ॥557॥
अन्यप्रकाशनिरपेक्ष जो आपला आपणच प्रकाश करितो (स्वप्रकाशरूप आहे) तो, अर्जुना, काय सांगावे ? केवल एकरूप आहे. त्यावांचुन दुसरे काही नाहीच. 57
558-15
तो गा मी निरुपाधिकु । क्षराक्षरोत्तमु एकु । म्हणौनि म्हणे वेद लोकु । पुरुषोत्तमु ॥558॥
असा क्षराक्षराहून उत्तम किंवा श्रेष्ठ जो मी, हे माझे निरुपाधिक स्वरूप होय; म्हणूनच वेदांनी व लोकांनी ह्यांचे पुरुषोत्तम असे वर्णन केले आहे. 58
यो मामेवमसंमूढो जानाति पुरुषोत्तमम् ।
स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ॥15. 19॥
559-15
परी हे असो ऐसिया । मज पुरुषोत्तमाते धनंजया । जाणे जो पाहलेया । ज्ञानमित्रे ॥559॥
परंतु हे असो, अर्जुना, असा जो भी पुरुषोत्तम त्याला तोच एक पाहू शकतो की, ज्याच्या अंतःकरणात यथार्थ ज्ञानसूर्याचा उदय झाला आहे. 59
560-15
चेइलिया आपुले ज्ञान । जैसे नाहीचि होय स्वप्न । तैसे स्फुरते त्रिभुवन । वावो जाले ॥560॥
जागे झाल्यावर स्वप्नव्यवहार जसा नाहीसा होतो, तसेच ” चेइलिया आपुले ज्ञान ” म्हणजे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर दिसणारे विश्व स्वप्नवत् वाव होते. 560
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


561-15
का हाती घेतलिया माळा । फिटे सर्पाभासाचा काटाळा । तैसा माझेनि बोधे टवाळा । नागवे तो ॥561॥
जिच्यावर सर्पभ्रम झाला होता ती माळच हाती घेतल्यावर (अपरोक्ष झाल्यावर) जसा सर्पभ्रम व भीति नाहीशी होते, तसे ज्याला माझे ज्ञान झाले आहे तो ह्या टवाळ म्हणजे मिथ्या जगदाभासाने फसत नाही. (दृढमिथ्यात्वनिश्चयामुळे) 61
562-15
लेणे सोनेचि जो जाणे । तो लेणेपण ते वावो म्हणे । तेवी मी जाणोनि जेणे । वाळिला भेदु ॥562॥
अलंकाराला ज्याने सुवर्णत्वाने जाणले तो जसा अलंकार म्हणून काही स्वतंत्र वस्तु मानीत नाही त्याप्रमाणे ज्याला माझे ज्ञान झाले त्याची, अलंकाराच्या दृष्टांताप्रमाणे, भेदबुद्धि पार नाहींशी अगर बाधित होते. 62
563-15
मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदु । मीचि एकु स्वतःसिद्धु । जो आपणेनसी भेदु । नेणोनिया जाणे ॥563॥
मग, असा भेदबुद्धि बाधित झालेला पुरुष, स्वतःसिद्ध सच्चिदानंदस्वरूप असा मीच सर्वत्र आहे असे म्हणतो; व आपल्या स्वतःलाही दुजेपणाने न पहाता मला जाणतो. 63
564-15
तेणेचि सर्व जाणितले । हेही म्हणणे थेंकुले । जे तया सर्व उरले । द्वैत नाही ॥564॥
आता त्याला त्या पुरुषालाच सर्व ज्ञान झाले हेही म्हणणे अपुरे म्हणजे वस्तुस्थितिदर्शक नाही; कारण, त्याला सर्व म्हणून काही द्वैत उरलेच नाही. 64
565-15
म्हणौनि माझिया भजना । उचितु तोचि अर्जुना । गगन जैसे आलिंगना । गगनाचिया ॥565॥
म्हणून, अर्जुना, माझे भजन करावयास तोच (मद्रूप झालेला) एक योग्य होय; अरे ! गगनाला आलिंगन देण्याची योग्यता एका गगनाचीच आहे, अन्याची नव्हे. 65


566-15
क्षीरसागरा परगुणे । कीजे क्षीरसागरचिपणे । अमृतचि होऊनि मिळणे । अमृती जेवी ॥566॥
क्षीरसागराचा पाहुणचार क्षीरसागरानेच करणे अथवा अमृतत्वानेच अमृतास मिळणे जसे योग्य 66
567-15
साडेपंधरा मिसळावे । तै साडेपंधरेचि होआवे । तेवी मी जालिया संभवे । भक्ति माझी ॥567॥
उत्तम सुवर्णात तद्रूप होण्यास जसे उत्तम सुवर्णच पाहिजे, त्याप्रमाणे जो मद्रूप झाला यालाच माझी भक्ति करणे शक्य व योग्य आहे. 67
568-15
हा गा सिंधूसि आनी होती । तरी गंगा कैसेनि मिळती ? । म्हणौनि मी न होता भक्ती । अन्वयो आहे ? ॥568॥
गंगा सिंधूहून जर भिन्न असती तर ती सिंधुरूप कशी झाली असती ? म्हणून “मी न होता “ म्हणजे माझी सर्वव्यापकता न बाणता परिच्छिन्न बुद्धी केलेली भक्ति खरी किंवा सार्थ होईल काय ? 68
569-15
ऐसियालागी सर्व प्रकारी । जैसा कल्लोळु अनन्यु सागरी । तैसा माते अवधारी । भजिन्नला जो ॥569॥
ह्यासाठी, समुद्राच्याच्या लाटा जशा समुद्राशी सर्वथैव अनन्य (अभिन्न) आहेत, त्याप्रमाणे माझे भजन करणारा अनन्य असा, अगर अनन्य असेल त्यानेच खरे भजन केले असे जाण. 69
570-15
सूर्या आणि प्रभे । एकवंकी जेणे लोभे । तो पाडु मानू लाभे । भजना तया ॥570॥
सूर्य आणि प्रभा यांचे जसे नित्य ऐक्य आहे तशी वरील अनन्यभजनाची योग्यता आहे. 570
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयाऽनघ ॥
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात् कृतकृत्यश्च भारत ॥15. 20॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः ॥15॥
अर्थ : ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील पुरुषोत्तमयोग नावाचा हा पंधरावा अध्याय समाप्त झाला. ॥15॥


571-15
एवं कथिलयादारभ्य । हे जे सर्व शास्त्रैकलभ्य । उपनिषदा सौरभ्य । कमळदळा जेवी ॥571॥
ह्याप्रमाणे अध्यायाला आरंभ केल्यापासून येथवर जे सर्व सांगितले ते केवळ शास्त्रांपासूनच प्राप्त होत असते; आणि कमलांना सुगंध ही जशी शोभा, तसे हे गीताशास्त्र हे उपनिषद्रूप कमलांचा सुगंध होय. 71
572-15
हे शब्दब्रह्माचे मथिते । श्रीव्यासप्रज्ञेचेनि हाते । मथुनि काढिले आयिते । सार आम्ही ॥572॥
शब्दब्रह्मरूप जो वेदार्णव त्यापासून व्यासबुद्धिरूप रवीने मंथन करून आम्ही हे अनादिसिद्ध लोणी काढले आहे. 72
573-15
जे ज्ञानामृताची जाह्नवी । जे आनंदचंद्रींची सतरावी । विचारक्षीरार्णवींची नवी । लक्ष्मी जे हे ॥573॥
ही गीता ज्ञानामृताची गंगा, आनंदरूप चंद्राची सतरावी कला, अथवा विचाररूप क्षीरसागरांतून अवतरलेला नवीन लक्ष्मीचाच अवतार होय. 73
574-15
म्हणौनि आपुलेनि पदे वर्णे । अर्थाचेनि जीवेप्राणे । मीवाचोनि हो नेणे । आन काही ॥574॥
म्हणून ही, आपल्या प्रत्येक शब्दाने, वर्णनाने, आणि अर्थरूपी जिव्हाळयाने मजवाचून दुसरी कोणतीही गोष्ट जाणत नाही. 74
575-15
क्षराक्षरत्वे समोर जाले । तयांचे पुरुषत्व वाळिले । मग सर्वस्व मज दिधले । पुरुषोत्तमी ॥575॥
तिच्यासमोर क्षर व अक्षर असे दोन पुरुष आले असता (दर्शनानेच) त्यांचे पुरुषत्व तिने नाकारले, व मग, आपले सर्वस्व मज पुरुषोत्तमास अर्पिले. 75

दिवस २५१ वा. ८, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३००१ ते ३०१२
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३००१
होईल तो भोग भोगीन आपुला । न घली विठ्ठला भार तुज ॥१॥
तुम्हापासाव हे इच्छीतसे दान । अंतरीचे ध्यान मुखी नाम ॥धृपद॥
नये काकुलती गर्भवासांसाठी । न धरी हे पोटी भय काही ॥२॥
तुका म्हणे मज उदंड एवढे । नाचेन मी पुढे मायबापा ॥३॥
अर्थ
हे विठ्ठला जे काही होईल ते प्रारब्धाचे भोग मी स्वत: भोगेन त्याचा भार मी तुझ्यावर घालणार नाही. देवा मी तुमच्यापासून केवळ एवढयाच दानाची इच्छा करीत आहे की, “माझ्या अंतरंगात ध्यान आणि मुखात तुमचे नाम असावे. ” अहो देवा मला गर्भवास भोगावा लागेल व ते तुम्ही दूर करावे यासाठी मी तुमच्याकडे काकूळतीला येणार नाही कारण त्याविषयी आता माझ्या मनामध्ये काही भयच राहीलेले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तू केवळ मला माझ्या अंतरंगामध्ये ध्यान आणि मुखात तुझे नाम एवढे दान दिले ना तर तेवढेच मला उदंड झाले मग मी माझ्या मायबापापुढे सुखाने नाचेन. ”
2:25

अभंग क्र. ३००२
करावा संकोच चित्तासी भोवता । होय ते बहुता सुख कीजे ॥१॥
देवाची पूजा हे भूताचे पाळण । मत्सर तो सीण बहुतांचा ॥धृ॥
रुसावे फुगावे आपुलियावरी । उरला तो हरी सकळ ही ॥२॥
तुका म्हणे संतपण याची नांव । जरी होय जीव सकळांचा ॥३॥
अर्थ
जो काही संकोच करायचा असेल तो आपल्या चित्ताच्या भोवतीच करावा परंतू पुष्कळ लोकांना सुख मिळेल असेच वागत राहावे. भूतमात्राचे पालनपोषण करणे म्हणजेच देवाची पूजा आहे आणि अनेक जणांचा मत्सर करणे म्हणजे देवाला त्रास देण्यासारखेच आहे. अहो जर रुसायचे फुगायचे असेल तर स्वत:वरच रुसावे फुगावे कारण इतरांवर रुसणे फुगण्यासाठी इथे दुसरे कोण आहे सर्वत्र एक हरीच सामावला आहे ना. तुकाराम महाराज म्हणतात, “जो, सर्वाचा जीव हा आपलाच जीव आहे असे समजतो याचेच नांव संतपणा आहे व तोच संत असतो. ”
2:26

अभंग क्र. ३००३
नाही जप तप जीवाची आटणी । मनासी दाटणी नाही केली ॥१॥
निजलिया ठायी पोकारिला धावा । साकडे ते देवा तुझे माझे ॥धृपद॥
नाही आणूनिया समर्पीले जळ । सेवा ते केवळ चिंतनाची ॥२॥
तुका म्हणे आम्ही वेचिली उत्तरे । घेतली उदारे मायबापे ॥३॥
अर्थ
देवा मी कधीही जपतप करुन जीवाचा आटापिटा केली नाही व मनावर कुठल्याही प्रकारचे दडपण आणले नाही. देवा मी निजल्या ठिकाणाहून तुझा धावा अगदी स्वस्थपणे केला आहे त्यामुळे तर तुला माझे साकडे पडले आहे. देवा मी कधीही कोणत्या प्रकारचे जल आणून तुला समर्पण केले नाही केवळ तुझे नामचिंतन करण्याचीच सेवा केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आम्ही जे शब्द खर्च करुन तुमची स्तुती तुमचे वर्णन गायिले आहे ते तुम्ही उदार मायबापानी स्वीकारले आहेत. ”
2:26

अभंग क्र. ३००४
देह तव आहे प्रारब्धा अधीन । याचा मी का सीण वाहू भार ॥१॥
सरो माझा काळ तुझिया चिंतने । कायावाचामने इच्छीतसे ॥धृपद॥
लाभ तो न दिसे याहूनि दुसरा । आणीक दातारा येणे जन्मे ॥२॥
तुका म्हणे आलो सोसीत संकटे । मी माझे वोखटे आहे देवा ॥३॥
अर्थ
देह तर प्रारब्धाच्या आधीन आहे मग मी याचा शीण आणि भार का वाहू ? देवा आता माझा सर्व काळ तुमच्या चिंतनातच जावा हीच इच्छा मी कायावाचामनाने करीत आहे. हे दातारा आता या जन्मामध्ये तरी मला यावाचून दुसरा कोणताही लाभ दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अहो मी अनेक योनीपासून अनेक प्रकारचे संकटे सोसीत इथपर्यंत आलो आहे याला कारण म्हणजे मी आणि माझे हा खोटा भ्रम आहे. ”
2:26

अभंग क्र. ३००५
सकळ तुझे पायी मानिला विश्वास । न करी उदास आता मज ॥१॥
वाचे गाता गोड आइकता कानी । पाहाता लोचनी मूर्ती तुझी ॥धृपद॥
मन स्थिर माझे झालेंसे निश्चळि । वारिले सकळ आशापाश ॥२॥
जन्मजराव्याधि निवारिले दुःख । वोसंडले सुख प्रेम धरी ॥३॥
तुका म्हणे मज झाला हा निर्धार । आता वाया फार काय बोलो ॥४॥
अर्थ
तुझ्या पायाच्या ठिकाणीच मी सर्व विश्वास मांडला आहे त्यामुळे देवा तू मला आता उदास करु नकोस. देवा तुझे नाम वाचेने गाताना मला फार गोड वाटते कारण तुझी किर्ती ऐकताना तसेच तुझी मूर्ती डोळयाने पाहताना मला खूप सुख होते. देवा माझे मन तुझ्या पायाच्याच ठिकाणी स्थिर झाले असून तेथेच ते निश्चल झाले आहेत निश्चिंत झाले आहेत आणि सर्व आशापाशच नाहीसा झाला आहे. जन्म जरा व्याधी या सर्व दु:खाचे निवारण झाले असून देवाच्या प्रेमसुखाची धार माझ्या अंतरंगात व माझ्या बाह्यरंगात ओसंडून वाहात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता मी तुझ्या पायाच्या ठिकाणी पूर्ण विश्वास ठेवण्याचा निर्धारच केलेला आहे तर मग मी व्यर्थ जास्त फार काय बोलावे ? ”
2:27

अभंग क्र. ३००६
नये माझा तुम्हा होऊ शब्दस्पर्श । विप्रवृंदा तुम्हा ब्राम्हणांसी ॥१॥
म्हणोनिया तुम्हा करितो विनंती । द्यावे शेष हाती उरले ते ॥धृपद॥
वेदी कर्म जैसे बोलिले विहित । करावी ते नीत विचारूनि ॥२॥
तुमचा स्वधर्म माझा अधिकार । भोजन उत्तर तुका म्हणे ॥३॥
अर्थ
एका विद्वान ब्राम्हणाने तुकाराम महाराजांना घरी जेवण्यास बोलावले त्यावेळी तुकाराम महाराज त्यांना म्हणतात की, तुम्ही ब्राम्हण आहात तुम्हाला माझा शरीरस्पर्श काय तर शब्दस्पर्श देखील होऊ नये कारण तुम्ही विद्वान आहात. त्यामुळेच मी तुम्हाला एक विनंती करीत आहे की तुमच्या पंक्तीत मला बसू न देता जे काही तुमच्या भोजनानंतर उरले असेल तर ते माझ्या हाती दयावे. वेदाने विविध वर्णाला जे जे काही त्यांचे विहित कर्म सांगितले आहेत ते ते विहित कर्म त्या त्या वर्णाने त्याचा चांगला विचार करुन करावे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे श्रेष्ठ विद्वान ब्राम्हणहो तुमचा जो स्वधर्म आहे तो तुम्ही पालन करा तुमचे भोजन झाले की मग माझा भोजन करण्याचा अधिकार आहे तुमचे भोजन झाल्यानंतर जे शेष राहील ते मग आम्ही सेवन करु. ”
2:27

अभंग क्र. ३००७
बहुत असती मागे सुखी केली । अनाथा माउली जिवांची तू ॥१॥
माझिया संकटा न धरी अळस । लावुनिया कासे पार पावी ॥धृपद॥
कृपावंता करा ज्याचा अंगीकार । तया संवसार नाही पुन्हा ॥ । २॥
विचारिता नाही दुजा बळिवंत । ऐसा सर्वगत व्याप्य कोणी ॥३॥
म्हणउनि दिला मुळी जीवभाव । देह केला वाव समाधिस्थ ॥४॥
तुका म्हणे नाही जाणत आणीक । तुजविण एक पांडुरंगा ॥५॥
अर्थ
देवा तुम्ही यापूर्वी अनेकाचा उध्दार करुन त्यांना सुखी केलेत आणि तुम्ही अनाथांची माऊली देखील आहात. त्यामुळे तू माझ्या संकटाच्यावेळी आळस धरु नकोस तुझ्या कासेला लावून मला या भवनदीच्या पार कर. अहो कृपावंता तुम्ही ज्यांचा अंगीकार करता त्यांना पुन्हा जन्ममरणाचा संसारच नाही. देवा जर विचार करुन पाहिला तर तुझ्यासारखा बलवंत दुसरा कोण आहे आणि सर्वत्र व्यापलेला देखील दुसरा कोण आहे. म्हणूनच तर मी माझा सुरवातीपासूनच जीवभाव तुला अर्पण केला असून देह मिथ्या ठरवून समाधीस्थ मी झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा मी तुझ्यावाचून दुसरे काही एक जाणत नाही. ”
2:28

अभंग क्र. ३००८
आम्हा देणे धरा सांगतो ते कानी । चिंता पाय मनी विठोबाचे ॥१॥
तेणे माझे चित्ता होय समाधान । विलास मिष्टान्न न लगे सोने ॥धृपद॥
व्रत एकादशी दारी वृंदावन । कंठी ल्यारे लेणे तुळसीमाळा ॥२॥
तुका म्हणे त्याचे घरीची उष्टावळी । मज ते दिवाळी दसरा सण ॥३॥
अर्थ
आम्हाला जर काही दयायचेच असेल तर ते मी तुमच्या कानामध्ये सांगतो ते म्हणजे असे की, तुम्ही विठोबाच्या पायाचे चिंतन मनामध्ये करत राहा. एवढे जरी तुम्ही मला दिले तर त्या योगाने माझ्या चित्ताला समाधान होईल मग मला तुमचे मिष्ठान्न विलास सोने वगैरे काहीच नको. तुम्ही एकादशी व्रत करा, दारामध्ये तुळशी वृंदावन राहू दयावे, कंठामध्ये हरीनाम धारण करा आणि गळयामध्ये तुळशीमाळेचे लेणे परिधान करावे. तुकाराम महाराज म्हणतात, “जर असे या नियमाने कुणी वागले तर माझ्यासाठी तो दिवाळी दसरा सणच वाटेल. ”
2:28

अभंग क्र. ३००९
आवडी धरोनी आलेती आकारा । केला हा पसारा याजसाठी ॥१॥
ते मी तुझे नाम गाईन आवडी । क्षण एक घडी विसंबेना ॥धृपद॥
वर्म धरावे हा मुख्यधर्मसार । अवघे प्रकार तयापासी ॥२॥
वेगळ्या विचारे वेगळाले भाव । धरायासी ठाव बहु नाही ॥३॥
तुका म्हणे घालू इच्छेचिये पोटी । कवळुनी धाकुटी मूर्ती जीवे ॥४॥
अर्थ
देवा तुम्ही ज्याची आवड धरुन आकाराला आलात आणि ज्याच्यासाठी तुम्ही पसारा केला आहे, असे ते तुझे नाम मी आवडीने गायील त्या नामाला एक क्षणभर देखील मी विसरणार नाही. देवा तुझे नाम घेणे हेच तुझ्या प्राप्तीचे वर्म मुख्य आहे व सर्वधर्म सार देखील तेच आहे आणि सर्व प्रकार देखील तुझ्या नामाच्या पोटातच आहे. एका हरीचे नाम घेतले की, त्या हरीच्या नामानेच हरीची प्राप्ती होते आणि त्याकरता वेगळे विचार आणि वेगवेगळे भक्तीभाव धरण्याची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही देवाच्या छोटयाशा मूर्तीला देखील प्रेमाने मिठी घालू आणि ती मूर्ती आम्ही नामाच्या बळाने आमच्या इच्छेच्या पोटात साठवून ठेवू. ”
2:29

अभंग क्र. ३०१०
भागलो मी आता आपुल्या स्वभावे । कृपा करोनि देवे आश्वासीजे ॥१॥
देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरे । अंगे ही दातारे निववावी ॥धृपद॥
अमृताची दृष्टी घालूनिया वरी । शीतळ हा करी जीव माझा ॥२॥
घेई उचलूनि पुसे तानभूक । पुसी माझे मुख पीतांबरे ॥३॥
बुझावोनि माझी धरी हनुवंटी । ओवाळुनि दिठी करुनी सांडी ॥४॥
तुका म्हणे बापा आहो विश्वंभरा । आता कृपा करा ऐसी काही ॥५॥
अर्थ
देवा मी आतापर्यंत संसारातील अनेक कर्मे करुन खूपच त्रासलो आहे कृपा करुन तुम्ही मला आश्वासन दयावे. हे दातारा देवा तुम्ही मला आलिंगन देऊन माझे अंग शीतल करावे. अहो देवा तुमची अमृताची दृष्टी माझ्यावर तुम्ही घाला आणि माझा जीव शांत करा. देवा तू मला उचलून घेऊन माझ्या तहान भूकेविषयी मला विचारपूस कर आणि पितांबराने मुख पुस. देवा तुम्ही माझ्याजवळ बसून माझी हनुवटी धरुन माझी दृष्ट काढण्यासाठी माझ्यावरुन लिंबलोण उतरवून टाका. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो माझ्या बापा विश्वंभरा आता अशीच काहीतरी कृपा तुम्ही माझ्यावर करा. ”
2:30

अभंग क्र. ३०११
न सरे लुटिता मागे बहुता जनी । जुनाट हे खाणी उघडिली ॥१॥
सद्धि महामुनि साधक संपन्न । तिही हे जतन केले होते ॥धृपद॥
पायाळाच्या गुणे पडिले ठाउके । जगा पुंडलिके दाखविले ॥२॥
तुका म्हणे येथे होतो मी दुबळा । आले या कपाळा थोडे बहु ॥३॥
अर्थ
अशी एक जुनाट खाण आहे की जी उघडकीस आली आहे ती खाणी पूर्वी खूप जणांनी लुटली तरी ती संपत नाही. सिध्द महामुनी साधक सर्वगुण संपन्न यांनीच या खाणीचे जतन केले होते. पाळीव माणसाच्या गुणाने भूमीतील धन सापडते त्याप्रमाणेच पुंडलिकाने देखील जगाला पंढरीमध्ये विठ्ठलरुपी धनाची खाण दाखवली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्यावेळी पुंडलिकाने ही जुनाट खाण उघडली त्यावेळी मी दरिद्री देखील तेथेच होतो त्यामुळेच माझ्या नशीबाला थोडेफार विठ्ठलरुपी धन आले आहे. ”
2:30

अभंग क्र. ३०१२
भगवे तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथे अनुभवाचा काय पंथ ॥१॥
वाढवुनी जटा फिरे दाही दिशा । तरी जंबुवेषा सहज स्थिति ॥धृपद॥
कोरोनिया भूमी करिती मधी वास । तरी उंदिरास काय वाणी ॥२॥
तुका म्हणे ऐसे कासया करावे । देहासी दंडावे वाउगेचि ॥३॥
अर्थ
काही मनुष्य अंगावर भगवी वस्त्रे धारण करतात मग त्याचा अर्थ असा थोडा होतो की त्यांना हरीच्या प्राप्तीच्या अनुभव आला किंवा ते हरीपंथाला लागले आहेत असे असले तर मग एखादया कुत्र्याचा रंग सहजच भगवा असतो मग त्या कुत्र्याला देखील हरीच्या प्राप्तीचा अनुभव किंवा हरी प्राप्तीचा मार्ग सापडला असा होतो काय ? अहो एखादा मनुष्य असा असतो की, जटा वाढवून दाही दिशा फिरत असतो परंतू त्याचा काही उपयोग होतो काय आणि तसे पाहिले गेले तर कोल्हयाचा देखील वेश तसाच असतो तोही तसाच सर्वत्र फिरत असतो. अहो काही लोक तर भूमी कोरुन भूमीमध्ये वास करतात मग त्याच्यासारखेच उंदीर देखील भूमी कोरुन भूमीत वास करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “पण मी म्हणतो असे का करावे देहाला विनाकारण दंड का दयावा ? ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading