१३ जून, दिवस १६४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा, ओवी २२६ ते २४७ सार्थ तुकाराम गाथा अभंग १९५७ ते १९६८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“13 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 13 June
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक 13 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १९५७ ते १९६८चे पारायण आपण करणार आहोत.
13 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी २२६ ते २४७,

226-12
तेणेसी आम्हा मैत्र । एथ कायसे विचित्र ? । परी तयाचे चरित्र । ऐकती जे ॥226॥
अशा भक्ताशी माझे अत्यंत सख्य असते, यात काही आश्चर्य नाही; पण जे कोणी माझ्या भक्तांचे चरित्र श्रवण करतात.
227-12
तेही प्राणापरौते । आवडती हे निरुते । जे भक्तचरित्राते । प्रशंसिती ॥227॥
तसेच जे कोणी माझ्या भक्तांच्या चरित्राची स्तुती करतात- म्हणजे गुणकीर्तन करतात- ते देखील मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय असतात, हे अत्यंत सत्य आहे.
228-12
जो हा अर्जुना साद्यंत । सांगितला प्रस्तुत । भक्तियोगु समस्त- । योगरूप ॥228॥
अर्जुना ! तुला मी आताच जो संपूर्ण भक्तीयोग सांगितला, त्यात माझ्याशी ऐक्य करणारे जेवढे योग आहेत, त्या सर्वाचा अंतर्भाव होतो- म्हणजे भक्तीयोगाने सर्व प्रक्रिया अवगत होतात किंवा साधतात.
229-12
तया मी प्रीति करी । का मनी शिरसा धरी । येवढी थोरी । जया स्थितीये ॥229॥
ज्या भक्तीस्थितीची एवढी थोरवी आहे की, त्या भक्तीप्रेमामुळेच मीही आपल्या भक्तांचे अत्यंत प्रेम करतो किंवा त्याला शिरावर धारण करतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव प्रियाः ॥12. 20॥

अर्थ श्रद्धायुक्त व मी ज्यांना अत्यंत प्रिय आहे असे जे भक्त, वर सांगितल्याप्रमाणे धर्मसंबंधी अमृताचे सेवन करतात म्हणजे त्याप्रमाणे आचरण करतात ते मला अत्यंत प्रिय आहेत. ॥12-20॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः ॥12॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील भक्तियोग नावाचा हा बारावा अध्याय समाप्त झाला. ॥12॥
(भक्तियोग = भक्त श्रेष्ठ)
230-12
ते हे गोष्टी रम्य । अमृतधारा धर्म्य । करिती प्रतीतिगम्य । आइकोनि जे ॥230॥
धर्म्य-म्हणजे अवश्य आचरणीय-व चित्ताला मोहक अशी ही अमृताची धारा-म्हणजे अखंड अविनाशी-अशी भक्तीयोगाची कथा ऐकून जे कोणी आपल्या अनुभवाला आणून घेतील.


231-12
तेसीचि श्रद्धेचेनि आदरे । जयांचे ठायी विस्तरे । जीवी जया थारे । जे अनुष्ठिती ॥231॥
त्याचप्रमाणे अत्यंत श्रद्धा व आदर यांच्या योगाने ज्यांच्या ठिकाणी हा भक्तीयोग विस्तार पावला व ज्यांच्या अंतःकरणात तो दृढ होऊन जे त्या भक्तीचे अनुष्ठान करतात.
232-12
परी निरूपली जैसी । तैसीच स्थिति मानसी । मग सुक्षेत्री जैसी । पेरणी केली ॥232॥
पण चांगल्या मशागत केलेल्या क्षेत्रात जशी पेरणी केली जाते, त्याप्रमाणे वर सांगितली तशीच, ज्यांच्या मनाची अत्यंत प्रेमळ स्थिती आहे,
233-12
परी माते परम करूनि । इये अर्थी प्रेम धरूनि । हेचि सर्वस्व मानूनि । घेती जे पै ॥233॥
आणि जे माझ्या सगुणस्वरूपालाच आपली परमगती समजतात, ज्यांना माझ्या सगुणस्वरूपाच्या प्राप्तीचे प्रेम असते व जे माझ्या सगुण स्वरूपाला सर्वस्व मानून घेतात.
234-12
पार्था गा जगी । तेचि भक्त तेच तर योगी । उत्कंठा तयांलागी । अखंड मज ॥234॥
बा अर्जुना ! या जगात तेच खरे भक्त व तेच खरे योगी होत. मला त्यांच्याच भेटीची अत्यंत उत्कंठा असते.
235-12
ते तीर्थ ते क्षेत्र । जगी तेचि पवित्र । भक्ति कथेसि मैत्र । जया पुरुषा ॥235॥
माझ्या भक्तिकथेशी ज्यांचे सख्य झाले, ते पुरुषच खरोखर पवित्र तीर्थ व पवित्र क्षेत्र होत. त्यांच्यासारखे जगात दुसरे काहीही पवित्र नाही.


236-12
आम्ही तयांचे करू ध्यान । ते आमुचे देवतार्चन । ते वाचूनि आन । गोमटे नाही ॥236॥
अशा भक्तांचे आम्ही ध्यान करू तेच आमच्या पूजेतील देव आहेत. त्यांच्यावाचून आम्हाला काहीही एक गोड वाटत नाही.
237-12
तयांचे आम्हा व्यसन । ते आमुचे निधिनिधान । किंबहुना समाधान । ते मिळती तै ॥237॥
आम्हाला त्यांचाच छंद असतो. तेच आमच्या द्रव्याचे साठे होत. एवढेच नाही, तर त्यांची भेट झाली असताच आमच्या मनाचे समाधान होते.
238-12
पै प्रेमळाची वार्ता । जे अनुवादती पंडुसुता । ते मानू परमदेवता । आपुली आम्ही ॥238॥
अर्जुना ! पण जे कोणी अशा प्रेमळ भक्तांच्या गोष्टी करतात किंवा कथा गातात, त्यांना देखील आम्ही परम देवता मानतो.
239-12
ऐसे निजजनानंदे । तेणे जगदादिकंदे । बोलिले मुकुंदे । संजयो म्हणे ॥239॥
संजय म्हणतो धृतराष्ट्रा ! आपल्या भक्तजनांचा ब्रह्मानंद व जगद्रूपी कार्याचे मूळ कारण असा जो भगवान श्रीकृष्ण, तो याप्रमाणे अर्जुनाशी बोलला.
240-12
राया जो निर्मळु । निष्कलंक लोककृपाळु । शरणागता प्रतिपाळु । शरण्यु जो ॥240॥
राजा धृतराष्ट्रा ! जो अविद्यादोषरहित असा शुद्ध आहे, ज्याची कीर्ती कलंकरहित आहे, जो सर्व लोकांवर कृपा करणारा आहे, जो शरणागतांवर आईप्रमाणे प्रेम करणारा आहे आणि सर्वाना शरण जाण्याला योग्य आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


241-12
पै सुरसहायशीळु । लोकलालनलीळु । प्रणतप्रतिपाळु । हा खेळु जयाचा ॥241॥
देवांचा कैवार घेऊन त्यांना साह्य करण्याचा ज्याचा स्वभाव आहे, त्रैलोक्याचे संगोपन करणे ही ज्याची क्रीडा आहे व शरण आलेल्यांचा प्रतिपाळ करणे हाच ज्याचा खेळ आहे.
242-12
जो धर्मकीर्ति धवलु । आगाध दातृत्वे सरळु । अतुळबळे प्रबळु । बळिबंधनु ॥242॥
धर्माप्रमाणेच वागणारा अशी ज्याची कीर्ती आहे, अगाध दातृत्वामुळे ज्याचे सम वागणे आहे, अमर्याद सामर्थ्याने समर्थ असल्यामुळे जो प्रबळ अशा बळीला बंधन करणारा झाला आहे.
243-12
जो भक्तजनवत्सळु । प्रेमळजन प्रांजळु । सत्यसेतु सकळु । कलानिधी ॥243॥
जो आपल्या भक्तजनांवर आईप्रमाणे प्रेम करणारा आहे आणि प्रेमळजनांशी निष्कपट आहे. जो आपल्या सत्यस्वरूपाने जगाचे धारण करणारा आहे व जो संपूर्ण कलांचा निधी आहे.
244-12
तो श्रीकृष्ण वैकुंठीचा । चक्रवर्ती निजांचा । सांगे येरु दैवाचा । आइकतु असे ॥244॥
जो वैकुंठीचा स्वामी असून आपल्या भक्तांचा सार्वभौम राजा आहे तो श्रीकृष्ण सांगत असून भाग्यवान अर्जुन श्रवण करीत आहे.
245-12
आता ययावरी । निरूपिती परी । संजयो म्हणे अवधारी । धृतराष्ट्राते ॥245॥
संजय राजा धृतराष्ट्राला म्हणतो, आता यापुढे भगवान श्रीकृष्ण कायबोलतात ते ऐका.
246-12
तेचि रसाळ कथा । मऱ्हाठिया प्रतिपथा । आणिजेल आता । आवधारिजो ॥246॥
तीच रसाळ कथा मराठी भाषेच्या रूपांतरात आणली जाईल, आता लक्ष द्या.
247-12
ज्ञानदेव म्हणे तुम्ही । संत वोळगावेति आम्ही । हे पढविलो जी स्वामी । निवृत्तिदेवी ॥247॥
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आम्ही तुम्ही संतांचे चरण धरावे, हेच श्री स्वामी निवृत्तिदेवांनी आम्हाला शिकविले.
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
भक्तियोगोनाम द्वादशोऽध्यायः ॥12॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 20॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 247॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १६४ वा, १३, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १९५७ ते १९६८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १९५७
एक शेरा अन्ना चाड । येर वाउगी बडबड ॥१॥
का रे तृष्णा वाढविसी । बांधवूनि मोहपाशी ॥धृपद॥
ओठ हात तुझा जागा । येर सिणसी वाउगा ॥२॥
तुका म्हणे श्रम । एक विसरता राम ॥३॥
अर्थ

एक शेर अन्नाचीच गरज प्रत्येक मनुष्याला रोजच्या दिवशी असते तेवढीच मिळण्याची खटपट करावी इतर कोणतेही व्यर्थ खटपट करू नये. अरे मग मनुष्या तु व्यर्थ मोहात गुंतून हाव का वाढवीत आहेस ? अरे तुला एकंदरीत साडेतीन हाताची जागा राहण्यासाठी पुष्कळ आहे मग तु वाडे बंगले बांधण्यात व्यर्थ शीन का करून घेतोस ? तुकाराम महाराज म्हणतात एका रामाला तु विसरलास तर मग बाकी जे काही तू करशील ते सर्व श्रमच आहे.
3

अभंग क्र. १९५८
आले धरायच पेठे । पुढे मागुते न भेटे ॥१॥
नाही कोणांचा सांगात । दुःख भोगिता आघात ॥धृपद॥
होसी फजीती वरपडा । लक्ष चौऱ्यांशीचा वेढा ॥२॥
एका पाउलाची वाट । कोणा सांगावा बोभाट ॥३॥
जुंतिजेसी घाणा । नाही मारित्या करुणा ॥४॥
तुका म्हणे हित पाहे । जोवरी हे हाती आहे ॥५॥
अर्थ

अरे मनुष्याहो तुम्ही या मनुष्य देहाच्या बाजारपेठेमध्ये आला आहात तर मग राम नामाचा चांगला माल आपल्या हृदयामध्ये भरा आणि एकदा की हा मनुष्य देह गेला की तुम्हाला राम नामाचा चांगला माल कुठेही भेटणार नाही. तुम्ही की एकदा चौर्‍यांशी लक्ष योनीच्या वेढ्यात सापडला तर तुमची फजिती होईल. तो चौर्‍यांशी लक्ष्म योनीचा वेढा तुम्ही भोगत असताना त्याचे अगाध दुःख सहन करत असताना कोणीही तुम्हाला साय्य करणार नाही. अशा या जीव कोटीच्या योनीमध्ये चालण्यासाठी केवळ एकच पावलाची वाट आहे हे कोणाला सांगत बसावे ? तेलाच्या घाण्याला जुंपलेला बैल सारखा फिरत रहावा आणि तो दमला की थांबावा पण तसा न थांबऊ देता तेली त्या बैलाची करूना न धरता त्याला सारखा फिरण्यासाठी मारत असतो. तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे आपले हित पहावे कुठपर्यंत तर जोपर्यंत आपल्या हातात हा मनुष्य देह आहे तोपर्यंतच.
3

अभंग क्र. १९५९
लाभ जाला बहुता दिसी । लाहो करा पुढे नासी । मनुष्यदेहा ऐसी । उत्तमजोडी जोडिली ॥१॥
घेई हरीनाम सादरे । भरा सुखाची भांडारे । जालिया व्यापारे । लाहो हेवा जोडीचा ॥धृपद॥
घेउनि माप हाती । काळ मोवी दिवस राती । चोर लाग घेती । पुढे तैसे पळावे ॥२॥
हित सावकासे । म्हणे करीन ते पिसे । हाती काय ऐसे । तुका म्हणे नेणसी ॥३॥
अर्थ

लोकहो तुम्हाला पुष्कळ दिवसानंतर चौर्‍यांशी लक्ष योनी फिरल्यानंतर मनुष्य देहाचा लाभ झाला आहे म्हणूनच हरी प्राप्ती करून घेण्यासाठी त्वरा करा कारण पुढे हा लाभ नष्ट होणार आहे. कारण तुम्हाला मनुष्य देहा सारखे उत्तम योनी लाभली आहे. त्यामुळे तुम्ही हरिनाम श्रद्धायुक्त भावनेने घ्या आणि तुमचे सुखाचे भांडार भरून टाका. जसा व्यापारामध्ये व्यापाऱ्याला लाभ झाला की तो व्यापारी व्यापारा विषयी अधिक हाव धरतो त्याप्रमाणे तुम्ही परमार्थामध्ये हाव धरा. काळ आपल्या हातामध्ये माप घेऊन तुमच्या आयुष्यातील किती दिवस किती रात्र शिल्लक आहेत बाकी आहे ते मोजत आहे. आपल्याकडे पुष्कळ धन आहे आणि आपण प्रवास करतो आहे तर मग जोपर्यंत चोर आपल्या पाठीमागे लागलेले नाहीत तोपर्यंतच आपण पळत पुढे जावे हेच चांगले. तुकाराम महाराज म्हणतात जे म्हणतात मी माझे हित म्हातारपणी सावकाश पणाने करीन त्यांना वेड लागले आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात अरे म्हातारपणापर्यंत तुझे आयुष्य तुझ्या हातात आहे हे तुला काय माहित आहे काय ?
3

अभंग क्र. १९६०
सुखाचे ओतले । दिसे श्रीमुख चांगले ॥१॥
मने धरिला अभिळास । मिठी घातली पायास ॥धृपद॥
होता दृष्टादृष्टी । तापगेला उठाउठी ॥२॥
तुका म्हणे जाला । लाभे लाभ दुणावला ॥३॥
अर्थ

श्रीहरीचे मुख जणू सुखाच्या मुशीत ओतले आहे जणू त्यामुळेच ते फार सुंदर दिसत आहे. म्हणूनच मी श्रीहरीच्या मुखाची इच्छा केली आहे आणि आता त्यांच्या पायाला मी मिठी घातली आहे. त्या हरी ची व माझी दृष्टा दृष्टी झाली आणि माझ्यासह त्रिविधताप नष्ट झाले. तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या पायाला मी मिठी घातली त्यामुळे हरीचे दर्शन झाले म्हणजे माझा लाभ दुप्पट झाला.
3

अभंग क्र. १९६१
झरा लागला सुखाचा । ऐसा मापारी कइंचा ॥१॥
जो हे माप तोंडे धरी । सळे जाली ते आवरी ॥धृपद॥
जाले बहु काळ । कोणा नाही ऐसे बळ ॥२॥
तुका म्हणे तळ । नाही पाहेसा सकळ ॥३॥
अर्थ

हरीची सुखप्राप्ती झाल्यानंतर माझ्या चित्तामध्ये अखंड प्रेम सुखाचा जरा वहात आहे आणि त्या सुखाचा माप घेणारा कोणी आहे काय. आता हे माप चित्ता पासून तोंडापर्यंत टाकून झाले आहे मग त्याला आवरायला हवे असे कोण ठरवील. सुखात खूप दिवस घालविले पण त्याची मर्यादा सांगता येईल असे कोणातही सामर्थ्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्या सुखाचा तळ पाऊ शकेल असाही कोणी नाही.
3

अभंग क्र. १९६२
आम्ही बोलो ते तुज कळे । एक दोही ठायी खेळे ॥१॥
काय परिहाराचे काम । जाणे अंतरीचे राम ॥धृपद॥
कळोनिया काय चाड । माझी लोकासी बडबड ॥२॥
कारण सवे ऐका । अवघे आहे म्हणे तुका ॥३॥
अर्थ

देवा आम्ही जे काही बोलतो ते तुला आधीच समजते कारण आपल्या दोघामध्येही तुच वास्तव्य करतोस. देवा मग तुला इतर काही परिहार देण्याचे काय काम आहे कारण तुच आमच्या अंतकरणात रहात असतोस. मी माझ्या अंतकरणातील आवड इतरांना कशाला सांगू कारण मी काही त्यांना उपदेश केला तर लोकांना ती बडबड वाटते. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझे काम फक्त एकट्या तुझ्याशीच आहे बाकीच्यांशी माझी काही कर्तव्य नाही.
3

अभंग क्र. १९६३
उमटे ते ठायी । तुझे निरोपावे पायी ॥१॥
आह्मी करावे चिंतन । तुझे नामसंकीर्तन ॥धृपद॥
भोजन भोजनाच्या काळी । मागो करूनिया आळी ॥२॥
तुका म्हणे माथा । भार तुझ्या पंढरीनाथा ॥३॥
अर्थ

देवा आमच्या अंतकरणात आमची जी मागणी उत्पन्न होईल ती आम्ही तुझ्या पायाजवळ सांगू. व इतर वेळेस आम्ही तुझे चिंतन व नामसंकीर्तन करू. देवा ज्या वेळी आम्हाला भूक लागेल त्या भोजनाच्या वेळी आम्ही तुला हट्ट करून जेवण मागू. तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीनाथा माझ्या योगाक्षमाचा भार तुझ्या माथ्यावर आहे.
3 3

अभंग क्र. १९६३
उमटे ते ठायी । तुझे निरोपावे पायी ॥१॥
आह्मी करावे चिंतन । तुझे नामसंकीर्तन ॥धृपद॥
भोजन भोजनाच्या काळी । मागो करूनिया आळी ॥२॥
तुका म्हणे माथा । भार तुझ्या पंढरीनाथा ॥३॥
अर्थ

देवा आमच्या अंतकरणात आमची जी मागणी उत्पन्न होईल ती आम्ही तुझ्या पायाजवळ सांगू. व इतर वेळेस आम्ही तुझे चिंतन व नामसंकीर्तन करू. देवा ज्या वेळी आम्हाला भूक लागेल त्या भोजनाच्या वेळी आम्ही तुला हट्ट करून जेवण मागू. तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीनाथा माझ्या योगाक्षमाचा भार तुझ्या माथ्यावर आहे.
3 3

अभंग क्र. १९६४
केला पण सांडी । ऐसियासी म्हणती लंडी ॥१॥
आता पाहा विचारून । समर्थासी बोले कोण ॥धृपद॥
आपला निवाड । आपणचि करिता गोड ॥२॥
तुह्मी आह्मी देवा । बोलिला बोल सिद्धी न्यावा ॥३॥
आसे धुरे उणे । मागे सरे तुका म्हणे ॥४॥
अर्थ

देवा केलेली प्रतिज्ञा मोडने यालाच लंडपणा म्हणजे लबाडपणा म्हणतात. आता याचा विचार तुम्हीच तुमच्या मनाशी करा कारण तुमच्या सारख्या समर्थाला कोण बोलेल. स्वतःने केलेल्या अन्यायाचा निवाडा स्वतः करणेच योग्य ठरते. देवा तुम्ही आणि आम्ही जे बोल बोललो आहोत ते सिद्धीला न्यावे तेच चांगले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आपल्या दोघामध्ये आपण जी प्रतिज्ञा केली आहे त्याचे पालन जो योग्य पद्धतीने करील त्यालाच थोर पणा येईल परंतु जो त्यात मागे सरेल त्याला उने पणा प्राप्त होईल.
3

अभंग क्र. १९६५
न व्हावे ते जाले । तुम्हा आम्हासी लागले ॥१॥
आता हालमाकलमे । भांडोनिया काढू वर्मे ॥धृपद॥
पाटोळ्यासंवसाटी । दिली रगटयाची गाठी ॥२॥
तुका म्हणे हारी । आणूनिया करिन सरी ॥३॥
अर्थ

देवा जी गोष्ट नको व्हायला होती ती झाली आहे आता तुमच्यात अन आमच्यात भांडण लागले आहे हीच ती गोष्ट. देवा आता आम्ही कसे का होईना परंतु भांडून तुमचे वर्म बाहेर काढून घेऊ. देवा तुमच्याजवळ मौल्यवान पितांबर आहे परंतु आता त्याची गाट या रगट्या बरोबर झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा भांडण्यासाठी मी तुझ्या इतकाच कणखर आहे बरे का आणि भांडून आता मी तुला हरवुन सरशी करून घेईल.
3

अभंग क्र. १९६६
पतित मिरासी । ते म्या धरिला जीवेसी ॥१॥
आता बळिया सांग कोण । ग्वाही तुझे माझे मन ॥धृपद॥
पावणांचा ठसा । दावी मज तुझा कैसा ॥२॥
वाव तुका म्हणे जाले । रोख पाहिजे दाविले ॥३॥
अर्थ

देवा माझी तर वतन दारीच पाप करण्याची आहे आणि तिच मी जतन करुन जीवाशी धरून ठेवली आहे. आता आपल्या दोघामध्ये बलवान कोण आहे ते तूच सांग आणि त्याला साक्ष म्हणजे तुझे आणि माझे मनच आहे. देवा मी तर पतीत आहे परंतु तु पावन आहेस याचा ठसा मला तु दाखव. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु पतीत पावन आहेस तर मला ते तु रोख पणाने दाखविले पाहिजेना.
3

अभंग क्र. १९६७
करिता वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा ॥१॥
हे तो झोंडाईचे चाळे । काय पोटी ते न कळे ॥धृपद॥
आरोगुणी मुग । बैसलासी जैसा बग ॥२॥
तुका म्हणे किती । बुडविली आळविती ॥३॥
अर्थ

देवा आम्ही तुझ्याकडे किती येरझरा घातल्या आहेत परंतु आमच्या सेवा रुपी मोलाचे व्यवहार पुर्ण करण्यासाठी तु आमच्या समोर एकदाही उभा नाही राहिलास. अरे हे झोंड पणाचे चाळे आहेत नेमके तुझ्या पोटात आमच्याविषयी काय चालले आहे ते काही कळत नाही बुवा. देवा काही लोक मूग गिळून गप्प बसतात आणि बगळा जसा मासे पकडण्यास स्तब्ध्‍ा एकदम शांत बसतो तसा तु बसला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात अरे तुला आळवणाऱ्या किती भक्तांना तू बुडविले आहेस ?
3

अभंग क्र. १९६८
नाही देणे घेणे । गोवी केली अभिमाने ॥१॥
आता का हो निवडू नेदां । पांडुरंगा येवढा धंदा ॥धृपद॥
पाचांमधी जावे । थोड्यासाठी फजित व्हावे ॥२॥
तुज ऐसी नाही । पांडुरंगा आह्मी काही ॥३॥
टाकु तो वेव्हार । तुज बहू करकर ॥४॥
तुका म्हणे आता । निवडू संता हे देखता ॥५॥
अर्थ

देवा आम्ही जे तुला सेवा रुपी मोल दिले त्या बदल्यात तु आम्हाला काही दिले नाही ते तर आम्ही तुलाच दिले आहे परंतु तु दीनानाथ पतितपावन या ब्रिदाच्या अभिमाना मध्येच गुंतुन बसला आहेस. आहो पांडुरंगा आपल्यामध्ये जो घेण्या देण्याचा धंदा, व्यवहार झाला आहे त्याबद्दल तुम्ही निवडा का बर करत नाही म्हणजे तुम्ही घेतले म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहात का मी दिले म्हणून मी श्रेष्ठ आहे याचा तुम्हीच विचार करा. देवा या शुल्लक गोष्टीसाठी म्हणजे आपल्या देण्या-घेण्याच्या व्यवहारासाठी आपण आता पंचाती मध्ये जायचे आहे काय म्हणजे आपल्या दोघाचीही चांगलीच फजिती होईल. पांडुरंगा परंतु आम्ही तुझ्यासारखे नाही समजले का. देवा आम्ही या शुल्लक गोष्टीसाठी तुझ्या पुढे येऊन सारखी करकर करू असे आम्ही नाहीत आणि तुला विनाकारण त्रास आम्ही देणार नाही त्यापेक्षा तो व्यवहारच आम्ही टाकून देऊ. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु फक्त संतांनाच घाबरतोस त्यामुळेच त्यांच्या पुढे जाऊनच आपल्या देण्याघेण्याच्या व्यवहाराचा निवाडा आपण करू.

जून नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading