आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

३ सप्टेंबर, दिवस २४६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ४२६ ते ४५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २९४१ ते २९५२
“३ सप्टेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ३ September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ३ सप्टेंबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २९४१ ते २९५२ चे पारायण आपण करणार आहोत.
३ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ४२६ ते ४५०,
426-15
ना शरीरपराते सेविता । संसारगौरवचि ऐकता । देही जयांची अहंता । बुडोनि ठेली ॥426॥
अथवा, देहात्मबुद्धिवानांची सेवा करून, संसाराचे कोडकौतुक, ऐकून, ज्यांचा अहंकार देहाच्या ठिकाणीच दृढ झाला आहे. 26
427-15
ते स्वर्गसंसारालागी । धावता कर्ममार्गी । दुःखाच्या सेलभागी । विभागी होती ॥427॥
ते, स्वर्गातील किंवा संसारांतील विषयसुखासाठी कर्ममार्गाच्या मार्गे लागून अखेर शेलक्या म्हणजे गाळीव किंवा सुखलेशरहित दुःखाचे वांटेकरी होतात. 27
428-15
परी हेही होणे अर्जुना । मजचिस्तव तया अज्ञाना । जैसा जागताचि हेतु स्वप्ना । निद्रेते होय ॥428॥
पण ह्या अज्ञानी जीवांना ही स्थिति प्राप्त होण्यालाही, मुळात कारण ज्ञान स्वरूप जो मी, तोच होय; जसा जागा पुरुषच स्वप्नाला व निर्देला हेतु म्हणजे आधार असतो. 28
429-15
पै अभ्रे दिवसु हरपला । तोहि दिवसेचि जाणो आला । तेवी मी नेणोनि विषयो देखिला । मजचिस्तव भूती ॥429॥
सूर्य मेघांनी आच्छादिला आहे हेही सूर्याच्या सत्तेने (प्रकाशाने) जाणता आलें; तसे मला नेणणे व विषय जाणणे हा प्राण्यांचा व्यवहारही माझ्या सत्तेवरच होतो. 29
430-15
एवं निद्रा का जागणिया । प्रबोधुचि हेतु धनंजया । तेवी ज्ञाना अज्ञाना जीवा या । मीचि मूळ ॥430॥
अर्जुना, निजलेला मनुष्यच जर जागा होतो तर, ह्या दोन्ही अवस्थाना हेतुभूत असणारी ” नित्यजागृति ” (प्रबोधता ) मुळात असतेच, त्याप्रमाणे या जीवांच्या जाणण्याच्या किंवा नेणण्याच्या दोन्ही व्यवहारांना केवल असा मीच मूळहेतु आहे. 30
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
431-15
जैसे सर्पत्वा का दोरा । दोरुचि मूळ धनुर्धरा । तैसा ज्ञाना अज्ञानाचिया संसारा । मियाचि सिद्धु ॥431॥
सर्पभास होवो, की दोरीचे ज्ञान होवो, दोन्ही ज्ञाने जशी एका दोरीच्या सत्तेवरच होतात त्याप्रमाणे, व्यवहार ज्ञानाचा घडो की अज्ञानाचा घडो, तो, ज्ञानस्वरूप जो मी त्या माझ्याच आधारावर होतो.
432-15
म्हणौनि जैसा असे तैसया । माते नेणोनि धनंजया । वेदु जाणो गेला तव तया । जालिया शाखा ॥432॥
म्हणून माझे यथार्थ ज्ञान न झाल्यामुळे, वेद ते जाणण्याचा उद्योग करू लागला, तेव्हा त्याच्या शाखा झाल्या (भाग झाले) 32
433-15
तरी तिही शाखाभेदी । मीचि जाणिजे त्रिशुद्धी । जैसा पूर्वापरा नदी । समुद्रचि ठी ॥433॥
तरी, त्याच्या त्या तिन्ही शाखांनी (ऋक्, यजु, साम) खरोखर माझेच स्वरूप वर्णिले आहे; उदा. अशी नदी पूर्ववाहिनी असो की पश्चिमवाहिनी असो; अखेर मिळणार समुद्रालाच. 33
434-15
आणि महासिद्धांतापासी । श्रुति हारपती शब्देंसी । जैसिया सगंधा आकाशी । वातलहरी ॥434॥
आणि, पृथ्वीचा गंध घेऊन वाहणाऱ्या वाऱ्याच्या, लहरी ज्याप्रमाणे आकाशाच्या पोटात मावळतात, त्याप्रमाणे, माझे वर्णन करीत महासिद्धांत प्रमेयापाशी (लक्ष्यार्थापाशी) येतांच त्यांची वाणी कुंठित होऊन त्या मौनावल्या. 34
435-15
तैसे समस्तही श्रुतिजात । ठाके लाजिले ऐसे निवांत । ते मीचि करी यथावत । प्रकटोनिया ॥435॥
तसेच, माझ्या वर्णनांत सर्व श्रुति लज्जित (असमर्थ) होऊन त्यांनी मौन धरिले ते योग्यच होय, हे स्वप्रकाशत्वाने प्रगट होऊन मला दाखवावे लागते. (स्वप्रकाशत्व म्हणजे वेद्य न होता अपरोक्षत्व असणे; मग अवेद्यरूप श्रुतींना वर्णिता आले नाही तर नवल काय ? ) 35
436-15
पाठी श्रुतिसकट अशेष । जग हारपे जेथ निःशेष । ते निजज्ञानही चोख । जाणता मीचि ॥436॥
आणि, सर्व श्रुतींसह जग जेथे पार लय पावते ते शुद्ध आत्मज्ञान जाणणाराही मीच आहे. 36
437-15
जैसे निदेलिया जागिजे । तेव्हा स्वप्नीचे कीर नाही दुजे । परी एकत्वही देखो पाविजे । आपलेचि ॥437॥
निद्रिस्त पुरुष जागा झाल्यावर स्वप्नातील सर्व द्वैतव्यवहार तर जागृतीत नसतोच, पण, स्वप्नातही दुसरे काहीही नसून आपण एकटेच होतो असा निश्चय होतो 37
438-15
तैसे आपले अद्वयपण । मी जाणतसे दुजेनवीण । तयाही बोधाकारण । जाणता मीचि ॥438॥
तसाच माझा एकीएकपणा, दुजेपणाचा स्पर्शही होऊ न देता मी जाणतो आणि ह्याही स्वरूपबोधाला कारण ज्ञानरूप जो मी तोच. 38
439-15
मग आगी लागलिया कापुरा । ना काजळी ना वैश्वानरा । उरणे नाही वीरा । जयापरी ॥439॥
अर्जुना, कापूर जळल्यावर जशी मागे काजळी रहात नाही व अग्नीही रहात नाही. 39
440-15
तेवी समूळ अविद्या खाये । ते ज्ञानही जै बुडोनि जाये । तऱ्ही नाही कीर नोहे । आणि न साहे असणेही ॥440॥
त्याप्रमाणे समूळ अविद्येचा ग्रास करणारे जे ज्ञान, ते ज्ञानही जेव्हा लय पावते वेळीं, ” काही नाहीं” असा अत्यंताभाव तर नाहीच, पण म्हणून ” आहे ” असे म्हणाल तर ” नाही ” ह्याच्या अपेक्षेने रूढ असलेले “आहे ” हे पद तरी, केवल अस्तिता=सत्तारूप असलेल्या वस्तूबद्दल कसे सहन होईल ? 440
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
441-15
पै विश्व घेऊनि गेला मागेसी । तया चोराते कवण के गिंवसी ? । जे कोणी एकी दशा ऐसी । शुद्ध ते मी ॥441॥
(अज्ञान किंवा मूलाविद्या हे जगताचे उपादान कारण आहे; त्याचे नाशक असे एकच साधन म्हणजे अंतःकरणवृत्तिस्थ शुद्ध शास्त्रीय ब्रह्मज्ञान होय; ह्याच्या उदयाने उपादानकारण जे अज्ञान त्याचा ग्रास होत असल्याने तत्कार्य जे जगत् याचा कोठे मागमूसही उरत नाही; तसेच अज्ञाननाश झाल्यावर हे ब्रह्मज्ञान पुढे काही कर्तव्य उरले नाही म्हणून स्वभावत: आपले मूलस्वरूप मे सामान्यज्ञान त्यात लय पावते, तेव्हा त्याला शुद्ध ब्रह्मता आली. ह्या दोन्ही अभिप्रायांनी महाराज म्हणतात, असा जो अलौकिक चोर, की ज्याने सर्व विश्व त्यातील वाटांसह चोरून नेऊन त्या चोरीचा काही मागमूसही ठेविला नाही त्या चोराचा कोण व कसा पत्ता लावणार ? अशा ह्या लोकोत्तर चोराचे जे मूलस्थान हेच माझे शुद्धस्वरूप होय. 41
442-15
ऐसी जडाजडव्याप्ती । रूप करिता कैवल्यपती । ठी केली निरुपहिती । आपुल्या रूपी ॥442॥
कैवल्यपति भगवान् श्रीकृष्ण, ह्यांनी स्थावरजंगमांमध्ये असलेल्या आपल्या ओतप्रोत व्याप्तीन्हे निरूपण करीत करीत ह्याप्रकारे आपल्या निरुपाधिक स्वरूपाच्या मुक्कामापर्यंत येऊन पोचले. 42
443-15
तो आघवाचि बोधु सहसा । अर्जुनी उमटला कैसा । व्योमींचा चंद्रोदयो जैसा । क्षीरार्णवी ॥443॥
आकाशांतील चंद्राचे क्षीरार्णवांत जसे स्पष्ट प्रतिबिंब व्हावे तसा या सर्व बोधाचा अर्जुनाच्या चित्तावर एकदम ठसा उमटला. 43
444-15
का प्रतिभिंती चोखटे । समोरील चित्र उमटे । तैसा अर्जुने आणि वैकुंठे । नांदतसे बोधु ॥444॥
एका भिंतीवरील चित्र, समोरच्या आरशा सारख्या शुद्ध भितींत तंतोतंत उमटून, जसे दोन ठिकाणी नांदते असे दिसते, त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान् ह्यांच्या ठिकाणचा एकच बोध, शुद्ध भित्तिस्थान असलेल्या अर्जुनाच्या अंतःकरणात जसाच्या तसा उमटलेला दिसत होता. 44
445-15
तरी बाप वस्तुस्वभावो । फावे तव तव गोडिये थांवो । म्हणौनि अनुभवियांचा रावो । अर्जुन म्हणे ॥445॥
पण, महाराज, वस्तुमहिमाच असा आहे ! जशी ती अनुभवाला चढावी (अनुभव दृढ व्हावा) तशी तिजविषयींची गोडी वाढते, म्हणून, अशा जातीच्या भाग्यवंतांतील श्रेष्ठ अर्जुन म्हणाला. 45
446-15
जी व्यापकपण बोलता । निरुपाधिक जे आता । स्वरूप प्रसंगता । बोलिले देवो ॥446॥
देवा, आपले व्यापकपण सांगता सांगता, प्रसंगानुरोधानेच, शेवटी आपल्या शुद्ध निरुपाधिक स्वरूपाचे जे वर्णन केले, 46
447-15
ते एक वेळ अव्यंगवाणे । कीजो का मजकारणे । तेथ द्वारकेचा नाथु म्हणे । भले केले ॥447॥
ते पुन्हा एक वेळ माझ्यासाठी संपूर्णतया सांगावे अशी इच्छा आहे ! हे ऐकून देव म्हणाले, अर्जुना, शाबास शाबास ! 47
448-15
पै अर्जुना आम्हाहि वाडेकोडे । अखंडा बोलो आवडे । परी काय कीजे न जोडे । पुसते ऐसे ॥448॥
खरे सांगू का ? (पै) अर्जुना, आम्हालाही ह्या गोष्टीची फार आवड आहे ! तिच्याच अखंड गोष्टी कराव्या असे वाटते; पण काय करावे ? कोणी विचारणाराच भेटत नाही रे. 48
449-15
आजि मनोरथांसि फळ । जोडलासि तू केवळ । जे तोंड भरूनि निखळ । आलासि पुसो ॥449॥
आज मात्र माझे मनोरथ फळले; आणि ते केवळ तुझ्यामुळे हो ! का म्हणशील तर काहीही आशंका न घरिता केवळ ह्याच म्हणजे निरुपाधिक स्वरूपाविषयींचा प्रश्न केलास म्हणून. 49
450-15
जे अद्वैताहीवरी भोगिजे । ते अनुभवीच तू विरजे । पुसोनि मज माझे । देतासि सुख ॥450॥
(अद्वैतरूपतेनंतर) अद्वैतप्राप्तीच्या सुखाचा जो एक भोग आहे, तो देण्यास तू मला साह्य झाला आहेस. कारण, तुझा प्रश्न माझ्या निरुपाधिक स्वरूपाचा असल्याने माझ्या सुखाचाच मला पुन्हा भोग घडवीत आहेस. 450
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २४६ वा. ३, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २९४१ ते २९५२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २९४१
मागे पुढे नाही । दुजे यावेगळे काही ॥१॥
नाही उरले आणीक । केला झाडा सकळिक ॥धृपद॥
विश्वासावाचून । नावे दुजियाचे शून्य ॥२॥
तुका म्हणे काही । बोलायची उरी नाही ॥३॥
अर्थ
देवावाचून माझ्या मागेपुढे दुसरे वेगळे असे काहीच नाही. देवावाचून माझ्या मागेपुढे दुसरे काहीही उरले नाही मी सर्व गोष्टींचा झाडा म्हणजे बाद केला आहे. माझा एक देवावाचून दुसरा कोणावरही विश्वास नाही देवावाचून मी दुसऱ्या सर्व गोष्टींवर शून्य घातला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आता देवावाचून इतर काहीही बोलायचे उरलेले नाही. ”
अभंग क्र. २९४२
वैराग्याचा अंगी झालासे संचार । इच्छी वनांतर सेवावया ॥१॥
का जी याचे करू नये समाधान । वियोगाने मन सिणतसे ॥धृपद॥
नयेचि यावया पंढरीचे मूळ । न देवेचि माळ कंठींची ही ॥२॥
तुका म्हणे झाले अप्रीतीचे जिणे । लाजिर हे वाणे सेवा करी ॥३॥
अर्थ
आता माझ्या अंगी वैराग्याचा संचार झाला आहे त्यामुळे वनामध्ये जाऊन एकातवास भोगण्याची इच्छा माझ्या मनात होत आहे. देवा अहो तुमच्या वियोगाने माझ्या मनाला खूप त्रास होत आहे मग अशी माझी स्थिती असून देखील सुध्दा तुम्ही माझे समाधान का करु नये ? अहो देवा मला पंढरीला बोलावण्यासाठी कोणाचा निरोप देखील येत नाही आणि गळयातील तुळशीची माळ देखील तुम्ही मला देत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुमचे माझ्यावर प्रेमच राहिले नाही असेच मला वाटत आहे त्यामुळे माझे जीणे म्हणजे लाजिरवाणे झाले आहे तरी देखील मी लाज सोडून तुमची सेवा करीत आहे. ”
अभंग क्र. २९४३
आळिकरा कोठे साहाते कठिण । आपुला ते प्राण देऊ पाहे ॥१॥
सांभाळावे मायबापे कृपादृष्टी । पीडिता तो दृष्टी देखो नये ॥धृपद॥
अंतरलो मागे संवसारा हाती । पायापे सरती झालो नाही ॥२॥
तुका म्हणे तुम्ही विचारा जी देवा । ठेवाल ते ठेवा कोणी परी ॥३॥
अर्थ
हट्टी मुलाला आईचे कठोर वागणे कुठे सहन होत असते का तो रडून रडून आपले प्राण देखील देण्यास घाबरत नाही त्यामुळे मायबापाने आपल्या मुलाचा सांभाळ कृपादृष्टीने करावा त्या मुलाला पीडा झालेली देखील दृष्टीने त्यांनी पाहू नये. देवा मी तुमच्या प्राप्तीसाठी संसाराला हातातून सोडून संसारापासून अंतरलो तरी मी तुमच्या पायाजवळ सरता झालो नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अहो तुम्ही माझ्याविषयी थोडा विचार करा आणि मग तुम्हाला मला कसे ठेवायचे असेल तसे ठेवा. ”
अभंग क्र. २९४४
स्वप्नीचे हे धन हाती ना पदरी । प्रत्यक्ष का हरी होऊ नये ॥१॥
आजुनि का करा चाळवाचाळवी । सावकाशे द्यावी सत्य भेटी ॥धृपद॥
बोलोनिया फेडा जीवींची काजळी । पाहेन कोवळी चरणांबुजे ॥२॥
तुका म्हणे माझ्या जीवींचिया जीवा । सारूनिया ठेवा पडदा आता ॥३॥
अर्थ
अहो हरी स्वप्नातले धन हे हातात नाही पडत व पदरातही पडत नाही त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला तुमचा अनुभव देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटच का देत नाही ? देवा मला तुमच्या सगुण स्वरुपाविषयी पूर्ण माहिती झाली आहे त्यामुळे तुम्ही अजून देखील माझी फसवाफसवी का करता तुम्ही मला सावकाश का होईना परंतू तुमच्या सगुण स्वरुपाचे सत्य दर्शन दयावे. देवा तुम्ही मला तुमच्याजवळ बोलवून माझ्या जीवाची काजळीरुपी किल्मिश दूर करा मग मी तुमची कोवळी चरणकमळे प्रत्यक्ष माझ्या डोळयाने पाहीन. तुकाराम महाराज म्हणतात, “हे माझ्या जीवाच्या जीवना आता आपल्या दोघाच्यामधील भेदाचा पडदा तुम्ही सारुन ठेवा. ”
अभंग क्र. २९४५
येतील अंतरा शिष्टाचे अनुभव । तळमळी जीव तया सुखा ॥१॥
आता माझा जीव घेउनिया बळी । बैसवावे वोळी संताचिये ॥धृपद॥
विस्तारिली वाचा फळेंविण वेल । कोरडेचि बोल फोस वांझे ॥२॥
तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी । राहो नेदी उरी नारायणा ॥३॥
अर्थ
पूर्वी जे ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत मुनी होऊन गेले त्यांना जो ब्रम्हानुभवाचा अनुभव आला तोच अनुभव माझ्या अंतरंगात येईल काय आणि त्या सुखासाठीच माझा जीव तळमळत आहे. अहो देवा आता माझ्या सुखाचा बळी तुम्ही घ्या आणि परंतू संतांच्या मात्र रांगेमध्ये मला बसवा. एखादा वेल फळावाचून नुसताच विस्तार पावावा त्याप्रमाणे माझे बोलणे हे खूपच विस्तार पावले आहे परंतू ते अनुभवाने खोल कोरडे वांझ राहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे नारायणा मी आता अगदी निर्वाणीवर आलो आहे आता मी काहीही बाकी राहू देणार नाही. ”
अभंग क्र. २९४६
म्हणउनि काय जीऊ भक्तपण । जायाची भूषणे अळंकार ॥१॥
आपुल्या कष्टाची करूनिया जोडी । मिरवीन उघडी इच्छावसे ॥धृपद॥
तुके तरि तुके खऱ्याचे उत्तम । मुलाम्याच्या भ्रम कोठवरी ॥२॥
तुका म्हणे पुढे आणि मागे फांस । पावे ऐसा नास न करी देवा ॥३॥
अर्थ
अंत:करणात भक्ती नाही आणि केवळ भक्तपणा दाखवून जगून काय उपयोग आहे दुसऱ्याचे अलंकार आपलीच आहे हे सांगून काय होणार आहे ? देवा मी माझ्या कष्टाने तुझी प्राप्ती करुन घेईन आणि मग माझ्या इच्छेने उघड उघड माझा भक्तपणा सर्वत्र मिरवीन. खऱ्या सोन्याच्या बरोबरीला उत्तम प्रकारच्या वस्तूच बरोबरीला उतरतात परंतू सोन्याचा मुलामा दिलेल्या खोटया धातूचा भ्रम कोठपर्यंत टिकेल ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी मागे आणि पुढे जन्ममरणाच्या पाषात सापडेन अशा प्रकारचा स्वत:चा नाश कधीच करुन घेणार नाही. ”
अभंग क्र. २९४७
आपणचि व्हाल साहे । कार्य आहे निर्वाणीचे ॥१॥
भाकिली ते उरली कीव । आहे जीव जीवपणे ॥धृपद॥
आहाच कैचा बीजा मोड । प्रीति कोड वाचूनि ॥२॥
तुका म्हणे दंडिन काया । याल तया धावणिया ॥३॥
अर्थ
देवा मी निर्वाणीचे कार्य हाती घेतले आहे तरी त्यावेळ प्रसंगी तुम्ही मला साह्य व्हाल. देवा यापूर्वी मी तुम्हाला खूप करुणा भाकली परंतू माझी उरली आहे ती केवळ “करुणाच”, अहो माझा जीव अजूनही जीवदशेतच आहे. अहो देवा नुसते वरच्या वर बीज ठेवले तर त्याला मोड कसे फुटेल त्याप्रमाणेच तुमचे माझ्यावर प्रेमच नसले तर माझी इच्छा तरी कशी पूर्ण होणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता मी माझ्या शरीराला दंड करील त्रास करुन घेईन त्यामुळे तरी तुम्ही माझ्याकडे धावत याल. ”
अभंग क्र. २९४८
निश्चिंतीने होतो करुनिया सेवा । का जी मन देवा उद्वेगिले ॥१॥
अनंत उठती चित्ताचे तरंग । करावा हा त्याग वाटतसे ॥धृपद॥
कोण तुम्हाविण मनाचा चाळक । दुजे सांगा एक नारायणा ॥२॥
तुका म्हणे माझा मांडिला विनोद । करऊ नेणे छंद कराल काइ ॥३॥
अर्थ
देवा मी निश्चिंतपणाने तुमची सेवा करत होतो परंतू तुम्ही माझ्या मनाला का दु:खी केले ? अहो देवा त्यामुळे अंतरंगामधे अनेक प्रकारच्या विकाराचे तरंग उठतात आणि तुमच्या सेवेचा त्याग करावा असे वाटते. हे नारायणा अहो तुमच्यावाचून माझ्या मनाचा दुसरा कोण चालक आहे काय ते तुम्हीच सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही माझी चांगलीच थट्टा विनोद मांडला आहे परंतू मला तुमचा छंद कसा करावा हेच समजत नाही त्याला तुम्ही तरी काय करताल. ”
अभंग क्र. २९४९
आश्वासावे दास । तरी घडे तो विश्वास ॥१॥
नाही चुकत चाकरी । पुट लाडे शोचे थोरी ॥धृपद॥
स्वामीच्या उत्तरे । सुख वाटे अभये करे ॥२॥
न मगे परि भाते । तुका म्हणे निढळ रिते ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही तुमच्या दासाला केवळ “भिऊ नकोस मी आहे” असे आश्वासन जरी दिले तरी तुमच्या दासाला तुमच्याविषयी विश्वास वाटतो. आम्हाला तुम्ही केवळ आश्वासन दिले तरी आमचे म्हणजे तुमच्या लाडक्या भक्तांचे महत्व जगामधे वाढेल आणि आम्ही तुमची सेवा करण्यास कधीही चुकत नाहीत. अहो स्वामीच्या नुसत्या प्रेमाच्या शब्दाने आणि स्वामीच्या अभयहस्त मस्तकावर असल्याने दासाला सुख वाटत असते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुमची आम्ही जी सेवा करतो त्याच्या बदल्यात आम्हाला तुम्ही काहीतरी दयावे असे आम्ही तुम्हाला तर मागणार नाही परंतू तुम्ही केवळ आम्हाला आश्वासन जरी दिले तरी आम्हाला चांगले वाटेल. ”
अभंग क्र. २९५०
जेणे होय हित । ते तू जाणसी उचित ॥१॥
मज नको लावू तैसे । वाया जाये ऐसे पिसे ॥धृपद॥
धरितोसी सत्ता । होसी सकळ जाणता ॥२॥
चतुराच्या राया । अंगीकारावे तुकया ॥३॥
अर्थ
देवा ज्या योगाने माझे हित होईल व जे उचित आहे ते तू जाणतो आहेस. देवा मी उगाचच वायाला जाईन असले भलतेसलते काही वेड तू मला लावू नकोस. देवा सर्व सत्ताधारी व सर्व जाणता तू आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, “हे चतुरांच्या राजा तू माझा अंगीकार कर. ”
अभंग क्र. २९५१
राहे उभा वादावादी । तरी फंदी सापडे ॥१॥
लव्हाळ्यासी कोठे बळ । करिल जळ आपुले ॥धृपद॥
कठिणासी बलजोडा । नम्र पीडा देखेना ॥२॥
तुका म्हणे सर्वरसी । मिळे त्यासी गोत ते ॥३॥
अर्थ
जो नेहमी वादावाद करण्यासाठी उभाच असतो तो कधीना कधी अडचणीत सापडतो. लव्हाळयामध्ये कुठे बळ आहे काय परंतू कितीही पाण्याचा प्रवाह असला तरी त्या पाण्याच्या प्रवाहापुढे ते नम्र होते व पाण्याला आपलेसे करते. जो कोणी वादविवाद करण्यासाठी नेहमी तत्पर असतो त्याला कोणीना कोणी कधी ना कधी त्याच्यासारखा भेटतोच व तो त्याला दु:ख देतोच परंतू जो नम्र आहे तो सर्वापुढे नम्र असतो त्यामुळे त्याला कधीही दु:ख दिसतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “जो सर्वाशी समरस होऊन वागतो त्याचे सर्व जग गणगोत होते. ”
अभंग क्र. २९५२
म्हणउनि झाली तुटी । नाही भेटी अहंकारे ॥१॥
दाखविले देवे वर्म । अवघा भ्रम नासला ॥धृपद॥
हाते मुरगाळिता कान । नाही भिन्न वेदना ॥२॥
तुका म्हणे एकातसुखे । अवघी गोते गुंतले ॥३॥
अर्थ
अहंकारच माझ्या ठिकाणी राहिला नाही त्यामुळेच संसाराचा निरास झाला आहे. देवाने मला परमार्थ करण्याचे खरे वर्म दाखविले त्यामुळे माझा सर्व भ्रमच नाहीसा झाला आहे. आपल्याच हाताने आपण आपला कान पिरगळून घेतला तर आपल्याला वेदना होतीलच. तुकाराम महाराज म्हणतात, “जर आपल्याला असे एकातसुख प्राप्त झाले तर सर्व गणगोत आपल्यामध्येच गुंततात. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















