आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२८ सप्टेंबर, दिवस २७१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी ४५१ ते ४७३ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३२४१ ते ३२५२
“२८ सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 28 September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २८ सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३२४१ ते ३२५२ चे पारायण आपण करणार आहोत.
२८ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी ४५१ ते ४७३,
451-16
तरी माशालागी भुलला । ब्राह्मण पाणबुडा रिघाला । की तेथही पावला । नास्तिकवादु ॥451॥
ब्राह्मण, माशांच्या आशेने पाणबुडा (कोळ्यांच्या जातींत) शिरला, पण असला नास्तिक आम्हाला नको, म्हणून तेही त्याला आपल्या जातीत घेईनात, तात्पर्य तो आपल्या व परक्या जातीस मुकला ! 51
152-16
तैसे विषयांचेनि कोडे । जेणे परत्रा केले उबडे । तव तोचि आणिकीकडे । मरणे नेला ॥452॥
त्याप्रमाणे विषयांच्या लालचीने त्याने परलोक तर लाथाडलाच; पण विषयभोग तरी घडेल म्हणावे तर इतक्यात त्यास मृत्यूने गाठले ! ( सारांश, दोन्ही अंतरला ! ) 52
453-16
एवं परत्र ना स्वर्गु । ना ऐहिकही विषयभोगु । तेथ केउता प्रसंगु । मोक्षाचा तो ? ॥453॥
ह्याप्रमाणे, परलोक किंवा स्वर्ग नाही व ऐहिक विषयभोगही नाही, अशा स्थितीत मोक्षाची गोष्टच कशाला पाहिजे ? 53
454-16
म्हणौनि कामाचेनि बळे । जो विषय सेवू पाहे सळे । तया विषयो ना स्वर्गु मिळे । ना उद्धरे तो ॥454॥
म्हणून कामाच्या नादी लागून जो विषयांचे बळाने सेवन करू पाहतो, त्याला विषयही नाही व स्वर्गही नाही असे होते; उद्धार तर. 54
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहाऱसि ॥16. 24॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः ॥16॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील दैवासुरसंपद्विभागयोग नावाचा हा सोळावा अध्याय समाप्त झाला. ॥16॥
455-16
याकारणे पै बापा । जया आथी आपुली कृपा । तेणे वेदांचिया निरोपा । आन न कीजे ॥455॥
म्हणून अर्जुना, ज्याला आपल्या स्वतःवरच कृपा करणे असेल त्याने वेदाज्ञेचे उल्लंघन करू नये. 55
456-16
पतीचिया मता । अनुसरोनि पतिव्रता । अनायासे आत्महिता । भेटेचि ते ॥456॥
पतीच्या मनोगताप्रमाणे वागल्याचे श्रेय जोडून त्यातच पतिव्रता जसे आत्मकल्याणही साधिते. 56
457-16
नातरी श्रीगुरुवचना । दिठी देतु जतना । शिष्य आत्मभुवना- । माजी पैसे ॥457॥
किंवा श्रीगुरुवचनाकडे लक्ष्य देऊन त्याचे काळजीपूर्वक जतन (चिंतन) करणारा शिष्य जसा आत्मभुवनामध्ये म्हणजे स्वरूपच्या ठिकाणी स्थित होतो. 57
458-16
हे असो आपुला ठेवा । हाता आथी जरी यावा । तरी आदरे जेवी दिवा । पुढा कीजे ॥458॥
हेही असो; आपलाच ठेवा खरा; पण सापडावा असे वाटत असेल तर जसे दीपाचे सहाय्य घ्यावे लागतं, 58
459-16
तैसा अशेषांही पुरुषार्था । जो गोसावी हो म्हणे पार्था । तेणे श्रुतिस्मृति माथा । बैसणे घापे ॥459॥
तसे, अशेष पुरुषार्थाचा धनी होण्याची ज्याची इच्छा असेल त्याने श्रुति व स्मृति ह्यांच्या आज्ञा शिरसावंद्य मानाव्या. 59
460-16
शास्त्र म्हणेल जे सांडावे । ते राज्यही तृण मानावे । जे घेववी ते न म्हणावे । विषही विरु ॥460॥
शास्त्र ज्याचा निषेध करील ती राज्यासारखी वस्तूही तृणवत् मानावी व ज्याचा स्वीकार कर असे शास्त्रवचन असेल ती वस्तु विषाप्रमाणे असली तरीही आपला वैरी अहितकारी आहे असे म्हणू नये. 460
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
461-16
ऐसिया वेदैकनिष्ठा । जालिया जरी सुभटा । तरी के आहे अनिष्टा । भेटणे गा ? ॥461॥
अर्जुना, अशा वैदिकनिष्ठ पुरुषाला कधीतरी अनिष्टाची गाठ पडेल काय ? 61
462-16
पै अहितापासूनि काढिती । हित देऊनि वाढविती । नाही गा श्रुतिपरौती । माउली जगा ॥462॥
हे पहा; अहितापासून रक्षण करणारी व हितबोध करून वाढविणारी अशी श्रुतीसारखी साऱ्या जगाची माउली कोणी नाहीच नाही. 62
463-16
म्हणौनि ब्रह्मेशी मेळवी । तव हे कोणे न सांडावी । अगा तुवांही ऐसीचि भजावी । विशेषेसी ॥463॥
म्हणून जिच्या योगे ब्रह्मप्राप्ति होते अशा ह्या श्रुतीची कोणीही करू अवज्ञा नये आणि अर्जुना, तू तर तिचे विशेषच पालन कर. 63
464-16
जे आजि अर्जुना तू येथे । करावया सत्य शास्त्रे सार्थे । जन्मलासि बळार्थे । धर्माचेनि ॥464॥
कारण अर्जुना, शास्त्र सत्य व सार्थ आहे हे लोकांना स्पष्टपणे पटवून देण्याकरिता म्हणून महान् पूर्वपुण्याचरणाने तुझा येथे जन्म झाला आहे. 64
465-16
आणि धर्मानुज हे ऐसे । बोधेचि आले अपैसे । म्हणौनि आनारिसे । करू नये ॥465॥
आणि सहज ओघाने तु धर्मानुजहि आहेस; म्हणूनही तुझा त्याबद्दल विशेष आदर असावा. 65
466-16
कार्याकार्यविवेकी । शास्त्रंचि करावी पारखी । अकृत्य ते कुडे लोकी । वाळावे गा ॥466॥
कार्य काय व अकार्य काय हा विचार किंवा निर्णय शास्त्राज्ञे प्रमाणेच करावा व जे अकृत्य ते अनिष्ट मानून त्याचा त्याग करावा. 66
467-16
मग कृत्यपणे खरे निगे । ते तुवा आपुलेनि आंगे । आचरोनि आदरे चांगे । सारावे गा ॥467॥
व जे कर्तव्य असे ठरेल, ते आदरपूर्वक तू जातीने आचरून पुरे करावे. 67
468-16
जे विश्वप्रामाण्याची मुदी । आजि तुझ्या हाती असे सुबुद्धी । लोकसंग्रहासि त्रिशुद्धी । योग्यु होसी ॥468॥
कारण तुझे शुद्ध बुद्धि असून, तुझा आचार लोकांनी प्रमाणभूत मानावा, असा तुझा व्यावहारिक अधिकारही आहे; व म्हणूनच लोकसंग्रहदृष्टयाही तु निःसंशय योग्य आहेस. 68
469-16
एवं आसुरवर्गु आघवा । सांगोनि तेथिचा निगावा । तोहि देवे पांडवा । निरूपिला ॥469॥
ह्याप्रमाणे आसुरी संपत्ति व तिचे परिणाम ह्यांचे देवांनी अर्जुनास निरूपण केले. 69
470-16
इयावरी तो पंडूचा । कुमरु सद्भावो जीवीचा । पुसेल तो चैतन्याचा । कानी ऐका ॥470॥
ह्यापुढे तो पंडुकुमर जे काही सद्भावपूर्वक विचारील ते सावधान चित्ते ऐकावे. 470
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
471-16
संजये व्यासाचिया निरोपा । तो वेळु फेडिला तया नृपा । तैसा मीहि निवृत्तिकृपा । सांगेन तुम्हा ॥471॥
श्रीव्यासाचे आज्ञे प्रमाणे संजयाने ह्या निरोपाने राजा धृतराष्ट्राचा जसा कालक्षेप केला तसा मीही तुमचा करीन. 71
472-16
तुम्ही संत माझिया कडा । दिठीचा कराल बहुडा । तरी तुम्हा माने येवढा । होईन मी ॥472॥
तुम्ही संतजन जर मजवर आपला कृपावर्षाव कराल तर तुम्हाला मान्य व्हावा अगर पटावा असा (व्याख्यान करणारा) मी ही होईन. 72
473-16
म्हणौनि निज अवधान । मज वोळगे पसायदान । दीजो जी सनाथु होईन । ज्ञानदेवो म्हणे ॥473॥
म्हणून महाराज संतांस म्हणतात, आपले अवधान देऊन मज शिष्यावर प्रसाद व्हावा म्हणजे मी अनाथ राहाणार नाही. 473
॥ इति श्रीज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकायां दैवासुरसंपद्विभागयोगोनाम षोडशोऽध्यायः ॥16॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :-24॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 473॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २७१ वा. २८, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३२४१ ते ३२५२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३२४१
आजि शिवला मांग । माझे विटाळले आंग ॥१॥
यासी घेऊ प्रायश्चित्त । विठ्ठलविठ्ठल हृदयात ॥धृपद॥
झाली क्रोधासवे भेटी । तोंडावाटे नर्क लोटी ॥२॥
अनुतापी न्हाऊ । तुका म्हणे रवी पाहू ॥३॥
अर्थ
मला आज मांग शिवला त्यामुळे माझे अंग विटाळले आहे. याला आता एकच प्रायश्चित्त आहे ते म्हणजे विठ्ठल विठ्ठल असे नाम चिंतन ह्दयात घेऊ. अहो माझ्या अंगाला आज क्रोधरुपी मांग शिवला आहे अश्या मांगाची मला आज भेट झाली त्यामुळे माझ्या तोंडावाटून विचित्र शब्द बाहेर पडून तोंडवाटे जणू नरकच बाहेर वाहत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “त्यामुळे आज पश्चात्तापरुपी पाण्यामध्ये स्नान करुन सूर्याचे दर्शन घेऊ. ”
3:34
अभंग क्र. ३२४२
ठाव तुम्हापाशी । झाला आता हृषीकेशी ॥१॥
न लगे जागावे सतत । येथे स्वभावे हे नीत ॥धृपद॥
चोरट्यासी थारा । येथे कैचा जी दातारा ॥२॥
तुका म्हणे मने । आम्हा झाले समाधान ॥३॥
अर्थ
हे ऋषिकशी आता आमचा आश्रयस्थान तुमच्या पाया जवळच आहे. तुमच्या पायाजवळ सतत जागृत राहावे लागत नाही हे तुमच्या पायाचे वैशिष्ट्य आहे, स्वभाव आहे, धर्मनीती आहे. हे दातारा तुमच्या पायाजवळ कामक्रोध रुपी षडविकार तसेच काळ रुपी चोरांना थारा कसा मिळेल ? तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या मनाला तुमच्या पायाजवळ थारा मिळाला आहे त्यामुळे माझे मन समाधानी झाले आहे.
3:34
अभंग क्र. ३२४३
पाळियेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे ॥१॥
बहुजन्माचे पोषणे । सरते पायापाशी तेणे ॥धृपद॥
सवे दिली लागो । भाते आवडीचे मागो ॥२॥
तुका म्हणे भिन्न । नाही दिसो दिले क्षण ॥३॥
अर्थ
विठ्ठल कृपाळू आहे त्याने आजपर्यंत माझे सर्व लाड पूर्ण केलेले आहेत. अहो या विठ्ठलाने मला खूप जन्मांतरापासून पोसले आहे माझे पालनपोषण केले आहे आणि त्याने त्याच्या पायापाशी मला सरते म्हणजे मान्य केले आहे. त्याने मला खूप जन्मांपासून त्याच्याजवळ राहण्याची सवय लागू दिली आहे त्यामुळे मला जे आवडेल ते खाऊ मी त्याला कायम मागत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “या विठ्ठलाने एक क्षणभर देखील मला त्याच्यापासून भिन्न दिसू दिले नाही. ”
3:35
अभंग क्र. ३२४३
पाळियेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे ॥१॥
बहुजन्माचे पोषणे । सरते पायापाशी तेणे ॥धृपद॥
सवे दिली लागो । भाते आवडीचे मागो ॥२॥
तुका म्हणे भिन्न । नाही दिसो दिले क्षण ॥३॥
अर्थ
विठ्ठल कृपाळू आहे त्याने आजपर्यंत माझे सर्व लाड पूर्ण केलेले आहेत. अहो या विठ्ठलाने मला खूप जन्मांतरापासून पोसले आहे माझे पालनपोषण केले आहे आणि त्याने त्याच्या पायापाशी मला सरते म्हणजे मान्य केले आहे. त्याने मला खूप जन्मांपासून त्याच्याजवळ राहण्याची सवय लागू दिली आहे त्यामुळे मला जे आवडेल ते खाऊ मी त्याला कायम मागत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “या विठ्ठलाने एक क्षणभर देखील मला त्याच्यापासून भिन्न दिसू दिले नाही. ”
3:38
अभंग क्र. ३२४४
जो या गेला पंढरपुरा । आणीक यात्रा न मनी तो ॥१॥
सुलभ माय पंढरिराणा । पुरवी खुणा अंतरींच्या ॥धृपद॥
जन्मांतरिंच्या पुण्यरासी । वारी त्यासी पंढरीची ॥२॥
बाहेर येता प्राण फुटे । रडे दाटे गहिवरे ॥३॥
दधिमंगळभोजन सारा । म्हणती करा मुरडींव ॥४॥
मागुता हा पाहो ठाव । पंढरिराव दर्शने ॥५॥
तुका म्हणे भूवैकुंठ । वाळुवंट भींवरा ॥६॥
अर्थ
जो या पंढरपूरच्या यात्रेला एकदा गेला तो इतर कोणत्याही यात्रा मानीत नाही. माझी माय म्हणजे पंढरीचा राया विठ्ठल आहे ती त्याच्या भक्तरुपी लेकरांच्या अंत:करणातील सर्व खुणा ओळखते व ती पूर्ण करते. अनेक जन्माच्या पुण्याच्या राशी असतील तरच त्या मनुष्यास पंढरीची वारी घडते. भक्त एकदा पंढरपूरला गेले विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि पंढरीतून बाहेर पडले की त्यांना रडू येते त्यांचा कंठ दाटतो ते अगदी गहिवरुन जातात. ते भक्त एकमेकाला म्हणतात की आज आपल्याला पंढरी सोडून जायचे आहे आज दही भाताचा मंगलमय जेवण करा मूरडीचा कानवला करा. आपण जर असे केले तर आपण लवकरच पुन्हा पंढरीला येवू आणि पंढरीरायाचे पुन्हा लवकरच दर्शन घेऊ अशी नितांत श्रध्दा वारकऱ्यांची असते. तुकाराम महाराज म्हणतात, “भीमा नदीच्या तीरावरील वाळवंटावर वसलेली पंढरीक्षेत्र म्हणजे भूवैकुंठच आहे. ”
3:38
अभंग क्र. ३२४५
न मिळती एका एक । जये नगरीचे लोक ॥१॥
भली तेथे राहू नये । क्षणे होईल न कळे काय ॥धृपद॥
न करिता अन्याय । बळे करी अपाय ॥२॥
नाही पुराणाची प्रीति । ठायींठायी पंचाइती ॥३॥
भल्या बुऱ्या मारी । होता कोणी न विचारी ॥४॥
अविचाऱ्या हाती । देऊनि प्रजा नागविती ॥५॥
तुका म्हणे दरी । सुखे सेवावी ते बरी ॥६॥
अर्थ
ज्या नगरीचे लोक एकमेकांच्या मताने एकत्र येऊन मिसळत नाहीत, मग भल्या माणसाने तेथे राहूच नये एक क्षणात तेथे कोण काय करेल व काय होईल हे सांगताच येणार नाही. अहो एखादा सभ्य मनुष्य जर तेथे गेला भला मनुष्य जर तेथे गेलाच तर त्या गावातील लोक त्याने काहीही अन्याय न करता बळेच त्याचे काहीतरी नुकसान करतील. अहो त्या गावामध्ये हरीकथा पुराणे याविषयी आवड तर नसतेच परंतू भांडण मिटवण्यासाठी जागोजागी पंचायत चालू असते. वाईट प्रवृत्तीचे माणसांचे आणि चांगल्या प्रवृत्तीच्या माणसांचे जर भांडण चालू असले आणि वाईट माणसे चांगल्या माणसांना मारीत असले तर तेथे कोणीही यामध्ये खरे अपराधी कोण आहेत याचा विचार करतच नाहीत. एखादया अविचारी माणसाच्या हातात तेथील प्रतिष्ठित लोक आपल्या राज्याची सत्ता देऊन टाकतात आणि आपल्या राज्यातील प्रजाजनांचे हाल त्रास करवून घेऊन त्यांना नागवितात. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा एक विचार नसलेल्या मनुष्यांच्या गावात राहण्यापेक्षा सुखाने डोंगर दऱ्यात राहणे हे चांगले. ”
3:38
अभंग क्र. ३२४६
शिकवणे नाक झाडी । पुढील जोडी कळेना ॥१॥
निरयगावी भोग देता । तेथे सत्ता आणिकाची ॥धृपद॥
अवगुणाचा साठा करी । तेचि धरी जीवासी ॥२॥
तुका म्हणे जडबुद्धी । कर्मशुद्धी सांडवी ॥३॥
अर्थ
एखादया मनुष्याला जर आपण चांगले शिकवण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला पटत नाही तो आपला तिरस्कार करतो व आपल्यापुढे नाक झाडून आपण सांगितलेला चांगला उपदेश तो ऐकत नाही परंतू अशा त्याच्या वागण्याने पुढे त्याला नरकाची प्राप्ती होईल हे त्याला कळत नाही. मग पुढे त्याला नरकप्राप्ती होते व तेथे त्याला अनेक प्रकारचे दु:ख भोगावे लागतात व यमदूताची व यमाची सत्ता त्याच्यावर चालते. अनेक दुर्गुणाचा साठा तो आपल्या ह्दयामध्ये करुन ठेवत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “हे असे जड बुध्दीचे लोक असतात की त्यांच्या अंत:करणातील जे दुर्गुण असतात त्या दुर्गुणामुळे ते शुध्द कर्म देखील टाकण्यास प्रवृत्त होतात. ”
3:39
अभंग क्र. ३२४७
गोपीचंदन मुद्रा धारणे । आम्हा लेणे वैष्णवा ॥१॥
मिरवू अळंकार लेणे । ही भूषणे स्वामीची ॥धृपद॥
विकलो ते सेवा जीवे । एक्याभावे एकविध ॥२॥
तुका म्हणे शूर झालो । बाहेर आलो संसारा ॥३॥
अर्थ
गोपीचंदन टिळे मुद्रा धारण करणे हे आम्हा वैष्णवाचे लेणे म्हणजे अलंकार आहेत. आमच्या स्वामींची ही भूषणे आहेत ते आम्ही आमच्या अंगावर परिधान करु आणि सर्वत्र मिरवू. आम्ही आमचा जीव स्वामीला एकनिष्ठतेने ऐक्यभावाने विकला आहे कारण आम्हाला स्वामीची सेवा करता यावी म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही संसारातून बाहेर पडलो त्यामुळे आम्ही शूर झालो आहोत. ”
3:39
अभंग क्र. ३२४८
विषयांचे लोलिंगत । ते फजीत होतील ॥१॥
न सरे येथे यातिकुळ । शुद्ध मूळबीज व्हावे ॥धृपद॥
शिखासूत्र सोंग वरी । दुराचारी दंड पावे ॥२॥
तुका म्हणे अभिमान । नारायणा न सोसे ॥३॥
अर्थ
जे विषयभोग भोगणारे आहेत ते पुढे जाऊन फजितच होतील. मग तेथे उच्च जात कुळ हे काहीही पाहिले जात नाही तेथे केवळ मुळातच शुध्द असलेले बीज असावे लागते मग तो कोणत्याही जातीचा असो तरी त्याला शिक्षा आहे. जरी शेंडी जानवे धारण केले आणि वरवर परमार्थाचे सोंग केले आणि अंत:करणात दुराचार वृत्ती ठेवली तर त्या दुराचाऱ्याला यमलोकात दंड होणार म्हणजे होणारच. तुकाराम महाराज म्हणतात, “नारायणाला अभिमान सहन होत नाही. ”
3:39
अभंग क्र. ३२४९
वडिले दिले भूमिदान । ते जो मागे अभिळासून ॥१॥
अग्रपूजेचा अधिकारी । श्रेष्ठ दंड यमा घरी ॥धृपद॥
उभयकुळ समवेत । नरकी प्रवेश अद्भुत ॥२॥
तप्तलोहे भेटी । तुका म्हणे कल्पकोटी ॥३॥
अर्थ
एखादयाच्या वडिलांनी भूमी दान म्हणून कोणालाही दिलेली असेल आणि ती भूमी दान दिलेली पुन्हा परत माघारी जो मागेल, मग तो यमाच्या घरी सर्वश्रेष्ठ दंड भोगणारा अधिकारी होऊन अग्रपूजेचा म्हणजे दंड भोगण्याचा अधिकारी होतो. यामध्ये अद्भूत गोष्ट अशी आहे तो एकटाच नरकामध्ये जात नाही तर आईचे आणि वडिलांचे दोन्हीही कुळ आपल्याबरोबर नरकात घेऊन जातो. तुकाराम महाराज म्हणतात, “मग त्या पापी मनुष्याला कल्पकोटी तापलेल्या लोहाला भेट दयावी लागते. ”
3:39
अभंग क्र. ३२५०
लटिकी ग्वाही सभेआत । देता पतित आगळा ॥१॥
कुंभपाकी वस्ती करू । होय धुरु कुळेसी ॥धृपद॥
रजस्वला रुधिर स्रवे । तेचि घ्यावे तृषेसी ॥२॥
तुका म्हणे जन्मा आला । काळ झाला कुळासी ॥३॥
अर्थ
धर्मसभेमध्ये जो खोटी ग्वाही देतो साक्ष देतो तो सर्वापेक्षा वेगळा पतित असतो. तो पापी सर्व पाप्यांच्या कुळामधील सर्वश्रेष्ठ पापी असतो त्यामुळे त्याला घोर अशा कुंभीपाक नरकामध्ये राहण्यास जागा मिळते. ज्यावेळी अशा पापी मनुष्याला कुंभीपाक नरकामध्ये तहान लागेल त्यावेळी रजास्वाला महिन्यातून चार दिवस बाजूला असलेल्या स्त्रीचे स्त्रवणारे जे रुधीर आहे ते पिण्यास देऊ असे यम म्हणतात, “तुकाराम महाराज म्हणतात, “असा पतित कुळामध्ये जन्माला येऊन सर्व कुळाचा काळच झालेला असतो. ”
3:39
अभंग क्र. ३२५१
आचरे दोष न धरी धाक । परीपाक दुःखाचा ॥१॥
चांडाळ तो दुराचारी । अंगीकारी कोण त्या ॥धृपद॥
नव्हे संतान वोसघर । अंधकार कुळासी ॥२॥
तुका म्हणे त्याचे दान । घेता पतन दुःखासी ॥३॥
अर्थ
जो पाप करतो आणि पाप करण्याविषयी कोणताही धाक मनामध्ये धरत नाही त्याचा परिणाम म्हणजे शेवटी त्याला दु:खच भोगावे लागते. तो चांडाळ दुराचारी आहे त्याचा अंगीकार कोण करेल ? अशा पापी मनुष्याला संतान होत नाही त्याचे घर तसेच ओस राहाते शेवटी त्याच्या कुळामध्ये अंधारच असतो दिवा लावण्यासही कोणी नसते. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा पापी मनुष्याकडून जर कोणी दान घेतले तर घेणाऱ्याचे पतन होते व त्याला दु:ख भोगावे लागते. ”
3:40
अभंग क्र. ३२५२
कीविलवाणा झाला आता । दोष करिता न विचारी ॥१॥
अभिलाषी नारी धन । झकवी जन लटिकेचि ॥धृपद॥
विश्वासिया करीता घात । न धरी चित्त काटाळा ॥२॥
तुका म्हणे नाही आला । वृथा गेला जन्मासी ॥३॥
अर्थ
पाप करताना पापी मनुष्याने कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही परंतू दु:ख भोगताना बघा किती केविलवाणा झाला आहे. अशा या पापी मनुष्याने परस्त्री व परधनाची अभिलाषा धरली व खोटे बोलून लोकांची फसवणूक केली. विश्वासू मनुष्याचा याने घात केला घात करताना कोणत्याही प्रकारचा मनामध्ये कंटाळा धरला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “पाप करताना याला कोणत्याही प्रकारचा विचार किंवा कंटाळा आला नाही त्यामुळे हा या जन्मी तर मेलाच परंतू पुन्हा जन्माला आला. ”
3:40
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















