आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२७ जून, दिवस १७८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ३२६ ते ३५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २१२५ ते २१३६
“27 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 27 June
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक 27 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २१२५ ते २१३६ चे पारायण आपण करणार आहोत.
27 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ३२६ ते ३५०,
326-13
का अभ्रापैलीकडे । जै येत चांदिणे कोडे । तै चकोरे चांचुवडे । उचलितीना ॥13-326॥
किंवा ढगामधून ज्या वेळेला चांदणे येते त्यावेळेला त्या मळकट चंद्रप्रकाशाचा उपभोग घेण्याकरता चकोर पक्षी कौतुकाने देखील आपली चोच सरसावीत नाहीत.
327-13
तैसे तुम्ही वास न पाहाल । ग्रंथु नेघा वरी कोपाल । जरी निर्विवाद नव्हैल । निरूपण ॥13-327॥
त्याप्रमाणे जर माझे निरूपण निर्विवाद (शंकारहित) होणार नाही, तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक असणार नाही व ग्रंथाचा स्वीकार करणार नाही, इतकेच नव्हे तर शिवाय आणखी तुम्ही रागवाल.
328-13
न बुझाविता मते । न फिटे आक्षेपाचे लागते । ते व्याख्यान जी तुमते । जोडूनि नेदी ॥13-328॥
निरनिराळ्या मतांचे निराकरण न करता जर अहिंसेचे व्याख्यान केले तर त्या व्याख्यानात आक्षेपांचा संबंध दूर होणार नाही. (त्यामधे शंकेच्या पुष्कळ जागा रहातील) व महाराज तसले व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही.
329-13
आणि माझे तव आघवे । ग्रथन येणेचि भावे । जे तुम्ही संती होआवे । सन्मुख सदा ॥13-329॥
आणि माझे ग्रंथ रचणे याच हेतूने आहे की तुम्ही संतांनी नेहेमी प्रसन्न असावे.
330-13
एऱ्हवी तरी साचोकारे । तुम्ही गीतार्थाचे सोइरे । जाणोनि गीता एकसरे । धरिली मिया ॥13-330॥
श्रोत्यांची स्तुती =
सहज विचार करून पाहिले तर तुम्ही खरोखर गीतार्थाचे चाहते आहात, असे समजून मी गीतेचा आश्रय केला, तिला जीवासारखी प्रिय मानून तिचे व्याख्यान करू लागलो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-13
जे आपुले सर्वस्व द्याल । मग इयेते सोडवूनि न्याल । म्हणौनि ग्रंथु नव्हे वोल । साचचि हे ॥331॥
जी आपली सर्व मालमत्ता (पूर्ण कृपा) आहे ती द्याल व हिला गीतेला सोडवून न्याल, म्हणून गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे तर माझ्याजवळ तुमचे तारण आहे.
332-13
का सर्वस्वाचा लोभु धरा । वोलीचा अव्हेरु करा । तरी गीते मज अवधारा । एकचि गती ॥332॥
अथवा तुम्ही आपल्या सर्वस्वाचा लोभ धराल व तारणाचा अव्हेर कराल तर गीतेची व माझी एकच गती आहे असे समजा.
333-13
किंबहुना मज । तुमचिया कृपा काज । तियेलागी व्याज । ग्रंथाचे केले ॥333॥
फार काय सांगावे ? मला तुमच्या कृपेशी काम आहे व या कृपेकरता मी हे ग्रंथाचे निमित्त केले.
334-13
तरी तुम्हा रसिकांजोगे । व्याख्यान शोधावे लागे । म्हणौनि जी मतांगे । बोलो गेलो ॥334॥
तरी तुम्ही जे रसिक त्या तुम्हा योग्य व्याख्यान योजावे लागले, म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली.
335-13
तव कथेसि पसरु जाहला । श्लोकार्थु दूरी गेला । कीजो क्षमा यया बोला । अपत्या मज ॥335॥
तो व्याख्यानाचा विस्तार झाला, श्लोकाचा अर्थ एकीकडे राहिला, या माझ्या बोलण्याबद्दल मला लेकराला आपण क्षमा करावी.
336-13
आणि घांसा आंतिल हरळु । फेडिता लागे वेळु । ते दूषण नव्हे खडळु । सांडावा की ॥336॥
आणि (जेवीत असताना) घासातील खडा काढताना वेळ लागतो, तर जेवणार्याला तो घासातील खडा काढण्याला वेळ लागला व आपले जेवण आटोपण्यास उशीर केला तर त्यात जेवणार्याचा दोष नाही, कारण घासातील खडे वगैरे कचरा काढून टाकलाच पाहिजे.
337-13
का संवचोरा चुकविता । दिवस लागलिया माता । कोपावे की जीविता । जिताणे कीजे ? ॥337॥
अथवा सोबतीच्या संभावित चोराला चुकवून आल्यामुळे घरी येण्यास मुलाला जास्त दिवस लागले तर आईने मुलावर रागवावे किंवा तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून मीठमोहर्या वगैरे ओवाळून त्याची दृष्ट काढावी !
338-13
परी यावरील हे नव्हे । तुम्ही उपसाहिले तेचि बरवे । आता अवधारिजो देवे । बोलिले ऐसे ॥338॥
परंतु हे माझे बोलणे वरच्यासारखे (शाबासकी देण्यासारखे) नाही, तर माझे बोलणे पाल्हाळाचे होते व ते तुम्ही सहन केले हे म्हणणेच बरे. तर आता महाराज, ऐका. देव असे बोलले.
339-13
म्हणे उन्मेखसुलोचना । सावध होई अर्जुना । करू तुज ज्ञाना । वोळखी आता ॥339॥
भगवान म्हणतात, हे ज्ञानरूपी उत्तमदृष्टी असणार्या अर्जुना, आता तुला ज्ञानाचा उत्तम परिचय करून देतो, तू इकडे लक्ष दे.
340-13
तरी ज्ञान गा ते एथे । वोळख तू निरुते । आक्रोशेवीण जेथे । क्षमा असे ॥340॥
तर जेथे चरफडल्याशिवाय क्षमा असेल तेथे ज्ञान आहे, हे तू पक्के ओळख.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
341-13
अगाध सरोवरी । कमळिणी जियापरी । का सदैवाचिया घरी । संपत्ति जैसी ॥341॥
?ञफार खोल तळ्यात ज्याप्रमाणे कमळाचे वेल (विपुल वाढतात) अथवा भाग्यवान पुरुषाच्या येथे जशी संपत्ती (अलोट येत असते),
342-13
पार्था तेणे पाडे । क्षमा जयाते वाढे । तेही लक्षे ते फुडे । लक्षण सांगो ॥342॥
अर्जुना, त्या मानाने ज्याच्या ठिकाणी क्षमा वाढत असते तेही ज्या लक्षणांपासून कळते, ती लक्षणे आम्ही निश्चितपणे सांगतो.
343-13
तरी पढियंते लेणे । आंगी भावे जेणे । धरिजे तेवी साहणे । सर्वचि जया ॥343॥
ज्या भावनेने आवडता अलंकार धारण करतात, त्याप्रमाणे जो सर्व सहन करतो.
344-13
त्रिविध मुख्य आघवे । उपद्रवाचे मेळावे । वरी पडिलिया नव्हे । वाकुडा जो ॥344॥
आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अशा तीन प्रकारच्या तापांचे समुदाय आहेत, ते सर्व जरी एकदम त्याच्यावर कोसळले तथापि जो डगमगत नाही.
345-13
अपेक्षित पावे । ते जेणे तोषे मानवे । अनपेक्षिताही करवे । तोचि मानु ॥345॥
इच्छा असलेली एखादी वस्तू मिळाली असता जेवढा संतोष होतो, तेवढ्याच संतोषाने अनपेक्षित वस्तू प्राप्त झाली असता तिचा आदर करतो.
346-13
जो मानापमानाते साहे । सुखदुःख जेथ सामाये । निंदास्तुती नोहे । दुखंडु जो ॥346॥
जो मान व अपमान (मनाच्या सारख्या स्थितीने) सहन करतो व सुखदु:खे ही ज्याच्या ठिकाणी सामावली जातात, (सारखी मानली जातात) व निंदा आणि स्तुतीने ज्याच्या मनाची स्थिती दोन प्रकारची (सुखाची व दु:खाची) होत नाही.
347-13
उन्हाळेनि जो न तपे । हिमवंती न कांपे । कयसेनिही न वासिपे । पातलेया ॥347॥
उन्हाळ्याने जो तापत नाही व हिवाने जो कापत नाही आणि काही जरी प्राप्त झाले तरी जो भीत नाही.
348-13
स्वशिखरांचा भारु । नेणे जैसा मेरु । की धरा यज्ञसूकरु । वोझे न म्हणे ॥348॥
मेरु पर्वत आपल्या शिखराचे जसे ओझे मानीत नाही अथवा वराह अवतार ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे म्हणत नाही,
349-13
नाना चराचरी भूती । दाटणी नव्हे क्षिती । तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती । घामेजेना ॥349॥
ज्याप्रमाणे अनेक चराचर प्राण्यांनी पृथ्वी जशी दडपली जात नाही, त्याप्रमाणे नाना प्रकारची सुखदु:खादि द्वंद्वे प्राप्त झाली असता जो श्रमी होत नाही.
350-13
घेऊनी जळाचे लोट । आलिया नदीनदाचे संघाट । करी वाड पोट । समुद्र जेवी ॥350॥
पाण्याचे लोट घेऊन नदी व नद यांचे समुदाय आले असता समुद्र ज्याप्रमाणे आपल्यात सर्वाचा समावेश करुन घेतो,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १७८ वा, २७, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २१२५ ते २१३६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २१२५
धरिता इच्छा दुरी पळे । पाठी सोहळा उदासा ॥१॥
म्हणऊनि असट मन । नका खुण सांगतो ॥धृपद॥
आविसापासी अवघे वर्म । सोस श्रम पाववी ॥२॥
तुका म्हणे बीज न्यावे । तेथे यावे फळाने ॥३॥
अर्थ
विषयाची इच्छा धरली तर ते विषय आपल्यापासून दूर पळतात आणि निरिच्छा उदासीन राहिले तर सुख सोहळे च आपल्या पाठीमागे पळतात. म्हणूनच मी तुम्हाला असे सांगतो की विषयाच्या पाठीमागे मनाला धावु देऊ नका खरे सुख प्राप्त करून घ्यायची असेल तर हीच खूण आहे. दुःख होण्याचे खरे वर्म आमिष आहे आणि त्यामुळे विविध प्रकारचे कष्ट देखील होत असतात. तुकाराम महाराज म्हणतात फळाची बी आपण जेथे टाकू तेथे वृक्ष उगवूण पुन्हा ते फळ तयार होते त्याप्रमाणे जिथे आपण इच्छा धरू तेथे आपल्याला दु:ख होते व जेथे आपण निरिच्छ राहू तेथे आपल्याला सुख प्राप्त होते.
अभंग क्र. २१२६
वेद शास्त्र नाही पुराण प्रमाण । तयाचे वदन नावलोका ॥१॥
तार्किकाचे अंग आपणा पारिखे । माजियासारिखे वाईचाळे ॥धृपद॥
माता निंदी तया कोण तो आधार । भंगले खापर याच नावे ॥२॥
तुका म्हणे आडराणे ज्याची चाली । तयाची ते बोली मिठेंविण ॥३॥
अर्थ
ज्या मनुष्याला वेद शास्त्र पुराण हे प्रमाण नाहीत त्याचे तोंड देखील पाहू नये. तर्क आणि कुतर्क करणाऱ्या मनुष्याला आपले शरीर देखील आपलेच आहे का याविषयी शंका निर्माण होऊन ते परक्या सारखे वाटते आणि पुरणाला न मानणारा मनुष्य हा माजल्या सारखे चाळे करतो ते सर्व व्यर्थ च असते. जो मनुष्य आपल्या मातेची निंदा करतो त्याला जगामध्ये कोण आधार देतो, का त्याच्या नावाने उलटे खापरे फोडले जातात म्हणजेच तो त्याच्या आई साठी काय जगासाठी देखील मेलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात जो मनुष्य वेद, शास्त्र आणि पुराण यांना प्रमाण नाही त्यांच्यावर नुसार वागत नाही आडराने चालतो त्या मनुष्याचे बोलणे म्हणजे जसे मिठा वाचून अन्न गोड लागत नाही अगदी तसेच आहे.
अभंग क्र. २१२७
कस्तुरीचे अंगी मीनली मृत्तिका । मग वेगळी का येईल लेखू ॥१॥
तयापरि भेद नाही देवभक्ती । संदेहाच्या युक्ती सरो द्याव्या ॥धृपद॥
इंधने ते आगी संयोगाच्या गुणे । सागरा दरुषणे ओहोळ तो चि ॥२॥
तुका म्हणे माझे साक्षीचे वचन । येथे तो कारण शुद्ध भाव ॥३॥
अर्थ
कस्तुरी आणि माती जर एकत्र झाली तर त्या दोघाना वेगळे लेखता येईल काय. अगदी त्याप्रमाणे देव आणि भक्त यांच्यामध्ये भेद भाव नाही, जरी काही संदेह वाटत असेल तरी सर्व प्रकारचे संदेह व संशय बाजूला सारून द्यावेत. इंधन कोणत्याही प्रकारचे असो अग्नीच्या संयोगात आले की अग्नीचे सर्व गुण त्यामध्ये एकरूप होऊन ते इंधन अग्निरूप होते आणि ओढे ओहोळ हे सागरात एकदा की मिश्रित झाले तर त्यांची धाव थांबून ते सागर रूपच होतात. तुकाराम महाराज म्हणतात मी जे काही शब्द बोलत आहे ते अगदी साक्ष रूपाने बोलत आहे कारण माझा शुद्ध भक्तिभाव आहे.
अभंग क्र. २१२८
भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मी भोग ब्रम्हा तनु ॥१॥
देहाच्या निरसने पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जव नव्हे ॥धृपद॥
उदक अग्नी धान्य जाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥२॥
तुका म्हणे मज केले ते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥३॥
अर्थ
सर्व भूतमात्रांमध्ये एक देव आहे असे समजून सर्वाना नमस्कार करणे याला भक्ती म्हणतात. कोणत्याही गोष्टीची आसक्ती न करून त्याग करणे याला वैराग्य म्हणतात आणि ब्रम्ह स्वरूपाचा अनुभव घेऊन किंवा भोग घेऊन शरीर ब्रम्हरूप करणे याला ज्ञान म्हणतात. ज्यावेळी देहाविषयी संपूर्ण भावनेचा निरास होतो त्यावेळेस आपल्याला ब्रम्ह स्थिती प्राप्त होते जर देह माझा किंवा मी देहाचा आहे अशी भावना असेल तर त्यावेळी अशी ब्रम्हस्थिती प्राप्त होत नसते. जर स्वयंपाक करायचा असेल तर पाणी अग्नि आणि धान्य या तीन गोष्टी लागतात यापैकी एक जरी नसेल तर स्वयंपाक होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जर कोणी भक्ती ज्ञान आणि वैराग्य याविषयी बडबड करू लागला तर तो सत्य बोलत आहे किंवा त्याला या तीनही स्थिती प्राप्त आहेत किंवा नाही याविषयी सत्यता पडताळण्याची किंवा त्याविषयी चाचणी करण्याचे मला चांगलेच कळते.
अभंग क्र. २१२९
श्रीसंताचिया माथा चरणांवरी । साष्टांग हे करी दंडवत ॥१॥
विश्रांती पावलो सांभाळउत्तरी । वाढले अंतरी प्रेमसुखे ॥धृपद॥
डौरली हे काया कृपेच्या वोरसे । नव्हे अनारिसे उद्धरलो ॥२॥
तुका म्हणे मज न घडता सेवा । पूर्वपुण्य ठेवा वोढवला ॥३॥
अर्थ
मी श्रेष्ठ श्री संतांच्या चरणांवर माझा माथा टेकून त्यांना साष्टांग दंडवत करीत आहे. हे संत हो तुम्ही मला जो उपदेश केला आहे त्याचा तुम्ही कृपया सांभाळ करावा आणि त्या उपदेशामुळेच मी समाधानी पावलो आहे आणि माझ्या अंतरंगात त्यामुळे भक्ती प्रेमसुख वाढले आहे. अहो तुमच्या कृपेच्या छत्र छायेमुळे माझे शरीर अतिशय तजेलदार झाले आहे एवढेच नाही तर आता माझा उद्धार झाला म्हणजे मी उद्धारलो यात कोणत्या प्रकारचा संशयच राहिला नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे संत जन हो माझ्याकडून तुमची कोणत्याही प्रकारची सेवा घडली नाही परंतु माझे पूर्वपुण्य चांगले होते त्यामुळे तुमच्या कृपेचा ठेवा माझ्याकडे आपोआप ओढला गेला आहे.
अभंग क्र. २१३०
नेणो काय नाड । आला उचित काळ आड ॥१॥
नाही जाली संतभेटी । येवढी हानी काय मोठी ॥धृपद॥
सहज पायापासी । जवळी पावलिया ऐसी ॥२॥
चुकी जाली आता काय । तुका काय म्हणे उरली हाय ॥३॥
अर्थ
आता संतांची भेट होण्याचा उचित काळ आला आहे तरी पण आता काय प्रतिबंध आडवा येत आहे ते काही कळत नाही. परंतु संत भेट झाली नाही तर यापेक्षा मोठी हानी कोणती असेल ? मला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध आला नसता तर मी संतांच्या पायाजवळ सहजच गेलो असतो. तुकाराम महाराज म्हणतात परंतु आता संतांची व माझी चुकामुक झाली आता काय केवळ हाय हाय करणेच बाकी राहिले.
अभंग क्र. २१३१
आणीक नाही नेणे । असे पायाच्या चिंतने ॥१॥
माझा न व्हावा विसर । नाही आणीक आधार ॥धृपद॥
भांडवल सेवा । हाचि ठेवियेला ठेवा ॥२॥
करी मानभावा । तुका विनंती करी देवा ॥३॥
अर्थ
देवा मी आता तुमच्या पायाच्या चिंतनात लागलो आहे त्यामुळे मी दुसरे काही जाणत नाही. त्यामुळे तुम्हाला माझा विसर पडू देऊ नका कारण तुमच्या वाचून मला कोणताही आधार राहिलेला नाही. तुमची सेवा हेच एक भांडवल माझ्याजवळ आहे आणि तोच ठेवा माझ्याजवळ जतन करून ठेवलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुम्हाला एक विनंती करत आहे माझ्या एकनिष्ठ भक्ती भावाचा मान जरूर ठेवा.
अभंग क्र. २१३२
आरुश माझी वाणी बोबडी उत्तरे । केली ते लेकुरे सलगी पायी ॥१॥
करावे कवतुक संती मायबापी । जीवन देउनि रोपी विस्तारिजे ॥धृपद॥
आधारे वदली प्रसादाची वाणी । उिच्छष्टसवणी तुमचिया ॥२॥
तुका म्हणे हे चि करितो विनंती । मागोनि पुढती सेवादान ॥३॥
अर्थ
मी जे काही शब्द बोललो आहे ते अबद्ध आहेत बोबडे आहेत परंतु मी तुमचे लहान लाडके लेकरू आहे म्हणूनच मी तुमच्या पायाशी सलगी केली आहे. तसेच तुम्ही संत मायबाप कृपावंत आहात तुम्ही माझ्या बोलण्याचे कौतुक करावे. जसे पाणी देऊन रोपटे विस्तार पावते तसे तुम्ही माझ्या ज्ञानरूपी रोपाला तुमचे उपदेश रुपी पाणी द्यावे व त्याचा विस्तार करावा. तुम्ही बोललेल्या शब्दाचे उचिष्ठ मी सेवन केले व त्याच आधाराने मी प्रासादिक वाणी बोललो आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हा संता जणांना एकच विनंती करत आहे पुढेही माझ्या हातून तुमची सेवा घडो हे एवढेच दान मी मागत आहे.
अभंग क्र. २१३३
पुरुषाहाती कंकणचुडा । नवल दोडा वृत्ति या ॥१॥
पाहा कैसी विटंबणा । नारायणा देखिली ॥धृपद॥
जळो ऐसी ब्रिदावळी । भाटबोळीपणाची ॥२॥
तुका म्हणे पाहो डोळा । अवकळा नये हे ॥३॥
अर्थ
पुरुषाच्या हाती कंकण चुडा असणे हे एक प्रकारचे नवलच आहे आणि असे वर्तन म्हणजे विपरित पनाचेच आहे. साधू बनायची कशी विटंबना आहे हे नारायण ते तु पहा मी तर बघितली. अशा ढोंगी साधू च्या भाटाणे सांगितलेल्या लांबलचक ब्रिदावळीला आग लागो. तुकाराम महाराज म्हणतात देवा अशी परमार्थाची अवकळा मी आपल्या डोळ्यांनी कधीच पाहणार नाही.
अभंग क्र. २१३४
वितीयेवढेंसे पोट । केवढा बोभाट तयाचा ॥१॥
जळो त्याची विटंबना । भूक जना नाचवी ॥धृपद॥
अभिमान सिरी भार । जाले खर तृष्णेचे ॥२॥
तुका म्हणे नरका जावे । हाचि जीवे व्यापार ॥३॥
अर्थ
विती एवढेच पोट आहे परंतु ते भरण्यासाठी केवढा गाजावाजा केला जातो. भूक भागवण्याकरता लोक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात, विटंबनाही करतात परंतु अशा लोकांच्या विटंबनेला आग लागो. या प्रपंचातील विविध प्रकारच्या अभिमानाचा भार लोकांनी आपल्या माथ्यावर घेतला आहे आणि तृष्णे चे गाढव होऊन बसले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात काही लोक असे व्यापार करतात की ज्या मार्गाने नर्क प्राप्ती होईल असेच व्यापार लोक आपल्या जिवाच्या सहाय्याने करतात.
अभंग क्र. २१३५
सेवटासी जरी आले । तरी जाले आंधळे ॥१॥
स्वहिताचा लेश नाही । दगडा काही अंतरी ॥धृपद॥
काय परिसासवे भेटी । खापरखुंटी जालिया ॥२॥
तुका म्हणे अधम जन । अवगुणे चि वाढवी ॥३॥
अर्थ
अगदी शेवटची घटका आली तरी देखील काही माणस आपल्या स्वहितासाठी आंधळीच असतात. अशा माणसांचे अंतःकरण म्हणजे दगडाप्रमाणे असतात त्यांच्या अंतकरणात स्वहिताचा लेश देखील येत नाही. खापर जरी खुंटी झाली आणि तिची गाठ भेट परिसा संगे झाली तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही त्याचे सोने होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जे अधम लोक आहेत ते आपला अवगुण सतत वाढवत असतात.
अभंग क्र. २१३६
प्रायिश्चत्ते देतो तुका । जातो लोका सकळा ॥१॥
धरितील ते तरतील मनी । जाती घाणी वाया त्या ॥धृपद॥
निग्रहअनुग्रहाचे ठाय । देतो घाय पाहोनि ॥२॥
तुका जाला नरसिंही । भय नाही कृपेने ॥३॥
अर्थ
मी तुकाराम सर्व लोकांच्या जवळ जाऊन हरिनामाचे प्रायचित्त देत आहे. मी दिलेले प्रायचित्त जे कोणी मनात धारण करतील व सतत नामचिंतन करतील तेच तरतील आणि जो कोणी याचा स्वीकार करणार नाही ती घान वायला च जाणार आहे. मी लोकांना निग्रह आणि अनुग्रह लोकाचा अधिकार पाहूनच देत आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी आता सर्व लोकांमध्ये हरी च्या नामाने व हरीच्या कृपेने नरसिंह झालो आहे त्यामुळे मला आता कुठल्या प्रकारचे भय राहिले नाही.
अभंग क्र. २१३७
दुर्जनाचे अंग अवघेचि सरळ । नरकाचा कोथळ साठवला ॥१॥
खाय अमंगळ बोले अमंगळ । उठवी कपाळ संघष्टणे ॥धृपद॥
सर्पा मंत्र चाले धरावया हाती । खळाची ते जाती निखळे चि ॥२॥
तुका म्हणे काही न साहे उपमा । आणीक अधमा वोखटयाची ॥३॥
अर्थ
दुर्जनाचेअंग म्हणजे सरळसरळ आहे त्यामध्ये त्याने नरकाचा कोथळा साठवलेला आहे. अमंगळ खातो आमंगळ बोलतो आणि त्याच्या संगतीत जे कोणी असतात त्यांचे बोलून बोलून सारखं डोके उठवीत असतो. सर्प ला पकडण्यासाठी देखील मंत्र उच्चारले की सर्प हाती येतो परंतु दुष्ट माणसाची जात अशी असते की त्याला काहीही केले तरी ते हातात येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात दुर्जन मनुष्याला जगातील कोणतीही वाईट उपमा सजेशी ठरतच नाही कारण त्यांच्या पेक्षा वाईट जगामध्ये कोणीही नसते.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















