२३ जून, दिवस १७४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी २२६ ते २५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २०७७ ते २०८८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“23 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 23 June
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक 23 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २०७७ ते २०८८ चे पारायण आपण करणार आहोत.
23 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी २२६ ते २५०,

226-13
नाना रोगे आहाळली । लोळती भूते देखिली । ते हिंसा निवारावया केली । चिकित्सा का ॥13-226॥
नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले व त्या दु:खाने लोळत पडलेले प्राणी पाहिले व मग आयुर्वेदाने ती हिंसा (दु:ख) निवारण करण्याकरता औषधांची योजना केली.
227-13
तव ते चिकित्से पहिले । एकाचे कंद खणविले । एका उपडविले । समूळी सपत्री ॥13-227॥
तो औषधयोजनेत पहिल्याप्रथम कित्येक झाडाचे कंद खाणवले व कित्येकांना मुळांसकट व पानांसकट उपटविले.
228-13
एके आड मोडविली । अजंगमाची खाल काढविली । एके गर्भिणी उकडविली । पुटामाजी ॥13-228॥
काही झाडे मध्येच मोडली (म्हणजे त्याच्या मधल्या भागाचा औषधात उपयोग केला. ) काही झाडाची साल काढवली व काही फळ देण्य़ाच्या बेतात असलेल्या वनस्पती, त्यावर क्षाराचे वगैरे कसले तरी थर देऊन उकडविल्या
229-13
अजातशत्रु तरुवरा । सर्वांगी देवविल्या शिरा । ऐसे जीव घेऊनि धनुर्धरा । कोरडे केले ॥13-229॥
ज्यांनी) कोणाचे केव्हाच वाकडे केले नाही, म्हणून ज्यांना शत्रु उत्पन्न झाला नाही अशा बिचार्‍या झाडाना (त्याचा चीक काढण्याकरता) त्यांच्या सर्वागावर भेगा पाडून, याप्रमाणे अर्जुना, त्या वृक्षांचे जीव घेऊन त्यांना कोरडे केले.
230-13
आणि जंगमाही हात । लाऊनि काढिले पित्त । मग राखिले शिणत । आणिक जीव ॥13-230॥
आणि हालचाल करणार्‍या प्राण्यांसही हात घालून त्यांचे पित्त काढून मग त्या योगाने रोगांनी पीडित अशा दुसर्‍या जीवाचे रक्षण केले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
हास्यास्पद अहिंसा


231-13
अहो वसती धवळारे । मोडूनि केली देव्हारे । नागवूनि वेव्हारे । गवांदी घातली ॥13-231॥
अहो रहाती घरे मोडून त्या घराच्या सामानाने देऊळ व देव्हारे केले व व्यवहारात लोकांना फसवून, लुटून जे द्रव्य मिळवले त्या द्रव्याच्या योगाने अन्नसत्र घातले.
232-13
मस्तक पांघुरविले । तव तळवटी उघडे पडले । घर मोडोनि केले । मांडव पुढे ॥13-232॥
डोक्यास गुंडाळण्याकरता नेसलेले वस्त्र सोडून जर ते मस्तकास बांधले तर शरीराचा खालचा भाग उघडा पडतो, अथवा जसे घर मोडून त्या घरापुढे मांडव केले
233-13
नाना पांघुरणे । जाळूनि जैसे तापणे । जाले आंगधुणे । कुंजराचे ॥13-233॥
अथवा पांघरुणे जाळून मग जसा शेक घेणे किंवा हत्तीचे जसे अंगधुणे झाले (हत्ती हा स्नान केल्याबरोबर आपल्या ओल्या अंगावर सोंडेने माती घेऊन जास्त मलीन होतो)
234-13
नातरी बैल विकूनि गोठा । पुंसा लावोनि बांधिजे गांठा । इया करणी की चेष्टा ? । काइ हसो ॥13-234॥
बैल विकून जसा गोठा बांधावा, अथवा राघूस हाकून देऊन मग पिंजरा तयार करावा, असल्या कृतींना योग्य करणे म्हणावे किंवा चेष्टा म्हणाव्यात ? का याला हसावे ?
दैनंदिन हिंसा
235-13
एकी धर्माचिया वाहणी । गाळू आदरिले पाणी । तव गाळितया आहाळणी । जीव मेले ॥13-235॥
बा कित्येकांनी धर्ममार्ग म्हणून पाणी गाळण्याला आरंभ केला तेव्हा गाळण्याच्या तापाने जीव मेले.


236-13
एक न पचवितीचि कण । इये हिंसेचे भेण । तेथ कदर्थले प्राण । तेचि हिंसा ॥13-236॥
कित्येक या हिंसेच्या भयाने धान्य शिजवीत नाहीत (तर कोरडेच धान्य खातात. ते कच्चे धान्य त्यास पचत नसल्यामुळे) त्यांचे प्राण कासावीस होतात, हीच हिंसा होय.
237-13
एवं हिंसाचि अहिंसा । कर्मकांडी हा ऐसा । सिद्धांतु सुमनसा । वोळखे तू ॥13-237॥
बा, याप्रमाणे हे चांगल्या मनाच्या अर्जुना, हिंसेलाच अहिंसा ठरवण्याचा असा हा कर्मकांडात सिद्धांत आहे, तो तू नीट समजून ठेव.
238-13
पहिले अहिंसेचे नांव । आम्ही केले जव । तव स्फूर्ति बांधली हाव । इये मती ॥13-238॥
अहिंसेविषयी निरनिराळी मते सांगण्याचे जेव्हा आम्ही पहिल्या प्रथम अहिंसेच्या नावाचा उच्चार केला तेव्हा ही मते सांगावीत अशी स्फूर्तीला हाव झाली,
239-13
तरि कैसेनि इयेते गाळावे । म्हणौनि पडिले बोलावे । तेवीचि तुवांही जाणावे । ऐसा भावो ॥13-239॥
तर या मतांना कसे गाळावे ? म्हणून आम्हाला बोलणे भाग पडले. त्याच प्रमाणे तुलाही निरनिराळी मते माहीत व्हावीत असा हे प्रतिपादन करण्याचा आमचा हेतु होता.
240-13
बहुतकरूनि किरीटी । हाचि विषो इये गोठी । एऱ्हवी का आडवाटी । धाविजैल गा ? ॥13-240॥
अर्जुना, बहुतकरून या अहिंसे संबंधी काही बोलावयास लागले की त्या प्रतिपादनात हाच (वर सांगितलेला हिंसात्मक अहिंसांचा) विषय आढळतो. (म्हणून आम्ही त्याची चर्चा केली). नाहीतर हाती घेतलेल्या विषयाच्या प्रतिपादनाचा धोपट मार्ग सोडून मतमतांतरे सांगण्याच्या आडवाटेला कशाला जावे लागले असते ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


241-13
आणि स्वमताचिया निर्धारा- । लागोनिया धनुर्धरा । प्राप्ता मतांतरा । निर्वेचु कीजे ॥13-241॥
आणि अर्जुना, आपल्या स्वत:च्या मताच्या निश्चयाकरता जी दुसरी मते विचारात घेणे जरूर असेल त्यांचाही निर्णय केलाच पाहिजे.
242-13
ऐसी हे अवधारी । निरूपिती परी । आता ययावरी । मुख्य जे गा ॥13-242॥
याप्रमाणे ही निरूपण करण्याची पद्धति आहे असे समज. कारण अहिंसेविषयी ज्ञानेशांचे मत
243-13
आता अर्जुना, यानंतर मुख्य जे, ते स्वमत बोलिजैल । अहिंसे रूप किजैल । जेणे उठलिया आंतुल । ज्ञान दिसे ॥13-243॥
ते आमचे मत सांगण्यात येईल. अहिंसेची नीट कल्पना येईल, असे लक्षण करण्यात येईल. ही अहिंसा चित्तात प्रगट झाली असता त्या ज्ञान आहे असे दिसेल.
244-13
परी ते अधिष्ठिलेनि आंगे । जाणिजे आचरतेनि बगे । जैसी कसवटी सांगे । वानियाते ॥13-244॥
पण ज्याप्रमाणे कसोटी सोन्याच्या कसाला सांगते त्याप्रमाणे अहिंसेने वास्तव्य केलेल्या शरीराच्या आचरणाच्या रीतीवरून त्या शरीरात अहिंसा रहात आहे असे जाणले जाते.
245-13
तैसे ज्ञानामनाचिये भेटी । सरिसेचि अहिंसेचे बिंब उठी । तेचि ऐसे किरीटी । परिस आता ॥13-245॥
त्याप्रमाणे ज्ञानामनाच्या भेटीबरोबरच (मनात ज्ञान उत्पन्न झाल्याबरोबर) अहिंसेचे चित्र उमटते, ते चित्र असे असते. अर्जुना, ऐक.


246-13
तरी तरंगु नोलांडितु । लहरी पाये न फोडितु । सांचलु न मोडितु । पाणियाचा ॥13-246॥
अहिंसकाचे चालणे = तर लाटांचे उल्लंघन न करता किंवा पायाने त्यांना न मोडता व पाण्याचा आवाज (खळखळ) न मोडू देता
247-13
वेगे आणि लेसा । दिठी घालूनि आंविसा । जळी बकु जैसा । पाउल सुये ॥13-247॥
वेगाने व फार जपून आमिषावर दृष्टि ठेऊन बगळा जसा पाण्यात पाय घालतो,
248-13
का कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार । कुचुंबैल केसर । इया शंका ॥13-248॥
अथवा भ्रमर जसे कमळावर कमळातील तंतू चुरगळतील या शंकेने नाजूक रीतीने पाय ठेवतात,
249-13
तैसे परमाणु पा गुंतले । जाणूनि जीव सानुले । कारुण्यामाजी पाउले । लपवूनि चाले ॥13-249॥
त्याप्रमाणे परमाणूंमधे लहान जीव आहेत असे जाणून दयेमधे आपली पाऊले लपवून चालतो.
250-13
ते वाट कृपेची करितु । ते दिशाचि स्नेह भरितु । जीवातळी आंथरितु । आपुला जीवु ॥13-250॥
तो ज्या रस्त्याने चालतो तो रस्ताच कृपेने भरतो व ज्या बाजूकडे त्याची नजर जाते, ती दिशाच प्रेमाने भरलेली करतो व प्राण्यांच्या खाली आपला स्वत:चा प्राण अंथरतो (मग त्यावर चालतो).
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १७४ वा, २३, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २०७७ ते २०८८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २०७७
निवडावे खडे । तरी दळणा वोजे घडे ॥१॥
नाही तरि नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ॥धृपद॥
निवडावे तन । सेती करावे राखण ॥२॥
तुका म्हणे नीत । न विचारिता नव्हे हित ॥३॥
अर्थ

जर धान्यातून खडे निवडले तरच दळण चांगले दळण्यात येते. नाहीतर दळण दळले नाही त्यातले खडे काढले नाही तर दळलेले पीठही वाया जाते आणि त्याच्या केलेल्या चपात्या वा भाकरी खाताना खडे लागल्यावर हाय हाय करण्याची वेळ येते याला कारण म्हणजे आपला अळस आहे. शेतातील गवत खुरपावे लागते आणि शेतीची राखण करावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे आपली धर्मनीती असते आपण जर त्याविषयी विचार केला नाही तर आपले हित कधीही होत नाही.

अभंग क्र. २०७८
दुर्जनाचा मान । सुखे करावा खंडण ॥१॥
लाता हाणोनिया वारी । गुंड वाट शुद्ध करी ॥धृपद॥
बहुता पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ॥२॥
तुका म्हणे नखे । काढुनि टाकिजेती सुखे ॥३॥
अर्थ

दुर्जन लोकाचा नेहमी आपमान करत राहावा त्यांची खंडना करीत रहावे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे पाप होत नसते. वाटेवर पडलेला दगड पायाने लाथाळून बाजूला करून वाट स्वच्छ करावी. दृष्ट व्यक्ती अनेक सज्जनांना पिडा देतो त्रास देतो त्यामुळे त्यांचा विटाळ धरावा. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे आपण आपल्या हातापायाची नखे वाढली की आनंदाने काढून टाकतो त्याप्रमाणे दुष्ट लोकाचाही आपण त्याग करावा.

अभंग क्र. २०७९
नका धरू कोणी । राग वचनाचा मनी ॥१॥
येथे बहुतांचे हित । शुद्ध करोनि राखा चित्त ॥धृपद॥
नाही केली निंदा । आह्मी दुसिलेंसे भेदा ॥२॥
तुका म्हणे मज । येणे विण काय काज ॥३॥
अर्थ

मी बोललेल्या वाक्याचा कोणीही आपल्या मनामध्ये द्वेष नका धरू. माझ्या बोलण्याने खूप जणांची हित होणार आहे त्यामुळे सर्वानी आपले चित्त शुद्ध करून माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. मी कोणाचीही निंदा केली नाही केवळ त्या मनुष्याच्या आतील जे विकार आहेत त्यांनाच मी दूषण दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात नाहीतर माझे या वाचून काही आडले आहे की काय ?

अभंग क्र. २०८०
काही जडभारी । पडता ते अवसरी ॥१॥
तुझे आठवावे पाय । आह्मी मोकलूनि धाय ॥धृपद॥
तहान पीडी भूक । शीत उष्ण वाटे दुःख ॥२॥
तुका म्हणे देहयोगे । वारंवार पीडिती भोगे ॥३॥
अर्थ

देवा ज्या वेळी आमच्यावर काही भारी संकट पडते तेव्हा, त्यावेळी आम्ही धायमोकलून तुझ्या पायाची आठवण करू. कधी अति तहानेने, अति भुकेने, अति थंडीने, अति उष्णतेने दुख होते तेव्हा आम्ही, तुकाराम महाराज म्हणतात या देह योगामुळे आम्हाला विविध प्रकारचे पारबद्ध भोग भोगावे लागतात परंतु त्याही वेळी आम्ही तुझ्या पायाची आठवण करू.

अभंग क्र. २०८१
होउनि कृपाळ । भार घेतला सकळ ॥१॥
तू चि चालविसी माझे । भार सकळ ही ओझे ॥धृपद॥
देह तुझ्या पायी । ठेवुनि झालो उतराई ॥२॥
कायावाचामने । तुका म्हणे दुजे नेणे ॥३॥
अर्थ

हे हरी तु कृपाळू आहेस त्यामुळे तु माझ्या सर्व योग क्षेमाचा भार तुझ्या खांद्यावर घेतला आहे. माझ्या सर्व योगक्षेमाचा भार तूच चालविणारा आहेस. त्यामुळे हे देवा आता मी या कारणानेच माझा देह तुझ्या पायाजवळ ठेवला आहे आणि तुझ्या उपकारातून उतराई झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी काया-वाचा-मनाने केवळ तुलाच एक जाणतो तुझ्या वाचून दुसरे काहीही मी जाणत नाही.

अभंग क्र. २०८२
आता होई माझे बुद्धीचा जनिता । अवरावे चित्ता पांडुरंगा ॥१॥
येथूनिया कोठे न वजे बाहेरी । ऐसे मज धरी सत्ताबळे ॥धृपद॥
अनावर गुण बहुता जातीचे । न बोलावे वाचे ऐसे करी ॥२॥
तुका म्हणे हित कोणिये जातीचे । तुज ठावे साचे मायबापा ॥३॥
अर्थ

हे पांडुरंगा आता तूच माझ्या बुद्धीचा जनीता हो चांगले विचार माझ्या बुद्धीत येऊ दे आणि विषयापर्यंत जाऊ नये यासाठी तु माझ्या चित्ताला आवर घाल. आता माझ्या चित्तामध्ये केवळ तुझीच आठवण राहू दे याला तुझ्यापासून कुठे ही बाहेर जाऊ देऊ नकोस तुच तुझ्या सत्तेने मला धरून ठेव. माझ्या चित्तामध्ये अनेक प्रकारचे दुर्गुण आहेत पण असे दुर्गुण माझ्या बोलण्यात येणार नाही असे तु कर. तुकाराम महाराज म्हणतात हे मायबापा पांडुरंगा माझे हीत कशात आहे व ते कोणत्या स्वरूपाचे आहे हे खरे तर तुलाच माहित आहे.

अभंग क्र. २०८३
नित्य मनासी करितो विचार । तो हे अनावर विषयलोभी ॥१॥
आता मज राखे आपुलिया बळे । न देखे हे जाळे उगवता ॥धृपद॥
सापडला गळी नाही त्याची सत्ता । उगळी मागुता घेतला तो ॥२॥
तुका म्हणे मी तो अज्ञान चि आहे । परि तुझी पाहे वास देवा ॥३॥
अर्थ

देवा मी मनाशी नेहमी असा विचार करतो की आपण नेहमी हरी चिंतनात असावे परंतु हे मन अतिशय चंचल आहे ते मला अनावर होत आहे ते खूपच विषय लोभी आहे. त्यामुळे हे देवा आता तूच तुझ्या सत्तेने माझ्या मनाला आवर घाल कारण हे माया जाळ्याचे कोडे काही माझ्याच्याने सुटणार नाही. मासा की एकदा गळाला लागला की त्याची सत्ता त्या पुढे चालत नाही तो कोळी लोकांच्या स्वाधीन जातो. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तर अज्ञानीच आहे परंतु तुझा वास मला व्हावा याची वाट मी कायमस्वरूपी पाहता आहे.

अभंग क्र. २०८४
दुर्बळाचे हाती सापडले धन । करिता जतन नये त्यासी ॥१॥
तैसी परी मज झाली नारायणा । योगक्षेम जाणा तुम्ही आता ॥धृपद॥
खाता लेता नये मिरविता वरी । राजा दंड करी जनराग ॥२॥
तुका म्हणे मग तळमळ उरे । देखिले ते झुरे पाहावया ॥३॥
अर्थ

दुर्बल मनुष्याच्या हातात जर धन सापडले तर त्या धनाचे रक्षण त्याला करता येत नाही. अगदी त्याप्रमाणे माझी परिस्थिती झाली आहे हे नारायणा आता माझा योगक्षेम तुम्हीच जाणून घ्यावा. मला आजपर्यंत जे मिळाले नाही ते मिळवे आणि त्याचे रक्षण करण्याचे ही तुम्हीच मनात आणावे आहो देवा एकद्या दुर्बळ मनुष्याच्या हाती जर धन सापडले तर त्याला त्याचा सदउपयोग करता येत नाही, त्याला त्यापासून चांगले सुग्र असे जेवण आणून खाता येत नाही, अंगावरती अलंकार परिधान करता येत नाही, चांगल्या प्रकारचे वस्र नेसता येत नाही कारण जर तो अलंकार वस्त्रे परिधान करून त्याचा बडेजाव दाखवायला लागला तर याच्या कडे एवढी संपत्ती आली कुठून म्हणजे याने चोरीच केली असणार म्हणून राजा त्याला दंड करतो आणि त्याला अचानक एवढी श्रीमंती लाभली म्हणून सामान्य जणमाणसे त्याचा राग द्वेष मत्सर धरतात. तुकाराम महाराज म्हणतात दुर्बळ मनुष्याच्या हाती शेवटी केवळ तळमळच उरते कारण आपल्याला आत्ता जे धन मिळाले आहे ते जर कोणी लुबाडून नेले तर ते धन आपल्याला पुन्हा कधी पाहायला मिळेल किंवा नाही याविषयी तो झुरत असतो.

अभंग क्र. २०८५
मागे जैसा होता माझे अंगी भाव । तैसा एक ठाव नाही आता ॥१॥
ऐसे ग्वही माझे मन मजपाशी । तुटी मुदलेंसी दिसे पुढे ॥धृपद॥
पुढिलांचे मना आणि गुणदोष । पूज्य आपणास करावया ॥२॥
तुका म्हणे जाली कोंबड्याची परी । पुढे चि उकरी लाभ नेणे ॥३॥
अर्थ

पूर्वी जसा माझ्या अंगी भक्तिभाव होता आता तसा राहिलेला नाही. मला आत्ता सध्याला जो परमार्थामध्ये मुद्दल मिळालेला आहे त्याचा देखील तोटा पुढे मला होणार आहे असे मला दिसत आहे. मी समोरच्या व्यक्तीविषयी त्यांचे गुणदोष मनात आणतो व ते सांगतो कारण मी स्वतःला पूज्य करून घेण्यासाठी ही खटपट करत आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझी अवस्था म्हणजे कोंबड्या प्रमाणे झाले आहे जरी खायला खाद्य टाकले तरी देखील कोंबडयाला सवय असते, पुढे पुढे उकरीत जावे परंतु उकरल्यामुळे मागे धाण्यावर पुन्हा कचरा पडतो. परंतु पुढे पुढे उकरण्याची सवय कोंबड्याला असल्याने त्याला काहीच लाभ होत नाही.

अभंग क्र. २०८६
किती तुजपाशी देऊ परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥१॥
आता माझे हाती देई हित । करी माझे चित्त समाधान॥धृपद॥
राग आला तरी कापू नये मान । बाळा मायेविण कोण दुजे ॥२॥
तुका म्हणे तैसा होईल लौकिक । मागे बाळ भीक समर्थाचे ॥३॥
अर्थ

हे पांडुरंगा तु सर्वाचे अंतकरण जाणतोस मग मी माझा परिहार तरी तुला किती वेळ देत राहू ? आता माझे हीत माझ्या तु हातात दे आणि माझ्या चित्ताचे समाधान कर. कितीही राग आला तरी आईने बाळाची मान कापू नये कारण आई शिवाय त्या बाळाला कोण प्रेम देणारे आहे दुसरे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु जर माझे हीत केले नाही तर समर्थाचे बाळ भिक मागत आहे असाच तुझा लौकिक सगळीकडे होईल.

अभंग क्र. २०८७
लाज वाटे पुढे तोंड दाखविता । परि जाऊ आता कोणापाशी ॥१॥
चुकलिया कामा मागतो मुशारा । लाज फजितखोरा नाही मज ॥धृपद॥
पाय सांडूनिया फिरतो बासर । स्वामिसेवे चोर होऊनिया ॥२॥
तुका म्हणे मज पाहिजे दंडिले । पुढे हे घडले न पाहिजे ॥३॥
अर्थ

देवा मी तुझी आज पर्यंत काहीच सेवा केली नाही त्यामुळे मला तुला तोंड दाखवण्याची देखील लाज वाटते परंतु आता मी जाऊ तरी कोणाजवळ ? अहो मी कोणत्याही प्रकारची सेवा न करता केवळ कामचुकारपणा करून देखील तुम्हाला कामाचा मोबदला मागतो आहे खरोखरच माझ्यासारख्या फजीत खोर माणसाला लाजच नाही. माझ्या स्वामीच्या पायाची सेवा करायची तर मी ते पाय सोडून मनमौजे प्रमाणे कोठेही फिरत आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या या अशा वागण्यामुळे मला दंड केला पाहिजे कारण पुढे अशी चूक माझ्याकडून घडू नये म्हणून.

अभंग क्र. २०८८
पुढिलिया सुखे निंब देता भले । बहुत वारले होय दुःख ॥१॥
हे तो वर्म असे माउलीचे हाती । हाणी मारी प्रीती हितासाठी ॥धृपद॥
खेळता विसरे भूक तहान घर । धरूनिया कर आणी बळे ॥२॥
तुका म्हणे पाळी तोंदिचीया घासे । उदार सर्वस्वे सर्वकाळ ॥३॥
अर्थ

रोगी मुलाला कडू लिंबाचा रस देणे हेच चांगले कारण त्यामुळे त्याला पुढे होणारे रोग नाहीसे होणार असते. मुलाला कडू लिंबाचा रस कसा द्यावा याचे वर्म माऊलीच्या हाती असते कारण ती त्याच्या हितासाठी त्याला हाणते मारते परंतु तिचे त्या मुलावर खरे प्रेम असते. लहान मूल खेळण्याच्या नादामध्ये तहान-भूक सर्व काही विसरून जातो परंतु त्याची माऊली त्याच्या हाताला धरून बळच घरी आणून त्याला जेऊ घालते. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या मुखातला घास मुलासाठी रक्षण करून ठेवते अशी माऊली आहे माऊली लहान बाळा करता सर्वस्वी आणि सर्व काळ नेहमी उदार असते.

जून नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading