२० जून, दिवस १७१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १५१ ते १७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २०४१ ते २०५२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“20 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 20 June
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक 20 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २०४१ ते २०५२ चे पारायण आपण करणार आहोत.
20 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १५१ ते १७५,

151-13
रथांगांचा मेळावा । जेवी रथु म्हणिजे पांडवा । का अधोर्ध्व अवेवा । नांव देहो ॥151॥
चाक, जू वगैरे रथाच्या भागांच्या समुदायास, अर्जुना, ज्याप्रमाणे रथ म्हणावे, किंवा (शरीराच्या) वरच्या व खालच्या अवयवांना एकत्र मिळून जसे देह हे नाव येते,
152-13
करीतुरंगसमाजे । सेना नाम निफजे । का वाक्ये म्हणिपती पुंजे । अक्षरांचे ॥152॥
हत्ती, घोडे वगैरेंच्या समुदायास जसे सैन्य हे नाव उत्पन्न होते किंवा अक्षरांच्या समुदायांना वाक्ये म्हणतात
153-13
का जळधरांचा मेळा । वाच्य होय आभाळा । नाना लोका सकळा । नाम जग ॥153॥
अथवा ढगांचा समुदाय, आभाळ या नावाने बोलला जातो अथवा सर्व लोकांना मिळून जग हे नाव येते,
154-13
का स्नेहसूत्रवन्ही । मेळु एकिचि स्थानी । धरिजे तो जनी । दीपु होय ॥154॥
अथवा तेल, वात व अग्नी यांचा एके ठिकाणी संयोग करून ठेवणे, तोच लोकात दिवा म्हणून प्रसिद्ध होतो,
155-13
तैसी छत्तीसही इये तत्त्वे । मिळती जेणे एकत्वे । तेणे समूह परत्वे । क्षेत्र म्हणिपे ॥155॥
त्याप्रमाणे ही छत्तीस तत्वे ज्या एकत्वाने जमा होतात त्या समुदायपरत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते.


156-13
आणि वाहतेनि भौतिके । पाप पुण्य येथे पिके । म्हणौनि आम्ही कौतुके । क्षेत्र म्हणो ॥156॥
लागवडीस आणलेल्या या शरीराच्या योगाने येथे (शरीररूप शेतात) पाप-पुण्यरूप पीक पिकते, म्हणून आम्ही कौतुकाने ह्या देहाला क्षेत्र असे म्हणतो.
157-13
आणि एकाचेनि मते । देह म्हणती ययाते । परी असो हे अनंते । नामे यया॥157॥
कित्येकांच्या मताने याला देह असे म्हणतात. पण आता हे राहू दे. या क्षेत्राला अनंत नावे आहेत.
158-13
पै परतत्त्वाआरौते । स्थावराआंतौते । जे काही होते जाते । क्षेत्रचि हे ॥158॥
परंतु परब्रह्माच्या अलीकडे व स्थावरापर्यंत धरून त्या दोहोंच्या दरम्यान जे जे काही उत्पन्न होते व नाहीसे होते, ते सर्व क्षेत्रच होय.
159-13
परि सुर नर उरगी । घडत आहे योनिविभागी । ते गुणकर्मसंगी । पडिले साते ॥159॥
परंतु गुण व कर्म यांच्या संगतीत सापडले असता देव, मनुष्य, सर्प वगैरे जातींच्या वेगळेपणाने या क्षेत्राची रचना होते.
160-13
हेचि गुणविवंचना । पुढा म्हणिपैल अर्जुना । प्रस्तुत आता तुज ज्ञाना । रूप दावू ॥160॥
ज्ञान = अर्जुना, हाच गुणांचा विचार तुला पुढे (अध्याय 14 मधे) सांगण्यात येईल. सांप्रत आता ज्ञानाचे स्वरूप सांगतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


161-13
क्षेत्र तव सविस्तर । सांगितले सविकार । म्हणौनि आता उदार । ज्ञान आइके ॥161॥
क्षेत्र तर आम्ही तुला विकारांसह विस्तारपूर्वक सांगितले. म्हणून आता उदार ज्ञान ऐक.
162-13
जया ज्ञानालागी । गगन गिळिताती योगी । स्वर्गाची आडवंगी । उमरडोनि ॥162॥
ज्ञानाकरता केले जाणारे प्रयत्न = ज्या ज्ञानाकरता योगी हे स्वर्गाचा आडमार्ग उल्लंघून आकाश गिळतात. (म्हणजे मूर्ध्निआकाशाचा लय करतात).
163-13
न करिती सिद्धीची चाड । न धरिती ऋद्धीची भीड । योगा{ऐ}से दुवाड । हेळसिती ॥163॥
(ज्या ज्ञानाकरता योगी) सिद्धीची इच्छा करीत नाहीत आणि ऐश्वर्याची पर्वा करत नाहीत आणि योगासारखी कष्टसाध्य गोष्ट तुच्छ मानतात.
164-13
तपोदुर्गे वोलांडित । क्रतुकोटि वोवांडित । उलथूनि सांडित । कर्मवल्ली ॥164॥
(ज्या ज्ञानाकरता कित्येक लोक) तपरूपी डोंगरी किल्ले ओलांडून पलीकडे जातात आणि कोट्यवधी यज्ञ आचरून त्या अनुष्ठानांतून पार पडतात आणि कर्मरूपी वेलाची उलथापालथ करून (आचरण करून) त्याचा त्याग करतात.
165-13
नाना भजनमार्गी । धावत उघडिया आंगी । एक रिगताति सुरंगी । सुषुम्नेचिये ॥165॥
अथवा (ज्या ज्ञानाकरता) कित्येक उघड्या अंगांनी (अंतर्बाह्य परिग्रह टाकून) भजनमार्गाने धावतात व कित्येक सुषुम्नेच्या भुयारात शिरतात.


166-13
ऐसी जिये ज्ञानी । मुनीश्वरांची उतान्ही । वेदतरूच्या पानोवानी । हिंडताती ॥166॥
याप्रमाणे मुनीश्वरांस ज्या ज्ञानाच्या ठिकाणी इच्छा असते व ते मुनीश्वर ज्या ज्ञानाकरता वेदरूपी झाडाचे पान आणि पान हिंडतात (म्हणजे संपूर्ण वेदांचे अध्ययन करतात)
167-13
देईल गुरुसेवा । इया बुद्धि पांडवा । जन्मशतांचा सांडोवा । टाकित जे ॥167॥
अर्जुना, गुरुसेवेने ते ज्ञान मिळेल या बुद्धीने त्या सेवेवरून आपला जन्म ओवाळून टाकतात, (जन्मभर गुरुसेवा करतात).
168-13
जया ज्ञानाची रिगवणी । अविद्ये उणे आणी । जीवा आत्मया बुझावणी । मांडूनि दे ॥168॥
ज्ञानाचे कार्य = 168ऱ्ह्या ज्ञानाचा प्रवेश अविद्येला नाहीसे करतो आणि जीव व ब्रह्म यांचे ऐक्य करून देतो,
169-13
जे इंद्रियांची द्वारे आडी । प्रवृत्तीचे पाय मोडी । जे दैन्यचि फेडी । मानसाचे ॥169॥
जे ज्ञान इंद्रियांची द्वारे बंद करते, बहिर्मुख वृत्तीचे पाय मोडते आणि जे मनाचे दारिद्र्य नाहीसे करते
170-13
द्वैताचा दुकाळु पाहे । साम्याचे सुयाणे होये । जया ज्ञानाची सोये । ऐसे करी. ॥170॥
द्वैतरूपी दुष्काळ नाहीसा होतो व सर्वत्र समबुद्धीच्या बोधरूपी सुबत्तेचे दिवस येतात, ज्या ज्ञानाची प्राप्ती अशी स्थिती प्राप्त करून देते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


171-13
मदाचा ठावोचि पुसी । जे महामोहाते ग्रासी । नेदी आपपरु ऐसी । भाष उरो ॥171॥
जे ज्ञान उन्मत्तपणाचा ठावठिकाणा नाहीसा करते व जे जबरदस्त भ्रांतीस नाहीसे करते व (जे) आपले आणि दुसर्‍याचे ही गोष्टच शिल्लक राहू देत नाही,
172-13
जे संसाराते उन्मूळी । संकल्पपंकु पाखाळी । अनावराते वेटाळी । ज्ञेयाते जे ॥172॥
अर्जुना जे ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकते व संकल्परूपी चिखल साफ धुवून टाकते व आकलन करण्यास कठीण अशा परब्रह्माला ते ज्ञान व्यापून टाकते.
173-13
जयाचेनि जालेपणे । पांगुळा होईजे प्राणे । जयाचेनि विंदाणे । जगहे चेष्टे ॥173॥
जे ज्ञान प्राप्त झाले असता प्राणही स्थिर होतो व ज्या ज्ञानाच्या सत्तेने जगातील व्यापार चालतात.
173-13
जयाचेनि उजाळे । उघडती बुद्धीचे डोळे । जीवु दोंदावरी लोळे । आनंदाचिया ॥173अ॥
ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो
175-13
ऐसे जे ज्ञान । पवित्रैकनिधान । जेथ विटाळले मन । चोख कीजे ॥175॥
असे जे ज्ञान जे पवित्रपणाचा एकच ठेवा आहे व जेथे(जे प्राप्त झाले असता)(विषयाने)विटाळलेले मन शुद्ध करता येते

दिवस १७१ वा, २०, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २०४१ ते २०५२
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २०४१
अवघे चुकविले सायास । तप रासी जीव नाश ॥१॥
जीव देऊनिया बळी । अवघी तारिली दुबळी ॥धृपद॥
केला भूमंडळी । माजी थोर पवाडा ॥२॥
काही न मागे याची गती । लुटवितो जमा हाती ॥३॥
तुका म्हणे भक्तराजा । कोंण वर्णी पार तुझा ॥४॥
अर्थ

हे पुंडलिका विठुरायाच्या प्राप्तीकरता खूप सायास करावे लागायचे खूप तप करावे लागायचे आणि ते तप करता करता जीवाचा नाश देखील होण्याची शक्यता असायची परंतु तु तुझ्या पुण्याइने या विठुरायाला येथे विटेवर उभे केले आहेस आणि सर्व भक्तांचे सायासच चुकविले आहेस. अरे तु सेवा करून आपला जीव बळी देउन या हरीला येथे उभे केले आहे आणि त्या निमित्ताने सर्व दीनदुबळ्या भक्तांना तु या भवसागरातून तारले आहेस. आणि तु या भुमंडळावर फार थोर पणाचे काम केले आहे. इतकी तुझी कीर्ति असून देखील तु या विठोबाला काहीच मागितले नाही परंतु जगाच्या हातून खुप सुख लुटविले आहेस. तुकाराम महाराज म्हणतात हे भक्तराज पुंडलिकराया तु भक्तांचा राजा आहेस आणि तुझ्या किर्ती चा महिमा वर्णन करू शकेल असा या जगामध्ये कोण आहे ?

अभंग क्र. २०४२
प्रमाण हे त्याच्या बोला । देव भक्तांचा अंकिला ॥१॥
न पुसता जाता नये । खाली बैसता ही भिये ॥धृपद॥
अवघा त्याचा होय । जीव भावाही सहित ॥२॥
वदे उपचारे वाणी । काही माग म्हणऊनि ॥३॥
उदासीनाच्या लागे । तुका म्हणे धावे मागे ॥४॥
अर्थ

देव भक्ताचा अंकित आहे आणि भक्तांचा प्रत्येक शब्द तो प्रमाण मानतो. त्यामुळेच देव भक्तांना न विचारता कोठेही जात नाही आणि एवढेच नाही तर खाली बसण्यासाठीही भक्ताला विचारवा लागेल आणि त्याला न विचारता आपण बसलो बसू नये एवढे भक्ताला तो भितो. एवढा तो भक्तांचा जीवाभावा सहीत होऊन राहतो. भक्ताची सेवा पाहून देव भक्ताला म्हणतो अरे तु माझी एवढी सेवा करतो तु मला काहीतरी माग तरी. तुकाराम महाराज म्हणतात देहाविषयी उदासीन झालेल्या भक्तांच्या मागे तु काहीतरी माग असे म्हणून हा देव त्याच्या पाठीमागे लागतो.

अभंग क्र. २०४३
काही न मागती देवा । त्यांची करू धावे सेवा ॥१॥
हळूहळू फेडी ॠण । होऊनिया रूपे दीन ॥धृपद॥
होऊ न सके वेगळा । क्षण एक त्या निराळा ॥२॥
तुका म्हणे भक्तीभाव । तोचि देवाचा ही देव ॥३॥
अर्थ

देवाला काहीही न मागण्याचे ज्याची मनस्थिती असते अशा भक्ताची सेवा करण्यासाठी देव धाव घेतो. हा देव भक्तांचे जे सेवा रुपी ऋण त्याच्याकडे असते ते फेडण्या करता दीन-दुबळे रूप धारण करतो व हळूहळू फेडून टाकतो. भक्तांच्या पासून एक क्षणभर देखील हा देव वेगळा होऊ शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्याची खरी देवाविषयी भक्तिभाव एकनिष्ठता आहे तोच खरा देवाचाही देव आहे.

अभंग क्र. २०४४
जाणे अंतरिचा भाव । तोचि करितो उपाव ॥१॥
न लगे सांगावे मांगावे । जीवे भावे अनुसरावे । अविनाश घ्यावे । फळ धीर धरोनि ॥धृपद॥
बाळा न मागता भोजन । माता घाली पाचारून ॥२॥
तुका म्हणे तरी । एकी लंघियेले गिरी ॥३॥
अर्थ

देव भक्ताच्या अंतरंगातील सर्व इच्छा जाणतो आणि त्या पूर्ण करण्याकरता वेगवेगळे प्रकारचे उपाय योजत असतो. देवाला आपल्या मनातील कोणत्याही प्रकारची इच्छा सांगावे किंवा मागावे लागत नाही तर तो आपल्या मनातील सर्व इच्छा जाणत असतो केवळ जीव भावाने त्याला शरण जावे. देवाजवळ केवळ धीर धरून राहावे मग तो आपल्याला अविनाश रुपी म्हणजे कधीही नाश न पावणारे असे फळ देतो. बाळाने जेवण मागितले नाही तरी आई त्याला बाहेरून बोलवून आणते आणि त्याला जेऊ घालते. तुकाराम महाराज म्हणतात एका पायाने चालणारे पागळे देखील पर्वताचे उल्लंघन करू शकतात ते केवळ हरी कृपेमुळेच.

अभंग क्र. २०४५
आम्ही नाचो तेणे सुखे । वाऊ टाळी गातो मुखे ॥१॥
देव कृपेचा कोवळा । शरणागता पाळी लळा ॥धृपद॥
आम्हा जाला हा निर्धार । मागे तारिले अपार ॥२॥
तुका म्हणे संती । वर्म दिले आम्हा हाती ॥३॥
अर्थ

आम्ही निष्काम भक्ती सुखाने विठ्ठलापुढे नाचू टाळी वाजवू आणि त्याचे गीत मुखाने गात राहू. देव भक्तांवर कृपा करण्यासाठी अतिशय कोवळा आहे आणि त्याला शरण आलेल्या भक्तांचा लळा तो पाळत असतो. आता आम्हाला त्याच्यावर पूर्णपणे निर्धार झालेला आहे मागे त्याने अनेक भक्तांना तारलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात या भवसागरातून तरून जाण्याकरता संतांनी आमच्या हाती विठ्ठल नामाचे खरे वर्म दिले आहे.

अभंग क्र. २०४६
जालो निर्भर मानसी । म्हणऊनि कळलासी ॥१॥
तुझे म्हणविती त्यास । भय चिंता नाही आस ॥धृपद॥
चुकविसी पाश । गर्भवासयातना ॥२॥
तुझे जाणोनिया वर्म । कंठी धरियेले नाम ॥३॥
तुका म्हणे तेणे सुखे । निरसली जन्मदुःखे ॥४॥
अर्थ

देवा आम्ही मनापासून निर्भर (आनंदभरीत) झालो म्हणजे आमच्या मनाला तुझे खरे ज्ञान झाले. देवा जे भक्त स्वतःला तुझा म्हणून घेतात त्यांना कोणत्याही प्रकारची इच्छा भय चिंता नसतेच. देवा जे स्वतःला तुझा म्हणून घेतात त्यांचा तु सर्व पाश नाहीसा करतो त्यांचे गर्भवास यातना तुच चुकवीत असतोस. देवा तुझी प्राप्ती कश्याने होईल ते वर्म आम्ही जाणले आहे ते वर्म म्हणजे तुझे नाम आहे म्हणूनच तेच नाम आम्ही आमच्या कंठात धारण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला तुझे ज्ञान व तुझे नाम यामुळे जे सुख प्राप्त झाले त्यामुळे जन्ममरणाचे दुःखच आमचे नीरसले आहे.

अभंग क्र. २०४७
नको दुष्टसंग । पडे भजनामधी भंग ॥१॥
काय विचार देखिला । सांग माझा तो विठ्ठला ॥धृपद॥
तुज निषेधिता । मज न साहे सर्वथा ॥२॥
एका माझ्या जीवे । वाद करू कोणासवे ॥३॥
तुझे वणूप गुण । की हे राखो दुष्टजन ॥४॥
काय करू एका । मुखे सांग म्हणे तुका ॥५॥
अर्थ

देवा मला दुष्टांचा संग घडू देऊ नकोस कारण त्यांच्या संगतीने भजनांमध्ये भंग पडतो. हे विठ्ठला मी असे जे तुझ्या पुढे विचार मांडले आहेत त्याविषयी तु काय विचार केला आहेस ते मला सांग. दुष्ट लोकांनी तुझा निषेध केला की मला तो कोणताही प्रकारे सहन होत नाही. माझ्या एकट्या जीवाने कोणाकोणाशी वाद करत राहावे. अरे देवा मी तुझे गुणगान वर्णन करत बसलो की या दृष्टाचे मन राखत बसू. तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा मी माझ्या एका मुखाने तरी काय काय करू ते तूच मला सांग.

अभंग क्र. २०४८
विठ्ठल माझी माय । आम्हा सुखा उणे काय ॥१॥
घेतो अमृताची धनी । प्रेम वोसंडले स्तनी ॥धृपद॥
क्रीडो वैष्णवांच्या मेळी । करू आनंदाच्या जळी ॥२॥
तुका म्हणे कृपावंत । ठेवी आम्हापाशी चित्त ॥३॥
अर्थ

आमची माय विठ्ठल आहे मग आमच्या सुखाला काय ऊणे आहे ? या विठाईच्या स्तनांमध्ये प्रेम रुपी दूध आहे व ते नेहमी ओसंडत राहते व ते प्रेमरुपी दुध म्हणजे एक प्रकारचे अमृत आहे व ते मी तृप्त होईपर्यंत घेत असतो. वैष्णवाचा मेळा मध्ये आम्ही आनंदरूप जळामध्ये क्रिडा करत राहू. तुकाराम महाराज म्हणतात ही विठाई खूप कृपावंत आहे तिचे चित्त ती नेहमी आमच्या जवळ ठेवत असते.

अभंग क्र. २०४९
भक्ती सुखे जे मातले । ते किळकाळा शूर जाले ॥१॥
हाती बाण हरीनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥धृपद॥
महा दोषा आला त्रास । जन्ममरणा केला नाश ॥२॥
सहस्रनामाची आरोळी । एक एकाहूनि बळी ॥३॥
नाही आणिकाचा गुमान । ज्याचे अंकित त्यावाचून ॥४॥
तुका म्हणे त्यांच्या घरी । मोक्षसिद्धी या कामारी ॥५॥
अर्थ

जे भक्ती सुखांमध्ये भक्त माजले आहेत ते कळी काळापेक्षाही शूर झाले आहेत. हे विठ्ठलाचे वीर भक्त हातांमध्ये हरिनाम घेऊन त्याच्या नावाची गर्जना करत असतात. हरीनामामुळे महा दोषाना देखील त्रास निर्माण होतो आणि हरिनामाने तर जन्ममरणाचा नाशच केला आहे. हे हरिभक्त एकापेक्षा एक बलवंत आहेत अधिकार संपन्न आहेत आणि ते हरीचे सहस्रनामाची ची आरोळी देत आहेत. हे हरिभक्त केवळ एक विठ्ठलाचे आंकीत आहेत आणि त्या वाचुन कोणाचीही ते पर्वा करत नाही कोणाचीही आज्ञा मानत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अशा या वीर भक्तांच्या घरी मोक्ष रिद्धी सिद्धी हे काम करणाऱ्या दाशी होतात.

अभंग क्र. २०५०
पंधरा दिवसा एक एकादशी । का रे न करिसी व्रतसार ॥१॥
काय तुझा जीव जातो एका दिसे । फराळाच्या मिसे धणी घेसी ॥धृपद॥
स्वहित कारण मानवेल जन । हरीकथा पूजन वैष्णवाचे ॥२॥
थोडे तुज घरी होती उजगरे । देउळासी का रे मरसी जाता ॥३॥
तुका म्हणे का रे सकुमार जालासी । काय जाब देसी यमदूता ॥४॥
अर्थ
सर्व व्रताचे सार म्हणजे एकादशी आहे आणि ती पंधरा दिवसातून एकदा येते तरी देखील तु एकादशी हे व्रत का करत नाहीस ? अरे एकादशी धरताना तुझा जीव जातो काय आणि धरली तरी एकादशीच्या दिवशी फराळाच्या निमित्ताने चांगले पोट भरून नेहमीपेक्षा जास्त खातोस. त्या दिवशी खरे तर हरी कथा करावी वैष्णवांची पूजा करावी हेच खरे तुझे स्वहित आहे त्या निमित्ताने तुला जन माणसात मान सन्मान देखील मिळेल. अरे तुझ्या घरी तु कोणत्याही कारणानिमित्त काही थोडे जागरण केले आहेस काय मग एकादशीच्या दिवशी देवळात जाऊन जागर केला तर काय तु मरशील की काय ते सांग ? तुकाराम महाराज म्हणतात अरे एकादशीच्या दिवशी मला भूक सहन होत नाही मला खूप त्रास होतो असे तु म्हणतोस एवढा तु नाजूक झाला आहेस की काय आणि यमदुतानी तुला यमसदेने गेल्यावर काय काय पुण्य तु आजवर केले आहे असे विचारले तर तु त्यांना काय उत्तर देशील ?

अभंग क्र. २०५१
कथा हे भूषण जनामध्ये सार । तरले अपार बहुत येणे ॥१॥
नीचिये कुळीचा उंच वंद्य होय । हरीचे जो गाय गुणवाद ॥धृपद॥
देव त्याची माथा वंदी पायधुर्ळी । दीप झाला कुळी वंशाचिये ॥२॥
त्याची निंदा करी त्याची कुष्ठ वाणी । मुख संवदणी रजकाची ॥३॥
तुका म्हणे नाही चोरीचा व्यापार । विठ्ठलाचे सार नाम घ्यावे ॥४॥
अर्थ

हरीची कथा ऐकणे व करणे हे भूषण आहे, वैभवाचे लक्षण आहे, तसेच संतजनांच्या उपदेशाचे सार आहे, आता काय सांगू ह्याच कारणाने आता पर्यंत कितीतरी जण तरले. हरीचे नाम घेणारा मग तो निच कुळीचा असला तरी चालेल, जो हरीचे गुण गातो, त्याचा नामाचा जयघोष करतो तो थोर होतो आणि जनामधे वंद्य होतो. देव देखील अशांची पायाची धूळ स्वतःच्या भाळी लावतो, त्याला शिरावर घेतो आणि असा हा मनुष्य स्वतःच्या वंशाचा आणि कुळाचा दीपक होतो. अशांची जे निंदा करतात, त्यांना बोल लावतात त्यांची वाणी कुष्ट होय आणि त्यांचे मुख हे धोब्याच्या संवदणी सारखे म्हणजे धोब्याच्या धोपटण्यासारखे मलीन होय. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाचे नाम घेणे हा चोरीचा व्यापार नसून सौभाग्यचं लक्षण आहे. सर्व साधनांचे जे सार आहे असे हे विठ्ठलाचे नाम सर्वानीच मनापासून घ्यावे.

अभंग क्र. २०५२
टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषे जेजेकार ब्रह्मानंदु ॥१॥
गरुडटके दिंडी पताकांचे भार । आनंद अपार ब्रह्मादिकां॥धृपद॥
आनंदे वैष्णव जाती लोटांगणी । एक एकाहुनि भद्रजाति ॥२॥
तेणे सुखे सुटे पाषाणा पाझर । नष्ट खळ नर शुद्ध होती ॥३॥
तुका म्हणे सोपे वैकुंठवासी जाता । रामकृष्ण कथा हे ची वाट ॥४॥
अर्थ

टाळ वाजवणे सुखाने हरीच्या नामाचा गजर करणे त्याचा घोष करून जयजयकार करणे यामुळे ब्रम्‍हनंदाचा आनंद प्राप्त होतो. गरुड चिन्ह असलेले पताका त्यांचे समूह वीणा यांना पाहून ब्रम्हाधीकांनाही आनंद प्राप्त होतो. हत्ती पेक्षाही बलवान असलेल्या भद्र जाती म्हणजे बलवान असलेले वैष्णव आनंदाने एकमेकांच्या पायाजवळ लोटांगण घेतात. हा हरिनाम सुख सोहळा पाहून पाषणाला देखील पाझर फुटतो आणि नष्टदृष्ट पापी असलेले लोक देखील हा सोहळा पाहून लुब्ध होतात. तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठाला जाण्याकरता राम कृष्ण कथा हीच एक सोपी वाट आहे.

जून नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading