आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१७ सप्टेंबर, दिवस २६० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी १७६ ते २०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३१०९ ते ३१२०
“१७ सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 17 September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १७ सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३१०९ ते ३१२० चे पारायण आपण करणार आहोत.
१७ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी १७६ ते २००,
176-16
नाना चांडाळ मंदिराशी । अवचटे आलिया संन्याशी । मग लाज होय जैसी । उत्तमा तया ॥176॥
किंवा एखादा संन्यासी आकस्मिकपणे चांडाळगृह आला असता या श्रेष्ठ पुरुषाला जशी लज्जा उत्पन्न होते. 76
177-16
क्षत्रिया रणी पळोनि जाणे । ते कोण साहे लाजिरवाणे । का वैधव्ये पाचारणे । महासतियेते ॥177॥
रणांतून पळून जाणे ही लाजिरवाणी गोष्ट कोणता जातिवंत क्षत्रिय सहन करील ? किंवा महापतिव्रतेला वैधव्यबोधक शब्द लावणे कोणास आवडेल ? 77
178-16
रूपसा उदयले कुष्ट । संभाविता कुटीचे बोट । तया लाजा प्राणसंकट । होय जैसे ॥178॥
देखण्या व्यक्तीला अंगावर कोड उठावे, किंवा एखाद्या सन्माननीय गृहस्थावर वेडावांकडा आळ यावा हे जसे प्राणसंकटासारखे होते. 78
179-16
तैसे औटहातपणे । जे शव होऊनि जिणे । उपजो उपजो मरणे । नावानावा ॥179॥
त्याप्रमाणे साडेतीन हात प्रेतरूप शरीर त्याच्या आधारावर स्वतःचे जगणे अथवा आस्तित्व मानून पुनःपुन्हा जन्माला यावे व मरावे. 79
180-16
तिये गर्भमेदमुसे । रक्तमूत्ररसे । वोतीव होऊनि असे । ते लाजिरवाणे ॥180॥
व त्या गर्भाशयरूप मुशीत (सांच्यात) रक्तमूत्रादि रसांची ओतीव मूर्ति होऊन राहणे हा जो लाजिरवाणा भोग. 180
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-16
हे बहु असो देहपणे । नामरूपासि येणे । नाही गा लाजिरवाणे । तयाहूनी ॥181॥
फार काय सांगावे ! देहपणाने नामरूपाला येऊन मिरवणे ह्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही. 81
182-16
ऐसैसिया अवकळा । घेपे शरीराचा कंटाळा । ते लाज पै निर्मळा । निसुगा गोड ॥182॥
स्वतःला अशा हीन दशेला आणणान्या शरीराचे धारण करण्याचा भोग वाटयास यावा ह्याची साधुपुरुषांना लाज व खंती वाटते; परंतु निर्लज्जाला तेच गोड वाटते. 82
183-16
आता सूत्रतंतु तुटलिया । चेष्टाचि ठाके सायखडिया । तैसे प्राणजये कर्मेंद्रिया । खुंटे गती ॥183॥
आता चलन देणारी दोरी तुटल्यावर कळसूत्री बाहुल्यांच्या सर्व चेष्टा जशा बंद पडतात, त्याप्रमाणे प्राणांचा जय (योग) केला असता सर्व कमेंद्रियांच्या चेष्टा बंद पडतात. 83
184-16
की मावळलिया दिनकरु । सरे किरणांचा प्रसरु । तैसा मनोजये प्रकारु । ज्ञानेंद्रियांचा ॥184॥
किंवा सूर्यास्ताबरोबर सर्व किरणांचा पसारा जसा संपतो त्याप्रमाणे मनोजय केला असता ज्ञानेंद्रियांचे व्यापार बंद होतात. 84
185-16
एवं मनपवननियमे । होती दाही इंद्रिये अक्षमे । ते अचापल्य वर्मे । येणे होय ॥185॥
ह्याप्रमाणे प्राणजय व मनोजय केल्याने दशेंद्रियांच्या सर्व चेष्टा थांबून ती स्तब्ध होतात त्यालाच ” अचापल्य” असे म्हणतात. 85
तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता ।
भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत ॥16. 3॥
186-16
आता ईश्वरप्राप्तीलागी । प्रवर्तता ज्ञानमार्गी । धिंवसेयाचि आंगी । उणीव नोहे ॥186॥
आता ईश्वरप्राप्तीसाठी ज्ञानमार्गाकडे प्रवृत्ति झाली असता धैर्याची उणीव भासत नाही. 86
187-16
वोखटे मरणा{ऐ}से । तेही आले अग्निप्रवेशें । परी प्राणेश्वरोद्देशे । न गणीचि सती ॥187॥ ऐसे
मरणासारखा अत्यंत अप्रिय प्रसंग, व तोही जिवंतपणी अग्निप्रवेश करून येणार; पण, प्राणपतीच्या उद्देशाने तो ओढवून घेतांना पतिव्रता सतीला त्याचे काहीच वाटत नाही. 87
188-16
तैसे आत्मनाथाचिया आधी । लाऊनि विषयविषाची बाधी । धावो आवडे पाणधी । शून्याचिये ॥188॥
त्याप्रमाणे ज्याला आत्मप्राप्तीची तळमळ लागली आहे, तो, विषयांचा विषवत् त्याग करून, आवश्यक तर, प्राणनिरोधनाने शून्यसमाधीसारखे कठीण साधनही करण्यास तयार होतो. 88
189-16
न ठाके निषेधु आड । न पडे विधीची भीड । नुपजेचि जीवी कोड । महासिद्धीचे ॥189॥
विधिनिषेधाचे भान रहात नाही किंवा महासिद्धीसारखी प्राप्ति झाली असतांही त्याला तिचे कौतुक वाटत नाही. 89
190-16
ऐसे ईश्वराकडे निज । धावे आपसया सहज । तया नांव तेज । आध्यात्मिक ते ॥190॥
ज्याच्या वृत्तीचा स्वाभाविक ईश्वर प्राप्तीकडे असा ओढा असतो, त्याला अध्यात्मिक (शारीरिक) तेज असे म्हणतात. 190
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-16
आता सर्वही साहातिया गरिमा । गर्वा न ये तेचि क्षमा । जैसे देह वाहोनि रोमा । वाहणे नेणे ॥191॥
आता येईल तो घोर किंवा थोर प्रसंग सहन करूनही ज्याला, देहाला आपण अनंत रोम धारण केले आहेत ह्याचे जसे भानही नसते त्याप्रमाणे, मुळीच गर्व अगर स्वतःच्या सहनशीलतेचे भानही नसते ती “ क्षमा” होय. 91
192-16
आणि मातलिया इंद्रियांचे वेग । का प्राचीने खवळले रोग । अथवा योगवियोग । प्रियाप्रियांचे ॥192॥
आणि इंद्रियांच्या वृत्ति अनावर झाल्या असता, किंवा अदृष्टाने रोगादि भोग उभे राहिले असता, अथवा प्रिय किंवा अप्रिय वस्तूंचा योग किंवा वियोग घडला असता. 92
193-16
यया आघवियांचाचि थोरु । एके वेळे आलिया पूरु । तरी अगस्त्य का होऊनि धीरु । उभा ठाके ॥193॥
किंवा हे प्रसंग पृथक् पणे न येता एकाच वेळ ह्या सर्वाचा पूर आला तरी जो अगस्ति ऋषीप्रमाणे ह्या सर्वाचा एकदम ग्रास करून टाकतो व अकंप असतो. 93
194-16
आकाशी धूमाची रेखा । उठिली बहुवा आगळिका । ते गिळी येकी झुळुका । वारा जेवी ॥194॥
आकाशात धुराचा केवढाही स्तंभ उंच गेला असला तरी, वाऱ्याची एकच झळूक तो जसा मोडून टाकते. 94
195-16
तैसे अधिभूताधिदैवा । अध्यात्मादि उपद्रवा । पातलेया पांडवा । गिळुनि घाली ॥195॥
त्याप्रमाणे अर्जुना, आध्यात्मिक, आधिभौतिक अथवा आधिदैविक वगैरे पीडा उत्पन्न झाल्या असता, त्या सर्व जो गिळून जातो. 95
196-16
ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी । उचलूनि धैर्या जे चांगावे करी । धृति म्हणिपे अवधारी । तियेते गा ॥196॥
अशा चित्तक्षोभाच्या प्रसंगांत ज्याचे धैर्य टिकून राहते त्याला धृति म्हणतात, हे लक्षात असूदे. 96
197-16
आता निर्वाळूनि कनके । भरिला गांगे पीयूखे । तया कलशाचियासारिखे । शौच असे ॥197॥
आता सुवर्णकलश स्वच्छ करून आत शुद्ध गंगोदक भरावे, त्याप्रमाणे ” शौच ” म्हणजे शुद्धतेचे स्वरूप आहे. 97
198-16
जे आंगी निष्काम आचारु । जीवी विवेकु साचारु । तो सबाह्य घडला आकारु । शुचित्वाचाचि ॥198॥
ज्याचे आचरण निष्काम असून, चित्तांत विवेक नित्य जागा असतो, तो सबाह्य शुचित्वाची मूर्तीच होय असे समज. 98
199-16
का फेडित पाप ताप । पोखीत तीरींचे पादप । समुद्रा जाय आप । गंगेचे जैसे ॥199॥ तीरीचे
समुद्राकडे वाहणारे गंगोदक जसे स्नान करणान्यांच्या पापाचा व तापाचा नाश करून तीरावर असलेल्या वृक्षांचे सहज पोषण करिते. 99
200-16
का जगाचे आंध्य फेडितु । श्रियेची राउळे उघडितु । निघे जैसा भास्वतु । प्रदक्षिणे ॥200॥
किंवा सूर्य नित्याच्या फेरीला निघाला असता जगांतील अंधकाराचा नाश करून सर्व व्यवहार व्यापार प्रकट करितो. 200
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २६० वा. १७, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३१०९ ते ३१२०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३१०९
आम्हा केले गुणवंत । ते उचित राखावे ॥१॥
तुम्हासी तो चाड नाही । आणिका काही सुखदुःखा ॥धृपद॥
दासांचे तो देखो नये । उणे काय होईल ते ॥२॥
तुका म्हणे विश्वंभरा । दृष्टि करा सामोरी ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही आम्हाला त्रिगुणात बांधून टाकले आहे मग त्यापासून उचित प्रकारे आमचे रक्षण करा. देवा इतरांना सुख होवो अथवा दु:ख होवो तुम्हाला त्याची काही काळजीच नाही. आपल्या भक्तांना आपल्या दासांना काही उणे पडते की काय आणि पडत असेल तर ते आपण लगेच भरुन काढावे असे तुम्हाला वाटले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे विश्वंभरा तुमची कृपादृष्टी आमच्यासमोर करा व आम्हाला तुम्ही समाधानी करा. ”
3:02
अभंग क्र. ३११०
अगत्य ज्या नरका जाणे । वीट मानणे कीर्तने ॥१॥
नावडेसा झाला बाप । आले पाप वस्तीसि ॥धृपद॥
नारायण नाही वाचे । ते यमाचे अंदण ॥२॥
तुका म्हणे अभक्तासी । माता दासी जगझोडी ॥३॥
अर्थ
ज्याला नरकाला अवश्य जावे असे वाटत असेल त्याने कीर्तनाचा वीट मानावा. सर्वच जगाचा चालक जो देव आहे तो आपला बाप आहे आणि आपला बाप म्हणजे पिता ज्याला आवडेनासा झाला आहे मग त्याच्या जवळ सर्व पापे येऊन वास्तव्य करतात हेच जाणून घ्यावे. अहो ज्याच्या मुखाला नारायणाचे नामच येत नाही ते यमाला दिलेले आंदणच असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “असे जे अभक्त आहेत त्यांची आई म्हणजेच सर्व जगाची बटिकच आहे असे समजावे. ”
3:02
अभंग क्र. ३१११
पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती ॥१॥
प्रल्हादासी पिता करितो जाचणी । परि तो स्मरे मनी नारायण ॥धृपद॥
सुदामा ब्राम्हण दरिद्रे पीडिला । नाही विसरला पांडुरंगा ॥२॥
तुका म्हणे तुझा न पडावा विसर । दुःखाचे डोंगर झाले तरी ॥३॥
अर्थ
लोकहो पाहा ते पांडव वनवासात आहेत तरी देखील अखंड देवाचे नाम घेत आहेत. प्रल्हादाचा पिता त्याला कायमस्वरुपी त्रास देतो परंतू प्रल्हाद मनामध्ये कायमस्वरुपी नारायणाचे स्मरण करीत होता. सुदामा ब्राम्हण दारिद्रयाने अतिशय त्रासला होता परंतू तरी देखील तो पाडूरंगाला विसरला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा कितीही दु:खाचे डोंगर माझ्यावर पडले तरी तुझा विसर मला पडू नये. ”
3:02
अभंग क्र. ३११२
जन्ममरणांची कायसी चिंता । तुझ्या शरणागता पंढरीराया ॥१॥
वदनी तुझे नाम अमृतसंजीवनी । असता चक्रपाणी भय काय ॥धृपद॥
हृदयी तुझे रूप बिंबले साकार । तेथे कोण पार संसाराचा ॥२॥
तुका म्हणे तुझ्या चरणांची पाखर । असता कळिकाळ पाया तळी ॥३॥
अर्थ
हे पंढरीरराया तुला शरण आलेल्यांना जन्ममरणाची कसली चिंता ? हे चक्रपाणी मुखामध्ये तुझे अमृत संजीवनीसारखे नाम असताना कसले भय आले ? हे देवा तुमचे सगुण साकार रुप ह्दयामध्ये जर ठसलेले असेल तर मग संसार समुद्र तरुन जाणे काही कठीण नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझ्या नामाची कृपा छाया जर आमच्यावर असेल तर मग कळीकाळा देखील आम्ही आमच्या पायाखाली आणू. ”
3:03
अभंग क्र. ३११३
क्षमाशस्त्र जया नराचिया हाती । दुष्ट तयाप्रति काय करी ॥१॥
तृण नाही तेथे पडिला दावाग्नि । जाय तो विझोनि आपसया ॥२॥
तुका म्हणे क्षमा सर्वाचे स्वहित । धरा अखंडित सुखरूप ॥३॥
अर्थ
क्षमा हे शस्त्र ज्या मनुष्याच्या हातात आहे त्याला दुष्ट मनुष्य काय करीन ? ज्या ठिकाणी गवत नाही तेथे अग्नी जरी पडला तरी तो अग्नी आपोआप विझून जातो. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्वाचे व स्वत:चेही हित क्षमा करते त्यामुळे सुखाचे जे कारण ते म्हणजे क्षमा आहे ती अखंडित तुमच्याजवळ राहू दयावे. ”
3:03
अभंग क्र. ३११४
पाने जो खाईल बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ते ॥१॥
तमाखू ओढूनि काढिला जो धूर । बुडेल ते घर तेणे पापे ॥धृपद॥
कीर्तनी बडबड करील जो कोणी । बेडुक होउनी येईल जन्मा ॥२॥
जयाचिये मनी कथेचा कंटाळा । होती त्या चांडाळा बहु जाच ॥३॥
जाच होती पाठी उडती यमदंड । त्याचे काळे तोंड तुका म्हणे ॥४॥
अर्थ
जो हरी हरीकथे मध्ये बसून पानाखाली त्याला गोहत्येचे पाप पडले. जो हरी कुठे मध्ये बसून तंबाखू खाऊन व बिडी ओढून दूर काढेल त्याच्या त्या पापाने त्याचे सर्व घर बुडून जाईल. जो कीर्तनामध्ये बसून बडबड करील तो पुढच्या जन्मी बेडूक होऊन जन्माला येईल. ज्याला हरी कथेचा फार कंटाळा आहे त्यालाही यमलोकात यम फारच जाच करील. तुकाराम महाराज म्हणतात त्याला यमराज जाच तर करीलच परंतु त्याच्या पाठीवर यंदांड देखील उठतील आणि त्याचे तोंड काळे होईल.
3:03
अभंग क्र. ३११५
कामामध्ये काम । काही म्हणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होईल दुःखाचे ॥१॥
कळो येईल अंतकाळी । प्राणप्रयाणाचे वेळी । राहाती निराळी । रांडापोरे सकळ ॥धृपद॥
जीता जीसी जैसा तैसा । पुढे आहे रे वोळसा । उगवुनि फासा । काय करणे ते करी ॥२॥
केले होते याचि जन्मे । अवघे विठोबाच्या नामे । तुका म्हणे वर्मे । जाणोनिया तरती ॥३॥
अर्थ
तुम्हाला खूप काम आहेत परंतु त्याला कामामध्ये आणखी एक काम करा ते म्हणजे मुखाने रामराम असे म्हणत रहा. त्यामुळे होईल काय तर या भावसागरातील सर्व श्रम तुमचे निघून जातील आणि जो दुःखरूप असा संसार आहे तो सुखरूप होईल. तुम्हाला तुमच्या अंतकाळी हे कळून येईल की, तुमच्या पासून तुमची बायको पोरे मुलेबाळे ही सर्व वेगळी उभे राहिले आहेत. अरे तू जोपर्यंत जगशील तोपर्यंत कसाबसा तरी जगशील परंतु तुला पुढे अनेक जन्ममरणाचे भवरे आहेत. त्यामुळे तू प्रथम सर्व बंधनाचे पाश तोडून टाक मग तुला काय करायचे ते कर. तुकाराम महाराज म्हणतात अरे तू याच जन्मात विठोबाचे नाम घेऊन काही सत्कर्म केले तर तुला पुढे चांगले फल प्राप्त होईल. हेच खरे परमार्थातील मर्म जे जाणून घेतील तेच या भवसागरातून तरतील.
3:03
अभंग क्र. ३११६
माउलीसी सांगे कोण । प्रेम वाढवी तान्हे ॥१॥
अंतरीचा कळवळा । करीतसे प्रतिपाळा ॥धृपद॥
मायबापाची उपमा । तुज देऊ पुरुषोत्तमा ॥२॥
ते ही साजेना पाहाता । जीवलगा पंढरिनाथा ॥३॥
माय पाळी संसारी । परलोक राहे दुरी ॥४॥
तैसा नव्हेसी अनंता । काळावरी तुझी सत्ता ॥५॥
तुका म्हणे नारायणा । तुम्हा बहुत करुणा ॥६॥
अर्थ
तुझ्या तान्या बाळा विषयी तू थोडे प्रेम वाढव असे त्या बाळाच्या आईला कोणी सांगत असते काय ? अहो पण त्या आईच्या अंतकरणातील कळवळाच त्या तान्या बाळाचे पालनपोषण करते. हे पुरुषोत्तमा तुला जर माय बापाची उपमा दिली तर, हे जिवलग पंढरीनाथाती उपमा देखील तुला साजेनाशी आहे. कारण मायबाप संसारांमध्ये मुलाचे पालनपोषण तर करतात पण पर लोकांमध्ये ते मुलापासून दूर राहत असतात. परंतु हे अनंता तू तसा नाहीयेस तुझी सत्ता काळावर देखील आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा तुला तर आई-बाबा पेक्षा हि जास्त करूणा आहे.
3:03
अभंग क्र. ३११७
कोड आवडीचे । पुरवीना बाळकाचे ॥१॥
तेव्हा कैसी ते माउली । जाणा काशासाठी व्याली ॥धृपद॥
वत्साचिये आसे । धेनु धावेना वोरसे ॥२॥
तुका म्हणे घरि । बाळ टाकिले वानरी ॥३॥
अर्थ
बालकाच्या आवडीचे आणि बालकाला जे काही कोड कौतुक व त्याच्या इच्छा जी आई पूर्ण करीत नाही, अहो मग ती आई तरी कसली व कशासाठी तिने त्या बालकाला जन्म दिला असेल ? वासराच्या आवडीने जी गाय पान्हा सोडत वासराकडे धावत येत नाही ती कसली गाय ? तुकाराम महाराज म्हणतात की वानर आपल्या बाळाला पोटाशी धरण्याचे सोडून घरी टाकून बाहेर फिरत असेल तर मग ती आई कसली त्याप्रमाणे जो देव भक्तांची उपेक्षा करतो तो देवच कसला परंतु हे माझ्या विठ्ठला तू तसा नाहीस तू अतिशय प्रेमळ व दयाळू आहेस.
3:04
अभंग क्र. ३११८
अवघ्या पातकांची मी एक रासी । अवघा तू होसी सर्वोत्तम ॥१॥
जैसा तैसा करणे लागे अंगीकार । माझा सर्व भार चालविणे ॥धृपद॥
अवघेचि मज गिळियेले काळे । अवघाच बळे तुझे अंगी ॥२॥
तुका म्हणे आता खुंटला उपाय । अवघेचि पाय तुझे मज ॥३॥
अर्थ
सर्व पातकांची राशी मी एक आहे परंतु देवा तू सर्वोत्तम आहेस. परंतु मी जसा असेल तसा तुला माझा अंगिकार करावाच लागेल आणि माझा योगाक्षेमाचा भार तुला चालवावा लागेल. काळाने तर मला सर्व प्रकाराने गिळून टाकले आहे पण तुझ्या अंगी तर सर्व बळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझे सर्व प्रकारचे उपाय खुंटले आहेत माझ्यासाठी आता सर्व काही म्हणजे तुझे पायच आहेत.
3:04
अभंग क्र. ३११९
सावळे सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयी माझे ॥१॥
आणीक काही इच्छा आम्हा नाही चाड । तुझे नाम गोड पांडुरंगे ॥धृपद॥
जन्मोजन्मी ऐसे मागितले तुज । आम्हासी सहज द्यावे आता ॥२॥
तुका म्हणे तुज ऐसे जी दयाळ । धुंडिता सकळ नाही आम्हा ॥३॥
अर्थ
देवाचे सावळे सुंदर मनोहर रुप माझ्या ह्दयामध्ये निरंतर राहो. हे पाडूरंगा देवा इतर कशाचीही इच्छा किंवा आवड आम्हाला नाही तुझे नाम इतके गोड आहे. देवा जन्मोजन्मी मी तुला हेच मागणे मागत आलो आहे आता सहजरित्या मला माझे मागणे देऊन टाक. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझ्यासारखा दयाळू आम्ही सर्वत्र जरी शोधला तरी मिळणार नाही. ”
3:04
अभंग क्र. ३१२०
भक्तांहून देवा आवडते काइ । त्रिभुवनी नाही आन दुजे ॥१॥
नावडे वैकुंठ क्षीराचा सागर । धरोनि अंतर राहे दासा ॥धृपद॥
सर्वभावे त्याचे सर्वस्वे ही गोड । तुळसीदळ कोड करुनी घ्यावे ॥२॥
सर्वस्वे त्याचा म्हणवी विकिला । चित्त द्यावे बोला सांगितल्या ॥३॥
तुका म्हणे भक्तीसुखाचा बांधिला । आणीक विठ्ठला धर्म नाही ॥४॥
अर्थ
देवाला भक्तावाचून त्रिभुवनामधे दुसरे काहीही आवडत नाही हे मी शपथ घेऊन सांगतो आहे. देवाला वैकुंठ आवडत नाही, क्षीरसागर आवडत नाही केवळ त्याच्या दासांच्या अंत:करणामध्ये रहाणे त्याला आवडते. अहो दासांनी सर्वभावे त्याला काहीही अर्पण करु दया त्या सर्वाचा तो स्वीकार करुन घेतो आणि नुसते तुळशीदळ जरी त्याला वाहिले तरी त्याचे कोड कौतुक करुन ते देखील देव गोड मानून घेतो. माझ्या मते तर देव भक्ताला विकलाच गेलेला आहे भक्त जे काही सांगतील जे काही काम देतील जे काही बोलतील त्यांच्या बोलण्याकडे त्यांनी सांगितलेल्या कामाकडेच तो चित्त देऊन असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “भक्तांच्या सुखामधे विठ्ठल बांधला गेलेला आहे भक्तांचे कार्य करण्यावाचून विठ्ठलाला दुसरा धर्मच नाही. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















