आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१२ सप्टेंबर, दिवस २५५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी ५१ ते ७५ + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३०४९ ते ३०६०
“१२ सप्टेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 12 September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १२ सप्टेंबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १५ अभंग, आज अभंग ३०४९ ते ३०६० चे पारायण आपण करणार आहोत.
१२ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी ५१ ते ७५,
51-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
येवढेया लाठेपणाचा उपावो । आनु नाहीचि म्हणे देवो । हा सम्यक्ज्ञानाचा रावो । उपायांमाजी ॥51॥
ब्रह्मप्राप्तीला इतके बलवत्तर दुसरे साधनच नाही; सर्व उपायांमध्ये सम्यक् ज्ञान हाच राजा होय असे देवांनी सांगितले. 51
52-16
ऐसे आत्मजिज्ञासु जे होते । तिही तोषलेनि चित्ते । आदरे तया ज्ञानाते । वोवाळिले जीवे ॥52॥
इतक्या अधिकाराचे जे आत्मजिज्ञासू होते, त्यांनी संतुष्टचित्त होऊन, त्या ज्ञानोपायावरून आपले प्राण ओवाळन टाकिले. 52
53-16
आता आवडी जेथ पडे । तयाचि अवसरी पुढे पुढे । रिगो लागे हे घडे । प्रेम ऐसे ॥53॥
ज्याला ज्या विषयाची अत्यंत आवड असते, त्याची त्या विषयात पुढे पुढे गति असते हे प्रेमाचे लक्षणच आहे. 53
54-16
म्हणौनि जिज्ञासूंच्या पैकी । ज्ञानी प्रतीती होय ना जव निकी । तव योग क्षेमु ज्ञानविखी । स्फुरेलचि की ॥54॥
व प्राप्त झाले असता कसे टिकेल अशी जिज्ञासा सहजच होणार. 54
55-16
म्हणौनि तेचि सम्यक् ज्ञान । कैसेनि होय स्वाधीन । जालिया वृद्धियत्न । घडेल केवी ॥55॥
म्हणून ते सम्यक् ज्ञान कसे हस्तगत (अपरोक्षत्वाने) होईल व झाल्यास त्याच्या वृद्धीचा यत्न कोणता करावा. 55
56-16
का उपजोचि जे न लाहे । जे उपजलेही अव्हांटा सूये । ते ज्ञानी विरुद्ध काय आहे । हे जाणावे की ॥56॥
किंवा, ज्या कारणास्तव मे ज्ञान उत्पन्नच न व्हावे, अथवा झाले तरी आडमार्गाने व्यर्थ जावे, अशी ज्ञानाला प्रतिबंधक कोणती गोष्ट आहे ते कळावे. 56
57-16
मग जाणतया जे विरू । तयाची वाट वाहती करू । ज्ञाना हित तेचि विचारू । सर्वभावे ॥57॥
म्हणजे त्यायोगे तो ज्ञानाला विघ्न करणारा मार्ग सोडून देऊन, त्याला हितकर असेल त्याच मार्गाचा सर्वभावे आदर करू 57
58-16
ऐसा ज्ञानजिज्ञासु तुम्ही समस्ती । भावो जो धरिला असे चित्ती । तो पुरवावया लक्ष्मीपती । बोलिजेल ॥58॥
तुम्हा सर्व जिज्ञासूंच्या मनात हे कळावे असा जो भाव आहे तो पुरविण्यासाठी लक्ष्मीपति भगवान् पुढे सांगतील. 58
59-16
ज्ञानासि सुजन्म जोडे । आपली विश्रांतिही वरी वाढे । ते संपत्तीचे पवाडे । सांगिजेल दैवी ॥59॥
जिच्या पोटी उत्तम ज्ञान जन्माला यावे व आत्मविश्रांतीही लाभावी, त्या दैवी संपत्तीचे वर्णन देव आता करितील. 59
60-16
आणि ज्ञानाचेनि कामाकारे । जे रागद्वेषांसि दे थारे । तिये आसुरियेहि घोरे । करील रूप ॥60॥
आणि ज्ञानप्राप्तीच्या मिषाने रागद्वेषांदिकांना आश्रय देणारी जी घोर आसुरी संपत्ति तिचेही देव वर्णन करितील. 60
61-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
सहज इष्टानिष्टकरणी । दोघीचि इया कवतुकिणी । हे नवमाध्यायी उभारणी । केली होती ॥61॥
ह्या दैवी व आसुरी संपत्तीने इष्ट व अनिष्ट गोष्टी कशा घडतात, हे सांगण्याचा उपक्रम नवव्या अध्यायात केला होता. 61
62-16
तेथ साउमा घेयावया उवावो । तव वोडवला आन प्रस्तावो । तरी तया प्रसंगे आता देवो । निरूपीत असे ॥62॥
तेथे त्यांचा समग्र विचार करावयाचा होता, पण दुसराच प्रसंग (विषय) पुढे येऊन ते तसेच राहिले, म्हणून देव आता त्या राहिलेल्या प्रसंगाचे पुढे निरूपण करितील. 62
63-16
तया निरूपणाचेनि नांवे । अध्याय पद सोळावे । लावणी पाहता जाणावे । मागिलावरी ॥63॥
अध्यायाच्या अनुक्रमाने पहाता हे निरूपण सोळाव्यात पडते हे खरे; पण तो मागील विषयाचाच विस्तार होय. 63
64-16
परी हे असो आता प्रस्तुती । ज्ञानाच्या हिताहिती । समर्था संपत्ती । इयाचि दोन्ही ॥64॥
पण हे आता असो; ज्ञानाला हितकारिणी व अहितकारिणी अशा ह्या दोनच संपत्ति समर्थ आहेत. 64
65-16
जे मुमुक्षुमार्गींची बोळावी । जे मोहरात्रीची धर्मदिवी । ते आधी तव दैवी । संपत्ती ऐका ॥65॥
जी मुमुक्षुला मोक्षापर्यंत सोबत करणारी व मोहांधकारांतून प्रवास करतांना दिव्याप्रमाणे वाट दाखविणारी, ती दैवी संपत्ति प्रथम श्रवण करा. 65
66-16
जेथ एक एकाते पोखी । ऐसे बहुत पदार्थ येकी । संपादिजती ते लोकी । संपत्ति म्हणिजे ॥66॥
जेथे एक पदार्थ दुसऱ्याला पोषक असतो असे अनेक पदार्थ एकत्र जमले म्हणजे त्याला संपत्ति असे म्हणतात. 66
67-16
ते दैवी सुखसंभवी । तेथ दैवगुणे येकोपजीवी । जाली म्हणौनि दैवी । संपत्ति हे ॥67॥
दैवयोगाने, अशी सुखप्राप्ति करून देणारी साधने एकत्र झाली म्हणजे ती दैवी संपत्ति होय. 67
68-16
श्री भगवानुवाच ।
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितः ।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवं ॥16. 1॥
आता तयाचि दैवगुणा- । माजी धुरेचा बैसणा । बैसे तया आकर्णा । अभय ऐसे ॥68॥
आता ह्या दैवी संपत्तीमध्ये ज्याला प्रमुखस्थान लाधले आहे त्याला ‘अभय ” अशी संज्ञा आहे. 68
69-16
तरी न घालूनि महापुरी । न घेपे बुडणयाची शियारी । का रोगु न गणिजे घरी । पथ्याचिया ॥69॥
जो महापुरांत उडी घेत नाही त्याला जसे बुडण्याचे भय नसते, किंवा जो नित्य पथ्य पाळितो त्याला रोग जसा गांठीत नाही. 69
70-16
तैसा कर्माकर्माचिया मोहरा । उठू नेदूनि अहंकारा । संसाराचा दरारा । सांडणे येणे ॥70॥
त्याचप्रमाणे कर्म करणे अगर न करणे ह्यांविषयी जो अत:करनात अहंकार उठू देत नाही त्याने संसाराचे भय बाळगण्याचे कारण नाही. 70
71-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अथवा ऐक्यभावाचेनि पैसे । दुजे मानूनि आत्मा ऐसे । भयवार्ता देशे । दवडणे जे ॥71॥
अथवा ज्याचा सर्वात्मभाव अशाप्रकारे विस्तारला आहे की जे काही दिसेल ते आत्मस्वरूपच आहे, त्याला भयाचा गंधही असणे शक्य नाही. 71
72-16
पाणी बुड{ऊ} ये मिठाते । तव मीठचि पाणी आते । तेवी आपण जालेनि अद्वैते । नाशे भय ॥72॥
पाणी मिठाला बुडवू लागले तर, मीठच जलरूप होते, त्याप्रमाणे सर्वत्र अद्वैतभावना झाल्यावर (म्हणजे भय कारण जे द्वितीयत्व हे नाहीसे झाल्यावर) भयाला अवसरच कसा असणार ? (ते नष्टच होते) 72
73-16
अगा अभय येणे नांवे । बोलिजे ते हे जाणावे । सम्यक्ज्ञानाचे आघवे । धावणे हे ॥73॥
अरे, अभय असे म्हणतात ते ह्याप्रकारे जाणावे; सम्यक् ज्ञानाशिवाय ते साध्य होत नाही. 73
74-16
आता सत्त्वशुद्धी जे म्हणिजे । ते ऐशा चिन्ही जाणिजे । तरी जळे ना विझे । राखोंडी जैसी ॥74॥
आता ज्याला सत्वशुद्धि म्हणतात ती ह्या चिन्हांवरून ओळखावी; जशी राखोंडी जळतही नाही किंवा विझविणेचेही कारण नसते. 74
75-16
का पाडिवा वाढी न मगे । अंवसे तुटी सांडूनि मागे । माजी अतिसूक्ष्म अंगे । चंद्रु जैसा राहे ॥75॥
किंवा अमावस्येच्या क्षयाची समाप्ति झाली व पाडव्याच्या वृद्धीस आरंभ नाही, अशा स्थितीत चंद्राचे जसे अतिसूक्ष्मरूप असते. 75
दिवस २५५ वा. १२, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३०४९ ते ३०६०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३०४९
स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचे । काय त्या प्रेमाचे सुख मज ॥१॥
दुःखवीना चित्त तुझे नारायणा । काहीच मागेना तुजपासी ॥धृपद॥
रिद्धि सिद्धि मोक्ष संपित्त विलास । सोडियेली आस यांची जीवे ॥२॥
तुका म्हणे एके वेळे देई भेटी । वोरसोनि पोटी आळिंगावे ॥३॥
अर्थ
ज्या गोष्टीमुळे स्वामीवर संकट पडेल त्या गोष्टीविषयी मला काय प्रेमसुख वाटणार आहे ? त्यामुळे हे नारायणा मी तुझे मन कधीच दुखावणार नाही आणि तुझ्याजवळ काहीच मागणार नाही. अरे माझ्या मनाने तर रिध्दी सिध्दी मोक्ष संपत्ती विलास याची अपेक्षा याची इच्छा केव्हाच सोडलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे नारायणा तुम्ही फक्त मला एकदाच भेट दयावी आणि मला तुमच्या पोटाशी लावून एकदा आलिंगन दयावे. ”
2:46
अभंग क्र. ३०५०
देव तिही बळे धरिला सायासे । करूनिया नास उपाधीचा ॥१॥
पुर्वपक्षी धातु धिक्कारिले जन । स्वये जनार्दन तेचि झाले ॥२॥
तुका म्हणे यासी न चले तांतडी । अनुभवे गोडी येईल कळो ॥३॥
अर्थ
सर्व उपाधीचा नाश जो करतो तोच देवाला आपल्या भक्तीच्या बळाने व आधिकाराने वश करतो. जे परमार्थाच्या सुरवातीलाच सोने नाणे जण धन यांचा धिक्कार करतात ते परमार्थात पुढे चालून स्वत: जनार्दन रुपच होतात. तुकाराम महाराज म्हणतात, “परमार्थामधे तातडी करुन चालत नाही तर हळूहळू अनुभवानेच देवाची गोडी कळून येते. ”
2:47
अभंग क्र. ३०५१
भेटीवाचोनिया दुजे नाही चित्ती । येणे काकुलती याजसाठी ॥१॥
भेटोनिया बोले आवडीचे गुज । आनंदाच्या भोजे जेवू संगे ॥धृपद॥
मायलेकरासी नाही दुजी परि । जेऊ बरोबरी बैसोनिया ॥२॥
तुका म्हणे ऐसे अंतरीचे आर्त । यावे जी त्वरित नारायणा ॥३॥
अर्थ
माझ्या चित्तामध्ये तुझ्या भेटीवाचून दुसरे काहीच नाही त्यामुळे तर देवा तुला सारखे काकूळतीला यावे लागते. देवा तू मला एकदा भेट मग आपण दोघेही भेटलो की आवडीने गुज गुह्य गोष्टी करु व आनंदाने एकत्र बसून भोजन सेवन करु. देवा मायलेकरांमध्ये दुजाभाव नसतो त्याप्रमाणे आपण दोघेही मायलेकरेच आहोत त्यामुळे आपण दोघेही भेटलो की बरोबरीनेच बसून दोघेही एकत्र जेवू. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो नारायणा अशी आर्त इच्छा माझ्या मनात आहे व त्यामुळे तुम्ही त्वरीत यावे. ”
2:47
अभंग क्र. ३०५२
जायाचे शरीर जाईंल क्षणात । का हा गोपिनाथ पावेचि ना ॥१॥
तुम्ही संत सारे कृपेचे सागर । निरोप हा फार सांगा देवा ॥धृपद॥
अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला । पायापे विठ्ठला ठेवी मज ॥२॥
तुका म्हणे ऐसी करा निरवण । मग तो रक्षण करिल माझे ॥३॥
अर्थ
हे शरीर केव्हा तरी जाणारच आहे व ते क्षणात केव्हाही जाईल पण तरी देखील मला हा गोपीनाथ भेटत नाही ? हे संतजनहो तुम्ही सारेच कृपेचे सागर आहात त्यामुळे माझा निरोप देवाला तुम्ही आग्रह करुन सांगा. हा तुकाराम अनाथ आहे, अज्ञानी आहे याला येथे कोणीही नाही त्यामुळे हे विठ्ठला तुम्ही मला तुमच्या पायाजवळच ठेवा असा माझा निरोप तुम्ही विठ्ठलाला सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, “हे संतजनहो अशी सूचनाच तुम्ही त्या विठ्ठलाला करा मग तो माझे रक्षण करील. ”
2:47
अभंग क्र. ३०५३
त्रासला हा जीव संसारीच्या सुखा । तुजविण सखा नाही कोणी ॥१॥
ऐसे माझे मनी वाटे नारायणा । घालावी चरणावरी मिठी ॥धृपद॥
कइ ते सुंदर देखोनि रूपडे । आवडीच्या कोडे आळंगीन ॥२॥
नाही पूर्व पुण्य मज पामरासी । म्हणोनि पायासी अंतरलो ॥३॥
अलभ्य लाभ कैचा संचिता वेगळा । विनवी गोपाळा दास तुका ॥४॥
अर्थ
देवा संसाराच्या सुखाने माझा जीव त्रासला आहे आता तुझ्यावाचून मला कोणीही सखा नाही. हे नारायणा तुझ्या चरणाला मिठी घालावी असे मला मनाला वाटत आहे. देवा तुझे ते सावळे सुंदर रुप मी कधी पाहीन आणि तुला कोड कौतुकाने आवडीने कधी आलिंगन देईन असे मला वाटत आहे. अहो देवा माझ्या पामराजवळ पूर्वपुण्यच नाही त्यामुळे तर मी तुमच्या पायाला अंतरलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “जर पूर्वसंचितच चांगले नसेल तर अलभ्याचा लाभ कसा होईल त्यामुळेच हे गोपाळा मी तुमचा दास आहे म्हणून तुम्हाला विनंती करीत आहे. ”
2:47
अभंग क्र. ३०५४
मोलाचे आयुष्य वेचुनिया जाय । पूर्वपुण्ये होय लाभ याचा ॥१॥
अनंतजन्मींचा शेवट पाहता । नर देह हाता आला तुझ्या ॥धृपद॥
कराल ते जोडी येईल कार्यासी । ध्यावे विठ्ठलासी सुखालागी ॥२॥
सांचलिया धन होईल ठेवणे । तैसा नारायण जोडी करा ॥३॥
करा हरीभक्ती परलोकी कामा । सोडवील यमापासोनिया ॥४॥
तुका म्हणे करा आयुष्याचे मोल । नका वेचू बोल नामेविण ॥५॥
अर्थ
अरे तुमचे एवढे मोठे मोलाचे आयुष्य व्यर्थच वाया जात आहे खूप पूर्वपुण्य चांगले असेल तरच हे मोलाचे आयुष्य मिळते. अरे अनंत जन्माच्या शेवटी तुझ्या हाती हा नरदेह आला आहे. अहो या नरदेहामध्ये जे जे जे चांगले कार्य तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल ते पूर्ण होतील आणि सुखाची प्राप्ती करुन घ्यायची असेल तर विठ्ठलाचे चिंतन नेहमी करत राहावे. ज्याप्रमाणे धनाची साठवण करुन ठेवल्यानंतर खूप धन एकत्रित होते त्याप्रमाणे थोडी थोडी भक्ती करा व नारायणाची प्राप्ती तुम्ही करुन घ्यावी. या नरदेहामध्ये तुम्ही आला आहात तर हरीभक्ती करत राहा ती हरीभक्ती तुम्हाला परलोकात कामाला येईल व यमापासून सोडवील. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो लोकहो तुम्हाला मोठया कष्टाने हे आयुष्यरुपी मोल मिळाले आहे तरी तुम्ही या नरदेहामध्ये हरीनामावाचून व्यर्थ कोणत्याही प्रकारचे बोल बोलू नका. ”
2:47
अभंग क्र. ३०५५
काय सुख आहे वाउगे बोलता । ध्याता पंढरिनाथा कष्ट नाही ॥१॥
सर्वकाळ वाचे उच्चारिता हरी । तया सुखा सरि पाड नाही ॥धृपद॥
रामकृष्णरंगी रसना रंगली । अमृताची उकली नाम तुझे ॥२॥
तुका म्हणे धन्य तयाचे वदन । जया नारायण ध्यानी मनी ॥३॥
अर्थ
व्यर्थ काही बोलण्यात काय अर्थ आहे त्यापेक्षा पंढरीरायाचे ध्यान केले तर काही कष्ट होत नाही. सर्वकाळ जर वाचेने हरीनाम उच्चारण केले तर होणाऱ्या सुखाची सर दुसऱ्या कशातही नाही आणि त्या सुखाला अंत:पारही नाही. माझी रसना रामकृष्ण या नामात रंगून गेली आहे आणि देवा तुझे नाम म्हणजे अमृताची उकळीच आहे म्हणजे अमृताला आलेली उकळीप्रमाणे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याच्या ध्यानीमनी सतत नारायण आहे आणि ज्याच्या वाणीतही नारायणाचे नाम आहे त्याची वाणी धन्य आहे. ”
2:48
अभंग क्र. ३०५६
कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव । पंढरीचा राव संगी आहे ॥१॥
भक्त जाय सदा हरी कीर्ति गात । त्यासेवे अनंत हिंडतसे ॥धृपद॥
त्रैलोक्य भ्रमण करित नारद । त्यासंवे गोविंद फिरतसे ॥२॥
नारद मंजुळ सुस्वरे गीत गात । मार्गी चालताहे संगे हरी ॥३॥
तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची । नाही आणिकाची प्रीति ऐसी ॥४॥
अर्थ
नामसंकीर्तनाच्या सुखानेच हा देव सुखी होतो आणि हा पंढरीराव त्यांच्या संगतीतच नेहमी असतो. भक्त हरीची किर्ती सदासर्वकाळ गातच असतो आणि तो जेथे जेथे जाईल तेथे तेथे त्याच्यामागे हा अनंत हिंडतच असतो. नारदमुनी नारायण नारायण नाम जपत त्रैलोक्यात भ्रमण करीत फिरत असतात आणि हा गोविंद देखील त्याच्या पाठीमागे सारखा फिरतच असतो. नारद हरीचे मंजूळ सुस्वरात गीत गात ज्या मार्गाने चालतात त्याच मार्गाने नारदांच्या बरोबर हरी देखील त्यांच्या बरोबरच चालत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाला नामसंकीर्तनाची जितकी गोडी आहे तितकी तर कोणत्याही साधनाची आवड व गोडी नाही. ”
2:48
अभंग क्र. ३०५७
मायेविण बाळ क्षणभरि न राहे । न देखता होय कासाविस ॥१॥
आणिक उदंड बुझाविती तरी । छंद त्या अंतरी माउलीचा ॥धृपद॥
नावडती तया बोल आणिकाचे । देखोनिया नाचे माय दृष्टी ॥२॥
तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । आणिकाचे बोली चाड नाही ॥३॥
अर्थ
आईवाचून बाळ एक क्षणभर देखील राहात नाही ती दिसली नाही की ते कासावीस होते. अनेक लोक त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात परंतू त्याच्या अंतरंगात त्याच्या आईचा छंद असतो. त्या बाळाला इतर कोणाचेही बोल आवडतच नाही एकदा की त्या मातेला त्याने दृष्टीने पाहिले की, ते नाचूच लागते. तुकाराम महाराज म्हणतात, “त्याप्रमाणेच माझी आई देखील विठाबाई आहे त्या विठाबाई वाचून मला इतर कोणाचेही बोल आवडतच नाही. ”
2:48
अभंग क्र. ३०५८
हरीचिया भक्ता नाही भयचिंता । दुःखनिवारिता नारायण ॥१॥
न लगे वाहणे संसारउद्वेग । जडो नेदी पाग देवराया ॥धृपद॥
असो द्यावा धीर सदा समाधान । आहे नारायण जवळीच ॥२॥
तुका म्हणे माझा सखा पांडुरंग । व्यापियेले जग तेणे एके ॥३॥
अर्थ
हरीभक्तांचे दु:ख निवारण सदासर्वकाळ नारायण करत असतो त्यामुळे भक्तांना कोणत्याही प्रकारचे भय किंवा चिंता नसते. हरीच्या भक्तांना संसाराविषयी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज पडत नाही हा देवराव भक्तांना कोणत्याही प्रकारचा दोष लागू देत नाही. हा नारायण सदासर्वकाळ आपल्याजवळच असतो त्यामुळे आपल्या अंत:करणामध्ये नेहमी धीर आणि समाधान असू दयावे. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो ज्याने सर्व जगच व्यापले आहे तो पाडूरंग माझा सखा आहे. ”
2:48
अभंग क्र. ३०५९
दसरा दिवाळी तोचि आम्हा सन । सखे संतजन भेटतील ॥१॥
आमुप जोडल्या पुण्याचिया राशी । पार त्या सुखासी नाहि लेखा ॥धृपद॥
धन्य दिवस आजी झाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामे ॥२॥
तुका म्हणे काय होऊ उतराई । जीव ठेवू पायी संताचिये ॥३॥
अर्थ
ज्या दिवशी मला हरीभक्त भेटतील तोच दिवस माझ्यासाठी दसरा आणि दिवाळी सारखा आहे. ज्या दिवशी मला सखे हरीजण भेटतील त्या दिवशी मला अनेक पुण्याच्या राशी जोडल्या जातील आणि त्या सुखाला अंत:पारही राहणार नाही व त्या सुखाची सर इतर कोणत्याही सुखाला देता येणार नाही. आज मला सखे हरीजण भेटले त्यामुळे आजचा दिवस सोन्याचा झाला आहे आणि त्यांच्या संगतीमध्ये माझ्या वाणीला देखील रामनामाचे पीक भरपूर आले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी संतांच्या या उपकारातून कसा काय उत्तीर्ण होऊ शकतो परंतू मी माझा जीव त्यांच्या पायावर ठेवू शकतो. ”
2:49
अभंग क्र. ३०६०
हाचि माझा नेम धरिला हा धंदा । यावरी गोविंदा भेटी द्यावी ॥१॥
हाचि माझा ध्यास सदा सर्वकाळ । न्यावयासी मूळ येसी कधी ॥धृपद॥
डोळियांची भूक पहाता श्रीमुख । आलिंगणे सुख निवती भुजा ॥२॥
बहु चित्त ओढे तयाचिये सोई । पुरेल हा कई नवस नेणो ॥३॥
बहुबहु काळ झालो कासावीस । वाहिले बहुवस कलेवर ॥४॥
तुका म्हणे आता पाडावे हे ओझे । पांडुरंगा माझे इयावरी ॥५॥
अर्थ
हे गोविंदा तू मला भेट दयावीस हाच मी नित्यनियम आणि हाच धंदा मी धरला आहे. अरे गोविंदा तू मला वैकुंठाला नेण्यासाठी कधी येशील हाच ध्यास मला लागलेला आहे. हे देवा तुझे श्रीमुख पाहिले की माझ्या डोळयांची भूक भागते आणि तुला आलिंगन दिले की माझ्या दोन्ही भुजांना सुख प्राप्त होते. अरे तुझी भेट घेण्याकरता माझे चित्त खूप ओढ घेत आहे परंतू हा माझा नवस कधी पूर्ण होईल काय माहित ? देवा तुझी भेट व्हावी यासाठी मी खूप म्हणजे खूपच कासावीस झालो आहे त्यामुळे तर मी आजपर्यंत हे शरीर धारण करुन राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही मला भेट दया आणि माझी इच्छा पूर्ण करा व माझ्या इच्छेचे ओझे खाली पाडा. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















