४ जून, दिवस १५५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा, ओवी १ ते २५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १८४९ ते १८६०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“४ जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ४ jun
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ४ जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १८४९ ते १८६० चे पारायण आपण करणार आहोत.
४ जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी १ ते २५,

॥ सार्थ श्रीज्ञानेश्वरी: ::॥ अथ द्वादशोऽध्यायःअध्याय बारावा ॥ भक्तियोग ॥
एकूण ओव्या 247

मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अध्याय बारावा
1-12
जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे । अनवरत आनंदे । वर्षतिये ॥1॥
हे सद्गुरु आई ! तू शुद्ध म्हणजे अखंड अज्ञानादि दोषरहित आहेस, तू एक अत्यंत उदार म्हणून प्रसिध्द आहेस व तू अखंड आनंदस्वरूप किंवा प्रेमरूप असून शिष्याचे ठिकाणी अखंड परमानंदाचा वर्षाव करणारी किंवा परमानंदरूप प्रेमाची प्राप्ती करून देणारी आहेस. (श्रीगुरूंचा जयजयकार करून व आपल्याकडे बालपण घेऊन श्रीज्ञानेश्वर महाराज लडिवाळपणाने श्रीगुरुंचे स्ववन करतात.
जय जय वो शुद्धे — येथे शुद्ध हे विशेषण जीवाच्या ठिकाणी असलेल्या अशुद्धीच्या अपेक्षेने आहे. जीवाच्या ठिकाणी अज्ञान व अज्ञानजन्य अनेकत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, राग, द्वेष, अभिनिवेश, पाप इत्यादि नानाप्रकारची अशुद्धी आहे. तसेच त्याची ज्ञानदृष्टीही विपरित-ज्ञानरूप अशी अशुद्ध असून, त्याचे देहादिक पंचभौतिकही अशुद्ध आहेत.
पण श्रीगुरूची दृष्टी शुद्ध चिन्मय असून ज्ञानभक्तीने त्याची सगुण साकार मूर्तीही चिन्मयच झालेली असते- म्हणजे श्रीगुरु आत-बाहेर पूर्ण चिन्मयच असतात- म्हणून ते सर्वतोपरी उपाधिरहित-म्हणजे शुद्ध आहेत किंवा पूर्ण ब्रह्म आहेत, असे ‘शुद्ध’ या शब्दाने माउलिंनी संबोधून जयजयकार केला आहे. )
2-12
विषयव्याळे मिठी । दिधलिया नुठी ताठी । ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥2॥
विषयरूपी भयंकर सर्पाने जीवाच्या ठिकाणी मिठी मारल्यामुळे जी त्याला आत्मविस्मृतीची मूर्च्छा आली आहे, ती कशानेही नाहीशी होत नाही, पण हे श्रीगुरो ! एक तुझ्या कृपादृष्टीनेच विषयरूपी सर्पाचे विष उतरून ती मूर्च्छा नाहीशी होते. (परमार्थात संसारनिवृत्तिरूप मोक्षप्राप्तीकरिता ज्ञानभक्तीनिष्ठ श्रीगुरुकृपेवाचून दुसरा उपाय नाही असा भाव)
3-12
तरी कवणाते तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी । जरी प्रसादरसकल्लोळी । पुरे येसि तू ॥3॥
तुझ्या अंतःकरणात ज्याच्याविषयी कृपाप्रेमाचा पूर येऊन त्याच्या लाटा उसळू लागल्या असता, संसारातील त्रिविधतापाने कोण पोळला जाईल ? व त्याला प्रियवस्तूचा वियोग व अप्रियवस्तूंचा संयोग यांच्याविषयीचा शोक कसा जाळू शकेल ?
4-12
योगसुखाचे सोहळे । सेवका तुझेनि स्नेहाळे । सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तू ॥4॥
हे प्रेमळ सद्गुरु आई ! तू आपल्या प्रेमळ अनन्य सेवकांना आपल्या प्रेमानेच योगसुखाचे सोहळे भोगवितेस आणि त्यांचे सोहंसिध्दीचे लळे- म्हणजे लाड तू पुरवितेस.
5-12
आधारशक्तीचिया अंकी । वाढविसी कौतुकी । हृदयाकाशपल्लकी । परीये देसी निजे ॥5॥
आधारशक्तीच्या मांडीवर, कुंडलिनीशक्ती जागी करून, तिच्या सहाय्याने, सेवकाला कौतुकाने वर नेतेस आणि ह्रदयाकाशरूपी पाळण्यात, त्याला आपल्या शुध्द आत्मस्वरूपाच्या ऐक्याचे झोके देतेस.

6-12
प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाची खेळणी । आत्मसुखाची बाळलेणी । लेवविसी ॥6॥
तू आपल्या सेवकाला प्रत्यग्ज्योतीची ओवाळणी करून मनपवनाची खेळणी करून देतेस व आत्मसुखाची बाळलेणी लेववितेस. (प्रत्यग्ज्योती- म्हणजे देहापासून बुद्धीपर्यत जेवढी स्थूळसूक्ष्म तत्वे आहेत, त्या सर्वाच्या अंतर्यामी राहणारे चैतन्य
ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला प्रेमाने ओवाळते, त्याप्रमाणे श्रीगुरुही आपल्या प्रेमळ सेवकाला ह्रदयाकाशाच्या ठिकाणी, स्वयंज्योती अशा प्रत्यक् आत्मचैतन्यरूप ज्योतीने ओवाळतात म्हणजे त्याला सर्व उपाधीरहित करून सोडतात.
बाळलेणी म्हणजे बालपणी घातले जाणारे अलंकार. आई जसे आपल्या मुलाला लहानपणी सोन्याचे अलंकार घालते, त्याप्रमाणे श्रीगुरुआई आपल्या सेवकाला त्याच्या बालपणातत आत्मसुखाचे अलंकार घालते. अर्थात गुरुसेवकाचे बालपण म्हणजे ज्ञानाहंकाररहित असणे होय. या ज्ञानाहंकाररहिततेमुळेच सेवकाचे अंगी दंभदर्परहित असणे, मन इंद्रियादिक देहाच्या सुखांकरिता विषयाकडे न धावता शांत असणे, हर्ष-दुःख, मान-अपमान, इत्यादि द्वंदाचे ठिकाणी चित्ताची समता असणे हे सर्व गुण सहज बाणतात व आत्मसुखाची प्राप्ती होते.
हे सर्व श्रीगुरुच्या कृपेनेच साधले जाते, हे ‘लेवविसी’ या शब्दाने माऊलिंनी सुचविले आहे. )
7-12
सतरावियेचे स्तन्य देसी । अनुहताचा हल्लरू गासी । समाधिबोधे निजविसी । बुझाऊनि ॥7॥
त्याला सतराव्या अमृतकलेचे स्तन्य पाजून अनाहताचे गाणे गातेस आणि ऐक्यज्ञानाच्या उपदेशाने त्याचे समाधान करून त्याला समाधी साधून देतेस व निजवितेस. (सतरावी-म्हणजे योगशास्रांतील अमृतकला. तिचे स्तन्य म्हणजे दूध. चंद्राच्या सोळा कला सांगितल्या आहेत. कृष्णपक्षात एक एक कला कमी होऊन अमावास्येला तो चंद्र दिसेनासा होतो व शुक्ल पक्षात एक एक कला वाढत जाऊन पौर्णिमेला 16 कलांनी पूर्ण होतो, असे आपणाला दिसते. पण हे सर्व पृथ्वीच्या उपाधीमुळे आहे. वास्तविक चंद्र हा अखंड सोळा कलांनी पूर्णच असतो. ही त्याची अखंड पूर्णता सतरावी कला म्हटली जाते.
त्याप्रमाणेच देहउपाधीने जीवाचे ठिकाणी भासणारे जन्ममृत्यू नाहीसे होऊन, तो जीव ज्या स्थितीत आपले मूळचे अविनाशित्वाचे सुख अनुभवितो, त्या स्थितीला सतरावी कला म्हणतात व त्या सुखभोगाला अमृतपान म्हणतात. )
8-12
म्हणौनि साधका तू माउली । पिके सारस्वत तुझिया पाउली । या कारणे मी साउली । न संडी तुझी ॥8॥
म्हणून हे सद्गुरु आई ! तू साधकाची सतत कृपादृष्टीने सांभाळ करणारी आई आहेस, तुझे चरण ज्या साधकाच्या ह्रदयात राहतील, त्याला सर्व प्रकारच्या विद्या प्राप्त होतात. यास्तव मी तुझ्या कृपेची सावली सोडत नाही.
9-12
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी । तो सकलविद्यांचिये सृष्टी । धात्रा होय ॥9॥
हे सद्गुरुचे कृपादृष्टि ! तुझ्या करुणेचा आश्रय होऊन, तो सृष्टी निर्माण करणार्‍या ब्रह्मदेवाप्रमाणे नाना विद्यांची सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव होतो.
10-12
म्हणौनि अंबे श्रीमंते । निजजनकल्पलते । आज्ञापी माते । ग्रंथनिरूपणी ॥10॥
म्हणून हे माते ! परमेश्वराप्रमाणे तू षड्गुणैश्वर्यसंपन्न असल्यामुळे श्रीमंत आहेस आणि म्हणूनच आपल्या भक्तजनांची कामना पूर्ण करणारा कल्पतरू आहेस. (आता) मला ग्रंथ निरूपण करण्याला आज्ञा कर.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

11-12
नवरसी भरवी सागरु । करवी उचित रत्नांचे आगरु । भावार्थाचे गिरिवरु । निफजवी माये ॥11॥
माझे हे निरूपण नवरस सागरांनी भरून जाऊ दे – म्हणजे माझ्या निरूपणात नऊही रस अमर्याद भरलेले असू दे. वेदान्तमान्य अशा सिध्दान्तरूप रत्नांचे ते भंडारगृह कर व त्यातून गूढार्थाचे मोठे पर्वत निर्माण कर.
12-12
साहित्यसोनियाचिया खाणी । उघडवी देशियेचिया क्षोणी । विवेकवल्लीची लावणी । हो देई सैंघ ॥12॥
या माझ्या मराठी भाषेच्या भूमीत साहित्य – म्हणजे उपमा, अलंकार इत्यादि-सोन्याच्या खाणी जागोजागी निघू दे आणि सर्वत्र आत्मानात्मविवेकरूपी वेलींची लागवण होऊ दे.
13-12
संवादफळनिधाने । प्रमेयाची उद्याने । लावी म्हणे गहने । निरंतर ॥13॥
(संवाद म्हणजे विरोधी वाक्यांची एकवाक्यता) या संवादरूपी फळाला आश्रयस्थान होणार्‍या सिध्दान्ताच्या मोठमोठ्या बागा सर्वकाळ लाव – म्हणजे पूर्वोत्तर निरूपणात विरोध राहील व सिध्दान्ताला बाधा येईल असे निरूपण होऊ देऊ नकोस
14-12
पाखांडाचे दरकुटे । मोडी वाग्वाद अव्हांटे । कुतर्कांची दुष्टे । सावजे फेडी ॥14॥
पाखांड- म्हणजे श्रृतिस्मृतिपुराणे यांना सोडून असणारे विचार, ह्याच कोणी दर्‍या आणि वितंडवादाच्या आडवाटा यांचा विध्वंस कर. कुतर्क- म्हणजे प्रमाणावर उभारले नसलेले तर्क हेच कोणी हिंसक प्राणी, यांचा नायनाट कर- म्हणजे नास्तिक विचारांचा, वितंडवादाचा व कुतर्काचा सहज नाश होईल असे माझे निरूपण होऊ दे !
15-12
श्रीकृष्णगुणी माते । सर्वत्र करी वो सरते । राणिवे बैसवी श्रोते । श्रवणाचिये ॥15॥
सर्वत्र श्रीकृष्णाचे गुणवर्णन करण्यात मला उल्हास वाटेल, असे कर आणि श्रोतेजनांना एकाग्र श्रवणाच्या राज्यावर बसव – म्हणजे श्रोत्याकडून अत्यंत एकाग्रतेने श्रवण होऊ दे.

16-12
ये मराठीयेचिया नगरी । ब्रह्मविद्येचा सुकाळु करी । घेणे देणे सुखचिवरी । हो देई या जगा ॥16॥
या मराठीभाषेच्या नगरांत ब्रह्मविद्येचा सुकाळ कर आणि या जगातील सर्व लोकांच्या घेण्यादेण्याचा व्यवहार ब्रह्मसुखाचाच होऊ दे.
17-12
तू आपुलेनि स्नेहपल्लवे । माते पांघुरविशील सदैवे । तरी आताचि हे आघवे । निर्मीन माये ॥17॥
हे सद्गुरु जननी ! महद्भाग्यवान पुरुषांनाच प्राप्त होणार्‍या आपल्या कृपादृष्टीरूप प्रेमपदराने मला झाकशील, तर वर वर्णन केलेल्या गुणांनी युक्त असे संपूर्ण निरूपण आताच निर्माण करीन.
18-12
इये विनवणीयेसाठी । अवलोकिले गुरु कृपादृष्टी । म्हणे गीतार्थेसी उठी । न बोले बहु ॥18॥
श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी, अशी श्रीसद्गुरु निवृत्तिनाथांची प्रार्थना केल्याबरोबर, श्रीनिवृत्तिनाथांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले व गीतार्थ सांगण्यास सुरुवात कर, फार बोलू नको, असे ते म्हणाले.
19-12
तेथ जी जी महाप्रसादु । म्हणौनि साविया जाहला आनन्दु । आता निरोपीन प्रबंधु । अवधान दीजे ॥19॥
श्रीनिवृत्तिनाथांचे वचन ऐकून श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, ” अहोजी महाराज ! हे आपले म्हणणे म्हणजे महान प्रसादच आहे ” असे म्हणून ते (श्रीज्ञानेश्वरमहाराज) फार आनंदित झाले आणि आता ग्रंथाचे निरूपण करितो, लक्ष द्यावे. ” अशी त्यांनी प्रार्थना केली.

अर्जुन उवाच
। एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वा पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥12. 1॥

अर्जुन म्हाणाला याप्रमाणे सतत (तुझ्या व्यक्त स्वरूपाचे ठिकाणी) युक्त असलेले जे भक्त तुझी उपासना करतात आणि जे अव्यक्त अशा अक्षर ब्रह्माची उपासना करतात त्या दोन प्रकारच्या (योग्यांपैकी) उत्तम योगी कोणते ॥12-1॥
20-12
तरी सकलवीराधिराजु । जो सोमवंशी विजयध्वजु । तो बोलता जाहला आत्मजु । पंडुनृपाचा ॥20॥
नंतर संपूर्ण पराक्रमी वीरांमध्ये श्रेष्ठ व जो सोमवंशातील विजयरूपी ध्वजच होय, असा पांडुराजाचा पुत्र अर्जुन भगवंताला म्हणाला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

21-12
कृष्णाते म्हणे अवधारिले । आपण विश्वरूप मज दाविले । ते नवल म्हणौनि बिहाले । चित्त माझे ॥21॥
भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो, ऐकले का देवा ! आपण मला जे विश्वरूप दाखविले, ते पूर्वी कधी न पाहिलेले असे अद्भूतच होते; म्हणून ते पाहिल्याबरोबर माझ्या चित्ताला भीती वाटली.
22-12
आणि इये कृष्णमूर्तीची सवे । यालागी सोय धरिली जीवे । तव नको म्हणोनि देवे । वारिले माते ॥22॥
आणि या तुमच्या श्रीकृष्णमूर्तीच्या सहवासाचा सतत अभ्यास व गोडी असल्यामुळे ती पाहण्याचाच मला ध्यास लागला; पण तसे करणे चांगले नव्हे, म्हणून मला परावृत्त केले.
23-12
तरी व्यक्त आणि अव्यक्त । हे तूचि एक निभ्रांत । भक्ती पाविजे व्यक्त । अव्यक्त योगे ॥23॥
पण तुझे व्यक्त- म्हणजे एकदेशीय श्रीकृष्णस्वरूप व अव्यक्त विश्वरूप हे दोन्ही निःसंशय तूच एक आहेस. भक्तीने तुझे व्यक्तस्वरूप प्राप्त होते व योगाने तुझे अव्यक्त विश्वरूप प्राप्त होते.
24-12
या दोनी जी वाटा । तूते पावावया वैकुंठा । व्यक्ताव्यक्त दारवंठा । रिगिजे ये थ ॥24॥
हे वैकुंठनाथा ! तुझ्याशी ऐक्य पावण्याकरिता भक्तियोग व ज्ञानयोग असे दोन मार्ग असून तुझे एकदेशीय सगुण साकारास्वरूप व अव्यक्त विश्वरूप हे अनुक्रमे, त्या मार्गाचे दोन दारवंठे आहेत. त्या दारवंठ्यांनी तुझ्या ठिकाणी येता येते.
25-12
पै जे वानी श्यातुका । तेचि वेगळिये वाला येका । म्हणौनि एकदेशिया व्यापका । सरिसा पाडू ॥25॥
पण एका शंभर नंबरी सोन्याच्या लगडीला जो कस असतो; तोच कस त्याच्यातून तोडलेल्या वालभर सोन्याचा असतो; म्हणून तुझे एकदेशीय, डोळ्यांनी दिसणारे व्यक्तस्वरूप आणि तुझे व्यापक विश्वरूप यांची सारखीच योग्यता आहे.

दिवस १५५ वा, ४, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १८४९ ते १८६०
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १८४९
जे दोष घडले न फिटे करिता काही । सरते तुझ्या पायी जाले तैसे ॥१॥
माझा का हो करू नये अंगीकार । जालेती निष्ठुर पांडुरंगा ॥धृपद॥
यातिहीन नये ऐको ज्या वेद । तया दिले पद वैकुंठीचे ॥२॥
तुका म्हणे का रे एकाचा आभार । घेसी माथा भार वाहोनिया ॥३॥
अर्थ

देवा भयंकर महादोष ज्यांच्या हातून घडले की त्याचे कितीही प्रायचित्त घेतले तरी ते फिटत नाही परंतु ते तुला श्रद्धायुक्त शरण आले तर त्यांनाही तु तुझ्या पायाच्या ठिकाणी आश्रय दिला आहेस. मग हे पांडुरंगा तुम्ही माझा अंगिकार का करू नये माझ्याविषयी तुम्ही इतके निष्ठुर का झाले आहात ? असे तुझे काही हिन जातीचे भक्त आहेत की ज्यांना वेद देखील ऐकण्याची परवानगी नाही मग त्यांनाही तू वैकुंठीचे पद दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा अरे तू कित्येक भक्तांचा भार आपल्या माथ्यावर वाहत आहेत परंतु मग माझा एकट्याचाच भार तु का घेत नाहीस ?
, :

अभंग क्र. १८५०
हरीकथेची आवडी देवा । करितो सेवा दासांची ॥१॥
म्हणोनि हिंडे मागे मागे । घरटी जागे घालितसे ॥धृपद॥
निर्लज्ज भोजे नाचे रंगी । भरते अंगी प्रेमाचे ॥२॥
तुका म्हणे विकले देवे । आपण भावे संवसाटी ॥३॥
अर्थ

देवाला हरिकथेची फार आवड आहे ; म्हणून तो हरिकथा करणा-या भक्तांची सेवा करतो. एवढेच नव्हे, तर ते भक्त जिकडे जातील, त्यांच्या मागे मागे हिंडत राहतो ; व ते ज्या जागी बसतील, त्यांच्याभोवती घिरट्या घालतो, किंवा रात्री ज्या भक्तांच्या घरी हरिनामकीर्तन चालू असते. त्या प्रत्येकाच्या घरी जागता पहारा घालीत फिरतो. हरिकथा चालू असते तेव्हा देव निर्लज्ज होऊन त्या रंगात नाचतो ; व त्या वेळी त्याच्या अंगात प्रेमाचे भरते येते. तुकाराम महाराज म्हणतात, हरिभक्तांच्या निःसीम व अनन्य प्रेमाच्या बदली स्वतःला देवाने विकून टाकले आहे.
, :

अभंग क्र. १८५१
साधन संपत्ती हेचि माझे धन । सकळ चरण विठोबाचे ॥१॥
शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळीच नीट सुखरूप ॥धृपद॥
वैष्णवाचा संग राम नाम गाणे । मंडित भूषणे अळंकार ॥२॥
भवनदी आड नव्हतीसी जाली । कोरडीच चाली जावे पायी ॥३॥
मायबाप दोघे पाहातील वाट । ठेवूनिया कटी कर उभी ॥४॥
तुका म्हणे केव्हा देखेन कळस । पळाली आळस निद्रा भूक ॥५॥
अर्थ

विठोबाचे चरण हीच आमची योगयोगादी आणि विवेकवैराग्यादी साधनसंपत्ती आहे ; व हेच आमचे धनही आहे. पंढरीची वाट म्हणजेच माझ्या माहेरची वाट आहे. ही वाट शांत, जवळची, सरळ आणि सुखाची आहे. वैष्णवांची संगती आणि त्यांच्या संगतीत ‘ राम ‘ नामांचे गीत गाणे हीच आमची भूषणे आणि अलंकार आहेत, आणि या अलंकार- भूषणांनी आम्ही सुशोभित झालो आहोत. ही भवनदी कधीच आड आली नाही ; किंबहुना ती नव्हतीच असे झाले आहे ; आणि कोरड्या पायाने चालत जावे, अशी स्थिती झाली आहे. माझे मायबाप श्रीरूक्मिणी-पांडुरंग, ही दोघे कटावर हात ठेऊन उभी असलेली माझी निरंतर वाट पाहात असतील. तुकाराम महाराज म्हणतात, मी पंढरीला जाऊन केव्हा श्रीपंढरीरायाचा कळस बघेन, असे मला झाले आहे ; आणि त्यामुळे आळस, निद्रा, भूक ही सारी पळाली आहेत.
, :

अभंग क्र. १८५२
यथार्थवादे तुज न वर्णवे कदा । बोलतो ते निंदा करितो तुझी ।
वेदश्रुति तुज नेणती कोणी । चोवीस ठेंगणी धांडोळिता ॥१॥
आता मज क्षमा करावे देवा । सलगी ते केशवा बोलियेलो ॥धृपद॥
सगुण की साकार निर्गुण की निराकार । न कळे हा पार वेद श्रुती ।
तो आह्मी भावे केलासी लहान । ठेवूनिया नावे पाचारितो ॥२॥
सहस्रमुखे शेष सीणला स्तविता । पार न कळता ब्रह्मा ठेला ।
तेथे माझी देहबुद्धी ते काई । थोर मी अन्यायी तुका म्हणे ॥३॥
अर्थ

देवा मी यथार्थ वादाने तुझे वर्णन करायला गेलो होतो ते मला कदापि शक्य नाही परंतु आता मी तुझ्या विषयी स्तुती रुपी जे काही शब्द बोलत आहे ती एक प्रकारची निंदाच आहे. वेद उपनिषदे तुला जाणत नाहीत आणि चोवीस शास्त्र म्हणजे आठरा पुराणं व सहा शास्त्र तुझा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनाही तु सापडला नाही. त्यामुळे हे देवा तुम्ही आता मला क्षमा करावी हे केशवा मी जे काही तुमच्या विषयी स्तुतीरूप शब्द बोलत आहे ते सलगीने बोलत आहे. देवा तु सगुण-साकार आहेस की निर्गुण निराकार आहेस हे वेद-उपनिषदांना देखील कळत नाही. अशा या देवाला आम्ही आमच्या भक्तिभावाने लहान केले आहे आणि त्याला विविध प्रकारचे नावे ठेवून बोलवत आहोत. असा हा हरी आहे याच्याविषयी हजारो मुख असलेला शेष देखील त्याचे वर्णन करता करता शिणला आणि ब्रम्‍हदेवाला याचा अंतपार न लागल्यामुळे तोही शांत झाला. तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना देखील तुमचे वर्णन करणे जमले नाही तेथे माझ्या बुद्धी ने तुमचे वर्णन करणे म्हणजे एक प्रकारचा अपराध आहे अन्यायच आहे.
, :

अभंग क्र. १८५३
कृष्ण ध्याता चित्ती कृष्ण गाता गीती । ते ही कृष्ण होती कृष्णध्याने ॥१॥
आसनी शयनी भोजनी जेविता । म्हणारे भोगिता नारायण ॥धृपद॥
ओविया दळणी गावा नारायण । कांडिता कांडण करिता काम ॥२॥
नर नारी याति हो कोणी भलती । भावे एका प्रीती नारायणा ॥३॥
तुका म्हणे एका भावे भजा हरी । कांति ते दुसरी रूप एक ॥४॥
अर्थ

जो कृष्णा चे ध्यान करतो जो कृष्णाचे गीत गातो, तो ध्यान करणारा आणि गीत गाणारा कृष्णासारखा होतो. त्यामुळे हे जण हो तुम्ही झोपलेले असताना बसलेले असताना जेवण जेवत असताना एवढेच नाही तर कोणतेही भोग भोगत असताना नारायण नारायण म्हणत रहा. हे स्त्रियांनो तुम्ही देखील दळण दळत असताना कांडण करीत असताना आणि कोणतेही काम करत असताना नारायणाच्याच ओव्या गात रहा. कोणत्याही जातीचा पुरुष असो किवा स्त्री असो त्या सर्वानी एकनिष्ठ भक्ती भावाने नारायणाचे गुणगान ऐकावे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही एकनिष्ठेने हरीला भजा, जसे सूर्य आणि त्याची कांती ही वेगवेगळी असते परंतु दोघाचे ही रूप एकच असते तसे तुमचे व हरीचे एकरूप होईल.
, :

अभंग क्र. १८५४
डोळिया पाझर कंठ माझा दाटे । येऊ देई भेटे पांडुरंगे ॥१॥
बहु दिस टाकिले का निरास केले । कोठे वो गुंतले चित्त तुझे ॥धृपद॥
बहु धंदा तुज नाही वो आठव । राहिलासे जीव माझा कंठी ॥२॥
पंढरीस जाती वारकरी संता । निरोप बहुता हाती धाडी ॥३॥
तुजविण कोण सांवा धावा करी । ये वो झडकरी पांडुरंगे ॥४॥
काय तुझी वाट पाहो कोठवरी । कृपाळु कापरी विसरलासी ॥५॥
एक वेळे माझा धरूनि आठव । तुका म्हणे ये वो न्यावयासी ॥६॥
अर्थ

हे पांडुरंगा तुझ्या वियोगाणे आता माझ्या डोळ्यांना पाझर फुटला आहे माझा कंठ दाटून आला आहे त्यामुळे लवकर यावे आणि मला भेट द्यावी. देवा तू माझा त्याग करून बरेच दिवस झाले आहेत माझी निराशा केली आहेस माझ्यापासून तुझे चित्त इतर कोणत्या कामात गुंतले आहे की काय ? देवा मला माहित आहे तुझ्या पाठीमागे खूप उद्योग धंदा आहे त्यामुळे तुला माझी आठवण येत नाही परंतु तुझ्या वियोगाने माझा जीव कंठात आला आहे. मी पंढरपूरला जे वारकरी संत जातात त्यांच्या कडे खूप वेळा माझा निरोप पाठवला आहे. हे पांडुरंगा तुझ्या वाचुन कोण मला सहाय्य करेल त्यामुळे हे पांडुरंगा तु लवकर धावत माझ्याकडे यावे. हे कृपाळू देवा मी तुझी वाट कुठपर्यंत पाहू तू मला विसरला आहेस की काय ? तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तु एकदा तरी माझी आठवण काढ आणि मला तु घ्यायला ये.
, :

अभंग क्र. १८५५
काय करू या मना आता । का विसराते पंढरिनाथा ।
करी संसाराची चिंता । वेळोवेळा मागुती ॥१॥
अधिक कोंडिता चरफडी । भलतीकडे घाली उडी ॥धृपद॥
भजन नावडे श्रवण । धावे विषय अवलोकून ॥२॥
बहुत चंचळ चपळ । जाता येता न लगे वेळ ॥३॥
किती राखो दोनी काळ । निजलिया जागे वेळे ॥४॥
मज राखे आता । तुका म्हणे पंढरिनाथा ॥५॥
अर्थ

आता या मनाला काय करावे हे पंढरीनाथाला का विसरत असेल बरे ? हे मन मात्र संसाराची चिंता वेळोवेळा करीत असते. हे मन विचित्र आहे याला कोंडून ठेवले की ते तरफडते मग ते भलत्याच ठिकाणी उडी घालत असते. या मनाला हरी भजन हरी कथा श्रवण करणे आवडत नाही पण ते विषयाकडे आवर्जून धाव घेत असते. हे मन अतिशय चंचल व चपळ आहे त्याला कोठेही जाऊन येण्यास अधिक वेळ लागत नाही. झोपलेले असताना व जागे असताना या मनाचे रक्षण दोन्ही काळात कोठ पर्यंत करावा ? तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीनाथा आता तुम्हीच माझे रक्षण करावे.
, :

अभंग क्र. १८५६
कंथा प्रावर्ण । नव्हे भिक्षेचे ते अन्न ॥१॥
करी यापरी स्वहित । विचारूनि धर्म नीत ॥धृपद॥
देऊळ नव्हे घर । प्रपचं परउपकार ॥२॥
विधी सेवन काम । नव्हे शब्द रामराम ॥३॥
हत्या क्षात्रधर्म । नव्हे निष्काम ते कर्म ॥४॥
तुका म्हणे संती । करूनि ठेविली आइती ॥५॥
अर्थ

संन्याशांची कथा अशी आहे की त्यांच्या अंगावरील वस्त्र हे साधारण वस्त्राप्रमाणे समजू नये आणि भिक्षेत आलेले पवित्र अन्न त्याची तुलना इतर अन्ना शी करू नये. याप्रमाणे धर्मनीती आहे व त्याप्रमाणे तू विचार करून आपले हित करून घ्यावे. देवळाला घर म्हणू नये आणि परोउपकार करणे याला प्रपंच म्हणू नये. विधिपूर्वक शास्त्रशुद्ध मार्गाने केलेले विषय व भोग याला काम म्हणजे वासना म्हणू नये आणि राम राम हे साधे शब्द आहेत असे म्हणू नये. क्षत्रिय धर्मानुसार युद्धांमध्ये शत्रूला मारले तर त्याला हत्या म्हणू नये आणि निष्काम कर्म असेल तर त्याला कर्म मुळीच म्हणू नये. तुकाराम महाराज म्हणतात अशी धर्मनीती संतांनी करून ठेवली आहे त्याप्रमाणे आपण वागावे.
, :

अभंग क्र. १८५७
पडोनिया राही । उगाच संताचिये पायी ॥१॥
न लगे पुसणे सांगावे । चित्त शुद्ध करी भावे ॥धृपद॥
सहज ते स्थिति । उपदेश पर युक्ती ॥२॥
तुका म्हणे भाव । जवळी धरूनि आणी देव ॥३॥
अर्थ

अरे नरा, संतांच्या पायाजवळ उगाच पडून राहा. त्यांना ज्ञानासंबंधी काही पुसावे, सांगावे लागत नाही संतांचे ठिकाणी निष्ठा ठेवून प्रथम चित्ताची शुध्दता कर. ते संत तुझा उत्कृष्ट अधिकार पाहून आपोआप ब्रम्‍हज्ञानाचा उपदेश अनेक युक्ति – प्रयुक्तींनी करतील. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे संतांवर विश्वास ठेवला तर तो भक्तीभाव देवालाही जवळ आणतो.
, :

अभंग क्र. १८५८
देवाचे घरी देवे केले चोरी । देवे देव नागवूनि केला भिकारी ॥१॥
धावणिया धावा धावणिया धावा । मागचि नाही जावे कवणिया गावा ॥धृपद॥
सवेचि होता चोर घरिचिया घरी । अवघे केले वाटोळे फावलिया वरी ॥२॥
तुका म्हणे येथे कोणीच नाही । नागवले कोण गेले कोणाचे काई ॥३॥
अर्थ

जीवरूपी देवाच्या घरी ईश्वररूपी देवाने काम – कर्म अविद्येची चोरी केली ; आणि अशा रीतीने देवानेच जीवरूपी देवाला लुटून त्याला भिकारी – असंग करून टाकले आहे. याकरिता धावणारे लोकहो, धावा धावा ; पण ज्याने आपल्या शोधाचे साधनच ठेवले नाही. ज्याने कार्य-कारणांचा अत्यंत भावरूप बाध केला आहे, त्या अव्यक्त, निराकार चोर देवाचा शोध करण्याकरिता कोण्या गावाला जावे ? ते मात्र कळत नाही हो ! तो चोर देव इतके दिवस अंतःकरणरूपी घरातच आमच्या बरोबरच राहात होता ; आणि चित्तशुध्दीची संधी सापडताच त्याने जीवाचे वाटोळे केले. देहादी उपाधींचा निरास केला. तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा जीवरूपी देवाची ईश्वररूपी देवाने चोरी केली, त्या अवस्थेत जीवेश्वराचे परम ऐक्य झाल्यामुळे दोघापैकी भिन्न असा कोणीच राहिला नाही ; तर मग त्या अद्वैतस्थितीत कोणी कोणाला लुटले ; आणि कोणाचे काय गेले ? अर्थात सारेच मिथ्या आहे.
, :

अभंग क्र. १८५९
जतन करा रे जतन करा । घालू पाहे घरावरी घाला चोरटे ॥१॥
अवघेचि निजो नका अवघिये ठायी । वेळ अवेळ तरी सांभाळावी काही ॥धृपद॥
सीतरिली फार खाती भोवताले फेरे । गेले नये हाता सेकी तळमळ उरे ॥२॥
तुका म्हणे आह्मी करू आपले जतन । न लगे काही कोणा घावे उघडारे कान ॥३॥
अर्थ

लोकहो, परमार्थरूपी धनाचे रक्षण करा. कारण, देहरूपी घरावर काळरूपी चोरटे घाला घालू पाहात आहे. तुम्ही सर्वजण सर्वकाळ निजू नका. वेळ – अवेळ काहीतरी बघत जा ; व प्रसंगी विशेषी सावध राहा. मायिक विषयांनी ठकविलेली माणसे अनेक योनींच्या भोवती मरणाचे फेरे घालतात. मनुष्य देहरूपी निधान एकदा का गेले ; म्हणजे पुनः ते हाताशी येत नाही, व शेवटी तळमळ करणे तेवढे उरते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आपले परमार्थ धन जतन करू. या परमार्थ धनाचे रक्षण करण्याकरिता कोण्या रखवालदार शिपायाला पगार द्यावा लागत नाही. लोकहो, तुम्हीदेखील माझा हा उपदेश कान उघडे ठेवून ऐका. व परमार्थ धनाचे रक्षण करा.
, :

अभंग क्र. १८६०
काळोखी खाऊन कैवाड केला धीर । आपुलिया हिते जाले जनामध्ये शूर ॥१॥
का रे तुह्मी नेणा का रे तुह्मी नेणा । अल्प सुखासाठी पडशी विपत्तीचे घाणा ॥धृपद॥
नाही ऐसी लाज काय तयापे आगळे । काय नव्हे केले आपुलिया बळे ॥२॥
तुका म्हणे तरी सुख अवघेचि बरे । जतन करून हे आपुलाली ढोरे ॥३॥
अर्थ

अर्थ:–ज्या संतांनी साधकावस्थेत असताना मोठ्या धैर्‍याने परमार्थासंबंधी अनेक युक्त्या लढवून हरीविषयी अज्ञान दूर केले ; व आपले हित साधले, ते संत या जनामध्ये मोठे शूर झाले आहेत. लोकहो, हे तुमच्या लक्षात का येत नाही ? विषयाच्या अल्प सुखासाठी अनेक विपत्तींच्या घाण्यात निष्कारण का पडता ? संतांप्रमाणे तुम्हीदेखील परमार्थाचा पक्ष घेऊन व अज्ञान नष्ट करून हित साधा. परमार्थ करण्याकरिता तुमच्यापेक्षा संतांमध्ये कोणता विशेष गुण होता ; आणि तुमच्यात त्यांच्यापेक्षा कोणती न्यूनता आहे. सांगा ! दोघानाही मनुष्यदेह तर सारखाच आहे, मग संतांनी मुक्त होऊन सुखी व्हावे ; आणि तुम्ही मात्र मनुष्यदेह असून बध्द दुःखी राहावे, याची तुम्हाला लाज वाटू नये काय ? अरे, आपल्या प्रयत्नबळाने केले तर काय एक होत नाही ? तुकाराम महाराज म्हणतात, लोकहो, संतांप्रमाणे तुम्ही परमार्थ केला, तर तुमचे सर्वतोपरी कल्याण होऊन सुखप्राप्ती होईल ; पण त्याकरिता प्रथम इंद्रियरूपी पशूंचे रक्षण करा.

जून नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading