ग्रामगीता अध्याय सहावा – 6 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्याय सहावा- ६
Gram Gita Chapter 6 – ६
ओवी संख्या :- ११२
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय ६ संसर्ग प्रभाव
संसर्ग प्रभाव

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय सहावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ६
Gram Gita Chapter VI Beginning


—-🕉ग्रामगीता अध्याय ६ संसर्ग प्रभाव


संसर्ग प्रभाव
ईश्वरे जग केले निर्माण । त्याचे कार्य अजूनि अपूर्ण । ते आपल्यापरी कराया पूर्ण । सदबुध्दि दिली मानवा ॥१॥
एकापासूनि अनेक व्हावे । अनेकासि एकत्वी आणावे । हा आपुला मूळ संकल्प देवे । चित्ती घातला सर्वाच्या ॥२॥
अनेक ईषणा प्रेरणा । त्या कारण होती आत्मविकसना । पुत्रपौत्रादि रूपे नाना । मानव आपणा प्रकटवी ॥३॥
कोणी शिष्यशाखा वाढवी । कोणी ग्रंथादिक उपजवी । जगी आपुली परंपरा चालावी । ऐसी इच्छा स्वाभाविक ॥४॥
जगावरचि मानव जगला । समुदायातचि उन्नत झाला । तो समुदायाचे कार्य विसरला । तरि ते उचित कैसे ? ॥५॥
पिंडब्रह्मांड हे निगडित । संस्कारहि जगाशी संबंधित । आत्मज्ञाने राहो जीव अलिप्त । परि उपेक्षा न व्हावी जगाची ॥६॥
सत्य शिव सुखी सुंदर । ऐसा व्हावा हा संसार । हे सोपविले कर्तव्य थोर । देवे मानवाप्रति ॥७॥
मानवे आपुला उध्दार करावा । तैसाचि समाज सुधारावा । यासाठीच दिला धर्म आघवा । नेमूनि सकळा ॥८॥
यासाठीच झाले अवतार । यासाठीच संतभक्तांचा व्यवहार । ” सुखी करीन अवघाचि संसार ” । ब्रीद तयांचे ॥९॥
न सुधारवे अखिल विश्व । तरि उन्नत करावे आपुलेचि गाव । यानेच संतोषेल देवाधिदेव । लाभेल ठेव मोक्षाची ॥१०॥

हे ठीक म्हणती श्रोतेजन । परि गावाप्रति आमुचे कर्तव्य कोण ? काय होईल आम्हीच झुरोन ? गावी कोणी ऐकेना ॥११॥
सर्व करीती आपुल्यासाठी । स्त्रीपुत्रांसाठी चैनीसाठी । परि आठवचि नाही येरासाठी । काही करावे म्हणूनि त्या ॥१२॥
सर्वास वाटे आमुचे ऐकावे । पण ऐकतील कैसे हे न ठावे । म्हणोनि यास्तव पुढे जावे । न वाटे कोणा ॥१३॥
कार्य करावया पुढे जावे । साथ न मिळता फजीत व्हावे । संकटी कोणी जीव द्यावे ? । वाटे ऐसे बहुतेका ॥१४॥
आम्हास वाटे गाव सुधारावे । परि सांगा त्यासाठी काय करावे ? कैसे वळतील आघवे । लोक सन्मार्गी ? ॥१५॥
आपण पुसलिया प्रश्नाचे । मी उत्तर देईन साचे । परि लक्षी ठेवोनि ह्रदयाचे । आचरा तैसे ॥१६॥
मी सांगेन म्हणूनि नव्हे । संती हेचि कथिले बरवे । माझा विश्वास जेथे धावे । तेचि सांगेन तुम्हाला ॥१७॥
सर्वाआधी एक निश्चय । लोक असती अनुकरप्रिय । विशेष दिसे ती घेती सोय । न सांगताहि ॥१८॥
मुख्य कार्यकर्त्याची राहणी । निरोक्षोनि बघती कोणी । लागती त्याच्याच मागे धावोनी । वत्स जैसे ॥१९॥
म्हणोनी कार्यकर्त्यात असावे आकर्षण । सेवाचारित्र्याचे ओजपूर्ण । सुधार नोहे त्यावाचून । गावाच्या कोण्या ॥२०॥

या मार्गानेचि जनजागृती । हेचि सूत्र घ्यावे हाती । आपण वागावे तैसे वागती । जनहि सारे ॥२१॥
यासाठी प्रथम करावी आपुली शुध्दि । शरीरशुध्दि ह्रदयशुध्दि । घरशुध्दि ग्रामशुध्दि । सर्वतोपरी ॥२२॥
जैसे तुम्ही कराल आपुले घर । ते पाहतील जन सत्वर । करतील तैसेचि प्रकार । आपुल्या घरी ॥२३॥
सुंदर दृश्य पाहता डोळा । आवडे पाहणाराहि तसाच सोहळा । आपणहि वर्तावयाचा चाळा । करितो प्राणी ॥२४॥
फुललेली बाग पाहिली । अनंतरंगी फुले फुलली । सुरस फळांनी बहरली । सौंदर्यखाणि ॥२५॥
पाणी वाहे झरणापरी । वृक्षलतांच्या कुंजांतरी । आमोद दरवळे नानापरी । फळफुलांचा ॥२६॥
गर्द छायेतळी हिरवळ । दुर्वांकुरांचे जाळे कोमळ । नाना रंगी फुलपाखरे सोज्वळ । मन मोहविती जीवाचे ॥२७॥
कोठे पाणी चमके आरशापरी । कोठे दगडांच्या कणांची कुसरी । कोठे कोमलरूप भूमि धरी । वाटे अंकी लोळावे ॥२८॥
कोठे भूमिचेहि भिन्न वर्ण । कोठे काळे, पिंगटपण । कोठे पांढरे लाल मधून । सुवर्णापरी ॥२९॥
लतालतावरि झुलती पक्षी । सर्व फळाफुलांचे साक्षी । जरी फिरती अंतरीक्षी । पिकली फळे त्या ठावी ॥३०॥

उडोनि तेथेचि मारिती झडप । रसाचा आस्वाद घेती अमूप । जैसा करील प्राणी संकल्प । तैसा भोग त्या पावे ॥३१॥
जिकडे तिकडे सुगंध उसळे । उल्हासित इंद्रिये भोगती सगळे । नाक कान जीभ डोळे । नाना विषयारसानंद ॥३२॥
ऐसे दृश्य पाहे प्राणी । तेव्हा आपणहि करावे वाटे मनी । जातो घरासि परतोनि । सजवाया घर आपुले ॥३३॥
लहान अंगणी बाग लावी । अथवा कुंडीतचि फुले फुलवी । शृंगारी झोपडी आपुली बरवी । आपुल्यापरी ॥३४॥
जरि त्या बागचि न दिसता । तरि तो कैसा प्रयत्न करता ? ऐसाचि आहे मानव तत्त्वता । जे देखे आपण करी ॥३५॥
विशेषतः ऐसे मुलांचे वागणे । त्यांचे कार्यचि प्रतिध्वनि उठवणे । जे जे पाहतील डोळयाने । तेचि आचरती उल्हासे ॥३६॥
म्हणूनि मुख्याची ही जबाबदारी । ते जे करतील ग्रामभीतरी । मुले आचरतील घरी दारी । मातापित्यासि वळवोनि ॥३७॥
एका प्रमुखाने कोंबडी पाळली । तिला सुंदर पिली झाली । दुसर्‍यानेहि तीच घेतली । कला त्याची ॥३८॥
मग गावासि तोच आनंद । चढला तयांना उन्माद । लढाई करण्याचा लागला नाद । कोंबडियांची ॥३९॥
एकादा कोंबडयांची झुंज पाहिली । सर्व गावास धुंदी चढली । मग कोंबडयात्रा भरली । लढाईसाठी ॥४०॥

बांधती कोंबडयांच्या पायी सुरा । लढविती मैदानी भरभरा । रक्तबंबाळ खेळ सारा । क्रूरवृत्तीने वाढविला ॥४१॥
मग पाटील म्हणे कर लावा । पैदासीचा धंदा वाढवा । लोक चेतले गावोगावा । झुंज करण्या कोंबडयांची ॥४२॥
बिचार्‍या दीन जीवाने काय केले । यांनीच त्यास निमित्त धरले । त्यांचे प्राण लढता गेले । धंदे वाढले पापांचे ॥४३॥
एका प्रमुखाने चालना दिली । ती रीती सर्व गावाने उचलली । प्रौढ माणसेहि करू लागली । लढाई मग कोंबडयांची ॥४४॥
सारी शक्ति कोंबडयांमागे । प्रतिष्ठितहि झाले बेढंगे । म्हणोनि एकाने आपुल्या अंगे । नगर-आखाडा निर्मिला ॥४५॥
जमविले बाल तरुण काही । उल्हास ओतिला त्यांच्या देही । व्यायामाच्या नव्या उत्साही । लाविले तया ॥४६॥
प्रथम भरविला गावी दंगल । इनामी कुस्त्यांचा जंगी मेळ । पाहताचि मुलेबाळे सकळ । लागले करण्या व्यायाम ॥४७॥
घरोघरी मुले खेळती कुस्ती । गल्लीगलींत चंग बांधती । चढली व्यायामाची मस्ती । लहानथोरा ॥४८॥
कवायत करेला मल्लखांब । लाठीकाठी भाला लेजीम । तलवार छडीपट्टा मर्दानी काम । व्यायामाचे ॥४९॥
त्याने गावातील वाईट व्यसन । सर्वचि गेले हारपोन । शरीर कमाविण्याची लागली धुन । लहानथोरा ॥५०॥
जो तो आपुली छाती पाही । दंड मोंढे फिरवीत राही । मांडियांचे पट वाढवी देही । सौंदर्य यावया मल्लाचे ॥५१॥
मैदानी मर्दानी खेळ चाले । सर्व गाव लाल मातीने रंगले । कोंबडयांचे व्यसन कमी झाले । लढाई गेले विसरोनि ॥५२॥
दुसर्‍या एकास बुध्दि सुचली । त्याने जोडी चारूनि मस्त केली । दुसर्‍या बैलजोडीशी लाविली । धावण्यासाठी ॥५३॥
जनलोकांचे लक्ष वेधले । त्यातचि मनोरंजन वाटले । पुढे शंकरपट सुरू झाले । गावोगावी ॥५४॥
त्यात काही उद्देश उत्तम असती । बैलांना खुराक देवोनि बनविती । स्पर्धेने वाढविती बैलांची शक्ति । शेतीसाठी ॥५५॥
पण त्यातूनि प्रकटे दुष्परिणाम । राहते मागे उत्तम काम । बैल पळविण्याचाहि हंगाम । पुढे येतो ॥५६॥
मग जो बैल पळेना । त्यास टोचती तुतारी-अणा । रक्ताळोनि दुखविती प्राणा । नंदीबैलाच्या ॥५७॥
राहिले शेतीभातीचे काम । शंकरपटाचाचि उद्दम । माणसे करिती कसाबकर्म । नानापरी ॥५८॥
सहजचि गाडी जुंपती । पुराणी हाती धरोनि टोचती । पळता पळेना तरी मारिती । निर्दयपणे ॥५९॥
गाव पडले त्याच प्रवाही । उत्तम नाद घेणेचि नाही । राक्षसी धंदे ग्रामी सर्वहि । वाढू लागती त्वरेने ॥६०॥
ऐसा धूमधडाका चालला । एकाने गावी तमाशाचि आणला । सारा रागरंग बदलला । मागीलपैकी ॥६१॥
जो तो लावणी मुखे उच्चारी । घरीदारी शेती मंदिरी । ज्याच्या त्याच्या तोंडी सारी । गाणी विषयांची ॥६२॥
तमाशाचे प्रस्थ वाढले । लहान मुलात संस्कार बिंबले । मुले तरुणहि नटू लागले । तमाशागिरापरी ॥६३॥
जो तो चांगभांग करी । मुद्रा सुरू झाली लाजरी । हावभाव शरीरावरी । नाचती घरी मुलेबाळे ॥६४॥
आईवडील कौतुक करिती । मुली मौज म्हणोनि हासती । कोणी ताटपाट बडविती । डफासारिखे आनंदे ॥६५॥
परंतु कोणी इकडे बघेना । काय होणार विंटबना । सारा गाव तमाशाच्या रंजना । राजी झाला ॥६६॥
” डुबती ” म्हणे ढोलक ओरडून । तुणतुणे म्हणे ” कोणकोण ” । मंजिरा सांगे ” सर्वजन ” । परि कोणा न कळे हे ॥६७॥
मग कूठले कथाकीर्तन । भजन वा साधूंचे प्रवचन । टिंगल करिती मार्गी तरुण । सदभावांची ॥६८॥
ज्याने गावी तमाशे आणले । त्याचे पुत्र नाचे निघाले । गावोगावी जाऊ लागले । तेथेहि झाले सुरू फड ॥६९॥
मुलींना मार्गी जायाची चोरी । मुले छळती निलाजरी । येणे जाणे वाढवूनि घरी । नेल्या काढून कित्येक ॥७०॥

मग पाटलासि पडला उजेड । अरे काय वाढले थोतांड ? माझ्या घरातहि शिरले बंड । तमाशाचे ॥७१॥
माझ्या भावाने तमाशा आणला । त्याचा तर वंशच बिघडला । मुलगी पळाली मुलगाहि गेला । घर दुसर्‍याचे बुडवोनि ॥७२॥
मग विचारी ज्याला त्याला । कैसे बंद करावे तमाशाला ? जो तो म्हणे तुम्हीच होऊ दिला । धिंगाणा या गावाचा ॥७३॥
कुस्ती व्यायामाच्या नादांत । गाव सुंदर आदर्श अदभुत । परि हे भलभलते छंद नेत । लया सगळया गावासि ॥७४॥
सुंदर होते मुलांचे खेळणे । बरे होते बैल तयार करणे । पण या पापाने औदासीन्य । आणले गावी ॥७५॥
आता भोगा त्याची सजा । सारीच मुले वाजविती वाजा । झाला तमाशाचाचि अगाजा । सर्व गावी उत्सवी ॥७६॥
या गावात जे जे येती । ते तमाशाचे रंगीच रंगले असती । ओघ न थांबवे पाटलाप्रति । कठीण झाले ॥७७॥
एकाने त्यात छंद आणला । दारू पिऊन फिरू लागला । तमाशाचे आनंदाचा लोकाला । कळस दिसे त्या ठायी ॥७८॥
हळुहळू तीच वाढली प्रथा । दारूबाजांचा जमला जत्था । काय पुसता गावाची व्यथा । आता तुम्ही ॥७९॥
कोणी दंढारी तमाशे करी । कोणी दारु पिऊन शिव्या उच्चारी । कोणी कोणा न माने तिळभरी । लहान थोर स्वैर झाले ॥८०॥
व्यभिचार्‍यांची झाली दाटी । गंजिफा खेळती पैशांसाठी । मुले करिती चोरीचपाटी । काढती भट्टी घरोघरी ॥८१॥
मांस खाण्याचे वाढले व्यसन । चैन न पडे मद्यावाचून । अनेक रोग मांसमद्यातून । वाढले गावी ॥८२॥
मुले तेल लावूनि बाल फिरविती । पान चावूनि कोठेहि थुंकती । सिगारेट ओढूनि धुर सोडिती । धाकचि नाही कोणाचा ॥८३॥
मजूर कष्टाने पैसा मिळविती । तोहि दारूपायी उधळती । मुलाबाळा उपवास पडती । होय दुर्गति जीवनाची ॥८४॥
दारू पिऊनि मारिती स्त्रीला । सगळया गावीच चळ सुटला । पूर आला भांडाभांडीला । कोर्टकचेर्‍या गजबजल्या ॥८५॥
लोळे गटारांत अमीरहि । कोणीहि कोणास मारूनि देई । मुलीबाळी सुरक्षित नाही । ऐसा प्रसंग ओढवला ॥८६॥
पैसाआडका नष्ट झाला । ऐसा गाव ” उन्नती ” स चढला ! सगळ्या गावाचाचि धिंगाणा केला । दारूबाजांनी ॥८७॥
गावाचा मुखंड दारू प्याला । म्हणोनि व्यसन लागले बहुतेकाला । मग सर्व गावचि लागला । गटारगंगेमार्गी ॥८८॥
तैसेचि आहे जुगाराचे । चोरीचे आणि व्यभिचाराचे । पहिले बिघडती मुखंड आमुचे । मग बिघडे गाव सारा ॥८९॥
आज जे जे लोकांचे बिघडले । ते तरी कुणाचे होते पाहिले । म्हणोनीच तैसे करू लागले । लोक सर्व ॥९०॥
स्वतः प्रथम त्याने आचरिले । मगचि लोकांना सांगितले । म्हणोनीच जनलोक रंगले । रंगी त्याच्या ॥९१॥
सर्व गावाचे वर्तन । कार्यकत्यावरचि जाण । कार्यकर्ते गावाचे प्राण । समजो आम्ही ॥९२॥
गावी चार भले वागती । तरीच गावा होय उत्तमगति । मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती । तरि सर्व गावचि तैसे ॥९३॥
गाव म्हणजे शुध्द आरसा । जे दाखवाल ते दिसेल सहसा । जे कराल ते करील खासा । गाव आमुचा ॥९४॥
मी जे प्रारंभी बोललो । बाग बघोनि प्रसन्न झालो । तैसाचि घरी वर्तू लागलो । ऐसे होते सकळाचे ॥९५॥
म्हणोनि मी आपणासि विनवितो । योग्य जो वाटे आदर्श तो तो । निर्माण करूनि ठेवता येतो । प्रभाव आपुल्या अंगी ॥९६॥
अस्थिपंजर फकीर तो आज । भूमिदानयज्ञाचा उठवी आवाज । तरि तीच लाट उसळली सहज । गावोगावी ॥९७॥
आपली झुगारूनि सुखचैन । किती लोक दान मागती फिरून । गरीब-अमीरहि स्वार्थ विसरून । देती भूदान उल्हासे ॥९८॥
पुढारी जे जे गावी करी । लोक तैसेचि वागती घरोघरी । म्हणोनि याची आहे जबाबदारी । मुखंडावरती ॥९९॥
तेव्हा काय करावे आपुल्या गावी । ती योजना आपण ठरवावी । तैसीच आपुली सर्व सुधारावी । टापटीप ॥१००॥

त्यात नेहमी सावध असावे । जे जे करणे असेल बरवे । ते दूरदृष्टीने शोधूनि पाहावे । तेव्हा घ्यावे कार्य हाती ॥१०१॥
नाहीतरि सहज केले । परि ते प्राणावरीच आले । सारे गावचि बिघडले । होईल ऐसे ॥१०२॥
म्हणोनि गावी तेच सुरू करावे । ज्याने गाव नांवलौकिक पावे । येरव्ही शिवेआतहि येऊ न द्यावे । विडंबनकार्य ॥१०३॥
कदाचित केले एखाद्याने । तेहि सहन करू नये कोणे । लावावी उधळोनि समंजसपणे । वाईट रीति ॥१०४॥
कारण जैसी संगती घडे । तैसे अनुभवा येई रोकडे । म्हणोनि सावध असावे मागेपुढे । उत्तम गुण वाढवाया ॥१०५॥
उत्तम खेळ उत्तम कार्य । उत्तम कला उत्तम सौंदर्य । गावास भूषण ज्याने होय । ते अगत्याने उचलावे ॥१०६॥
कोठे काही व्यसन घुसले । त्यास लगेच पाहिजे कमी केले । त्यासाठी गावचे मुखंड लागले । पाहिजेत पाठी ॥१०७॥
जरी काही नाराजी झाली । मुलेबाळे रुसू लागली । तरी पाहिजे समज घातली । वडीलधार्‍यांनी ॥१०८॥
सर्वामाजी उत्तम उपाय । ते वातावरणचि बदलूनि जाय । ऐशा नव्या छंदाची द्यावी सोय । कार्यकर्त्यांनी ॥१०९॥
कायकर्ता तोचि गावचा । ज्यास लोभचि नाही कोणचा । आमुचा गावचि मोक्ष, आमुचा । मानावा त्याने ॥११०॥
मग त्याचा आदर्श गाव पाही । सर्व गावचि सुधरोनि जाई । मुखंडावरीच गाव राही । तुकडया म्हणे ॥१११॥
इति श्री ग्रामगीत ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभवसंमत । निवेदिले ग्रामजीवनमर्म येथ । सहावा अध्याय संपूर्ण ॥११२॥

ग्रामगीता अध्याय सहावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥


॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading