आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ग्रामगीता अध्याय चाळीसावा – 40 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय |
|---|---|
| ग्रामगीता अध्याय चाळीसावा – 40 Gram Gita Chapter 40 ओवी संख्या :- १२६ | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 40
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय चाळीसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ४०
Gram Gita chapter Forty beginning
—-🕉ग्रामगीता अध्याय 40 ग्रंथाध्ययन
ग्रंथाध्ययन
श्रोता आनंदे करी प्रश्न । आपण सांगितले आदर्श जीवन । परंतु कथाकहाण्या आत्मज्ञान । इतर ग्रंथी ॥१॥
गावोगावी ग्रंथ लाविती । त्यांहूनि आपुली वेगळीच पोथी । आमुच्या उध्दारासाठी कोणती । निवडावी सांगा ॥२॥
गाव व्हावया वैकुंठपूर । काय कामी न येती ग्रंथ इतर ? कोणत्या उपाये होतील संस्कार । दृढ गावाचे ? ॥३॥
याचे उत्तर ऐका आता । वेगळी नोहे ग्रामगीता । येथे नाही अन्य सदग्रंथा । विरोध काही ॥४॥
सर्व उपनिषदादि गायी । दोहूनि केली गीतामाई । तैसेचि संतग्रंथ सर्वहि । साररूपे या ग्रंथी ॥५॥
सर्वाभूती भगवदभाव । हा संतश्रेष्ठांचा अनुभव । त्या तत्त्वाचीच उठाठेव । या ग्रामगीतेमाजी ॥६॥
गीतेचे विश्वरूपदर्शन । वेदाचे विराटपुरुष-वर्णन । संतांच्या विश्वात्मक देवाची खूण । लाभे येथे सक्रिय ॥७॥
अनेक ग्रंथांतील वर्णने । अनेक तीर्थांतील दर्शने । अनेक कथाकीर्तनांतील उदाहरणे । तीहि याचसाठी ॥८॥
लोक भुलले सहकार्य देणे । झाले स्वार्थांध विकृत जिणे । आपुल्यासाठी फजीत करणे । लोकासहि सुरू झाले ॥९॥
हे कोण्यारीती निघोनि जाय । याचाच शोध आणि उपाय । करावया महापुरुषांनी सोय । अनुभव घेवोनि लाविली ॥१०॥
वाट चालता त्यांच्या पाउली । बोल बोलता त्यांच्या बोली । जीवन-सफलता होय आपुली । सर्वतोपरी निश्चये ॥११॥
यासाठी ग्रंथ-पोथी वाचावी । जनता सगळी जागृत करावी । गावे संस्कारांनी भरावी । सहकार्याच्या या मार्गे ॥१२॥
मानवतेची जागवाया शिकवण । गावी असावे कथाकीर्तन । पोथीपुराणांचे वाचन । हेचि शिकविण्या गावासि ॥१३॥
नाना दृष्टांत कथा अनंत । सांगोनि मानवा करणे उन्नत । याचसाठी ग्रामगीतेचेहि गीत । गायिले आम्ही ॥१४॥
नको उगीच अवडंबर । आपुले जीवन करावे सुंदर । गावी फुलवावे सुखाचे अंकुर । हेचि कर्तव्य मानवाचे ॥१५॥
मनुष्य निरोगी सात्विक बनावा । त्यास व्यसनांचा उपद्रव नसावा । त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा । कोणासहि ॥१६॥
हेचि शिकणे असते पोथीतूनि । भजनातूनि कीर्तनातूनि । याचसाठी ही साधने योजूनि । ठेविली संती ॥१७॥
साधनात साधन-रचना । मुख्य दृष्टि राष्ट्रीय जाणा । साधूनि मानवतेच्या अनुसंधाना । जन लावावे सुमार्गी ॥१८॥
त्यासाठी तात्त्विकता दावावी । वरकड उपांगे समजावोनि द्यावी । आवश्यक ती साधने लावावी । आपुल्या गावी ग्रंथादि ॥१९॥
ग्रंथ ओवीबध्दचि असावे । हेहि म्हणणे सोडोनि द्यावे । सहज कळेल तेचि उत्तम समजावे । गद्यपद्य ॥२०॥
काही ग्रंथ ऐतिहासिक । काही चरित्रे, काही तात्त्विक । काही अभंग पुराणे सम्यक । पठणी ठेवावी ॥२१॥
उगीच भरले चमत्कार । पूजापातीचा डोंगर । जीवनाचे काहीच सार । नसेल ते काय कामी ? ॥२२॥
प्रसादासाठी पोथी लाविली । चमत्कार ऐकता वेळ गेली । आपुली बुध्दि गहाण पडली । ऐसे न व्हावे यापुढे ॥२३॥
रूपकात्मक पूर्वीचे ग्रंथ । जनसाधारण भुलले तेथ । काढू लागले उलटा अर्थ । विश्वास सहसा बसेना ॥२४॥
पदोपदी ऐसे उदाहरण । ग्रंथ वाचूनि बिघडे मन । अर्थ न लागता वेडावून । जाती जन भाविकहि ॥२५॥
मी हरिविजय ग्रंथ ऐकला । कथिले, नारद नारदी झाला । साठ पुत्र देवोनि गेला । एके रात्री ॥२६॥
ग्रंथ ऐकिला पांडवप्रताप । थोरथोरांचे कथिले पाप । व्यभिचाराचे लागले माप । आपोआप जेथे तेथे ॥२७॥
कुणाचा जन्म कानांतून । कोणी जन्मला तोंडांतून । कोणी झाला घागरीमधून । ऐसेहि ग्रंथी ऐकियले ॥२८॥
शिंपींतून कोणी जन्मास आला । कोणी जटेंतूनचि जन्मला । कोणी लघवी करिता उध्दरोनि गेला । शिवलिंगावरि ॥२९॥
कोणी प्रसाद टाकोनि जात । म्हणोनि नांव बुडे पाण्यात । प्रसाद घेताचि वरि येत । जैसीच्या तैसी ॥३०॥
कोणी पृथ्वी घेवोनि पळाला । सागराइतुकी लघवी कुणाला । कुणाच्या नाकी गर्दभ चरला । झोपी जाता ॥३१॥
ऐसे ग्रंथी चमत्कार । कान धरोनि सांगा अपार । परि मन न माने क्षणभर । काय करावे त्यालागी ? ॥३२॥
हे जरि ऐसेचि ठेविले । तरि अर्थ सांगणारे पाहिजेत भले । त्यांनी तर स्वर्गासहि नाचविले । दोन बोटांवरि ॥३३॥
म्हणती जनहो ! ऐसेचि आहे । येथे संशय धरूचि नये । नाहीतरि पाप निरय । भोगणे पडे सर्वासि ॥३४॥
मानव करावया आदर्श । हाचि काढिला निष्कर्ष । सर्व चमत्कारांचा सारांश । तो ग्रंथराज ठरविला ॥३५॥
जो ऐकेल भावना धरोनि । तयास स्वर्गमुक्ति लाभे क्षणी । ऐसे सांगोनि स्त्रीपुरुषजनी । समाज केला पांगळा ॥३६॥
विचारे संशयासि जागा वाढली । समाधान-वृत्ति भंगली । नाही कोणी समजावोनि दिली । रोचक रूपक वाणी ती ॥३७॥
पुराणिक म्हणती उगेचि ऐकावे । ” होय ” म्हणूनि नम्र व्हावे । तरीच जीवा उध्दार पावे । संशयात्मे विनाशती ॥३८॥
हे साधुसंतांनी जाणले । म्हणोनि विवेकग्रंथ निर्माण केले । त्यात हे संशयचि फेडले । बहुजन समाजाचे ॥३९॥
भाविक जनासि लावावया वळण । आकळावया सकळ ज्ञान । संतमहंतांनी उपकारऋण । केले असे आम्हावरि ॥४०॥
संस्कृतांतूनि काढूनि सार । सुलभ केले प्राकृत ग्रंथभांडार । जनसाधारणासीहि कळावे सविस्तर । उध्दार मार्ग म्हणोनिया ॥४१॥
पुरातन संस्कृत ऋषि-बोली । त्यातूनि बहुविध भाषा जन्मली । तैसीच मराठीहि वाढविली । संतकविराजे ॥४२॥
संत ज्ञानदेव मुकुंदराज । चक्रधर नाथादि हंसराज । यांनीच सुलभ केले सहज । ज्ञान प्राकृत ग्रंथांतरी ॥४३॥
समर्थ रामदासादि झाले । मुक्तेश्वर मोरोपंतादि भले । गीत अभंग गाथे लिहिले । महाराष्ट्र-ग्रंथकर्त्यांनी ॥४४॥
महाराष्ट्री संतकवि-परंपरा । तैसाचि चरित्रग्रंथांचा पसारा । वळणी लावावया समाज सारा । ग्रंथ लिहिले बहुतांनी ॥४५॥
स्वामी विवेकानंदादि संती । जुन्यानव्यांची वाराया भ्रांति । ज्ञानदीप उजळले आपुल्या ग्रंथी । नाना भाषांमधूनि ॥४६॥
त्या सर्वातूनि शोधूनि घ्यावे । जे तात्त्विक बोधग्रंथ स्वभावे । कर्मठतेच्या भरी न भरावे । अथवा शुष्क पांडित्याच्या ॥४७॥
आपली पात्रता ओळखोन । समाजाची पातळी लक्षून । आदर्शाचे सुलभ होय ज्ञान । ऐसेचि ग्रंथ वाचावे ॥४८॥
ग्रंथ वाचताहि तारतम्य ठेवावे । कोणत्या ग्रंथांतून काय घ्यावे । काय सोडावे काय आचरावे । उन्नतीसाठी आपुल्या ॥४९॥
बोलके ज्ञान सांगण्यासाठी । ग्रंथ वाचले उठाउठी । तेणे आत्मघात होतो शेवटी । शांति तिळभरि लाभेना ॥५०॥
सखोल अध्यात्माचे ग्रंथ । त्यासाठी बुध्दीहि पाहिजे समर्थ । आणि उमगला पाहिजे कर्तव्यपथ । अर्जुनापरी ॥५१॥
एरव्ही हजारो ग्रंथ वाचले । त्यातील मर्मचि नाही कळले । तरि ते वाचणे वाउगेचि गेले । वेडयापरी ॥५२॥
वेडा बोलूनि फार गेला । परि त्याचा अर्थचि नाही उमगला । म्हणोनीच तो वेडा ठरला । लोकामाजी ॥५३॥
बोलेल जे काही वाचेने । तारतम्य ठेवोनि विवेकाने । वर्तेल तैसाचि जीवेप्राणे । त्यासचि म्हणती मानव ॥५४॥
जो फार बोलूनि जातो । परि एकावरि न निश्चित राहतो । त्यासचि वेडा आम्ही म्हणतो । आपुल्या विचारे ॥५५॥
लोकी हाचि घुसला वेडेपणा । त्याने धर्माचा केला धिंगाणा । माणूस दिसला भाविक शहाणा । तरी तो पाहता वेडाचि ॥५६॥
मज भेटला ऐसा एक सज्जन । म्हणे ऐकाल काय माझे कथन ? मी केले ग्रंथवाचन । बारा वर्षे ज्ञानात्मक ॥५७॥
ब्रह्मसूत्रे उपनिषदे पुराण । वाचले भागवत अध्यात्मरामायण । तरीहि ब्रह्मज्योतीसि अजून । देखिले नाही ॥५८॥
आता किती पारायणे करावी । जेणे कळेल ब्रह्मचवी ? सांगाल काय खूण बरवी । विशद करोनिया ? ॥५९॥
मी तयाशी विनोद केला । म्हणालो, कसे पावाल परमार्थाला ! त्यासाठी पाहिजे खल केला । सदग्रंथांचा ॥६०॥
ग्रंथ टाकावे बारीक खलून । चूर्ण सकाळी घ्यावे दुधांतून । अथवा पाण्याचेहि अनुपान । चालेल शिळया ॥६१॥
त्या गृहस्थाने घरी जाऊन । ग्रंथ फाडले दणादण । खल घातला चूर्णप्रमाण । बाह्यबुध्दि तयाची ॥६२॥
सकाळी येवोनि विचारी । किती दिवस प्यावे तरी ? सांगाल काय कैशापरी । घेत जावे घोळूनि हे ? ॥६३॥
मी म्हणालो, वारे बुध्दि ! अंधानुकरणा धावे आधी । तारतम्य नसता सांगा कधी । अनुभव येईल वाचका ? ॥६४॥
अरे ! तुज हेहि नाही कळले । ग्रंथ फाडोनि चूर्ण केले । याने का ज्ञान अनुभवले । जाईल बाबा ? ॥६५॥
तो म्हणाला, आम्हासि काय ? कोणी सांगेल तैसा करावा उपाय । ऐसीच पारायणे केली, सवय । रोज रोज लावूनिया ॥६६॥
कळले नाही ब्रह्मसूत्र । उपनिषद पंचीकरण विचारसागर । वाचले मुखे भराभर । सविस्तर टीकाग्रंथ ॥६७॥
आता कुठवरि पाठ करावे ? मने धरिले आपणास विचारावे । शंका धरोनि आलो जीवे । आपणापाशी ॥६८॥
आपण सांगितले चूर्ण करा । तैसेचि केले जाऊनि घरा । आलो पुढलिया विचारा । घेण्यासाठी ॥६९॥
कुणीकडे तोंड करावे पिण्यात ? सांगाल तैसे घेऊ सतत । मी म्हणालो, वारे श्रध्दावंत ! अंधानुकरणी लोक हे ! ॥७०॥
बाबा ! मीच खरा चुकलो । तुझ्याशी विनोद करोनि ठकलो । पाहावयासि होतो लागलो । बुध्दि तुझी ॥७१॥
एवढे ग्रंथराज वाचोन । किती आले तारतम्यज्ञान । याचे समजले मज धोरण । तुझ्या कृतीवरोनि ॥७२॥
कर्मठ अंधानुकरणी बुध्दि । त्यासि ब्रह्मज्ञान नको आधी । शुध्दता अंतर्मुखता साधी । लागेना अवधि तया मग ॥७३॥
म्हणोनि सांगतो खरे ऐक । ग्रंथी वाचावे चारित्र्य सम्यक । राहणी कळेल ज्यात उदबोधक । रोजच्या व्यवहाराची ॥७४॥
कधी उठावे कधी झोपावे । कैसे स्नान, ध्यान करावे । कोणते कर्म आचरावे । पुण्यश्लोक व्हावया ॥७५॥
कोणत्या भावे उद्योग करावा । कोणाचा उपदेश ऐकावा । किती घ्यावा किती सोडावा । विचार-बळे ॥७६॥
हेचि पठन आधी करावे । मग कर्तव्य-तत्पर व्हावे । पुढे पुढे अनुभवीत जावे । ज्ञान-पुढील मार्गाचे ॥७७॥
ऐसे अनुक्रमे ग्रंथ वाचावे । तरीच ज्ञान संपादावे । एरव्ही पारायणे करीत मरावे । काय होते तयाने ? ॥७८॥
शास्त्रप्रचीति गुरुप्रचीति । मगचि होते आत्मप्रचीति । या म्हणण्यासीच आहे निश्चिती । अनुभवाअंती ॥७९॥
संती कथिले शास्त्रपठन । ते सदग्रंथांसि उद्देशून । परि अधिकारपरत्वेचि वाचन । सफल जीवन करीतसे ॥८०॥
एरव्ही ग्रंथभांडार बहुत । नाना विद्वानांचे बहु मत । कोणते निवडावे समजोनि त्यात । आपणासाठी ? ॥८१॥
नाना अधिकारांचे नाना ग्रंथ । अधिकारपरत्वे असती संमत । आपला कोणता मार्ग त्यात । निवडोनि घ्यावा ? ॥८२॥
हे तो समजणे आपल्या आधीन । कळावी अधिकारपात्रता पूर्ण । हेहि समजण्याचे ज्ञान । ग्रंथीच आहे दाविले ॥८३॥
मूर्ख पढतमूर्ख विवेकी शुध्द । बध्द मुमुक्षू साधक सिध्द । ग्रंथीच दाविला पात्रता-भेद । उन्नतिमार्गासहित ॥८४॥
आपणासि कोण रोग जडला । निश्चित कळावा ज्याचा त्याला । त्याचि रोगाचा उपाय केला । पाहिजे आधी ॥८५॥
परि जो आपणासि ओळखू नेणे । त्यासि सहाय्य लागे देणे । त्यासाठी पाहिजे साक्ष घेणे । संतसज्जनांची ॥८६॥
नाहीतरि ग्रंथी सर्वचि विषय । कोणी उपाय कोणी अपाय । अवस्थाभेदे हे सर्व होय । साधक-बाधक ॥८७॥
यासाठी हवी सत-संगति । ज्यासि नाही सूक्ष्म मति । कुणी आपुल्याच विचारे चढती । आत्मानुभूति पावावया ॥८८॥
कोणी संस्कारचि घेवोनि आला । कोणी येथे शिकोनि रंगला । कोणास काहीच न कळे बोध भला । संतानुभवाचा ॥८९॥
म्हणोनि ग्रंथ वाचावे त्याने । मन लावोनि अर्थ समजणे । हे अनुभवियांकडोनि निवडणे । आपुल्यासाठी ॥९०॥
ग्रंथांचे भरले महाभांडार । त्यातूनि निवडती निवडणार । सार तेवढे देती साधकांसमोर । संतसज्जन ॥९१॥
मुळात सारचि संतांची वाणी । जनासि तारी मार्ग दावूनि । ग्रंथ ही शब्दमूर्तीच ज्ञान-खाणी । दिव्य संतांची ॥९२॥
परि तयांचा लाविता अर्थ । सामान्य बुध्दि पडे भ्रमांत । काल बदलोनि होतो अनर्थ । तारतम्य न कळता ॥९३॥
यासाठी देशकालानुसार । ग्रंथांचे उकलोनि दावावे अंतर । ऐसा असतो अधिकार । पुढील संतांचा ॥९४॥
साधुसंत अनुभवाचे सागर । त्यांना कळतो पुढील व्यवहार । जीवांचा कैसा होय उध्दार । काय करावे त्यालागी ॥९५॥
कोणास काय साधन द्यावे । हे त्यासीच कळे स्वभावे । म्हणोनि गुरुप्रचीतीस घ्यावे । बोललो आम्ही ॥९६॥
कोणते ग्रंथ कोणी वाचावे । संती कथियले ते बरवे । सदाचार नित्यनेम घ्यावे । वाचोनि आधी ॥९७॥
झोपावे उठावे ठरल्या वेळी । आपुली कामे करावी सगळी । कोणा दु:ख न व्हावे भूमंडळी । आपणासाठी ॥९८॥
आपुले कर्म संपवोनि सगळे । जो दुसर्याच्या सेवेसि वळे । तोचि चढे कार्य-बळे । लौकिकासि आणि उन्नतीसि ॥९९॥
ऐसे विचार जया ग्रंथी । तेचि प्रथम वाचावी पोथी । ठेवोनि लक्ष मुख्य अर्थी । जीवा उन्नतिपदा न्याया ॥१००॥
जयास व्यवहार समजला पूर्ण । सक्रिय कळले साधनाज्ञान । तेणेच ब्रह्म कोण आत्मा कोण । समजावे हे ग्रंथपठनी ॥१०१॥
समजोनि घ्यावे पंचीकरण । आत्मअनात्म ब्रह्मविवरण । कळल्यावरि नेघे मन । मिथ्याभ्रांतिविषयी आशा ॥१०२॥
मगचि खरे श्रवण मनन । निदिध्यास वाढेल मनापासून । तेणे साक्षात्काराची खूण । कळेल ठायी आपुल्या ॥१०३॥
साक्षात्कार ब्रम्हज्योति । होईल आत्मानंदाची प्राप्ति । आत्मरंगे विलीन वृत्ति । ब्रह्मामाजी होतसे ॥१०४॥
जयाची दृष्टि ऊर्ध्व झाली । विषयातूनि उन्मनीत गेली । त्याची समाधि सुखे डोलली । अखंडाकार ॥१०५॥
देवभक्त नाही दुजे । कळले अनुभवाने सहजे । विश्वी विश्वाकार होइजे । ऐसे झाले मग तेथे ॥१०६॥
ग्रंथवाक्याने वृत्ति चढली । गुरुबोधाने अनुभवी वळली । आत्मरुचीने तदाकार झाली । अखंड जैसी ॥१०७॥
मग कशाचे ग्रंथवाचन ? जे जे करील तेचि समाधान । जे बोलेल तेचि ग्रंथज्ञान । होईल स्वये ॥१०८॥
हर्ष नाही जन्म घेता । दु:ख नाही मृत्यु होता । अंगी बाणे स्थितप्रज्ञता । कैवल्यरूप तयाच्या ॥१०९॥
याचि पूर्ण सुखासाठी । ग्रंथ वाचणे उठाउठी । जीवनाची पूर्णता शेवटी । यातचि आहे ॥११०॥
ही आत्मप्रचीति पावावयासि । हाचि मार्ग आहे साधकासि । प्रथम सदग्रंथ-अवलोकनासि । केले पाहिजे ॥१११॥
एरव्ही जो पूर्वीच उमगला । त्यास नकोचि हा गलबला । तो सरळचि आत्मप्रचीतीसि गेला । समाधाने ॥११२॥
आत्मप्रचीति म्हणजे दिव्यदृष्टि । ज्यात व्यष्टि, समष्टि आणि परमेष्टि । आपणचि अनुभवतो उठाउठी । अगणित रूपे एकपणे ॥११३॥
असो देव, संत, मानव । पापी, पुण्यवान सर्व । मूळरूपाचा घेता अनुभव । चैतन्यघन विश्वचि ॥११४॥
ऐसा अनुभव ज्याने घेतला । तो विश्वाच्या उपयोगा आला । त्याचा व्यवहार व्यापक झाला । सकळासाठी ॥११५॥
याचि भावे जनसाधारणासि । ग्रंथ द्यावेत वाचावयासि । त्यानेच लागेल मार्ग त्यासि । विश्वरूप-दर्शनाचा ॥११६॥
परंतु ज्यासि व्यवहारपात्रता नाही । त्यांनी करावी अध्यात्म-घाई । हे तो होईल अनाठायी । ग्रंथपठन एकांगी ॥११७॥
शुध्दाचरण मागाहूनि वाचले । पहिले वेदान्तपठन केले । वळणीचे पाणी वरि चढविले । होईल ऐसे ॥११८॥
शब्दे म्हणतील ” सर्व ब्रह्म ” । मना आले ते करितील कर्म । नास्तिकतेहूनि महाभ्रम । माजेल लोकी शब्दज्ञाने ॥११९॥
गावी दु:खांची पेटली आग । तो म्हणेल ” सच्चिदानंद जग ” । हे सर्व बहुरूप्याचे सोंग । वाटेल जना वेडयापरी ॥१२०॥
यास्तव गाव होईल शुध्द । प्रेम, ज्ञान, सत्य आनंद । सर्वास लाभेल ऐसे सुबुध्द । ग्रंथ गावी लावावे ॥१२१॥ .
होईल जीवनाची उन्नति । ज्ञानविज्ञानाची प्रगति । ऐसीच असावी ग्रंथसंपत्ति । गावोगावी ॥१२२॥
सर्वास कळावे कर्तव्य आपुले । कैसे होईल सर्वाचे भले । तनमनधने फळेफुले । विश्व हे कैसे, कळावे ॥१२३॥
आम्ही रहिवासी सर्वचि मुळचे । विश्वरचाना हे नाटक आमुचे । आपुल्या परीने रंगविणे साचे । आहे आम्हा ॥१२४॥
ऐसे जाणोनि स्वरूपासि । वर्ते तो जिंकी या खेळासि । तुकडया म्हणे हेचि कळावयासि । कथिली असे ग्रामगीता ॥१२५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । ग्रंथपठनाचा कथिला भावार्थ । चाळिसावा अध्याय संपूर्ण ॥१२६॥
ग्रामगीता अध्याय चाळीसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.



















