ग्रामगीता अध्याय एकतिसावा- 31 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्याय एकतिसावा – 31
Gram Gita Chapter 31
ओवी संख्या :- १०८
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 31

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय एकतिसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ३१
Gram Gita chapter thirty-one begins

ग्रामगीता अध्याय 31 संत-चमत्कार

संत-चमत्कार
ईश्वर-भजनाचा करिता प्रचार । होईल आमुचा उध्दार । परंतु जगासि ताराया अपार । सामर्थ्य पाहिजे अंगी ते ॥१॥
ते कार्य संतचि करू जाणे । जे देवचि झाले जीवेप्राणे । येरा गबाळांनी केली भजने । तरी काय होते ? ॥२॥
रामनामे तरले पाषाण । परि ते लिहिणारेहि तैसेचि पूर्ण । इतरांनी खडा टाकताहि बुडोन । जाईल आता ॥३॥
निर्जीव चालविली भिंत । केले सोन्याचे पर्वत । विषासहि बनविले अमृत । तेचि खरे शक्तिशाली ॥४॥
रेडयामुखी वदविले वेद । डोही कोरडे ठेविले कागद । ऐसे थोर संत प्रसिध्द । विश्व-तारक ॥५॥
तेचि आपुल्या भजने वचने । जगासि उध्दरितील दयेने । आमुच्या भजनाचे तुणतुणे । फुकेच सारे ॥६॥
संत मायबाप कृपाळ । ” आपणासारिखे करिती तत्काळ ” । कृपा करिता न लागे वेळ । पतितहि तरावया ॥७॥
त्यांचा मंत्र पडता कानी । होय पातकांची हानि । जडजीवहि जाती उध्दरोनि । अन्य भजनी हे करू न शके ॥८॥
ऐसा श्रोतियाचा विचार । म्हणे संत करितील चमत्कार । तरीच तरेल हा संसार । साधन येर वाउगे ॥९॥
याचे उत्तर ऐका श्रोते ? संत जरि चमत्कारे तारिते । तरि कोणीच न उरते । आजवरि बध्द जनी ॥१०॥
कारण संत अपार झाले । ज्यांची देशावरीहि सत्ता चाले । त्या संतांसि सर्वचि आपुले । का न तारिले दयेने ? ॥११॥
संतांसि ” सर्वाचेंच बरे व्हावे ” । ऐसे वाटे जीवेभावे । परि ज्यांनी कर्तव्य करावे । तेचि होती अधिकारी ॥१२॥
जनी कर्तव्य न करिता । संत लाभ न देती आइता । नुसता त्यांचा मंत्र घेता । मोक्ष होतो म्हणू नये ॥१३॥
संत आपणासारिखे करिती । परिसे सोने केले लोहाप्रति । परंतु खापर सोने नोहे निश्चिती । जाणावे हे तारतम्य ॥१४॥
उध्दार करणे हे संतांचे कर्म । परि त्यात आहे निराळे वर्म । समजोनि घ्यावा शिष्यधर्म । कोणता आपुला ॥१५॥
संत जे ज्या कोणा सांगती । तैसेचि जरि ते जन वागती । त्यांचाचि उध्दार होतो जगती । ऐसे आहे ॥१६॥
उध्दार संत न करिती । मार्ग सांगती जनाप्रति । त्यांच्या बोधवचने प्रगति । केली पाहिजे साधके ॥१७॥
चोरासि वाटे चतुर निघावे । विषयी म्हणे शौकीन व्हावे । तैसे साधूसि वाटे सज्जन बनावे । लोक आपुले ॥१८॥
सर्वचि करिती आपुला प्रचार । तैसाचि साधूचा व्यवहार । कोणता उत्तम कोण अपवित्र । मार्ग जाणावा साधके ॥१९॥
मागे कोणत्या मार्गे जन गेले ? कोणाच्या प्रचारे कल्याण झाले ? कोणे जीवनासि पुढारिले । कीर्तिरूपे ? ॥२०॥


एक गेला जुगारापायी । एक मेला बुडोनि विषयी । एक झाला चोर अन्यायी । गावगुंड ॥२१॥
एक संतापाशी गेला । तोच सन्मार्गी लागोनि तरला । तयाचा उत्तम प्रचार झाला । सर्व लोकी ॥२२॥
ऐसी आहे संतांची संगति । आपण ऐकिल्या होते गति । पण कर्तव्य केल्यासचि उन्नति । दिसो लागे ॥२३॥
संत म्हणती सत्य बोलावे । आपण नेमके खोटे करावे । बोल शेवटी संतांवरि ठेवावे । कोण्या न्यायाने ? ॥२४॥
संतांनी सांगावे दुर्गुण सोडा । आपण पापांनी भरावा गाडा । कासया सांगावा संत-पोवाडा । ” उध्दार होतो ” म्हणोनि ? ॥२५॥
ज्याने संतवचन पाळावे । आपुले दुर्गुण आवरावे । त्यानेच कृपापात्र व्हावे । संताठायी ॥२६॥
कृपा हा संतांचा स्वभाव । वेगळी नाही कृपेची ठेव । करावयासि देवघेव । प्रयत्नाविण ॥२७॥
एकचि आहे विशेष खूण । संतांच्या वाणीत प्रेमळपण । मनासि लागे आकर्षण । सत्कर्माचे ॥२८॥
त्यांची वागणूक पाहोन । प्रसन्न होते पाहणाराचे मन । तैसेचि कर्म करावे आपण । वाटे लोका ॥२९॥
परि ज्याचे वाईट संस्कार । वृत्ति असे बहिरंग फार । त्यासि बोध होणे अति दुर्धर । समजा लोकी ॥३०॥
वृत्ति उत्तम कार्यी वळे । त्यावरि संताचा बोध मिळे । निश्चय होता भाग्य उजळे । थोरपणाने ॥३१॥
मनुष्य दु:खाने होरपळला । विचारे वैराग्यभावी वळला । त्यावरि गुरुचा बोध उजळला । मार्ग कळला भाग्याचा ॥३२॥
कोणी समजोनि पाऊल टाकले । आपुले सत्कर्मातचि आहे भले । त्याने संतांचे चरण धरिले । तेहि तरले भाग्यशाली ॥३३॥
ऐसे ज्याने साधन केले । संतवचनासि प्रतिपाळिले । त्याचे कौतुक कितीहि वानिले । तरी ते अपुरे ॥३४॥
संताचा शुध्द संकल्प । त्यासि कळला प्रगटला दीप । धरोनि निश्चायाचा प्रताप । उन्नत झाला सतशिष्य ॥३५॥
शेतीची जमीन झाली उत्तम । त्यावरि बी पडले सक्षम । वाढले कुटुंबियांचेहि प्रेम । वाढता पीक ॥३६॥
तैसेचि साधकाचे होते । प्रथम शुध्दाचरण शुध्दचित्ते । वरि संतबोध होता तेथे । पीक वाढे भक्तीचे ॥३७॥
ऐसे ज्याने सिंचन केले । अंकुर फुटले वाढो लागले । अनुभवाचे फळ आले । संतकृपाकटाक्षे ॥३८॥
परंतु ऐसी सांडोनि रीति । उगीच बुवांच्या पाया पडती । त्यानेच सर्व होते समजती । अंतरी लोक आपुल्या ॥३९॥
पाया पडल्याने सर्व होते । मग काम कासया करावे ते ? पोटासि मिळेल आइते । मोक्ष लाभेल बुवापायी ॥४०॥
चुकीची ही धारणा अति । ऐसी नव्हती याची रीति । नम्र व्हावे सर्वाभूती । ऐसा सिध्दान्त आहे याचा ॥४१॥
सर्वानी सर्वासि नम्र व्हावे । आपले हितगुज विचारावे । थोरांनी लहानांसि सांगावे । कर्तव्य म्हणोनि ॥४२॥
परि लाखो लोकांनी पायावरि पडावे । थोर सांगती ते न करावे । हे अजबचि घेतले स्वभावे । भाविकांच्या ॥४३॥
ही प्रथाचि बंद करावी । श्रवणी रुचि वाढवावी । मनन करोनि आचरावी । वाणी संता-थोरांची ॥४४॥
यानेच संतपण वाढ घेई । संतसंगे संतचि होई । परि ” संत ” म्हणता संसार सोडूनि जाई । ऐसे नव्हे ॥४५॥
संसारी असोनि संत असती । व्यवहारी राहोनि आदर्श होती । बुवा न म्हणविताहि अधिकार ठेविती । सदगुरुचा ॥४६॥
ऐसे आहे संतपण । ते मिळे सत्संगे करोनि साधन । नसे अंगी विचित्रपण । कोणतेहि तयाच्या ॥४७॥
पावडीमाजी पाय ठेविता । दावा म्हणे ब्रह्मसत्ता । त्या जयत्पालराजासि तारिले तत्त्वता । शेवटी ग्रंथचि बोधूनि ॥४८॥
करोनिया चमत्कार । संत न करिती उध्दार । हाचि मनी राखा निर्धार । बोधचि सार तयांचा ॥४९॥
चमत्काराच्या भरी भरोनि । झाली अनेकांची धुळधाणी । संतचमत्कार यापुढे कोणी । नका वर्णू सज्जन हो ! ॥५०॥


यावरि श्रोता प्रश्न करी । काय संत नव्हती चमत्कारी ? आम्ही प्रत्यक्ष पाहिले तरी । का न लोका सांगावे ? ॥५१॥
एकाने नालीतील घाण फेकली । ती अत्तरसुगंधे घमघमाटली । एकाने मुठीमधूनि काढिली । खडीसाखर प्रत्यक्ष ॥५२॥
एकाने कटोरीतूनि पंगती वाढल्या । श्रोतियानेत्री धारा काढल्या एकाने घडयाळीच बंद केल्या । सर्व गावाच्या ॥५३॥
मित्रा ! त्वा पाहिले साच । परि हा आभास मिथ्याच । संताचे हे लक्षण नव्हेच । कोणत्याहि, कदाकाळी ॥५४॥
हे सर्व संतांघरचे क्षुद्र खेळ । कोणी मानितील यास सबळ । तरि ते मुकतील प्रांजळ । सेवाव्रत महत्त्वाचे ॥५५॥
लटिके अदृश्य ते आणावे । काही लोकास जेवू घालावे । आणि आणिले तेथे खळगे पाडावे । हे दिसे त्या नवल कैसे ? ॥५६॥
कोणी कीर्तिस्तव दान करी । पैसे मिळवोनि काळयाबाजारी । तैसे दुसरीकडोनि आणोनि भरी । वस्तु अदृश्य ॥५७॥
एकाचे खिसे कापावे । दुसर्‍यास म्हणे दान घ्यावे । तैसेच चमत्कारलाघव आघवे । समजावे हे ॥५८॥
कोणी गुरुची सेवा करी । जीवन वाही चमत्कारावरि । अडक्याचे साधन साधूनि झुगारी । आयुष्यरत्न ॥५९॥
पैसा देवोनि नांवेतूनि जावे । तेथे तपाने पाण्यावरि चालावे । शेवटी अहंकारे भ्रष्ट व्हावे । यात थोरवी कशाची ? ॥६०॥
परि हे जनासि कळेना । संतांपासूनि इच्छा नाना । करिती देवोनि दानदक्षिणा । लोभासाठी ॥६१॥
लोकांचिया या ओळखोनि भावा । अनेक दांभिक येती गावा । लुटती जनासि ढोंगी बुवा । मागे लावोनिया ॥६२॥
ही बुवाबाजी भुलवी जना । भ्रष्ट करी ग्रामजीवना । फसवोनि भोळया-बापडयांना । भलत्या छंदा लाविती ॥६३॥
काही देती शेतीधन । मग पाहती मागे फिरोन । हे तव आहे वेडेपण । आपुल्या स्वार्थांधतेचे ॥६४॥
काही वर्गणी करोनि गोळा । गावी करिती भक्ति-सोहळा । भिकारी करोनि स्त्रियाबाळा । ठेविती कोणी ॥६५॥
प्रयत्नांचा मार्ग सोडिती । अल्पायासे लाभ इच्छिती । चमत्कारांच्या थापेत जाती । गारूडियांच्या ॥६६॥
लोक चमत्कारावरि भुलती । मागाहूनि पश्चात्ताप करिती । काही भुरळ पाडली म्हणती । आम्हावरि ॥६७॥
वास्तविक संत नव्हे जादुगार । करावया चमत्कार । हा तो चालत आहे व्यवहार । पोटभर्‍यांचा ॥६८॥
चमत्कार तेथे नमस्कार । तेणे जादुगिरीस चढे पूर । खर्‍या संतांस ओळखीना नर । चमत्काराअभावी ॥६९॥
याच भ्रांतीने भुलोनि । ” संत आले गावी भुवनी । परि पाप न गेले धुवोनि ” । म्हणती जन यापरी ॥७०॥


कोणी म्हणती घेतले दर्शन । परि न झाले रोग-निवारण । कोणी म्हणती नाही संतान । दिले संतांनी आम्हासि ॥७१॥
कोणी म्हणती मंत्र घेतला । परि उध्दारचि नाही झाला । दु:खचि जाळी अजूनि मनाला । अहोरात्र आमुच्या ॥७२॥
कोणी म्हणती घेतले दर्शन । परि नाही मिळाले आम्हा धन । कोणी म्हणती नोकरी लावून । द्यावी संती आम्हासि ॥७३॥
कोणी म्हणती मुलगी वाढली । संताने सोयरीक नाही जुळवली । कोणी म्हणती गेलो पायवणी घेतली । परि ताप न गेला आमुचा ॥७४ll
कोणी म्हणती गेलो दर्शनासि । परि आठ दिवसांचा आहे उपाशी । सट्टा नाही दिला आम्हासि । साधुसंताने एकहि ॥७५॥
कोणी म्हणे दर्शन घेतले । परि चोर तुरुंगांतूनि नाही सुटले । चोरी केली म्हणोनि काय झाले । दर्शन घेता मुक्त व्हावे ॥७६॥
कोणी म्हणती संत घरी आले । आमुचे पाहिजे भाग्य उघडले । कर्तव्य न करिताहि राज्य भेटले । पाहिजे आम्हा ॥७७॥
कर्तव्य करिता सर्व होते । मग संतदर्शन काय करावे ते ? संताने कर्महीनासि द्यावे आइते । आणूनिया ॥७८॥
तुम्ही म्हणता संत दयाळ । आमुचे वेडे झाले बाळ । त्याने कृपा करोनि तत्काळ । बरे करावे ॥७९॥
आम्ही जरी असलो पापी । त्याने संकल्प करावा सुखरूपी । आम्हास न कळता उपदव्यापी । मिटवाव्या तेणे ॥८०॥
संताने मंत्र देताक्षणी । आम्हासि न्यावे उध्दरोनि । पाहू नये अधिकार पडताळोनि । आमुचा त्याने ॥८१॥
तरीच त्यास संत म्हणावे । नाहीतरि त्या ढोंगी गणावे । आम्ही बोलतो हे चूक मानावे । कोण्या कारणे ? ॥८२॥
ऐसे जनाचे म्हणणे चाले । परि सांगा ऐसे कोठे झाले ? कोणत्या संताने केले । सुखी समृध्द सर्वालागी ? ॥८३॥
याचा विचार न करिती । चमत्कारासाठी मरमरती । काय संतांपाशी आहे भेदवृत्ति । इतरा शांति न द्याया ? ॥८४॥
साधुसंतचि मूल देती । तरि का वांझ जगी राहती ? संत धनवैभव अर्पिती । तरि भिकारी न दिसावे ॥८५॥
संत बिमारी बसविती । मग बुवांचेहि का प्राण जाती ? जगी कोणीच ना मरती । ऐसे का होऊ नये ? ॥८६॥


संतांचा मंत्र कानी पडे । उघडती मोक्षाची कवाडे । मग ऐसे का न घडे । सर्व लोकी सर्रास ? ॥८७॥
त्यांच्या संकल्पेचि सर्व होते । तरि दु:खी कोणीहि न राहते । काय तुम्हाविषयीच दुजाभाव ते । करिते काही ? ॥८८॥
जरि म्हणाला आमुच्या नशिबी नाही । तरि प्रारब्धचि प्रधान होई । मग संतचमत्काराची राही । महिमा कोठे ? ॥८९॥
संत आपुल्यापरी झटोनि । सौख्य देती सर्वजनी । सफलता त्यांच्या कार्यी बहुगुणी । परि तो नव्हे चमत्कार ॥९०॥
संतांच्या शुध्द हृदयातूनि । अनुभवा येई निघाली वाणी । परि त्याचीहि कल्पना त्यांनी । केली नाही चमत्कारे ॥९१॥
मुंगीसि हत्तीचे ओझे जैसे । वाटे नवलाचे भलतिसे । परि ते सहज घडे शक्तिविकासे । संतकार्य तैसे वाटे जना ॥९२॥
त्यासि चमत्कार मानलिया । लोक विसरती कर्तव्यपाया । भजो लागती सकामपणे तया । आंधळया भावे निष्क्रिय ॥९३॥
म्हणोनि महत्त्व नको चमत्कारा । शोधावी सत्कार्य-परंपरा । ज्ञान आणि कार्यस्फूर्तीचा झरा । घ्यावा संत-जीवनातूनि ॥९४॥
वस्तुत: मार्गदर्शनचि कार्य संतांचे । पुत्रधन देणे नव्हे साचे । बिमारी बसविणे हे वैद्याचे । काम आहे सर्वथा ॥९५॥
संत अज्ञानरोगाचे वैद्य । जीवनविकासाचे सर्वाद्य । शुध्द कर्मांनी असती वंद्य । तिन्ही लोकी ॥९६॥
त्यांचा एकचि चमत्कार । अल्पज्ञ जीव केला । विश्वाकार । सर्वाभूती देखिला ईश्वर । ठायी ठीयी याच डोळा ॥९७॥
त्यांचे तेवढे करणे जाणणे । या चमत्कारापुढे आकाश ठेंगणे । तेथे कोण पुसतो तुणतुणे । क्षुद्र सिध्दीचे वाजताहि ॥९८॥
संत सेवेचे अवतार । सर्वाभूती नम्र, सत्य व्यवहार । तयासि देवहि मानी थोर । अन्य चमत्कार कासया ? ॥९९॥
साधूचा सरळ प्रेमळपणा । हा या जगी चमत्कारचि जाणा । त्याने ” अन्यहि मीच ” म्हणावे आपणा । हा चमत्कार केवढा ! ॥१००॥
अहो ! सर्वात मोठा चमत्कार । तो मानी ” विश्वचि माझे घर ” । त्यासाठी कष्टतो अहोरात्र । जीवे फार उल्हासे ॥१०१॥
उणे दिसे ते पूर्ण करी । जगाचा तोल बोधे सावरी । परंतु केल्याचा स्पर्शचि नसे अंतरी । चमत्कारी संत ऐसे ॥१०२॥
मात्र संतचि सर्व काही करी । आणि कर्तव्यचि नाही माणसावरि । ऐसी संतांची एकांगी थोरी । गाती ते नोहे उचित ॥१०३॥
ऐसे गावी होऊ न द्यावे । जनासि सत्य ज्ञान कळावे । खर्‍या संतांसि ओळखावे । कर्तव्यासाठी ॥१०४॥
संतांचे विचित्र व्यवहार । तैसेचि त्यांचे चमत्कार । हे वगळोनि दावावा सत्य सार । ग्रामीण जनासि ॥१०५॥
आपुला आपण उध्दार करावा । संतदेवांचा सहारा घ्यावा । हाचि संतग्रंथांचा गवगवा । चित्ती धरावा सर्वानी ॥१०६॥
यातचि गावाचे कल्याण । निघोनि जाईल दुबळेपण । कर्तव्य आपुले जाणतील जन । तुकडया म्हणे करा ऐसे ॥१०७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । संत-सामर्थ्य कथिले येथ । एकतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥

ग्रामगीता अध्याय एकतिसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading