ग्रामगीता अध्याय एकोणचाळीसावा – 39 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्याय एकोणचाळीसावा – 39
Gram Gita Chapter 39
ओवी संख्या :- १३५
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 39

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय एकोणचाळीसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ३९

—-🕉ग्रामगीता अध्याय 39 भूवैकुण्ठ


भूवैकुण्ठ
सर्व जनांचे समाधान । याहूनि स्वर्ग नाही महान । नांदती द्वेष-मत्सराविण । बंधुभावे सर्व जेथे ॥१॥
गरीब-श्रीमंत कोणी नाही । नाही दारिद्रय रोगराई । उंचनीच कामे सर्वहि । करिती लोक प्रेमभरे ॥२॥
पक्ष नाही पंथ नाही । जातिभेद विरोध काही । एका कुटुंबापरी राही । गाव आपुले आनंदे ॥३॥
ऐसे व्हावे कोठेतरी । त्यासीच आम्ही म्हणतो वैकुंठपुरी । जेथे नाही भावनाच दुसरी । परकेपणाची ॥४॥
ग्रंथी स्वर्ग-वैकुंठ-वर्णन । वाचता तल्लीन होते मन । त्यात वर्णिले हेचि गुण । ते का आपण न घ्यावे ? ॥५॥
सत्य युगाची ऐकावी कथा । परि आपुली न सोडावी प्रथा । याने समाजाच्या व्यथा । चुकतील कैशा ? ॥६॥
वैकुंठीचा प्रेमानंद । सत्ययुगाचा समतावाद । आपुल्या गावी करावा सिध्द । हेचि कर्तव्य सर्वाचे ॥७॥
देवाने जगी अवतार घ्यावा । ऐसे का वाटते जीवा ? त्रास अन्याय अनाचार नसावा । कोठेहि लोकी ॥८॥
जरि हे आपणासि आवडे । तरि आपणचि व्हावे कराया पुढे । न करिताचि देवा नांवे ओरडे । ते सर्व वाया ॥९॥
सर्वचि भगवंताचे सखे । देवाचिया न्यायाने सारखे । मग व्यवहारीच पारखे । का ठेवावे ? ॥१०॥
देवाचा न्याय जगी आणावा । तरीच मिटे दु:ख-गवगवा । यासि टाळील तो जाणावा । भक्त कैसा ? ॥११॥
जे एकास तेचि सकळास । हेचि सत्य जीवनाचे रहस्य । सर्वाच्या सुखी दु:खी समरस । भावना राहती सकळांच्या ॥१२॥
उणा-अधिक गुणापाशी । नको जाति वा धनापाशी । अधिकार समानचि सर्वासि । जीवनाचा ॥१३॥
सर्वानी करावे शक्तिभर काम । अधिकारपरत्वे उपक्रम । सर्वासि मिळावे सौख्य सम । गरजांप्रमाणे जरूर त्या ॥१४॥
ऐसीच सर्वाची योजना करावी । पूर्ण वर्ष चिंताचि नसावी । अन्नवस्त्र धंद्यांची बरवी । योजना व्हावी सर्वामिळोनि ॥१५॥
वर्षाचे बजेट ठरवावे । माणसी लागेल ते योजावे । अन्नवस्त्र अलंकार बरवे । सर्वालागी घरदार ॥१६॥
वेगळा नफा वेगळी संपत्ति । वेगळे वैभव वेगळी महती । वेगळे चोचले कोणाप्रति । उरोचि न द्यावे ॥१७॥
एकचि वस्त्र एकचि अलंकार । एकचि आदर एकचि शृंगार । एकचि भोजन एकचि अधिकार । आपुलाल्या कामाचा ॥१८॥
सर्वाना सारखाच सणवार । सर्वाचे एकचि मेजवानी-प्रकार । एरव्ही न मिळो खानपान इतर । भिन्न कोणा ॥१९॥
सणावारी कोणी वारला । तरि गोडधड नसावे गावाला । तो दिवस सोडोनि पाहिजे नेमला । दुजा सर्वानी ॥२०॥
सर्वाची उठण्याची एक वेळा । घरकाम करण्या हुरूप आगळा । सफाई, ध्यान, प्रार्थना सगळा । कार्यक्रम सामुदायिक ॥२१॥
सर्वास ठेवावे सारखे । राहणी, खाणे, कपडे नेटके । सर्वाच्या मुलास शिक्षण निके । योग्यता-भेद बघोनि ॥२२॥
शिक्षणाची एकचि शाळा । राहणीचा एकचि सोहळा । प्रेमाचा सर्वभावे लळा । जेथे तेथे सर्वाशी ॥२३॥
समान व्यवस्था आरोग्याची । सारखीच उन्नति स्त्री-पुरुषांची । एकाची ती सर्वचि गावाची । जबाबदारी ॥२४॥
जैसे, कोणी येती पाहुणे । ते त्या आदर्श गावाचेचि म्हणे । वाटून द्यावेत आपुलाले कोणे । ऐसेहि होते ॥२५॥
परि त्यासि आहे मर्यादा । तेवढाचि नसावा धंदा । पाहुण्याची वेळ, सीमा सर्वदा । निश्चितचि असावी ॥२६॥
एरव्ही करावा पत्रव्यवहार । जेव्हा नसेल काम जरूर । दिवस घालवू नयेत भराभर । पाहुणेबाजीतचि ॥२७॥
तैसेचि लग्नादि उत्सव । त्यासि झटावे गावाने सर्व । परंतु नेहमीच धावाधाव । न व्हावी तीहि ॥२८॥
गावच्या मुलामुलीचे लग्न । सामुदायिक पध्दतिच प्रमाण । तेथे तिथि-मुहूर्ताचे कारण । काहीच नाही ॥२९॥
असोत लग्ने दहा-पन्नास । गावची शंभरहि त्या वर्षास । एकाच वेळी सावकाश । उरकवावी एके जागी ॥३०॥
गावी असावे विवाहस्थान । भांडीकुंडी बिछायत पूर्ण । सर्वासाठी ठेवावी जमवोन । गावातर्फे ॥३१॥
पवित्र विशाल सुंदर स्थान । जेथे प्रसन्न राही मन । सर्व वरांनी एकचि ठिकाण । पसंत करावे लग्नासि ॥३२॥
प्रसन्न वेळ आणि सज्जन । तोचि मुहूर्त सुखसंपन्न । प्रसन्न हवापाणी पाहोन । कार्य करावे सर्वानी ॥३३॥
गावचे सर्व जमोनि मित्र । सहकार्य अर्पावे सर्वत्र । बसवोन वधुवरांना एकत्र । करावे लग्नकार्य ॥३४॥
लग्नादिकासाठी कोणा । उडवू न द्यावे गावच्या धना । कराव्या ग्रामोध्दार-योजना । सर्व मिळोनि ॥३५॥
सर्वानी आपले सर्वस्व द्यावे । आदर्श गावाचे बनोनि राहावे । कोणीहि वेगळे न व्हावे । ऐसी घ्यावी दक्षता ॥३६॥
जरी सर्वानी संसारी असावे । तरी संततिनियमन सांभाळावे । तीन पुत्रांवरि पुत्र व्हावे । ऐसे इच्छू नये कोणी ॥३७॥
पुत्र तान्हपणी वाढला । दुसर्‍या दूधावरि लागला । की आईपासोनि सोडविला । पाहिजेचि तो ॥३८॥
गावाने करावे शिशुसंगोपन । म्हातार्‍या प्रेमळ बायांकडोन । जयांचेनि काम भिन्न । होत नाही कष्टाचे ॥३९॥
संपत्ति आणि संतति । सगळी गावाची ठेव निश्चिती । वाढवोनि साधावी उन्नति । योग्य मार्गे गावाची ॥४०॥

]


आपुल्या गावाचे सुखदु:ख । सकळांसीच कळावे नि:शंक । येता परस्पराची हाक । धावोनि जावे जिव्हाळयाने ॥४१॥
ज्याची कोणास जरूर पडे । त्यास त्याने बोलवावे निर्भिडे । कोणीहि घेऊ नयेत आढेवेढे । आपुले अडथळे सांगोनि ॥४२॥
कामाचे महत्त्व पाहोनि । हाकेस त्वरित जावे धावोनि । तोहि येईल तैसाचि समजोनि । कामास माझ्या ॥४३॥
जैसे आपण कोणाचे करावे । तैसेचि आपुल्या वाटयास यावे । ऐसेचि आहे स्वरूप बरवे । सहकार्याचे मानवांच्या ॥४४॥
म्हणोनि संकटी धावोनि जावे । सर्वानी कष्ट वाटूनि घ्यावे । जेणेकरूनि सर्वास वाटावे । कुटुंब माझे विश्वव्यापी ॥४५॥
जीव जगी जन्मासि आला । ऐसेचि सहकार्य द्यावयाला । अज्ञानी प्राणी सेवेसि मुकला । त्यास करावे सावधान ॥४६॥
कोणास नाही उद्योगधंदा । कोण लागला भलतिया छंदा । पाहावी निरीक्षोनि आपदा । दूर कराया गावाची ॥४७॥
कोण कोणाशी वितंडतो । कोण कोणाला छळीत बसतो । कोण स्वार्थासाठी दंडतो । पाहणे काम आमुचे ॥४८॥
व्यसनाधीन कोण राहे । कोण जुगारी बसलाहे । चिंतातुर कोण का आहे । पाहणे काम आमुचे ॥४९॥
कोणी स्त्रियांना जाच करिती । कोणी आईबापा कष्ट देती । कोणी मुलीच न पाठविती । कोणी नेती पळवोनि ॥५०॥
हे सर्व दोष सारावया । जबाबदार आम्हीच तया । गावचे रहिवासी म्हणोनिया । काळजी असो आम्हासि ॥५१॥
आमुचे करणे आमुचे नव्हे । त्या जामीन सर्व गाव आहे । हे समजोनि करावे होय-नोहे । सर्व काही सर्वानी ॥५२॥
आम्ही गावी दारू प्यालो । म्हणजे ” दारूडे लोक ” झालो । तेणे ” दारूबाज गाव ” नांव चालो । ऐसे होते ॥५३॥
मग सांगा सर्व दारूबाज । होता कैसे चालेल राज्य ? म्हणोनि व्यसनादिकांचे बीज । येऊ न द्यावे शिवेआत ॥५४॥
कोणी गावी तमाशा करी । मनोरंजनाचा प्रचार विषारी । तेणे मुले नाचती दारोदारी । नाचे जैसे ॥५५॥
नृत्यकलेच्या नांवाखाली । विषयांध भावना पसरली । ऐसी नको सुधारणा-भुली । आमुच्या गावी ॥५६॥
ही कला नव्हे, विडंबन । पैसे लुटायाचे स्थान । ऐसे नाटक, पथक, गायन । असो न द्यावे ॥५७॥
असेल ज्यात जनहित । त्यासीच राहावे सहमत । वाढू न द्यावा वाईट पंथ । कोणताहि गावी ॥५८॥
उत्तम कार्यासि जे निघाले । रामधून भजन कलापथक चाले । व्यायाम खेळ मनोरंजन भले । सर्वकाही ॥५९॥
कोठेचि नाही कुटिलता । तमाशे-दंडारीची हीनता । विचारल्याविण पुढारी येता । भय वाटावे तयासि ॥६०॥
परका कार्यक्रमासि घुसे । विचारल्याविण मुख्यासि सहसे । कधीहि घडणार नाही ऐसे । गावी आमुच्या ॥६१॥
गावाच्या बुध्दीची उच्च पातळी । लोका कळावे तत्त्वे सगळी । भाषणे चालावी वेळोवेळी । ग्रामोन्नतीची यासाठी ॥६२॥
आपण कोणी भिन्न आहो । ऐसी स्वप्नीहि भावना न येवो । यासाठी ज्ञानपाठ जागता राहो । गावी आमुच्या ॥६३॥
आमुच्या गावी प्रार्थना-मंदिर । जेथे सर्व धर्मांचा आदर । विश्वातील जे असतील थोर । ते आम्हासि देवतुल्य ॥६४॥
त्याच मंदिरी थोरांची जयंती । उत्सव आणि संत-पुण्यतिथि । जागती राहे सामुदायिक वृत्ति । बौध्दिक-बळे ॥६५॥
साधुदेवतांची जयंती । पुण्यतिथि आदि उत्सव किती । इच्छा असेल ती सत्कृति । करावी गावी ॥६६॥
पण सर्वाचे असावे मत पवित्र । गावाने होऊनि एकत्र । सामुदायिकचि सर्वत्र । उत्सव करावे ॥६७॥
गावचा उत्सव तो सर्वाचा । त्यात हर्ष अति आदर्शाचा । तेथे आपापल्या मनाचा । तोल नसावा विपरीत ॥६८॥
नाहीतरि वाढे सांप्रदायिकता । जातीयता, व्यक्तिनिष्ठता । तेणे गावाचे तुकडे होता । वेळ न लागे ॥६९॥
म्हणोनि भेदचि नको काही । सर्वामनी उत्साह राही । एक कुटुंब ऐसे सर्वहि । ग्राम आमुचे प्रेमळ ॥७०॥
आपुले प्रेमचि अमोल संपत । आपुले श्रमचि महान दौलत । आपुले सहकार्यचि खरी इज्जत । समजावोनि द्यावे सर्वासि ॥७१॥
गावी तेचि सर्वानी करावे । कीर्तिस्फूर्तीने गाव भरावे । घराघरात शांतिसुख पावे । जनता जेणे ॥७२॥
कोणी एक मागे पडला । त्यास दुसर्‍याने सांभाळिला । ऐसे करिताच गाव झाला । सर्व गुणी संपन्न तो ॥७३॥
गावात नाही झगडा तंटा । कोणी नाही बोलणार उफराटा । सरळ सालस स्वभाव चोखटा । प्राणियांचा दिसावा ॥७४॥
जरी मत भिन्न झाले । तरी पाहिजे गावातचि मिटविले । आपुल्या गावाविण नाही उरले । कोर्टकचेरी-काम कोठे ॥७५॥
गावचा झगडा गावीच मिटे । निवडणुकीचे काम नव्हे खोटे । लंदफंद गावात नाही कोठे । ऐसे ग्राम सुंदर हे ॥७६॥
ऐसे सांगाया वाटावा अभिमान । तेचि खरे गावाचे भूषण । गावातील सर्व लोक सज्जन । परस्परावरि अति मोह ॥७७॥
यात कोणी उनाड दिसला । त्यासि उपदेश द्यावा चांगला । एवढे करोनि नाही वागला । तरि तो झाला बहिरंग ॥७८॥
ज्याने गावात धिंगाणा घातला । तो गाव-घातकीच ठरला । त्यास पाहिजे सरळ केला । शांति-प्रयत्न करोनि ॥७९॥
मग सर्वानी मिळोनि ठरवावे । याचे पुढे काय करावे । निरुपाय होता पाठवावे । निर्णय करोनि परगावी ॥८०॥


मग त्यास न मिळे सामान । अथवा त्याचे असलेले धन । त्याने पळावे जीव घेवोन । आपुला कोठे ॥८१॥
ऐसे बळकटपण जव नाही । तव आदर्श गाव तमाशाच राही । त्यात स्थिरताच येणार नाही । काही केल्या ॥८२॥
यावरि श्रोता प्रश्न करी । गावात अडचणी नानापरी । सर्व लोक जनोनि कोठवरि । सोडवतील सर्वचि त्या ? ॥८३॥
सर्वचि पाहती कारभार । तरि केव्हा करावे काम इतर ? याने ग्रामजीवन स्थिर । होईल कैसे सांगाना ? ॥८४॥
ऐका याचे समाधान । करावी एक समिति निर्माण । सर्वानी आपले प्रतिनिधि म्हणून । नेमावे काही कारभारी ॥८५॥
ज्यांनी आपुले सर्वस्व द्यावे । तेचि समितीचे घटक बरवे । तनमनधन समर्पावे । ग्रामासाठी जयांनी ॥८६॥
त्या सर्वाना सभासद करावे । त्यातून पांचजण निवडावे । सर्वानी प्रांजळ मने पाहावे । इमानदार न्यायनिष्ठ ॥८७॥
सर्वाचे मालधन एक करावे । सभासदांचे मोजमाप घ्यावे । मग सर्वाचेचि जीवन बनवावे । एकसारिखे ॥८८॥
सर्वाना भरपूर कामे द्यावी । उत्पन्नाची व्यवस्था लावावी । सर्व व्यवहार-उपाधि पाहावी । त्याच पंचांनी ॥८९॥
सर्वानी आपापले काम करावे । विकणे घेणे पंचांनी पाहावे । आणि उद्योगासि सामान पुरवावे । पंचांनीच ॥९०॥
गावाकरिता मार्ग जोडावा । गावाकरिता व्यापार पुढे न्यावा । हरतर्‍हेचा संबंध आणावा । सुखी कराया गाव हे ॥९१॥
गावातून जे द्रव्य जावे । माल, मनुष्यबल, सामान बरवे । ते प्रथम पूर्ण निरीक्षोनि घ्यावे । गावासाठी पंचांनी ॥९२॥
सर्वचि योजना पंचांवरती । कोणाचेचि नाही इतराहाती । इतर निश्चिंत राहती । कराया प्रगति अधिकाधिक ॥९३॥
एकदा येथे अनन्य झाले । ते व्यापारचिंतेपासूनि सुटले । नि:स्पृह भगवत्प्रेमी झाले । काम आपुले करोनि ॥९४॥
पंच म्हणजे परमेश्वरदूत । सर्वाची चिंता करी निश्चित । याविषयी कोणाचे दुमत । असूंचि नये ॥९५॥
तयांनी सर्व काळजी घ्यावी । गावची जनता सुखी ठेवावी । निर्णय देताचि ऐकावी । हाक जनतेने पंचांची ॥९६॥
ग्रामी जनता असेल मोठी । परि ती पंचापुढे धाकुटी । सदा तत्पर सेवेसाठी । प्राण पणा लावोनि ॥९७॥
पंच बोलले ते वेदप्रमाण । हीच गावधर्माची खूण । यातचि ग्रामाचे आदर्शपण । आमुच्या मते ॥९८॥
आमुचे गाव एक कुटुंब । पंच तयाचा मूळस्तंभ । सर्वावरि न्यायाचा दाब । हाचि कळस विकासाचा ॥९९॥
नसता कोणाचेहि शासन । न्यायाने वागती सत्ययुगी जन । त्याचेचि रूपांतर पंचायतन । लोकशाही लोकतंत्र ॥१००॥
या योजनेचे एकचि मरण । तेहि देतो लक्षात आणोन । पंच म्हणोनि निवडाल गौण । तरि ये धोका जीवनासि ॥१०१॥
सेवाहीनांची पंचायत । ती गावास करील पंचाईत । लोकशाही म्हणजे लोकांचे मनोगत । सिंहासनी चढावे ॥१०२॥
लोकशाही म्हणजे लोकांचे हित । लोकांकडूनि व्हावे हातोहात । सर्व मालक म्हणोनि सत्य । जबाबदारी ओळखावी ॥१०३॥
तीच म्हणावी लोकाशाही । जेथे कोणी कामचुकार नाही । सेवातत्पर सर्व उत्साही । न्यायी जन ॥१०४॥
लोकशाहीत जो सत्ताधारी । तो मालक नव्हेचि निर्धारी । लोकसेवेचा कारभारी । जबाबदारी हे त्याची ॥१०५॥
सर्व लोक कार्यतत्पर । त्यांहूनि विशेष जो धुरंधर । तोचि ग्रामाधिकारी खरोखर । पंच वा नेता ॥१०६॥
पंच तो असे आमुच्यातील । अधिक कामकर्ता आचारशील । ज्यासि संडास-सफाईचेहि नवल । नसे काही ॥१०७॥
अधिक सुरळीत काम करील । नेमाने निष्ठेने राहील । तोचि अधिकारी होईल । या गुणांनी गावाचा ॥१०८॥
येथे महत्त्व सदगुणांचे । धाडसाचे, स्वार्थत्यागाचे । तेचि पुढारी होती गावाचे । जे गावास देव मानती ॥१०९॥
ज्याने गावचि देव मानिला । सेवाकार्याचा मंत्र जपला । त्याचाचि असावा बोलबाला । गावामाजी आपुल्या ॥११०॥
तोचि पंच अतिसात्विक । गाव मानी जगन्नायक । एक सेवाचि महापूज देख । इतर नाही त्यासि भक्ति ॥१११॥
त्याला नाही दुसरा धर्म । त्याला नाही दुसरे कर्म । एक सेवाचि त्याचा उपक्रम । सर्वकाळ गावलोकी ॥११२॥
त्याचे सर्वस्व आमुच्या करिता । म्हणोनीच तो आमुचा पिता । जेथे जातिधर्मपंथमता । महत्त्व नाही ॥११३॥
तोचि पंच निवडावा । श्रध्दाविचारे ओळखावा । गटबाजीचा होवो न द्यावा । तमाशा कोठे ॥११४॥
करावे सकळांच्या हिताचे । तेथे व्यक्तित्वचि नको आमुचे । जो करि सर्वाहूनि हित लोकांचे । तोचि नेता मानावा ॥११५॥
सज्जनांचे असावे पंचमंडळ । जे गावा चालवी सर्वकाळ । आपुले कुटुंबचि गाव सकळ । मानावे त्यांनी ॥११६॥
परस्पराना घेऊनि चालावे । परस्पराचे हृदय एक व्हावे । कोठे उणे पडता आपणचि समजावे । उणे असो ॥११७॥
आपुल्या व्यक्ति-कुटुंबा करिता । न व्हावी गावाची अव्यवस्था । ऐसी दृष्टि असावी समस्ता । कार्यकर्त्यासि ॥११८॥
अन्याये पीडा न होवो कोणास । न व्हावा मुंगीलाहि त्रास । याची जाणीव असावी प्रमुखास । सर्वकाळ ॥११९॥
सार्वजनिक वस्तु घरी भोगणे । आप्तजनांसी सवलती देणे । हे टाकूनि करावी चोखपणे । तत्परतेने जनसेवा ॥१२०॥


आपुला दुराग्रह दूर सारावा । बहुजनांचा मागोवा घ्यावा । शक्यतो कारभार चालावा । एकमताने गावाचा ॥१२१॥
पांचामुखी परमेश्वर । परि नको सत्तेचा अहंकार । नियम पाळता वाटावे सुखकर । ठरलियावरि ॥१२२॥
सर्वानी सर्वासाठी झटावे । सर्वाच्या हितात स्वहित पाहावे । थोरांनी याचे धडे दाखवावे । आचरोनि निश्चयाने ॥१२३॥
यातचि आहे मोठेपण । ग्रामजीवन होई स्वयंपूर्ण । हीच आहे खरी खूण । आदर्श ग्रामराज्याची ॥१२४॥
ग्रामराज्यचि रामराज्य । स्वावलंबन हेचि स्वराज्य । बोलिले महात्मा विश्वपूज्य । विकास त्याचा सुंदर हा ॥१२५॥
आमचे ग्रामचि एक राज्य । सर्वाचे माहेर अविभाज्य । ऐसे आदर्श होती जे जे । नाते आमुचे त्यांच्याशी ॥१२६॥
दुसरे गाव शत्रु नोहे । परि आमुचा संबंध कामी राहे । सहकार्य देती पंच निश्चये । चांगुलपण वाढवाया ॥१२७॥
पंचमंडळ निष्ठेने राही । ते ते गाव भूवैकुंठ होई । त्याच्या प्रभावे पवित्र मही । आपोआप होतसे ॥१२८॥
ऐसे जव गाव साधले । तव ते प्रांतांत प्रमुख झाले । ऐसे प्रांत प्रभावी ठरले । तरीच ते भूषण देशासि ॥१२९॥
देश ऐसा उन्नत होय । तोचि विश्वाचा घटक शांतिमय । एरव्ही जो स्वार्थे पुढे घे पाय । घातक होय विश्वासि ॥१३०॥
म्हणोनि ऐका लक्ष लावून । स्वर्ग कराया जगी निर्माण । करा कुटुंब समर्पण । सामुदायिक तत्त्वासि ॥१३१॥
घ्या वाचून, करा तातडी । मग मनन करोनि आवडी । घाला या आदर्शयोजनेत उडी । आपुले सर्वस्व देवोनि ॥१३२॥
श्रोतेहो ! ऐकिले काय वचना ? मग वेळ कासयासि पुन्हा ? आजचि तनमनधन समर्पाना । या कार्यासि ॥१३३॥
यानेच थोरांची इच्छा सफळ । सार्थकी लागे ज्ञानभक्ति सकळ । मिटेल अंतर्बाह्य तळमळ । तुकडया म्हणे सर्वाची ॥१३४॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । आदर्श ग्रामराज्य कथित । एकोणचाळिसावा अध्याय संपूर्ण ॥१३५॥
ग्रामगीता अध्याय एकोणचाळीसावा समाप्त

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading