आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ग्रामगीता अध्याय चौदावा – 14 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय | ओवी संख्या |
|---|---|---|
| ग्रामगीता अध्याय चौदावा – 14 Gram Gita Chapter १४ – 14 | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book | १३० |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने | हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय १४ ग्राम आरोग्य
ग्राम आरोग्य
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय चौदावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय १४
Gram Gita Chapter Fourteen Beginning
—-🕉ग्रामगीता अध्याय १४ ग्राम आरोग्य
ग्राम आरोग्य
एक श्रोता महाभाविक । म्हणे गावहि केले ठीक । तरी देवाने मारली मेख । ती निघू शकेना ॥१॥
प्रत्यक्ष शहर जरी झाले । तरी देवापुढे ताब न चाले । तेथे खेडे शहरापरी केले । तरी काय होते ? ॥२॥
देवीदेवतांचा कोप झाला । कॉलरा पटकीचा झटका आला । म्हणजे सुधारूंच न शके कोणाला । बाप वैद्याचा ॥३॥
म्हणोनि देवता राहती प्रसन्न । ऐसे करावे पूजन । गाव असो की शहर संपन्न । सुखी त्याविण न राहे ॥४॥
मित्रा ! ऐक याचे उत्तर । देवदेवता किंवा परमेश्वर । हे कृपेचेचि अवतार । कोपचि नाही त्याठायी ॥५॥
कोप करिती ते दुष्टावरि । त्यातहि उध्दार भावचि अंतरी । तेथे निरपराध्यास छळती जरि । तरि त्या देव न म्हणावे ॥६॥
सर्व लोक लेकरे त्याची । छळणा का करील कोणाची ? कृति आपुलीच आपणा जाची । शत्रु आपणचि आपुले ॥७॥
चहूबाजूंनी केली घाण । त्यात जंतु झाले निर्माण । त्यातूनि रोगांच्या साथी भिन्न भिन्न । वाढ घेती ॥८॥
नाही नेमाचा आचार । शुध्द नाही आहारविहार । अशुध्द हवापाणी, संहार । करिती जनांचा ॥९॥
काही केव्हा कुठेहि खाणे । कधी झोपणे कधी जागणे । सप्तहि धातु कोपती याने । रोगरूपाने फळा येती ॥१०॥
” हाटेली खाणे मसणा जाणे ” । ऐसे बोलती शहाणे । त्यावरि नाना तिखट व्यसने । आग्यावेताळासारिखी ॥११॥
कशास काही नियम नुरला । कोण रोगी कोठे थुंकला । कोठे जेवला संसर्गी आला । गोंधळ झाला सर्वत्र ॥१२॥
त्याने रोगप्रचार झाला । लागट रोग वाढतचि गेला । बळी घेतले हजारो लोकाला । वाढोनि साथ ॥१३॥
मग कोणी म्हणे कोपली देवी । कोणी मांत्रिकासि बोलावी । बाहेरभितरचे समजोनि गावी । काढती आरत्या अंधारी ॥१४॥
कोणी करणी कौटाळ म्हणती । कोणी पिशाच्चास भारती । औषधेहि न देता रोगी मारती । मूर्खपणाने ॥१५
भगत मांत्रिक अरबाडी जाणते । घुमारे बघती भाविक कोणते । पोटासाठी नाना मते । फैलाविती लोकामाजी ॥१६॥
करविती नवस सायास थोर । देवीपूजेचा जोरसोर । रेडे बकरे कोंबडे पामर । कापिताति अज्ञाने ॥१७
देवानेचि केले जीव । त्यास कैची मारण्याची हाव ? मधले दलाल करिती ठेव । आपुली हौस पुरवावया ॥१८॥
संते देवास केले प्रसन्न । तेव्हा बळी दिले कोण ? चोखोबा, श्रीचक्रधर, रामकृष्ण । म्हणती ” प्रसन्न देव भावे ” ॥१९॥
देवासि पाहिजे बलिदान । तो पशु आपुला भ्रम अभिमान । गावचे गेल्याविण अज्ञान । सुखी जीवन न होई ॥२०॥
गाव असो अथवा शहर । तेथील बिघडले आचारविचार । म्हणोनीच रोगराईने बेजार । जाहले सारे जन लोक ॥२१॥
गाव व्हावया निरोगी सुंदर । सुधारावे लागेल एकेक घर । आणि त्याहूनहि घरात राहणार । करावा लागेल आदर्श ॥२२॥
व्यक्ति व्हाया आदर्श सम्यक । पाहिजे दिनचर्याच सात्विक । सारे जीवन निरोगी सुरेख । तरीच होईल गावाचे ॥२३॥
नियमी बांधला एकेक दिन । त्यानेच सुधरे जीवन संपूर्ण । गावहि होय आरोग्यसंपन्न । सारे प्रसन्न देवीदेव ॥२४॥
नियमांचा मुख्य आधार । मजबूत पाहिजे निर्धार । त्यावरीच उत्कर्षाची मदार । ऐहिक आणि आध्यात्मिक ॥२५॥
नाहीतरि मानवाने नियम केले । सर्व जीवन सुरळीत चाले । परि एकदा दुर्लक्ष झाले । की चुकतचि जाते ॥२६॥
एकदा रात्रभरि जागला । मग सकाळी उठणेंच कशाला ? आळसांत सर्व दिवस गेला । नियम मोडोनि ॥२७॥
त्यास धाक नाही काळजी नाही । घरचे लोक बोललेच नाही । हा उठला दुसरे दिवशीहि । दहा वाजता दिवसाचे ॥२८॥
काही दिवस अलक्ष झाले । उशीरा उठणे अंगवळणी पडले । मग बदलेना, काही केले । उपचार जरी ॥२९॥
ऐसे कासया घडू द्यावे । रोज सकाळीच उठावे । न उठता घरच्यांनी जागवावे । झोपणारासि निश्चये ॥३०॥
काही म्हणती उशीरा उठणे । हे तो भाग्यवंताचे लक्षणे । त्यास काय आहे उणे । पोट भराया धनवंता ? ॥३१॥
ऐसे समजोनि आळशी केला । अरे ! हा भाग्यवान कसला ? निजण्यावरि भाग्यवान ठरला । तरि बीमार महाभागी का नव्हे ? ॥३२॥
तो तर निजलाचि राहतो । झोपूनचि खातो-पितो ॥ काय अधिक भाग्यवान म्हणवितो ? सांगा सांगा ॥३३॥
भाग्यवंताची उलटी व्याख्या । करणे शोभते का शहाण्यासारख्या । अरे ! सकाळी उठणारासचि सख्या । भाग्यवंत म्हणावे ॥३४॥
श्रमातूनचि उपजे भाग्यसंपत्ति । निजणारे तिची हानि करिती । इतरा श्रम अधिक पडती । उत्साह घटे आपलाहि ॥३५॥
झोपी गेला घरचा धनी । सुर्य चालला डोक्यावरोनि । उन्ह पडले तरी निजूनि । कड फेरितो झोपेचा ॥३६॥
नोकरचाकर आळस करिती । म्हणती घरधनीच झोपती । मग आपणचि कैशा रीती । काम करावे जावोनि ? ॥३७॥
ऐसा सारा अंधार पडे । वाजती श्वानांचे चौघडे । मूलबाळ रडेओरडे । झोप काढिती आयाबाया ॥३८॥
घरदार कोठूनि पवित्र ? जागल्यावरीहि आळसले गात्र । अव्यवस्था माजे सर्वत्र । बध्दकोष्ठता वाढ घे ॥३९॥
यातूनचि वाढती सर्व रोग । वैद्य डॉक्टरांचा लागला भोग । तिकडे बिघडत गेले उद्योग । शिरले दुर्भाग्य त्या घरी ॥४०॥
प्रात:काळची आरोग्यदायी हवा । सदासर्वदा मानवते जीवा । प्रसन्नता देई ऋतु तेधवा । सर्व प्राणीमात्रासि ॥४१॥
सर्व वनेंराने जागी होती । पुष्पे सारी विकास पावती । पशुपक्षीहि नेहमी उठती । प्रात:काळी ॥४२॥
पहाटे दोहता गाय-म्हैस । त्यात अधिकचि सार-अंश । पहाटवारा चढवी रक्तास । लाली रोगप्रतिकारक ॥४३॥
म्हणोनि प्रात:काळी उठावे । ब्राह्ममुहूर्ता डोळयांनी बघावे । उठतांच प्रात:स्मरण करावे । आसनस्थानी ॥४४॥
प्रात:स्मरण म्हणजे नवीन स्फूर्ति । उगवल्या दिवशी व्हाया प्रगति । उत्तम कार्य घडावे पूर्ण गती । म्हणोनि प्रार्थना देवाची ॥४५॥
त्यावेळी जो संकल्प करतो । वाईट न घडो ऐसे चिंतितो । तो सुसंस्कारे वाढत जातो । उन्नतिमार्गे वेगाने ॥४६॥
म्हणोनि प्रात:स्मरण करावे । नैसर्गिक उत्साहभरे भरावे । मग प्रातर्विधी आटोपावे । नित्यनेम हा अमोलिक ॥४७॥
पहाटेस शौचमुखमार्जन । त्याने वायुदोषांचे होय शमन । शरीरी नवा जोम निर्माण । होय निर्मळपण लाभोनि ॥४८॥
सकाळी करावे उष:पान । त्याने अंतरीद्रियांचे शांतवन । नंतर करावे शीतजलस्नान । अति प्रसन्न चित्त राहे ॥४९॥
शीतजलस्नानाचे महिमान थोर । तेणे त्वचाशक्ति जागे सुंदर । शरीर राहे सदा तरतर । उत्साहाने ॥५०॥
मेंदूचा भाग थंड राहिला । तरीच बुध्दीचा उत्कर्ष झाला । ऐसा थोरांना अनुभव आला । कितीतरी ॥५१॥
उष्ण पाण्याने स्नान करणे । म्हणजे बीमारचि तो समजणे । ऐसी सवय नेहमी लावणे । हानिकारक देहासि ॥५२॥
स्नानोत्तर अरुणोदयापूर्वी । सामुदायिक ध्यान-उपासना करावी । प्रार्थनामंदिर अथवा पडवी । ध्यानास्तव पहावी निर्मळ ॥५३॥
अरुणोदयाची सुवर्णप्रभा । दिसे लावण्याची शोभा । निसर्ग वाढवी शांति प्रतिभा । अलभ्यलाभा पावती योगी ॥५४॥
जन म्हणती योग्यांनी ध्यान करावे । आपण कासया उठावे स्मरावे ? हे म्हणणे कदापि नोहे बरवे । कोणाचेहि ॥५५॥
योगी आपली समाधि घरी । साधक सन्मार्गाचा योग करी । जीवन-उज्ज्वलतेचा योग संसारी । प्रात:काळी साधतसे ॥५६॥
ध्यानापरीच सहल प्रात:काळची । जरूर करावी सवय रोजचि । त्याने देह मन राहे निर्मल शुचि । प्राणवायुस्पर्शाने ॥५७॥
कोणी धावती कोणी चालती । कोणी आसने सूर्यनमस्कार घालती । कोणी गाती चिंतन करिती । हे दृश्य दिसो प्रभाती ॥५८॥
काही पठण-पाठण करावे । शरीरमनासि वळण लावावे । आयुष्य सुंदर होते आघवे । ऐशा क्रमे ॥५९॥
घरी असो वा आश्रमी । प्रवासी असो वा तीर्थधामी । प्रात:काळी नित्यनियमी । अभ्यासक्रम उरकवावा ॥६०॥
घरा-आश्रमाची करावी सफाई । स्वच्छता मार्गी ठायी ठायी । गायीम्हशीचे गोठे सर्वहि । आरशासारखे करावे ॥६१॥
गडीमाणसांनी सहाय्य द्यावे । परि प्रत्येकाने काम करावे । आईबाई मिळोनि उरकवावे । कामधंदे चटचट ॥६२॥
कोणीहि बघे अरुणोदयी । सडासंमार्जन रांगोळी रई । आंतबाहेर गलिच्छता नाही । कामे झाली सकळांची ॥६३॥
ऐसे ज्या गावी झाले । समजावे लक्ष्मीचे मन मोहिले । आरोग्याचे राज्य आले । तया गावी ॥६४॥
तेथे उदंड आयुष्य वाढते । जेथे प्रात:काळी स्वच्छता होते । कोणीहि न दिसे झोपला जेथे । प्राणीमात्र ॥६५॥
म्हणोनि ऐसे नियम करावे । चुकलियाहि चुको न द्यावे । पुन:पुन्हा सावरावे । वर्तन आपुले ॥६६॥
ऐसा अभ्यास जडल्यावरी । आरोग्य भाग्य नांदे संसारी । औषधांची गरजचि नुरे शरीरी । वाढे अभ्यंतरी नवे तेज ॥६७॥
पूर्वी प्रात:काळी माध्यान्हा । आणि सायंकाळी जाणा । होती त्रिकाळ संध्याप्रार्थना । संस्कारास्तव लाविली ॥६८॥
ते सर्वकाळचि उचित । म्हणोनि प्रातर्ध्यान नियमित । आणि सायंप्रार्थनाहि नेमस्त । करीत जावी सर्वानी ॥६९॥
निद्रेचिया आदिअंती । दिवस-रात्रीच्या संधीप्रति । आणि भोजनसमयी संकल्प होती । ते बनती दृढ संस्कार ॥७०॥
जनींभोजनी हरि आळवणे । गीतापाठादि उच्चारणे । सात्विक भाव हृदयी भरणे । शुध्द करी जीवनासि ॥७१॥
श्रोतयांनी प्रश्न केला । भोजनी आळवावे भगवंताला । याचे फळ सांगा आम्हाला । काय कैसे ? ॥७२॥
भोजन म्हणजे आहार घेणे । तेथे कशाला देवाचे गाणे ? हास्यविनोद का न करणे । उल्हासास्तव ? ॥७३॥
ऐका याचेहि उत्तर । भोजन म्हणजे पिंडसंस्कार । यज्ञहि यासि म्हणती थोर । वैश्वानर अग्निमाजी ॥७४॥
भोजनाचे वेळी प्रसन्न । केलिया विचार शुभचिंतन । तैसेचि भिनती निर्मळ गुण । अन्नासवे ॥७५॥
पवित्र धूप सुगंध सात्विक । तेणे वातावरण रोगनाशक । रांगोळया आदि प्रसन्नकारक । स्वच्छ असावी जागा तरी ॥७६॥
स्वच्छतेविणा जे भोजन । समजावे ते मलीनपण । अग्नि वाढाया हातपाय धुवोन । पुसोनि भोजन करावे ॥७७॥
काही करावे भोजनापूर्वी काम । जेणे मिळे सकळासि आराम । कार्य होतसे सुगम । सर्व जना मिळोनि ॥७८॥
कोणी आसने, पाट टाकावे । कोणी वाढावे, पाणी ठेवावे । कोणी उदबत्ती, धूप लावावे । सुगंधासाठी ॥७९॥
प्रथम बसोनि पाठ म्हणावा । गंभीर सुरे रंग भरावा । वाढणे संपता शांतिमंत्र गावा । गांभीर्याने ॥८०॥
मग करावे ब्रह्मार्पण । आदराने करावे अन्नसेवन । भोजनींहि श्लोक, मधुरवचन । उल्हासाने बोलावे ॥८१॥
भोजनापूर्वी आचमन । त्याचा उद्देश अग्निदीपन । चित्राहूति जलआवर्तन । समर्पण हाचि भाव त्याचा ॥८२॥
ईश्वरे उपजविले अन्न । ते अन्न ईश्वरी कृपादान । ज्यावरि सर्वाचे असे जीवन । त्याचे ऋण आठवावे ॥८३॥
त्याची लेकरे जीवजन । त्यांना आधी लाभावे अन्न । यासाठी विश्वदेवाचे संतर्पण । यज्ञमय भोजन या भावे ॥८४॥
भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद । समजोनि सुखे घ्यावा आस्वाद । ज्यात शेतकर्यांचे कष्ट विशद । ते अन्न सेवावे सेवेस्तव ॥८५॥
ऐशा सदभावे आदरे सेवावे । उत्तम श्लोक भोजनी गावे । वेडेवाकुडे न बोलावे । क्रोधा न यावे भोजनसमयी ॥८६॥
हास्यविनोद जरी असला । तरी अश्लीलता न यावी प्रसंगाला । उच्छिष्ट कण न पाहिजे टाकला । भोजनप्रसंगी ॥८७॥
राजस तामस सात्विक । भोजनाचे प्रकार अनेक । त्यात आपली शक्ति पाहूनि सम्यक । पचेल तैसे करावे ॥८८॥
कोणी सज्जन म्हणती भले । पचनासाठी सर्वचि खाद्य निर्मिले । परंतु पचनाचे तारतम्य पाहिले । पाहिजे जुळवोनि ॥८९॥
कोणी खाद्य रोग करी । कोणी खाद्य भोग भरी । कोणी खाद्य वाईट संस्कारी । करिते प्राण्या ॥९०॥
काही जीव चुनखडीहि खाती । काही मांसकिडे भक्षिती । परंतु त्यांची स्वभाव-प्रकृति । त्याचि परी राहे ॥९१॥
मानवाने काय खावे । म्हणजे मानवपणेचि शोभावे । हेचि येथे पाहावे । लागते सज्जनासि ॥९२॥
शुध्द सात्विक अन्न घेतले । त्याने सात्विक विचार प्रवर्तले । तामस राजस खाद्य सेविले । तैसे झाले आचरण ॥९३॥
मद्यमांसाहार करिती कोणी । विकारबुध्दि वाढे मनमानी । भलतेचि रोग जाती लागोनि । सांसर्गिक आदि ॥९४॥
हे तो निश्चितचि आहे । खाद्ये रसरक्त उत्पन्न होय । रक्तापासूनि मांस मेद वीर्य । नि:संशय होती शरीरी ॥९५॥
जैसे ज्याचे रक्तरसगुण । तैसे विचार होती स्फुरण । क्रूर-शूर मंद-बुध्दिमान । रक्तमिश्रणे दिसताति ॥९६॥
काही आनुवंशिक गुण येती । रक्तरेताचिया मिश्रस्थिती । काही खाण्यापिण्याचेहि होती । संस्कार अंगी ॥९७॥
काही संगतीने वळण लागे । भूमिपात्रे काही परिणाम जागे । काही प्रयत्नशीलतेचे धागे । वळविती जीवा ॥९८॥
हे सर्व जरी खरे असले । तरी मुख्य अंग खाद्यपेयचि झाले । कारण त्यानेच बनलें-घटले । रक्तमांस जीवाचे ॥९९॥
उत्तम रक्ताचे असावे शरीर । तरि अन्नहि उत्तमचि खावे सुंदर । बाष्कळ खाता मेंदू-इंद्रियांवर । बाष्कळताचि येईल ॥१००॥
मग विषय-वासना नावरे । लागेल बहिरंगाचे वारे । झगडती जैसी जनावरे । तैसे अनावर मानवहि ॥१०१॥
ज्यासि क्रूरकर्मचि करणे आहे । त्याने तेचि खावे नि:संशय । तैसेचि भोगावेत अपाय । झालिया अंगी ॥१०२॥
ज्यासि मनुष्यपण लाभावे । ऐसे वाटे जीवेभावे । त्याने सात्विक अन्नचि सेवावे । सर्वतोपरी ॥१०३॥
एकाने ऐसा प्रश्न केला । सात्विक अन्न कुठले गरीबाला ? त्याने काय करावे बोला । जीवनासाठी ? ॥१०४॥
मित्रहो ! सात्विक अन्नचि सहज मिळते । जे श्रमाने शेतीत पिकते । भाजीभाकरी भातपोळी लाभते । अल्प प्रयासे ॥१०५॥
सूर्यकिरणांनी तयार झाली । कंद भाज्याफळे बागेत पिकली । सत्वांशयुक्त सर्व ती भली । आरोग्यदायी ॥१०६॥
साधे सहज ताजे पावन । तेचि असे सात्विक अन्न । नाना विकृतीचे मिष्टान्न । ते सात्विक नव्हे ॥१०७॥
कळणाकोंडाहि सात्विक । ज्या सत्त्वे तगती गरीब लोक । सात्विक म्हणजे शरीरपोषक । आरोग्यदायी सुसंस्कारी ॥१०८॥
तळलें विटले खाऊ नये । आंबट खारट सेवू नये । तैसे अति गोडहि जेवू नये । भोजनी कोणी ॥१०९॥
मिष्टान्न नेहमीं सेवू नये । तळण मसाले खाऊ नये । मिरचीवरि सोकावू नये । सर्वांनीच ॥११०॥
स्वच्छ असावे सात्विक अन्न । ताजे रुचिकर आणि रसपूर्ण । पालेभाजी फळभाजी विभिन्न । स्वाद संपन्न मुळातचि ॥१११॥
उगीच आटवून आटवून रबडी खाणे । वाटून वाटून पुरणपोळी करणे । तळून तळून भजेपुर्या जेवणे । उन्मत्तांचे भोजन हे ॥११२॥
चाळून गाळून केला रवा । पिसून किसून भरला खवा । खातांना जीभ करी वाहवा ! पोट जाई कामांतूनि ॥११३॥
काहींनी खाण्याचीच वाढविली कला । भात खाती टोपला-टोपला । वरोनि चिंचपाणी पेला पेला । भातावरि घेती ॥११४॥
काही लाडूपेढे खूपचि खाती । रबडी हलवा तंडोनि घेती । पैसे ठरवोनि माप लाविती । खावयाचे ॥११५॥
मग त्याने पचन होईना । सारा शरीराचा होय धिंगाणा । नाना रोग जडती, यातना । द्यावयासि ॥११६॥
कोणी स्वादासाठी भोजन करिती । नको असले तरी पोटांत कोंबती । मग बिमारी घेऊन उठती । कॉलरा, अपचन, संग्रहणी ॥११७॥
काहींना होते उदर-कुंदी । चाले अपानांतून दुर्गधी । लोक हसती ” खाणेपिणे स्वच्छंदी । का करतो ” म्हणोनिया ॥११८॥
प्रकृतीच्या विरुध्द आहार । नाही काळवेळाचा सुमार । आंबट तेलकट आदि विषम मिश्र । ऐसा आहार विषारी ॥११९
काही लोक ऐसेचि खाती । प्रकृति बिघडलिया औषध घेती । गरीबास कुठली इतकी संपत्ति ? वैद्य होती घरोघरी ॥१२०॥
डॉक्टर म्हणती पथ्यचि नाही । तेणे रोगाचे मूळ तैसेचि राही । रोगी पाहती तेच नित्यहि । मृत्यूची घाई झाल्यापरी ॥१२१॥
पहिले खावोनि मस्त व्हावे । मग औषधि घेवोनि पचवावे । ऐसे उपद्रव कासयासि करावे । उन्मत्तपणे ? ॥१२२॥
उगीच आहे ऐसे खाणे । पचविण्यासाठी चूर्ण घेणे । अन्नरसाची नासाडी करणे । कशासाठी ? ॥१२३॥
आत वाढत जाता विकृति । धन्वंतरीहि काय करिती ? नष्ट करोनि औषधे, संपत्ति । मुखी माती पडतसे ॥१२४॥
परंतु लोक आग्रही पडती । हितचिंतक म्हणवोनि खाया देती । ते समजावे घातक श्रोती । ठेवावी निश्चिती आहाराची ॥१२५॥
नियमित सात्विक अन्नचि खावे । साधे ताजे, भाजीपाले बरवे । दूधदही आपुल्यापरी सेवावे । भोजना करावे औषधचि ॥१२६॥
सर्व भोजनी उत्तम भोजन । ज्यात गोघृतदुग्धतक्रपान । समजावे अमृताचे सेवन । शरीरासाठी ॥१२७॥
गोदूध नित्य सेवन करिता । कायाकल्पदि होय तत्त्वता । शक्ति चपलता बुध्दिमत्ता । आरोग्य हाता नित्य राही ॥१२८॥ .
निरोगी आयुष्य लाभेल बहुत । अल्पमृत्यु अथवा रोगांची साथ । हे पाऊल न ठेवितील गावात । तुकडया म्हणे ॥१२९॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । व्यक्ति-आचारे ग्रामारोग्य वर्णित । चौदावा अध्याय संपूर्ण ॥१३०॥
ग्रामगीता अध्याय चौदावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

