आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ग्रामगीता अध्याय दुसरा – 2 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय |
|---|---|
| ग्रामगीता अध्याय दुसरा- २ Gram Gita Chapter 2 – 2 ओवी संख्या :- १०८ | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय २ धर्माध्ययन
धर्माध्ययन
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
ग्रामगीता अध्याय दुसरा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय २
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
Gram Gita Chapter II Beginning
-🕉ग्रामगीता अध्याय २ धर्माध्ययन 🕉-
धर्माध्ययन
॥ श्रीगुरूदेवाय नम : ॥
देवे निर्माण केली क्षिती । प्रजा वाढवी प्रजापति । मानवसमाज राहाया सुस्थिती । धर्म सकळा निवेदिला ॥१॥
” धर्म ” बोलावया शध्द एक । परि त्याचा विस्तार अलौकिक । लौकिक आणि पारमार्थिक । मिळोनिया ॥२॥
अनेक प्राणी जेथे राहती । त्या सर्वाची राहावी सुस्थिती । समान समाधानाची गति । त्यास धर्म म्हणावे ॥३॥
आत्मरूपाची धारणा । सर्वाठायी समभावना । विश्वकुटुंब ऐशा आचरणा । धर्म म्हणावे निश्चये ॥४॥
आपुली साधावी उन्नति । सौख्य द्यावे इतरांप्रति । या उद्देशे जी जी संस्कृति । धर्म म्हणावे तिजलागी ॥५॥
परस्पराशी वागणूक । ज्यात न्याय – नीति सम्यक । प्रत्येकांचे कर्तव्य चोख । धर्म ऐसे त्या नांव ॥६॥
कोणाचा द्रोह न करून । करावा ऐहिक उत्कर्ष पूर्ण । साधावे आत्मसमाधान । हाचि बाणा धर्माचा ॥७॥
सर्वास असावा संतोष । दुःख न व्हावे प्राणीमात्रास । याचा सक्रिय कराया अभ्यास । धर्मनीति बोलली ॥८॥
भिन्न लोकांची भिन्न कामे । मिळोनी पुरती जीवनकर्मे । असोत भिन्न गुण भिन्न नामे । परि सुख सर्वाचे सहकारी ॥९॥
नको सत्तेचा बडगा त्यासि । नको दंडभय सत्कर्मासि । आपापले कर्म सर्वासि । धर्म शिकवी सर्वागे ॥१०॥
धार्मिक त्यासचि म्हणावे । सत्तेवाचूनि वागे बरवे । स्वये आपुल्याचि स्वभावे । समरस होई सर्वाशी ॥११॥
नको वैद्य अथवा डॉक्टर । आपणचि राहे आरोग्यतत्पर । नको वकील न्यायाधीश दंडधर । न्यायव्यवहार सहजचि ॥१२॥
नको धाक तलवारीचा । चुकीस्तव तळमळे आत्मा साचा । साक्ष देतो अंकुश देवाचा । अंतरामाजी ॥१३॥
ऐसे ज्याचे हृदयी स्फुरण । तोचि खरा धर्मवान । बाह्य अवडंबर धर्मचिन्ह । ते ते गौण, धर्म नव्हे ॥१४॥
शुध्द सात्विकता प्रकट करावी । लौकिकी तीच जागवावी । आपुल्या चारित्र्याने सांभाळावी । सुव्यवस्था जगाची ॥१५॥
व्यक्तिधर्म, कुटुंबधर्म । समाजधर्म, गावधर्म । बळकट होई राष्ट्र्धर्म । प्रगतिपथाचा ॥१६॥
व्यक्ति व्हावी कुटुंबपूरक । कुटुंब व्हावे समाजपोषक । तैसेचि ग्राम व्हावे राष्ट्रसहाय़क । राष्ट्र विश्वाशांतिदायी ॥१७॥
याकरिता जी जी रचना । तियेसि धर्म म्हणती जाणा । देशद्रोह अधार्मिकपणा । एकाच अर्थी ॥१८॥
मुख्य धर्माचे लक्षण । त्याग अहिंसा सत्य पूर्ण । अपरिग्रह ब्रम्हचर्य जाण । तारतम्ययुक्त ॥१९॥
निर्भयता शरीरश्रम । परस्पराशी अभेद प्रेम । पूरक व्हावया विद्या सत्कर्म । सकलासाठी ॥२०॥
सर्व विश्वची व्हावे सुखी । ही धर्माची दृष्टी नेटकी । ती आणावी सर्व गावलोकी । तरीच लाभ ॥२१॥
विश्वाचा घटक देश । गाव हाचि देशाचा अंश । गावाचा मूळपाया माणूस । त्यासि करावे धार्मिक ॥२२॥
व्यक्तिधर्म सर्वा कळावा । कुटुंबधर्म आचरणी यावा । ग्रामधर्म अंगी बाणावा । राष्ट्रधर्माच्या धारणेने ॥२३॥
व्यक्ति – व्यक्ति व्हावी धार्मिक । धर्म नव्हे एकांगी लटक । भौतिक आणि पारमार्थिक । विकास व्हावा सर्वाचा ॥२४॥
प्रत्येकासि शरीर, मन । वाणी, इंद्रिये, बुध्दि, प्राण । या सर्वाचे विकास साधन । तोचि धर्म ॥२५॥
ऐशा सदधर्माचे ज्ञान । आधी प्राप्त व्हावे सर्वागीण । मगचि त्यासारिखे जीवन । जगता येई या लोकी ॥२६॥
यासाठीच आश्रमव्यवस्था । पूर्वजांची उत्तम प्रथा । आरंभी मिळे धर्माची संथा । पुढे जीवन धर्ममय ॥२७॥
मानव पशूयोनीतूनि आला । नराचा नारायण होणे त्याला । यासाठी संस्कार देऊनि सावरिला । क्रमाक्रमाने ॥२८॥
मानवाकडोनि जे जे घडते । ते बरे – वाईट दोन्ही होते । त्यातूनि निवडावे लागते । पापपुण्य ॥२९॥
त्यांचे सुधारोनि आचरण । द्यावे लागते नवे वळण । जेणे आपले करील उध्दरण । इतरा सहायक होऊनि ॥३०॥
यासाठी धर्मे नेमिले संस्कार । आश्रम गोविले जीवनी चार । आयुष्य कल्पूनि वर्षे शंभर । विभागले ते उन्नतिस्तव ॥३१॥
मानवजीवनी करिता पर्दापण । ब्रम्हचर्याश्रम लागे जाण । जो सर्व आश्रमांचे मूलस्थान । पाया म्हणावा जीवनाचा ॥३२॥
ज्याचा ब्रह्मचर्याश्रम साधला । त्याचा पुढील काळ सुखी गेला । मग प्रत्येक आश्रम त्याला । उत्कर्षदायी होतसे ॥३३॥
या ब्रह्मचर्याश्रमचे साधन । चाले गर्भधारणेपासून । पोटातचि असता जीव पडोन । जतन करावा संस्कारे ॥३४॥
संस्कार दुष्परिणामकारी । न पडावे आतील गर्भावरि । म्हणोनी मातापित्यांनी सदाचारी । राहावे सदभावे ॥३५॥
न करावे अश्लील भाषण । न बघावे दृष्य हीन । न राहावे व्यसनाधीन । दुर्गुणी अन्न न खावे ॥३६॥
आहारविहार सात्विक पूर्ण । उत्तमगुणी चिंतन वाचन । न ऐकावे शृंगारगायन । गर्भवतीस घेवोनि ॥३७॥
येथोनि पाहिजे जतन केले । पुढे मूल जन्मासि आले । तेव्हापासूनि संस्कार घडले । पाहिजेत सत्कर्माचे ॥३८॥
घरी पुत्ररत्न जन्मले । काही दिवस त्याचे कौतुक केले । परि जन पुढे पाहू लागले । कर्तव्य तयाचे ॥३९॥
मुलगा काय खेळणे खेळतो । काय बघतो कोठे जातो । कैसा बोलतो चालतो गातो । पाहती जन ॥४०॥
मुलास जैसे कळो लागले । तैसे त्यास सांभाळणे अवश्य झाले । त्याचे समोर न पाहिजे बोलिले । दुर्विषय कोणी ॥४१॥
त्यावरि उत्तम संस्कार घडावे । म्हणोनीच व्रतबंधादि बरवे । शिकवावे पाठ करोनि घ्यावे । उत्तम विषय ॥४२॥
मग जो तो त्यासि म्हणे । काय रे ! केले की नाही वाचणे ? कैसा फिरतोसि रानेवने । वेडया – पिशासारिखा ? ॥४३॥
तुज नाही का संस्कार । घडावया सदगुणी व्यवहार ? काय करिती पालक चतुर ? लक्ष नाही तुझ्यावरि ॥४४॥
सांगितली नाही का स्नानसंध्या । स्मरावयासि जगदवंद्या ? नमस्कारिले नाहीस का प्रतिपाद्या । सकाळी सायंकाळी जाऊनि ? ॥४५॥
मग का फिरतोसि रानावना ? कैसा होशील शहाणा ? उपदेश देती ऐसा, सदगुणा । वाढवाया जन थोर ॥४६॥
घडावया उत्तम संस्कार मायबाप शिकविती सदाचार । व्हावया उत्तम गुणी चतुर । मोठेपणी ॥४७॥
आठवर्षांचे आतचि त्याला । पाहिजे उपनयन संस्कार केला । तोहि नको रूढीचा बांधला । नाटक नुसते बटूचे ॥४८॥
उपनयन म्हणजे विद्येचे व्रत । ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात । गुरुजवळी करणे समर्पित । जीवन त्याचे घडवावय़ा ॥४९॥
तोहि गुरु असावा ब्रह्मचारी । अथवा वानप्रस्थ तरी । त्याने घ्यावी काळजी पुरी । मुलांचिया ब्रह्मचर्याची ॥५०॥
त्याचे राहणे खाणे पिणे । खेळ खेळणे ग्रंथ वाचणे । लक्ष ठेवावे आचार्याने । मनोरंजनादिकावरि ॥५१॥
जरा चुकलिया चुकतचि जाते । मग सावरेना काही केल्य़ा ते । इंद्रिया वळण जैसे लागते । तैसेचि होते जन्मभरि ॥५२॥
म्हणूनि गुरुआश्रमी नियम । प्रत्येक आचरणी संयम । छात्रालयी हीच उत्तम । दॄष्टी असावी सर्वत्र ॥५३॥
मुलगा अभ्यासा लागला । की सात्विक खाणे असावे त्याला । खारट आंबट तिखट मसाला । देऊ नये भोजनी ॥५४॥
चमचमीत चुरचुरीत । अति मधुर तळीव पदार्थ । अथवा रुक्ष कृत्रिम मिश्रित । भोजनासि न द्यावे ॥५५॥
साधे ताजे अन्न द्यावे । वेळेवरि झोपवावे जागवावे । झोपता जागता जवळी नसावे । स्पर्शणारे कोणी ॥५६॥
कराया लावावे प्रातर्ध्यान । सांयकाळी प्रार्थना पूर्ण । झोपता जागता चिंतन । आदर्श महापुरूषांचे ॥५७॥
नित्य नियमे उषःपान । सुर्यनमस्कार आसन । पोहणे आणि निंबसेवन । आरोग्यदायी जे सोपे ॥५८॥
शीतजले करवावे स्नान । सकाळी रानीवनी गमन । करवावे नेहमी पठणपाठण । चारित्र्यवंतांचे ॥५९॥
शौकिन राहणी वर्जावी । सुगंधी अत्तरे फुलेहि त्यजावी । कोणी बाल न ठेवी तेल न लावी । ऐसे करावे ॥६०॥
बघू न द्यावे दर्पणी तोंड । वाढू न द्यावे पोषाखाचे बंड । पान बिडी चहाचे थोतांड । सर्वतोपरी वर्जावे ॥६१॥
कोणीहि न घ्यावे मादक द्रव्य । तोंडी नसावे नाटकी काव्य । समजावूनि द्यावे सेव्यासेव्य । उपवासहि करवावा ॥६२॥
कराया सांगावे आपुले काम । दुसर्यासाठीहि परिश्रम । शिकवावे बंधुभगिनी – प्रेम । सेवाधर्म शिकवावा ॥६३॥
बसवू नये मुलींसह शिक्षणी । तेथे संमिश्र नाटके कोठोनि ? स्त्रैणासंगती शृंगारगायनी । क्षणभरीहि बसो न द्यावे ॥६४॥
मुलाचे वय जसजसे वाढे । तोडावे स्त्रियाचे संबंध गाढे । नेहमी चरित्रवंतांचे धडे । द्यावेत तयासि ॥६५॥
विवाहादि कार्ये न दाखवावी । शृंगारकाव्ये न शिकवावी । व्यायाम दंगली खेळवावी । मुले निर्भयत्वे ॥६६॥
अश्लीलता कोठेहि न दिसावी । दिनचर्या आदर्श असावी । सकाळी सायंकाळी द्यावी । बौध्दिके ब्रह्मचर्याची ॥६७॥
सांगावे ब्रह्मचर्याचे महिमान । ब्रह्मचर्याचा उद्देश कोण । काय सेविल्या होते रक्षण । ब्रह्मचर्याचे ॥६८॥
ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माचरण । ब्रह्मतेजाचे साधन । विद्याप्राप्तीचे वर्तन । वीर्यरक्षण ब्रह्मचर्य ॥६९॥
ब्रह्मचर्यासमान कोण । जगी महत्त्वाचे साधन ? जो ब्रह्मचर्य करी पालन । तो देवासमान होतसे ॥७०॥
रिध्दिसिध्दी त्याच्या दासी । देव धावती त्याच्या हाकेसि । सूर्यासमान कांति तयासि । लाभतसे निरोगी ॥७१॥
भीष्मचा व्रतनिश्चय । कार्तिकेयाचे चातुर्य । शुकाचा ज्ञानयोग निर्भय । लाभे ब्रह्मचर्याने ॥७२॥
अवधूताची दृष्टी विशाल । हनुमंताचे महाबल । ब्रह्मचारी पावे महाचपल । वज्रदेह ॥७३॥
सर्व बळात वीर्यबळ । वीर्य नाही तो दरिद्री दुर्बळ । रोगांचिया मुखीचा कवळ । नेहमी होतो ॥७४॥
ज्याने वीर्य सांभाळले । यश तयासि माळ घाले । वीर्य क्षीण होता मृत्युने केले । शिकार त्यासि ॥७५॥
वीर्या अंगी आहे ओज । वीर्या अंगी नवे तेज । वीर्या अंगी आरोग्यबीज । बुध्दिसामर्थ्यहि ॥७६॥
ऐका वीर्य कैसे बनते । चाळीस शेर अन्न पचते । त्याचे एक शेर रक्त होते । वीर्य त्याचे दोन तोळे ॥७७॥
पुरुष रोज एक शेर जेवला । तरी एक महिना तीस शेराला । त्यात दीड तोळा उपजला । वीर्यरसबिंदु ॥७८॥
तो नष्ट होय एका क्षणी । केवढी थोर केली हानि ! द्रव्य मिळविले कष्ट करोनि । केली धुळधाणी हौसेने ॥७९॥
ब्रह्मचारी पतन पावला । महिन्याची कमाई खोवतो क्षणाला । केवढा हा तोटा झाला । आयुष्याचा ? ॥८०॥
साता दिशा अन्नरस होई । तो साता दिसा रक्तपण घेई । रक्तामधूनि मांस होई । थोडे थोडे ॥८१॥
त्यातूनि मेद आणि हाडे । साता दिसा मज्जा वाढे । मग वीर्य निपजे थोडथोडे । सप्ताहानंतरी ॥८२॥
बेचाळीस दिवसानंतर । वीर्य शुक्रधातु शक्तिकर । त्यासि किती प्रयास दिवसरात्र । अन्नखर्च कितीतरी ॥८३॥
ते अमोल वीर्य देहातील रत्न । ज्यावरि देहाचे जीवन । ते आरोग्यदायी अमृतकण । तेज वाढे रोमरोमी ॥८४॥
म्हणून यासि सांभाळावे । ओज सामर्थ्य वाढवावे । सूर्यचंद्रापरी शोभावे । ब्रह्मचर्याने ॥८५॥
ऐसे शिकवावे बाळा तरुणा । बौध्दिक द्यावे सर्व जना । बुध्दि बनता वेळ लागेना । जीवन आदर्श व्हावया ॥८६॥
गुरुजनी ऐसे द्यावेत धडे । आपुला आदर्श ठेवोनि पुढे । विद्यार्थी तयार होता चहूकडे । राष्ट्र होई तेजस्वी ॥८७॥
चोवीस वर्षे ऐसी गेली । त्याची जीवन – सफलता झाली । गृहस्थपणे गुढी उभारली । सत्कार्याची त्यापुढे ॥८८॥
ब्रह्मचारी घे गृहस्थपण । शंभर वर्षे जगे तयाचे संतान । रोगराई दुबळेपण । तया न बाधे सर्वथा ॥८९॥
यानेच गाव होईल आदर्श । बलवान बनेल सर्व देश । मानवासमाजाचा उत्कर्ष । होईल सर्वतोपरी ॥९०॥
हे साधाया पहिला उपक्रम । पाहिजे ब्रह्मचर्याश्रम । जेणे प्रजा होई कार्यक्षम । स्वतःसाठी तैसी राष्ट्रासाठी ॥९१॥
राष्ट्रासाठी जीवन बनविणे । त्यासि चारित्र्ययोग संपादणे । आरोग्यबल शरीरी राखणे । ब्रह्मचर्यायोगे ॥९२॥
परस्परात प्रेम राखणे । समाजाकरिता तत्पर होणे । त्यासाठीहि आधी जीवन बनविणे । हाचि पाया आवश्यक ॥९३॥
जे हे नियम मुलांसाठी । तीच मुलींकरिता रहाटी । वयाचीच मुख्य विषमता पोटी । राही तयाच्या ॥९४॥
भारती झाल्या ब्रह्मचारिणी । विद्यासंपन्न तेजस्विनी । त्यांचे आश्रम स्वतंत्र स्थानी । आदर्शरूप ॥९५॥
जोवरि हे होते आश्रम । तोवरि राष्ट्र बलवान उत्तम । वाढूनि व्यसने विषयप्रेम । पतन झाले समाजाचे ॥९६॥
धर्माचा पाया विद्यार्थीधर्म । तयासाठी ब्रह्मचर्याश्रम । त्यानेच जीवन होईल उत्तम । व्यक्तीचे आणि राष्ट्राचे ॥९७॥
म्हणोनि साधा या व्रतनियमाला । असेचि आश्रम काढा गावाला । शिकवा आपुल्या भावी पिढीला । लक्ष देऊनि मित्रहो ! ॥९८॥
मी हे जाणतो मागील वर्म । त्याकाळी सुलभ श्रध्दा संयम । तैसे आज करिता आश्रम । कठीण जाईल गावासि ॥९९॥
उपभोग सकलांचे वाढले । राहणीमाजी अंतर पडले । सभोवताली तार चढले । विषयसतारीचे ॥१००॥
मुलींचे विद्यालय अलग नाही । विधवाहि शृंगाराविण न राही । धाक कोणाचा कोणाहि । उरला दिसेना ॥१०१॥
नटवेष घुसले जीवनी । भुलविले चित्रपट – कादंबर्यांनी । अध्यापक तोचि विलासी व्यसनी । शृंगारकाव्य शिकवितो ॥१०२॥
रस्तोरस्ती खाद्य पेये । वैभवशाली विद्यालये । चैन हेच जणू जीवन ध्येय । कोणी सोय लावावी कोणा ? ॥१०३॥
ऐसे वातावरण जरी असले । तरी ह्रदयवंताने पाहिजे सुधारले । आपुले गाव बिघडू दिले । ऐसे न करावे सुज्ञाने ॥१०४॥
नियमित मुलांचे वर्तन । नियमित ठेवावे खानपान । नियमित ब्रह्मचर्याचे पालन । घडलेंच पाहिजे ॥१०५॥
सर्व भुक्तिमुक्तिसि कारण । असे ब्रह्मचर्य धर्मज्ञान । म्हणोनि विनवितो श्रोतेजन । इकडे दुर्लक्ष न व्हावे ॥१०६॥
ऐसे साधाल जेवढयापरी । संतान बळकट होई संसारी । गावाचे स्वास्थ वाढेल निर्धारी । तुकडया म्हणे ॥१०७॥
इति श्री ग्रामगीता ग्रंथ । गुरू – शास्त्र – स्वानुभव – समंत । धर्म ब्रह्मचर्य निवेदिले येथ । दुसरा अध्याय संपूर्ण ॥१०८॥
ग्रामगीता अध्याय दुसरा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.



















