ग्रामगीता अध्याय आडोतीसवा- 38 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्याय आडोतीसवा – 38
Gram Gita Chapter 38
ओवी संख्या :- १२०
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 38

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय आडोतीसवा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ३८
Gram Gita chapter thirty eight beginning

—-🕉ग्रामगीता अध्याय 38 ग्राम-कुटुंब


ग्राम-कुटुंब
श्रोते आत्मबोधी रंगले । म्हणती हेचि पाहिजे कथिले । साधुसंती हेचि सांगितले । सर्व जनांसी ॥१॥
धन्य धन्य आत्मबोध । ऐकता होय ब्रह्मानंद । येथे गावसेवेची ब्याद । कासयासि सांगावी ? ॥२॥
ऐसी श्रोत्यांची धारणा । ऐका आता समाधाना । एकाग्र करोनिया मना । सर्व जनहो ! ॥३॥
माझ्या जिवीचे मनोगत । मी सांगतो आता सत्य । ग्रामगीतेचा मतितार्थ । यातचि आहे सर्वहि ॥४॥
माझाच नव्हे हा विचार । सर्व संतग्रंथांचा सार । महात्म्यांची तळमळ अपार । तेच वर्म कथितो मी ॥५॥
आपण त्यांचे वाचता ग्रंथ । आत्मबोध ऐकता सतत । परंतु त्यांचे काय हृदगत । दुर्लक्ष झाले तयाकडे ॥६॥
जगी ज्यांनी घेतला स्वानुभव । ज्यांनी जाणले मूळतत्त्व । त्या सर्वाचा एकचि भाव । व्हावेत सर्व लोक सुखी ॥७॥
अवघाचि संसार व्हावा सुखी । मंगलता निघो सर्वामुखी । खळदुर्जनांचीहि दृष्टि निकी । व्हावी सर्वथा ॥८॥
मित्रता नांदावी सर्वजनी । उणीव न दिसावी कोठे कोणी । जी जी इच्छा करिती प्राणी । व्हावी पूर्ण ती न्याये ॥९॥
नको कोठेहि द्वेषवैर । न उरो कोठे हाहा:कार । दंभ मत्सर अत्याचार । अनाचार न राहो ॥१०॥
लया जावो जगाचा भेद । परस्परपोषक होवोत वाद । नांदो आनंदी आनंद । सगळीकडे सर्वदा ॥११॥
हीच तळमळ रात्रंदिनी । सारखी होती तयांचे मनी । जगी जे झाले थोर कोणी । महापुरुष कोठेहि ॥१२॥
त्यांनी कथिले आत्मज्ञान । तेहि सुखी कराया जन । आत्मवत जाणावे सर्वासि म्हणोन । प्रत्येकाने ॥१३॥
त्यांनी वर्णिले ईश्वर-भजन । तेहि शुध्द व्हावया मन । पाहावी देवाची लेकरे समान । म्हणोनिया ॥१४॥
त्यांनी कथिले त्यागवैराग्य । तेहि जग न मानता भोग्य । निष्काम सेवेने पावावे भाग्य । याचसाठी ॥१५॥
भूतदया परोपकार । दानधर्म यज्ञादि अपार । याद्वारे दु:खितांसि आणावे वर । अधिक ते ते देवोनि ॥१६॥
करावी समाजी समानता । म्हणोनीच ही साधने तत्त्वता । तीर्थादिद्वारे सामुदायिकता । शिकविली साधुसंतांनी ॥१७॥
एकमेकांमुखी काला द्यावा । समानभावे भात खावा । सोने वाटोनि स्नेह वाढवावा । ऐशा प्रथा कितीतरी ॥१८॥
सर्वामाजी एकचि भाव । आकुंचित न व्हावा मानव । सामुदायिक वृत्तीने करावे सर्व । विश्वचि सुखी ॥१९॥
सर्व मिळोनि एकत्वे रहावे । सर्वानी सर्वास चालवावे । सर्व भूत-हिती रत व्हावे । ऐसेचि वचन गीतेचे ॥२०॥
वेदापासूनि हाच घोष । समानसुखे नांदावा मानववंश । सर्व धर्मांचा हाच उद्देश । जिव्हाळयाचा ॥२१॥
परंतु हे सारे पडले पचनी । मानव राहिला मागासलेपणी । करमणूक झाली संत-वाणी । उच्च ज्ञानाची ॥२२॥
एक एकाचे घेवोनि शब्द । करिती चर्चा वितंडवाद । जीवनी उतरायाचा बोध । त्यासि नाही ठाव कोठे ॥२३॥
संतांनी कथिले ब्रह्मज्ञान । विशाल व्हाया मानवी मन । सर्वानी राहाया समान । परस्पर-सहकार्ये ॥२४॥
परि ते राहिले नुसते मुखी । स्वार्थाचीच वाढली शेखी । आपुला शेजारी मरो दु:खी । नाही चिंता आज कोणा ॥२५॥
चर्चेसाठी तत्त्वज्ञान । आणि चैनीसाठी जीवन । ऐसे घेतले भिन्नपण । मानवांनी वाउगे ॥२६॥
तेणे संतऋषींचा हेतु । ग्रासूनि गेला राहूकेतु । राम गेला बांधूनि सेतु । गोटे राहिले जैसे-तैसे ॥२७॥
त्यांना सांगावी संत-कहाणी । हाडे दिली दधीचींनी । जनसेवेसाठी ऋषिमुनि । रात्रंदिवस कष्टले ॥२८॥
दामाजींनी सुखविले जना । त्यातचि तृप्ति नारायणा । संत दादू करी पिंजणा । सेवाभावे ॥२९॥
हाती घेवोनि तूपवाटी । नामदेव लागे श्वानापाठी । संतोषवी जगी जगजेठी । कपडे शिवोनि ॥३०॥


सावतोबांनी शेत पिकविले । चोखोबांनी गाव झाडले । लोकसेवेचे महत्व कथिले । सर्व संतांनी ॥३१॥
कबिरांनी विणले शेले । जातिधर्मादि भेद निरसले । हे सर्व जरी सांगितले । तरी जाग नये त्यासि ॥३२॥
ते म्हणती हे साधूंकरिता । आम्ही प्रापंचिक सर्वथा । आम्हा पाप्यासि त्या कथा । ऐकल्याने पुण्य लाभे ॥३३॥
आम्ही सकळासाठी जन्मलो । सर्व मिळोनि राहाया आलो । परस्पराशी पाहिजे पूरक झालो । हे न कळे तया ॥३४॥
तेणे ग्राम झाले कुग्राम । नाही परस्पराशी निर्मल प्रेम । सर्वाचे स्वार्थ वाढले बेफाम । आपुल्याचि व्यक्तित्वाचे ॥३५॥
एक लाडू करोनि खातो । तेथेचि दुजा उपाशी राहतो । हे आम्ही गावोगावी पाहतो । मानती भूषण ते त्यासि ॥३६॥
एक हौसेने महाल करी । दुजास राहे घर कौलारी । तिजास कुडाचीहि झोपडी बरी । पाहता दिसेना ॥३७॥
एकास नाही जराहि वाव । एकास उधळपट्टीची हाव । एक बसोनि भोगी वैभव । कष्ट करोनि दु:खी एक ॥३८॥
सदा एक-दुसर्‍यासि जळती । एक-दुजाचे वाभाडे काढिती । किंवा नशिबावरि हात ठेविती । हाक देती देवासि ॥३९॥
कैसा होईल यांचा मिलाप ? कशाने फळेल संतसंकल्प ? कैसियाने होईल विश्वरूप । सुखी हे सारे ? ॥४०॥
यासाठी अनेक महात्मे झटले । परि जगाचे दु:ख नाही मिटले । उपदेश त्यांचे नाही उतरले । लोकजीवनी म्हणोनिया ॥४१॥
यासाठी शोधिला पाहिजे उपाय । जेणे जगी सुखशांति राहे । महापुरुषांचे समाधान होय । विचारू तैसे ॥४२॥
ऐसे संकल्प उठता । लागलो कराया विचार तत्त्वता । सापडला मार्ग निर्मळ हाता । ग्रामकुटुंबयोजनेचा ॥४३॥
उपदेश सुधारी काही लोका । परि समाजरचना देई धोका । तेणे आणता नये अनेका । प्रत्यक्षात संतबोध ॥४४॥
म्हणोनि समाज-रचना बदलावी । संतबोधावरि मांडणी करावी । ब्रम्हज्ञानासि सक्रियता द्यावी । समत्व आणोनि जीवनी ॥४५॥
देव एक असोनि अनंत झाला । नाना रूपे धरोनि नटला । परि तो पाहता एकचि दिसला । तैसे व्हावे जनलोकी ॥४६॥
एकाचे सुखदु:ख सर्वासि । सर्वाचा उपयोग एकासि । घटकासि आणि विश्वासि । सांगड व्हावी सर्वथा ॥४७॥
सर्व विश्वचि माझे घर । ऐसे बोलिले संत ज्ञानेश्वर । त्याचे प्रात्यक्षिक हे सुंदर । करावे ग्राम आपुले ॥४८॥
गावाची करावी आदर्श व्यवस्था । म्हणोनि कथिली ग्रामगीता । ग्रामापासोनि पुढे वाढता । विश्वव्यापी व्हावे ॥४९॥
जेथे गावाचाच न कळे धर्म । तेथे विश्वधर्माचे कैचे वर्म ? हेचि कळावया साधन सुगम । धरिले गावाचे ॥५०॥
मनुष्य ग्रामाचा संरक्षक । ग्राम देशासि पोषक । देश विश्वाचा घटक । ऐसे व्हावे यथार्थ ॥५१॥
मनुष्याचे सर्वस्व ग्राम आहे । त्याविण त्याला अस्तित्व नोहे । ग्राम सर्वागपूर्ण राहे । तरीच वैभव मानवाचे ॥५२॥
गावी एकाने माडी बांधली । सर्व घरे मोडून पडली । याने आमुची कीर्ति वाढली हे समजणे वेडेपणाचे ॥५३॥
खरा स्वार्थ तोचि करी । ज्याचा व्यवहार समाजा उध्दरी । नाही भिन्नत्वाची उरी । जयामाजी ॥५४॥
नाहीतरि उलट घडे । ऐसे चालत आले पोवाडे । श्रीमंत-गरीब हे आकडे । पुसले पाहिजेत या पुढती ॥५५॥
आपुला स्वार्थचि धरिला उरी । पर्वा इतरांची न केली जरि । तेणे आपणासहि शांति संसारी । न साधेल कधी ॥५६॥
म्हणोनि ज्यासि दूरदृष्टि आली । त्याने हीच ठेवावी बोली । देवाने ही दुनिया निर्मिली । सकळासाठी ॥५७॥
हीच खरी विकासाची वाणी । जाणेल तोचि खरा ज्ञानी । अभ्यास करावा सर्व लोकांनी । आतातरी ॥५८॥
हा अभ्यास नको शाब्दिक । बौध्दिक अथवा केवळ तात्त्विक । जीवनचि करा सामुदायिक । ग्राम-जन हो ! ॥५९॥
त्यानेच साधेल संत-उद्देश । ईश्वरी संकल्प येईल फळास । व्यवहारी लाभेल ब्रह्मरस । सर्व गावासि ॥६०॥
यावरि श्रोती विचारिले । आपण सामुदायिकत्व सुचविले । परि त्याचे स्वरूप कळले । नाही आम्हा ॥६१॥
तेचि ऐका सविस्तर । परमार्थमय हा व्यवहार । जेणे गावी वैकुंठपूर । नांदू लागे सहजचि ॥६२॥
शक्ति, बुध्दि, सत्ता, धन । आज ज्याच्या जे स्वाधीन । तो त्या त्या साधने स्वार्थ साधून । लुटतो गावा ॥६३॥
पाहती आपापल्या पुरते । लाभ इच्छिती आइते । इतर मेलियाची तेथे । पर्वा नाही कोणासि ॥६४॥
हे आकुंचितपण बाधक । पोसाया आपुले कुटुंबीय लोक । इतरासि मागाया लावित भीक । नाना मार्गे ॥६५॥
म्हणोनि स्वरूप द्यावे सामुदायिक । सर्व गावचि कुटुंब एक । श्रमती खाती सर्वचि लोक । ऐसे दृश्य दिसावे ॥६६॥
गावी जेवढी शक्ति बुध्दि । तो सर्व गावाचाचि निधि । ऐसे होता आधिव्याधि । नष्ट होतील सर्वचि ॥६७॥
आज मजुरा नाही शास्त्रीय ज्ञान । शास्त्रज्ञाअंगी श्रमाची वाण । तेणे वाढेल कैसे उत्पन्न । गावाचे आमुच्या ? ॥६८॥
श्रम करितील सर्व मिळून । तरि पिकू लागेल बरड जमीन । मार्ग काढतील बुध्दिमान । नव्या नव्या शोधांनी ॥६९॥
सामुदायिक प्रयत्नांनी । सामर्थ्य वाढेल कणोकणी । जेथे नसे घोटभर पाणी । तेथे सरिता वाहू लागे ॥७०॥


स्वच्छ पाण्याचे भरेल तळे । विहिरी, जागोजागी मळे । नदीचे प्रवाह होतील सगळे । शेतीसाठी उपयोगी ॥७१॥
नदी सागरी मिळावी । तिची अपार शक्ति व्यर्थचि जावी । ऐसी ईश्वरी इच्छाचि नसावी । उपयोगी यावी सर्वाच्या ॥७२॥
तैसीच मानवी शक्तिबुध्दि । स्वार्थींच वाया न जावी कधी । गावी नांदवाव्या ऋध्दिसिध्दी । नाना प्रयत्ने ॥७३॥
आमुचे गावचि आमुचे घर । सर्व व्यवहार सगळयांवर । सर्वाचा सर्वाठायी हातभार । असलाचि पाहिजे ॥७४॥
बुध्दिकाम, देहपरिश्रम । कलाकाम, कौशल्यौद्यम । ज्याचे असेल जे जे कर्म । ते ते वाहावे समाजा ॥७५॥
कोणी द्यावा आपुला धंदा । कोणी द्यावी सर्व संपदा । कोणी नोकरीचा पगार सर्वदा । समर्पावा या योजनेसि ॥७६॥
त्यात असावे चांभार-कुंभार । त्यात असावे सुतार-बेलदार । शिक्षक, शिंपी, लोहार, कलाकार । दाई, सेविका सर्वचि ॥७७॥
शेती उत्तम कसणारे । शेतीची योजना जमविणारे । वैद्य, कोष्टी, विणणारे- । कापड, साडया, सतरंज्या ॥७८॥
अजूनीहि जे गावी असती । त्यांची पाहिजे अधिक भरती । त्या सर्वाची शक्तियुक्ति । संघटित व्हावी गाव-सेवे ॥७९॥
धन द्यावे धनवानांनी । भूमि द्यावी जमीनदारांनी । श्रम द्यावेत मजुरांनी । सर्वतोपरी आपुले ॥८०॥
बुध्दि द्यावी बुध्दिवंतांनी । कला द्यावी कलावंतांनी । सेवा करावी वैद्य-डॉक्टरांनी । आळसी कोणी नसावे ॥८१॥
सर्व लोकांनी झीज सोसावी । गावसोयीसाठी जागाहि द्यावी । गरीबांची घरे दुरुस्त करावी । गाव-खर्चाने ॥८२॥
देवळांच्या जमिनी, पडीत खंडारे । वाटोनि द्यावे गरीबा सारे । व्यवस्था ठेवावी उत्तम प्रकारे । सर्वाच्याच जीवनाची ॥८३॥
सर्वानी समयदान करावे । घरे, रस्तेहि सजवोनि द्यावे । गाव नंदनवन बनवावे । सामुदायिक कष्टांनी ॥८४॥
कोणी नसावा गावी उपाशी । उद्योग द्यावे सकळ जनांसी । भीक मागण्याची प्रथा जराशी । नसावी गावी आमुच्या ॥८५॥
असो पुजारी वा पंडित । कामे करील जो उचित । तोचि राहील या गावात । सर्वानुमते सांगावे ॥८६॥
सर्वानी सारखेच काम करावे । आपुलाल्या कलेने बरवे । कष्टाविण कुणाला पोसावे । ऐसे नाही ॥८७॥
कष्ट करोनि वृध्द झाला । काम बदलोनि द्यावे त्याला । अथवा कोणी बिमार पडला । तरीच पोसावे सर्वानी ॥८८॥
असो साधु भक्त विद्वान । त्यांनीहि न खावे कष्टाविण । उलट आदर्श दावावा झटून । सर्व लोकासि ॥८९॥
मुखे भजावे गोविंदा । हाते करावा कामधंदा । प्रेम ठेवावे सदासर्वदा । सर्वेश्वराठायी ॥९०॥
आपुलाले काम करावे । सर्व लोकांशी इमानदार व्हावे । घेणे देणे सर्वचि करावे । प्रांजळ बुध्दि धरोनि ॥९१॥
जैसा गोरा कुंभार मडकी करी । नित्य उच्चारी हरिहरि । परि मडकियात बैमानी धरी । ऐसे कल्पान्ती घडेना ॥९२॥
जनाबाई संत झाली । परि गोवर्‍या वेचणे नाही भुलली । तैसीच चोख्याने भक्ति केली । ढोरे ओढता ग्रामाची ॥९३॥
खरा नाथ भक्तिवान । देई मागासल्यांना ज्ञान । खाऊ घाली पितरांचे अन्न । कष्टकर्त्या दीनजना ॥९४॥
एका पैचा न चुको हिशेब । म्हणोनि जागे, नसोनि लोभ । संतोषला पद्मनाभ । पाणी पाजता गाढवासि ॥९५॥
हेचि त्यांची खरी भक्ति । स्वये बोलला जगत्पति । नाचे सावत्याच्या मळयाप्रति । नेटके काम बघोनि ॥९६॥
ऐसे घडले पाहिजे साचे । काम करोनि ग्रामाचे । त्यात ठेवावे भक्तिरसाचे । हृदय आपुले ॥९७॥
जे जे गावी भिन्न उद्योग । त्यांचा जुळवावा संयोग । ठराविक जागी नाना प्रयोग । चालवावे गावात ॥९८॥
आपल्या कामाचा ठरला वेळ । सर्वानी झटावे लावोनि बळ । चिंता करू नये वेडगळ । भलतियाचि ॥९९॥
जो जो असे आपुला धंदा । तल्लीन राहावे कामातचि सदा । ठरल्या वेळी व्यवसायाबंधा । सोडूनि द्यावे सर्वानी ॥१००॥


नियमित वेळी काम करावे । नियमितपणे खेळ खेळावे । नियमित समयी प्रार्थने जावे । सर्व मिळोनि ॥१०१॥
एरव्ही सामुदायिक जीवन । हेचि प्रार्थना असे महान । गावासाठी कष्टावे पूर्ण । सेवाभावाने ॥१०२॥
काय नाही आपल्या गावी । याची चौकशी असावी । नसेल ती साजवावी । पुष्पवाटिका ग्रामासि ॥१०३॥
गाव-जीवनासि जे आवश्यक । त्याची मागावी नलगे भीक । ऐसे सर्वानी श्रमोनि करावे ठीक । जीवन सारे ॥१०४॥
कोणी गावास्तव जोडे शिवी । कोणी कपडे शिवोनि पाठवी । कोणी लोखंडी कामेहि बरवी । पाठवी वस्तुभांडारी ॥१०५॥
कोणी कपडा विणूनि आणावा । कोणी नवारी, दोर द्यावा । लाकडी कामे करोनि बरवा । आणतो कोणी ॥१०६॥
कोणी महिनोगणती शेती करी । हंगाम होता आणी दरबारी । प्रत्येक ऋतूचि तुरी-बाजरी । तांदूळ आदि सामुग्री ॥१०७॥
धान्य उपजवावे सर्वतोपरी । जे जे लागे गावी घरी । दुसरीकडोनि न घ्यावी माधुकरी । हेचि उत्तम ॥१०८॥
जे जे आपुल्या गावी होते । आपणचि वापरावे सामान ते । उरलेले विकावे भोवते । भिन्न गावी ॥१०९॥
सर्व गावाचे एक दुकान । सर्वाच्या सहकार्याचे प्रदर्शन । फायदा झालियाचे धन । सर्वाच्याचि मालकीचे ॥११०॥
सर्वचि धन हे सर्वाचे । हे उद्योगहि सकळिकांचे । हे भुवन प्रत्येकाचे । ग्रामचि आहे ॥१११॥
म्हणोनि सर्व एकत्र करावे । ज्याचे काम त्याला द्यावे । उणे असता अधिक मागावे । जास्त द्यावे खजिन्यामाजी ॥११२॥
अहो ! पैशांचे तोंड काळे । सर्व आपुल्याच गावी मिळे । न मिळता प्रयत्नबळे । तैसे करू ग्राम आमुचे ॥११३॥
आमुच्या गावीचे सर्व धन । ग्रामवासियांचे सुखस्थान । आम्ही सर्वचि मिळोन । करू स्वर्ग गावासि ॥११४॥
याहीवरि उणे पडे । तरि मागू देश-पित्याकडे । पूर्ण कराया पोवाडे । गावाचे आमुच्या ॥११५॥
ग्रामो जरि अधिक उरे । तरि देऊ परगावी संतोषभरे । यात तिळभरि अंतर न शिरे । कल्पान्तीहि ॥११६॥
आधी ग्राम असावे सुखी । कोणी न व्हावी कोणाशी पारखी । सर्व कामे गावीच निकी । करू आम्ही ॥११७॥
याच दृष्टीला धरोन नामी । व्याप्ति करू विश्वाची आम्ही । लावावया मानवता कामी । सकळिकांची ॥११८॥
ज्या ज्या मार्गे ऐसे घडे । तोचि धर्म तेचि ज्ञान रोकडे । तुकडया म्हणे समाधान जोडे । सकळ जनांसी ॥११९॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । सामुदायिक जीवन कथित । अडतिसावा अध्याय संपूर्ण ॥१२०॥
ग्रामगीता अध्याय आडोतीसवा समाप्त

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading