आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ग्रामगीता अध्याय सव्विसावा – 26 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय |
|---|---|
| ग्रामगीता अध्याय सव्विसावा – 26 Gram Gita Chapter 26 ओवी संख्या :- १०८ | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 26
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय सव्विसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय २६
Gram Gita chapter twenty-sixth beginning
ग्रामगीता अध्याय 26 मूर्ति-उपासना
मूर्ति-उपासना
ईश्वर सर्वाठायी व्यापला । तो पंथी नाही विभागला । मग उणे-अधिक कोणाला । का म्हणावे ? ॥१॥
ऐसे ऐकोनि निरूपण । एक श्रोता करी प्रश्न । देव विशाल व्यापक पूर्ण । मग का समर्थन मूर्तीचे ? ॥२॥
असो कोणाहि धर्माची खूण । परि मूर्ति मानवांनी केली निर्माण । तिथे कोठले देवपण ? तिचे पूजन कशाला ? ॥३॥
देव कुणाची पूजा नेघे । त्यास नको हे वाउगे । स्वये बोलला भक्तासंगे । ” मज हवे शुध्द प्रेम ” ॥४॥
याचे ऐकावे उत्तर । प्रेम निर्मावे एका मूर्तीवर । तेचि क्रमाने करावे विश्वाकार । हाच हेतु पूजनाचा ॥५॥
देवाची स्मरणमूर्ति बघता । त्याचे जीवनकार्य ध्यानी आणता । शक्ति येते मनासि तत्त्वता । मानसिक संयोगे ॥६॥
मनासि लावावया चिंतन । लागावया मार्गाचे आकर्षण । नेमिले असे प्रतिमापूजन । साधुसंती ॥७॥
मनास पाहिजे काही आधार । म्हणोनि आरंभीं मानिले साकार । देवे व्यापिले चराचर । तेथे मूर्ति तद्रुपचि ॥८॥
परि जो सिध्दान्ताचा पुरस्कर्ता झाला । त्यासहि जन देव बोलला । त्याचीहि प्रतिमा पूजू लागला । भोळेपणाने ॥९॥
जरी पूजिली व्यक्तिमूर्ति । तरी चुकले मी न म्हणे चित्ती । परि सिध्दांत वाउगे राखिती । हे तो आहे अज्ञानपण ॥१०॥
सुखासाठी आखिली दिशा । रेखिला घराचा नकाशा । परि लाभली शेवटी निराशा । नकाशाचि राखता ॥११॥
घर राहाया नाही मिळाले । नकाशे नकाशेच राहिले । तेणे समाधान भंगले । जाणीव होता पुढे पुढे ॥१२॥
तैसेचि झाले मूर्तिपूजेचे । जे जे पंथ दिसती आजचे । तेथील साधक मूर्तिपूजेपुढचे । काहीच नेणे ॥१३॥
तो मूर्ति धरोनीच बसला । मूर्खचि समजतो पुढचियाला । म्हणतो भ्रष्टाचार झाला । मूर्तिपूजेवाचोनि ॥१४॥
त्यासि कळला नाही धर्म । मूर्तिपूजेचे काय वर्म । उगीच वाढवूनि घेतला भ्रम । बिचार्याने अंतरी ॥१५॥
घरी देवाचा कट्टर पुजारी । असत्य करीत असे बाजारी । व्यवहार करिता झाला वैरी । ज्याचा त्याचा ॥१६॥
देवळामाजी कान घरी । नाक धरोनि प्राणायाम करी । बाहेर येता शिवी दे, कावरी । ज्यासि त्यासि ॥१७॥
देवाद्वारी हवन करी । बाहेर भिकार्यासि मारी । पोटा न दे चूनभाकरी । उपाशीयाच्या कधीहि ॥१८॥
आमचा देव सत्यचि बोले । परि आम्ही पाहिजे खोटे केले । ऐसे असोनि भक्त झाले । म्हणती आम्ही ॥१९॥
स्वये म्हणवी रामभक्त । नाही एकपत्नीव्रत । नित्य पूजितो हनुमंत । व्यसने झाला प्रेताऐसा ॥२०॥
देव दुर्जनासि संहारी । कष्ट करितो भक्तांघरी । भक्त बघा हा व्यभिचारी । आळसे घरी झोपतसे ॥२१॥
देव म्हणे ” मी सर्वत्र । दीनरंक माझे पुत्र ” । उपासक त्यासि दिवसरात्र । पिळोनि चैन भोगितसे ॥२२॥
” प्रभु आमुचा पतितपावन ” । म्हणोनि कंठरवे करी गायन । मानवासि अस्पृश्य हीन । मानून डौल मिरवितो ॥२३॥
देवाचिया मूर्तीसाठी । सोने हिरे बैसवी मुकुटी । न दे श्रमिकासि लंगोटी । मंदिर बांधता मेला तरी ॥२४॥
कसले हे देवपूजन ? मूर्तिपूजेचे विडंबन । केवढे शिरले आहे अज्ञान । आपणामाजी ! ॥२५॥
देवळामाजी करी भजन । बाहेर येता खोटे भाषण । ऐशा पुजार्या पुसेल कोण ? सांगा तरी ॥२६॥
म्हणोनि हे वाईट विसरावे । पूजेने पूज्यासि ओळखीत जावे । अभ्यासाने पाऊल टाकावे । पुढे पुढे ॥२७॥
जैसी ज्याची भावना । त्याने तैसीच मानावी देवता मना । परि न चुकावी उपासना । सत्कर्मांची ॥२८॥
मूर्तिपूजेचा अर्थ एक । आपण मूर्तीच व्हावे सम्यक । म्हणजे करावी तैसी वागणूक । अभ्यासाने ॥२९॥
जयाची मूर्ति उपासावी । तयाची चरित्रकथा वाचावी । पुढे कामेहि करीत जावी । आपणहि तैसी ॥३०॥
काय केले माझिया देवे । मजसी मुळीच नाही ठावे । फक्त मूर्तीच धरोनि बसावे । हे वेडेपणाचे ॥३१॥
ऐसी असावी उपासना । उपासनी वाढवावे कर्तव्यगुणा । कर्तव्यपूर्तीने मोठेपणा । अंगी घ्यावा मिळवोनि ॥३२॥
संकटे येता कार्यामाझारी । चिंतनी घ्यावे चारित्र्य अंतरी । अभ्यासाचे तेज वृत्तीवरि । वाढवावे सर्वकाळ ॥३३॥
चुकलिया संता विचारावे । पुढे कार्य करावयासि धजावे । आपुल्या परीने सुख देत जावे । जीवालागी ॥३४॥
यासाठीच मूर्तिस्थापना । ठायीठायी केली जाणा । आठवण राहावी साधकांना । म्हणोनिया ॥३५॥
पदोपदी हो पवित्र वृत्ति । म्हणोनि स्थळोस्थळी स्थापिली मूर्ति । वृक्षपशुपक्षी ठरविल्या विभूति । सदभावासाठी ॥३६॥
मनोभावे मूर्तीसि पुजावे । श्रवण, कथन, स्मरणादि करावे । मूर्तीप्रमाणे सत्कर्म घडावे । आपुलिया अंगे ॥३७॥
सर्व सोडोनि भिन्न भावना । हृदयी धरावी उपसना । जेणे प्रसन्नता येई मना । तेचि उत्तम समजावे ॥३८॥
मन जेथे समाधान पावे । तेथूनि शक्तीचे तेज घ्यावे । मग कार्यासि लागावे । सदगुणी ऐशा ॥३९॥
सदभावे करावे पूजन । विनम्र करोनिया देहमन । निर्मळ असावे वातावरण । ध्यान धराया देवाचे ॥४०॥
येथे मानसिक पूजेचेच महत्त्व । विचारसामर्थ्य हे मूलतत्त्व । तेणेचि पावे ईश्वरत्व । जीवालागी प्रयत्ने ॥४१॥
जीवासि मूळतत्त्व कळावे । सर्वाभूती आत्मरूप समजावे । ऐसेचि पूजनाचे गोडवे । वर्णिले संती ॥४२॥
संती बोलिले हरिनाम घ्यावे । हेहि वाटे साधन बरवे । परि अर्थ समजोनि जपावे । तरीच सार्थक जीवाचे ॥४३॥
नाम ईश्वराची शब्दमूर्ति । ” मुखी नाम हाती मोक्ष ” म्हणती । यज्ञाहूनि थोर जपावी महती । ठाऊक हे सर्वा ॥४४॥
परि कासयासि जपावे नाम । साधावयाचे ते कोण काम । या ध्येज्ञानावाचोनि सर्व कर्म । निरर्थक ॥४५॥
कितीतरी जन नाम घेती । माळा-मणी ओढीत राहती । परि क्षणहि त्यांची मति । रामी न रंगे ॥४६॥
मुखे नाम उच्चारिती । व्यवहार अधोगामी करिती । पापे करोनि शपथ घेती । देवधर्मांची ॥४७॥
कसले हे नाम जपणे ? स्वार्थे विश्वासघात करणे । आशातृष्णा न सोडणे । इंद्रियविषायांची ॥४८॥
येथे तारतम्यचि पाहिजे । नामजपी व्रतस्थ होइजे । तरी जीवास सुखाचे साजे । स्थान जीवनी ॥४९॥
मुखी नामाचे चिंतन । हाती सेवाकर्य पूर्ण । करील चारित्र्य संपादन । तोचि भक्त ॥५०॥
नामे शक्ति येते अंगी । संकटे निवारण्याची प्रसंगी । परि पुरुषार्थ असावा जंगी । तरीच फळे ॥५१॥
दुराचार सज्जन-विरोध । ऐसे दोष आणिती बाध । काया-वाचा-मने टाळिले अपराध । तरीच फळे ॥५२॥
मग ते नाम मंदिरी जपावे । अथवा शेतीमाजी घ्यावे । चालता बोलताहि गावे । तरी तो यज्ञ ॥५३॥
मुख्य नामाचे अधिष्ठान । कर्तव्य करावे संपादन । हेचि साधावया संतजन । नामजप सांगती ॥५४॥
जे पुरुषार्थ सोडोनि जपती नाम । त्यासि कैसा पावेल आराम ? हे तो झाले आंधळे काम । देवाद्वारी ॥५५॥
आमुचा राम कामे करी । आम्ही मागावी भाकरी । होवोनि फिरावे भिकारी । ही भक्ति कैची ? ॥५६॥
रामे असुरांसि मर्दावे । आम्ही पूजापात्र अवलंबावे । निर्बल होवोनि शरण जावे । ही भक्ति कैची ? ॥५७॥
भक्त म्हणजे विभक्त नव्हे । एकरूपचि होवोनि जावे । देवे लोकांचे दु:ख हरावे । आम्ही का करावे देवदेव ? ॥५८॥
ऐसा जप जयाने केला । तो शेवटी मूर्खचि राहिला । बोल देवोनिया देवाला । काय होते ? ॥५९॥
पापक्षालनासि नाम घ्यावे । पुढती पाप करीतचि जावे । ऐसे कोण वदले बरवे । सांगा मज ॥६०॥
ऐसी आहे ज्यांची स्थिति । त्यासि नामजपी म्हणती । मी म्हणेन कलंक लाविती । नामादिकासि ते ॥६१॥
याहूनि न जपे तो पुरवला । उत्तम राहणी ठेवी जो भला । दु:ख न देईच कोणाला । कोण्या प्रसंगी ॥६२॥
व्यवहार करीतसे कष्टून । जोडोनिया उद्योगे धन । सदा राहतो प्रसन्न । खेळीमेळी प्रेमभावे ॥६३॥
असेल ते गरजूंना देणे । कोणा उत्तम-वाईट न म्हणे । आपणा ऐसे सर्वाचे जाणे । सुखदु:ख सज्जन ॥६४॥
हेचि शिकावयासाठी । नामजप सांगितला उठाउठी । सदा राहणी गोमटी । प्रेमळपणाची सर्वाशी ॥६५॥
प्रथम नाम दुजे चिंतन । तिजे निश्चयी लावावे मन । मग होवोनि सत्कार्यप्रवण । समाजसेवा साधावी ॥६६॥
ऐसे सत्कर्म जरी नाचरवे । सदगुण विसरोनि नामचि गावे । तरी ते पूर्णतेस न पावे । आत्मोन्नतीच्या ॥६७॥
म्हणोनि संताचिया वचना । निरीक्षोनि ठेवावी धारणा । तरीच ग्रंथी कथिल्या त्या खुणा । पावती रामनामाच्या ॥६८॥
देव बोलला ” कामे करा । निर्भय होवोनि देशी विचरा ” । सकळ देवाचाचि पसारा । सेवाभाव साधा ॥६९॥
जनता ज्याला देवरूप कळली । त्याचीच भक्ति देवा पावली । साक्षात्कारे वृत्ति वळली । विश्वात्मभावी ॥७०॥
ते साधाया बोलिले नाम । लाभावया जीवास आराम । तुटावया अज्ञानभ्रम । दु:खमूळ जो ॥७१॥
आपण तरूनि जग तारावे । शक्तियुक्तीने विश्व भरावे । नामे लोकासि जागवावे । ऐसा आदेश संतांचा ॥७२॥
संतमुकुटमणि तुकाराम । त्यांनी अभंग कथिले अति सुगम । मार्ग केला व्यवहारक्षम । भोळयाभाळया जनांसाठी ॥७३॥
अत्यंत साधी गर्जली वाणी । गेली वेदादिकास भेदोनि । भ्रमचि निवारिला तत्क्षणी । अज्ञानी जडजीवांचा ॥७४॥
हजारो मुखांतूनि गरजला । ” वेदान्त आम्हासीच कळला ” । ” ज्याने पंढरीराज वंदिला । सर्व पावला शास्त्रगुह्य ” ॥७५॥
म्हणे ” नको ब्रह्मज्ञानादि भाव । आत्मस्थितीचा गौरव । आम्ही भक्त तू चहूकडे देव । ऐसे करी आम्हासि ” ॥७६॥
” कोठोनि आणावी विद्वत्ता ? सेवेचे काम आमुच्या हाता । नाम गाऊ कष्ट करिता । पंढरीनाथा पावाया ” ॥७७॥
प्रभूने ऐकिली त्यांची सेवा । संकटी आला ऐकोनि धावा । त्यांच्या शब्देहि लोक तरावा । ऐसा केला चमत्कार ॥७८॥
ऐसे झाले संत अनेक । मूर्तिभक्त बहु नामधारक । जे सेव्यचि झाले असोनि सेवक । हनुमंतापरी ॥७९॥
सर्वचि पंथांचे भक्तिप्रकार । तत्त्व साधता असती सार । हा आचरोनि दाविला समन्वय सुंदर । रामकृष्ण परमहंसे ॥८०॥
मूर्तिपूजा जपतप काही । तत्त्व साधता बाधक नाही । हे सिध्दचि केले अनुभवे पाही । संतजनांनी ॥८२॥
उत्तम भाकरी करिता यावी । म्हणोनि मुलीने मातीची करावी । तैसी अमूर्त देवाचा मार्ग दावी । मूर्तिपूजा ही ॥८३॥
देव आहे मूळचा अंतरी । त्याची साधना करावी लागे बाहेरी । ओळख पटता विचारे पुरी । भिन्नपणा राहीना ॥८४॥
सत्कर्मांचे ज्ञान झाले । सत्कर्म करणे अंगी आले । मूर्तिपूजेचे साधन संपले । साधकाचे ॥८५॥
राहिले जीवनात तैसे वागणे । देव भजता देवचि होणे । देव होण्याची कारणे । अनुभवोनिया ॥८६॥
माझा देव दयावंत । पुरवी हीनदीनांचे मनोगत । मजसी पाहिजे निष्ठावंत । तेचि केले ॥८७॥
ऐसा जप जाले अंतरी । हाती व्यवस्थेची चाकरी । लागला रंग याचिपरी । अहोरात्री देहाला ॥८८॥
आता परोपकारचि उरला । देव अंतरी-बाहेरी भरला । पाहणेचि नाही दुसर्या कोणाला । कोणे ठायी ॥८९॥
विसरोनि गेले व्यक्तिपण । झाले कार्यरूपचि आपण । ऐसे होता देवपण । अंगी आले धावोनि ॥९०॥
नाना विरोधकास तोंड दिले । नाना कष्ट सहन केले । शेवटी सर्वानी ठरविले । हेचि खरे म्हणोनि ॥९१॥
पूर्वी मूर्तीस शृंगार करी । तैसेचि मानवांसि शृंगारी । ” कष्ट नसो कोण तिळभरी । गावी माझ्या ” म्हणोनि ॥९२॥
हीच खरी देवपूजा । याविण नाही मार्ग दुजा । संतदेव बोलिले माझ्या । हृदयामाजी येवोनि ॥९३॥
देव जैसा जैसा आकळला । तैसा देह-अंहकार मावळला । लवणकण सागरी मिळाला । सागर झाला एकत्वे ॥९४॥
यापरी पुढची आहे पायरी । जैसी वृत्ति धरोनि चढाल वरी । तैसा जीव ब्रह्म होवोनि अंतरी । अनुभव घेई आपणचि ॥९५॥ .
म्हणे मीचि सर्व आता झालो । विश्वी विश्वाकार होवोनि ठेलो । सर्वचि कार्ये करू लागलो । आपणाचि साठी ॥९६॥ .
माझ्याविरहित कोणी नुरला । अणुरेणूमाजी मीचि संचला । ऐसा अनुभव येता झाला । पूर्ण योगी ॥९७॥
प्रथम पाहिली देवुळी मूर्ति । पुढे पाहिले जीवजनाप्रति । पूर्णता होता सर्वत्र व्याप्ति । आपुल्याचि रूपाची ॥९८॥
ऐसी लाभावया आनंद-ठेव । पूजावयासि मांडिला देव । द्रष्टा-दृश्य-दर्शनभाव । एकतत्त्वी दिसावया ॥९९॥
हाचि धरोनि निर्धार । केलिया नवविध पूजाप्रकार । पावेल सर्वोत्तम सार । ईश्वरभक्तीचा ॥१००॥
एरव्ही कितीहि पूजिली मूर्ति । तरी वाढचि घेईल भ्रांति । न मिळेल कदाकाळी शांति । जनामनासि ॥१०१॥
नसता वाढेल अहंकार । ” आमची प्रतिमा अधिक थोर ” । न मिटेल पंथद्वेष साचार । व्यापक ईश्वर जाणल्याविण ॥१०२॥
म्हणोनि प्रतिमा धरोनीच न बसावे । पायरीने वाढत जावे । क्रियाशीलपणे विश्वी पाहावे । विश्वंभरासि ॥१०३॥
सर्व लोकचि आमुचा ईश्वर । सर्व गावचि आमुचे मंदिर । सेवा करणे निरंतर । पूजा आमुची ॥१०४॥
प्रामाणिकतेने करणे काम । हेचि आमुचे ईश्वरनाम । सर्व जीवमात्राशी ऐक्यप्रेम । धर्म हा आमुचा ॥१०५॥
हाचि दृढ धरिता निर्धार । परमार्थ याहूनि नाही थोर । किंबहुना हाचि परमार्थ-सार । अनुभवियांचा ॥१०६॥
अंगीकारोनि या तत्वांसि । एक करावे सर्व भक्तांसि । लावावे पूजाया ग्राममंदिरासि । तुकडया म्हणे ॥१०७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । पूजनस्मरण-रहस्य कथित । सहविसावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥
ग्रामगीता अध्याय सव्विसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.



















