आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ग्रामगीता अध्याय पांचवा – 5 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय |
|---|---|
| ग्रामगीता अध्याय पाचवा- ५ Gram Gita Chapter ५ – 5 ओवी संख्या :- १३५ | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय ५ वर्ण व्यवस्था
वर्ण व्यवस्था
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय पाचवा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ५
Gram Gita Chapter V Beginning
—-🕉ग्रामगीता अध्याय ५ वर्ण व्यवस्था
वर्ण व्यवस्था
॥ श्रीगुरूदेवाय नम : ॥
साधावया पुरूषार्थ परम । आचरावया मानवधर्म । निवेदले चार आश्रम । गृहस्थाश्रम मुख्य त्यात ॥१॥
गृहस्थाश्रमीच समाज बहुतेक । त्याच्या गरजा असती अनेक । आणि प्रकृतीनेहि लोक । भिन्न भिन्न ॥२॥
जरी मानव दिसती समान । दोन हातपाय डोळे कान । तरी स्वभावाचे भिन्नपण । ओळखू येते ॥३॥
स्वरूपाची धारणा वेगळी । जी विचारे भरली सगळी । संस्कार खेळती चेंडूफळी । वेगळाले ॥४॥
एक शांत एक उग्र । एक चंचल एक एकाग्र । कोणे निवडावी समग्र । गुणकर्मे ती ॥५॥
मग मानव कैसा म्हणावा एक । अधिकारहि न दिसे सम्यक । त्याचे जीवनहि भिन्नतेचे निदर्शक । स्वभावापरी ॥६॥
भिन्न वृत्ति भिन्न प्रकृति । भिन्न कुटुंबे भिन्न संगति । ती आदळती परस्परावरती । ज्ञान नाही म्हणोनि ॥७॥
त्यात एक संधि ओळखू येते । स्वभावसाम्य निवडले जाते । राजस तामस सात्विक दिसते । प्रकृति वेगळाली ॥८॥
स्वभावाचे तीनचि प्रकार । त्यात बसती सर्व प्राणीमात्र । जितुके म्हणोनि विषयमंत्र । या जगी जीवकोटीचे ॥९॥
ज्याचे अंगी जो मुख्य गुण । त्यापरीच त्याचे सारे वर्तन । प्रत्येकाचे कर्म भिन्न । एकमेकापासूनि ॥१०॥
प्रत्येक भिन्न दिशेस जाई । तरि समाज कैसा सुदृढ राही ? मग कैसी उन्नति होई । व्यक्तीची आणि देशाची ? ॥११॥
हे धर्मवेत्त्यांनी जाणले । गुणकर्मविभाग ध्यानी घेतले । परस्परासि पूरक बनविले । समाजव्यवस्थेकारणे ॥१२॥
सत्त्वप्रधान रजप्रधान । मिश्रित आणि तमप्रधान । शुध्दाशुध्द लक्षूनि गुण । विभाग चार नेमिले ॥१३॥
निसर्गावरि केली रचना । म्हणोनि म्हणती ईश्वरी योजना । कल्पिले बुध्दि – बाहु – उदर – चरणा । समाजपुरूषाच्या ॥१४॥
मुळात सर्वचि एकसम आहे । परि अनंत गुणे व्यापले राहे । गुण गुणासि पोषक होय । यासीच संसार बोलती ॥१५॥
धंदे असती अनेक गुणांचे । परि मुख्य भेद चारचि त्यांचे । म्हणोनि ” चातुर्वर्ण्य ” नांव याचे । ठेविले ऋषिजनी ॥१६॥
संरक्षण देती ते क्षत्रिय । व्यापार करिती ते वैश्य निर्भय । न्यायदर्शन योजनाकार्य । ब्राह्मणवर्णा नेमिले ॥१७॥
या तिन्ही कामी अनधिकारी । तया शूद्र नाम निर्धारी । करी सर्वाची सेवाचाकरी । तोहि सर्वासि पूरक ॥१८॥
सत्य न्याय अस्तेय संयम । सर्वासि सारखाचि नियमधर्म । परि आपापले भिन्न कर्म । वाहूनि पूजिती समाजदेवा ॥१९॥
जो ज्यापाशी उत्तम गुण । त्यानेच त्याचे चालावे जीवन । व्हावे समाजाचेहि धारणपोषण । हीच योजना चातुर्वर्ण्यी ॥२०॥
भिन्न गुणांचा सहकार्य – संगम । त्यात सर्वाचाचि योगक्षेम । मग कैसा चाले जीवनसंग्राम ? वर्गकलह न राहे ॥२१॥
सर्वकाली सर्वदेशी । नैसर्गिक गुणभिन्नता ऐसी । म्हणोनि वर्णाश्रमयोजना जगासि । शांतिदायी ॥२२॥
परि हे तत्त्व राहिले मागे । आसक्तीचे जडता धागे । आपुला पुत्र शूद्रापरी वागे । तरी त्या गणावे आपुल्यावर्णी ॥२३॥
नजरेआड केले कर्मगुण । जन्मावरोनि चालले वर्ण । धंद्यांवरोनी जाति भिन्न । वाढल्या लोकी ॥२४॥
त्यातहि ज्ञात्यांनी । ठेविले धोरण । कर्मांतूनि गुण निर्माण । केले संस्कारांची देऊनि घडण । जन्मलेल्यासि त्या वर्णाचे ॥२५॥
पूर्वी त्यासाठी होते संस्कार । शिक्षणक्रम शिकवी व्यवहार । मागील ऋषी असती चतुर । समाजव्यवस्था चालवाया ॥२६॥
तयांनी कुटुंबेच संस्थामय केली । बालपणापासून शिकवण दिली । परंपराचि तैसी बनविली । प्रयत्नांनी गुणकर्माची ॥२७॥
शेतकर्याच्या मुलास शेती । तलवार क्षत्रियपुत्राहाती । वैश्याची मुले तराजू धरती । लहानपणापासूनि ॥२८॥
ब्राह्मणाच्या मुला मंत्रजप । शिकविला जाई आपोआप । ऐसा हा परंपरेचा व्याप । चालला होता ॥२९॥
जो जयाने धंदा केला । त्याचा स्वभावचि तो बनला । स्वभाव बनता संस्कार जडला । अंगी तयाच्या ॥३०॥
तैसेचि मग त्याचे वर्तन । तैसेचि खेळणे बोलणे भोजन । अंगे – अंगे जाती बनून । संस्कारसंगे ॥३१॥
परि ही परंपराहि मोडली । सत्तालोभे फूट पाडली । लहानथोरासि भावना वाढली । उपभोगाची ॥३२॥
काही आपत्ति काही संगति । काही सत्ता काही प्रकृति । यामुळे दुसर्यांचे धंदे हाती । घेतले सुखास्तव ॥३३॥
वैश्यधंदा एकाने धरला । व्याजभोगी व्यापारी बनला । आपुल्याहि मित्राचा घेतला । मुनाफा त्याने ॥३४॥
त्यात तारतम्यचि न राही । भरमसाट वाढली मुनाफशाही । जनतेचे हित कोण पाही । मिसळून देई माल खोटा ॥३५॥
खोटे बोलणे सहजी घडे । स्वार्थापायी पाप वाढे । यास कोण सांभाळील चोखडे । सत्ता नसता जागरूक ॥३६॥
सहज कोणी त्यास म्हणावे । तरि शत्रुभाव अधिक बळावे । मग दोघांचेहि धंदे बरवे । एकाच मार्गी ॥३७॥
गावचे लोक विरुध्द होती । म्हणती आमुचीच का धर्मे फजीती ? तेहि पुढे कामचोर होती । अडवणूक करिती वैश्याची ॥३८॥
सर्वामध्ये कलह माजे । त्यासि निवारावे क्षात्रतेजे । तरि तेहि बिचारे पोटाच्या काजे । धावती स्वैर ॥३९॥
जिकडे पैसा मान मिळे । तिकडे धावती क्षत्रियबाळे । न्यायनीती कोण सांभाळे ? झुके पारडे पैशांनी ॥४०॥
चोरी पकडण्या चोर धावले । शिपायीबाणा घेऊनि भले । तेणे चोरांना अधिकचि फावले । चोरी करण्या गावाची ॥४१॥
तेथे ब्राह्मणांनी करावे न्यायदान । सर्वासि ठेवावे सेवापरायण । तरि तेहि पाहूनि दान मान । झाले त्यांचेच साह्यकारी ॥४२॥
पुढे ऐसीच झाली रीति । दंडुकेशहासि क्षत्रिय म्हणती । चोरव्यापारी त्यासि बोलती । लोक वैश्याधिकारी ॥४३॥
बुध्दीने जो फाटाफूट करी । तो ब्राह्मण जाहला निर्धारी । ऐसी बिघडली वर्णव्यवस्था पुरी । गावोगावी ॥४४॥
त्यामाजी जो कमजोर ठरला । तो शुद्र म्हणोनि बाहेर काढला । अन्नान्नदशा करोनि सोडला । जीवनकलही ॥४५॥
वर्णजातीचे गुणकर्म नाही । मोडून केली नोकरशाही । नागविली भावना सर्वहि । वर्णाश्रमाची ॥४६॥
अभिमान राहिला वर्माचा । चुराडा झाला गुणकर्माचा । ऐसा घडविला संस्कार गावाचा । घडी काही बसेना ॥४७॥
ऐसे मुळीच पूर्वी नव्हते । परस्परपूरक धंदे सर्व ते । सर्वाचेच कल्याण त्यात होते । समभावाने ॥४८॥
परि तो सारा वर्णाश्रम । आज होऊनि बसला भ्रम । वर्णांश्रमातील नेमिले काम । बहुतेकांनी सोडले ॥४९॥
ब्राह्मण जोडे शिवण्यासि लागला । चांभार तो पुजारी बनला । क्षत्रिये नोकरीपेशा धरिला । वैश्याघरी ॥५०॥
वैश्य लढे सैन्यात जाऊन । शुद्र करिती कथाकिर्तन । यासि वर्णसंकर म्हणती जन । करिती मात्र सर्वचि ॥५१॥
परि जाति मागचीच सांगती । कामे मात्र भलतीच करिती । तेणे होते अनिश्चिती । समजावया लोकासि ॥५२॥
वडिलांचा धंदा भिन्न होता । तो मुलाच्या जव नसे हाता । तरि वडिलांचा धंदा मुलाने सांगता । अर्थ काही निघेना ॥५३॥
म्हणोनि जेणे जे काम करावे । त्याच वर्णजातीचे म्हणवावे । ऐसे तरी असावे बरवे । वर्णजाति मानलिया ॥५४॥
ऐसेचि नामाभिधान चालते । आणि सर्व लोक तैसेचि वागते । तरि वर्णव्यवस्था भ्रष्ट झाली म्हणते । कोण कैसे ? ॥५५॥
परि जन ऐसे म्हणवाया लाजती । कर्मे मात्र विपरीत करिती । पूर्वजांचिया नावे जगती । आळशापरी ॥५६॥
जरी झालो कर्मभ्रष्ट । तरी आपण इतरांहूनि श्रेष्ठ । ऐसा प्रतिष्ठेसाठी बळकट । धरिली रूढि ॥५७॥
वास्तविक कामाकरिता वर्ण झाले । समाजासि सर्वचि लागले । म्हणोनि सर्वानाचि महत्त्व भले । ब्राह्मणापासोनि महारावरि ॥५८॥
त्यात ” तू नीच मी उच्च ” म्हणोन । वाढविले आडंबर पूर्ण । त्यानेच जाहले पतन । वर्णांचे आणि गावाचे ॥५९॥
प्रत्येक धंद्याचे गम्य भिन्न । वेगळी खुराक वेगळे वळण । यासाठीच होते वेगळेपण । रोटीबेटी – व्यवहाराचे ॥६०॥
तेथे अज्ञानाने भेद पाडले । हाती सत्ता ते मोठे ठरले । समाजाची स्वच्छता करीत मेले । ते ते बोलिले नीच ऐसे ॥६१॥
वास्तविक नीचता दुराचारे होते । खरी उच्चता तपाने लाभते । जातीमातीवरि कैसी ठरते । उच्चनीचता ? ॥६२॥
ज्याने काही नीचता केली । समाजाने त्यास शिक्षा दिली । म्हणोनि अस्पृश्यता बोलली । काही कारणे ॥६३॥
परि त्यांची पीढीच नीच समजावी । आपुली नीचता ती लपवावी । दुसर्याची उत्तमताहि न गौरवावी । प्रथाच पडली यापरी ॥६४॥
अरे ! हे कुठले न्यायदान ? हे तो गुलामीचे लक्षण । याने कैसे होईल पुनर्निर्माण । गावाचे आमुच्या ? ॥६५॥
म्हणोनि अस्पृश्यता क्रियेवरि मानावी । जाति सर्व एक जाणावी । आपापल्या परीने उचलावी । कामे सकळांनी ॥६६॥
जाति सर्वाचि एकचि आहे । परि धंदा गुणकर्मासम राहे । आपल्या उद्योगाच्या प्रवाहे । ओळखी द्यावी ॥६७॥
येरव्ही सर्वत्रचि सर्व वर्ण । सर्वातचि दिसती सर्वगुण । परि कोणते गुणप्राधान्य । तेचि ओळखावे मुख्यतः ॥६८॥
शुद्राघरी उत्तमवर्तनी जन्मला । तो शूद्रचि कैसा राहिला ? तैसा क्षत्रियाघरी भ्रष्ट निपजला । तो क्षत्रिय कैसा ? ॥६९॥
एक ब्राह्मण दुकानी बैसला । मांसमच्छी विको लागला । त्याची पूजा कराया एक गेला । शोभा देईल काय ते ? ॥७०॥
ब्राह्मण म्हणवूनि विलास करी । नाना व्यसने अंगीकारी । करी नोकरी सावकारी । तो ब्राह्मण का मानावा ? ॥७१॥
परंपरेने गोसावी होणे । मग त्याने विवाहाचा थाट करणे । ते केवढे होय लाजिरवाणे । लोकामाजी ? ॥७२॥
आचार्य आणि आचारी । एकाच जातीचे अधिकारी । म्हणोनि काय आदर एकाचपरी । करावा लोकी निष्ठेने ? ॥७३॥
ऐसे कोणासहि ब्राह्मण म्हणावे । पूजूनि त्याचे पाय वंदावे । त्याने जोडयांच्या दुकानी नोकर का न व्हावे । पाय पुसाया ? ॥७४॥
वास्तविक जातिवंत जे ब्राह्मण । त्यांनी स्वतःच टाळावे हे पूजन । म्हणावे माणुसकीनेच नमन । करूया सर्वा ॥७५॥
आपण वेगवेगळा धंदा करणारे । सर्व बरोबरीचे मित्र बरे । हे पूजेचे ढोंग सारे । आम्हीच कासया करावे ? ॥७६॥
ऐसे लोकासि शिकवावे । बिघडले दिसेल ते सुधरावे । जनासि उद्योगि बनवावे । आपुल्यापरी ॥७७॥
” जेथे दिसती ब्राह्मणाचे गुण । त्यासि आदरे म्हणावे ब्राह्मण ” । ऐसा स्थापिलाचि आहे सनातन । नियम वर्णाश्रमाचा ॥७८॥
म्हणोनि गुणावरचि लक्ष द्यावे । ” जो ज्या गुणी तो त्या वर्णी म्हणावे । सर्व गुणांचा आदर स्वभावे । सर्वाकरिता असावा ॥७९॥
जो जैसा कर्म करू लागला । तो त्याचि वर्णाचा अधिकारी झाला । सर्वत्र नियम हा चालला । तरीच होईल सुव्यवस्था ॥८०॥
येथे संशय उभा झाला । विविध कर्मे करावी लागती एकाला । तरि काय वेळोवेळी म्हणो त्याला । ब्राह्मण क्षत्रियादि गुणाऐसे ? ॥८१॥
एक वैश्यकर्मी असला । परि ध्यानासाठी मंदिरी बसला । तरि तो वैश्य कैसा ठरला । तया स्थानी ? ॥८२॥
एक भंगी – काम करी । वेळ मिळताचि ये प्रार्थनामंदिरी । त्याचे भंगी नामचि उच्चारी । कोणत्या न्याये ? ॥८३॥
त्या क्षणी तो खराच ब्राह्मण । परि त्याचे नित्यकर्म अन्य । म्हणोनि प्रामुख्याने नामाभिधान । धंदे पाहूनि ठेविती ॥८४॥
एकाचे लक्ष्य मुख्यतः व्यापार । परि तो करितो कीर्तन सुंदर । म्हणोनि त्यास ब्राह्मण म्हणणे साचार । होईल कैसे ? ॥८५॥
सदब्राह्मण शेती करू लागला । म्हणोनि तो माळीच मानला । याने येईल क्षणाक्षणाला । अनवस्थाप्रसंग ॥८६॥
बहुरूपी कधी राजे बनती । म्हणोनि काय राज्य चालविती ? ज्याची कला त्याचे सांगाती । येरा काय वैभव ते ? ॥८७॥
म्हणोनि याची ऐसी आहे रीती । ज्यात ज्याची मुख्य अंतरवृत्ति । त्याच्या जीवनाची निश्चिती । दाखवि ते विशेष कर्म ॥८८॥
त्याचे विशेष कर्म कोणते । गुण कोणते विषय कोणते । अंग कोणते अंतरंग कोणते । ते पाहूनि नाम ठेवावे ॥८९॥
ज्यामध्ये ज्याचे सर्व तनुमन । सर्वस्व ज्यांचे ज्यात लवलीन । ऐशा प्रमुख गुणावरून । म्हणावा तो त्या वर्णाचा ॥९०॥
येथे म्हणण्याचेचि नाही महत्त्व । जे जयाचे असेल सर्वस्व । त्यापरी त्याचा व्हावा गौरव । समाजामध्ये ॥९१॥
समाजाची रचना नेटकी । बसेल तैसे करावे कौतुकी । दीक्षा घ्यावी समजोनि निकी । गुणकर्माची ॥९२॥
जाणत्यांनी तत्त्वे अभ्यासावी । रूपांतरे व्यवहारी आणावी । बिघडली घडी दुरुस्त करावी । समाजाची ॥९३॥
सुखी व्हावा गृहस्थाश्रम । मिटावा जीवनाचा संग्राम । सहकार्याने नांदावे ग्राम । यासाठी बुध्दि सर्वा द्यावी ॥९४॥
जेव्हा गुण गुणांशी द्रोह करी । तेव्हा पडे बुध्दि अपुरी । हे सांभाळण्याचे कार्य करी । ब्राह्मण ते ॥९५॥
गुणासि गुणाचे सहकार्य । मिळोनि व्हावे सफल कार्य । हा सृष्टिक्रमाचा व्यवसाय़ । ब्राह्मण्याकडे ॥९६॥
हे करावया ऐक्य निर्माण । आज पाहिजेत गुणवंत ब्राह्मण । ब्राह्मण्यावाचूनि हे साधन । घडेचि ना ॥९७॥
सामुदायिक बुध्दीची शिकवण । सर्व जीवात समत्वस्थापन । विषम पात्रांचे समाधान । करूण देणे ब्राह्मणकर्म ॥९८॥
ब्राह्मण तो दूरदृष्टि । त्याचे घरचि समष्टि । सुरळीत चालण्या होय कष्टी । ब्राह्मण तो ॥९९॥
ब्राह्मण ह्रदयाचा अति निर्मळ । दुष्टबुध्दीचा महाकाळ । हिंसेवाचूनि करी प्राजंळ । मन दुर्जनांचे ॥१००॥
शक्तियुक्तीचा उदार । भक्तिमुक्तीचा आधार । सर्वोदयाने संसार । नटवी जो ॥१०१॥
जो सर्वासि प्रेमे सांभाळी । गावसेवाचि मानी आगळी । उणे पडो नेदी कधीकाळी । कोण्या प्रकारे ॥१०२॥
त्याचे लक्ष नोहे येरव्ही । जे बिघडेल ते नीटचि करवी । जुळवाजुळवीची पैरवी । ब्राह्मणाकडे ॥१०३॥
सर्वाशी सर्वाचे जळवावे । कीर्तिस्फूर्तीने ग्राम भरावे । लौकिक पारमार्थिक पडो न द्यावे । उणे ग्रामवासियांचे ॥१०४॥
गाव करावे व्यवहारचतुर । त्यात भरावे निर्मळ संस्कार । परस्परात निर्मावा सहकार । न्यायनीतीने चालण्या ॥१०५॥
हे शिकवाया थोरांच्या कथा । सांगत जाव्या मिटाया व्यथा । त्याग वाढवावा उचित प्रथा । थोरामोठयांच्या दावूनि ॥१०६॥
त्यासाठी कृष्णकथा रामजन्म । चालवावा महात्म्यांचा पुण्यतिथिक्रम । ग्रंथांतरीचा न्यायसंग्राम । शिकवावा निर्भय व्हाया ॥१०७॥
प्रत्येकाचे कर्तव्य सांगोनि । आपुल्या उत्साहे उद्योगी लावोनि । करावी ग्रामाची मेळणी । विशाल मार्गे ब्राह्मणे ॥१०८॥
असोनिया गावी ब्राह्मण । पडली तटे चालले भांडण । तरि समजावे । तो पावला पतन । गाव मोकाट सुटले हे ॥१०९॥
त्याने आपली निष्ठा सोडली । म्हणोनि लोकांनी हेळसांड केली । त्याचेकडे का न आली । पुकार लोकांची ? ॥११०॥
जव ब्राह्मणचि चुको लागले । तव गावचि स्वैराचारी झाले । नाना तर्हेचे तमाशे माजले । गावामाजी ॥१११॥
लोकश्रध्देत व्हावया बदल । काय कारण घडले प्रबल ? हे जाणेल तोचि निर्मल । त्यागी तपस्वी ॥११२॥
प्रभाव ऐसा अंगी यावया । त्याग यपनियमांची दीक्षा तया । पाहिजे, म्हणोनि तपश्चर्या । करावी लागे ब्रह्मकर्म्या ॥११३॥
आबालवृध्दा समजविण्यासाठी । ओज तेज असावे पाठी । म्हणोनि जपतप, सदग्रंथ कंठी । धारण करावे ब्राह्मणाने ॥११४॥
उपदेश देता रागावू नये । लोभे चुकवू नये निर्णय । म्हणोनि सांभाळावा इंद्रियजय । अध्यात्मउपाय त्यासाठी ॥११५॥
आधी त्याग त्याने करावा । तरीच मग लोकासि शिकवावा । याच मार्गे परिणाम पहावा । लोकामाजी आपैसा ॥११६॥
ही दीक्षा ज्याने घेतली । आपुली भोगवासनाचि निरसली । त्यासीच ब्राह्मण संज्ञा मिळाली । वर्णाश्रमाची ॥११७॥
ऐसे गुण जो धरण्यासि चुकला । तो ब्राह्मण म्हणोनि गौरविला । तरि व्यर्थचि आहे त्याला । पदवी अजागळापरी ॥११८॥
जातिवेषासि वंदणे । हे तो दुसर्याचेचि सोने । फिटले कोणाचे पारणे । रुईफळे खाऊनि ? ॥११९॥
ब्राह्मण मुळी जाति नोहे । ती विशालतेची पदवी आहे । हे समजोनि धरावी सोय । ग्रामवासियानि ॥१२०॥
सर्वाघटी ब्रह्म ईश्वर । पाहूनि होई सेवातत्पर । तोचि ब्राह्मण सर्वावर । प्रभाव पाडी नम्रतेचा ॥१२१॥
त्याचे चारित्र्य बघूनि उज्ज्वल । लोभ करिती त्यावरि आबाल । सर्वासीच सांगे विशाल । धर्म मानवजागृतीचा ॥१२२॥
ब्राह्मण असे अस्पृश्यांचा । क्षत्रियांचा वैश्यादिकाचा । कोणाशीच पारखा त्याचा । शब्द नाही ॥१२३॥
त्याने सर्वाचे भले पाहावे । भिन्न गुणांचे लोक जुळवावे । आणि गाव चालवूनि संतोषावे । बुध्दि देवोनि ॥१२४॥
उगीचचि लोक ना ऐकती । त्यासि दंड देईल हा ब्रह्ममूर्ति । परि ग्रामी वाईट चालीरीती । प्राण गेल्या न ठेवी ॥१२५॥
ब्राह्मणाचे वचन ना ऐके । तो तिन्ही लोकी न टिके । याचे कारण हेचि इतुके । ब्राह्मण अनर्थ करीना ॥१२६॥
त्याची हेचि साध्यमुद्रा । शांति लाभावो आब्रह्मशूद्रा । ग्रामसुखात सुख लोकेंद्रा । तपस्वियासि ॥१२७॥
म्हणोनि ब्राह्मणवर्ण श्रेष्ठ बोलला । उगीच नाही डांगोरा पिटला । भृगूची लाथहि झेलता झाला । देव माझा ॥१२८॥
ऐसे ब्राह्मणत्व निर्माण करा । प्रचारक होऊनि घरोघरी फिरा । तरीच सर्वासि मिळे आसरा । सुखशांतीचा ॥१२९॥
हे ब्राह्मणत्व नव्हे जातीय । कुणीहि साधावे निर्भय । जो आदर्श प्रचारक होय । तोचि ब्राह्मण निर्धारे ॥१३०॥
ब्राह्मण सर्वाची सदबुध्दि । ती करील अन्य गुणांची वृध्दि । गावी नांदतील ऋध्दिसिध्दि । गुणकर्माच्या सहकारे ॥१३१॥
हरिकथानिरूपण राजकारण । सावधपण सेवाप्रयत्न । हा चारी वर्णांचा सार न्यूनपूर्ण । प्रत्येकाने आचरावा ॥१३२॥
लोकशिक्षण न्याय रक्षण । जनांचे पोषण आणि श्रमदान । यासाठी जे जे करितील प्रयत्न । त्यांना साधेल वर्णाश्रम ॥१३३॥
स्वभावे सर्वानी कर्म करावे । गाव सौंदर्ये साजवावे । सर्वासह उध्दरोनि जावे । तुकडया म्हणे ॥१३४॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र स्वानुभव संमत । वर्ण – धर्म निरूपला येथ । पांचवा अध्याय संपूर्ण ॥१३५॥
ग्रामगीता अध्याय पाचवा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.



















