ग्रामगीता अध्याय आठवा – 8 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषयओवी संख्या
ग्रामगीता अध्याय आठवा- ८
Gram Gita Chapter ८ – 8
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
१२६
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजनेहिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय ८ प्रचार – महिमा
प्रचार-महिमा

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय आठवा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ८
Gram Gita Chapter VIII Beginning


—-🕉ग्रामगीता अध्याय ८ प्रचार – महिमा

प्रचार-महिमा
एक साधुवेषी मजशी बोले । आमुचे आचरण जरी भले । परि लोक दुसर्‍यांनी दिपविले । न ऐकती ते ॥१॥
वाईटाकडे सहज प्रवृत्ति । अनेक प्रलोभने दुष्टांचे हाती । आम्रतरु मेहनतीनेहि न जगती । गवत वाढे न पेरता ॥२॥
ऐसा अनुभव मज आला । सांगोनीहि न पटे जनतेला । वाटे काय करावे याला । ऐकती ना हे वेडे जन ॥३॥
म्हणोनि प्रार्थना करितो साहेबासि । त्यांनी करावे कायद्यासि । जनता उध्दारावी हवी तैसी । दंड कैद करोनि ॥४॥
ऐकताचि त्याचे वचन । म्हणालो मग सरकारचि झाला भगवान । कासया करिशी देवाचे भजन ? पुजावे जोडे साहेबाचे ॥५॥
वास्तविक संताचे सांगणे प्रेमाचे । सरकारचे सांगणे दंडुक्याचे । जरी पर्यायाने दोघांचे । एकचि ध्येय पाहता ॥६॥
यात दमनाने लोक भिती । तेवढयापुरती नीट वागती । आणि मार्ग काढोनि पापे करिती । कोटयानुकोटी ॥७॥
तैसे नाही साधुसंतांचे । त्यांचे बोलणे आपुलकीचे । एकदा विचार पटले त्यांचे । लोक मरेतो न विसरती ॥८॥
साधूंनी देवासि प्रार्थावे । सकळ जनासि बोधीत जावे । ऐसे आहे साधन बरवे । साधुसंतांचे ॥९॥
पूर्वी प्रचारक साधु म्हणोन फिरती । गावोगावी लोका जागविती । ” आलख ” म्हणोन पाहरा देती । घरोघरी अरुणोदयी ॥१०॥

त्यांचे प्रेमचि कार्य करी । लोक उठती नित्यनेमावरि । राहणे टापटिपीचे बाहेरी । अंतरी निर्मळपणा ॥११॥
कथाकीर्तनादिकांच्या योगे । पापभीरुता अंगी वागे । तेणे कायद्याविणहि सुमार्गे । जाती बहुजन ॥१२॥
जगी काही लोक अज्ञानी । ते दुसर्‍याऐसी करिती करणी । थोरांचे आदर्श जीवन म्हणूनि । पाहिजे अनुकरणास्तव ॥१३॥
काही लोक चिकित्सक । विचार पटताचि वागती चोख । त्यासाठी उत्तम विवेचक । प्रचारक पाहिजे ॥१४॥
काही लोक प्रलोभनी पडले । लाभ असेल तेचि घेती भले । त्यांना स्वर्गसुख पाहिजे दाविले । दुःखे निवारूनि सेवकांनी ॥१५॥
परंतु भयावाचोनि काही लोक । न ऐकतीच बोध सम्यक । दंडाविण जैसे पशु देख । न चालतीच योग्य मार्गे ॥१६॥
त्यांना हित कोणी शिकवावे ? कोणी मूर्खांचे हृदय धरावे ? म्हणोनि सत्तेने सरळ करावे । ऐसा मार्ग वाढला ॥१७॥
साम दाम दंड भेद । राजनीति ही बहुविध । कायद्याच्या आधारे शुध्द । करू पाहे जनलोका ॥१८॥
कायद्यानुसार गावरचना । कायद्यापरी करावे वर्तना । कायद्यानुसारचि जना । सहाय्य द्यावे परस्परे ॥१९॥
जो करील कायदाभंग । त्यासि दंड द्यावा लागवेग । यासाठी नेमावा लागे मग । राजा सत्ताधीश मुखंड ॥२०॥

परि राजा हा विष्णु-अंश बरवा । ऐसा लोकी करावा गवगवा । तेव्हाचि कायदा त्याचा चालावा । यातहि आले प्रचारतंत्र ॥२१॥
देश हा देवचि पवित्र । कायदा त्याचे व्यवस्थासूत्र । ते न पाळता पातक थोर । प्रचारतंत्र आवश्यक ॥२२॥
सत्ता, कायदा, ध्वजावरि श्रध्दा । प्रचारेचि निर्माण होई सदा । त्याविण नुसते भय सर्वदा । नियमयुक्त न ठेवी ॥२३॥
उलट राजाभयादि नसून । लोकात प्रचार होता पूर्ण । आत्मसाक्षीने वागती जन । उत्तम हाही अनुभव ॥२४॥
तैसेच कायद्याची चुकवोनि रेषा । किती करिती पापे नित्यशा । परि विचार भिनता प्रचारे सहसा । पाऊल न पडे वाममार्गी ॥२५॥
सारांश सत्तानामेहि राज्य करी । प्रचारचि सर्व जीवनावरि । सत्ता देहासचि बंधनकारी । अंधभिकारी कायदा ॥२६॥
प्रचार मनावरि संस्कार करी । तो संस्कार अंतरी बाहेरी । राज्य करोनि मानवा सुधारी । गाव करी तीर्थचि तो ॥२७॥
हे सत्तेने कधीच नव्हे । उलट चुकारासि लाभ पावे । गरीब सज्जन उगीच मरावे । ऐसेहि होते ॥२८॥
सत्तेने जे कायदे केले । त्यांचे फायदे मुजोरांनी घेतले । आणि दुबळे भोळे मागेच राहिले । ऐसे झाले आजवरि ॥२९॥
म्हणोनि कायदाचि नव्हे सर्वकाही । प्रचाराऐसे श्रेष्ठ नाही । सर्वासि मानवतेचे पाठ देई । तो नियमन करी न करिता ॥३०॥

राजे किती आले गेले । त्यांचे कायदे नष्ट झाले । सत्तेचे दरबार उजाडले । परि राज्य चाले संतांचे ॥३१॥
संतांचा तो प्रचार अमर । अजूनिहि लोक-मनावर । राज्य चालवोनि निरंतर । लाखो जीवा उध्दरितो ॥३२॥
नलगे सत्तेचा बडगा । नको भयभीतीहि सन्मार्गा । आपापले कर्तव्य जगा । प्रचारसूर्याचि दाखवी ॥३३॥
जेव्हा जाणीव देणे अपूर्ण पडे । तेव्हाचि दंडभेदाचा अवलंब घडे । ऐसेचि वाढत गेले पोवाडे । विकृतीचे ॥३४॥
परि दंडे अन्याय जरि नाशते । लोक जरि सुधारले असते । तरि तुरूंग हे न वाढते । गुन्हे न होते अधिकाधिक ॥३५॥
हेचि जाणोनि सज्जन म्हणती । जागवा हृदयातील अंतर्ज्योती । तरीच सुधारेल मानववृत्ति । जग होईल आदर्श ॥३६॥
जे जे म्हणती सत्तेवाचून । गाव होईना आदर्शवान । त्यांचे हे म्हणणे नाही परिपूर्ण । ठेवावी खूण बांधोनि ॥३७
त्यासि पाहिजे सत्प्रचारक । प्रेमळ सरळ नम्र भाविक । सत्तेवाचूनिहि करी हाक । पूर्ण लोकांची सेवाप्रेमे ॥३८॥
अहो ! जनशक्ति केवढी महान । ती जो आणील संघटोन । तो स्वर्गावरीहि लावील निशाण । आपुल्या कार्ये ॥३९॥
हाती न घेता तलवार । बुध्द राज्य करी जगावर । त्यासि कारण एक प्रचार । प्रभावशाली ॥४०॥

जगी आजवर जे कार्य घडले । ते प्रचारकांच्याच करवी झाले । प्रचारक नाही म्हणोनि अडले । कार्य आपुले ॥४१
ग्राम सुधारावयाचा मुलमंत्र । उत्तम पाहिजे प्रचारतंत्र । प्रचारकांवाचून सर्वत्र । नडते आहे ॥४२॥
प्रचारकाची पाठ बळे । जिकडे तिकडे सूर्य मावळे । उदासीनतेचे अंधारजाळे । पसरोनि राही ॥४३॥
प्रचार जेथे धावला दिसे । तेथील गाव स्वर्गचि भासे । जनलोक न्यायास साजेसे । वागती तेथे ॥४४॥
प्रचारक प्रेतात प्राण आणी । दुबळयासि करी कार्याभिमानी । बिघडवी आणि सुधारवी दोन्ही । प्रचारक ॥४५॥
प्रचार ही कला आहे । प्रचार अंतःकरणहि राहे । पोट भरवयाचाहि उपाय । प्रचारतंत्र ॥४६॥
प्रचार खोटयास खपवी बाजारी । प्रचार गोटयास देव करी । प्रचार युध्दाची वाजवी भेरी । वृष्टीहि करी अमृताची ॥४७॥
काहीकाचा स्वभावचि असे । अपप्रचार करोनि भरावे खिसे । जना नागविता आनंद दिसे । काहीकांना ॥४८॥
परि तो प्रचारक दुराचारी । आपण मरूनि इतरा मारी । यानेच बिघडली गावाची थोरी । अशांति संसारी माजली ॥४९॥
त्यांच्या विषारी प्रचाराहून । झाला पाहिजे प्रबल पूर्ण । सत्यप्रचार आपुला महान । तरीच परिवर्तन सहज घडे ॥५०॥
जोवरि अंतःकरण नाही गुंतले । तोवरि प्रचार वरवर चाले । यासाठी पाहिजे जीवनचि रंगले । प्रचारकांचे ॥५१॥
मित्रहो ! आदर्श कराया ग्राम । उत्तम प्रचारक पाहिजे प्रथम । तरी चाले उत्तम काम । गावाचे आपुल्या ॥५२॥
राणीमाशी जाऊन बसली । तेथे मधमाशांची रीघ लागली । पाहता पाहता सृष्टी सजली । होईल ऐसे ॥५३॥
श्रोतियांनी विचारला प्रश्न । प्रचार करील गावी पूर्ण । तया प्रचारकांचे लक्षण । कैसे असे ? ॥५४॥
प्रचारकांचे वर्तन कैसे ? राहणी, स्वभाव, भाषण कैसे ? ध्येय, धोरण, साधन कैसे । गावासाठी ? ॥५५॥
याची उत्तरे श्रवणी ऐका । जे जे गुण व्हावेत प्रचारका । ते अंगी बाणता सुधारील लोका । कोणीहि सहज ॥५६॥
गावाचे भवितव्य कराया उज्ज्वल । पाहिजे प्रचारक-शक्ति प्रबल । प्रचारकाअंगी पाहिजे शील । सत्य चारित्र्य नम्रता ॥५७॥
प्रचारकाची मुख्य लक्षणे । सत्तेवाचूनि कार्य करणे । आत्मशुध्दिने गाव सुधारणे । गवसे तया ॥५८॥
त्यासि सत्तेची नाही चाड । नसे धनाचा मोह द्वाड । आत्मप्रेमाचा झरा अखंड । वळवी मना ॥५९॥
प्रचारक स्वभावाचा सरळ । वाईट मनोवृत्तीचा काळ । अंतःकरण पाण्याहूनि निर्मळ । अहिंसक ॥६०॥

बोलण्यात राही निर्भय । कष्ट करण्यातहि पुढेच पाय । वागणूक तरि आदर्श राहे । प्रचारकाची ॥६१॥
प्रचारकाची दिनचर्या । वेळ जराहि न घालावी वाया । जे जे शोभे सेवेच्या कार्या । ते ते करी सर्वचि ॥६२॥
नेत्री तयाच्या सात्विक तेज । बोलण्यात भरले असे ओज । राहणीत वैराग्य त्याग सहज । प्रचारकाच्या ॥६३॥
पिकलिया फळाचे देठ तुटले । तैसे प्रचारकाचे मन झाले । आसक्तिविषय सर्व गेले । इंद्रियांचे ॥६४॥
इंद्रियासि नुरली ऊर्मि । सर्व उन्मुख सेवाकर्मी । पावसाळा हिवाळा गर्मी । सारखीच त्यासि ॥६५॥
परि उदास नसे प्रचारकाची मति । नेहमी दिसेल हसरी मूर्ति । सदा कार्य करावयाची स्फूर्ति । स्फूरली दिसे ॥६६॥
कधी न करी चिडचीड । कोसळो का आपत्तीचा पहाड । श्रम करोनि जिवापाड । लोक लावी सन्मार्गी ॥६७॥
प्रचारकासि उरले नाही घर । सर्वचि घरे त्याचे माहेर । सर्व जन हेचि त्याचे गोत्र । विश्वमाजी ॥६८॥
नाही सत्तेचे प्रलोभन । प्रतिष्ठेचेहि कुठले भान ? आपणासाठी न मागे धन । रेंगाळोनि कोणा ॥६९॥
सत्कार्यासाठी पाठी लागे । धन जमीन मान मागे । सर्वस्व मागे, प्राण मागे । न संकोचता ॥७०॥
आपणासाठी काहीच नाही । जे करील ते सर्वाचे पाही । प्राण तोहि अर्पावा ही । भावना सेवेसाठी ॥७१॥
सर्व करणे सर्वासाठी । आत्म्यासाठी देवासाठी । बांधावया मनुष्यत्वाच्या गाठी । समाधाने ॥७२॥
त्यासि एकचि वासना उरली । जनता पाहिजे सुखे सुधरली । मानवांची दैना गेली । पाहिजे पळोनिया ॥७३॥
सर्वाची प्रार्थना व्हावी एक । मानवांचा व्यवहार मानवा पूरक । राहणी सर्वाची समान सात्विक । सर्वासाठी ॥७४॥
याचसाठी आटाआटी । करावया पडतो संकष्टी । प्राण तोहि अर्पावा शेवटी । वाटे त्यासि ॥७५॥
ही भूमिका साधुसंतांची । हीच साधने प्रचारकांची । प्रचाराचा कळस सत्यचि । संतपण ॥७६॥
खरे प्रचारक साधुसंत । त्यांनीच कळविला जगाचा हेत । सत्य काय, काय असत्य । जगामाजी ॥७७॥
तेथूनीच प्रचारकांची निर्मीती । प्रचारक सत्य समजावोनि घेती । शंकासमाधान ऐकती । मन लावोनि ॥७८॥
जया क्षणी बोध झाला । अंतःकरणी स्फुरू लागला । त्यासि अभ्यासाने चांगला । बळकट करिती सत्संगी ॥७९॥
मनन करोनि आत्मसात करिती । मग पुढे तैसीच होय मति । एकदा वाणी रंगली सुमती । सरळ चाले माप तिचे ॥८०॥

उत्तम पुरुषाने कान फुंकले । समजा त्याने मंत्रचि घेतले । मग वारियापरी प्रचार चाले । प्रचारकाचा ॥८१॥
प्रचारक प्रचारानेच प्रचार करी । त्याचे माप चाले वार्‍यावरि । वाहन पोहोचण्याचे अगोदरी । प्रचार धावे तयाचा ॥८२॥
जो जो कोणी जिकडे भेटला । त्यास आपुले सांगत सुटला । पाहणेचि नाही मेघापरी त्याला । घेतो कोणी की नाही ॥८३॥
फाटका तुटका कोणी दिसो । गरीब-अमीर कोणी असो । विद्वान शिक्षित हसो रुसो । प्रचार त्याचा बंद नाही ॥८४॥
कोणी असो कोण्या पंथाचा । आधार देई त्यासीच त्याचा । ओघ चालला प्रचाराचा । खळगे भरीत दिसती ते ॥८५॥
जरा मुखवटा डोळयांनी पाहिला । वाचा फुटली प्रचारकाला । राघूपरी । बोलत सुटला । होय-नव्हे सर्व काही ॥८६॥
लोकांनी जरी थांब म्हटले । तरी याचे कार्य झाले । जरा वेळाने पुन्हा चाले । रस्ता करीत शब्द गंगा ॥८७॥
प्रचारकाचे बोल तत्त्ववादी । अचूक धरूनि संशया छेदी । टोचक नसताहि मर्मभेदी । सरस हृदयाचे ॥८८॥
कोणी विरोधक शिव्या देई । हसूनि त्याचे शब्द साही । गोड बोलूनि समजावीत जाई । आपुले म्हणणे ॥८९॥
सहनशीलताचि त्याचे ब्रीद । कधी तोंडी नये अपशब्द । जरी झाला वादविवाद । तरी गांभीर्यासि न सोडी ॥९०॥
कोणासि ” हट ” न बोलता । अंगी ठेवोनि सहनशीलता । आपले तत्त्व बोलता चालता । समजावोनि दे प्रचारक ॥९१॥
गोड बोलूनि मना वळवी । गावाच्या सेवेलागी लावी । अनंत प्रकारे वृत्ति बरवी । करोनि सोडी ॥९२॥
बिघडलेले घर सुधरवी । फाटाफूट तेथे संगति जुळवी । निर्दयासीहि दया उपजवी । नाना प्रयत्ने ॥९३॥
प्रचारकाची यत्नसाधना । सांगताचि नये एक कोणा । नाना प्रकार नाना योजना । प्रचारकापाशी ॥९४॥
कोठे भजनातून प्रचार करी । कोठे प्रार्थना करून कानी भरी । कोठे कथा सांगून मनासि सावरी । प्रचारक ॥९५॥
कोठे कीर्तन प्रवचन करी । तुंबडी पोवाडे नानापरी । यात्रा उत्सव हाती धरी । प्रचारक ॥९६॥
कोठे उद्योगांतून हात घाली । कोठे कलारंजनाने जनता वेधली । मनोरंजनातूनहि चाली । चालावी कोठे ॥९७॥
कोठे व्यायामातूनहि स्फूर्ति भरली । कोठे पार्टीतहि सभा रंगली । कोठे लग्नातून सुरवात केली । पाहिजे त्याने ॥९८॥
कोठे जन्मतिथि पुण्यतिथि । मौजीबंधनेहि न ठेवी रिती । जैसी वेळ पडे प्रचारकप्रति । सर्व करी स्वभाचे ॥९९॥
कोठे शिंपियाचे दुकानी । कोठे न्हावियाचे सलूनी । ओटी चोहटी चहूकोनी । प्रचार चाले ॥१००॥

हाटी बाजारी तेचि करी । तमाशीहि तेच बोले वैखरी । प्रचारकाची ऐसी बावरी । जिव्हा असे ॥१०१॥
कोठे आईबाईपाशी बैसे । त्याने घरातील वळवी माणसे । काय मार्गाने प्रचारक घुसे । हे तो सांगता नये कोणा ॥१०२॥
कामातूनि गाण्यातूनि । हसण्यातूनि व्यवनातूनि । चालता बोलता प्रचारवाणी । रंगे त्याची ॥१०३॥
प्रचारक असे बालकात बालक । तरुणासि बोधया तरुण सम्यक । वृध्दासि द्यावया अनुभव तात्त्विक । त्याचेपाशी ॥१०४॥
मुलात जाऊनि सेवा वाढवी । मुलीमाजी कला उपजवी । तरुण-तरुणी दोघातहि लावी । गाव-सेवेसि ॥१०५॥
व्यसनाधीनाची धरी संगति । परि नीट करावया त्याची मति । डाव न चुके कल्पांती । प्रचारकाचा ॥१०६॥
नाना कला त्याच्या अंगी । जैसी वेळ पडे प्रसंगी । रंगवी नाना साधन-रंगी । प्रचार आपुला ॥१०७॥
तारतम्य ठेवोनि अंतरी । गोड बोलोनि प्रचार करी । वाटे टाकली मोहनी बरी । गावावरि प्रचारकाने ॥१०८॥
तो प्रचारक आवडे सर्वाच्या मनी । त्यासि बघताचि पडे मोहनी । लोक धावती बोलताक्षणी । कार्य कराया गावाचे ॥१०९॥
हा-हा म्हणता गावात फिरला । सवे लोकाचा थवा घेऊन आला । सांगेल तैसे करू लागला । प्रचारक त्यासि ॥११०॥
ऐसा प्रचारक जादुगार । त्याच्या मुठीत जनसागर । नव्या सृष्टीचा कारागीर । साधासुधा ॥१११॥
प्रचारक सर्वाशी बोलणी पुरे । ज्ञान अंगी त्याच्या संचरे । रोमरोमांत-वैराग्य अंकुरे । दिसती तयाच्या ॥११२॥
म्हणोनि असे आकर्षण । लोक धावूनि येती पक्ष्यासमान । करावया गाव स्वयंपूर्ण । प्रचारकचि पाहिजे ॥११३॥
त्याचे अंगी महान निश्चय । जे संकल्पील घेईल ठाय । नाना करोनि उपाय । साधील त्यासि ॥११४॥
त्याचा प्रचार महाप्रबल । चालतसे सर्वस्पर्शी सर्वकाल । प्रचाराविण एकहि बोल । न निघे त्याचा ॥११५॥
” काय करावे ” हेचि बोलणे । न करावे ते ते काहीच न जाणे । ” नाही ” हे बोलणेचि उणे । त्यांच्या जीवनकोश ॥११६॥
काय नाही आमुच्या गावी । त्यासि ही वदंताच कळावी । हाती घेता करोनि दावी । पूर्तींच त्याची ॥११७॥
नसले ते ते उभे करी । लोकजीवनाची कलाकुसरी । चेतना जीवा-जीवात भरी । सत्कार्याची ॥११८॥
ज्याचा प्रचार हाती धरला । समजोनि जावे पूर्ण केला । नाहीतरि आपणचि मेला । समजावा प्रचारक ॥११९॥
म्हणोनि बोललो गावाचे अधिष्ठान । प्रथम पाहिजे प्रचारक महान । जी जी असेल ती उणीव भरोन । काढावया गावाची ॥१२०॥

सारांश प्रचारक ज्या गावी । तेथे दुसरी पंढरी जाणावी । जना मना पाषाणा नाचवी । आनंदाने ॥१२१॥
ऐसे प्रचारक निवडा गावी । मग गाव नांदेल वैभवी । सेवामंडळे स्थापूनि द्यावी । सेवेसाठी ॥१२२॥
ऐसे गाव ज्यांनी केले । तेचि कीर्तिवंत होती भले । म्हणोनि पाहिजे आरंभिले । प्रचारकार्य ॥१२३॥
त्यासाठी पुनः पुन्हा बोललो । प्रचारक करावयासि लागलो । प्रचारकांकरवी झालो । दास सर्व लोकाचा ॥१२४॥
निश्चये ग्राम निर्मावया । प्रचारक हाचि मुख्य पाया । ग्रामगीताहि याच कार्या । निर्माण केली तुकडया म्हणे ॥१२५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु शास्त्र स्वानुभव-संमत । कथिला प्रचारमहिमा येथ । आठवा अध्याय संपूर्ण ॥१२६॥

ग्रामगीता अध्याय आठवा समाप्त
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥


वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading