ग्रामगीता अध्याय पस्तीसावा – 35 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्याय पस्तीसावा – 35
Gram Gita Chapter 35
ओवी संख्या :- १२०
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 35

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय पस्तीसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ३५
Gram Gita Chapter Thirty-Five Beginning


—-🕉ग्रामगीता अध्याय 35 प्रयत्न प्रभाव
प्रयत्न प्रभाव
मागील अध्यायी निरुपण । इच्छा-प्रयत्ने गुंफले जीवन । हानि लाभ जन्ममरण । त्यावाचून नसे काही ॥१॥
आजची असो वा पूर्वीची । आपुलीच इच्छा बर्‍यावाईटाची । आपणा सुख दे अथवा जाची । हे निर्विवाद ॥२॥
जे झाले ते होऊनि गेले । आता पुढे पाहिजे सूधारले । इच्छा-कर्तव्ये लाभती फले । सर्व काही ॥३॥
यावरि श्रोत्याने प्रश्न केला । आपण इच्छा-कर्तव्याला मान दिला । परि अचानक मृत्यु घडतो त्याला । कोणती इच्छा सांगाना ? ॥४॥
कोणी अकस्मातचि मेले । थोडेहि बिमार नाही पडले । छातीमाजी कळ आली वाटले । तैसेचि गेले मृत्युमुखी ॥५॥
कोणी एकाएकी विहिरीत पडला । अथवा रानी व्याघ्राने भक्षिला । तो काय त्या प्रसंगाला । इच्छीत होता त्या पूर्वी ? ॥६॥
कोणास मार्गात मारोनि टाकिती । कोणी ठोकर लागता मरती । त्यांची काय ती इच्छा होती ? अथवा कर्तव्य ? ॥७॥
अहो ! हो देवा-दैवाची लीला । ठावी असोनि आपणाला । आम्हासि लावाया कार्याला । सांगता भलते ॥८॥
मित्रा ! ऐसा न धरी भ्रम । सत्यचि आहे कथिले ते वर्म । इच्छा-प्रयत्नेचि देव-काल-कर्म । देती फळे ॥९॥
मी तर आधीच सांगितले । अचानक कर्तृत्व नाही दिसले । परि पूर्वी तेचि कार्य असेल घडले । आघाताचे ॥१०॥
करतेवेळी कळले नाही । प्रसंग येता वाटले काही । परि दैवावरि भार देवोनि राही । मोकळा बिचारा ॥११॥
जैसे, धन संग्रही न करता । तरि चोर कासयासि मारता ? पाहोनिया वाट चालता । तरि ठोकर कैसी लागती ? ॥१२॥
देह, स्थान, संग निवडोनि । आधीच घेता उत्तमपणी । आहारविहार करिता समजोनि । तरि दु:खी होता कैसा तो ? ॥१३॥
अविवेक, क्रूरता, गर्व, बेहोशी । लागली मृत्यूच्या मार्गासि । निमित्त केले व्याघ्रादिकासि । परि तो प्रयत्न आपुलाचि ॥१४॥
आणि अचानक दिसे घडले । ते तरी देहावरीच पडले । जन्मचि न घेता कोठले । संकट त्यासि ? ॥१५॥
जन्म हाचि इच्छेचा खेळ । जगी अनेक इच्छांचा मेळ । तेथे संघर्ष असे अटळ । सुखदु:खफळ कर्माचे ॥१६॥
येथे दैव मारते, देव मारितो । काय म्हणून आम्ही म्हणतो ? आम्ही काय कुणाचे खातो ? सांगा मज ॥१७॥
देवदैव आपुल्याने करी । तरि दोष लागेल देवावरि । तैसी नाहीच देवाची कामगिरी । दु:ख देणे मानवासि ॥१८॥
आपणचि मार्ग चुकतो । इच्छेने संगतीने वाया जातो । मग ” कैसे झाले ” म्हणतो । एकाएकी फळ येता ॥१९॥
तेथे जबाबदार धरतो दैव । अथवा म्हणतो देवाची माव । नाहीतरि ग्रहगोलांचा प्रभाव । समजतो शुभाशुभ ॥२०॥
कोणी करिती ग्रहशांति । वाचती पोथी गिर्‍हे बांधती । परंतु दुराग्रह बसला चित्ती । तो न काढिती भ्रांतीचा ॥२१॥
नक्षत्रांचा सृष्टीवरि प्रभाव । परि ते निमित्तमात्रचि सर्व । आपुल्याचि शुभाशुभ कर्मांची ठेव । फळा येई त्या त्या वेळी ॥२२॥
आपण बरे-वाईट बी पेरले । ते त्या त्या ऋतूत उदया आले । येथे कालाने काय केले ? साह्य दिले उदय होण्या ॥२३॥
परि नारळीस न येती रुई-फळे । पेरिले तेचि उगवते बळे । त्यासि फक्त साह्यचि दिले जळे । तैसा देव साह्यकारी ॥२४॥
तो स्वत: काही न करी । ज्याचे त्यास देई निर्धारी । ” प्राप्त काळघडी ” सारी । निमित्तमात्र करोनि ॥२५॥
काळ चाले आपुल्या गती । ईश्वर व्यापक सम स्थिती । कर्मे आपचि फळा येती । सृष्टिनियमे आपुली ॥२६॥
कर्म करायाची स्वतंत्रता । ही जीवाहाती महान सत्ता । आपुल्या दैवाचा विधाता । आपणचि आहे ॥२७॥
ग्रहगोलांचा अनिष्ट प्रभाव । न पडावा म्हणोनि शोधिले उपाव । यातहि कर्तबगार मानव । सिध्दिचि असे ॥२८॥
उपासनेद्वारे मानसिक शक्ति । वाढता दु:खीहि सुखाची प्राप्ति । ही ईश्वरी कृपाहि असे हाती । जीवाच्याचि ॥२९॥
मित्रा ! हे विसरू नको आता । आपणचि सर्व कर्ताहर्ता । यात देव-दैवाची वार्ता । आपणचि केली ॥३०॥
ऐसे धरूनि राहा जीवी । शुध्द कर्मे करीत जावी । तरीच गति पावे बरवी । पुढे पुढे ॥३१॥
असो निसर्ग वा योगायोग । असो प्रारब्धाचाहि भोग । उत्तम प्रयत्ने त्यांचाहि ओघ । वळविता येई ॥३२॥
तैसी नसती जरि शक्यता । जीव सर्वस्वी पराधीन असता । तरि शास्त्र कोण देते हाता । नाना उपाय सांगोनि ? ॥३३॥
” धर्मे वाग, सत्य वद ” । ऐसा का सांगता वेद ? । सारेचि होतील विधिनिषेध । अनाठायी मग ॥३४॥
पडोनि दैवादिकांच्या प्रवाही । जीव अधिकचि बुडेल डोही । निघायासि मार्गचि नाही । उरला मग, ऐसे होता ॥३५॥
परंतु मिथ्या हा विचार । जीवास असे कर्मस्वातंत्र्य । प्रयत्न करता होतो उध्दार । आपुला शत्रुमित्र आपणचि ॥३६॥
वाईट चिंतिता वाईट होते । जे जे साधू ते साधते । मग का न घ्यावे थोरपण येथे । सदगुण सारे शिकोनि ? ॥३७॥
यावरि श्रोता म्हणे ऐका । माझी अजूनि आहे शंका । जगी धडपडती सर्वचि सर्वचि सुखा । परि एक एका न मिळे ॥३८॥
बरे करताहि ब्रह्महत्त्या । लागे कित्येकांच्या माथा । कित्येका जन्मभरि टाळ कुटता । ताल तोहि न साधे ॥३९॥
याचे काय आहे कारण ? काय नाही केला प्रयत्न ? उलट सुखी असती पापे करून । कित्येक लोक ॥४०॥
याचे ऐका समाधान । लोक दिसती भिन्न भिन्न । परि त्यासि कारण त्यांचेच प्रयत्न । वेगळाले ॥४१॥
भिन्न संस्कारे भरले लोक । म्हणोनि न मिळती एकासि एक । कोणी जन्मताचि गुणी सुरेख । ताल न जन्मी साधे कोणा ॥४२॥
संस्कारचि हे नान तर्‍हांचे । काही गायनाचे काही विद्वत्तेचे । काही चित्रकलेचे, धाडसाचे । चातुर्याचे कित्येक ॥४३॥
काही धनाचे काही मानाचे । काही अध्यात्म आणि भक्तीचे । काही असती कार्यशक्तीचे । संस्कार नाना ॥४४॥
ज्या प्राण्याने जो यत्न केला । तो संस्कार त्याच्या वाटयासि आला । म्हणोनि सर्वचि सर्वाला । येता दिसेना ॥४५॥
एकास मिळे संपत्ति । परि अक्कल नाही त्यासि पुरती । एकास विद्वत्ता पिसे अति । परि खाया पुरेना ॥४६॥
एक अतीच धाडसी दिसतो । परि बुध्दीने शून्यचि भासतो । म्हणोनि जीवनात तो ठरतो । वेडा अथवा गुंड जैसा ॥४७॥
एक शब्दसृष्टि उभी करितो । एक गायने जग डोलवितो । एक अदभुत वाद्ये वाजवितो । लहानपणी ॥४८॥
एक ध्यान करण्यात प्रवीण । एका भक्तीचेचि अवधान । एकास विश्वज्ञान आत्मज्ञान । लहानपणी ॥४९॥
याचे एकचि कारण । ज्याने जे कर्तव्य केले समजोन । तेचि त्याचे संस्कार पूर्ण । पावले तया पूर्वीचे ॥५०॥
इच्छा-संस्कार कर्तव्य-संस्कार । यांचेच हे रूपान्तर । ज्याने केला जो व्यवहार । तोच फळला यत्ने त्यासि ॥५१॥
प्रयत्नशील त्यासीच म्हणावे । इच्छेत तेच चिंतनी असावे । हातांनी कार्य तेचि घडावे । सर्वकाळ ॥५२॥
मनी वसे ते ध्यानी दिसे । ध्यानी ठसे तेचि स्थानी भासे । तैसेचि कर्तव्य इच्छाउल्हासे । उमटो लागे जीवनी ॥५३॥
या सर्वाचा मेळ झाला । तरीच यश प्रयत्नाला । नाहीतरि अवघा गलबला । एक मिळेना एकाशी ॥५४॥
याचा अनुक्रम ऐसा आहे । प्रथम मनी संकल्प राहे । संकल्प दृढ होता निश्चय । सत्कार्याचे रूप घेई ॥५५॥
कुणाचे संकल्प अवधी न लाविती । त्यांची तैसीच असते प्रकृति । काही संस्कार मागील असती । काही लाभती मातापित्याचे ॥५६॥
ऐसे संग्रहित होत जाती । त्यांची पुढे पुढे होई प्रगति । तैसी तैसी लाभे गति । बर्‍यावाईट फळांची ॥५७॥
पूर्वी केले उत्तम यत्न । म्हणोनि हाती आले रत्न । वाईट वर्तनाने पुढे पतन । फळा येईल आपैसे ॥५८॥
पूर्वीची कमाई भोगली । पुढे सुकृत-जोड नाही केली । त्यासि भोगावी लागली । राज्याअंती नर्कगति ॥५९॥
पूर्वी काही पुण्य घडले । म्हणोनि सुख वाटयासि आले । परि पाप करता येतील घाले । निश्चयाने या पुढती ॥६०॥
पुण्यवंता आज कष्ट । याचे कारण आहे स्पष्ट । एका संस्कारे तो पुण्यनिष्ठ । परि दुसरा फळला दु:खरूपे ॥६१॥
प्रयत्न सर्वागीण आदर्श । सर्वचि संस्कारांचा उत्कर्ष । ऐसे न होय म्हणोनि पुरुष । विचित्र फळे भोगिती ॥६२॥
तुकाराम आणि एकनाथ । दोघे सारखेचि अधिकारी संत । परि एका त्रास एक धनवंत । फळे ही भिन्न संस्कारे ॥६३॥ .
सकाळी उठण्याचे फळ निराळे । अभ्यासाचे फळचि वेगळे । उत्तम राहणीचे फळ आगळे । झाकविता झाकेना ॥६४॥
चित्तशुध्दीचे वेगळे फळ । दानादिकांचे भिन्न सकळ । ज्ञान-साधनाचे फळ प्रांजळ । नाही मेळ एक-एका ॥६५॥
उत्तम कार्या फळ उत्तम । परि दुसरे एक वाईट कर्म । म्हणोनि फळ लाभे अधम । मागे-पुढे याचे त्याचे ॥६६॥
कल्याणकर्म केले जेवढे । ते कधीतरी फळेल मागेपुढे । हा सिध्दान्त व्यर्थ न घडे । कदाकाळी ॥६७॥
म्हणोनि उपकार नाही फळले । पुण्य करिता अपकार झाले । हे म्हणणेचि नाही शोभले । शहाण्या जना ॥६८॥
फळ वेगळेचि आज दिसते । परि आले कैसे धुंडिता ते । सहज कळेल, प्रयत्नचि होते । मागे केले ॥६९॥
उपकार पुण्य संग्रही पडले । अपकाररूपे पूर्वपाप फळले । ऐसा मिश्र व्यवहार चाले । ओळखू येईना ॥७०॥
कोणत्या कर्माचे कोणते फळ । हे जाणता येना तत्काळ । तेणे चित्ती होय गोंधळ । वाढू लागे कुशंका ॥७१॥
प्रत्येक कर्माचे वेगळे फळ । परि जाणताचि लावी मोल सकळ । प्रयत्न-फळांची गुंतवळ । उकलेना सहजपणे ॥७२॥
उत्तमगाण्याचे फळ खाद्य नोहे । परि त्याहूनि त्यात सुख आहे । हे कैसे कळेल ? जोवरि रुचि नये । गायनाची ॥७३॥
उपकार-सेवेत आत्मसमाधान । हे फळचि असे महान । तेथे का इच्छावे बक्षीस अन्य । सज्जनांनी ? ॥७४॥
आपुले प्रयत्नचि सरस करावे । केले तरी करीतचि राहावे । थोडे उणे होऊ न द्यावे । प्रयत्नामध्ये ॥७५॥
क्षण एक चुकी न द्यावे । प्रयत्नासि दूरदृष्टीने जपावे । प्रयत्नहि सर्वागीण व्हावे । सर्व सुखे भोगावया ॥७६॥
एरव्ही प्रयत्नाशिवाय कोणीच नाही । प्रयत्न होती सर्वदाहि । परि दु:खचि देती प्रयत्न काही । जीवजना ॥७७॥
काही प्रयत्न नांवलौकिका नेती । काही प्रयत्ने होय फजीती । काही प्रयत्न प्राणचि घेती । आपुले आणि परक्यांचे ॥७८॥
म्हणोनि प्रयत्न करावे चांगले । कर्त्या सज्जना पाहिजे पुसले । लोभप्रतिष्ठेसि जे नाही भाळले । तेचि खरे प्रयत्नशील ॥७९॥
काही प्रयत्न उलटे घडती । त्यांची फळे मरणतुल्य येती । काही प्रयत्न प्रांजळ होती । तेणे पावती उत्तम जन्म ॥८०॥
मरणासीहि प्रयत्नचि कारण । जन्मण्यासहि प्रयत्नचि प्रमाण । भोग-सुख-दु:खांचे निधान । प्रयत्नचि ॥८१॥
काही प्रयत्न योजनारूप होती । त्यांनी कीर्तिपळे लाभती । काही प्रयत्नी शिकस्त करिती । मुक्ति पावती साक्षात्कारे ॥८२॥
काही प्रयत्न संचिती पडती । प्रारब्ध भोगता जे जे घडती । नाही मुळीच उपभोगाची वृत्ति । त्यांचे प्रयत्न कळसाचे ॥८३॥
त्यांचे प्रयत्न शुभप्रारब्ध झाले । दोन्ही मिळोनि देवपणासि आले । आपण आपणात मिळाले । साक्षात्कारे आत्मत्वे ॥८४॥
मित्रा ! म्हणोनि प्रयत्नशील व्हावे । प्रारब्धाचे थोरपण न मानावे । कर्तव्याने चमकून उठावे । भूमंडळी उत्साहे ॥८५॥
अमका प्रारब्धे श्रीमंत झाला । अमका पुण्य करिता दैवे गिळिला । अमका ” देव देव ” म्हणता तरला । प्रयत्नाविण ॥८६॥
हे तो म्हणणे अज्ञानाचे । पुन्हा करू नको उच्चार वाचे । सुप्रयत्नासि फळ सौख्याचे । निश्चये आहे ॥८७॥
दुसर्‍याचे फळ पाहोनि झुरावे । आपण काहीच न करावे । हे तो लक्षण आहे बरवे । अधोगतीचे आपुल्या ॥८८॥
आमुचे पूर्वसुकृत नाही बळी । म्हणोनि हात ठेवावा कपाळी । हे तो आमुच्याने कधीकाळी । घडोचि नये ॥८९॥
नाही तेचि आता कमावू । आहे ते ते अधिक वाढवू । इच्छा फलद्रूप करोनि घेऊ । हाचि करावा निर्धार ॥९०॥
याच निर्धारे वाल्या कोळी । पुण्यश्लोक झाला भूमंडळी । संत योगी वीर बळी । गाजले मानव-इतिहासी ॥९१॥
वेश्यागामी बिल्वमंगल । यत्ने झाला सूरदास निर्मल । आपणासह महीमंडल । केले पावन भजनाने ॥९२॥
हेचि शिकावे सत्संगतीने । यानेचि मानव होती शहाणे । भाग्य उजळेल सूर्याप्रमाणे । उद्योगशील झालिया ॥९३॥
प्रत्येक उद्योगा फळ पावे । शेतकर्‍यासि हितगुज पुसावे । प्रयत्ने एक बीज लावावे । फळ पावावे कणसापरी ॥९४॥
प्रयत्नविण स्वयंपाक झाला । प्रयत्नाविण घास मुखी गेला । प्रारब्धानेच व्यवहार चालला । ऐसे कोण सांगो शके ? ॥९५॥
पटवावया प्रारब्धवाद । त्यासहि लागे प्रयत्न सिध्द । विमान, दूरध्वनि आदि शोध । लाविले काय प्रारब्धे ? ॥९६॥
उघड आहे प्रयत्नाची थोरी । प्रयत्नापुढे प्रारब्ध ताण करी । हे म्हणणेचि अपुरे सर्वतोपरी । दूरदृष्टीने पाहता ॥९७॥
मुख्य असे प्रयत्नचि केवळ । प्रारब्ध हेहि प्रयत्नाचे फळ । वृक्षावाचोनि झाले फळमूळ । कोण म्हणे ? ॥९८॥
प्रयत्न सोडोनि प्रारब्ध धरले । तरि ते प्राणी दोघातूनि गेले । नाही प्रयत्नहि पूर्ण केले । प्रारब्ध पळाले दूरदेशी ॥९९॥
कोणी एक झाड लावले । दिवसेंदिवस सुकतचि गेले । त्याचेकडे दुर्लक्ष केले । कोणी एकी ॥१००॥
लोक म्हणती आयुष्य सरले । कोणी म्हणती किडयांनी ग्रासले । कोणी म्हणती त्याचे प्रारब्ध आले । मरणस्थानी ॥१०१॥
कोणी म्हणती येथे झाड जगेना । कोणी म्हणती चुकू द्या यातना । कोणी म्हणती काय आपणा- । हाती आहे ? ॥१०२॥
अरे ! हे सर्वचि आहे खरे । परि प्रयत्न करोनि पहा बरे । झाड जगते की ऐसेचि मरे । प्रयत्न केलिया ? ॥१०३॥
म्हणोनि त्यास खत घातले । तारतम्य ठेवोनि सांभाळिले । पाणी देवोनि वाचविले । मूळडाळ सर्वचि ॥१०४॥
पुढे पुढे झाड फुलले । पुष्पीफळी बहरोनि आले । प्रयत्न केल्यानेचि झाले । आहेना हे प्रत्यक्ष ? ॥१०५॥
कलमे करोनि नानापरी । फुले आणिली बहुप्रकारी । हात ठेविता कपाळावरि । ऐसे कधी होईल का ? ॥१०६॥
तैसेचि मानवाचे जीवन । उन्नत व्हावया हवा प्रयत्न । अपमृत्यु आदि धोके दारूण । टळती संशोधन केलिया ॥१०७॥
मानव सृष्टीहूनि थोर । तो ईश्वराचा अंशावतार । अचूक प्रयत्न दैवी हत्यार । निर्मू शके प्रतिसृष्टि ॥१०८॥
म्हणोनि सांगतो प्रयत्न करा । विचारशक्ति प्रयत्नांत भरा । शिका शिकवा, प्रयत्न सारा । व्यापू द्या गावोगावी ॥१०९॥
ज्या ज्या राष्ट्रांनी ऐसे केले । त्यांचे वैभव शिगेस गेले । जीवनमान आदि वाढले । इच्छेसारिखे तयांचे ॥११०॥
प्रारब्धवादी शिथील झाला । प्रयत्नवादी चेतना पावला । शोध करीत पुढे गेला । दिगंतरी ॥१११॥
केले मंगळावरि उड्डाण । चढला हिमगिरिशिखरी पूर्ण । शोधिले अग्निअस्त्र अणुअस्त्र महान । हैड्रोजनादि ॥११२॥
ऐकती करोडो मैलांवरून । परस्पराचे गायन-भाषण । विश्व हे आटोक्यात आणून । घर केले राहण्याचे ॥११३॥
प्रयत्नाची शिकस्त झाली । अजूनिहि जागा आहे उरली । धाव कधीच नाही संपली । प्रयत्नशीलांची ॥११४॥
प्रयत्ने देवपण पावला भक्त । प्रयत्ने योगी झाला जीवन्मुक्त । प्रयत्ने बध्द झाला निरासक्त । विषयामाजी ॥११५॥
प्रयत्ने गाव झाला आदर्श । प्रयत्ने सुखी होय स्वदेश । प्रयत्ने विश्वशांतीचे सायास । सफल होती ॥११६॥
यासाठी प्रयत्न करावे आपण । मिरवावे देवाचे थोरपण । अंगां येईल अहंकार म्हणोन । देव मध्यस्थी घालावा ॥११७॥
प्रयत्ने राज्य समृध्द करावे । प्रयत्ने भूमंडल डोलवावे । प्रयत्नेचि दासपण शोभवावे । कार्यप्रभावे ॥११८॥
प्रयत्ने मानव होई उन्नत । गावचि नव्हे, हालवी दिक्प्रांत । ही अनुभवाची मात । विसरू नका तुकडया म्हणे ॥११९॥ .
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । कथिला प्रयत्नवाद समर्थ । पस्तिसावा अध्याय संपूर्ण ॥१२०॥
ग्रामगीता अध्याय पस्तीसावा समाप्त

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading