आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ग्रामगीता अध्याय बाविसावा – 22 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय |
|---|---|
| ग्रामगीता अध्याय बाविसावा – 22 Gram Gita Chapter 22 ओवी संख्या :- ११८ | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय बाविसावा
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय बाविसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय २२
Gram Gita chapter twenty-second beginning
—-🕉ग्रामगीता अध्याय 22 अंत्यसंस्कार
अंत्यसंस्कार
ग्रामगीता – अध्याय बाविसावा अंत्यसंस्कार
विवाहादि संस्कार आवश्यक । परि खर्च न व्हावा अधिक । त्यांचे स्वरूप जाणोनि तात्विक । आचरावे सर्वदा ॥१॥
ओटीफळे, मौजीबंधन । जावळे उतरणे तीर्थी जाऊन । वास्तु, बारसे, वाढदिवस जाण । अवडंबर नको तेथे ॥२॥
तैसेचि मृत्युसंस्काराचे । स्तोम नसावे अंत्यविधीचे । जेणे मृताचिया नांवे सजीवाचे । दु:खी होय जीवन ॥३॥
मृत्युसंस्काराचा ऐका खुलासा । लोक मृत्युसि समजती भलतिसा । मी म्हणतो मृत्युजैसा । उत्तम नाही कोणीहि ॥४॥
जैसी नदी सागरासि मिळे । सोडोनि भेदभाव कष्टबळे । तिचे कार्यचि होते सगळे । मिळण्यासाठी सागरी ॥५॥
वाहत राही आपुल्या रंगे । लोक शांत होती सहज संगे । तिच्या पाण्यासि घेवोनि निजांगे । तृप्ति पावती जीवनी ॥६॥
परि तिजसि महत्त्व सागराचे । तैसेचि आहे मानवाचे । मोहपाश तुटता आसक्तीचे । धाव घेई निजरूपी ॥७॥
परि कार्याची जी वासना राहते । तीच जीवासि साथ देते । तिचेचि आविष्करण पुन्हा होते । पुढच्या जन्मी ॥८॥
शरीरमात्र नष्ट झाले । परि संस्कार वासनेअंगी भरले । पुन्हा जन्म घेता प्रगटले । ऐसे होते ॥९॥
ज्याने याच जन्मी मोह मिटविले । उत्तम संस्कार प्राप्त केले । त्याचे पारणेचि फिटले । जन्ममरणांचे ॥१०॥
परि ऐसे क्वचितचि होती । अढळ परमधाम पावती । येर ते प्राणी येती जाती । आसक्तियोगे ॥११॥
आसक्तीने इंद्रियी बांधला । मना येई तसा करू लागला । तो जन लोकासहि आवडला । स्वार्थ त्यांनाहि म्हणोनि ॥१२॥
जन्मला वाढला मोठा झाला । अवस्था अनेक त्या देहाला । षडऋतूंनी फळाफुला आला । जीर्ण झाला वृक्ष जैसा ॥१३॥
त्याची विकृति शिगेस लागली । शरीरगात्रे विस्कळून गेली । मग वाट पाहे आपुली । मूळच्या घराची ॥१४॥
त्यास मोहपाशे बांधू पाहती । औषधे वाटेल तैसी देती । ” वाचवा वाचवा ” कळवळोनि म्हणती । कमी येईल म्हणोनि ॥१५॥
मरणोन्मुखासि जीवन द्यावे । पुनरपि उत्तम बनवावे । हे मानवाचे कर्तव्यहि बरवे । समजो आम्ही ॥१६॥
परि प्रयत्न करोनि नाही जगला । शेवटी शरीर सोडोनि गेला । समजावा देवाच्या स्वरूपी मिळाला । प्राणी आपुल्या ॥१७॥
मग ईश्वरास करावी प्रार्थना । त्यास शांति लाभो देवसदना । आमुच्या सुखदु:खाच्या भावना । न बाधोत तया ॥१८॥
येथे रडण्याचे नाही काम । आपणासहि तेच धाम । पाहावे लागेल परम । झाल्या उपशम देहाचा ॥१९॥
म्हणोनि मृत्युनंतर रोदन । हे आहे अज्ञानाचे प्रदर्शन । कासया दावावे सर्व समजोन । उदास होवोनि मानसी ? ॥२०॥
हे ज्याचे त्यासचि प्राप्त होते । मग रडावे कासयासि लागते ? काही करोनि तरी दाखवावे ते । कीर्तीसाठी ॥२१॥
आपण उरले ते कर्तव्य करावे । तेणे त्याचे नांव भूषवावे । आपल्या कुळात गौरव पावोनि जावे । तेणे भूषण वडिलासि ॥२२॥
असो ऐसा प्राणी निवर्तला । सर्वामिळोनि न्यावे त्याला । पाहो नये जात-परजात भला । कोण होता ॥२३॥
सन्मान द्यावा जाणाराप्रति । अभद्र ऐसी नको अर्थी । गंभीरपणे जावे सांगाती । आत्मीयतेने ॥२४॥
सर्वानी प्रसंग नीट करावा । हातभार लावोनि द्यावा । आपलाहि संस्कार आठवावा । उत्तम होईल म्हणोनि ॥२५॥
मृत्यूहि सुमंगल समजावा । स्मशानयात्रेस सहयोग द्यावा । दिंडीघोषे मार्ग सुधारावा । जाणाराचा ॥२६॥
अभद्र विद्रूप किळसवाणी । न ठेवावी रीत कुणी । श्रध्दांजलीच्या भाषणी । भूषवावे प्रसंगी ॥२७॥
स्मशानी असावी सुव्यवस्था । पाऊसकालासाठीहि तत्त्वता । संस्कारमंडप सर्वाकरिता । पवित्रता वातावरणी ॥२८॥
मृतशरीराचे करोनि दहन । पवित्र करावे वातावरण । गावे लावोनि ठेवावे सामान । योग्य ठायी ॥२९॥
मृत शरीरास पीतांबर । घरी नसल्यास विका घर । दु:ख भोगा जन्मभर । ऐसे कोणी न करावे ॥३०॥
असेल तैसेचि वागावे । जुनेहि वस्त्र स्वच्छ करावे । खुशाल अंगी बांधोनि न्यावे । मृताचिया गरिबांनी ॥३१॥
नवेचि वस्त्र पाहिजे आणिले । ऐसे शास्त्राने जरी सांगितले । तरी आमुच्या घरचे कैसे चाले । नाही ठाउके शास्त्रासि ॥३२॥
तुपावाचोनि नको भोजन । हे शास्त्रवचन पाळतो कोण ? मग मृतासीच तुप चोळाया जाण शास्त्रवचन का सांगावे ? ॥३३॥
मृत्यु झाला एकाचिया घरी । खावयास नाही एक दिवस ज्वारी । सुतक धरोनि कैसियापरि । बसावे तेणे ? ॥३४॥
एक दिवस खाली गेला । तरी उपास पडती गरिबाला । त्याने दहा दिवस उपास भला । कैसा करावा सांगा तुम्ही ॥३५॥
म्हणोनि प्रेत नेवोनि कार्य उरकले । घरी येवोनि स्नान केले । मृत्युस्थळ पवित्र करोनि ठेविले । आटोपले मृत्युसंस्कार ॥३६॥
मग त्याने खुशाल कामासि जावे । मोलमजूरी करीत राहावे । उत्तम विचारांचे करावे । मनन ध्यान एकांती ॥३७॥
सुतक धरण्याची प्रथा लाविली । ही तर शोकवृत्तीच दाविली । आड येतील ती काढून टाकिली । पाहिजेत ऐसी बंधने ॥३८॥
याचा मूळ उद्देश ऐसा होता । मृत देहाचा संसर्ग घडता । रोगजंतु चढती शुश्रुषा करिता । म्हणोनि दूर राहावे ॥३९॥
परि बाप शंभर कोसावरि मेला । मुलगा सुतक पाळी मुंबईला । हा विपर्यास पाहिजे दूर केला । मूळ चित्ती धरोनि ॥४०॥
गोमूत्र शिंपडणे निंब खाणे । प्रेतासि अग्निसंस्कार देणे । सुतक अस्पर्शता पाळणे । आरोग्यासाठी सर्व हे ॥४१॥
म्हणोनि शुध्द जलाने स्नान करावे । शुध्द कपडे परिधान करावे । असेल ते वस्त्रपात्र धुवावे । रोगियाचे ॥४२॥
हे करणे आहे आवश्यक । यासीच बोलती सुतक । परि दहा दिवस करावा शोक । हे तो मना पटेना ॥४३॥
शोकवार्ता सकळासि कळावी । म्हणोनि एकदा पत्रे टाकावी । यापरि सुधारणा करावी समाजाची ॥४४॥
विचारांची दृढता व्हावी । म्हणोनि सदग्रंथांची कास धरावी । परि सहामासवरी रडभूक करावी । पाहुण्यांसवे कासया ? ॥४५॥
विवेके सावरोनि भावना । करावी तेराव्या दिवशी प्रार्थना । सर्व लोकासह जाणा । भजनानंद चाखावा ॥४६॥
सांगावी स्मृति म्हणोनि कहाणी । असेल तरि दान देवोनि । सेवा करावी त्या निमित्तानी । नसल्यास मनी खेद नको ॥४७॥
मोकळेपणी नमन करावे । ” मी उत्तम वागेन ” संकल्पावे । सेवेचे कार्य चालवावे । गतात्म्याचिया प्रित्यर्थ ॥४८॥
परि पाहावी आपुली परिस्थिति । जित्यांची होऊ नये फजीती । कोणी दान-दक्षिणेत दिवाळे काढती । ऐसे नको ॥४९॥
कोणी रूढिबंधनात पडती । मृतासाठी कर्ज काढती । त्यांचे नांवाने पंगती उठविती । जातभाई जमवोनि ॥५०॥
बुवा, पंच अथवा ब्राह्मण । यासि धन देती भूर्दंड म्हणोन । कोणी घेती गोडजेवण । कमर मोडे गरिबाची ॥५१॥
कोणी घरी धनाढय असती । परि पुत्राअभावी नर्काची भीति । म्हणोनि मरते वेळी दत्तक घेती । होय फजीती राहिल्यांची ॥५२॥
दत्तक करी उधळेपणा । किंवा पूर येई भांडणा । अपव्ययाची वाट लागे धना । तेणे नर्क चुके कैसा ? ॥५३॥
जीव स्वककर्मांची फळे भोगतो । त्यासि कोण कैसा तारितो ? सत्कीर्तीनेच स्वर्ग मिळतो । पुत्रपौत्रे कदा नोहे ॥५४॥
स्वर्ग अथवा मुक्ति काही । सदगतिवेगळी अन्य नाही । मन:प्रवृत्ति सत्याकडे जाई । हीच उध्दारगति जीवाची ॥५५॥
यासाठी धन असल्या मालकीचे । करावे कार्य गाव-सोयीचे । विहीर, शाळा, छात्रालयादि कोणचे । सत्कार्य भावे ॥५६॥
अथवा बांधवावा एकादा मार्ग । जेणे जनतेचे चुकती कष्टभोग । आसक्ति सोडण्यानेच स्वर्ग । लाभेल त्यासि ॥५७॥
किंवा त्याचे जे नातलग । त्यांनी सत्कार्यांचा आणावा योग । उत्तम कार्यी करावा उपयोग । धनाचा त्याच्या ॥५८॥
तयायोगे जी होईल कीर्ति । तिलाच सज्जन स्वर्ग म्हणती । लोक हृदये गुण वाखाणती । याविण स्वर्ग असेना ॥५९॥
ज्याची पसरेल अपकीर्ति । त्यासि कैसी मिळेल मुक्ति ? लोक मृत्यूवरीहि वाखाणती । ऐसे व्हावे जीवन ॥६०॥
याचसाठी उत्तम शिकावे । उत्तम राहावे वागावे । सर्वास उत्तम करोनि सोडावे । कीर्तीसाठी ॥६१॥
कीर्ति तोचि स्वर्ग खरा । अपकीर्ति नरकाचा पसारा । याच जगी यांचा व्याप सारा । पाहती प्राणी ॥६२॥
एरव्ही स्वर्गस्थळीहि गेला । तरी कुकर्मे दु:खाचि देवेद्राला । नव्याण्णव यज्ञे करोनि झाला । सर्प नहुष अहंकारे ॥६३॥
म्हणोनि कार्यातचि स्वर्गनर्क । सकाम ग्रंथांचे फोल कौतुक । मिथ्या कल्पनांत भुलले लोक । स्वार्थियांच्या ॥६४॥
म्हणती कावळयाने पिंड नेला । तरीच तो स्वर्गाला गेला । नाहीतरि आत्मा अटकला । त्याचा कोठे ॥६५॥
हे म्हणणे कसेसेचि वाटते । पिंडाचे नाही महत्त्व येथे । महत्त्वाचे असे काय केले ते । जन्मा येवोनि मानवाच्या ॥६६॥
मेल्यावरि दहा दिवस भ्रमतो । जीव पिंड देता स्वर्गी जातो । नाहीतरि तो नर्की पडतो । ऐसे म्हणणे व्यर्थ असे ॥६७॥
त्याने केले असेल उत्तम कर्म । तरीच पावेल उत्तम धाम । नाहीतरि पुन्हा अधम । योनीत जाणे स्वाभाविक ॥६८॥
प्राणी आपुल्याच कर्म-स्वभावे । भोगी उत्तम-अधम फळ बरवे । हे पिंडदानाने बदलोनि जावे । ऐसे नाही ॥६९॥
ज्याने सुकृतचि नाही केले । त्याचे कितीहि पिंड उचलले । म्हणोनि काय उन्नत झाले । जीवन त्याचे ? ॥७०॥
भिक्षुकाघरी दिली गाय । तिचे शेपूट धरोनि काय । वैतरणी नदी तरोनि जाय । गेलेला जीव ? ॥७१॥
हा तो आहे कर्मठ सोहळा । सग्यासोयर्यांचा विरंगुळा । पुत्रपौत्रांचा पुरवावया लळा । दिला निर्वाळा समाधाना ॥७२॥
टीका न करणे मृत्युग्रंथांची । तीहि असे साधना भावनातृप्तीची । परि यातचि सार्थकता जीवाची । ऐसे आम्ही मानू ना ॥७३॥
मृत्यु पावे त्यांचे नांव राहावे । म्हणोनि समाजसेवेस काही द्यावे । त्याच्या सदगुणांचे गोडवे गावे । आपणहि तैसे व्हावया ॥७४॥
खरा पिंड आपणचि उचलावा । कर्तव्य करोनि जीव भूषवावा । त्यानेच पावेल कीर्ति जीवा । उज्ज्वल साची ॥७५॥
नाहीतरि मेला की रडावे । जिवंतपणी लक्ष न द्यावे । ऐसे ढोंग कासायासि करावे । समाजाने ? ॥७६॥
जिवंत असता रोटी ना दे । मेलियावरि वाजवी वाद्ये । कावळयासि पिंड, इतरा दक्षणा दे । म्हणोनि साधे काय त्याने ? ॥७७॥
श्राध्दासाठी धन उधळावे । लोकलाजेस्तव मरावे । ऐसे कासया करावे । मूर्खपणे ? ॥७८॥
गेला जीव न राहे थांबून । वर्षमासाअंती घ्यावया भोजन । आपुले घेवोनि पापपुण्य । फळ भोगाया पुन्हा जन्मे ॥७९॥
जीव पुन्हा जीवनी यावा । काही सत्संगतीस लागावा । मागील केलेला दोष चुकावा । म्हणोनि करावा सुसंकल्प ॥८०॥
किंवा त्याचे गुणवैभव । श्रध्देने आठवावे सर्व । हेचि श्राध्द असे अपूर्व । श्रध्दांजलीरूप ॥८१॥
त्याची कीर्ति राहावी लोकी । म्हणोनि करावी दानपुण्ये निकी । आपुल्याच गावी कौतुकी । स्मरण राहील म्हणोनि ॥८२॥
जो कोणी ज्या रोगे मेला । तैसे होऊ नये इतरांला । म्हणोनि गावी औषधालयाला । मदत द्यावी त्या निमित्ते ॥८३॥
परि हे जनासि न कळे धर्मगुज । जाती तीर्थी करोनि कर्ज । त्याने फावते व्यापारा सहज । तीर्थियांच्या ॥८४॥
काही सज्जन तीर्थासि जाती । अस्थि-राख भरोनि नेती । म्हणे गंगोदके नाहीशी होती । पापे त्याची ॥८५॥
” काश्या तु मरणान्मुक्ति ” । ऐसी लोकी वाढली भ्रांति । गंगाजळी किडेहि मरती । तरि ते काय मुक्त झाले ? ॥८६॥
काशीवासी भक्त कबीर । समाधीसि निवडती गाव मगहर । ज्यास लोक म्हणती नर्कद्वार । तीच उध्दारभूमि झाली ॥८७॥
जन्मभरि सूत विणोन । प्रकट देखिला जनी जनार्दन । त्या भक्त कबीराचे महिमान । गंगेतील पाषाण जाणती कैसे ॥८८॥
जन्मवरि दोषकृत्ये केली । त्यावेळी नाही गंगेत ठरविली । आता हाडे टाकोनि झाली । सदगति म्हणे जीवाची ॥८९॥
हे सांगणारे आणि करणारे । यांना पोटापाण्याचे भरले वारे । म्हणोनि मेल्यावरि करिती सारे । जिवंतपणी न सांगती ॥९०॥
अहो ! ज्यात मनचि नसते । ते करोनिहि वाया जाते । मन देह मन दोन्ही नाहीत जेथे । तेथे काय घडवावे ? ॥९१॥
परि पंडेपुजारी सांगती गौरवे । तुमच्या वडिला स्वर्गी पाठवावे । तरि बोला दक्षणा काय द्याल भावे । आम्हालागी ? ॥९२॥
बिचारा भोळाभाळा शेतकरी । मजूर अथवा भाविक व्यवहारी । म्हणे कर्ज करोनि देतो पुरी । दक्षणा तुम्हा ॥९३॥
परि आमचे वाडवडील । स्वर्गाला कधी पाठवाल ? म्हणूनि रडतो टेकवूनि भाल । पंडयापुढे ॥९४॥
ऐशा अंधश्रध्देसि वाढवोनि । धूर्त घेती स्वार्थ साधूनि । हे महापाप असे जनी । निकष्टिकांचे ॥९५॥
वास्तविक ऐसी वेळ आली । त्यास पाहिजे संधी साधली । सांगावी पंडयाभिक्षुकांनी भली । युक्ति त्यासि ॥९६॥
” तुझे पितर स्वर्गात जावे । ऐसे घेतले तुझ्या जीवे । तरि त्यास संकल्प लागती करावे । गंगेमाजी ॥९७॥
मी पितर स्वर्गी जाण्यासाठी । संकल्प करितो जीवे पोटी । दारू गांजा भांग आदि ओठी । नाही लावणार जन्मभरि ॥९८॥
नाही करणार दुर्व्यवहार । नाही फसविणार दीनपामर । देईन सर्वासि सहकार । सत्सेवेसाठी ” ॥९९॥
ऐसे जरि पंडयांनी करविले । तरि त्यांचेहि उदर भरले । आणि लोकांचेहि कल्याण झाले । ऐसे होय ॥१००॥
परि पंडयाचि व्यसनी दुराचारी । फुकट लुटाया खटपट करी । तरि तो कैसेनि उध्दरी । समाजासि ? ॥१०१॥
म्हणोनि आंधळा कर्मठपणा । हा वाढवूच न द्यावा कोणा । गावगंगा म्हणोनि जाणा । तिलाच सर्व अर्पावे ॥१०२॥
गावचा तलाव अथवा नदी । सुंदर पहावी विहीर आदि । स्नान करोनि साधावी शुध्दि । प्रभूला आठव द्यावा त्याचा ॥१०३॥
त्याचे निमित्ताने करावे सत्कार्य । कासया बघावे तीर्थ बाह्य । देव सर्वाठायीच आहे । सदासर्वकाळ ॥१०४॥
म्हणोनि हे साधन बदलावे । गावीच सर्वकाही करावे । जे जे करणे असेल सदभावे । वळण द्यावे हे सर्वा ॥१०५॥
कोणी प्रेताची समाधी करिती । उगीच जागा गुंतवोनि धरिती । ऐसे करिता सारीच क्षिति । गुंतूनि जाइल त्यायोगे ॥१०६॥
मेला त्याची एक समाधि । जन्मला त्याच्या घरांची गर्दी । मग उरेल काय भूमि कधी । जगण्यासाठी इतरांना ? ॥१०७॥
जिवंत मानवा नाही घर । कष्टाळूंना नाही वावर । तेथे समाधीचे अवडंबर । मृतासाठी कासयासि ? ॥१०८॥
म्हणोनि सरळचि ऐसे करावे । मृतदेहाचे लोभी न व्हावे । पंचतत्त्वांशी त्यास मिळवावे । अग्निसंस्कार देवोनि ॥१०९॥
स्मरण म्हणोनि घरी वा गावी । योग्यशी तसबीर लावावी । वेळोवेळी आठवण करावी । सदगुणी पुरुष म्हणोनि ॥११०॥
कुणाचीहि समाधि करोनि ठेवणे । ही तव आसक्तीची लक्षणे । समाधि करोनि काय होणे-जाणे । सांगा मज ॥१११॥
समाधि करोनि दर्शन होते । तेचि चित्र पाहोनि मनात येते । मनात येण्याचेचि महत्त्व येथे । सर्वात मुख्य ॥११२॥
वाटल्यास उत्तम स्थान करावे । ज्यात लोकशिक्षण चालेल बरवे । स्मरणार्थ म्हणोनि अर्पोनि द्यावे । गावलोकासि ॥११३॥
ऐसी आहे सहजस्थिति । त्यासि कासया करावी विकृति ? जेणे समाज राहे सुस्थिती । तीच महती वाढवावी ॥११४॥
मानव असो वा पशुपक्षी । न कराव्या त्यांच्या समाधि साक्षी । जिवंत समाज ठेवोनि लक्षी । करावे कार्य सुस्थितीचे ॥११५॥
त्या दृष्टीनेचि भिन्न संस्कार । भिन्न वेळाचे महत्त्व थोर । लक्षूनि करावे सर्वानी सुंदर । साजे तैसे ग्रामराज्या ॥११६॥
मृत्यु असो वा जन्मादि उत्सव । यांचा नुसता नको गौरव । गावाचे वाढवावे वैभव । बचत करोनि, तुकडया म्हणे ॥११७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत । कथिला अन्त्यसंस्कार उचित । बाविसावा अध्याय संपूर्ण ॥११८॥
ग्रामगीता अध्याय बाविसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.



















