आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ग्रामगीता अध्याय तेविसावा 23 संत तुकडोजी महाराज – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय |
|---|---|
| ग्रामगीता अध्याय तेविसावा – २३ Gram Gita Chapter 23 ओवी संख्या :- ००० | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 23 – तेविसावा
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय तेविसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय २३
Gram Gita chapter twenty-third beginning
—-🕉ग्रामगीता अध्याय 23 सणोत्सव
सणोत्सव
श्रोतियांनी प्रश्न केला । आपण विवाह आणि मृत्युसंस्कार कथिला । तो आमुच्याहि मनी वाटला । उत्तम ऐसा ॥१॥
परि जन्मादि उत्सव बरवे । आनंद लाभे सणोत्सवे । तेणे ग्रामजीवन चेतना पावे । विरंगुळा हाचि सर्वासि ॥२॥
तयासि आपण गौण ठरविले । याचे कारण पाहिजे बोलिले । तरि आता उत्तर ऐकिले । पाहिजे श्रोती ॥३॥
आजचे करू जाता सणवार । दिवस न पुरती वर्षभर । त्यात जयंत्या-पुण्यतिथ्या येती फार । वाढदिवस निराळे ॥४॥
हे सर्वचि पाहिजेत केले । तरि कामधंदे सर्व गेले । एवढेच करोनि सर्व भागले । होईल कैसे ? ॥५॥
म्हणोनि त्यात सानथोर निवडावे । तारतम्याने करीत जावे । प्रसंगमान पाहोनि वर्तावे । सर्वकाळ ॥६॥
जे जे करावे ते समजोन । सांगता यावे त्याचे कारण । उगीच लाडूपेढे खाया जयंतीदिन । पाळू नये ॥७॥
पूर्वजांनी जो हेतु योजिला । तो पाहिजे समजोनि घेतला । त्याचि उद्देशाप्रमाणे झाला । पाहिजे सणवार ॥८॥
भारतवर्षाची चालीरीति । अत्यंत योजनाबध्द होती । त्याने सहज चाले सुस्थिति । समाजाची ॥९॥
तेचि पुन्हा उजळावे । म्हणोनि बोलिलो सहजभावे । तत्त्वता उत्सवासि गौणत्व द्यावे । ऐसे नाही ॥१०॥
उत्सवप्रिय मानवाचा स्वभाव । सणवारमुहूर्ताचा त्यासि गौरव । विशेष कार्यासाठी धाव । नेहमी त्याची ॥११॥
विशेष काही कार्य व्हावे । ऐसे घेतले त्याच्या जीवे । न घे आढेवेढे, मनोभावे । खर्च करी मनमाने ॥१२॥
ऐसे उत्सवाचे नांव घेवोनि । धन व्यर्थ उधळू नये कोणी । ते लागावे सत्कारणी । बोलिलो म्हणोनि बचत करा ॥१३॥
नाहीतरि घरी दिवाळी केली । दिवाळे निघावयाची सोय झाली । जनता हसेल गावातली । ” हौसी नटराज ” म्हणोनि ॥१४॥
तैसी होऊ न द्यावी फजीती । बसावे तरि सर्वाचे पंगती । परि होऊ न द्यावी जीवनाची माती । कधीहि आपुत्या ॥१५॥
एके दिवशी सण केला । ते भोगणे आले दुसर्या दिवसाला । ऐसा कोणीच नाही सांगितला । गृहस्थ-धर्म ॥१६॥
पुढेहि आहेत सणवार । समजोनि करावा विचार । प्रसंग येती पुढे थोर । त्यासहि देणे सहकार्य ॥१७॥
काही प्रसंगमानासाठी । पैसा ठेविला पाहिजे गाठी । सण येताचि उठाउठी । खर्चू नये सर्व शक्ति ॥१८॥
कोणीहि करिता सणोत्सव । पाहावी आपुली आधी उणीव । मग पुढे टाकावा पाय रेखीव । हर्षासाठी ॥१९॥
चार जणासि मिळवावे । आनंदीआनंद करीत राहावे । त्यातूनि नेहमीचे धडे घ्यावे । वागण्यासाठी ॥२०॥
वाढविता यावे जीवनज्ञान । कधीहि न वाढावेत दुर्गुण । मग करावे निर्भय मन । प्रसंगासाठी ॥२१॥
काही सण घरी करावे । काही सार्वजनिक जागी ठरवावे । सर्व मिळोनि उचलीत जावे । ओझे काही ॥२२॥
उत्सवाच्या निमित्ताने । सुंदर करावी सहभोजने । बंधुप्रेम वाढेल जेणे । आचरावे तैसेचि ॥२३॥
घरोघरच्या शिदोर्या आणून । अथवा स्वयंपाक सर्वामिळून । तेणे प्रेमानंद ये उचंबळून । एकत्र खाता ॥२४॥
असला नसला प्रसादचि द्यावा । प्रसंग गोड करोनि घ्यावा । परि खाण्यातचि वेळ न जावा । समाजाचा ॥२५॥
सुंदर करावे कथाकीर्तन । दिंडया खेळ मनोरंजन । परि लागावी उत्तम चालचलन । समाजासि ॥२६॥
खरा उत्सव रोजचे कर्म । विचारे सांभाळावा धर्म । परि नैमित्तिक सणांचेहि वर्म । जाणोनिया आचरावे ॥२७॥
दत्त जयंती रामनवमी । हनुमान जयंती गोकुळाष्टमी । शिवरात्रि आषाढी ऋषिपंचमी । विविध कार्यांनी पाळावी ॥२८॥
वटसावित्री शारदोत्सव । रक्षाबंधन संक्रांतिपर्व । गौरीपूजनादि महिलांचे उत्सव । सामुदायिक करावे ॥२९॥
उद्योगदिन स्नेहसंमेलन । बलोत्कर्ष आणि प्रार्थनादिन । गीताजयंतीस बुध्दिविकासदिन । पंचमहोत्सव आवश्यक ॥३०॥
सर्व जाती-जमाती मिळून । हळदकुंकू तिळगूळ सुवर्णदान । चढाओढी ग्रामशुध्दि रामधून । भाषणे आदि करावी ॥३१॥
तैसाचि आला पोळा सण । हाहि आहे महत्त्वपूर्ण । यात ठेवावे बैलांचे प्रदर्शन । शेती-सामानासहित ॥३२॥
उत्तम रांगेत बैल ठेवावा । साजेल तैसा अंगी भूषवावा । त्यात ज्याची सफल सेवा । त्याचा गौरव त्या दिवशी ॥३३॥
कोणी जोडी उत्तम ठेवली । कोण बैलास खुराग घाली । इनामे द्यावी त्यास भली । सर्व गावकर्यांनी ॥३४॥
कोणाचे उत्तम शेतीसाधन । कोणी ठेवले नोकर प्रसन्न । त्याचे वाढवावे उच्च स्थान । पोळयाचिया शुभदिनी ॥३५॥
घरोघरी जोडी फिरवावी । मिरवीत मिरवीत घरी न्यावी । इनामपोळी माणसांनी घ्यावी । प्रसन्न ठेवावी वृत्ति त्यांची ॥३६॥
काही पाडवा जुगार खेळती । ही आहे समाजाची अधोगती । काही लोक जिंकोनि जाती । काही हरती वस्त्रेहि ॥३७॥
ऐसी रीति बंद करावी । हवी तर दंगलेहि भरवावी । कामगारासि इनामे द्यावी । काटक चपल म्हणोनिया ॥३८॥
ऐसाचि आहे दशहरादिन । विजयादशमी उत्साहपूर्ण । त्याने वाढे स्नेहसंघटन । उत्तम गावी ॥३९॥
सगळयांनी मिळोनि मिरवीत जावे । थोर पुरुषांचे गोडवे गावे । पूर्वऋषींचे कौतुक करावे । गौरवावे राष्ट्रासि ॥४०॥
ते दिनी उत्तम संकल्प करावा । ” आपुले ते सर्वाचे ” हा बोध घ्यावा । मतभेद समूळचि विसरावा । सोने देवोनि एकमेका ॥४१॥
पुढे वितंडणेंचि नसावे । सकळांनी सकळासि वंदावे । परस्पराचे आशीश घ्यावे । बंधु-बंधु म्हणोनि ॥४२॥
मिरवीत मिरवीत यावे घरी । संतदेवासि वंदोनि अंतरी । वाडवडिलांचे वरदहस्त शिरी । धारण करावे कौतुकाने ॥४३॥
नवीन कार्यसंकल्प करावा । मग वर्षभरि तो टिकवावा । ऐसा सोहळा सगळयांनी साधावा । एकात्मतेने ॥४४॥
दिवाळीचा सण आला । सर्वानीच पाहिजे केला । परि पाहावा कोण राहिला । भुकेला घरी ॥४५॥
त्यास आमंत्रित करावे । गोडधड भोजन द्यावे । परस्परानी मिळून चालवावे । वैभव सर्वाचे ॥४६॥
गावचे एकचि असावे लक्ष्मीपूजन । प्रचंड मंडपी करोनि स्थान । सर्वास द्यावे फराळ भोजन । सर्वामिळोनि ॥४७॥
आनंद उसळावा घरोघरी । सुखी गायीवासरे नरनारी । भाऊबहिणीचे परोपरी । नाते वाढे ऐसे व्हावे ॥४८॥
बंधुभाव भगिनीपण । हे नाते ओसरले समाजातून । ते वाढाया नव्या पीढीत पूर्ण । योजना भाऊबीजेची ॥४९॥
तैसेचि भरवावे गोप्रदर्शन । कोणत्या गायी दुधाळ पूर्ण । कोणता वळू गुणसंपन्न । उंचपुरा पहावा ॥५०॥
तो सगळयांनी गौरवावा । सर्वामिळोनि इनाम द्यावा । गायीगुरांचा महिमा पटवावा । सर्व जना ॥५१॥
आपापली गाय प्रभावी । पुढे करावयासि सांगावी । पुढची गुढी उभारावी । इनाम देऊ म्हणोनि ॥५२॥
तैसेचि वाढवावे खताचे महिमान । नर्कासुरास निमित्त करून । शेणखतादिकांचे वर्णन । विशद करून सांगावे ॥५३॥
याच खतामुताच्या संयोगे । शेती उत्तम राहोनि पिके । म्हणोनि सर्वानी योग्य खळगे । करोनि खत सांभाळावे ॥५४॥
शेतीमाजीच शेणादि जावे । तरीच भूमिमाता पावे । हे घरोघरी सांगावे । हाचि खरा दिवाळसण ॥५५॥
गावी ज्याने लक्ष्मी नांदे । लोक जगतील आनंदे । ऐशा प्रयत्नांनीच साधे । खरी दिवाळी ॥५६॥
बारा महिन्यानी दिवाळी आली । घरेदारे स्वच्छ झाली । भिंत-ओसरी सारवोनि ठेविली । रंगरंगोटी लावोनि ॥५७॥
दुसरे दिवशी सडा नाही । झाडझूड तीहि नाही । घाण पसरली सर्वहि । जिकडे तिकडे ॥५८॥
ऐसी करिता दसरादिवाळी । अवदशाचि येई कपाळी । त्यापेक्षा रोज सकाळी । उठणे हाचि दिवाळसण ॥५९॥
सण म्हणोनि करावे अभ्यंगस्नान । नाहीतरि फासावे वंगण । हे कोठचे शहाणपण । शिकलो आम्ही ? ॥६०॥
रोजचि थोडे करीत जावे । स्नानध्यान पाठादि बरवे । श्रम करोनि सौंदर्य वाढवावे । घरीदारी ॥६१॥
दिवाळीचे निमित्त करोनि । स्वच्छता पवित्रता शिकावी सर्वानी । उकिरडाहि नीट करोनि । दिवा लावावा स्वच्छतेचा ॥६२॥
नेहमी स्वच्छ ठेवावे घर । श्रम करावेत अंगभर । हाचि खरा सणवार । नित्य सुंदर वर्तणूक ॥६३॥
जो नेहमीच स्वच्छता करी । त्याने उत्सव पाळले सर्वतोपरी । उत्तम जेवावी भाजीभाकरी । देवादिका अर्पोनि ॥६४॥
ऐसे व्रत जो सांभाळी । त्याची खरी दसरादिवाळी । नाहीतरि समजा होळी । आपुल्या सार्या जीवनाची ॥६५॥
होळीचा आला शिमगासण । त्यात मोठी मारहाण । लोक इभ्रतमान सोडोन । पळती मार्गी वेडेसे ॥६६॥
हा वाढला विचित्रपणा । ऐसा नोहे शिमगा जाणा । त्यातहि आहे तात्विकपणा । घेण्यासारिखा समाजा ॥६७॥
याच दिवशी प्रल्हादाची छळणा । केली होती होळीने जाणा । परि दु:ख न झाले प्रल्हादप्राणा । हरिभक्त म्हणोनि ॥६८॥
शेवटी छळणारेचि जळले । हे गावासि कौतुक झाले । म्हणोनि जन ओरडले । उपहास त्यांचा करोनि ॥६९॥
त्याच दिवशी शंकराने । काम जाळिला तिसर्या नयने । म्हणोनि कामास धिक्कारिले भूतसेनेने । हलकल्लोळ करोनि ॥७०॥
त्याच दिवशी सज्जनांनी । वार्षिक यज्ञाची केली आखणी । संपूर्ण गाव साफ करोनि । द्यावे पेटवोनि कैचण ते ॥७१॥
त्याच्या प्रकाशी सर्वानी जमावे । आपले दुष्कृत्य निवेदावे । पुढे तैसे न करण्याचे योजावे । अनुतापाने ॥७२॥
हे मनोधैर्य कमी पडले । म्हणोनि दुसरे जन ओरडले । गावाचे पाप धुवोनि काढले । ऐसियापरी ॥७३॥
पुढे याचा विपर्यास झाला । शिवीगाळ देती परस्पराला । पोथ्याहि सांगती ” अभद्र बोला ” । मूळ त्याचे न जाणता ॥७४॥
म्हणती कोणी वर्षातून । शिव्यासाठीच एक दिन । परि सज्जनासि याचे काय कारण ? ये उत्तेजन दुर्जना ॥७५॥
या सणी मुख्य धूलिवंदन । जे ग्रामसफाईचे प्राचीन चिन्ह । अस्पृश्यांनाहि स्पर्शावे म्हणून । सांगितले ग्रंथी त्या दिवशी ॥७६॥
आधी सार्वजनिक अग्निपूजन । त्यात वाईट वृत्तीचे दहन । मग राख न्यावी उकिरडी पूर्ण । करावे स्नान समुदाये ॥७७॥
ऐसा ग्रामसेवेचा आनंद । त्याने परस्परा लाविला सुगंध । प्रसन्नता दाखवाया विशद । योजिला प्रसंग रंजनाचा ॥७८॥
ठिकठिकाणी गाणे वाजवणे । रंगगुलाल आदि उधळणे । प्रसन्न ठेवावया मानवी मने । शिमगा सण योजिला ॥७९॥
राजेरजवाडयांचिया दरबारी । त्यास रूप आले शृंगारी । श्रीकृष्णाचिया नांवे रंगपिचकारी । उडविण्याचे ॥८०॥
गावी वेगळाचि विपर्यास झाला । ग्रामशुध्दीचा उद्देश गेला । नालीमोरीचा उडवोनि मैला । दु:ख देती जनतेसि ॥८१॥
कुणाची लाकडे चोरूनि नेती । घरच्या वस्तूहि होळीत टाकती । गाडी घोडयांचे सामान जाळती । खाट नेती स्मशानी ॥८२॥
या सणाने होते सणसण । गाव दिसू लागते भणभण । ऐसा हा प्रसंग वाईट म्हणोन । करिती टिका धीर प्राणी ॥८३॥
परि यासि वळण लावावे । ऐसे वेडेपण होऊ न द्यावे । त्यात सौंदर्य पावित्र्य भरावे । गाणे वाजवणे ठेवोनि ॥८४॥
होळी निमित्ते जमवोनि नरनारी । घ्याव्या कवायती मोहल्ल्यावरि । ग्रामसुधारक नाटिका बरी । मनोरंजनासि योजावी ॥८५॥
होळी म्हणजे ग्रामशुध्दिजन । तैसेचि मातृदिन बालकदिन । श्रमिकदिन मानवतादिन । स्वातंत्र्यदिनादि कितीतरी ॥८६॥
तैसेचि अनेक लहान सण । सर्वात असावे तत्त्वानुसंधान । उदरपूर्तीचे दिखाऊ साधन । ऐसे झाले तरि व्यर्थ ॥८७॥
प्रगतीसाठी सणवार करावे । काही सण एके ठायीच घडवावे । सर्वामिळोनि आचरावे । सहकार्याने ॥८८॥
पूर्वी घरोघरी गणेशोत्सव । नाना रूढयांचे उपद्रव । लोकमान्यांनी आणिले महत्त्व । राष्ट्रीय रूपे तयासि ॥८९॥
गावाचा एकचि गणपति । सर्वासाठी कार्यक्रम होती । जेणे वाढेल राष्ट्रीय वृत्ति ऐसी असावी धारणा ॥९०॥
तोचि उत्तम सण, उत्सव, दिन । जो राष्ट्रीय वृत्तीने पूर्ण । हेचि घडावया महाकारण । संती बोधिले समाजा ॥९१॥
जनता असते उत्सवप्रिय । म्हणोनि त्या मार्गेचि लावावी सोय । राष्ट्रीय भावना जागे निर्भय । तोचि करावा उत्सव ॥९२॥
विशेष निमित्ते संघटित व्हावे । सर्वामिळोनि कार्य करावे । जेणे बोझ न पडावा जीवे । कोणावरि ॥९३॥
नाहीतरि आपुले मनोरंजन । त्यासाठी जावे दुसर्यांचे प्राण । ऐसे करील जो उत्सव सण । तो तो हीन या लोकी ॥९४॥
परका सुखी आपणहि सुखी । तत्पर परस्पराचे कौतुकी । वागणूक सर्वाची सारखी । सर्वासाठी असावी ॥९५॥
ही मानव्यबुध्दि उपजावया । गावोगावी बदलावी उत्सवप्रक्रिया । जेणे धडा मिळे लोकासि या । नेहमी वागणुकीसाठी ॥९६॥
सकल धर्मामाजी सणवार । याचिसाठी केले सानथोर । जेणे मनुष्याची कदर । मनुष्य करील सर्वदा ॥९७॥
सामुदायिकता वाढे सर्वत्र । हेचि सणवारांचे मूळसूत्र । सामुदायिकपणाचा प्रकार । तोचि खरा उत्सव ॥९८॥
ज्या दिवशी गाव झाले एक । तोचि उत्सवदिन अलौकिक । ओळखू न येती रावरंक । उत्सवामाजी ॥९९॥
ज्यासि नाही त्यासि देणे । जो बिघडला त्या सरळ करणे । आप्त समजोनि उचलोनि घेणे । पडला त्या सर्वतोपरी ॥१००॥
हेचि खरे औदर्य आहे । गावाच्या सुखात उत्सव पाहे । तेणे सदाचा सणवार राहे । आपुल्या गावी ॥१०१॥
पूर्वी गावी बारा बलुते । अठरापगड जातीचे जत्थे । परस्परावरि अवलंबून होते । सहकारी जीवन ॥१०२॥
कोळी जाळे घेवोनि येई । सोनार जिवती लावोनि देई । न्हावी धोबी गोवळी नेई । धान्यादिक सणावारी ॥१०३॥
परि तो आता नुरला कायदा । उत्सवास येणे हा नव्हे फायदा । सणवार सांगणे हा नव्हे धंदा । कोणाच्याहि पोटाचा ॥१०४॥
ही आहे निर्मळ सेवा । उजळावया अंतरीचा दिवा । पोट भरण्याचा प्रश्न उत्सवा । आणोचि नये ॥१०५॥
सकळांनी कामधाम करावे । उरल्यावेळी सणवार सांगावे । मंडपादि करण्यास लागावे । सेवाभावे सर्वानी ॥१०६॥
ऐसे सांगणे हे निराळे । परि त्या निमित्ताने भुलवावे भोळे । तेणे घोटाळोनि लोक सगळे । नास्तिक जैसे बोलती ॥१०७॥
श्रम-विभागणी होती पूर्वी । त्यातूनि ही वाढली स्वार्थचवी । त्याच कामी लागले भिक्षुकगोसावी । नांव बुडवाया पूर्वजांचे ॥१०८॥
जो कोणी एवढेचि करी । त्यासि गावाने द्यावी चाकरी । उदर भरण्याची व्यवस्था पुरी । परिश्रमाने सर्वकाळ ॥१०९॥
बेकारी न ठेवावी ग्रामाप्रति । उधळपट्टी न करावी कोणेरीती । उत्सवाने उत्तम गति । लागे तैसेचि करावे ॥११०॥
उत्तमगति तोचि उत्सव । एरव्ही मोले घेतले उपद्रव । तैसे न व्हाया करावे गाव । संघटित आणि क्रियाशील ॥१११॥
साधावा कार्याचा उसाह । तोचि उत्सव नि:संदेह । तुकडया म्हणे गावी प्रवाह । वाहू द्या शांतिसुखाचा ॥११२॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुणशास्त्र-स्वानुभव-संमत । कथिला सणोत्सवांचा मुख्यार्थ । तेविसावा अध्याय संपूर्ण ॥११३॥
ग्रामगीता अध्याय तेविसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.



















