आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ग्रामगीता अध्याय एकविसावा – 21 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय |
|---|---|
| ग्रामगीता अध्याय एकविसावा – २१ Gram Gita Chapter 21 ओवी संख्या :- १०४ | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय एकविसावा प्रारंभ
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय एकविसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय २१
Gram Gita chapter twenty one beginning
—-🕉ग्रामगीता अध्याय २१ वैवाहिक – जीवन
वैवाहिक – जीवन
ईश्वराच्या इच्छेचे पूरक । समाजाचे दोनचि घटक । पुरुष आणि महिला देख । सृष्टिचक्र चालविती ॥१॥
चालावा जगाचा प्रवाह । व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह । यासाठीच योजिला विवाह । धर्मज्ञांनी तयांचा ॥२॥
स्त्रीपुरुष ही दोन चाके । जरि परस्पर सहायके । तरीच संसाररथ चाले कौतुके । ग्राम होई आदर्श ॥३॥
परि याची हेळसांड झाली । विवाहाची रूढीच बनली । मग यातूनचि उदया आली । हजारो दु:खे समाजाची ॥४॥
पुरुषार्थासाठी वैवाहिक जीवन । विवाह समाजस्थैर्याचे साधन । परि वाढोनि अज्ञान प्रलोभन । झाली धुळधाण समाजाची ॥५॥
कितीतरी मुली असती सुंदर । परि हुंडयासाठी राहती कुवार । तैसाचि मुलांचा व्यवहार । जातीत भासे कित्येक ॥६॥
ऐसी वाईट पडली प्रथा । तेणे व्यभिचार वाढले सर्वथा । हे महापाप असे माथा । समाजाच्या ॥७॥
कुणाचे पिते लग्न करोनि देती । घराणे, पैसा, प्रतिष्ठा बघती । विवाहाआधी न पुसती । दोघासहि ॥८॥
भिन्न स्वभावाचे प्राणी । जमवोनि आणावेत दुसर्यांनी । कैसी रुचेल जिंदगानी । दोघासहि ? ॥९॥
वडिलांचा मान राखावा । म्हणोनि का संसार नागवावा ? ऐसातरी हेतु का धरावा । वरिष्ठांनी ? ॥१०॥
विवाहाआधी परस्पराने । पाहावे दोघांनाहि निश्चयाने । विचारस्वातंत्र्य दोघासहि देणे । अगत्याचे ॥११॥
वडिलांनी पहावी एक खूण । लग्न करिती काय आंधळे होऊन । पश्चात्तापाचे कारण । न पडावे म्हणोनिया ॥१२॥
एरव्ही दोघांच्याही मते । लग्न जुळवूनि आणावे सु-मते । नांदोत दोघेहि एकसुते । संसार सुखी करावया ॥१३॥
जुळता दोघांचेहि विचार । विकास पावेल कारभार । दोघांची उत्साहशक्ति अपार । कार्य करील सेवेचे ॥१४॥
उत्तम राहणे उत्तम बोलणे । उत्तम सौंदर्य सात्विक लेणे । घरामाजी शोभून उठती तेणे । देवता जणू समविचारे ॥१५॥
विचाराविण जे जे करणे । ते सर्वचि होते लाजिरवाणे । ऐसेचि मागील गार्हाणे । ऐकतो आम्ही ॥१६॥
भोगासाठी लग्न केले । आंधळेपणी संसार चाले । वर्ष लोटताचि गोंधळले । दोन्ही प्राणी ॥१७॥
एक एकाशी बोलेना । संशय वाढले दोन्हीजणा । कशाचा संसार ? यमयातना । वाटे पतिपत्नीसि ॥१८॥
विषय-विकारे लग्न केले । पूर्वीच परस्परासि नाही ओळखले । तेणे सर्वाचि वाया गेले । जीवन दोघांचे ॥१९॥
केवळ भोगासाठी लग्न । हे तो दिसे विचित्रपण । काय होते पशु जमवोन । एके ठायी ? ॥२०॥
मानवाचे एक होणे । स्वर्गसुखहि त्यांना ठेंगणे । त्यांच्या संयोगे उत्त्कर्ष पावणे । लावण्यासि ॥२१॥
श्वानांचिया पशुत्वसंयोगे । जन्मती जीव कर्मभोगे । टाकिली जाती सर्व मार्गे । श्वान-पिली ॥२२॥
तैसे नोहे मानवाचे । त्यांचे राहणे जबाबदारीचे । एक संतानहि थोर कामाचे । दिगंतरी ॥२३॥
देशी पाहिजे सर्वचि धन । रानधन, लेणी आदि मानधन । द्रव्यधन, खाणी आणि गोधन । सर्वकाही ॥२४॥
सर्व धनांमाजी सुपुत्रधन । वाढवी राष्ट्राचे गौरवस्थान । म्हणोनिच वधुवरांनी शोधून । लग्न करावे विचारे ॥२५॥
नाहीतरि मरतुकडे पुत्र व्हावे । तेणे घराणे बुडोन जावे । देशासहि कलंकित करावे । न होवो ऐसे ॥२६॥
उत्तम बीजसि उत्तम जमीन । तेणे वृक्ष वाढतो भेदूनि गगन । ऐसेचि असावे सन्तान । बलभीमासारिखे ॥२७॥
ऐसे सन्तान घराणे शोभवी । एकवीस कुळाचे नांव जागवी । स्वकर्तव्याने चमकवी । देश आपुला ॥२८॥
परि पुत्रांचीहि असावी मर्यादा । देशी न वाढवी आपदा । शरीर संरक्षणाचीहि संपदा । गमावू नये संसारी ॥२९॥
निरोगी रक्त उत्तम गुण । सुस्वभावी ऐसे सन्तान । हे नाही सर्वस्वी अवलंबून । जाति-कुळ-गोत्रावरि ॥३०॥
दोघे प्राणी उपवर असती । भिन्नजाति लग्न करू म्हणती । विचारे करिता, त्यासि संमति । अवश्य द्यावी ॥३१॥
गुण गुणाकडे धाव घेतो । आपण शास्त्रीपुराणीहि ऐकतो । मिश्र विवाहाने बिघाड होतो । म्हणणे व्यर्थ ॥३२॥
मिश्र विवाह ऐसा नसावा । इच्छा नसता बळी पाडावा । विचार करण्यास अवकाश द्यावा । प्रसन्न चित्ते ॥३३॥
विचारे ” जीवनाच्या संग्रामी । हाचि विवाह करू आम्ही । ” म्हणती दोन्ही विवेकी प्रेमी । आड कोणी का यावे ? ॥३४॥
मागे गुणविवाह बहुत झाले । श्रीकृष्णे अर्जुनादिके केले । समाजी अनेक प्रयोग घडले । विवाहांचे भिन्न भिन्न ॥३५॥
गुणसाम्याचे मिश्रविवाह । वीरश्रीच्या कसोटीचे विवाह । राष्ट्रांतील भेद मिटविण्याचे विवाह । नाना जमातींमधूनि ॥३६॥
ऐसे अनेक तात्विक विवाह । त्यात काही राक्षस-विवाह । बळजबरीने बांधले देह । अनेक हेतूंसाठी ॥३७॥
ऐशा गोष्टीस मात्र जपावे । बाळपणीहि लग्न नसावे । समजूतदारीने करूनि द्यावे । लग्नप्रसंग ॥३८॥
काही पित्यांची असते हौस । मुलींचे वय तीन वर्ष । अथवा असता तीन मास । करिती लग्न ॥३९॥
वयात येती वधुवर । माहीत नसतो मानवी व्यवहार । बळी पडती रूढीसि पामर । दोन्ही प्राणी ॥४०॥
पुढे एक एकाशी न मिळे । सर्प-मुंगुसापरी सगळे । मग पंचायती-नोटिसांचे सोहळे । जीवन गारद यातचि ॥४१॥
काही मुली विधवा होती । बालवयीच पति वारती । पुढे त्याची होते फजीती । लग्नावाचोनि ॥४२॥
रूढि सांगते लग्न न करावे । मन बावरे कोणी आवरावे ? चोरूनि पापाचरणी व्हावे । तरि ते दु:खदायी ॥४३॥
ऐशा ज्या ज्या वाईट रीती । झुगारोनि द्याव्या हातोहाती । करावी पुन्हा नवीन निर्मिती । समाजनियमांची ॥४४॥
ज्या विधवेस वाटे लग्न करावे । तिने वडीलधार्यासि सांगावे । त्यांनी सहृदयपणे लग्न योजावे । जीवधर्म म्हणोनिया ॥४५॥
ज्या विधवेची इच्छा नाही । तिला छळू नये कोणी कदाहि । ती सती संन्यासिनी समजोनि देही । राखावी समाजाने ॥४६॥
ऐसेचि हे घडू द्यावे । मानवांच्या प्रकृतिस्वभावे । तरीच मानव म्हणविणे बरवे । शोभा देते ॥४७॥
काहीचे वडील लग्न करोनि देती । मनास वाटेल तो हुंडा घेती । जोड-विजोड काही न पाहती । धनापायी ॥४८॥
वृध्द वा रोगी असोनि वर । वधु देती बालिका सुंदर । धनासाठी दुर्व्यवहार । परोपरीचे ॥४९॥
मुलामुलींचा घेवोनि पैसा । जीवनात वाढविती निराशा । मोलाने का प्रेम-फासा । पडे गळी कोणाच्या ? ॥५०॥
बालक-बालिकेसि वाचा नसते । तोंड फोडोनि बोलेना ते । परि हे कसाब म्हणावेत पुरते । जे विजोड लग्न योजिती ॥५१॥
ऐशा असतील ज्या वेडया रीती । त्या काढोनि टाकाव्या प्रवृत्ती । जीवनाचे प्रेम चित्ती । तेचि धन समजावे ॥५२॥
ज्याने मुलामुलींचे पैसे घेतले । त्यासि समाजाने पाहिजे निषेधिले । तरीच हे दुराग्रह मोडले । जातील आता ॥५३॥
नाहीतरि हुंडयापांडयासाठी । जीवन होईल मसणवटी । अनेक मुलेमुली करिती शेवटी । आत्मघात ॥५४॥
कित्येक हात धरोनि जाती । समाजजीवनी कालविती माती । परि लोभ न सोडवे शहाणियाप्रति । पैशांचा अजुनि ॥५५॥
हे गावाने दुरुस्त नाही केले । तोवरि पापांचे डोंगर वाढले । सगळे गावचि भागीदार झाले । समजावे त्यांचे ॥५६॥
काही घरी मुली उपवर । मुलेहि लग्नासाठी तयार । तेथे आटयासाटयाचा व्यवहार । करिती कोणी ॥५७॥
मुलामुलींची नसता जोड । आपुलिया सोयीसाठी उघड । लादिती मानेवरि जोखड । मायबाप ॥५८॥
मग तेथे भांडाभांडी । मुलगी माहेरीच न धाडी । अथवा टाकोनि करिती नासाडी । जीवनाची तिच्या ॥५९॥
काही आपुल्या मानाकरिता । मुलींच्या दैवी आणिती व्यथा । ऐशा वाढल्या वाईट प्रथा । कितीतरी गावी ॥६०॥
काही जातीत ठेविती पडदा । जणू कोंडवाडयाचाचि धंदा । त्याने लग्न झालियाहि आपदा । येते केव्हा ॥६१॥
मुलगी पडद्याने बघितली नव्हती । आता कळले तिरळी होती । काही म्हणती लग्नप्रति । मागे घ्यावे काडीमोडीने ॥६२॥
पडद्याचिया प्रस्थामुळे । शहाणे तेहि होती खुळे । गर्दीत पति चुकता गोंधळे । पडे बापडी गुंडाहाती ॥६३॥
दुर्जन बुरख्याआड लपविती । ऐशा स्त्रिया नेल्या किती । अजूनिहि नेत्र न उघडती । समाजाचे ॥६४॥
पडदापध्दति बहुपरी भोवे । थोरांपुढे कधी न यावे । परिशुश्रुषाहि अंतरल्या याभावे । कितीतरी मुली ॥६५॥
ऐशा विचित्र काही प्रथा । मोडोनि टाकाव्या समाजी व्यथा । लावू नये दोष माथा । कोणा एकाच्याचि ॥६६॥
काही मायबाप पोरा चढविती । पुरुषे कैसेहि वागावे म्हणती । मुलीस गांजिती, मार देवविती । ऐसी वृत्ति आसुरी ॥६७॥
काही मायबाप मुलींचे कैवारी । ” हू ” म्हणता जावोनि पडती द्वारी । ऐसे कु-शिक्षण नानापरी । दु:ख संसारी वाढवी ॥६८॥
काही पतिपत्नीचे संघटन । परि आड येई थोरांचा मान । काडीमोड, विरोध अथवा भांडण । करी वैराण जीवन त्यांचे ॥६९॥
काही लपवालपवी करिती । मुली नांदायासि न धाडिती । काही मुलींना ओढूनि नेती । तमाशा करिती जीवनाचा ॥७०॥
काही लग्नाआधी लपविती उणीव । त्याची पुढे होता जाणीव । जन्मभरि भोगावा लागे उपद्रव । सकळासि मग ॥७१॥
काही बढाई दाविती खोटी । काही रुसती आंदणासाठी । सोय न पाहता करिती कष्टी । परस्परासि सोयरे ॥७२॥
कोणास दागिन्यांची हाव । सदगुणांचा नकळे भाव । त्यास फसवी नकली वैभव । जीवन गारद मुलींचे ॥७३॥
मुलीमुलांचा लग्नाबाजार । शिक्षण, सौंदर्य, नोकरीवर । भाव न्यूनाधिक ठरविती साचार । जीवनमूल्ये न जाणता ॥७४॥
काही लग्नाचे दलाल । उधळीत जाती रंग गुलाल । मुलामुलींचे जीवन हलाल । करिती स्वार्थास्तव ॥७५॥
काही मुलींना खपवू पाहती । ध्यानी न घेता नीति-अनीति । ऐसी लाचार केली स्थिति । नाना रूढयांनी ॥७६॥ .
ज्योतिषासि देऊन-घेऊन । मनासारिखे काढविती गुण । प्रसंगी नावंहि सांगती बदलून । दंभ दारूण वाढला ॥७७॥
आकाशांतील पाहती ग्रह । इकडे स्वभावी वेगळे दुराग्रह । जीवनात वाढे जयांनी द्रोह । ऐसे त्यांना न दिसती ॥७८॥
म्हणती वधुवरे सुलक्षण । जुळले त्यांचे छत्तीसगुण । इकडे छत्तीसी अथवा खडाष्टक पूर्ण । करी जीवन बरबाद ॥७९॥
वधुवरांचे उत्तम गुण हेचि परस्पराचे महाभूषण । त्यावाचोनि विवाह केला वैभवपूर्ण । तरि तो सर्व अमंगल ॥८०॥
काही ठिकाणी विवाह करिती । वेडयासारखा पैसा उधळिती । उपयोग नाही ऐसी रीति । कासयास आचरावी ? ॥८१॥
लग्नाचे अपार सोहळे । विहीण-व्याही-मामे सगळे । वर्हाडांचे गोंधळ सावळे यासि विवाह म्हणो नये ॥८२॥
अस्ताव्यस्त तारांबळ । उधळपट्टी आणि धावपळ । यासि म्हणावे कार्य अमंगळ । खर्च निष्फळ पैशांचा ॥८३॥
लग्नाकरिता कर्ज करावे । जन्मभरि व्याज भरीत जावे । लग्नासाठी कफल्लक व्हावे । कोण्या देवे सांगितले ? ॥८४॥
चार-पांच दिवस लग्न । लग्नात होती नाना विघ्न । मोठेपणाचे विडंबन । कासयासि करावे ? ॥८५॥
असोत अडी-अडचणी किती । साधिलीच पाहिजे तिथि । ऐसी का ठेवावी प्रवृत्ति । रूढिबध्द ? ॥८६॥
प्रसन्न हवापाणी ऋतु । हाचि विवाहाचा मुहूर्त । बाकीचे झंजट फालतू । समजतो आम्ही ॥८७॥
दिवस पाहावा सुंदर । हावापाणी सोयीस्कर । सर्वासि होईल सुखकर । म्हणोनिया ॥८८॥
खर्च नको भव्य मंडपाचा । देखावा असावा निसर्गाचा । अथवा सभामंडप मंदिराचा । योजावा या कार्यासि ॥८९॥
वेळ पैसा आणि श्रम । वाचवावेत करोनि नेम । गुणास द्यावे महत्त्व परम । जाति-धन-भ्रम सोडोनि ॥९०॥
सुंदर करावे सभास्थान । बैसवावे साजेलसे जन । वरवधूना समोर बसवून । सूचना द्यावी सूचके ॥९१॥
द्यावा वरवधूंचा परिचय । प्रकट करावा सत्कार्य-निश्चय । मग साधावे कार्य मंगलमय । मंगलाष्टके म्हणोनिया ॥९२॥
मंगलाष्टकी विवाह-उद्देश । सज्जने करावा उचित उपदेश । येऊ न द्यावा नाटकी अंश । अपवित्र त्यात ॥९३॥
सभा असावी आदरपूर्ण । देऊ नये धूम्रपान । धर्मसंस्कार वाटावे लग्न । अग्निदेवते स्मरोनिया ॥९४॥
वडील जनांचे आशीश घ्यावे । सर्वाशी प्रेमादरे वागावे । गोड बोलोनि उरकवावे । लग्नप्रसंगा ॥९५
वरवधूना ग्रामीण खादी । असो जुनी वा नवी साधी । ऐशा वस्त्रीच लग्नाक्षदी । पडाव्या शिरी उभयतांच्या ॥९६॥
कपडे असती ते घालावे । नसता धुवोन स्वच्छ करावे । अहेरादि नको लग्नप्रसंगी यावे । सर्वजने आदरे ॥९७॥
लग्नानिमित्त भेटीच देणे । तरि उभयतांचा संसार सुरू व्हावा तेणे । अथवा गावाचे फिटावे उणे । ऐशी योजना करावी ॥९८॥
सारांश, लग्नाचा प्रसंग । विचाराने करावा यथासांग । समजोनि परिस्थिति वेळप्रसंग । सर्वकाही ॥९९॥
ऐसा हा मंगल प्रसंग । देशाचे भूषवी अंग । समाजजीवन करील अभंग । वाढेल कीर्ति गावाची ॥१००॥
विवाहाचा जो संस्कार । त्याचे महत्त्व सर्वात थोर । त्या पायावरीलच समाजमंदिर । म्हणोनि सुंदर करा यासि ॥१०१॥
यासाठीच वधुवरांसंबंधी बोललो । नवनिर्माण ओघाने पुढे चाललो । सांगोनि एकदा मुक्त झालो । सुखदु:ख समाजाचे ॥१०२॥
स्त्रीपुरुष ही दोन चाके । परस्परपोषक होता निके । गाव नांदेल स्वर्गीय सुखे । तुकडया म्हणे ॥१०३॥
इतिश्री ग्रामगीत ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत । विवाहसंस्कारे ग्रामोद्वार कथित । एकविसावा अध्याय संपूर्ण ॥१०४॥
ग्रामगीता अध्याय एकविसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.



















