ग्रामगीता अध्याय पहिला – १ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्याय पहिला – १
Gram Gita Chapter I – 1
ओवी संख्या :- १२१
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय १ – देव-दर्शन
देव-दर्शन

49-A राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ALL ग्रंथ
—-🕉ग्रामगीता
प्रस्तावना
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
ग्रामगीता अध्याय पहिला प्रारंभ
ग्रामगीता अध्याय १
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
Gram Gita Chapter I Beginning


—-🕉ग्रामगीता अध्याय १ – देव-दर्शन
देव-दर्शन
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
ॐ नमोजी विश्वचालका ! जगदवंद्या ब्रह्मांडनायका ! एकचि असोनि अनेका । भासशी विश्वरूपी ॥१॥
आपणचि झाला धराधर । उरला भरोनि महीवर । अणुरेणूतूनी करशी संचार । विश्वनाटक नटावया ॥२॥
आपणचि मंदिर, मूर्ति, पूजारी । आपणचि पुष्पे होऊनि पूजा करी । आपणचि देवरूपे अंतरी । पावे भक्ता ॥३॥
गणेश, शारदा आणि सदगुरू । आपणचि भक्तकामकल्पतरू । देवदेवता नारद तुंबरू । आपणचि जाहला ॥४॥
नाना चातुर्यकला – व्यापे । आपणचि गाये नाचे आलापे । प्रसन्न होऊनि आपणचि सोपे । भक्तिफळ दावी ॥५॥
गुरूशिष्य एकाच स्थळीचे । भिन्न नाहीत पाहता मुळीचे । सुखसंवाद चालती भिन्नतत्वाचे । रंग रंगणी आणावया ॥६॥
हे जयाचिया अनुभवा आले । त्याचे जन्ममरणदुःख संपले । आत्मस्वरूप मूळचे भले । ओळखले म्हणोनिया ॥७॥
त्यासि नाही उरला भ्रम । विश्व आपणासह झाले ब्रह्म । तो जे जे करील ते ते कर्म । पूजाच तुझी ईश्वरा ! ॥८॥
तुझ्या शक्तीची ही पूर्णावलि । अजूनि नाही जीवाभावात शिरली । म्हणोनीच अज्ञानदशा उरली । आम्हापाशी ॥९॥
जेव्हा तुझे दर्शन घडे । उघडती विशाल ज्ञानाची कवडे । मग मी – तू – पणाचे पोवाडे । कोठचे तेथे ? ॥१०॥

ज्यासि तुझे दर्शन घडले । त्यास कैचे परके राहिले ? । सर्व विश्वचि झाले आपुले । दिव्यपणी ॥११॥
परि आम्ही वंचित दर्शनासि । परसुखे आनंद कुठला आम्हासि ? आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी । मानतो स्वर्ग ॥१२॥
दुसर्‍याची उणीव पाहता हसणे । दुसर्‍याची आपत्ति पाहून पळणे । दुसर्‍याचे वैभव देखोनि जळणे । होते ऐसे ॥१३॥
कष्टासाठी कोणी मरो । प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरो । लोभासाठी कुणाहि स्मरो । होते ऐसे ॥१४॥
हे जेव्हा अनुभवा आले । तेव्हाच ” अल्पज्ञ आम्ही ” कळले । म्हणोनि तुझ्या नामी वेधले । चित्त सर्वतोपरी ॥१५॥
दुजा कोणा शरण जावे । तरी सर्वागीण शक्ति केवि पावे ? एकेकाचे चरण धरावे । तरी वेळ जीवा फावेना ॥१६॥
उजेडाकरिता काजवे धरावे । भुललिया मार्गी परतो जावे । तेथे स्वसंवेद्य कैसे व्हावे । निर्भयपणे ? ॥१७॥
तारकेवरि दृष्टि धरली । तीचि स्वये क्षणात उडाली । तैसी गति होईल आमुची भली । विशाल मार्गी ॥१८॥
तूंची खरा निश्चयी अविनाशी । कधीकाळाही न ढळशी । सर्व गुणज्ञान तुझेपाशी । हवे ते ते लाभती ॥१९॥
यासीच पाहिजे सूर्यकिरण । अनेक मार्ग दिसती दूरून । अनुभवया आपुले चिंतन । ध्येय – प्राप्तिरूपाने ॥२०॥

सुर्य जैसा नभी उगवला । अंधकाराचा नाश झाला । तैसा तू हृदयी प्रकटला । जीव झाला विश्वव्यापी ॥२१॥
चंद्राचे किरण व्यापले । चकोरचित्त प्रसन्न झाले । तैसे तू आपुलेसे केले । मग पळाले ताप सारे ॥२२॥
जोवरि पंचानन नाही दिसला । तोवरि अतिगर्व जंबुकाला । तैसा तुझा प्रकाश नाही पडला । तोवरि ग्रासती विकारशत्रु ॥२३॥
सूर्ये जीवन देता आपुले । कमल जैसे हसले फुलले । तैसे तुझ्या दर्शनाने झाले । कॄपापात्र जीवाचे ॥२४॥
राजहंसे चोच पुरविता । पाणीदुधाची होय भिन्नता । तैसे तुझे ज्ञान स्पर्शे चित्ता । दोष – निर्दोषता उमगे ॥२५॥
अति काळोखी वीज कडाडे । दुरावला गडी दृष्टीस पडे । तैसी तुझ्या दर्शनप्रतापे घडे । शांतिप्राप्ति ॥२६॥
अज्ञानामुळे विकार माजती । अज्ञानेचि लाभते कुसंगति । अज्ञानानेच दुरावते प्राप्ति । सत्यस्वरूप देवाची ॥२७॥
तुझे दर्शन म्हणजे ज्ञान । अंतरंगात आनंदभान । वस्तु भरोनी पूर्णपण । तुझ्या ठायी ॥२८॥
म्हणोनी हे ज्ञानसमुद्रा ! पूर्णकलात्मक आत्मचंद्रा ! सर्वागविकासा स्वर्गमुनींद्रा ! कृपा करी आम्हावरी ॥२९॥
जीवाचे दारिद्र्य द्याया निवारून । एक तूचि आहेसि संपन्न । म्हणोनी आलो तुझ्या शरण । सर्वज्ञा आदिपुरूषा ॥३०॥

होतो तुझेचि परि दुरावलो । ठायीच असोनि भुललो । मृगजळास पाणी समजोनि धावलो । हरिणापरी ॥३१॥
सुकलिया नदीसि पाहूनि । त्रस्त होती पिपासू प्राणी । भरते येता जाती आनंदूनि । तैसेचि करी आम्हासि ॥३२॥
कोवळे अंकुर भूमीवरि फुटले । जेथे मंदशीतल वर्षा चाले । त्यापरीच समाधान झाले । आर्त जीवाचे तवकृपे ॥३३॥
ऐसे व्हावयासि करतो प्रार्थना । तन्मय करोनी जीवप्राणा । भिन्न उरोचि नये वाटे मना । व्हावे लवणा – समुद्रापरी ॥३४॥
यात असती किती अडथळे । आकुंचित केले अज्ञान – मळे । परि तुझ्या विशालतेचे चिंतन बळे । करील मोकळे आम्हासि ॥३५॥
आम्ही कितीहि दडलो पडलो तरी । तुझे लक्ष उडत्या घारीपरी । निवडोनि काढी अज्ञानाबाहेरी । सुख सर्वतोपरी द्यावयासि ॥३६॥
भुललिया वत्सा गाय हंबरे । पक्षिणी अंडाभवती फिरे । तान्हुल्या माय काम करिताहि सावरे । आपुलेचि म्हणोनि ॥३७॥
भिंगोटी अळीसि गोंजारी । निज्यध्यासे आपणासमान करी । तैसा देव भक्तालागी घरी । साधनजाळे पसरोनि ॥३८॥
ऐसे हे प्रत्यक्षचि घडे । जीव आर्त होता मार्ग सापडे । मार्गे चालता साक्षात्कार जोडे । व्यापक देवदर्शनाचा ॥३९॥
हे जाणोनि करितो प्रार्थना । पूर्ण व्हावया मानवांची आरधाना । विश्वरूप पहाया देवदर्शना । आलो चरणा निर्धारे ॥४०॥

तू व्यापक सर्वातरात्मा । सत्यज्ञानानंद निष्कामा । तैसेचि होणे ह्रदये आम्हा । तरीच होय तुझी भक्ति ॥४१॥
म्हणोनि आमुची बुध्दि विशाल करी । कर्म करावया भूलोकावरि । आयुष्य दे शतक निर्धारी । जीवो आम्ही विश्वसेवे ॥४२॥
पुण्यक्षेत्र पंढरपुरी । बैसलो असता चंद्रभागेतिरी । स्फुरू लागली ऐसी अंतरी । विश्वाकार वॄत्ति ॥४३॥
तेथे दृष्टांत होई अदभूत । कासया करावी विश्वाची मात ? प्रथम ग्रामगीताचि हातात । घ्यावी म्हणे ॥४४॥
विश्व ओळखावे आपणावरून । आपणचि विश्वघटक जाण । व्यक्तिपासूनि कुटुंब निर्माण । कुटुंबापुढे समाज आपुला ॥४५॥
समाजापुढे ग्राम आहे । ग्रामापुढे देश राहे । देश मिळोनि ब्रह्मांड होय । गतीगतीने जवळ ते ॥४६॥
मानवमात्रांचे प्रथम माहेर । आपुले गाव त्यातील घर । यातूनि प्रगति करीत सुंदर । पुढे जावे विश्वाच्या ॥४७॥
प्रथम पाया मानव – वर्तन । यास करावे उत्तम करावे जतन । गाव करावे सर्वागपूर्ण । आदर्श चित्र विश्वाचे ॥४८॥
गाव हा विश्वाचा नकाशा । गावावरून देशाची परीक्षा । गावचि भंगता अवदशा । येईल देशा ॥४९॥
आकारे पॄथ्वी असो विशाल । नद्यापर्वतांनी महाप्रबल । परि आमुचे गावचि मूल । घटक विशाल पॄथ्वीचा ॥५०॥
गावचि जरि उत्तम नसले । तरि देशाचे भवितव्य ढासळले । ऐसे मानावे जाणत्याने भले । ह्रदयामाजी ॥५१॥
गावाच्या प्रसन्नतेत संत प्रसन्न । विश्व प्रसन्न, देव प्रसन्न । सर्वाआधी मन प्रसन्न । करावयाचे आपुले ॥५२॥
हे ओळखाया ज्ञान व्हावे । ज्ञान अनुभवासि आणावे । मगचि सुख संपादावे । विश्वरूप – दर्शनाचे ॥५३॥
जाणावे ग्राम हेचि मंदिर । ग्रामातील जन सर्वेश्वर । सेवा हेचि पूजा समग्र । हाचि विचार निवेदावा ॥५४॥
यासाठी करावा ग्रंथ प्रारंभ । आचरण – ज्ञान मूळारंभ । सक्रियतेचा मूळस्तंभ । उभारावा ॥५५॥
ऐसा ऐकिला मधुर आवाज । भीमेतरी असता सहज । तैसाचि वंदिला पंढरीराज । ध्यानरूपाने ॥५६॥
केले साधुसंतांचे चिंतन । करावया ग्रामाचे पुनर्निर्माण । नवीन काहीच न सांगेन । जुनेचि देणे देवाचे ॥५७॥
संतमहंतांनी कथन केले । परि ते पुढे विपर्यस्त झाले । मानवा – मानवांत खंड पाडले । पाखंडयांनी ॥५८॥
विशालता गेली मानवांची । रचना केली जातिपंथांची । कामाची होती ती कायमची । विभागणी माथी बैसली ॥५९॥
सेवेसाठी पंथ – मंडळ । ते जनाशी वितंडायाचे झाले खेळ । असोनि एकचि गोपाळ । लढले जैसे यादवापरी ॥६०॥
हे व्दैत जावे निघोन । म्हणूनि सेवा आरंभावी आपण । ऐसा संकल्प दृढ धरोन । ग्रंथ केला सदभावे ॥६१॥
आपुल्यापरी काम घ्यावे । जैसे जयासि साधेल बरवे । उत्तमचि करित जावे । ईश्वरगुरूसि स्मरोनी ॥६२॥
वाडःमयी सेवा सेवाचि जाण । जेणे मार्गी लागती जन । जन तितुका जनार्दन । जाणूनि कार्य करावे ॥६३॥
जे जे आपणासि कळते । ते ते सांगावे सकळाते । आपुलेचि म्हणोनि जन ते । मायबाप ॥६४॥
सांगणाराचि हुशार झाला । ऐकणारा वाया गेला । ऐसा समज ज्याने केला । बुडाला तो अहंकारे ॥६५॥
सर्वचि ऐकतील ऐसे नाही । यासि आहे मागील ग्वाही । म्हणोनि सेवा खंडो द्यावी । ऐसे नाही उचित ॥६६॥
आत्मसंतोषाकारणे । विश्वसेवेच्या प्रेरणेने । ग्रंथ रचिले सहृदयपणे । थोर जनांनी ॥६७॥
काही सांगती वेश्वाची कहाणी । काही बोलती देश लक्षूनि । आपण सांगावी ग्रामावरूनि । ग्राम – गीता ॥६८॥
कृष्णगीता रामगीता । हंसगीता हनुमंतगीता । शिवगीता अवधूतगीता । कथिल्या कोणी ॥६९॥
गुरूगीता गणेशगीता । पांडवगीता भगवदगीता । देवगीता देवीगीता । सर्व झाल्या ॥७०॥
सर्वाचा एकचि सार । शुध्द करावे हॄदय – मंदिर । सुखी करावे चराचर । तरिच पावे सदगति ॥७१॥
” विश्वब्रम्ह ” बोलत गेला । सभोवती समाज दुःखी बुडाला । ग्रामसेवाहि न कळे ज्याला । त्याचे ज्ञान व्यर्थचि ॥७२॥
वनी तीर्थी फिरोनी आला । आपुला गाव नाही सुधारला । तो कैसा म्हणावा महाभला । एकटाचि ? ॥७३॥
संतांचे ऐसेचि वचन । आपण तरला ते नव्हे उध्दरण । लोकास लावी सन्मार्ग पूर्ण । तोचि तरला पूर्णपणे ॥७४॥
ठेवोनिया संतांवरि विश्वास । हाचि धरिला मनी निजध्यास । आरंभ केला ग्रामगीतेस । आपुल्यापरी सेवाभावे ॥७५॥
माझी मला साक्ष आहे । मी ग्रंथकर्ता विद्वान नोहे । परि धान्यराशीत आपुले पोहे । टाकावे वाटती ॥७६॥
देव प्रेमाचा भुकेला । न पाही जातपात अथवा कला । साधाभोळाहि उध्दरिला । ऐसा लौकिक तयाचा ॥७७॥
देव सौंदर्याचा भोक्ता असता । तरि कुब्जेवरि का प्रसन्न होता ? देव जरि वैभवचि इच्छिता । तरि विदुराघरी का धावे ? ॥७८॥
देवा कलाकौशल्याचि रूचे । तरि का वेड पेंध्यावाकुडयाचे ? मीपण जिरवी ब्रम्हदेवाचे । तेथे पांडित्य काय करी ? ॥७९॥
ऐसे देवाचे गोडवे । सांगावे ते कमीच पडावे । म्हणोनि आपुल्यापरी चिंतावे । कार्यं करावे भक्तीने ॥८०॥

आपुला विश्वास जैशापरी । तैसी करावी चाकरी । येथे बोलायची उरी । आहे सर्वालागोनि ॥८१॥
आपणासि देवापायी समर्पावे । विश्वी विश्वाकार व्हावे । पहावे तैसे बोधीत जावे । जीवालागी ॥८२॥
ऐसे धरोनी मानसी । आरंभ केला ग्रामगीतेसि । प्रार्थूनिया संतमहंतासि । आशीर्वाद घेतला ॥८३॥
संतमहात्माचे हृदगत । देवाला शुभ सृष्टिसंकेत । विशद कराया सरळभाषेत सुखसंवाद आरंभिला ॥८४॥
येथे श्रोती विचारिले । ग्रामगीतेप्रति लिहीणे झाले । त्यात संतदेव कासया घातले । स्तुतिस्तोत्रे गौरवूनि ? ॥८५॥
आपुले गाव उन्नत करावे । सकल लोक हाती घ्यावे । यासि देवाचे गोडवे । गावेत कासयासि ? ॥८६॥
काय देव न म्हणता काम नोहे ? संता न भजता वाया जाय ? आशीर्वाद न घेता येतो क्षय । सत्कार्यासि ? ॥८७॥
कासयासि मध्यस्थता ? उगीच देवधर्मांची कथा । करवी सर्व आपण गाथा । मारावी माथा देवाच्या ॥८८॥
ऐसे देवावरि विश्वासूनि । लोक झालेत दुबळे मनी । गाव भिके लागले याच गुणी । सोडा ” देव देव ” बोलणे ॥८९॥
तुमचे म्हणणे मी ऐकले । लोक पराधीन आळसी झाले । परि देवाने ऐसे सांगितले । कोठे आहे ? ॥९०॥
अहो ! देवचि ऐसा नाही झाला । मग सांगेल कैसा इतरांला ? हा तो विपर्यास केला । भित्र्या आळसी लोकांनी ॥९१॥
ज्यासि करणे नको काही । त्याने द्यावे देवाची ग्वाही । आपुली पापे लपवावी सर्वही । पाठीमागे ॥९२॥
लोकात वाढवावा भ्रम । आपुले चुकवावेत श्रम । देवाचिया नामे चालवावे कुकर्म । त्यांनीच समाज बुडविला ॥९३॥
म्हणोनि मी तैसे न सांगेन । येथे जे केले देवस्मरण । ते भित्रे आळसी कराया जन । नाही जाणा निर्धारे ॥९४॥
देव म्हणजे कर्तव्यशूर । न्यायनीतीचे माहेर । क्रांतीकार्याचे दिव्य निर्झर । अग्रसर जगामाजी ॥९५॥
देव म्हणजे अतिमानव । मानवाचा आदर्श गौरव । त्यांचे कार्य ध्यानी राहो । फूर्ति यावया पुढिलासि ॥९६॥
येथे मुख्य देवाचे व्याख्यान । नाही केले यथार्थ पूर्ण । देवासि पुरूषोत्तम समजून । वागा म्हणालो सर्वाना ॥९७॥
मुख्य देवाचे आरंभी स्मरण । त्यातहि त्याचे एकेक लक्षण । तेच साधकासि व्हावे साधन । म्हणोनिया आठविले ॥९८॥
चला विशालतेच्या मार्गी । जे गेले ते तरले जगी । भरोनि दिली अंतरंगी । हीच कीर्ती भाविकांच्या ॥९९॥
मित्रहो ! गाव व्हावे स्वयंपूर्ण । सर्व प्रकारे आदर्शवान । म्हणोनीच घेतले आशीर्वचन । पूर्वजांचे ॥१००॥
आशीर्वाद म्हणजे त्यांचे वचन । ऐकोनि घ्यावे देऊनि श्रवण । त्या फळवावे कार्य करोन । यासि आशीर्वाद बोलती ॥१०१॥
लोक थोर आशीर्वाद घेती । परि कार्य थोडेहि न करिती । तेणेचि फजीत पावती । गुलाम दुर्बळ होऊनि ॥१०२॥
आमुचे आशीर्वादाचे लक्षण । थोरांनी करावे मार्गदर्शन । बोधमार्ग उमगावा आपण । सफल करावा संकल्प ॥१०३॥
एरव्ही थोरानी म्हणावे ” शतं जीव ” । आम्ही व्यसने करावी मृत्युठेव । अभ्यास न करिता ” बुध्दिमान भव ” । आशीर्वाद कैसे फळे ? ॥१०४॥
अंध दुबळा भाविकपणा । तो कधीहि न रूचे माझ्या मना । संतदेवाची निष्क्रिय गर्जना । करील तो अस्तिक नव्हे ॥१०५॥
आम्ही मुख्यतः कार्यप्रेरक । चालती आम्हा ऐसे नास्तिक । ज्यांचा भाव आहे सम्यक । ” सुखी व्हावे सर्व ” म्हणूनि ॥१०६॥
भलेही तो देव न माने । परि सर्वा सुख देऊ जाणे । मानवासि मानवाने । पूरक व्हावे म्हणूनिया ॥१०७॥
ग्रामातील सर्वजन । होवोत सर्वसुख – संपन्न । घेऊ नये कुणाचा प्राण । समाजस्थिती टिकावी ॥१०८॥
आम्ही सर्वचि संतुष्ट राहू । सर्व मिळोनि सर्व खाऊ । राबू सर्व, सुखे सेवू । जे जे असेल ते सगळे ॥१०९॥
आमची संपत्ति नसे आमची । आमची संतती नसे आमची । कर्तव्यशक्तीहि नसे आमची । व्यक्तिशः उपभोगार्थ ॥११०॥
हे सारे गावाचे धन । असो काया वाचा बुध्दि प्राण । ऐसे असे जयाचे धोरण । तो नास्तिकहि प्रिय आम्हा ॥१११॥
तो तत्त्वतः नास्तिकचि नोहे । जो सर्वासि सुखविताहे । तो ” देव देव ” जरी न गाये । तरी देवसेवाचि त्या घडे ॥११२॥
आम्ही देवाचे नांव मध्ये घातले । परि सर्वाच्या सुखार्थ कार्य केले । कर्तव्यतत्परतेसीच वर्णिले । जिकडे तिकडे ॥११३॥
लोकापुढे विशाल ज्ञान । ठेवाया अत्युच्च आदर्श कोण । म्हणोनि देवाचे नामाभिधान । घेतले विशाल भावाने ॥११४॥
आम्ही आपुल्यासाठी मरतो । देव सकळासाठी कार्य करतो । हाचि भाव त्याने स्फुरतो । म्हणोनि धरिला देव चित्ती ॥११५॥
देव म्हणजे घेवचि नोहे । सर्व काही देवचि आहे । ऐसा ज्याचा संप्रदाय । त्यासि भजू जीवेभावे ॥११६॥
अंतिम ध्येय अखंड शांति । अनुभवा यावी जीवाप्रति । याचलागी केली स्तुति । साध्यसाधनाची ॥११७॥
जे शांती आणि सत्य । अंगी मुरवोनि झाले कृतकॄत्य । तेचि सेवामुर्ति संत स्तुत्य । आदर्शरूपे ॥११८॥
उदारचरित संतसज्जन । मनोभावे तयासि वंदन । जे उपदेशिती ” जनी जनार्दन ” । गाव संपन्न करावया ॥११९॥
साधुसंत देवधर्म । मानवोध्दारचि त्यांचे कर्म । तेचि आठवूनि उध्दरू ग्राम । तुकडया म्हणे ॥१२०॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र – स्वानुभव संमत । देवसंत वंदोनि कथिले ह्रदगत । प्रथम अध्याय संपूर्ण ॥१२१॥

ग्रामगीता अध्याय पहिला समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता ग्रामदेवतेलाच अर्पण केली आहे. हा गाव सुखी व्हावा. सर्वार्थाने समृद्ध व्हावा. परस्परांचा स्नेहभाव जागवावा. ज्यांचे हात श्रमांसाठी पुढे सरसावले आहेत, त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळावी, मानवतेचे तेज झळाळावे, या आर्त तळमळीने त्यांनी ही ग्रामगीता अर्पण करून ग्रामजीवनात समृद्धीचे पूर्णत्व आणणारी ग्रामदेवता जनमनात जागवली आहे.

जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत आहेत. त्यांच्या अंतरंगात वास करीत असलेली तळमळ ग्रामगीतेतून शब्दरूप होऊन बाहेर पडली आहे. भारतीय नवरचनेच्या संधिकाळात महाराजांनी ही ग्रामगीता जनतेच्या हाती देऊन ग्रामसुधारणेच्या कामाला सैद्धांतिक दिशा दिली आहे.

या ग्रामगीतेमध्ये एकेचाळीस अध्यायात आठ पंचके आहेत.
१) सद्‌धर्ममंथन,
२) लोकवशीकरण,
३) ग्रामनिर्माण,
४) दृष्टिपरिवर्तन,
५) संस्कारशोधन,
६) प्रेमधर्मस्थापन,
७) देवत्वसाधन, आणि
८) आदर्श जीवन
अशी ती आठ पंचके म्हणजे ग्रामजीवनाच्या विकास संकल्पनेतील अष्टमहासिद्धीच होत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता या युगग्रंथा मध्ये 41 अध्याय 41 जागतिक कीर्तीच्या महापुरुषांच्या विचारांचे आहेत पावणे पाच हजार ओव्या वीस हजार चरणे आणि ८ पंचक म्हणजे मिळते जुळते 5 विषयाचे पाच अध्याय एक पंचकात आहेत,
नाव ग्रामगीता आहे कारण महाराजांचा केंद्रबिंदू खेड्यातील माणूस होता परंतु ही सर्वांच्या कामाची आहे , ज्यात आदर्श दिनचर्या, आदर्श खानपान, व्यसनमुक्ती, जीवन जगण्याची कला, देव आणि देवदेवळे, ग्रामीण अर्थव्यवस्था, शिक्षण, कला, क्रीडा, राजकारण, समाजसेवा , एकूण मानवाचं जीवन कसं असलं पाहिजे याच शिक्षण ग्रामगितेमध्ये दिलेलं आहे , ग्राम म्हणजे गाव आणि गीता म्हणजे तत्व, जे ज्ञानोबा ते विनोबा या संतांपर्यंत सर्वांनी आपल्या वाङ्मयामध्ये लिहिलं त्यालाच एकसंघ करून आणि खूप मोठं तत्वज्ञान आजच्या प्राकृत मराठी मध्ये जनसामान्यांपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पोहोचविले

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी रचलेले प्रसिद्ध काव्य. ग्रामविकासाच्या उत्कटतेतून ते प्रकट झाले आहे. विनोबा भावे, सोनोपंत दांडेकर, वि. स. खांडेकर, वि. भि. कोलते, ग. त्र्यं. माडखोलकर, संत गाडगेबाबा यांच्या प्रास्ताविकासह हे १९५५ मध्ये प्रकाशित झाले. साध्या, सोप्या, सरळ, ओघवत्या, रसाळ मराठीत तुकडोजी महाराजांनी भगवद्गीतेच्या तत्त्वांवर याची रचना केली. गांधीविचारांचा प्रभावही या काव्यावर असल्याने ‘भगवद्गीता + गांधीवाद = ग्रामगीता’ असे म्हटले जाते.

रचना : ग्रामगीतेत एकूण एक्केचाळीस अध्याय असून ४,६७५ ओव्या आहेत व अखेरच्या अध्यायाचा अपवाद वगळता पाच-पाच अध्यायांचे आठ ‘पंचक’ केले आहेत. या पंचकांचे विषयांनुरूप आठ विभाग केले आहेत, ते खालीलप्रमाणे :

सद्धर्ममंथन : देवदर्शन, धर्माध्ययन, आश्रम-धर्म, संसार-परमार्थ आणि वर्णव्यवस्था.
लोकवशीकरण : संसर्ग-प्रभाव, आचार-प्राबल्य, प्रचार-महिमा, सेवासामर्थ्य आणि संघटनशक्ती.
ग्रामनिर्माण : ग्रामरक्षण, ग्रामशुद्धी, ग्रामनिर्माणकला, ग्रामआरोग्य, गोवंशसुधार.
दृष्टिपरिवर्तन : वेषवैभव, गरिबी-श्रीमंती, श्रम-संपत्ती, जीवनशिक्षण, महिलोन्नती.
संस्कारशोधन : वैवाहिक-जीवन, अंत्यसंस्कार, सणोत्सव, यात्रा-मेळे, देव-देवळे.
प्रेमधर्मस्थापन : मूर्ति-उपासना, सामुदायिक प्रार्थना, प्रार्थना व विश्वधर्म, दलित-सेवा, भजन-प्रभाव.
देवत्वसाधन : संत-चमत्कार, संत-स्वरूप, अवतारकार्य, प्रारब्धवाद, प्रयत्न-प्रभाव.
आदर्श-जीवन : जीवन-कला, आत्मानुभाव, ग्राम-कुटुंब, भू-वैकुंठ, ग्रंथाध्ययन.
तुकडोजी महाराजांनी ४१ व्या अध्यायात ग्रामगीता या ग्रंथाचा महिमा वर्णिला आहे. त्यांच्या अंतरंगात घर करून राहिलेली ग्रामसंस्कृती ग्रामगीतेमध्ये शब्दरूप घेऊन समर्थपणे प्रकट झाली आहे. ग्रामगीतेतील तात्त्विक आशय खालीलप्रमाणे :

अद्वैती तत्त्वज्ञान : ‘ग्रामापासोनि पुढे वाढता| विश्वव्यापी व्हावे||’ अशा स्वरूपाचे वैश्विक दृष्टीचे अद्वैती तत्त्वज्ञान तुकडोजी महाराजांनी आपल्या ओव्यांतून सांगितले आहे.

‘एकापासोनि अनेक व्हावे| अनेकासि एकत्वी आणावे|
हा आपला मूळ संकल्प देवे| चित्ती घातला सर्वांच्या||’

असा या काव्यरचनेचा हेतू त्यांनी सांगितला असून ‘प्रत्येक जीव देवाचा अंश’ असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. विश्वाकार होणे, विश्वकुटुंबकल्याणाची आस लागणे, विश्वात्मभावी वृत्ती राखणे त्यांना ग्रामगीतेत अभिप्रेत आहे.

महत्त्वाच्या संकल्पना : ‘जीवन-कला’ ही ग्रामगीतेतील महत्त्वाची संकल्पना आहे. ‘गावाप्रती आमचे कर्तव्य कोणते?’, ‘आम्हीच झुरून काय होईल?’, ‘गावी कोणी ऐकेना’, आमुचे आचरण जरी भले| परि लोक दुसर्‍यांनी दिपविले| न ऐकती ते||’

या सर्व व्यावहारिक समस्यांचा ऊहापोह करून त्यावर तुकडोजी महाराजांनी मार्ग सांगितला आहे. ‘सत्यचि प्रभावी सर्वांहून’ अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. गावी भिन्न-भिन्न संप्रदाय असतात, त्यांचे देव, धर्म, उत्सव निराळे असतात.

‘भिन्न भिन्न झाले गट| वेगवेगळे पडले तट||
आकुंचित मते शिकविती रोगट| समाजासि||’

यासाठी अलग न राहता समुदायात निर्भय होऊन मिळोनि जावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

थोडक्‍यात सांगायचे, तर तुकडोजी महाराजांची ग्रामगीता हीच ग्रामविकासाची संहिता होय.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading