आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२७ फेब्रुवारी, दिवस ५८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी १०१ ते १२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ६८५ ते ६९६
“२७ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 2७ feburvari
राम कृष्ण हरी आज दिनांक २७ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
येथे सार्थ ज्ञानेश्वरीच्या २५ ओव्या टाकाव्या.
101-6
ऐसेनि प्रतीती हे गवसे । ऐसा अनुभव जयाते असे । तोचि समबुध्दी हे अनारिसे । नव्हे जाणे ॥101॥
अशा अतिव्यापक ज्ञानाने हे सारे विश्व व्यापलेले आहे, असा ज्याला ब्रम्हानुभव आहे, तो सर्वत्र समप्रमाणात चैत्यन्य पाहणारा योगारूढ आहे, असे जाणावे. या माझ्या बोलण्यात खोटे असे काही नाही.
102-6
जयाचे नांव तीर्थरावो । दर्शने प्रशस्तीसि ठावो । जयाचेनि संगे ब्रह्मभावो । भ्रांतासी ॥102॥
ज्याचे नाव तीर्थराज आहे, ज्याचे दर्शन घेतले असता अंतःकरणात प्रसन्नतेच्या, समाधानाच्या लहरी निर्माण होतात, तसेच ज्याच्या संगतीमुळे, अहंकाराने भ्रमित झालेल्या माणसाची भ्रांती संपून जाते व ब्रम्हरूप होतो,
103-6
जयाचेनि बोले धर्मु जिये । दिठी महासिध्दिते विये । देखे स्वर्गसुखादि इये । खेळु जयाचा ॥103॥
ज्याच्या सहज बोलण्यातून धर्म प्रकट होत असतो, ज्याच्या कृपादृष्टीने महासिद्धी प्रकट होतात, ती स्वर्गातील सुखे ज्याच्या सहज लीला आहेत,
104-6
विपाये जरी आठवला चित्ता । तरी दे आपुली योग्यता । हे असो तयाते प्रशंसिता । लाभु आथि ॥104॥
अशा महापुरुषांचे नावाचं मनात जरी सहज स्मरण केले तरी तो आपली योग्यता देतो; हे राहू दे. त्याच्या बद्दल अधिक काय सांगावे ? त्याची स्तुती केल्यास निश्चितच (पारमार्थिक) लाभ होतो.
योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥6. 10॥
भावार्थ :-
ज्याचे मन व इंद्रिय यांच्यासह शरीर जिंकले आहे, जो संपूर्ण वासनारहित आहे, ज्याने कसलाही संग्रह केला नाही, त्या योगी पुरुषाने एकांत स्थानी एकटेच बसून चित्ताला आत्मतत्वात स्थिर केलेले आहे.
(आत्मानुभवात तल्लीन असतो)
105-6
पुढती अस्तवेना ऐसे । जया पाहले अद्वैतदिवसे । मग आपणपाचि आपण असे । अखंडित ॥105॥
ज्याचा कधी अस्त होत नाही, असा अद्वैताचा दिवस ज्याच्या हृदयात उजडला आहे, तो पुरुष सदैव आपणच आपल्या ठिकाणी रममाण असतो.
106-6
ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी । सहजे अपरिग्रही जो तिही लोकी । तोचि म्हणऊनि ॥106॥
अशा व्यापक दृष्टीने जो विचारी बनलेला असतो, तो कोठेही सदैव एकटाच आहे, तो परिग्रह न करणारा आहे; कारण तोच तिन्ही लोकात ब्रम्हरुपाने भरलेला आहे.
107-6
ऐसिये असाधारणे । निष्पन्नाची लक्षणे । आपुलेनि बहुवसपणे । श्रीकृष्ण बोले ॥107॥
(ज्ञानेश्वर माऊली म्हणतात) अशी ही सिद्ध पुरुषाची असाधारण लक्षणे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सर्वज्ञतेने सांगितली आहेत.
108-6
जो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु । जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची ॥108॥
जो ज्ञानी लोकाचा पिता आहे व सर्व पाहणाऱ्यांचा दृष्टीने प्रकाशक आहे आणि ज्या सामर्थ्याच्या केवळ संकल्पाने विशाल विश्वाची रचना होते,
109-6
प्रणवाचिये पेठे । जाहले शब्दब्रह्म माजिठे । ते जयाचिया यशा धाकुटे । वेढू न पुरे ॥109॥
ओंकाराच्या पेठेमध्ये तयार झालेले जे शब्दब्रम्ह म्हणजे वेद हे मर्यादित असल्यामुळे ज्याच्या अनंत यशाला लपेटु शकले नाहीत, त्या यशाचे संपूर्ण वर्णन करू शकत नाहीत.
110-6
जयाचेनि आंगीके तेजे । आवो रविशशीचिये वणिजे । म्हणौनि जग हे वेसजे- । वीण असे तया ॥110॥
ज्याच्या स्वयंभू प्रकाशावर चंद्र-सूर्याचे कार्य चालते. सूर्य – चंद्राला जर परमेश्वराचा प्रकाश नसता, तर त्यांना हे जग दिसले नसते. संपूर्ण जगच परमेश्वराच्या प्रकाशावर आधारित आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-6
हा गा नांवचि एक जयाचे । पाहता गगनही दिसे टांचे । गुण एकेक काय तयाचे । आकळशील तू ॥111॥
ज्ञानोबा माऊली स्वतःच्या मनाला म्हणतात, हे मना ! ज्या एका नामाचा विचार केला असता ते इतके व्यापक आहे की, त्याच्या पुढे विशाल आकाशदेखील ठेंगणे दिसते, त्या भगवंताचे एक – एक गुण तू कसे बरे जाणशील ?
112-6
म्हणोनि असो हे वानणे । सांगो नेणो कवणांची लक्षणे । दावावी मिषे येणे । का बोलिलो ते ॥112॥
म्हणून आता ही स्तुती पुरे. कारण अशा लक्षणांनी युक्त जो भगवान श्रीकृष्ण, तो स्वतः ज्या साधूचे वर्णन करतो, त्यांची लक्षणे आम्ही सांगू शकत नाही; परंतु ती सांगावीत म्हणून सांगितली. (कारण संतांची लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे सांगितली हे आम्हाला सांगता येत नाही. )
113-6
ऐके द्वैताचा ठावोचि फेडी । ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी । तरी अर्जुना पढिये हे गोडी । नासेल हन ॥113॥
(पण मला असे वाटते) ऐका. द्वैताचा ठावठिकाणा नाहीसा करणारे असे जे आत्मज्ञान, ते उघड उघड व्यक्त केले तर. अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहीशी होईल.
114-6
म्हणोनि ते तैसे बोलणे । नव्हे सपातळ आड लावणे । केले मनचि वेगळवाणे । भोगावया ॥114॥
म्हणून भगवंत तसे बोलले नाहीत; परंतु मध्ये त्यांनी अगदी पातळ असा पडदा ठेवला. अर्जुनाचे मन त्याच्या व आपल्या प्रेमाचा उपभोग घेण्याकरता भगवंतांनी वेगळे ठेवले.
115-6
जया सोहंभाव अटकु । मोक्षसुखालागोनि रंकु । तयाचिये दिठीचा झणे कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ॥115॥
जे मी ब्रम्ह आहे अशा बोधात अडकलेले आहेत आणि जे मोक्षसुखासाठी दीन झालेले आहेत, त्यांच्या दृष्टीचा कलंक तुझ्या प्रेमाला कदाचित लागेल.
116-6
विपाये अंहभाव ययाचा जाईल । मी तेचि हो जरी होईल । तरी मग काय कीजेल । एकलेया ॥116॥
आत्मज्ञानाच्या उपदेशाने अर्जुनाचा संपूर्ण अहंकार जर अकस्मात नाहीसा झाला आणि तो जर मीच होईल, तर मी एकट्याने काय बरे करावे ?
117-6
दिठीचि पाहता निविजे । का तोंड भरोनि बोलिजे । नातरी दाटुनि खेंव दीजे । ऐसे कोण आहे ॥117॥
ज्याला डोळ्यांनी पाहताच समाधान लाभावे किंवा तोंड भरून बोलावे अथवा दृढ आलिंगन द्यावे, असा अर्जुनाशिवाय जगात दुसरा कोण बरे आहे ?
118-6
आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवी । ते कवणेसि चावळावी । जरी ऐक्य जाहले ॥118॥
जर अर्जुनाचे आणि माझे ऐक्य झाले, तर आपल्या मनाला योग्य वाटणारी आणि अंतःकरणात न सामावणारी अशी गोष्ट कोणाला बरे सांगावी ?
119-6
इया काकुळती जनार्दने । अन्योपदेशाचेनि हातासने । बोलामाजि मन मने । आलिंगु सरले ॥119॥
अशा काकुळतीने भगवंतांनी योगारूढ पुरुषाची लक्षणे सांगण्याच्या हातोटीने बोलण्यामध्ये द्वैत ठेऊन आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले.
120-6
हे परिसता जरी कानडे । तरी जाण पा पार्थ उघडे । कृष्ण सुखाचेचि रुपडे । वोतले गा ॥120॥
हे ऐकण्यास जरी अवघड वाटत असले, तरीपण निश्चितपणे असे समज की, अर्जुन हा खरोखर भगवान श्रीकृष्णाच्या सुखाची ओतीव मूर्ती आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-6
हे असो वयसेचिये शेवटी । जैसे एकचि विये वांझोटी । मग ते मोहाची त्रिपुटी । नाचो लागे ॥121॥
हे राहू दे, ज्याप्रमाणे वय झाल्यावर एखाद्या वांझ स्त्रीला जर बाळ झाले असता त्या स्त्रीच्या रूपाने मग मूर्तिमंत मोहच वावरतो. (तशी देवाची स्थिती झाली)
122-6
तैसे जाहले अनंता । ऐसे तरी मी न म्हणता । जरी तयाचा न देखता । अतिशयो एथ ॥122॥
त्याचे अर्जुनाविषयी अतिशय प्रेम दिसून आले नसते, देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मी पहिला नसता तर मी असे (वांझोट्या बाईंसारखे) देवाला झाले, असे म्हंटले नसते.
123-6
पाहा पा नवल कैसे चोज । के उपदेशु केउते झुंज । परी पुढे वालभाचे भोज । नाचत असे ॥123॥
आश्चर्य पहा की, भगवंताचे अर्जुनाच्या ठिकाणी प्रेम कसे आहे ! ! कसला युद्धप्रसंग व कसल्या ठिकाणी हा उपदेश ! (माऊली म्हणतात युद्धाच्या प्रसंग अत्यन्त विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाच्या उपदेश करण्याला अगदी अयोग्य, परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंतांनी वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता आत्मज्ञानाच्या उपदेश केला) परंतु निश्चयेकरुन भगवान श्रीकृष्ण ही अर्जुनाच्या प्रेमाची मूर्तीच अगर चित्रच नाचत आहे.
124-6
आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी । पिसे आणि न भुलवी । तरी तेचि काइ ॥124॥
आवड आहे; पण लाज निर्माण करते, तर ती आवड कसली ? तसेच ते व्यसन आहे आणि त्याने कष्ट होत असतील, तर ते व्यसन कसले ? ते चक्क वेड आहे, परंतु भ्रम निर्माण करत नाही, तर ते वेड कसले ?
125-6
म्हणउनि भावार्थु तो ऐसा । अर्जुन मैत्रियेचा कुवासा । की सुखे श्रृंगारलिया मानसा । दर्पणु तो ॥125॥
म्हणून याचा भावार्थ असा की, अर्जुन हा भगवंताच्या मित्रत्वाचे आश्रयस्थान आहे किंवा सुखाने शृंगारलेल्या मनाचे प्रतिबिंब पाहण्याचा तो एक आरसा आहे.
दिवस ५८ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ६८५ ते ६९६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ६८५
संतांचे सुख झाले या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥
तेथे माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥धृपद॥
निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनिया ॥२॥
तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणासी ॥३॥
अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड । वागो नेदी आड कोणी तया ॥४॥
तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी । राहिले चरणी निकटवासे ॥५॥
अर्थ
संतांच्या संगतीने देवाला सुख झाले म्हणून देव त्यांची सेवा करतात. ज्या संतांची सेवा देवाला करायला आवडते त्या संतांचे वर्णन करण्या इतका माझा अधिकार काय ? जो निर्गुण असा परमात्मा सगुण साकार होऊन संतांची सेवा करतो पूजा करतो आणि त्यांना दंडवत घालतो, तीर्थे स्वत स्वच्छ होण्यासाठी संतांच्या पदस्पर्शाचि इच्छा करतात, पापी लोकांच्या पापाचे हरण करून ते मलीन झालेले असतात व ते निर्मळ होण्यासाठी संतांच्या पदस्पर्शाचि इच्छा करतात. म्हणून तेथे अस्ष्टमहासिद्धीना कोणी विचारत नाही. त्यांना कोणी जवळ फिरकू देत नाही. त्यांचा अडथळा कोणी जुमानत नाही. तुकाराम महाराज म्हणतात संत हे बलवंत शोरोमणी आहेत. तरीही विठ्ठलाच्या चरणी त्यांनी निकट वास्तव्य केले आहे.
अभंग क्र. ६८६
जो मानी तो देईल काई । न मानी तो नेईल काई ॥१॥
आम्हा विठ्ठल सर्वभूती । राहो चित्ती भलतैसा ॥धृपद॥
आधीन ते जना काई । जल्पे वायाविण ठायी ॥२॥
वंदी निंदी तुज तो गा । तुका म्हणे पांडुरंगा ॥३॥
अर्थ
या जगात जो आम्हाला मान देतो तो आम्हाला काय देणार आणि जो आम्हाला मानीत नाही तो आमचे काय नेणार आमच्या साठी सर्व भूती तो विठ्ठल आहे. वाटेल तर तो आमच्या चित्ती राहो. आपल्या जवळ काही नसताना लोक आपल्या ठिकाणी अभिमान बाळगत असतात. तुकाराम महाराज म्हणतात कोणी आम्हाला वंदन केले काय किंवा कोणी आमची निंदा केली काय ते सर्व तुलाच कडे लागते विठ्ठला.
अभंग क्र. ६८७
भावबळे कैसा झालासी लाहान । मागे संती ध्यान वर्णियेले ॥१॥
ते मज उचित करूनिया देवा । दाखवी केशवा मायबापा ॥धृपद॥
पाहोनिया डोळा बोलेन मी गोष्टी । आळिंगुनि मिठी देईन पायी ॥२॥
चरणी दृष्टि उभा राहेन समोर । जोडोनिया कर पुढे दोन्ही ॥३॥
तुका म्हणे उत्कंठित हे वासना । पुरवी नारायणा आर्त माझे ॥४॥
अर्थ
भक्ताच्या भावबळाने तू लहान कसा झालास, हे मोठे नवल. तुझ्या ध्यानाचे वर्णन मागे म्हणजे पूर्वी संतानी केले आहे. कृपा करून ते तुझे ध्यान मला दाखवा देवा. हे देवा मी तुला डोळे भरून पाहीन तुझ्या संगे हितगुजच्या गोष्टी ही करीन, मग तुला आलिंगन देऊन तुझ्या चरणांना आलिंगण देईन. तुझ्या चरणा कडे दृष्टी ठेऊन तुझ्या समोर माझे दोन्ही मी हात जोडून उभा राहीन. तुकाराम महाराज म्हणतात मी सांगितलेल्या या गोष्टीची मला फार वासना आहे, तेंव्हा माझी हि वासना तू पूर्ण कर.
अभंग क्र. ६८८
कृपाळु म्हणोनि बोलती पुराणे । निर्धार वचने यांची मज ॥१॥
आणीक उपाय नेणेचि काही । तुझे वर्म ठायी पडे तैसे ॥धृपद॥
नये धड काही बोलता वचन । रिघालो शरण सर्वभावे ॥२॥
कृपा करिसी तरि थोडे तुज काम । माझा तरि श्रम बहु हरे ॥३॥
तुका म्हणे मज दाखवी श्रीमुख । हरेल भूक या डोळियाची ॥४॥
अर्थ
हे प्रभू मला या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे कि पुराणातही असेच सांगितले आहे कि, तुम्ही फार कृपाळू आहात. तुझे वर्म मला कळेल असा उपाय मला माहित हि नाही आणि मी जाणतहि नाही. मला साधे नुसते धड काही नीट बोलताही येत नाही म्हणून मी तुम्हाला सर्व भावे शरण आलो आहे. हे प्रभू तुम्ही माझ्यावर थोडा जरी कृपेचा वर्षाव केला तरी तुमच्यासाठी हे काही मोठे काम नाही, माझे मात्र पुष्कळ श्रम वाचतील. तुकाराम महाराज म्हणतात हे हरी तू मला तुझे श्रीमुख दाविले तर माझ्या डोळ्यांची भूक हरेल.
अभंग क्र. ६८९
सर्वभावे आलो तुजचि शरण । कायावाचामनसहित देवा ॥१॥
आणीक दुसरे नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायी ॥धृपद॥
माझिये जीवीचेकाही जडभारी । तुजविण वारी कोण दुजे ॥३॥
तुझे आम्ही दास आमुचा तू ॠणी । चालत दूरूनी आले मागे ॥३॥
तुका म्हणे आता घेतले धरणे । हिशोबाकारणे भेटी देई ॥४॥
अर्थ
हे देवा मी तुला सर्व भावे शरण आलो आहे, अगदी काया, वाचा व मना सहित. आणखी दुसरे माझ्या मनात काहीच येत नाही, माझी सारी इच्छाही तुझ्या पायाशी राहिली आहे. माझ्यावरील संकटांचा जडभार तुझ्या वाचून दुसरे कोण निवारण करील ? आम्ही तुझे दास आहोत आणि तू आमचा ऋणी आहे हे फार मागे पासून असे चालत आले आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही तुझ्या दाराशी धरणे घेतले आहे, आमच्या हिशोबासाठी तुला आम्हाल भेट द्यावी लागेल.
अभंग क्र. ६९०
कई मात माझे ऐकती कान । बोलता वचन संता मुखी ॥१॥
केला पाडूरंगे तुझा अंगीकार । मग होईल धीर माझ्या जीवा ॥धृपद॥
म्हणऊनि मुख अवलोकितो पाय । हेचि मज आहे थोरी आशा ॥२॥
माझिया मनाचा हाचि पै विश्वास । न करी सायास साधनांचे ॥३॥
तुका म्हणे मज होईल भरवसा । तरलो मी ऐसा साच भावे ॥४॥
अर्थ
संतांच्या मुखी मी असे कधी ऐकेल की, पांडुरंगाने माझा अंगीकार केला आहे तेंव्हा माझ्या जीवाला धीर येईल. मला फार आशा आहे म्हणून मी तुमच्या तोंडाकडे आणि चरणांकडे पाहत आहे. माझ्या मनाला तुझा पुरेपूर विश्वास आहे म्हणून मी दुसऱ्या कोणत्याही साधनांचे प्रयत्न करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या मुखातून मी जेंव्हा हे ऐकेल तेंव्हाच मी समाधानी होईल व मी तरलो असा मला भरवसा येईल.
अभंग क्र. ६९१
दोन्ही हात ठेवुनि कटी । उभा भीवरेच्या तटी । कष्टलासी साठी । भक्तीकाजे विठ्ठला ॥१॥
भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आह्मालागी सोपा । दैत्या काळ कृतांत ॥धृपद॥
होतासी क्षीरसागरी । मही दाटली असुरी । म्हणोनिया घरी । गौळियाचे अवतार ॥२॥
केला पुंडलिके गोवा । तुज पंढरीसि देवा । तुका म्हणे भावा । साठी हाती सापडसी ॥३॥
अर्थ
भक्तांच्या कामासाठी तुला फार कष्ट झाले आहे, म्हणून हे पांडुरंग तू तुझे दोन्ही हात कटेवर ठेऊन भिवरेच्या तीरी उभा राहिला आहेस. हे पांडुरंगा तू फार दमला आहेस, फार कष्ट करून तू आमच्या साठी पुन्हः पुन्हः अवतार घेतला आहेस. तू आम्हासाठी फार सोपा आहेस परंतु दैत्या साठी तू कृतांत आहेस. तू क्षीर सागरात होतास पण पृथ्वीवर दैत्य फार झाले त्यामुळे तू गवळ्यांच्या घरी अवतार घेतलास. तुकाराम महाराज म्हणतात तुला पुंडलीकाने भक्तीने पंढरपूरला आणले, कारण तू फक्त भक्ती भावा साठी हाती सापडतो.
अभंग क्र. ६९२
गोड जाले पोट धाले । अवचित वाचे आले । म्हणता पाप गेले । विठ्ठलसे वाचेसी ॥१॥
सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । महापातकी चांडाळ । नामासाठी आपुलिया ॥धृपद॥
चित्त पावले आनंदा । सुखसमाधीते सदा । म्हणता गोविंदा । वेळोवेळा वाचेसी ॥२॥
हे जाणती अनुभवी । जया चाड तो चोजवी । तुका म्हणे दावी । रूप तेचि अरूप ॥३॥
अर्थ
अवचित विठ्ठलाचे नाम मुखी आले ते गोड लागले आणि त्याने पोटच भरले व विठ्ठल म्हणता माझे पाप नाहीसे झाले. तुम्ही सर्वानी खरे माना कारण महापातकी अजामिळ त्या चांडाळाचा देखील भगवंताने उद्धार केला. नामामुळे त्याचा उद्धार झाला. गोविंदाचे नाम वाचेने वेळोवेळी घेतल्यावर चित्ताला आनंद मिळतो समाधिसुख मिळते. तुकाराम महाराज म्हणतात हेकेवळ संतच अनुभवाने जाणतात व ज्याला गरज आहे तोच हे रूप शोधत असतो. कारण देव हा अरूप असुन रुपास येतो.
अभंग क्र. ६९३
रवि दीप हीरा दाविती देखणे । अदृश्य दर्शने संतांचीया ॥१॥
त्यांचा महिमा काय वर्णु मी पामर । न कळे तो साचार ब्रह्मादिका ॥धृपद॥
तापली चंदन निववितो कुडी । त्रिगुण तो काढी संतसंग ॥२॥
मायबापे पिंड पाळीयेला माया । जन्ममरण जाया संतसंग ॥३॥
संतांचे वचन वारी जन्मदुःख । मिष्टान्न ते भूकनिवारण ॥४॥
तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे । संतचरणी भावे रिघावया ॥५॥
अर्थ
सूर्य, दीप व हिरा म्हणजे अलंकार हे यांच्या प्रकाशाने जे दिसणारे आहेत तेच ते दाखवितात. परंतु संतांच्या दर्शनाने जे अदृश्य आहेत म्हणजे न दिसणारे (देव) आहे ते दिसते. अश्या या संतांचा महिमा मी पामर काय वर्णन करणार ? ज्या संतांचा महिमा ब्रम्हादेवाला सुद्धा कळात नाही. शरीराला ताप आल्यावर शीतल करण्याचे काम हे चंदन करते. पण त्रिगुणाचा जो ताप आहे तो या संतांच्या संगतीने दूर होतो आई वडिल मुलांचे पालन करतात परंतु जन्म मरण हे संतांच्या संगतीनेच चुकते. तुकाराम महाराज म्हणतात संतानी आपल्याला जवळ बोलाविले नाही तरी आपण होवून श्रद्धेने संतांपाशी जावे.
अभंग क्र. ६९४
हरी हरी तुह्मी म्हणा रे सकळ । तेणे मायाजाळ तुटईल ॥१॥
आणिका नका काही गाबाळाचे भरी । पडो येथे थोरी नागवण ॥धृपद॥
भावे तुळसीदळ पाणी जोडा हात । म्हणावा पतित वेळोवेळा ॥२॥
तुका म्हणे हा तव कृपेचा सागर । नामासाठी पार पाववील ॥३॥
अर्थ
तुम्ही सकळ जणांनी हरी हरी म्हणा, त्यामुळे तुमच्या मायाजाळाचा नाश होईल अन्य साधनांच्या भरीस तुम्ही पडू नका त्याने तुमचीच फसगत होईल. भक्ती भवाने तुलसीचे पान आणि जल म्हणजे पाणी हे श्रीहरीला अर्पण करा व मी पतित आहे असे वेळोवेळ म्हणून त्या हरी पुढे हात जोडा. तुकाराम महाराज म्हणतात तो हरी हा फार कृपाळू आहे. तो नामासाठी आपल्याला भवसागरातून पार करेल.
अभंग क्र. ६९५
गांठोळीस धन भाकावी करुणा । दावूनि सज्जना कीव पीडी ॥१॥
नाठेळाची भक्ती कुचराचे बळ । कोरडे वोंगळ मार खाय ॥धृपद॥
सांडोव्यासी घाली देवाची करंडी । विल्हाळ त्या धोंडी पूजा दावी ॥२॥
तुका म्हणे ऐसे माकडाचे छंद । अवघे धिंदधिंद सिंदळीचे ॥३॥
अर्थ
एखादया व्यक्ती जवळ पुष्कळ पैसे असूनही “माझ्या कडेच काही नाही उलट तूच मला काहीतरी दे” असे म्हणून सज्जन व्यक्तींना तो त्रास देतो. नाठेळाची म्हणजे ढोंगी लोकांची भक्ती आणि कुचर म्हणजे कामचुकाराची शक्ती हि व्यर्थ असते. ते लोक स्वतःच्या घरातल्या देवांची पूजा करत नाही आणि बाहेच्या देवाला हात जोडून स्वतःची भक्ती दाखवितो. तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व प्रकार म्हणजे माकड चाळे आहे, एखाद्या व्यभिचारिण स्त्रीचे (सिंदळीचे) प्रमाणे वागणे जसे धिंदधिंद म्हणजे निंद्य आहे त्या प्रमाणेच.
अभंग क्र. ६९६
ऐसे कुळी पुत्र होती । बुडविती पूर्वजा ॥१॥
चाहाडी चोरी भांडवला । वाटा आला भागासी ॥धृपद॥
त्याचियाने दुःखी मही । भार तेही न साहे ॥२॥
तुका म्हणे ग्रामपशु । केला नाशु अयुष्या ॥३॥
अर्थ
काही कुळात असे काही पुत्र जन्माला येतात कि, ते त्यांच्या पूर्वजांना बुडवितात म्हणजे अधोगतीला नेतात. या पुत्रांच्या भाग्याच्या वाट्यात चाहाडी तसेच चोरी करणे हेच त्यांचे भांडवल असते. यांच्या योगाने पृथ्वी दुखी होते, त्यांचा भार तिला पृथ्वीला सहन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात असे हे पापी कुत्र्या प्रमाणे असतात, ते स्वतः आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















