आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२० फेब्रुवारी, दिवस ५१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा, ओवी १०१ ते १२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ६०१ ते ६१२
“२० फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 20 feburvari
राम कृष्ण हरी आज दिनांक २० फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
101-5
तैसे नाम रुप तयाचे । एऱ्हवी ब्रह्मचि तो साचे । मन साम्या आले जयाचे । सर्वत्र गा ॥101॥
त्याप्रमाणे त्यांचे शरीर आणि नाव जगाप्रमाणे असले, तरीदेखील साक्षात ब्रम्हरूप आहेत, आणि त्यांचे मन सर्व ठिकाणी साम्याप्रत झालेले असते.
102-5
ऐसेनि समदृष्टी जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे । अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे । अच्युत म्हणे ॥102॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! अशी ज्यांची विश्वात्मक समदृष्टी झालेली असते, त्या पुरुषाचे लक्षण तुला संक्षेपाने सांगतो, तरी तू एक.
(म्हणजेच त्या पुरुषला ओळखण्याचे लक्षण थोडक्यात सांगतो. त्याचा तू विचार कर
न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य् चाप्रियम् ।
स्थिरबुध्दिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥5. 20॥
भावार्थ :-
जो प्रिय वस्तू प्राप्त झाली असता आनंद हर्ष पावत नाही अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्वेग / दुःख मानत नाही, असा स्थिर बुद्धी ज्याची आहे तोच स्थिरबुद्धी, मोहराहित, ब्रह्मज्ञ व परमेश्वराच्या / ब्रह्मच्या ठिकाणी सदैव स्थित असतो.
103-5
तरी मृगजळाचेनि पूरे । जैसे न लोटिजे का गिरिवरे । तैसा शुभाशुभी न विकरे । पातला जो ॥103॥
ज्याप्रमाणे मृगजलाच्या पुराणे डोंगर वाहून जात नाही, त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाली असता तिच्यापासून विकार पावत नाही,
104-5
तोचि तो निरुता । समदृष्टी तत्वता । हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥104॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! तोच खरा समदृष्टीचा पुरुष होय आणि तोच ब्रम्हाशी एकरूप झालेला होय. (तोच खरा समदृष्टीचा होय असे तू जाण)
ब्राह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥5. 21॥
भावार्थ :-
बाह्य विषयांच्या ठिकाणी ज्याचे अंतःकरण आसक्त झाले नाही त्याला आत्म्याच्या (स्वतःच्या अंतःकरणात आनंदाची प्राप्ती करून घेतो) ठिकाणी जे सुख आहे ते मिळते, तो ब्रम्हाशी समरस झालेला योगी अक्षयसुखाच्या अनुभव घेतो.
(परब्राम्हशी एकरूप होऊन अखंड आनंदाचा अनुभव घेतो)
105-5
जो आपणपे सांडुनि कही । इंद्रियग्रामावरी येणेचि नाही । तो विषय न सेवी हे काई । विचित्र येथ ॥105॥
जो आत्मस्वरूपाला सोडून केंव्हाही इंद्रियरूपी गावात / इंद्रियांच्या आधीन येत / होत नाही (म्हणजे इंद्रयांशी तादात्म्य करीत नाही), त्याने विषयांचे सेवन केले नाही, यात आश्चर्य ते काय आहे.
106-5
सहजे स्वसुखाचेनि अपारे । सुरवाडे अंतरे । रचिला म्हणऊनि बाहिरे । पाउल न घली ॥106॥
अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंतः करणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकीत नाही.
(बाहेर म्हणजे इतर विषय सुखाकडे वळत नाही कारण त्याचे अंतःकरणं स्वाभिकच संतुष्ट असते)
107-5
सांगे कुमुददळाचेनि ताटे । जो जेविला चंद्रकिरणे चोखटे । तो चकोरु काई वाळुवंटे । चुंबितु आहे ॥107॥
सांग बरे, कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो चकोर पक्षी शुद्ध शीतल चंद्रकिरणाचे सेवन / भोजन करतो, तो वाळवंटातील वाळूचे खडे चाटीत बसेल काय ?
108-5
तैसे आत्मसुख उपाइले । जयासि आपणपेचि फावले । तया विषयो सहजे सांडवले । म्हणो क ई ॥108॥
त्याप्रमाणे ज्याला स्वतःच आपल्या ठिकाणी आत्मानंद / उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाला, त्याच्याकडून विषयांचा त्याग सहजच घडतो, हे काय सांगावयास पाहिजे काय ?
109-5
एऱ्हवी तरी कौतुके । विचारुनि पाहे पा निके । या विषयांचेनि सुखे । झकविती कवण ॥109॥
एरवी सहज कौतुकाने थोडा विचार करून पाहा की, या विषयाच्या सुखाने कोण बरे फसतात. ?
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥5. 22॥
भावार्थ :-
हे कुंतीनंदना ! विषय व इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग हे दुःखाला कारण होतात. ते भोग निर्माण होतात आणि नाहीसे होतात. म्हणून ज्ञानी पुरुष त्या भोगांमध्ये रममाण होत नाहीत.
110-5
जिही आपणपे नाही देखिले । तेचि इही इंद्रियार्थी रंजले । जैसे रंकु का आळुकैले । तुषाते सेवी ॥110॥
ज्यांनी आपल्या आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही, ते इंद्रियाकडून प्राप्त होणाऱ्या विषयात रंगून जातात. ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेला मनुष्य कोंडा देखील खातो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-5
नातरी मृगे तृषापीडिते । संभ्रमे विसरोनि जळांते । मग तोयबुद्धी बरडीते । ठाकूनि येती ॥111॥
किंवा तहानेने व्याकुळ झालेली हरणे भ्रमामुळे खऱ्या पाण्याला विसरून जातात आणि मृगजळाला पाणी समजून माळरानावर धावत येऊन पोहचतात.
112-5
तैसे आपणपे नाही दिठे । जयाते स्वसुखाचे सदा खरांटे । तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ॥112॥
त्याप्रमाणे ज्यांना आत्मस्वरूप पाहण्याची दृष्टी नसते आणि ज्याला स्वरूप- आनंदाची सदैव कमतरता असते, त्यांना हे विषय सुखरूप वाटतात.
(ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही, किंवा परमआनंदचा नेहमी पूर्ण अभाव असतो)
113-5
एऱ्हवी विषयी काइ सुख आहे । हे बोलणेचि सारिखे नोहे । तरी विद्युत्स्फुरणे का न पाहे । जगामाजी ॥113॥
एरव्ही विषयांमध्ये सुख आहे, हे म्हणणे बोलण्याच्या सुद्धा योग्यतेचे नाही. नाहीतरी विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजडत नाही.
(माऊली काय सांगतात. विजेचे चमकने हे क्षणिक आहे, त्याप्रमाने काही वेळा विषय आनंद देतात पण ते आनंद क्षणिक / विनाशी आहे. हे आपण जाणावे)
114-5
सांगे वातवर्षआतपु धरे । ऐसे अभ्रछायाचि जरी सरे । तरी त्रिमाळिके धवळारे । करावी का ॥114॥
सांग बरे, वारा, पाऊस, ऊन, यांच्यापासून रक्षण करण्याचे काम जर ढगांच्या सावलीने होत असेल, तर मजबूत / तीन माजल्यांची चुनेगच्ची घरे बांधण्याचा खटाटोप का करावा ? ?
115-5
म्हणोनि विषयसुख जे बोलिजे । ते नेणता गा वाया जल्पिजे । जैसे महूर का म्हणिजे । विषकंदाते ॥115॥
विषयांचे स्वरूप न कळल्यामुळे विषयात सुख आहे, असे व्यर्थ बोलले जाते; म्हणून का विषाच्या कांद्याला मधुर म्हणावे ?
116-5
नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीते म्हणती जळु । तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ॥116॥
भूमिपुत्र (मंगळ) हा सर्व ग्रहात पीडाकारक दिसून येतो, तरीपण त्याला मंगळ असे म्हणतात; किंवा मृगजळालाच जल असे म्हणतात. त्याप्रमाणे विषयापासून मिळणाऱ्या अनुभवाला सुख असे म्हणणे व्यर्थ आहे.
117-5
हे असो आघवी बोली । सांग पा सर्पफणीची साउली । ते शीतल होईल केतुली । मूषकासी ॥117॥
हे सर्व बोलणे राहुं दे. असे सांग की, नागाच्या फणीची छाया उंदराला कितपत शीतल होऊ शकेल ?
118-5
जैसा आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तवचि बरवा । तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणे ॥118॥
जोपर्यंत गळाला लावलेल्या मांसाच्या तुकड्यास मासा तोंड लावीत नाही, तोपर्यन्त तो ठीक असतो. त्याप्रमाणे सर्व विषयांची आपला संबंध येत नाही, तोपर्यंतच बरे, हे, पांडवा, तू निःसंशय समजून घे.
119-5
हे विरक्ताचिये दिठी । जै न्याहाळिजे किरीटी । तै पांडुरोगाचिये पुष्टि- । सारिखे दिसे ॥119॥
वीरक्त पुरुषाच्या दृष्टीने हे विषयसुख जेंव्हा पहिले जाते, तेंव्हा पंडुरोगात येणाऱ्या लठ्ठपणासारखे वरून चांगले, पण आतून घातक दिसू लागते.
120-5
म्हणोनि विषयभोगी जे सुख । ते साद्यंतचि जाण दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेविता न सरे ॥120॥
म्हणून विषयभोगात जे सुख मानले जाते, ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखदायक आहे. परंतु अज्ञानी लोक काय करणार ? सवयीमुळे त्यांना विषयसेवन केल्याशिवाय चालत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-5
ते अंतर नेणती बापुडे । म्हणोनि अगत्य सेवणे घडे । सांगे पूयपंकीचे किडे । काय चिळसी घेती ॥121॥
ते बिचारी अज्ञानी, विषयांच्या आतले दुःख स्वरूप जाणत नाहीत, म्हणून त्यांच्या कडून विषयसेवन घडत असते. पुवाच्या चिखलातील किड्याना पुवाची कधी किळस येते काय ?
122-5
तया दुःखिया दुःखचि जिव्हार । ते विषयकर्दमीचे दर्दुर । ते भोगजळीचे जलचर । सांडिती केवी ॥122॥
त्या दुःखी लोकांचे दुःख हेच जीवन बनलेले असते. कारण, ते विषयरुपी चिखलात राहणारे बेडूक असतात, भोगरूपी पाण्यातील जलचर असतात, तर मग ते विषयांचे सेवन कसे बरे सोडतील. ?
123-5
आणि दुःखयोनि जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती । जरी विषयांवरी विरक्ती । धरिती जीव ॥123॥
जर विषयांच्या ठिकाणी जीवमात्र हे विरक्ती धारण करतील, तर मग जेवढ्या म्हणून दुःख दायक योनी आहेत, तेवढ्या व्यर्थ होणार नाहीत का ?
124-5
नातरी गर्भवासादि संकट । का जन्ममरणीचे कष्ट । हे विसांवेवीण वाट । वाहावी कवणे ॥124॥
अथवा गर्भवासात होणारी दुःख, जन्म मरणाचे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी बरे चालवा ?
125-5
जरी विषयी विषयो सांडिजेल । तरी महादोषी के वसिजेल । आणि संसारु हा शब्दु नव्हेल । लटिका जगी ॥125॥
जर विषयासक्त लोकांनी विषय सोडून दिले, तर मग महापातकांनी कोठे बरे राहावे ? आणि मग संसार हा शब्द खोटा ठरणार नाही का ?
दिवस ५१ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ६०१ ते ६१२
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ६०१
उगेचि हे मन राहाते निश्चळ । तरि का तळमळ साठ होती ॥१॥
काय तुमची नेणो कवतुक विंदाने । सर्वोत्तमपणे खेळतसा ॥धृपद॥
नानाछंदे आम्हा नाचवावे जीवा । वाढवाव्या हावा भलत्यापुढे ॥२॥
तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसा ॥३॥
अर्थ
माझे मन जर निश्चळ राहिले असते तर उगाच एवढी तळमळ का करावी लागली असते ? तुमचे कौतुक मला कळत नाही सर्वोत्तम खेळ तुम्हीच खेळता. आमच्या जीवाला तुम्ही नाना छंदाने नाचवता. आणि तुम्ही अनेक प्रकारच्या त्यांच्या पुढे भलत्या प्रकारची हाव वाढविता. तुकाराम महाराज म्हणताततुम्ही तुमची कीर्ती वाढविण्यासाठीच आमची चेष्टा करतात.
अभंग क्र. ६०२
आम्ही बळकट झालो फिराउनी । तुमच्या वचनी तुम्हा गोऊ ॥१॥
झाले तेंव्हा झाले मागील ते मागे । आता वर्मलागे ठावे झाले ॥धृपद॥
तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुध्द त्यासी शुद्ध बुद्ध व्हावे ॥२॥
तुका म्हणे आम्हा आत्मत्वाची सोय । आपणचि होय तैसाचि तू ॥३॥
अर्थ नाही टाका तपासा
अभंग क्र. ६०३
तुम्ही साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसा अधीरसे ॥१॥
कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनिया ॥धृपद॥
सुटो नये ऐसे कळले निरुते । का घ्यावे मागुते आळवुनि ॥२॥
तुका म्हणे तुम्ही सभाग्य जी देवा । माझा तुम्हा केवा काय आला ॥३॥
अर्थ
तुम्ही मला टाळणार नाही हा भरवसा मला आहे. तुम्ही मग असे का समजता की, मी अधीर आहे. माझा उद्धार तुम्ही लांबणीवर का टाकला आहे ? एकदा काय ती आमची करकर मिटवून टाका. आमच्या करकरी पासून तुमची सुटका होणार नाही हे जर तुम्हाला कळले आहे तर एवढे का विनवणी करायला लावत आहात ? तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही फार सभाग्यवान आहात देवा, कारण मला मुक्त करणे फारसे कठीण नाही पण तरीदेखील तुम्ही माझा उद्धार करण्याविषयी एवढा कंजूष पणा का दाखवत आहात.
अभंग क्र. ६०४
तुम्हा होईल देवा पडिला विसर । आह्मी ते उत्तर यत्न केले ॥१॥
पतितपावन ब्रीदे मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥धृपद॥
आहाच मी नव्हे अर्थाचे भुकेले । भलत्या एका बोले वारेन ते ॥२॥
तुका म्हणे देह देईन सांडणे । सहित अभिमाने ओवाळूनि ॥३॥
अर्थ
आहो देवा तुम्हाला आमचा विसर पडेल त्यामुळे आम्ही सारखे तुमच्या दारी येऊन तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही या कडे लक्ष द्यावा पतीताला तुम्ही पावन करता असे तुम्हाला ब्रीद आहे. ती जबाबदारी तुम्ही का घेत नाही ते सांगा ? मी द्रव्य अथवा अर्थाला भुकेला नाही, तेव्हा मला भलत्या थापा मारून मी कशालाही फसणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी माझा देह अभिमान सहित तुम्हा वरून ओवाळून टाकेल.
अभंग क्र. ६०५
जडलो अंगाअंगी । मग ठेवींये प्रसंगी । काही उरिजगी । लोकी आहे पुरती ॥१॥
ठेवी निवारुनि आधी । अवकाश तोचि बुद्धी । सांपडली संधी । मग बळ कोणासी ॥धृपद॥
गळा बांधेन पायी । हालो नेदी ठायिचे ठायी । निवाड तो तई । अवकळा केलिया ॥२॥
तुका म्हणे ठावे । आम्हा असा जी बरवे । बोभाटाची सवे । मुळींहुनी विठोबा ॥३॥
अर्थ
देवा मी तुमच्या अंगाला येऊन भिडलो आहे. आता या प्रसंगी मी तुमचा मोठे पणा शिल्लक ठेवणार नाहि. तुझा माझा कसा संबध आहे, ते लोकांना माहित आहे. मी धीर धरला आहे. तो पर्यंत तू विचार कर संधी मिळताच मी तुला धरून ठेवले तर आमचे बळ किती महान असते हे तुला कळून येईल तुझ्या चरणावरून माझे मस्तक हटवणार नाही. तुला हालचाल करू देणार नाही. आश्यावेळी आपल्या कर्तव्याला कोण चुकले हे सर्वाना कळून येईल. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही कसे आहात यांची मला जाणीव आहे. तुमच्या दाराशी जे भक्त येतील त्यांना तुझ्या नावाने ओरडून-ओरडून देण्याची व असेच ओरडत ठेवण्याची सवय तुम्हाला पहिल्या पासूनच आहे.
अभंग क्र. ६०६
आम्ही शक्तीहीने । कैसे कराल ते नेणे । लिगाडाच्या गुणे । खोळंबला राहिलो ॥१॥
माझे मज देई देवा । असे ठेविला तो ठेवा । नाही करीत हेवा । काही अधीक आगळा ॥धृपद॥
नाही गळा पडलो झोंड । तुमचे तेचि माझे तोंड । चौघां चार खंड । लांबणी हे अनुचित ॥२॥
नाही येत बळा । आता तुह्मासी गोपाळा । तुका म्हणे गळा । उगवा पाया लागतो ॥३॥
अर्थ
आम्ही शक्तीहीन आहोत, तुम्ही आमचे कसे काय कराल ? ते कळत नाहि. कोणाचे हि काम तुम्ही करत नाही अशा प्रकारचे निगड तुम्ही स्वतःच्या पाठीमागे लावून घेता ही तुमची खूप जुनी सवय आहे म्हणून मी येथे खोळंबलो आहे. माझे मला देऊन टाका जो ठेवा मी तुमच्या कडे ठेवला आहे. मी अधिक काही हाव धरीत नाही. काही संबंध नसताना मी तुमच्या गळ्यात पडलो असे समजू नका, तुम्ही जे म्हणाल ते मी अंगीकार करेन व तसाच वर्तन करील. देवा चारचौघा संतांमध्ये बसून आपल्या भांडणाचा नीकाल लावण्याचा प्रसंग येईल आणि अशा वेळेस तुम्ही देणे लांबणीवर टाकणे म्हणजे हा अनुचित प्रकार आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे गोपाळा, मी तुमच्यावर बळजबरी करीत नाही. तुमच्या पाया पडून विंनती करतो कि या भांडणाचा निकाल आता तुम्हीच लावावा.
अभंग क्र. ६०७
काय कृपेविण घालावे साकडे । निश्चिंती निवाडे कोण्या एका ॥१॥
आहो तैसी पुढे असो दीनपणे । वेचूनि वचने करुणेची ॥धृपद॥
धरू भय आता काय वाहो चिंता । काय करू आता आप्तपण ॥२॥
तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणउनी देव दुरे दुर ॥३॥
अर्थ
तुझी कृपा असल्या शिवाय आम्ही तुझ्यावर कशी साकडे घालावे, म्हणून आपल्यावर संकट घालणे योग्य वाटत नाही. आम्ही पूर्वी प्रमाणेच दिन पणाने तुमच्या पुढे काकुळतीस येऊन आर्ततेने हाक मारत राहू. भय धरून आता चिंता करत काय बसू ? तुमच्याशी नाते जोडले आहेना त्या आप्त पणाचा काय उपयोग. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भावहिनजीव आहोत. म्हणून देव आमच्या पासून दूर गेला आहे.
अभंग क्र. ६०८
नाही उल्लंघिले कोणाचे वचन । मज का नारायण दुरी जाला ॥१॥
आशंकिते मने करी आळवण । नाही समाधान निश्चिंतीचे ॥धृपद॥
दासांचा विसर हे तो अनुचित । असे सर्व नीत पायांपाशी ॥२॥
तुका म्हणे तुम्हा लाज येत नाही । आम्हा चिंताडोही बुडविता ॥३॥
अर्थ
मी कोणत्याही श्रेष्ठांचे वचनाचे उल्लंघन केले नाही, असे असता आमच्या पासून नारायण का दूर झाला ? याच शंशायाने मन नारायणाला आळवीत आहे. या शंशायामुळे माझ्या मनाची समाधान स्थिती स्थिर नाही. तुम्हाला तुमच्या दासांचा विसर पडतो हा तर अनुचित प्रकार आहे सर्व धर्मनीती तुमच्या पायापाशी चा आहे. तरी तुम्ही असे का वागता ? तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला चिंतेच्या डोहामध्ये बुडवतांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही ?
अभंग क्र. ६०९
जीव जायवरी सांडी करी माता । हे तो आश्चर्यता बाळकाची ॥१॥
दुर्बळ की नाही आइकत कानी । काय नारायणी न्यून जाले ॥धृपद॥
क्षणक्षणा माझा ने घावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥२॥
तुका म्हणे नाही वचनासी रुचि । फलकट वेचि ते ते होय ॥३॥
अर्थ
देवा बालकाच्या आईने बालकाचा जीव जाईपर्यंत जर त्याचा त्याग केला तर ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. हे नारायणा तुम्ही दुर्बळ झाला आहात की आमचे बोलणे तुमच्या कानापर्यंत येत नाही नेमके कमीपणा आहे तरी कोठे ? अहो देवा मी क्षणाक्षणाला तुमची करून भाकत आहे तरीदेखील तुम्ही माझ्याकडे लक्षही देत नाहीत माझा सांभाळ तुम्ही करत नाही ठीक आहे हे माझे काही तरी अभाग्याचा काळ आहे त्यामुळे तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या बोलण्यात तुम्हाला काही रुची वाटत नाही त्यामुळे आमचे बोलणे फोलपटा सारखे निरस झाले आहे.
अभंग क्र. ६१०
म्हणउनी दास नव्हे ऐसा जालो । अनुभवे बोलो स्वामीपुढे ॥१॥
का नाही वचन प्रतिउत्तराचे । मीच माझ्या वेचे अट्टाहासे ॥धृपद॥
कासयाने गोडी उपजावा विश्वास । प्रीती काही रस वाचुनिया ॥२॥
तुका म्हणे अगा चतुरा शिरोमणी । विचारावे मनी केशीराजा ॥३॥
अर्थ
मी अनुभवाने स्वामी पुढे बोलतो की मी तुमचा दास नाही. कारणमी एवढा अट्टाहासाने तुझ्यापुढे बडबड करतो आहे तरीदेखील तू त्याला काहीच प्रत्युत्तर का देत नाहीस ? अहो देवा प्रेम आणि बोलण्यात रसाळपणा जर आपल्या दोघामध्ये नसेल तर मग माझ्या चित्तामध्ये तुमचे विषयी विश्वास कसा उत्पन्न होईल. तुकाराम महाराज म्हणतात हे कृषिराजा तुम्ही सर्व चतुराची शिरोमणी आहात त्यामुळे माझ्या बोलण्याचा तुम्ही तुमच्या मनाशीच विचार करा.
अभंग क्र. ६११
काय आह्मी आता पोटचि भरावे । जग चाळवावे भक्त ह्मुण ॥१॥
ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतो फार कासावीस ॥धृपद॥
काय कवित्वाची घालूनिया रूढी । करू जोडाजोडी अक्षरांची ॥२॥
तुका म्हणे काय गुंफोनि दुकाना । राहो नारायणा करुनी घात ॥३॥
अर्थ
देवा आम्ही आता भक्तपणाचा आव आणून या भोळ्या भाबड्या माणसांना फसवून आमचे पोटच भरावे काय ? तुमचे असेच मत असेल तर मला सांगा. उगाचच आमचा जीव कासावीस होत आहे. काव्याची रचना करून आम्ही केवळ शब्दांची जोडत करत रहावे काय ? तुकाराम महाराज म्हणतात या दंभाच्या दुकानांमध्ये गुंतून राहून स्वतःचा घात करून घ्यावा काय ?
अभंग क्र. ६१२
वर्म तरि आम्हा दावा । काय देवा जाणे मी ॥१॥
बहुता रंगी हीन जालो । तरि आलो शरण ॥धृपद॥
द्याल जरि तुम्ही धीर । होईल स्थिर मन ठायी ॥२॥
तुका म्हणे सत्ताबळे । लडिवाळे राखावी ॥३॥
अर्थ
तुझ्या भेटीचे वर्म काय आहे ते दाखव, ते वर्म मी कसे जाणून घेऊ ? विषय सुखात रंगून माझी वृत्ती हीन झाली आहे. म्हणून मी तुझ्या चरणी शरण आलो आहे. तुम्ही जर मला धीर दिला तर, तुझ्या ठायी माझे मन स्थिर होईल. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आपल्या सत्ता बळाने माझ्या सारख्या बाळकाचे प्रेमाने रक्षण करावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















