३ फेब्रुवारी, दिवस ३४, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा, ओवी १७६ ते २०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३९७ ते ४०८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“३ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 3 feburvari

राम कृष्ण हरी आज दिनांक ३ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

176-3
जैसी बहुरूपियाची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाही मनी । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥176॥
बहुरुप्याने जरी राजा-राणीची सोंगे घेतली, तरीपण त्याच्या मनात स्त्री आणि पुरुष हा भाव मुळीच नसतो. लोकांची समजूत मात्र ते तसेच असल्याची होते. त्याप्रमाणे लोक कल्याणासाठी निष्काम पुरुष जरी कर्म करीत असला, तरी त्याला कर्माचे कोणतेही बंधन लागत नाही.
प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।
अहंकारविमूढात्मा कर्ताहं इति मन्यते ॥3. 27॥
भावार्थ :-

सर्व कर्मे प्रकृतीच्या (सात्विक, राजस, तामस) गुणांकडून केली जातात; परंतु अहंकाराने ज्याचे मन (अंतःकरण) अज्ञानी झाले असा पुरुष या कर्माचा ” मीच कर्ता ” असे मानतो.
177-3
देखे पुढिलाचे वोझे । जरी आपुला माथा घेईजे । तरी सांगे का न दाटिजे । धनुर्धरा ॥177॥
हे धनुर्धरा ! असे पाहा की, दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतले, तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का ? तूच सांग.
178-3
तैसी शुभाशुभे कर्मे । जिये निफजति प्रकृतिधर्मे । तिये मूर्ख मतिभ्रमे । मी कर्ता म्हणे ॥178॥
त्याचप्रमाणे प्रकृतीच्या गुणाने जी बरी-वाईट कर्मे निर्माण होतात, ती अज्ञानी मनुष्य, बुद्धीभ्रंशामुळे, ” मी करतो ” असे म्हणत असतो.
179-3
ऐसा अहंकाराधिरूढ । एकदेशी मूढ । तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥179॥
अशा अहंकाराच्या घोडयावर आरूढ झालेल्या आणि स्वतःला मर्यादित समजणारा जो अज्ञानी आहे, त्याच्या बुद्धीला हे गूढ तत्वज्ञान सांगू नये.
180-3
हे असो प्रस्तुत । सांगिजेल तुज हित । ते अर्जुना देऊनि चित्त । अवधारी पा ॥180॥
अर्जुना ! सध्या हा विषय इथेच राहू दे. आता तुला मी हिताची गोष्ट सांगणार आहे. तरी चित्त एकाग्र करून त्याचे श्रवण कर.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तत्ववित् तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।
गुणाः गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥3. 28॥
भावार्थ :-

परंतु हे महाबाहो अर्जुना ! गुणविभाग व कर्मविभाग यांचे तत्व रहस्य जाणणारा (गुण व तत्व हे विभाग आपल्याहून भिन्न आहेत, असे जाणणारा) आत्मज्ञानी पुरुष सर्व गुण (इंद्रिय) गुंणाच्या (विषयांच्या) ठिकाणी प्रवृत्त होतात, असे समजून आसक्त होत नाही.


181-3
जे तत्वज्ञियांचा ठायी । तो प्रकृतिभावो नाही । जेथ कर्मजात पाही । निपजत असे ॥181॥
ज्या प्रकृतीच्या गुणांपासून ही सर्व कर्मे निर्माण होतात, तो प्रकृतीचा विकार आत्मज्ञानी पुरुष्याच्या ठिकाणी असत नाही.
182-3
ते देहाभिमानु सांडुनी । गुणकर्मे वोलांडुनी । साक्षिभूत होऊनी । वर्तती देही ॥182॥
तो आत्मज्ञानी देहाचा अभिमान टाकून, गुण व गुणांपासून उत्पन्न होणारी कर्मे यांना ओलांडून देहाच्या ठिकाणी साक्षीत्वाने राहतात.
183-3
म्हणूनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नाकळती । जैसा का भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना ॥183॥
सूर्य ज्याप्रमाणे प्राणीमत्र्यांच्या बऱ्या-वाईट व्यवहाराने लिप्त होऊन जात नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुषाने देह धारण केला असला, तरी तो देहकर्मानी बध्द होत नाही.
प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन् न विचालयेत् ॥3. 29॥
भावार्थ :-

प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेला पुरुष गुण व कर्म यात आसक्त होत असतात. अशा अज्ञानी लोकाचा आत्मज्ञानी पुरुषाने बुद्धिभेद करू नये.
184-3
एथ कर्मी तोच लिंपे । जो गुणसंभ्रमे घेपे । प्रकृतिचेनि आटोपे । वर्ततु असे ॥184॥
या जगामध्ये जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागत असतो, तो कर्मात बध्द होतो.
185-3
इंद्रिये गुणाधारे । राहाटती निजव्यापारे । ते परकर्म बलात्कारे । आपादी जो ॥185॥
गुंणाच्या योगाने इंद्रिय आपआपली कर्मे करतात. त्यागुणांनी (सात्विक, तामस, राजस) केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बळेच आपल्याकडे घेतो, कर्मामध्ये बध्द होऊन राहतो.
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याद्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगत्ज्वरः ॥3. 30॥
भावार्थ :-

चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेऊन सर्व कर्मे मला समर्पण करून आशारहित, ममतारहित होऊन आणि शोकरहित होऊन युद्ध कर.


186-3
परी उचिते कर्मे आघवी । तुवा आचरोनि मज अर्पावी । परी चित्तवृत्ती न्यासावी । आत्मरूपी ॥186॥
सर्व विहित कर्म उत्तम प्रकारे करून ती मला अर्पण कर; परंतु चित्तवृत्ती मात्र सदैव आत्मस्वरूपी स्थिर कर.
187-3
हे कर्म मी कर्ता । का आचरेन या अर्था । ऐसा अभिमानु झणे चित्ता । रिगो देसी ॥187॥
‘मी या कर्माचा कर्ता आहे’ अमुक एक कारणसाठी (फळासाठी) मी हे कर्म करीत आहे, असा अभिमान कदाचित तुझ्या मनात येईल, तर तू येऊ देऊ नकोस.
188-3
तुवा शरीरपरा नोहावे । कामनाजात सांडावे । मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥188॥
तू शरीराच्या स्वाधीन राहू नकोस. सर्व इच्छांचा त्याग कर आणि योग्य वेळी सर्व भोगांचा उपभोग घे.
189-3
आता कोदंड घेऊनि हाती । आरूढ पा इये रथी । देई आलिंगन वीरवृत्ती । समाधाने ॥189॥
आता तू आपल्या हातात धनुष्य घे रथावर आरूढ हो आणि समाधानाने विरवृत्तीचा स्वीकार कर.
190-3
जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानु वाढवी । मग भारापासोनि सोडवी । मेदिनी हे ॥190॥
या जगामध्ये तू आपली कीर्ती रूढ कर, स्वधर्मचा मान वाढव; आणि या पृथ्वीला दुष्टांचा भारापासून तू सोडव.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


191-3
आता पार्था निःशंकु होई । या संग्रामा चित्त देई । एथ हे वाचूनि काही । बोलो नये ॥191॥
हे अर्जुना ! आता तू सर्व प्रकारचे संशय टाकून या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलू नकोस.
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥3. 31॥
भावार्थ :-

जे श्रद्धावान व मत्स्यरहित होऊन माझ्या या मताप्रमाणे आचरण करतील, ते देखील सर्व कर्मापासून मुक्त होतील.
192-3
हे अनुपरोध मत माझे । जिही परमादरे स्वीकारिजे । श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा ॥192॥
हे धनुर्धरा ! या माझ्या निश्चित स्वरूपाच्या मताचा जे आदराने स्वीकार करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात,
193-2
तेही सकळ कर्मी वर्ततु । जाण पा कर्मरहितु । म्हणोनि हे निश्चितु । करणीय गा ॥193॥
ते सर्व कर्म करीत असले तरी, ते कर्मराहित असतात असे तू जाण. म्हणून माझे हे मत दृढ निश्चयाने आचरण करण्यास योग्य आहे.
ये त्वेतत्दभ्यसूयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टानचेतसः ॥3. 32॥
भावार्थ :-

पण जे मत्सरी लोक माझे हे मत अनुसरत नाहीत, ते सर्व प्रकारच्या ज्ञानाविषयी मूढ, अविवेकी आणि भ्रष्ट आहेत, असे जाणावे. त्यांचे पतन होते.
194-3
नातरी प्रकृतिमंतु होऊनी । इंद्रिया लळा देऊनी । जे हे माझे मत अव्हेरुनी । ओसंडिती ॥194॥
जी लोक प्रकृतीच्या अधीन होऊन व इंद्रियांचे लाड पुरवून माझ्या या मताचा तिरस्कार करून त्याग करतात, (ते टाकून देतात),
195-3
जे सामान्यत्वे लेखिती । अवज्ञा करूनि देखिती । का हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणे ॥195॥
जे माझ्या मताला सामान्य समजतात, त्याचाकडे अनादर भावाने पाहतात किंवा जे वाचाळपणाने याला सामान्य वाणी म्हणतात,


196-3
ते मोहमदिरा भ्रमले । विषयविखे घारले । अज्ञानपंकी बुडाले । निभ्रांत मानी ॥196॥
ते लोक मोहरूपी अमली पदार्थाचे सेवन करून भूललेले व विष्यरूपी विषाने व्यापलेले आहेत आणि अज्ञानरूपी चिखलामध्ये फसलेले आहेत, असे निःसंशय समज.
197-3
देखे शवाचा हाती दिधले । जैसे का रत्न वाया गेले । नातरी जात्यंधा पाहले । प्रमाण नोहे ॥197॥
प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे वाया जाते अथवा जो जन्मापासून आंधळा आहे, त्याने पाहिलेले प्रमाण मानले जात नाही.
198-3
का चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा । मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ॥198॥
किंवा चंद्राचा उदय कावळ्याच्या उपयोगी पडत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी लोकांना हा विचार रुचनार नाही.
199-3
तैसे ते पार्था । जे विमुख या परमार्था । तयांसी संभाषण सर्वथा । करावे ना ॥199॥
हे पार्था ! जे लोक परमार्थाच्या विरुद्ध आहेत, त्यांच्याशी आत्मज्ञानासंबंधी काही बोलू नये.
200-3
म्हणोनि ते न मानिती । आणि निंदाही करू लागती । सांगे पतंग काय साहती । प्रकाशाते ॥200॥
ज्याप्रमाणे पतंग कीटक दिव्याच्या प्रकाशाला सहन करू शकत नाही, त्याप्रमाणे हे लोक या उपदेशाला तर मानीत नाहीतच आणि उलट, त्याची निंदादेखील करू लागतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ३४ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३९७ ते ४०८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. 397
जरी मी पतित नव्हतो देवा । तरि तू पावन कैचे तेंव्हा ॥१॥
म्हणोनि माझे नाम आधी । मग तू पावन कृपानिधी ॥धृपद॥
लोहो महिमान परिसा । नाही तरी दगड जैसा ॥२॥
तुका म्हणे याचकभावे । कल्पतरु मान पावे ॥३॥
अर्थ
अरे देवा मी जर पतित नसतो तर पतीतांना पावन करण्यासाठी तू पावन आहेस असे तुला कोण म्हटले असते ? म्हणुन माझे पातीताचे नांव आधी आहे व मग तू पावन, कृपानिधी आहेस. (पतितपावन) . लोखंडामुळे परिसाचा महिमा वाढलेला आहे. लोखंड नसते ते परीस म्हणजे एक नुसता दगड झाला असता. तुकाराम महाराज म्हणतात याचना करणारा आहे म्हणून कल्पतरू इच्छिलेले देतो, असा मोठेपणा त्या वृक्षाला मिळाला आहे. अर्थात विठ्ठलाला संतांमुळेच मोठे पण मिळाला आहे.
अभंग क्र. 398
एक भाव चित्ती । तरी न लगे काही युक्ती ॥१॥
कळो आले जीवे । मज माझियाचि भावे ॥धृपद॥
आठवचि पुरे । सुख अवघे मोहरे ॥२॥
तुका म्हणे मन । पूजा इच्छी नारायण ॥३॥
अर्थ
जर देवाविषयी मनामध्ये एकनिष्ठ शुद्ध भक्तिभाव असेल तर इतर कोणत्याही प्रकारची युक्ति देवाची प्राप्ती करण्यासाठी करावी लागत नाही. हे मर्म मला, माझ्याच शुध्द भावामुळे अगदी जीवा पासून कळले आहे. देवाची सतत आठवण ठेवली तरी पुरे त्या योगाने सर्व सुखाचा अनुभव येतो. तुकाराम महाराज म्हणतात आपले चित्त त्याच्याकडे लागले तर नारायणाला खरोखर तेच आवडते इतर जप, तप, उपवास, तीर्थयात्रा आदी साधनांचा काही उपयोग नाही.
अभंग क्र. 399
मज संतांचा आधार । तू एकले निर्वीकार ॥१॥
पाहा विचारूनि देवा । नको आम्हासवे दावा ॥धृपद॥
तुज बोल न बोलवे । आम्हा भांडायाची सवे ॥२॥
तुका म्हणे तरी । ऐक्यभाव नुरे उरी ॥३॥
अर्थ
देवा मला फक्त एकट्या संतांचा आधार आहे, तू तर निर्विकार आहेस. देवा स्वतःशीच या गोष्टीचा विचार करून तू पहा विनाकारण आमच्याबरोबर दावा करू नकोस. देवा आणि तुला एक शब्ददेखील बोलायची सवय नाही परंतु आम्हाला नेहमी भांडायची सवय आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा अरे तुझ्या स्वरूपाचे ठिकाणी ऐक्यभाव म्हणजे जीव ब्रम्‍ह ऐक्यभाव देखील राहत नाही मग आता सांग आपण एकमेकांशी संवाद कसा साधायचा. (या अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी देवाच्या द्वैत स्वरूपाचे आवड सांगितलेली केली आहे. )
अभंग क्र. 400
तुज मागणे ते देवा । आम्हा तुझी चरणसेवा ॥१॥
आन नेघो देसी तरी । रिद्धी सिद्धी मुक्ती चारी ॥धृपद॥
संतसंगति सर्वकाळ । थोर प्रेमाचा सुकाळ ॥२॥
तुका म्हणे नाम । तेणे पुरे माझे काम ॥३॥
अर्थ
हे देवा तुझ्या जवळ एकच मागणे आहे ते म्हणजे आम्हाला तुझी चरणसेवा घडावी. ऐरव्ही चारी मुक्ती किंवा सर्व सिद्धी दिल्यास तरी आम्ही घेणार नाही. आम्हाला सदा सर्व काळ संत संगतीचे प्रेमळ सुख द्यावे. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या नामानेच माझ्या सर्व कामना पूर्ण होतात.
सार्थ तुकाराम गाथा 301 ते 400 समाप्त
सार्थ तुकाराम गाथा 401 ते 500
अभंग क्र. 401
तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित ॥१॥
आणीक नेणे काही हेवा । तुजवाचूनि केशवा ॥धृपद॥
हेचि माझे गाणे । तुझे नामसंकीर्तन ॥२॥
तुझ्या नामाची भूषणे । तुका म्हणे ल्यालो लेणे ॥३॥
अर्थ
हे देवा मी तुला शरण आलेलो आहे जन्मोजन्मीचा मी तुझा अंकित दास आहे. हे केशवा, तुझ्या शिवाय आणखी कशाचीही हाव माझ्या मनात नाही. माझे गाणे म्हणशील, तर तुझे नामसंकीर्तन करणे तेवढेच. तुकाराम महाराज म्हणतात आणि माझी भूषणे, अलंकार म्हणशील तर तुझी विविध नामे हीच.
अभंग क्र. 402
उतरलो पार । सत्य झाला हा निर्धार ॥१॥
तुझे नाम धरिले कंठी । केली संसारासी तुटी ॥धृपद॥
आता नव्हे बाधा । कोणेविशी काही कदा ॥२॥
तुका म्हणे काही । आता उरले ऐसे नाही ॥३॥
अभंग क्र. 403
क्रियामति हीन । एक मी गा तुझे दीन ॥१॥
देवा करावा सांभाळ । वारी माझी तळमळ ॥धृपद॥
नको माझे ठायी । गुणदोष घालू काही ॥२॥
अपराधाच्या कोटी । तुका म्हणे घाला पोटी ॥३॥
अर्थ
देवा मी क्रियाहीन आहे मती हीन आहे मी तुझा दीन दुबळा दास आहे. देवा, तू माझा सांभाळ कर. माझी तळमळ दूर कर. माझ्या ठिकाणी गुण किंवा दोष यांपैकी कशाचाच प्रवेश येणार नाही असे कर. तुकाराम महाराज म्हणतात खरोखर माझे अनंत अपराध झाले आहेत त्यांबद्दल मला क्षमा कर ते अपराध पोटात घाल.
अभंग क्र. 404
नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ॥१॥
तैसे चित्तशुद्धी नाही । तेथे बोध करील काई ॥धृपद॥
वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥२॥
वांझा न होती लेकुरे । काय करावे भ्रातारे ॥३॥
अर्थ
नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी ॥४॥ @
प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥५॥ @
तुका म्हणे जीवनेविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥६॥
अभंग क्र. 405
नवा नवसांची । झालो तुह्मासी वाणीची ॥१॥
कोण तुझे नाम घेते । देवा पिंडदान देते ॥धृपद॥
कोण होते मागे पुढे । दुजे बोलाया रोकडे ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । कोणा घेतोसि वोसंगा ॥३॥
अर्थ
अहो देवा आम्ही तुमची नव्या नवसाची लेकरे आहोत. देवा आमच्या वाचून तुझे नांव कोण घेणार आहे जीवरुपी पिंड आम्ही दान तुला देत आहोत ते आमच्या वाचून तुला कोण देणार आहे, आमच्या खेरीज मागे पुढे तुम्हाला परखड शब्दात बोलणारे, रोकठोक प्रश्न विचारणारे दुसरे कोण आहे. आम्ही पांडुरंग, आम्ही तुझी मुले नसतो, तर तुम्ही पदरात कोणाला घेतले असते.
अभंग क्र. 406
एका बीजा केला नास । मग भोगिले कणीस ॥१॥
कळे सकळा हा भाव । लाहानथोरांवरी जीव ॥धृपद॥
लाभ नाही फुकासाठी । केल्यावीण जीवासाठी ॥२॥
तुका म्हणे रणी । जीव देता लाभ दुणी ॥३॥
अर्थ
शेतकरी भूमीमध्ये एक बीज पेरून त्याचा नाश करतो पण खरे तर त्या एक बीज यामुळेच अनेक बीज उत्पन्न होतात मग त्या शेतकऱ्याला अनेक कंसांचा लाभ होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना ही गोष्ट कळतच असते. आपला जीव खर्ची घातल्या शिवाय फुकट काही मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात रणा मध्ये शूर वीर जीव गमवतो पण त्याला दुप्पट लाभ होतो. तो म्हणजे इहलोकी कीर्ती मिळते आणि परलोकी सद्गती प्राप्त होते.
अभंग क्र. 407
आयुष्य गेले वायाविण । थोर झाली नागवण ॥१॥
आता धावाधाव करी । काय पाहातोसि हरी ॥धृपद॥
माझे तुझे याचि गती । दिवस गेले तोंडी माती ॥२॥
मन वाव घेऊ नेदी । बुडवू पाहे भवनदी ॥३॥
पडिला विषयाचा घाला । तेणे नागविले मला ॥४॥
शरण आलो आता धावे । तुका म्हणे मज पावे ॥५॥
अर्थ
माझे आयुष्य वाया गेले माझी चांगलीच नागवंण झाली आहे. हे हरी आता तरी तु धावा धाव कर काय पाहत आहेस माझा उद्धार कर. अरे देवा माझे आणि तुझे करण्यातच आज पर्यंत दिवस गेले असे करता करता माझ्या तोंडात माती पडायची वेळ आली आहे. माझे मन एक क्षण देखील स्थिर राहत नाही ती मला भवन नदीत बुडवू पाहत आहे. माझ्यावर विषयांचा घाला पडला आणि त्यामुळे मी चांगलाच नागावला गेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आता तुला शरण आलो आहे त्यामुळे तू धाव आणि मला येऊन भेट.
अभंग क्र. 408
सोसोनि विपत्ती । जोडी दिली तुझे हाती ॥१॥
त्याचा हाचि उपकार । अंती आम्हाशी वेव्हार ॥धृपद॥
नामरूपा केला ठाव । तुज कोण म्हणते देव ॥२॥
तुका म्हणे हरी । तुज ठाव दिला घरी ॥३॥
अर्थ
देवा मी आज पर्यंत आणि प्रकारच्या विपत्ती सोसल्या आणि सर्व लाव तुझ्या हाती दिला आहे. अखेर आम्हाला सोडून दिलेस त्याचेच का उपकार फेडलेस ? अरे आम्ही आमच्या भक्तीने तुला नांव आणि रूप दिले. तुला सगुण साकार केले. नाही तर तुला देव कोणी म्हंटले असते ? तुकाराम महाराज म्हणतात नाम रूपाच्या घराचा आश्रय आम्हीच तुला दिला आहे.

फेब्रुवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading