आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

५ फेब्रुवारी, दिवस ३६, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा, ओवी २२६ ते २५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ४२१ ते ४३२
“५ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 5 feburvari
राम कृष्ण हरी आज दिनांक ५ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
226-3
हा गा साकर आणि दूध । हे गौल्य कीर प्रसिद्ध । परी कृमीदोषी विरुद्ध । घेपे केवी ॥226॥
दूध आणि साखर याची गोडी सर्वाना ठाऊकच आहे, परंतु जंतांच्या रोगात (पोटाचा आजार, कृमिदोष) त्यांचा वाईट परिणाम होत असल्यामुळे, असा रोग असणाऱ्या मनुष्याने ते पदार्थ कसे बरे सेवन करावेत. ?
227-3
ऐसेनिही जरी सेविजेल । तरी ते आळुकीची उरेल । जे ते परिणामी पथ्य नव्हेल । धनुर्धरा ॥227॥
अर्जुना ! असे असूनही रोग्याने त्याचे सेवन केले, तर त्याचा तो हट्टच ठरेल; कारण परिणामी ते पदार्थ हितकारी होणार नाहीत.
228-3
म्हणोनि आणिकासी जे विहीत । आणि आपणपेया अनुचित । ते नाचरावे जरी हित । विचारिजे ॥228॥
म्हणून इतरांना जे विहित पण आपणास जे अयोग्य कर्म आहे, त्याचे आचरण करू नये. (हिताचा विचार केला असता त्याचे आचरण करू नये)
229-3
या स्वधर्माते अनुष्ठिता । वेचु होईल जीविता । तोहि निका वर उभयता । दिसतसे ॥229॥
स्वधर्मचे आचरण करीत असताना आपला जीव जरी अर्पण करावा लागला, तरी तो यालोकी (मृत्युलोकात) आणि परलोकात हा धर्म श्रेष्ठ मानला जातो.
230-3
ऐसे समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ श्रीशार्ङगपाणी । तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ॥230॥
सर्व देवांत श्रेष्ठ असलेले देवाधिदेव भगवान श्रीकृष्ण ज्या वेळी असे बोलले, त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा ! माझी एक विनंती ऐका.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
231-3
हे जे तुम्ही सांगितले । ते सकळ कीर म्या परिसले । परी आता पुसेन काही आपले । अपेक्षित ॥231॥
तुम्ही जे सर्व आतापर्यंत सांगितले ते मी सर्व बरोबर ऐकले आहे, पण आता माझी काही विचारायची इच्छा आहे ते मी विचारतो. ॥231॥
अर्जुन उवाच:
अथ केन प्रयुकोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥3. 36॥
232-3
तरी देवा हे ऐसे कैसे । जे ज्ञानियांचीही स्थिति भ्रंशे । मार्गु सांडुनि अनारिसे । चालत देखो ॥232॥
तरी देवा ! हे आश्चर्यच आहे की ज्ञानी जे म्हणवितात ते देखिल विहित मार्ग सोडून भलत्या मार्गाने चाललेले व विहित मार्गापासून भ्रष्ट झालेले दिसतात. ॥232॥
233-3
सर्वज्ञुही जे होती । हे उपायही जाणती । तेही परधर्मे व्यभिचरति । कवणे गुणे ॥233॥
जे सर्वज्ञ आहेत व जे आपल्या कल्याणाचा मार्ग जाणतात तेहि स्वधर्म सोडून परधर्माने वागतांना जे दिसतात ते कशामुळे ? ॥233॥
234-3
बीजा आणि भुसा । अंधु निवाडु नेणे जेसा । नावेक देखणाही तैसा । बरळे का पा ॥234॥
बी आणि कोंडा यांचा निवाडा अंधळ्याला करता येणार नाही, पण केव्हा केव्हा क्षणभर डोळस पुरुषही चुकतो ते का ? ॥234॥
235-3
जे असता संगु सांडिती । तेचि संसर्गु करिता न धाती । वनवासीही सेविती । जनपदाते ॥235॥
जे पुरुष, असलेला आप्तेष्टांचा संग सोडून दुसर्याचा संसर्ग लावून घेतांना पुरे म्हणत नाहीत, लोकसंसर्ग सोडून जंगलात राहायला गेलेले पुरुषही पुनः लोकातच राहू इच्छितात. ॥235॥
236-3
आपण तरी लपती । सर्वस्वे पाप चुकविती । परी बळात्कारे सुइजती । तयाचि माजी॥236॥
पाप कर्मे चुकविण्यासाठी लपून बसतात (त्यापासून दूर पळतात) तेच पुन्हा पापाचरणाला वृत्त होतात.॥236॥
237-3
जयांची जीवे घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जिवेसी । चुकविती ते गिंवसी । तयातेचि॥237॥
ज्या पापाचा मनापासून तिटकारा करतात, त्याचाच ध्यास घेऊन बसतात. आणि ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा, तेच आपल्याला नेमके शोधीत येते.॥237॥
238-3
ऐसा बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे । हे बोलावे ह्रषिकेशें । पार्थु म्हणे॥238॥
अशा प्रकारे पापाचरण करण्याविषयी ज्ञानी पुरुषावर बळजोरी केली जाते, तर हा कोणाचा आग्रह आहे ? ” ते श्रीकृष्णा, कृपा करून मला सांग ” असे अर्जुन म्हणाला.॥238॥
श्रीभगवानुवाच:
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥3. 37॥
239-3
तंब ह्रदयकमळ आरामु । जो योगियांचा निष्कामकामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक॥239॥
ह्रदयरूपी कमलात राहणारा, योग्याच्या निष्काम मनातील कामना असलेला श्रीकृष्ण म्हणाला, ” अर्जुना, तुला ह्या प्रशनाचे समाधान करणारे उत्तर सांगतो ते ऐक.॥239॥
240-3
तरी हे काम क्रोधु पाही । जयाते कृपेची साठवण नाही । हे कृतांताचा ठायी । मानिजती॥240॥
तर असे पहा, हे काम-क्रोध असे आहेत की, ज्याच्या ठिकाणी अंशमात्रसुद्धा दयाबुद्धी नाही. ते केवळ काळाप्रमाणे निष्ठुर आहेत.॥240॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-3
हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरांचे वाघ । भजनमार्गीचे मांग । मारक जे ॥241॥
हे ज्ञानरूपी संपत्तीवर बसलेले विषारी महासर्प आहेत, विषयरूपी पर्वताच्या गुहेत राहणारे महाभयानक वाघ आहेत आणि भजनमार्गाचे ते मारेकरी आहेत.
242-3
हे देहदुर्गीचे धोंड । इंद्रियग्रामीचे कोंड । यांचे व्यामोहादिक बंड । जगामाजि ॥242॥
हे देहरूपी डोंगरी किल्याचे मोठाले दगड आहेत, इंद्रियरूपी गावाच्या भोवती असलेले तट आहेत; आणि सर्व जगामध्ये भ्रम, अविचार इत्यादी उत्पन्न करण्यात ते प्रबळ आहेत.
243-3
हे रजोगुण मानसाचे । समूळ आसुरियेचे । धायपण ययाचे । अविद्या केले ॥243॥
हे मनात असलेल्या (काम, क्रोध) रजोगुणाचे परिणाम आहेत व मुळापासूनच आसुरी संपत्तीचे आहेत; यांचे पालन पोषण अविद्येने केले आहे. (अविद्येने यांना जन्म दिला आहे)
244-3
हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले । तेणे निजपद या दिधले । प्रमादमोह ॥244॥
हे रजोगुणापासून उत्पन्न झाले असले, तरी ते तमोगुणाला हे अत्यन्त प्रिय आहेत; म्हणून तमोगुणाने प्रमाद व मोह हे आपले निजपद यांना बहाल केली आहेत.
245-3
हे मृत्यूचा नगरी । मानिजति निकियापरी । जे जीविताचे वैरी । म्हणऊनिया ॥245॥
हे मानवाच्या जीवाचे मोठे शत्रू आहेत; म्हणून मृत्यूच्या नगरीत हे श्रेष्ठ मानले जातात.
246-3
जयासि भुकेलिया आमिषा । हे विश्व न पुरेचि घासा । कुळवाडी यांची आशा । चाळित असे ॥246॥
यांना भूक लागली असता हे संपूर्ण विश्व त्यांच्या एका घासालादेखील पुरेसे पडत नाही (एक घासाचेही हे विश्व नाही). उपभोगांची इच्छा म्हणजे आशा ही त्यांची (काम, क्रोधांचा) नाशकारक व्यवहार चालवीत असते. (या व्यापाऱ्यांवर देखरेख आशा करते)
247-3
कौतुके कवळिता मुठी । जिये चौदा भुवने थेकुटी । ते भ्रांति तिये धाकुटी । वाल्हीदुल्ही ॥247॥
जी आपल्या लीलेने चौदा भुवने मुठीत धरू शकते, हिच्या मुठीपेक्षा चौदा भुवणेदेखील लहान आहेत, अशी ही भ्रांती या आशेची आवडती लहान बहीण आहे.
248-3
जे लोकत्रयाचे भातुके । खेळताचि खाय कवतिके । तिच्या दासीपणाचेनि बिके । तृष्णा जिये ॥248॥
ही भ्रांती खेळता खेळता तिन्ही लोक सहज खाऊन टाकते, त्या भ्रांतीच्या दासीपणाचे बळावर इच्छारुपी तृष्णा ही जगत असते.
249-3
हे असो मोहे मानिजे । याते अहंकार घेपे दीजे । जेणे जग आपुलेनि भोजे । नाचवित असे ॥249॥
हे असो, या काम क्रोधाना मोहाच्या घरी खूप मान आहे. जो अहंकार आपल्या इच्छेप्रमाणे जगाला नाचवीत असतो, तो अहंकार यांच्याशी देवाण घेवाण करतो.
250-3
जेणे सत्याचा भोकसा काढिला । मग अकृत्य तृणकुटा भरिला । तो दंभु रूढविला । जगी इही ॥250॥
ज्याने सत्याचा कोथळा फाडून त्यात असत्याचा पेंढा भरला, तो दंभ, या कामक्रोधानी जगात प्रसिद्धीस आणला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३६ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४२१ ते ४३२
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 421
आम्ही ज्याचे दास । त्याचा पंढरिये वास ॥१॥
तो हा देवाचा ही देव । काय कळिकाळाचा भेव ॥धृपद॥
वेद जया गाती । श्रुति म्हणती नेति नेति ॥२॥
तुका म्हणे निज । रूपडे हे तत्त्वबीज ॥३॥
अर्थ
आम्ही ज्याचे दास आहोत तो आमचा मालक पंढरीला वास करतो. तो आमचा मालक देवाचाही देव आहे त्यामुळे आम्हाला कसले आले कळिकाळा चे भेव. ज्याचे वर्णन वेद गातात आणि श्रुती म्हणतात की आम्हाला तो अजूनही कळत नाही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात निज स्वरूपाचे जे तत्व बीज आहे ते पंढरीला वास करणाऱ्या आमच्या मालकाचे म्हणजे पंढरीरायाचे रूप आहे.
अभंग क्र. 422
भक्तवत्सल दिनानाथ । तिही लोकी ज्याची मात ॥१॥
तो हा पुंडलिकासाठी । आला उभा वाळवंटी ॥धृपद॥
गर्भवास धरी । अंबॠषीचा कैवारी ॥२॥
सकळा देवा अधिष्ठान । एका मंत्रासी कारण ॥३॥
तुका म्हणे ध्यानी । ज्यासि ध्यातो शूळपाणी ॥४॥
अर्थ
अहो ज्या देवाची त्रैलोक्यामध्ये भक्तवत्सल दिनानाथा अशी कीर्ती आहे तोच हा देव पुंडलिकाकरता वाळवंटात उभा राहिला आहे. त्याने अंऋषीचा कैवार घेऊन त्याच्या साठी गर्भवास पत्करले. तो सर्व देवाचाअधिष्ठान आहे म्हणून त्याच्या एका नामस्मरणाने सर्व सिद्ध होते. तुकाराम महाराज म्हणतात या देवाचे, नित्य ध्यान शूलपाणी, शिव भगवान महादेव एकाग्रतेने आपल्या चित्तात करतो. ऐवढा हा श्रेष्ठ आहे
अभंग क्र. 423
फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चाळविले ॥१॥
फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥२॥
तुका म्हणे अवघे फटकाळ हे जिणे । अनुभविये खूणे जाणतील ॥३॥
अर्थ
जे लोक तामस गुणाने उपासना करतात त्या लोकाचा देव्हारा ही फटकळ आहे त्यांनी दिलेला अंगारा ही फटकळ आहे म्हणजे खोटा आहे व त्यांनी सांगितलेले विचारही फसवे आहेत. कारण त्याने लोकांना भाबडे विचार सांगून फसविले. असा भक्त वाह्यात आणि त्याचा देव हि वाह्यात कारण असा डोंगी माणूस इतरंना नादी लावून त्याचा घात करतो. तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारचे देव्हारे माजवून जे अंगारे देतात, त्यांचे जगणे व्यर्थ आहे हे, ज्यांना अनुभवाचीम्हणजे स्वरूपस्थितीची खूण पटते ते सहज ओळखतात.
अभंग क्र. 424
नेत्राची वासना । तुज पाहावे नारायणा ॥१॥
करी याचे समाधान । काय पहातोसी अनुमान ॥धृपद॥
भेटावे पंढरिराया । हेचि इच्छिताती बाह्या ॥२॥
जावे पंढरीसी । हेचि ध्यान या मानसी ॥३॥
चित्त म्हणे पायी । तुझे राहीन निश्चयी ॥४॥
म्हणे बंधु तुकयाचा । देवा भाव पुरवी याचा ॥५॥
अर्थ
हे नारायणा तुझे रूप माझ्या डोळ्यांनी पाहावे अशी माझी वासना आहे. त्यांचे तू समाधान कर. वाट पाहत काय बसला आहेस ? हे पंढरीराया, तुला भेटावे हीच माझ्या बाहूंची इच्छा आहे. पंढरीला जाण्याचा ध्यास माझ्या मानाने घेतला आहे. चित्त हे तुझ्या पायांच्या ठिकाणी निश्चिंत होऊन निरंतर राहवे अशी इच्छा करत आहे. तुकाराम महाराजांचे बंधू म्हणतात, माझी हि इच्छा तू पूर्ण कर.
अभंग क्र. 425
जेणे तुज जाले रूप आणि नांव । पतित हे दैव तुझे आम्ही ॥१॥
नाही तरी तुज कोण हो पुसते । निराकारी तेथे एकाएकी ॥धृपद॥
अंधारे दीपा आणियेली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणाची ॥२॥
धन्वंतरी रोगे आणिला उजेडा । सुखा काय चाडा जाणावे त्या ॥३॥
अमृतासी मोल विषाचिया गुणे । पितळे तरी सोने उंच निच ॥४॥
तुका म्हणे आम्ही असोनिया जान । तुज देव पणा आणियेले ॥५॥
अर्थ
देवा पतीता करताच तुला नाम रूपाला यावे लागले म्हणजेच याचा अर्थ असा होतो की, आम्ही पतीतच खरे तुझे दैवत आहोत. नाही तर तू निराकार स्वरुपस्थितीने असतास तर तुला कोणी मानले असते. आंधरानेच दिव्याच्या प्रकाशाला शोभा आणली आहे व कोणंदणाच्या योगाने माणिक शोभून दिसते. वैद्याला रोगा मुळेच प्रसिद्धी मिळते. जर सर्व सुखी निरोगी असते, तर वैद्याकडे जाण्याचे कोणाला काय कारण होते ? विषा मुळेच अमृताला मोल चढते आणि पितळ हा धातू हलका आहे म्हणून सोन्याला श्रेष्टता प्राप्त झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात अरे विठ्ठला, आम्ही असे पतित असल्यामुळेच तुला देवपणाचा मोठेपणाला आणले आहे हे तू समजून राहा.
अभंग क्र. 426
सुखवाटे येचि ठायी । बहु पायी संतांचे ॥१॥
म्हणऊनि केला वास । नाही नास ते ठायी ॥धृपद॥
न करवे हाली चाली । निवारिली चिंता हे ॥२॥
तुका म्हणे निवे तनु । रज:कणु लागता ॥३॥
अर्थ
मला संतांच्या पाया जवळच खूप सुख वाटत आहे. येथे सुखाला कधीही नाश नाही म्हणून मी येथेच वास्तव्य केले. आता येथून ढळणे नाही, कसलेही खटाटोप नाहीत म्हणून माझी चिंता नाहीशी झाली. तुकाराम महाराज म्हणतात संतांचे रज: कण जरी शरीराला लागले तरी त्रिविध ताप नाहीसे होतात शरीर विश्रांत पावते.
अभंग क्र. 427
देऊनिया कपाट । की कोण काळ राखो वाट ॥१॥
काय होईल ते शिरी । आज्ञा धरोनिया करी ॥धृपद॥
करू कळे ऐसी मात । किंवा राखावा एकात ॥२॥
तुका म्हणे जागो । किंवा कोणा नेदू वागो ॥३॥
अर्थ
देवा इंद्रियांचे द्वार बंद करून किती दिवस तुझी वाट पाहत राहावे. आता जी आज्ञा तू करशील, ती मी शिरोधार्य करीन. मी काय करू ? मला जसे समजते, तसे कार्य करू कि केवळ एकातात राहू. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता मी येथे नेहमी जागत राहू की, इतर कोणाला म्हणजे विकारांना येण्या-जाण्यासाठी बंदी घालत राहू की, त्यांची वागणूक बंद करू ?
अभंग क्र. 428
मायबापापुढे लेकराची आळी । आणीक हे पाळी कोण लळे ॥१॥
सांभाळा जी माझी विषमे अनंता । जवळी असता अव्हेरु का ॥धृपद॥
आणिकाची चाले सत्ता आम्हावरी । तुमची ते थोरी काय मग ॥२॥
तुका म्हणे आलो दुरोनि जवळी । आता टाळाटाळी करू नये ॥३॥
अर्थ
मायबापाच्या पुढे लेकराचे हट्ट चालत असतात माय बापा वाचून इतर कोण त्याचे हट्ट पुरवणारा आहे ? अहो देवा, अनंता माझ्या ठिकाणी जी काम क्रोधाची विषम वृत्ती वाढली आहे, ती तुम्ही नाहीशी करा. तुम्ही माझ्या जवळ असून माझा अव्हेर का करता ? जर आमच्यावर दुसऱ्या कोणाची सत्ता चालेल, तर मग तुमचा थोर पणा तो काय राहिला ? तुकाराम महाराज म्हणतात देवा, मी खूप लांबून तुमच्या जवळ (अनेक योनी फिरून मनुष्यदेहात) आलो आहे आता आपण माझा उद्धार करण्यास टाळाटाळ करू नये.
अभंग क्र. 429
योग तप याचि नावे । गळीत व्हावे अभिमाने ॥१॥
करणे ते हेचि करा । सत्य बरा व्यापार ॥धृपद॥
तरि खंडे येरझार । निघे भार देहाचा ॥२॥
तुका म्हणे मानामान । हे बंधन नसावे ॥३॥
अभंग क्र. 430
करी संध्यास्नान । वारी खाउनिया अन्न ॥१॥
तया नाही लाभहानी । आदा वेचाचिये मानी ॥धृपद॥
मजुराचे धन । विळा दोरचि जतन ॥२॥
तुका म्हणे नाही । अधीरासी देव काही ॥३॥
अर्थ
काही मनुष्य असे आहेत की ती दररोज स्नानसंध्या करतात परंतु निषिद्ध अन्न खाऊन त्याने केलेल्या सर्व कर्मांचा नाश करतो. अशा मनुष्याला काही लाभही होत नाही व त्याचे नुकसानही होत नाही. जमा खर्च बरोबर होतो. ज्याप्रमाणे मजुराने मजुरी करून मिळवलेले सर्व धन खर्च होते आणि त्याच्या जवळ फक्त विळा आणि गवत बांधण्याचा दोर ऐवढेच राहते. म्हणून ज्याच्यामध्ये अधीरपण आहे त्याला देव प्राप्त होत नाही.
अभंग क्र. 431
वाखर घेउनि आले । त्यासी तलवारे नेहाले ॥१॥
नव्हे आपुले उचित । करुनि टाकावे फजित ॥धृपद॥
अंगुळिया मोडी । त्यासी काय सिले घोडी ॥२॥
नपुंसकासाठी । तुका म्हणे न लगे जेठी ॥३॥
अर्थ
एखादा सामान्य नाव्ही शुर शिपायावर वस्तरा घेऊन धावला आणि त्याचा प्रतिकार म्हणून शूर शिपायाने त्याच्यावर तलवार घेऊन धाव घेतली तर ते योग्य नाही, त्यावर खरे म्हणजे, ” शिपायानने, त्याच्यावर तलवार घेऊन धावणे आवशक नाही” शिपायाने जर त्या नाव्याला “गप्प बस मूर्खा, काय गडबड लावली आहेस ? ”अशा भाषणाने त्याला फजित करावे म्हणजे झाले. अतिरागणे दुसऱ्यावर बोटे मोडणार्या हिजडयाचा प्रतिकार करण्यास शिपाई आणि घोडेस्वार काय करायचे आहेत ? तुकाराम महाराज म्हणतात नामर्दाच्या पारिपत्यासाठी मल्लाची आवशक्यता नाही.
अभंग क्र. 432
प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातो हरी ॥१॥
मनेसहित वाचा काया । अवघे दिले पंढरीराया ॥धृपद॥
सत्ता सकळ तया हाती । माझी कीव काकुलती ॥२॥
तुका म्हणे ठेवी तैसे । आम्ही राहो त्याचे इच्छे ॥३॥
अर्थ
हरी आणि भक्त या दोघामध्ये प्रेमसूत्र ची दोरी असते त्यामुळे भक्त जिकडे जातो तिकडे त्याच्या पाठीमागे देव प्रेमसुत्रा च्या दोरीने आपोआप जात असतो. कारण भक्ताने पण देवाला आपले मन, काय आणि वाचा सर्वच अर्पण केले आहे. त्या देवाच्या हाती सर्व सत्ता आहे. त्याला माझी कीव येते. तुकाराम महाराज म्हणतात आता तो जसे ठेवील, तसे आम्ही राहो.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















