आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

८ फेब्रुवारी, दिवस ३९, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था, ओवी २६ ते ५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ४५७ ते ४६८
“८ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 8 feburvari
राम कृष्ण हरी आज दिनांक ८ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
26-4
कैसा नेणो मोहो वाढीनला । तेणे बहुतेक काळु व्यर्थ गेला । म्हणोनि योगु हा लोपला । लोकी इये ॥26॥
असा हा अज्ञानाचा मोह कसा वाढला, हे काही कळत नाही. त्यामुळे बहुतेक काळ हा योगपरंपरेपासून व्यर्थ गेला, म्हणून या लोकी हा निष्काम कर्मयोग लुप्त झाला.
स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥4. 3॥
भावार्थ :-
तू माझा भक्त व सखा आहेस, म्हणून तोच पुरातन योग, मी तुला सांगितला आहे. कारण हे सर्व रहस्यातील उत्तम रहस्य आहे.
27-4
तोचि हा आजि आता । तुजप्रती कुंतीसुता । सांगितला आम्ही तत्वता । भ्रांति न करी ॥27॥
हे कुंतीसुता ! तोच (श्रेष्ठ ज्ञानरहस्यरूप असा) योग आम्ही तुला यथार्थ पणाने कथन केला आहे. याविषयी मनात कोणत्याही प्रकारची (संशय, ) भ्रांती बाळगू नकोस.
28-4
हे जीवीचे निज गुज । परी केवी राखो तुज । जे पढियेसी तू मज । म्हणऊनिया ॥28॥
हा योग म्हणजे माझ्या हृदयातील विशेष गुह्य आहे. पण तुझ्यापासून हा योग कसा बरे चोरून ठेऊ ? कारण तू तर माझा अगदी लाडका आहेस.
29-4
म्हणून मी तुला तो सांगितला आहे. तू प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा । मैत्रियेची चित्कळा । धनुर्धरा ॥29॥
हे अर्जुना ! तू जणू काही प्रेमाचा पुतळा आहेस, भक्तीचा जिव्हाळा आहेस; जिवलग मित्रत्वरुपी चैतन्याचा अंश आहेत. (सख्याची जीवनकला आहेत).
30-4
तू अनुसंगाचा ठावो । आता तुज काय वंचू जावो । जरी संग्रामारूढ आहो । जाहलो आम्ही ॥30॥
जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहोत, तरी हे अर्जुना ! तुझा आणि माझा अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे तुझ्यापासून काही लपवून ठेवता येईल काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-4
तरी नावेक हे सहावे । गाजाबज्यही न धरावे । परी तुझे अज्ञानत्व हरावे । लागे आधी ॥31॥
तरी काही काळ हा युद्धाचा प्रसंग बाजूला ठेव. आमचे प्रथम कर्तव्य म्हणजे तुझे अज्ञान घालवून टाकले पाहिजे.
अर्जुन उवाच:
अपरं भवतो जन्मं परं जन्म विवस्वतः ।
कथमेतद् विजानीया त्वमादौ प्रोक्तवानिति ॥4. 4॥
भावार्थ :-
अर्जुन म्हणाला, हे देवा ! आपला जन्म हा अलीकडचा, आणि सूर्याचा जन्म आपल्या फार पूर्वीचा आहे. असे असताना तू सुरुवातीला हा योग त्याला सांगितलास, हे मी कसे बरे जाणावे ?
32-4
तव अर्जुन म्हणे हरी । माय आपुलेयाचा स्नेहो करी । एथ विस्मो काय अवधारी । कृपानिधी ॥32॥
तेंव्हा अर्जुन म्हणाला, हे कृपानिधी श्रीहरी ! आई आपल्या मुलावर प्रेम करते, यात नवल (आश्चर्य) ते काय ?
33-4
तू संसारश्रांतांची साऊली । अनाथ जीवांची माऊली । आमुते कीर प्रसवली । तुझीच कृपा ॥33॥
आणि तू तर संसारतापाने दमलेल्या जीवांची सावली आहेस, अनाथ जीवांची आई आहेस आणि खरोखर तुझ्या कृपेच्या वर्षावानेच (तुझ्या कृपेमुळेच) जन्म झाला आहे.
34-4
देवा पांगुळ एकादे विईजे । तरी जन्मोनि जोजारू साहिजे । हे बोलो काय तुझे । तुजचि पुढा ॥34॥
हे देवा ! आईच्या पोटी एखाद्या पांगळ्या मुलाचा जन्म झाला, तर त्याच्या जन्मापासून आईला त्रास सोसावा लागतो. हे सर्व आपण जाणता, तर मग ह्या सर्व गोष्टी तुझ्यासमोर काय बोलाव्या ?
35-4
आता पुसेन जे मी काही । तेथ निके चित्त देई । तेवीचि देवे कोपावे ना काही । बोला एका ॥35॥
देवा ! आता तुला मी जे विचारणार आहे, त्याच्याकडे उत्तम प्रकारे लक्ष दे. माझ्या या प्रश्नांचा (बोलण्याचा) मुळीच राग धरू नकोस. ही विनंती.
36-4
तरी मागील जे वार्ता । तुवा सांगितली होती अनंता । ते नावेक मज चित्ता । मानेचिना ॥36॥
हे अनंता ! पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस, ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही.
37-4
जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसे हे वडिला ठाऊवे नाही । तरी तुवाचि केवी पाही । उपदेशिला ॥37॥
पाहा, विवस्वानं म्हणजे कोण, याची आपल्या वाडवडिलांनासुद्धा ठाऊक नाही, तर पाहा तू त्याला उपदेश केलास, हे कसे बरे शक्य आहे. ?
38-4
तो तरी आइकिजे बहुता काळांचा । आणि तू तव कृष्ण सांपेचा । म्हणोनि गा इये मातुचा । विसंवादु ॥38॥
तो सूर्य तर फार प्राचीन काळातला आहे, असे आम्ही ऐकतो; आणि तू श्रीकृष्ण तर आजच्या काळाचा (अलीकडच्या काळात जन्माला आला आहात. ). म्हणून तुझ्या बोलण्यामध्ये विसंगती दिसत आहे.
39-4
तेवीचि देवा चरित्र तुझे । आपण काही काय जाणिजे । हे लटिके केवी म्हणिजे । एकिहेळा ॥39॥
हे देवा ! तुझे चरित्र आम्हास काही कळत नाही. तर मग आपण जे बोलता, ते एकदम खोटे आहे, असे तरी कसे म्हणावे. ?
40-4
परी हेचि मातु आघवी । मी परियेसे तैशी सांगावी । जे तुवाचि तया रवी केवी । उपदेशु केला ॥40॥
तेंव्हा प्राचीन काळी सूर्याला तू जो उपदेश केलास, तीच सगळी गोष्ट मला उत्तम प्रकारे समजू शकेल, अशा पद्धतीने सांगावी.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
श्री भगवानुवाच:
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥4. 5॥
भावार्थ :-
श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! माझे व तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत. त्या सर्वाना मी जाणतो. हे अर्जुना, तू मात्र ते जाणत नाहीस.
41-4
तव कृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जै होता । तै आम्ही नसो ऐसी चित्ता । भ्रांति जरी तुज ॥41॥
त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! जेंव्हा तो विवस्वानं होता, त्याकाळी आम्ही नव्हतो, अशी जर तुझ्या मनामध्ये भ्रांती निर्माण झाली असेल,
42-4
तरी तू गा हे नेणसी । पै जन्मे आम्हा तुम्हासी । बहुते गेली परी तिये न स्मरसी । आपली तू ॥42॥
तर तुला हे माहित नाही की, माझे आणि तुझे आजपर्यंत पुष्कळ जन्म झाले आहेत; परंतु तुला आपल्या गतजन्माचे स्मरण नाही.
43-4
मी जेणे जेणे अवसरे । जे जे होऊनि अवतरे । ते समस्तही स्मरे । धनुर्धरा ॥43॥
हे धनुर्धरा ! ज्या ज्या वेळी जे जे रूप घेऊन मी अवतरलो, त्या सर्व अवतारांचे मला स्मरण आहे.
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतामामिश्वरोऽपि सन् ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥4. 6॥
भावार्थ :-
मी अविनाशीस्वरूप अजन्मा असूनदेखील, सर्व भूतमात्रांचा ईश्वर असूनसुद्धा आपल्या प्रकृतीला वश करून मी योगमायेने प्रकट होत असतो.
44-4
म्हणोनि आघवे । मज मागील आठवे । मी अजुही परि संभवे । प्रकृतिसंगे ॥44॥
म्हणून मला मागील सर्व गोष्टींचे स्मरण होते. मी जन्मरहित आहे, तरीपण मायेच्या योगाने मी अवतार धारण करत असतो.
45-4
माझे अव्ययत्व तरी न नसे । परी होणे जाणे एक दिसे । ते प्रतिबिंबे मायावशे । माझाचि ठायी ॥45॥
माझा अविनाशपणा कधीही नाहीसे होत नाही; परंतु अवतार घेणे व संपविणे, हा जो प्रकार दिसतो, तो माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी मायेमुळे भासमान होतो.
46-4
माझी स्वतंत्रता तरी न मोडे । परी कर्माधीनु ऐसा आवडे । तेही भ्रांतिबुद्धि तरी घडे । एर्हवी नाही ॥46॥
माझे स्वातंत्र्य तर कधीही नष्ट होत नाही. मी कर्माच्या अधीन आहे, असे जे दिसते, ते भ्रांतीमुळे (आज्ञान) दिसते; परंतु खरोखर तसे नाही.
47-4
की एकचि दिसे दुसरे । ते दर्पणाचेनि आधारे । एर्हवी काय वस्तुविचारे । दुजे आहे ॥47॥
जसे आरशामूळे एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात; एरवी वस्तुस्थितीचा सूक्ष्म विचार केला, तर दुसरी वस्तू आहे काय ?
48-4
तैसा अमूर्तचि मी किरीटी । परी प्रकृति जै अधिष्ठी । तै साकारपणे नटे नटी । कार्यालागी ॥48॥
हे अर्जुना ! तसा मी निराकारच आहे. परंतु ज्यावेळी मी प्रकृतीचा (मायेचा) आश्रय घेतो, त्यावेळी काही विशेष कार्यासाठी (धर्मकार्याकरिता) मी सगुण रूपाच्या वेषाने नटतो.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥4. 7॥
भावार्थ :-
हे भरतवंशी अर्जुना ! जेंव्हा जेंव्हा धर्माची ग्लानी होते, आणि अधर्म बळावू लागतो (वाढतो) तेंव्हा मी स्वतःला जन्मास घालतो. (मी अवतार घेतो)
49-4
जे धर्मजात आघवे । युगायुगी म्या रक्षावे । ऐसा ओघु हा स्वभावे । आद्य असे ॥49॥
कारण की, धर्माच्या संपूर्ण स्वरूपाचे (हा जो धर्मचा विचार आहे) प्रत्येक युगात मी रक्षण करावे, असा हा क्रम (प्रवाह) स्वभावतः अगदी मुळापासून (जगाच्या आरंभापासून) चालत आलेला आहे.
50-4
म्हणोनि अजत्व परते ठेवी । मी अव्यक्तपणही नाठवी । जे वेळी धर्माते अभिभवी । अधर्मु हा ॥50॥
म्हणून ज्या ज्या वेळी अधर्म हा धर्माचा ऱ्हास (पराभव) करू लागतो, त्या वेळी मी माझा जन्मरहितपणा बाजूला ठेवतो आणि माझ्या अव्यक्तपणाची आठवणही न ठेवता मी अवतार धारण करतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥4. 8॥
भावार्थ :-
सज्जनांच्या रक्षणाकरिता, दुर्जनांच्या नाशाकरिता व धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी युगा-युगात प्रकट होत असतो.
दिवस ३९ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४५७ ते ४६८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 457
मढे झाकुनिया करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहो ॥१॥
तयापरी करी स्वहित आपुले । जयासी फावले नरदेह ॥धृपद॥
ओटीच्या परिस मुठीच्या ते वाढे । यापरि कैवाडे स्वहिताचे ॥२॥
नाही काळसत्ता आपुलिये हाती । जाणते हे गुंती उगविती ॥३॥
तुका म्हणे पाहे आपुली सूचना । करितो शाहाणा मृत्युलोकी ॥४॥
अर्थ
कुणबी लोकांची जात पेरणी विषयी इतकी दक्ष असते कि त्या वेळी घरात कोणी मेलेले असेल, तरी त्याचे मढे झाकून ठेवतात आणि पेरणी करायला धावतात. त्याच्या प्रमाणे मानवाने हा जन्म दुर्लभ आहे असे जाणून, इतर सर्व गोष्टी बाजूला ठेऊन आपले हित ज्यात आहे, असा परमार्थ करण्या विषयी तत्पर असावे. पेरणी करण्या करता ओटीमध्ये बी घेऊन त्यातील मुटभर दाने शेतकरी पाभरीच्या वर ठेवतो. ते जमिनित पडतात तेंव्हा हातील दाण्यापेक्षा ते अनेक पटीने वाढतात. त्याच प्रमाणे आपले हित वाढेल याचा विचार कर. उशीर करू नको. कारण काळ केंव्हा घाला घालील, याचा नेम नाही. त्याच्या हातून वाचणे शक्य नाही, असे ओळखून ज्ञानी लोक संसाराच्या गुंत्यातून आपली सुटका करून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात त्या सुचणे प्रमाणे जो मनुष्य या मृत्युलोकात आपले स्वतःचे हित करून घेतो, तोच शहाणा आहे.
अभंग क्र. 458
राजा चाले तेथे वैभव सांगाते । हे काय लागते सांगावे त्या ॥१॥
कोणी कोणा तेथे न मनी जी फुका । कृपेविण एका देवाचिया ॥धृपद॥
शृंगारिले नाही तगोयेत वरी । उमटे लौकरि जैसे तैसे ॥२॥
तुका म्हणे घरी वसे नारायण । कृपेची ते खुण दिसो येते ॥३॥
अर्थ
राजाची स्वारी जिकडे जाते, तिकडे त्याचा सर्व लवाजमा व वैभव त्याच्या बरोबर जाते. हे वेगळे सांगायला लागत नाही. कोणी कोणाला देवाच्या कृपेवाचून उगीच थोर मानत नाही. कोणत्याही सामन्य वस्तूला वरवर पुष्कळ सुशोभित केले, तरी ती शोभा फार वेळ टिकत नाही. लवकरच खरे स्वरूप दिसते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या हृदय रुपी घरात नारायणाची वस्ती झाली आहे, त्याला ओळखण्याची खूण म्हणजे त्याच्या वर नारायणची कृपा झाली असे समजावे.
अभंग क्र. 459
वत्स पळे धेनु धावे पाठीलागी । प्रीतीचा तो अंगे आविर्भाव ॥१॥
शिकविले काय येईल कारणा । सूत्र ओढी मना आणिकाच्या ॥धृपद॥
सांडिले ते नाही घेत मेळविता । म्हणऊनि लाता मागे सारी ॥२॥
तुका म्हणे आग्रह करावा न लगे । सांगतसे हा गे अनुभव ॥३॥
अर्थ
गाय वासराच्या मागे धावत पळत एका रणात तिच्या अंगी वासरा विषयी अविर्भाव प्रेम असते म्हणून. अश्या गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत शिकवून येणारहि नाहीत. खर प्रेम तंतू दुसऱ्याच्या मनाला ओढतो. पण तीच गाय ते वासरू मोठे झाल्यावर जवळ आले तर त्याला दुध न पाजता दूर लोटते. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याविषयी प्रेम कराच असा आग्रह करावा लागत नाही कोणत्याही व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी त्याचा विषयी त्याचा असलेला अनुभव महत्त्वाचा आहे.
अभंग क्र. 460
देवाच्या संबंधे विश्वचि सोयरे । सूत्र ओढे दोरे एका एक ॥१॥
आहाच हे नव्हे विटायासारिखे । जीव जीवनी देखे सामावले ॥धृपद॥
आणिकाचे सुख दुःख उमटे अंतरी । एथील इतरी तेणे न्याये ॥२॥
तुका म्हणे ठसावले शुद्ध जाती । शोभाचि पुढती विशेषता ॥३॥
अर्थ
एका देवाशी च आपला संबंध असला की सर्व विश्वच आपले सोयरे होते कारण आपले देवाविषयी प्रेम असले तर सर्व विश्वच आपल्याला देवस्वरूप दिसते. एकदा की आपल्याला सर्व विश्व देवासारखे वाटायला लागले की त्यांच्याविषयी झालेले निर्माण झालेले प्रेम हे कधीही विटण्या सारखे नसते कारण ब्रम्हनिष्ठांचा जीव विश्वाचे जीवन असलेल्या देवाशी समरस झालेला असतो. अश्या तऱ्हेची सोयरिक वरवर दिसणारी नसून किंवा वीट येणारी नसून जिवाभावाची असते. जीव जीवनात परस्पराशी ऐक्य पावतात असे समजावे. दुसऱ्याला झालेली सुख दुखः हि सर्वाना जाणवते. तुकाराम महाराज म्हणतात अश्या तऱ्हेचा शुद्ध सर्वात्म भाव ब्रम्हनिष्ठ भक्ताच्या अंतकरणात ठसतो. आणि त्याचे वैशिष्ट्य आणखीच शोभून दिसते.
अभंग क्र. 461
अवघा वेचलो इंद्रियांचे ओढी । जाले ते ते घडी निरोपिले ॥१॥
असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्या भार उतरिला ॥धृपद॥
कायावाचामने तोचि निजध्यास । एथे जालो ओस भक्तीभावे ॥२॥
तुका म्हणे करू येईल धावणे । तरि नारायणे सांभाळावे ॥३॥
अर्थ
देवा इंद्रियांच्या ओढीने मी जे जे काही कर्म केले ते ते सर्व कर्म तुला निरूपण केले आहे म्हणजे मी तुला सांगितले आहे. देवा तुला आमच्या अशाप्रकारचे सेवेचा ठावा नसावा परंतु मी जे काही घडले ते सर्व तुला निरोपण केले आहे त्यामुळे माझ्या माथ्यावरचा सर्व भार उतरविला आहे. माझ्या काया वाचा व मनाने इंद्रियांच्या ओढीने विषयांचा निजध्यास घेतला होता त्यामुळे मी भक्ती भावाच्या दृष्टीने ओस झालो होतो. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा तुला जर माझ्यासाठी धावून येता आले तर ये आणि माझा सांभाळ कर.
अभंग क्र. 462
राहो आता हेचि ध्यान । डोळा मन लंपट ॥१॥
कोंडकोंडुनि धरीन जीवे । देहभावे पूजीन ॥धृपद॥
होईल येणे कळसा आले । स्थिरावले अंतरी ॥२॥
तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पाया पडो द्या ॥३॥
अर्थ
आता माझ्या डोळ्यांना आणि मनाला विटेवर असलेले देवाचे ध्यान निरंतर राहो व माझे डोळे व मन त्याच्याविषयी लंपट होवो. ते ध्यान मग मी माझ्या जिवामध्ये दृढ धरीन आणि माझी देह भावना त्याला वाहून मी त्याची पूजा करीन. अश्या प्रकारे ते ध्यान मनात स्थिर झाले म्हणजे कळस गाठल्या सारखे होईल. तुकाराम महाराज म्हणतात हे गोजिरवाण्या देवा, मला तुझ्या पाया पडू दे.
अभंग क्र. 463
आदि मध्य अंत दाखविले दीपे । तो आपणापे यत्न बरा ॥१॥
दास्यत्वे दाविले धन्याचे भांडार । तोंतो नव्हे सार एथुनिया ॥धृपद॥
उपायाने सोस नासला सकळ । सत्ते सत्ताबळ अंगा आले ॥२॥
तुका म्हणे दृष्टि सकळाचे शिरी । वचनेचि करी बैसोनिया ॥३॥
अर्थ
अंधारामध्ये आपण दिवा हातात घेतला तर दिवा आपल्याला अंधारातील एखाद्या वस्तूचा सुरुवातीचा भाग मध्यभाग आणि अंत भाग म्हणजे संपूर्ण वस्तूचे ज्ञान करून देतो आणि अंधारामध्ये दिव्याचे साहाय्य घेणे चांगले. अगदी त्याप्रमाणेच या जगामध्ये एक विठ्ठलच सत्य आहे हे मी जाणले आहे व त्याचे दास्यत्व पत्करले आहे म्हणून त्या विठ्ठल धन्याने म्हणजे मालकाने मला परमार्थाचा ठेवा ऐश्वर्य दाखविले आता याच कारणामुळे मी देवा विठ्ठला शिवाय जे काही दिसेल ते सत्यच नाही ते खरे नाही असेच ठरविले आहे. मी हरी भक्तीचा उपाय केला त्यामुळे माझा सर्व विषय भोग नाहीसा झाला आणि देवाची भक्ती मी निरंतर करत राहिलो त्यामुळे विठ्ठलाने मला त्याची सर्व शक्ती देण्यास पात्र केले व माझ्या अंगी सत्ता बळ आले. आणि देवाची जी सत्ता आहे तिचे सामर्थ्य माझ्या अंगी आले. तुकाराम महाराज म्हणतात सर्वाच्या ठिकाणी माझी समान दृष्टी असून बसल्या जागेवरून मी सर्वाना देवाचे वचन एकवितो.
अभंग क्र. 464
सांठविला वाण । पैस घातला दुकान ॥१॥
जे ज्या पाहिजे जे काळी । आहे सिद्धचि जवळी ॥धृपद॥
निवडिले साचे । उत्तममध्यमकनिष्ठाचे ॥२॥
तुका बैसला दुकानी । दावी मोला ऐसी वाणी ॥३॥
अर्थ
आम्ही दुकान उघडे केले आहे त्या दुकानात आम्ही नवविधा भक्तीचा माल साठविला आहे. आमचे दुकान हे असे आहे ज्याला जी वस्तू हवी असेल ती वस्तू लगेच मिळते. आमच्या या दुकानात तिन्ही दर्जाची म्हणजे उत्तम, मध्यम आणि कनिष्ट जातीची भक्ती भरून ठेवलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी या दुकानात बसलो आहे जो जशी किंमत सेवा रुपी किंमत देईल तसा माल मी त्याला दाखवितो.
अभंग क्र. 465
अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले । मागे होते आले शिष्टाचार ॥१॥
दुर्बळाच्या नावे पिटावा डांगोरा । हा तो नव्हे बरा सत्यवाद ॥धृपद॥
मद्य आणि मधु एकरासी नावे । तरि का ते खावे आधारे त्या ॥२॥
तुका म्हणे माझा उच्छिष्ट प्रसाद । निवडी भेदाभेद वृष्टिन्याये ॥३॥
अर्थ
पूर्वीपासूनच कोणीही अवगुणाची स्थापना केलेली नाही मागे शिष्टांचे जसे आचार होते काही शिष्टांचे आचार होते जे अवगुणाला धरून होते जर आपण पूराणे वाचले तर त्यामध्ये आपल्याला काही शिष्टाचे अवगुण दिसून येतील ते म्हणजे असे की विश्वामित्र तपस्वी होते तरी देखील त्यांनी मेनका बरोबर संबंध केला भीष्माचार्यांनी दुर्योधनाचा पक्ष घेतला धर्मराज कधीही खोटे बोलत नव्हता तो देखील द्रोणाचार्या बरोबर खोटे बोलला म्हणजेच शिष्टांनी कसेही आचरण केले तर चालतात तर मग भक्ती न करणाऱ्या र्दुबाळाने अवगुणाचे वर्तन केले तर त्याच्या नावाने डांगोरा पिटवावा का ? तसे देखील काही लोकांचे म्हणणे आहे पण खरे पाहिले गेले तर त्यांचे हे बोलणे बरोबर नाही. मध आणि मद्य यांना मधु हे एकच नांव आहे. तेंव्हा आम्ही मधुपान करतो असा शब्द वापरून उगाच दारू का प्यावी ? म्हणजेच अवगुण कोणीही करो तो अवगुणच आहे ज्येष्ठांनी करो अथवा कनिष्ठाने करो तो अवगुणच आहे आणि सद्गुण कोणीही करो तो सद्गुणच आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला संतांच्या उच्छिष्टाचा प्रसाद लाभला आहे. तो तर मेघवृष्टी प्रमाणे भरपूर आहे. तो ग्रहण केल्या मुळे आझ्या अंगी चांगले, वाईट यांची निवड करण्याचे बळ आले आहे.
अभंग क्र. 466
लागलिया मुख स्तना । घाली पान्हा माउली ॥१॥
उभयता आवडी लाड । कोडे कोड पुरतसे ॥धृपद॥
मेळविता अंगे अंग । प्रेम रंग वाढतो ॥२॥
तुका म्हणे जड भारी । अवघे शिरी जननीचे ॥३॥
अर्थ
आईने आपल्या बालकाचे मूख आपल्या स्थानाला लावले की तिला पान्हा फुटतो. त्या दोघा मध्ये परस्पराची गोडी असते, म्हणून त्या दोघाचे लाड पूर्ण होतात. लहन बाळाचे अंग कुरवाळून आईने प्रेमाने बाळाला मिठी मारली कि प्रेमानंद अधिकच वाढतो. तुकाराम महाराज म्हणतात त्या बालकाला काहीही दुखणे, भाणे झाले, तर आईला त्याची सर्व काळजी असते.
अभंग क्र. 467
भूती भगवंत । हा तो जाणतो संकेत ॥१॥
भारी मोकलितो बाण । ज्याचा त्यासी कळे गुण ॥धृपद॥
करावा उपदेश । निवडोनि तरि दोष ॥२॥
तुका म्हणे वाटे । चुकता आडराने काटे ॥३॥
अर्थ
सर्व भूत मात्रा मध्ये प्राणीमात्रा मध्ये भगवंत आहे हा संकेत मी जाणतो. त्यामुळे मी जे कठोर बोलतो, त्या वाग्बानाने ज्याचा त्याला गुण कळून येतो. गुण आणि दोष यांची निवड करून यथातथ्य उपदेशच करावा, तसा मी करतो. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर वाट चुकून भलतीकडे जाल, तर आड रानात तुम्हाला काटेच बोचतील.
अभंग क्र. 468
आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥१॥
कासयाचा बाध एकाच्या निरोपे । काय व्हावे कोपे जगाचिये ॥धृपद॥
अविद्येचा येथे कोठे परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥२॥
तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा । न सरती येरा खोटया परी ॥३॥
अर्थ
जगाला नीती शिकवावी, जो चुकत असेल त्याला फजित करावं याचंच आम्हाला कौतुक वाटतं, म्हणजे तेच श्रेयस्कर वाटतं. एकाच्या निरोपाने कशाची बाधा होणार आहे ? जगावर कशाला कोपावं ? जिथे रामकृष्ण नामाचे बाण आहेत तिथे अविद्येचा त्रास कसा असेल ? तुकाराम महाराज म्हणतात इथे खरं विकलं जातं, इथे खोटं चालणार नाही.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















