१९ फेब्रुवारी, दिवस ५० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा, ओवी ७६ ते १०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ५८९ ते ६००

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१९ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 19 feburvari

राम कृष्ण हरी आज दिनांक १९ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

76-5
जैसा का सर्वेश्वरु । पाहिजे तव निर्व्यापारु । परि तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ॥76॥
सूक्ष्म विचार केला, तर तो सर्वेश्वर वस्तुतः काहीच न करणारा आहे, परंतु मायेच्या उपधींचा आरोप त्यावर केला म्हणजे संपूर्ण त्रिभुवनाचा विस्तार तोच करतो, असे दिसून येते.
77-5
आणि कर्ता ऐसे म्हणिपे । तरी कवणे कर्मी न शिंपे । जे हातोपावो न लिंपे । उदासवृतीचा ॥77॥
सर्वेश्वरास त्रिभुवनाचा कर्ता म्हणावे, तर कोणत्याही कर्माने तो लिप्त होत नाही; कारण तो उदासीन असल्यामुळे त्याच्या हाता- पायास कशाचेही संसर्ग होत नाही.
78-5
योगनिद्रा तरी न मोडे । अकर्तेपणा सळु न पडे । परि महाभूतांचे दळवाडे । उभारी भले ॥78॥
त्याची स्वरूप स्थिती कधीच मोडत नाही, त्याच्या अकर्तेपणालाही कधीही विरोध निर्माण होत नाही, तरीपण तो पंचमहाभूतांचे समुदाय उत्तम प्रकारे निर्माण करतो.
79-5
जगाचा जीवी आहे । परि कवणाचा कही नोहे । जगचि हे होय जाये । तो शुद्धीहि नेणे ॥79॥
तो परमात्मा विश्वातील सर्व प्राणीमात्रांना व्यापून असतो; परंतु कधीही कोणाचीही आसक्ती धरत नाही. हे विश्व उत्पन्न होते आणि नाहीसे होते, याची त्याला वार्ताही नसते.

नादत्ते कस्यचित् पापं न चैव सकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥5. 15॥
भावार्थ :-

परमात्मा कोणाचेही पाप अथवा पुण्यही घेत नाही. परंतु अज्ञानाने ज्ञान झाकले गेलेले असते; त्यामुळे अज्ञानी जीव मोहित होत असतात.
80-5
पापपुण्ये अशेषे । पासीचि असतु न देखे । आणि साक्षीही होऊ न ठके । येरी गोठी कायसी ॥80॥
प्राणिमात्राकडून होणारी सर्व पाप – पुण्य ही सर्व त्याच्या जवळ असूनदेखील तो त्यांना जाणत नाही. ऐवढेच काय, तो त्यांच्या साक्षीदेखील होऊन राहत नाही, मग इतर गोष्टीबद्दल काय बोलावे ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


81-5
पै मूर्तीचेनि मेळे । तो मूर्तचि होऊनि खेळे । परि अमूर्तपण न मैळे । दादुलयाचे ॥81॥
तो परमात्मा देहाच्या संगतीने साकार होतो आणि अनेक प्रकारचा लिलाविलास करतो (सगुण स्वरूपाच्या संगतीने तो (देह धारण करून) सगुण होऊन क्रीडा करतो); परंतु त्या ईश्वराचा निराकारपणा थोडाही मलिन होत नाही.
82-5
तो सृजी पाळी संहारी । ऐसे बोलती जे चराचरी । ते अज्ञान गा अवधारी । पंडुकुमरा ॥82॥
हे अर्जुना ! तो परमात्मा जगाला उत्पन्न करतो आणि जगाचा नाश करतो. त्याच्या कर्तृत्वाविषयी जे बोलले जाते, ते केवळ अज्ञान होय, हे तू लक्षात ठेव.

ज्ञानेन न तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ॥5. 16॥
भावार्थ :-

ज्याचे ते अज्ञान परम्यात्म्याच्या (आत्मज्ञानाने) ज्ञानाने नष्ट झाले आहे, त्याचे ते ज्ञान त्या स्वतः सिद्ध सत्-चित्-आनंदघन परमात्म्याचा अनुभव घेऊ लागते.
83-5
ते अज्ञान जै समूळ तुटे । तै भ्रांतीचे मसैरे फिटे । मग अकर्तृत्व प्रगटे । ईश्वराचे ॥83॥
जेंव्हा ते अज्ञान पूर्णपणे नाहीसे होते, तेंव्हा विषभ्रमाची काजळी दूर होते. असे झाले, म्हणजे परमेश्वराचे अकर्तेपन स्पष्टपणे समजू लागते.
84-5
एथ ईश्वरु एकु अकर्ता । ऐसे मानले जरी चित्ता । तरी तोचि मी हे स्वभावता । आदीचि आहे ॥84॥
आता ईश्वर अकर्ता आहे, हे जर चित्ताला पटले, तर पूर्वीपासून स्वभावतः तो ईश्वर मीच आहे, असा अभेदाचा अनुभव येतो.
85-5
ऐसेनि विवेके उदो चित्ती । तयासी भेदु कैचा त्रिजगती । देखे आपुलिया प्रतीति । जगचि मुक्त ॥85॥
अशा विवेकाचा उदय ज्याच्या चित्तात होतो, त्याला त्रैलोक्यात भेद कसा बरे दिसू शकेल ? तो आपल्या अनुभवाने संपूर्ण जगच मुक्त आहे, असे पाहतो.


86-5
जैशी पूर्वदिशेच्या राउळी । उदयाचि सूर्ये दिवाळी । की येरीही दिशा तियेचि काळी । काळिमा नाही ॥86॥
ज्याप्रमाणे पूर्वदिशेच्या राऊळी सूर्य उदय पावताच प्रकाशाची दिवाळी सुरु होते आणि इतर दिशांतील अंधकारही नाहीसा होतो,

तद् बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः ।
गच्छन्त्यपुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥5. 17॥
भावार्थ :-

ज्याची बुद्धी परम्यातम्याशी ताद्रुप झाली आहे, मन तदाकार झाले आहे, त्या सत्-चित्-आनंदस्वरूप परम्यातम्याशी जे सदैव ऐक्यभावाने स्थित आहेत; आणि ज्ञानाने ज्याचे सर्व प्रकारचे दोष नाहीसे झाले आहेत, असे जे तत्परायन, त्यांना पुनः जन्म मरण प्राप्त होत नाही. ते मोक्षाला प्राप्त होतात.
87-5
बुद्धिनिश्चये आत्मज्ञान । ब्रह्मरुप भावी आपणा आपण । ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशी ॥87॥
ज्याच्या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञानासंबधी आहे आणि जे आपणास ब्रम्हरूप मानू लागतो, तसेच रात्रंदिवस ब्रम्हपरायन होऊन आपली ब्रम्हस्थिती पूर्णपणे राखतो,
88-5
ऐसे व्यापक ज्ञान भले । जयाचिया हृदयाते गिंवसित आले । तयांची समता दृष्टि बोले । विशेषू काई ॥88॥
असे सर्व व्यापक श्रेष्ठ ज्ञान ज्याच्या हृदयाचा शोध करीत आले आहे, त्याची सर्व विश्वासम्बधी समतादृष्टी शब्दाने विशेष काय वर्णन करावी ?
89-5
एक पापियाचा आपणपेचि पा जैसे । ते देखती विश्व तैसे । हे बोलणे कायसे । नवलु एथ ॥89॥
ते जसे आपणास ब्रम्हरूप मानतात, त्याचप्रमाणे विश्वदेखील ब्रम्हरूप आहे, असे जाणतात, हे येथे सांगण्यात मोठे नवल ते काय ?
90-5
परी दैव जैसे कवतिके । कहीचि दैन्य न देखे । का विवेकु हा नोळखे । भ्रांतीते जेवी ॥90॥
परंतु भाग्य जसे कौतुकानेदेखील दारिद्राकडे पाहत नाही, किंवा विवेक हा ज्याप्रमाणे भ्रांतीला जाणत नाही,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


91-5
नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नी । अमृत नायके कानी । मृत्युकथा ॥91॥
किंवा सूर्य जसा स्वप्नात देखील अंधकारचे स्वरूप पाहत नाही अथवा अमृताच्या कानावर कधी मृत्यूची वार्ताही येत नाही,
(अगदी तसेच ज्ञानी पुरुष त्रैलोक्यात कसलाही भेद जाणत नाही)
92-5
हे असो संतापु कैसा । चंद्रु न स्मरे जैसा । भूती भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ॥92॥
हे राहू दे; उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुष सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद पाहत नाही.

(येथे माऊली ने आपल्या सर्वाना समजावे म्हणून अजून एक दृष्टांत दिला आहे)
विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥5. 18॥
भावार्थ :-

आत्मज्ञानी पंडित विद्या व विनय यांनी युक्त असा ब्राम्हण, गाय, हत्ती, आणि चांडाल या सर्वाच्या ठिकाणी त्याची दृष्टी सारखीच असते
93-5
मग हा मशकु हा गजु । की हा श्वपचु हा द्विपु । पैल इतरु हा आत्मजु । हे उरेल के ॥93॥
मग त्याच्या ठिकाणी हे चिलट आहे आणि हा हत्ती, हा चांडाल आणि हा ब्राम्हण आहे, अथवा हा आपला मुलगा आणि हा परका, असा भेद त्यांच्या अंगी कसा बरे राहील. ? (अर्थात राहणार नाही)
94-5
ना तरी हे धेनु हे श्वान । एक गुरु एक हीन । हे असो कैचे स्वप्न । जागतया ॥94॥
किंवा ही गाय, हा कुत्रा अथवा हा एक थोर आणि हा नीच आहे, हे सगळे राहू दे. जागा असलेल्या माणसास स्वप्न कसे बरे पडणार.
(झोपेतून जागे झाल्यावर, अज्ञान / अहंकार दूर झाल्यावर)
95-5
एथ भेदु तरी की देखा । जरि अंहभावा उरला होआवा । तो आधीचि नाही आघवा । आता विषमु काई ॥95॥
आणि अंतः करणात अहंकार असेल, तर विश्वात अनेक प्रकारचे भेद दिसतात; परंतु तो अहंकारच नाहीसा झाला, तर भेदभाव कुठला. (कोणत्याच प्रकारचे भेद दिसणार नाही)

इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः ॥5. 19॥
भावार्थ :-

अशा सम दृष्टीमध्ये ज्याचे मन स्थिर झाले आहे, त्यांनी या लोकीच (इहलोकीच, वर्तमान अवस्थेत जीवनमुक्त झाले आहेत) संसाराला जिंकेले आहे. कारण सत्-चित्- आनंदस्वरूप परमात्मा निर्दोष व सम आहे; म्हणून ते परमात्म्यातच स्थित आहेत.
96-5
म्हणोनि सर्वत्र सदा सम । ते आपणचि अद्वय ब्रह्म । हे संपूर्ण जाणे वर्म । समदृष्टीचे ॥96॥
म्हणून सर्व ठिकाणी, सर्वकाळ सम असणारे ते अद्वय ब्रम्ह आपणच आहोत, हे समदृष्टीचे तत्व, ते तो सम्पूर्ण जाणतो.
97-5
जिही विषयसंगु न सांडिता । इंद्रियाते न दंडिता । परि भोगिली निसंगता । कामेविण ॥97॥
ज्यांनी विषयांचा समंध न सोडता, इंद्रियांचे दमन न करता, निरिच्छ असल्यामुळे अलिप्तता भोगली;
98-5
जिही लोकांचेनि आधारे । लौकिकेची व्यापारे । परि सांडिले निदसुरे । लौकिकु हे ॥98॥
जे लोकांना अनुसरून, लोक जे करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात; (उदरनिर्वाहासाठी लौकिक व्यवहार करतात)
परंतु सामान्य लोकांच्या मनात ब्राम्हविषयक जे अज्ञान असेल, त्याचा त्यांनी त्याग केलेला असतो.
99-5
जैसा जनामाजी खेचरु । असतुचि जना नोहे गोचरु । तैसा शरीरी परि संसारु । नोळखे तयाते ॥99॥
ज्याप्रमाणे पिशाच्य जगात वावरत असून जगाला दिसत नाहीत, त्याप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाहीत. (समदृष्टी असलेला आत्मज्ञानी व्यक्तीला)
100-5
हे असो पवनाचेनि मेळे । जैसे जळीचि जळ लोळे । ते आणिके म्हणती वेगळे । कल्लोळ हे ॥100॥
हे असू दे, वास्तविक पाहता वाऱ्यामुळे पाण्यावरच पाणी लाटरूपाने खेळत असते. परंतु सामान्य लोक या लाटा पाण्यापेक्षा वेगळ्या आहेत, असे म्हणतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ५० वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ५८९ ते ६००
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. 589
निर्गुणाचे घ्यावे गुणासी दर्शन । एका एकी भिन्न भेद घडे ॥१॥
तुम्हा आम्हा आता न पडे यावरी । आहो तेचि बरी जेथे तेथे ॥धृपद॥
आपणापासुनी नसावे अंतर । वेचिले उत्तर म्हणउनि ॥२॥
तुका म्हणे अंगा आली कठिणता । आमच्या अनंता तुम्हा ऐसी ॥३॥
अर्थ
निर्गुण असे तुझे रूप आहे. असे असता मी जेव्हा तुझे दर्शन घेऊ पाहतो तेव्हा त्यावेळी अद्वैत नाहीसे होते आणि व्दैत उत्पन्न होते. देवा आता यापुढे तुझ्या आणि माझे काही पटणार नाही कारण मला तू जसा आहेस तसाच आवडतोस. आपल्या पासून आम्ही वेगळे नसावे म्हणून आत्ता पर्यंत मी तुमची पुष्कळ विनवणी केली. तुकाराम महाराज म्हणतात पण तुम्ही मन कठोर केले आम्हाला वेगळे ठेवले मीही तुमच्या सारखे मन कठोर करतो.
अभंग क्र. 590
तुजचि पासाव जालोसे निर्माण । असावे ते भिन्न कासयाने ॥१॥
पाहावा जी ठायी करूनि विचार । न्यून कोठे फार असेचि ना ॥धृपद॥
ठेविलिये ठायी आज्ञेचे पाळण । करूनि जतन राहिलेसे ॥२॥
तुका म्हणे आता बोलतसे स्पष्ट । जालो क्रियानष्ट तुह्मा ऐसा ॥३॥
अर्थ
तुझ्याच पासून आम्हा सर्वाची उत्पत्ती झाली. तुम्हाला सोडून आम्ही वेगळे कसे राहू ? तुम्हीच याचा विचार आपल्या मनाशी करून पाहवा. माझ्यात आणि तुमच्यात काही कमी असे नाहीच. तुम्ही मला जशी आज्ञा केली आहे त्याप्रमाणे तुम्ही ठेवले आहे त्या ठिकाणी मी राहिलो आहे व तुमच्या आज्ञेचे पालन केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आता एकदम स्पष्ट बोलतो आम्ही देखील तुमच्या सारखेच क्रियानष्ट झालो आहोत.
अभंग क्र. 591
प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा । भक्तिरस सांगा का जी तुह्मी ॥१॥
न म्हणऊनि काही न ठेवीचि उरी । आलो वर्मावरी एकाएकी ॥धृपद॥
न देखोचि काही परती माघारी । उरली ते उरी नाही मुळी ॥२॥
तुका म्हणे आला अंतरासी खंड । तरि माझे तोंड खवळिले ॥३॥
अर्थ
अहो पांडुरंगा तुम्ही माझ्या भक्तिरसाचा प्रीतीचा भंग केला आहे की नाही ते तुम्ही सांगा ? म्हणूनच मी तुमच्या मोठे पणाचा पर्वा ठेवणार नाही. म्हणूनच आम्ही एकेकी वर्मावर आलो आहे. आता तुमची निंदा करताना मी मागे पुढे पाहणार नाही, कारण आता तुमचे व आमचे काहीच नाते उरले नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता अंतरासी अंतर म्हणजे तुमच्यात व आमच्यात अंतर पडले आहे त्यामुळे मी आता तोंड खवळीले आहे.
अभंग क्र. 592
लटिका देव म्हणता ऐसा । संदेहसा वाटतसे ॥१॥
ऐसे आले अनुभवा । मज ही सेवा करिता ॥धृपद॥
शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥२॥
तुका म्हणे ताळी नाही । एके ठायी चपळत्वे ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही लटिके (खोटा) आहात इतके म्हणण्या विषयी संदेह माझ्या मनात आला आहे. तुमची सेवा करणाच असे माझ्या अनुभवास आले आहे. देवा तुम्ही शून्य स्थित रहता हे खरे आहे पण मी त्याला भेंडाळा म्हणजे एक प्रकारची दुष्कीर्तीच मानतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या कोणत्याही क्रियेत कसलेही प्रकारचा ताळमेळ नसतो तुम्ही फार चपळ आहात एका ठिकाणी तुम्ही अजिबात स्थिर नाहीच.
अभंग क्र. 593
जैशासाठी तैसे व्हावे । हे बरवे कळलेसे ॥१॥
उदास तू नारायणा । मीही म्हणा तुम्हीच ॥धृपद॥
ठका महाठका जोडा । हे धडफुडा लागासी ॥२॥
एकागीच भांडे तुका । नाही धोका जीवित्वे ॥३॥
अर्थ
जशास तसे वागावे हे आम्हाला कळले आहे. हे नारायणा, तुम्ही सर्व गोष्टी पासून उदास आहे. तसा मी हि उदास आहे. तुमच्या बाबतीत हि मी उदास आहे. तुम्ही ठक आहत तर आम्ही महाठक आहोत. हा तुमचा आणि आमचा योग आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी देवाशी एकागीच भांडत आहे, मला जिवाचीही भीती नाही.
अभंग क्र. 594
बहुता रीती काकुलती । आलो चित्ती न धराच ॥१॥
आता काशासाठी देवा । मिथ्या हेवा वाढवू ॥धृपद॥
तुम्हा आम्हा जाली तुटी । आता भेटी चिंतने ॥२॥
तुका म्हणे लाजिरवाणे । अधीर जिणे इच्छेचे ॥३॥
अर्थ
देवा मी अनेक प्रकारे तुम्हाला काकुळतीला आलो परंतु तुम्ही माझ्याविषयी काही चित्तात विचारत धारण करत नाहीत. मी आता उगाच खोटी हाव कशाला वाढवू ? तुमच्या आमच्या मध्ये ताटातूट झाली आता केवळ तुम्हाला चिंतनाने भेटावे लागेल. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमची सगुण दर्शन घडावे अशी इच्छा जर मनात धरावी तर ते जगणे म्हणजे लाजिरवाणे आणि अधीर पणाचे आहे.
अभंग क्र. 595
आश्चर्य ते एक झाले । मना आले माझिया ॥१॥
मढयापाशी करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥धृपद॥
न यावा तो कैसा राग । खोटे मग देखोनि ॥२॥
तुका म्हणे कैचा बोला । शोधा विठ्ठला माझिया ॥३॥
अर्थ
देवा माझ्या मनात एक गोष्ट आली आणि त्याचे मला आश्चर्य वाटत आहे एखादा मानव प्रेता जवळ रडत बसतो व त्याला करुणा भाकतो परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही अगदी त्याप्रमाणे आम्ही तुला प्रार्थना करतो ती हि व्यर्थ आहे. एखाद्याचे खोटे कृत्य पाहिल्यावर राग का येऊ नये तुम्ही खोटे पणाने वागला म्हणून मला तुमचा राग येतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घे विठ्ठला आता काय शोधत बसला आहात.
अभंग क्र. 596
मागायाची नाही इच्छा । जो मी ऐसा संकोचु ॥१॥
लटिकियाची न करू स्तुति । इच्छा चित्ती धरूनि ॥धृपद॥
हिशोबे ते आले घ्यावे । ते तो ठावे सकळांसी ॥२॥
तुका म्हणे स्वामिसेवा । येथे देवा काशाची ॥३॥
अर्थ
अहो मला जर देवाला काही मागायचे नाही तर मग मी देवाजवळ संकोच धरण्याचे काय कारण आहे ? कोणत्याही प्रकारची इच्छा मनात धरून मी खोट्याची स्तुती करणार नाही. जे काही हिशोबाने मिळते ते घेणे हे सर्वाना समजते. तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्ही दर्शनच देणार नसाल तर तुमची भक्ती का करायची ?
अभंग क्र. 597
पावटणी पडणे पाया । उद्धार वाया काशाचा ॥१॥
घडले ते भेटीसवे । दिसेल बरवे सकळा हे ॥धृपद॥
न घडता दृष्टादृष्टी । काय गोष्टी कोरड्या ॥२॥
अबोल्याने असे तुका । अंतर ऐका साक्षी ते ॥३॥
अर्थ
देवा अरे आम्ही तुझ्या पायरीच्या देखील पाया पडतो तेही अगदी भक्तिभावाने परंतु तरीदेखील तुझ्या मनात आमच्या विषयी काही प्रेम उत्पन्न होत नसेल तर तुमचा उद्धार करशील कसा ? साक्षात भेटीत जे घडेल तेच खरे आणि सर्वानांच बरे दिसते. जर एखाद्या गोष्टीची प्रत्यक्ष भेट झाली नाही तर त्याविषयी नुसतेच फोर्ट गप्पा मारून काय उपयोग आहे. तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच मी न बोलता अबोल्याने राहतो, माझे अंतकरण साक्षीला ठेवतो.
अभंग क्र. 598
अभयाचे स्थळ । ते हे एक अचळ ॥१॥
तरि धरिला विश्वास । ठेलो होउनिया दास ॥धृपद॥
पुरली आवडी । पायी लागलीसे गोडी ॥२॥
तुका म्हणे कंठी नाम । अंगी भरले सप्रेम ॥३॥
अर्थ
अभया चे स्थळ व जेथे काही भिण्याचे कारण नाही असे आणि अचल केवळ हरीचे चरण आहे. त्यामुळेच मी हरिचरणावर विश्वास धरला आहे आणि त्यांचा दास होऊन राहिलो आहे. त्यामुळे माझे सर्व आवड पूर्ण झाली व याच कारणामुळे हरीच्या पायाची मला आवड लागली. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या कंठामध्ये केवळ हरीचे नाम आहे आणि त्यामुळेच माझ्या संपू
अभंग क्र. 599
संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाही ॥१॥
आता नको मज खोटयाने फटवू । कोठे येऊ जाऊ वेळोवेळा ॥धृपद॥
गेला तरि काय जीवाचे साकडे । वाचउनि पुढे काय काज ॥२॥
तुका म्हणे कशी निवडा जी बरे । केली तैसी पोरे आळी पायी ॥३॥
अर्थ
संदेहच जर राहिला नाही तर खरी गोडी राहील. जे बेचव आहे ते कोणाला आवडत नाही, देवा आता मला खोट्या गोष्टीने तुम्ही विनाकारण फसवू नका मी वेळा कोठे येजा करत असून ? तुमच्या वाचून मी पुढे मी काय करू, म्हणून माझा जीव गेला तरी त्याचे काही मला वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा तुमच्या लेकराने, पोराने तुमच्या चरणाच्या दर्शनाची इच्छा केली आहे तर मग ही इच्छा बरोबर आहे कि नाही याची परीक्षा तरी तुम्ही घ्यावे.
अभंग क्र. 600
वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक ॥१॥
आम्ही ऐसे कैसे राहावे निश्चळ । पाठिलाग काळ जिंकितसे ॥धृपद॥
वाढविता पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥२॥
तुका म्हणे बरे जागविता मना । तुमच्या नारायणा अभय करे ॥३॥
अर्थ
या त्रैलोकांमध्ये लोक जसे बोलतात तसे वागत नाही परंतु बोलण्यासारखे कर्तुत्व हे अनुभवाला येणे दुर्लभच आहे लोक दुसऱ्या पाहून वागत आहेत असेच मला दिसते आहे. पणदेवा आम्ही स्तब्ध राहून निश्चल राहून कसे चालेल कारण काळ आम्हाला आमचा पाठलाग करून आम्हाला जिंकीत आहे. दांभिक परमार्थाचा पोट भरण्यासाठी वाढविलेला पसारा मुळे मुद्दलात तोटा मात्र नक्की होईलच. तुकाराम महाराज म्हणतात देवा काळ माझा पाठलाग करत आहे आणि माझे मन स्थिर राहत नाही त्यामुळे तुम्ही जर माझ्या मस्तकावर तुमचा अभ्यस्त ठेवून माझ्या मनाला शांत केले तर बरे होईल

फेब्रुवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading