आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१४ फेब्रुवारी, दिवस ४५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था, ओवी १७६ ते २०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ५२९ ते ५४०
“१४ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 14 feburvari
राम कृष्ण हरी आज दिनांक १४ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
176-4
सांगे भुवनत्रयाची काजळी । जे गगनामाजि उधवली । तिये प्रळयीचे वाहुटळी । काय अभ्र पुरे ॥176॥
प्रलकाळची वावटळ ही त्रैलोक्याची राख आकाशात उडवून देणारी असते. तिच्यापुढे अभ्र काय बरे टिकणार, तूच सांग ?
177-4
की पवनाचेनि कोपे । पाणियेचि जो पळिपे । तो प्रळयानळु दडपे । तृणे काष्ठे काइ ॥177॥
अथवा वाऱ्याच्या क्षोभाने जो प्रलयकाळचा अग्नी केवळ पाण्यानेच पेटतो (पाणीसुद्धा जाळू टाकतो) तो अग्नी, गवत आणि काष्ठे यांनी दडपला जाईल काय ?
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत् स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥4. 38॥
भावार्थ :-
या जगामध्ये परमात्मज्ञानानासारखे पवित्र दुसरे काही नाही. ते ज्ञान कर्मयोगी योग्य काळाने स्वतःच्या ठिकाणी स्वतःच मिळवितो.
178-4
म्हणोनि असे हे न घडे । ते विचारिताचि असंगडे । पुढती ज्ञानाचेनि पाडे । पवित्र न दिसे ॥178॥
असो, हे बोलणे पुरे ! ज्ञानाने दोष नाहीसे होतात अथवा नाहीसे होत नाहीत, हा प्रश्नच निर्माण होत नाही. ज्ञानाचा जो जो विचार करावा, तो तो असे दिसून येते की, ज्ञानाच्या योग्यतेची परमपवित्र वस्तू दुसरी कोणतीही नाही.
179-4
एथ ज्ञान हे उत्तम होये । आणिकही एक तैसे के आहे । जैसे चैतन्य का नोहे । दुसरे गा ॥179॥
या जगात ज्ञान हे उत्तम आहे, अरे, ज्याप्रमाणे दुसरे चैत्यन्य नाही, त्याप्रमाणे (ज्ञानाशिवय जगात) उत्तम दुसरे कोठे आहे ?
180-4
या महातेजाचेनि कसे । जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे । का गिंवसिले गिंवसे । आकाश हे ॥180॥
सूर्याच्या कसोटीला लावून पाहता, त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे दिसून येईल किंवा आकाशाला आपल्या कवळ्यात कवटाळता येऊ शकेल;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-4
ना तरी पृथ्वीचेनि पाडे । काटाळे जरी जोडे । तरी उपमा ज्ञानी घडे । पंडुकुमरा ॥181॥
अथवा, योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जर काही मिळेल. तरच अर्जुना, ज्ञानाला उपमा सापडेल.
182-4
म्हणूनी बहुती परी पाहता । पुढतपुढती निर्धारिता । हे ज्ञानाची पवित्रता । ज्ञानीचि आथि ॥182॥
म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला असता ज्ञानाची पवित्रता ही ज्ञानाच्या ठिकाणीच आहे, हे सिद्ध होते.
183-4
जरी अमृताचि चवी निवडिजे । तरी अमृतासारखी म्हणिजे । तैसे ज्ञान हे उपमिजे । ज्ञानेसीचि ॥183॥
अमृताची चव ही इतर रसाहून निवडून पहिली असता ती अमृतासारखीच आहे, असे म्हणावे लागते, त्याप्रमाणे ज्ञानाला ज्ञानानीच उपमा देणे भाग पडते.
184-4
आता यावरि जे बोलणे । ते वाया वेळु फेडणे । तव साचचि जी हे पार्थु म्हणे । जे बोलत असा ॥184॥
आता यापेक्षा ज्ञानाचे अधिक महत्व सांगणे म्हणजे व्यर्थ वेळ घालविणे होय, यावर अर्जुन म्हणाला महाराज (हे कृष्ण), आपण जे बोलत आहात ते खरेच आहे;
185-4
परि तेचि ज्ञान केवी जाणावे । ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे । जाणितले ॥185॥
पण तेच ज्ञान कसे जाणून घ्यावे ? असे अर्जुन विचारणार होता आणि त्याचे मनोगत देवाने जाणले.
186-4
मग म्हणतसे किरीटी । आता चित्त देयी गोठी । सांगेन ज्ञानाचिये भेटी । उपाय तुज ॥186॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आता मी सांगतो त्यागोष्टीकडे चित्त दे. ज्ञानप्राप्तीचा उपाय मी तुला आता सांगणार आहे.
श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥4. 39॥
भावार्थ :-
श्रद्धावान इंद्रिय जिंकलेल्या, ज्ञानसाधनात तत्पर असलेल्या पुरुषाला ज्ञान प्राप्त होते आणि त्या वेळी त्याला भगवत-प्राप्तीरूप परम शांती लाभते.
187-4
तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो का सकळ विषया । जया ठायी इंद्रिया । मानु नाही ॥187॥
एकदा का आत्मसुखाची अमृतधुर गोडी निर्माण झाली, की मन सर्व इंद्रिया संबंधीविटून जाते आणि इंदर्यांचे महत्व राहत नाही.
188-4
जो मनाचि चाड न सांगे । जो प्रकृतीचे केले नेघे । जो श्रद्धेचेनि संभोगे । सुखिया जाहला ॥188॥
जो मनातील इच्छा इंद्रियांना सांगत नाही, प्रकृतीने केलेल्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही, ज्याचे हृदय श्रद्धेने भरून गेलेले असते, तो सुखी झालेला असतो.
189-4
तयातेचि गिंवसित । हेहे ज्ञान पावे निश्चित । जयामाजि अचुंबित । शांति असे ॥189॥
ज्या ज्ञानात अखंड शांती असते, ते ज्ञान त्याला शोधीत येऊन निश्चित प्राप्ती होत असते.
190-4
ते हृदयी प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे । मग विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ॥190॥
ते ज्ञान हृदयात स्थिर होते आणि त्यापासून शांतीचा अंकुर उमलू लागतो. मग आत्मज्ञानाची वेल मोठया प्रमाणात प्रगट होऊ लागते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-4
मग जेऊति वास पाहिजे । तेऊति शांतीचि देखिजे । तेथ अपारा पारु नेणिजे । निर्धारिता ॥191॥
मग जिकडे पाहावे तिकडे परमशांतीच दिसू लागते, आप-पर भाव संपून जातो आणि विचारकरून देखील शांतीची पैलतीरे समजू शकत नाहीत.
192-4
ऐसा हा उत्तरोत्तरु । ज्ञानबीजाचा विस्तारु । सांगता असे अपारु । परि असो आता ॥192॥
असा हा उत्तरोत्तर वाढत राहणारा ज्ञानबीजाचा विस्तार आहे. त्याचे वर्णन करू लागलो, तर तो अपार आहे. परंतु हे सांगणे आता पुरे.
अज्ञाश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥4. 40॥
भावार्थ :-
आत्मज्ञान प्राप्त न झालेला अज्ञानी, श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य नाश पावतो. त्याला इहलोक साधत नाही आणि परलोकही मिळत नाही, तसेच, त्याला आत्मसुखाची प्राप्तीही लाभत नाही.
193 -4
ऐके जया प्राणियाचा ठायी । इया ज्ञानाची आवडी नाही । तयाचे जियाले म्हणो काई । वरी मरण चांग ॥193॥
हे बघ, ज्यप्राण्याच्या अंतःकरणात अध्यात्माची आवड नाही, त्याच्या जिवंत राहण्यात तरी काय अर्थ आहे ? (त्याच्या जगण्याला काय म्हणावे) ?, त्यापेक्षा मरण बरे.
194-4
शून्य जैसे गृह । का चैतन्येवीण देह । तैसे जीवित ते संमोह । ज्ञानहीना ॥194॥
एखादे सामसूम घर किंवा प्राणावाचून जसे शरीर, त्याप्रमाणे आत्मज्ञान नसलेल्या माणसाचे जीवन भ्रममय असते.
195-4
अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परी ते चाड एकी जरी वाहे । तरी तेथ जिव्हाळा काही आहे । प्राप्तीचा पै ॥195॥
आत्मज्ञानाची प्राप्ती झाली नसली, तरीपण त्या ज्ञानाची मनात इच्छा निर्माण झाली, तरी ते ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते.
196-4
वाचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परी ते आस्थाही न धरी मानसी । तरी तो संशयरूप हुताशी । पडिला जाण ॥196॥
उलट ज्ञानाची गोष्ट कशाला करायची ? जो मनुष्य आत्मज्ञानाची इच्छादेखील बाळगत नाही, तो संशयरुपी अग्नी मध्ये पडला, असे समज.
197-4
जे अमृतही परि नावडे । ऐसे सावियाचि आरोचकु जै पडे । तै मरण आले आले असे फुडे । जाणो ये की ॥197॥
एखाद्या रोग्याला अमृतही आवडत नाही, अशी अवस्था ज्यावेळी निर्माण होते, त्यावेळी त्याला निश्चित मरण आले आहे, असे समजावे.
198-4
तैसा विषयसुखे रंजे । जो ज्ञानसीचि माजे । तो संशये अंगीकारिजे । एथ भ्रांति नाही ॥198॥
त्याप्रमाणे जो विषयसुखात रंगून गेलेला असतो, ऐहिक ज्ञानाने जो उन्मत्त असतो, तो संशयाच्या चक्रात सापडला जातो, यात शंका नाही.
199-4
मग संशयी जरी पडला । तरी निभ्रांत जरी नासला । ति ऐहिकपरत्रा मुकला । सुखासी गा ॥199॥
अशा प्रकारे जो संशयाच्या चक्रात गुंतून गेला, त्याच्या जीवनाचा निश्चितपणे घात झाला, असे समजावे. त्याला ऐहिक व परलौकिक सुखे प्राप्त होत नाहीत.
200-4
जया काळज्वरु आंगी बाणे । तो शीतोष्णे जैशी नेणे । आगी आणि चांदिणे । सरिसेचि मानी ॥200॥
ज्या माणसाला विषमज्वर झालेला असतो, त्याला शीत – उष्ण यातील फरक कळत नाही, तो अग्नी आणि चांदणे समान मानतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ४५ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ५२९ ते ५४०
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 529
गावे म्हणउनि गीत । धरुनि राहे तैसे चित्त ॥१॥
हेचि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥धृपद॥
ऐकावी ह्मूण कथा । राहे तैसे धरुनि चित्ता ॥२॥
तुका म्हणे धणी । नव्हे जेविल्यावाचुनि ॥३॥
अर्थ
आपण हरीचे गुणगान गातो, ते स्वरूप चित्तात धरून ठेवावे. त्याच्या अर्थाकडे लक्ष द्यावे. पण हेच काम फार कठीण आहे. नुसते अन्न पाहून माणसाची भूक कधी भागेल काय ? हरीची कथा श्रवण केल्यावर ती हृदयपटलावर तशीच कोरून ठेवायची आहे, हे लक्षात घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात प्रत्येक्ष भोजन केल्या शिवाय तृप्ती होत नाहि, त्याप्रमाणे अंतःकरणापासून हरीचे नाम घेतल्याशिवाय खरे समाधान लागत नाही.
अभंग क्र. 530
कळेल हे खुण । तरि दावी नारायण ॥१॥
सत्य संतांपाशी राहे । येरा भय आड आहे ॥धृपद॥
अणुचिया ऐसे । असे भरले प्रकाशे ॥२॥
इंद्रियांचे धनी । ते हे जाती समजूनि ॥३॥
तर्क कुतर्क वाटा । नागवण घटापटा ॥४॥
तुका म्हणे ल्यावे । डोळा अंजन बरवे ॥५॥
अर्थ
ज्यावेळेला नारायण आपल्यावर कृपा करेल, त्यावेळी जीवनाचे खरे मर्म कळू शकेल. संतांच्या चरणकमलाजवळ खरे सत्य असते. आणि ते इतर लोक भय बाळगून असतात. या भगवंताचे स्वरूप अणु एवढे असून त्यात सर्वत्र दिव्य प्रकाश भरू राहिला आहे. जो इंद्रियांवरती ताबा ठेवतो त्याला जीवनाचे हे वर्म योग्य प्रकारे कळते. जे अनेक प्रकारचे तर्क, वितर्क करतात आणि घटपटादिकांची व्यर्थ चर्चा करतात. त्यांना खऱ्या परमार्थाची ओळख होत नाही त्याची हानी होते. तुकाराम महाराज म्हणतात डोळ्यांमध्ये विवेकाचे अंजन योग्य प्रकारे घालावे. म्हणजे सर्वत्र सम प्रमाणात भरलेल्या भगवंताचे दर्शन होते.
अभंग क्र. 531
जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥१॥
कैसा जालासे बेशरम । लाज नाही न म्हणे राम ॥धृपद॥
पाहे वैरियाकडे । डोळे वासुनिया रडे ॥२॥
बांधुनिया यमा हाती । दिला नाही त्याची खंती ॥३॥
नाही यापे काम । ऐसे जाणे तो अधम ॥४॥
अझुन तरि मुका । का रे जालासि म्हणे तुका ॥५॥
अर्थ
एकदा कि माणसाचा जीव गेला की, तो परत येत नाही. तरी देखील मृत्युच्या मार्गाला लागलेला करंटा मनुष्य आपल्या मालमत्येची सोय कशी करावी, इकडे लक्ष देत असतो. आपल्या पश्चात संपत्तीची व्यवस्था कशी करावि, हे पत्नी, मुलांना समजू सांगत असतो. त्या मृत्यु पंथाला लागलेला मनुष्य निर्लज्ज पणामुळे शेवटी देखील राम नामाचा उच्चार कर नाही. हा आपल्या शत्रूंकडे डोळे वटारून पाहतो आणि प्रेमी जणाकडे पाहून आश्रू ढळत असतो. सर्व नातेवाईकांनी त्याला यमाच्या हाती दिले, तरी त्याला काही खेद नसतो. जो अंत काळी देखील प्रेमाने प्रभूचे नामस्मरण करत नाही तो अधम आहे असे जाणावे. तुकाराम महाराज म्हणतात मृत्यूजवळ आला तरी देखील आजून का बरे मुका राहिला आहेस ? प्रभूचे अमृतमधुर नाम का बरे घेत नाहीस ?
अभंग क्र. 532
वाटा घेई लवकरि । मागे अंतरसी दुरी । केली भरोवरी । सार नेती आणीक ॥१॥
ऐसी भांबावली किती । काय जाणो नेणो किती । समय नेणती । माथा भार वाहोनि ॥धृपद॥
नाही सरले तोवरी । धाव घेई वेग करी । घेतले पदरी । फावले ते आपुले ॥२॥
फट लडी म्हणे तुका । एक न साहावे धका । तरि च या सुखा । मग कैसा पावसी ॥३॥
अर्थ
परमार्थाचा मार्ग तू निट समजून घे. त्या मार्ग वरून चालत राहा, नाही तर देवाला अंतरशील. सारी खटपट तू करणार आणि त्याचे श्रेय दुसरे घेवून जाणार. असे होऊ देऊ नकोस. अशा प्रपंच्याच्या भ्रमात किती जन भांबावले, हे काही कळत नाही. प्रपंचाचा भार डोक्यावर घेवून जगत असतात. जीवनाचा सदउपयोग करीत नाही. जो पर्यंत आयुष्य संपलेले नाही, तोपर्यंत त्वरेने धाव घेउन आपणास जे काही संतान कडून प्राप्त होईल ते पदरात घे आणि त्यातच खरे हित आहे. तुकाराम महाराज म्हणतात अरे अज्ञानी मानवा तुला विवेक वैराग्याचा एक धक्का सहन होत नाही तर मग, हरी प्रेमातून मिळणारे शाश्वत प्रेम सुख तुला कसे बरे प्राप्त होईल ?
अभंग क्र. 533
चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया । ऐकिल्या वाया वारता त्या ॥१॥
ऐका जी वोजे पडतसे पाया । भावचि ते जाया वाट नव्हे ॥धृपद॥
व्याली कुमारीचा अनुभवे अनुभव । सांगता तो भाव येत नाही ॥२॥
तुका म्हणे येथे पाहिजे आराले । बिंबी निवळले तरि भासे ॥३॥
अर्थ
अशा मार्गाने जावा की, तो मार्ग आपणास जेथे पोहचावयाचे आहे, तेथे बरोबर घेवून जातो. एकदा कि आपण तेथे पोहचलो, कि मग पूर्वीच्या ऐकलेल्या वाट व्यर्थ होतात. ॥१॥ मी पाया पडून तुम्हाला सांगत आहे, ते एकाग्रतेने श्रवण करा. परमेश्वरा जवळ जाण्यासाठी अंतःकरणात शुद्ध, निस्वार्थ प्रेम हेच महत्वाचे आहे. प्रसुतीच्या वेदना बाळंतबाईस माहित असतात. त्या कुमारीकेस सांगता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ईश्वराचा अनुभव येण्यासाठी हृदय शुद्ध झाले पाहिजे सूर्या समोर ढग आले कि सूर्य दिसत नाही, त्या प्रमाणे अंतरंगात संकल्प विकल्प निर्माण झाले, तर आत्म सूर्य दिसत नाही. सर्व प्प्रकाचा शंका नाहीसाया झाल्या कि, स्वच्छ स्वरुपात आत्म सूर्य पूर्ण प्रकाशाने दिसू लागतो.
अभंग क्र. 534
काय नाही लवत झाडे । विसरे वेडे देहभाव ॥१॥
जया न फळे उपदेश । धस ऐसे त्या नांव ॥धृपद॥
काय नाही असत जड । दगड तो अबोलणा ॥२॥
तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणा डेंग हा ॥३॥
अर्थ
वारा आल्या नंतर झाड लवत नाही का ? नास्तिक लोकांचे नम्र होणे हे एक प्रकारचे सोंगच आहे व तोच मनुष्य जर म्हणला की मी समाधी अवस्थेम देहाला विसरतो तर ते मला न पटण्या सरखेच आहे, वेडा मनुष्य देहभाव विसरत नाही काय. ज्या कोणाला परमार्थाचा उपदेश रूचत नाही, त्या व्यक्तीला अविचारी, अज्ञानी असे म्हणतात. दगड बोलत नाही कारण तो जड असतो. तुकाराम महाराज म्हणतात टणक दान शिजत नाही, अज्ञानी माणूस परमार्थाच्या बाबतीती तो अज्ञानी तसाच असतो.
अभंग क्र. 535
देखीचा दिमाख शिंकोनिया दावी । हिऱ्या ऐसी केवी गारगोटी ॥१॥
मर्यादा ते जाणे अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूर्ती ॥धृपद॥
काय पडिलासे लटिक्याचे भरी । वोवाळुनि थोरी परती सांडी ॥२॥
तुका म्हणे पुढे दिसतसे घात । करितो फजित म्हणउनी ॥३॥
अर्थ
दुसर्याचे पाहून शिकुन आपण मोठे पणा दाखविला, तर तो काही खरा नव्हे. गारगोट्या हिऱ्यासारख्याकशा होतील ? महाराज म्हणतात हे अभागी माणसा, आपणच सर्वश्रेष्ठ आहोत हे समजणे योग्य नाहि, कारण सर्वा मध्ये एकच चैतन्य मूर्ती आहे हे तू जाणून घे. खोट्या मोठ्यापाण च्या भरीला काय पडलास ? हा मोठे पाणाचा गर्व तू दूर कर. तुकाराम महाराज म्हणतात पुढे तुझा घात होणार आहे हे मनला माहित आहे, म्हणून मी तुझी निंदा करून मी तुला परमार्थाचा मार्ग दाखवीत आहे.
अभंग क्र. 536
संसाराचा माथा भार । काही पर न ठेवी ॥१॥
भक्तीची ते जाती ऐसी । सर्वस्वासी मुकावे ॥धृपद॥
भिक्षा आणि वेवसाव । काला करितो गाढव ॥२॥
करुनि वस्ती बाजारी । म्हणवी कासया निस्पृही ॥३॥
प्रसादा आडुनि कवी । केले तुप पाणी तेवी ॥४॥
तुका म्हणे होई सुर । किंवा निसुर मजुर ॥५॥
अर्थ
कोणताही मनुष्य असो तो असेपर्यंतच संसाराचा भार आपल्या माथ्यावर घेत आसतो तो बाजूला ठेवत नाही. आणि भक्तीची जाती तर अशी आहे की तिच्यासाठी सर्वकाही मुकावे लागते. भिक्षा आणि व्यवसाय हे दोन्ही वेगवेगळे आहेत आणि जो कोणी या दोघाचा काला करेल तो गाढवच आहे असे समजावे. स्वतःच्या फायद्याकरता भर बाजारात वस्ती करुन राहतो आणि मग मी निस्पृह आहे असा टेंभा का मिरवतोस ? एखाद्या प्रासादिक कवीच्या कवितेतील शब्द चोरून आपल्या कवितेमध्ये टाकतो आणि नंतर मी कवित्व केले असे सांगतो खरे तर तो कवी तूप आणि पाणी एकत्र करावेत असे करतो. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळेच तर तू एकदा शूर शिपाई तरी हो किंवा एखादा कष्टाळू मजूर तरी हो.
अभंग क्र. 537
तेज्या इशारती । तट्टा फोकावरी घेती ॥१॥
काय सांगावे त्याहूनी । ऐका रे धरा मनी ॥धृपद॥
नव्हे भांडखोर । धरू ओढूनि पदर ॥२॥
तुका म्हणे तोंड । काळे करा खाली मुंड ॥३॥
अर्थ
जे जातीवंत घोडे असतात त्यांना मालकाने नुसता इशारा जरी केला तरी ते धावत सुटतात. पण जे तट्टू असतात त्यांना कितीही मारले तरी ते जागचा हलतही नाहीत. पण तुम्हाला काय सांगू तुम्ही तर त्या तट्टू तो पेक्षा हि अगदी खालच्या पातळीचे आहात अहो मी तुम्हाला जे काही सांगत आहे तुमच्या हिताकरिता च सांगत आहे मी जे काही सांगेन ते तुम्ही तुमच्या मनी धरा. अरे मी काही बंडखोर नाही की तुमचा पदर धरवा आणि तुमच्याशी भांडत राहावे. तुकाराम महाराज म्हणतात आणि तुम्हाला जर माझे ऐकायचे नसेलच तर मग तोंड खाली करुन इथून चालते व्हा तुमचे तोंड काळे करा.
अभंग क्र. 538
मागे संती होते जे जे सांगितले । ते येऊ लागले अनुभवा ॥१॥
आचारभ्रष्ट होती लोक कली । पुण्य क्षीण बळी जाले पाप ॥धृपद॥
वर्णधर्म कोण न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायी ॥२॥
वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयी भांड ॥३॥
तुका म्हणे किती करावे फजित । तेचि छंद नित्य बहु होती ॥४॥
अर्थ
मागे संतानी जे जे काही सांगितले आहे, ते आता प्रत्येक्ष अनुभवला येऊ लागले. कलियुगात लोक सदाचारी न बनता दुराचारी बनतील. पुण्य कमी होऊन पाप वाढत जाईल. चांगल्या वाईटाचा कोणी विचार करणार नाही. सर्वजण एकत्र येऊन दुराचारी बनतील. एका ठिकाणी मिळून सर्व गोंधळ घालतील. वेद पठण करणारे मद्य पदार्थांचे सेवन करतील. चांगला वाईट विचार न करता भांडतील. तुकाराम महाराज म्हणतात त्यांची किती जरी फजिती केली, तरी त्यांचे दुराचारी छंद नित्याने वाढत जातील.
अभंग क्र. 539
अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणे तो ॥१॥
अवघियाचा तळ धरी । जीवा उरी नुरवुनी ॥धृपद॥
फळले ते लवे भारे । पिक खरे आले तई ॥२॥
तुका म्हणे हा गे देव । पुढे भाव सारावा ॥३॥
अर्थ
मी वेद अक्षरांचे पाठांतर करून श्रम केले, म्हणून मला आता त्याचे चांगले फळ मिळत आहे. ”मी” म्हणजे शरीराचा भवाच उरला नाही. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी मी अत्यंत विनम्र झालो आहे. वृक्षाला ज्यादा फळे आली, की तो खाली वाकतो म्हणजे नम्र होतो. त्यावरून त्याला पुष्कळ फळे आली आहेत, असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या पुढेही आपण असाच नम्र भाव अर्पण करावा.
अभंग क्र. 540
उचित जाणावे मुख्य धर्म आधी । चित्तशुद्ध बुद्धी ठायी स्थिर ॥१॥
न घालावी धाव मनाचिये ओढी । वचनी आवडी संताचिये ॥२॥
अंतरी या राहे वचनाचा विश्वास । न लगे उपदेश तुका म्हणे ॥
अर्थ
आपण आपले चित्त शुध्द करावे. बुद्धी परमेश्वराच्या चरणकामालांशी स्थिर करावी. हे धर्माचे वर्म योग्य प्रकारे जाणून घ्यावे. केवळ मनाच्या ओढीने धावत सुटू नये. संतांच्या वाचनाचा आवडीने अभ्यास करावा. तुकाराम महाराज म्हणतात संताचा विश्वास हृदयात स्थिर झाला, की मग त्याला वेगळा उपदेश करावा लागणार नाही.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















