२३ फेब्रुवारी, दिवस ५४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी १ ते २५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ६३७ ते ६४८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२३ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 23 feburvari

राम कृष्ण हरी आज दिनांक २३ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

सार्थ श्रीज्ञानेश्वरी
॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥
। अथ षष्ठोऽध्यायः – अध्याय सहावा॥

आत्मसंयमयोग: ।



अध्याय सहावा
1-6
मग रायाते म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो । कृष्ण सागंती जो । योगरुप ॥1॥
मग संजय राजा धृतराष्ट्रस म्हणाला, जो अष्टांगयोगासंबंधी जो योगरूप अभिप्राय भगवान श्रीकृष्ण सांगणार आहेत, तो आता श्रवण करा.
2-6
सहजे ब्रह्मरसाचे पारणे । केले अर्जुनालागी नारायणे । की तेचि अवसरी पाहुणे । पातलो आम्ही ॥2॥
श्रीकृष्णांनी, नारायनांनी अर्जुनाकरिता भोजनाचा उत्तम प्रसंग सहज केला होता जणू ब्रम्हरसांचे पारणे केले होते, त्याचवेळी आम्ही पाहुणे म्हणून गेलो होतो.
3-6
कैसी दैवाची थोरी नेणिजे । जैसे तान्हेलिया तोय सेविजे । की तेचि चवी करुनि पाहिजे । तव अमृत आहे ॥3॥
खरोखर दैव किती थोर आहे, हे कळत नाही. तहान लागलेल्या माणसाने पाणी पिण्यास घ्यावे आणि त्याची चव घेताच ते पाणी नसून अमृत आहे, असे कळावे.
4-6
तैसे आम्हा तुम्हा जाहले । जे आडमुठी तत्व फावले । तव धृतराष्ट्रे म्हणितले । हे न पुसो तूते ॥4॥
तसे आम्हाला आणि तुम्हाला झाले आहे. मिळण्याचा काही संबंध नसताना ब्रम्हज्ञान आपणास प्राप्त झाले. त्यावेळी धृतराष्ट म्हणाला, ” या ब्रम्हज्ञाना संबधी मी काही विचारले नाही. तर मग तू का बरे सांगतोस ?
(येथे मी पण आला आहे, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, असो)
5-6
तया संजया येणे बोले । रायाचे हृदय चोजवले । जे अवसरी आहे घेतले । कुमारांचिया ॥5॥
या बोलण्यामुळे धृतराष्ट्राचे अंतःकरणं कसे आहे, हे संजयला कळून आले. धृतराष्ट्र आपल्या पुत्रांची हकीकत ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. (मुलांविषयीच्या स्नेहाने धृतराष्ट्राचे मन या वेळी घेरलेले त्याच्या लक्षात आले) हे त्याला कळाले.


6-6
हे जाणोनि मनी हांसिला । म्हणे म्हातारा मोहे नाशिला । एऱ्हवी बोलु तरी भला जाहला । अवसरी ये ॥6॥
हे लक्षात येताच संजय मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, हे वयोवृद्ध धृदत्तराष्ट्र मोहामुळे कामातून गेला आहे. एरवी विचार करून पहिले, तर श्रीकृष्णांनी सांगितलेले विचार अतिशय चांगले आहेत.
7-6
परि तै तैसे कैसेनि होईल । जात्यंधा कैसे पाहेल । तेवीचि येरु से घेईल । म्हणौनि बिहे ॥7॥
परंतु या सुखसंवादाची गोडी याला कशी लागणार ? कारण तो जन्मापासूनच आंधळा आहे, त्याला कसे उजाडेल ? ही गोष्ट जर धृतराष्ट्रस तशी उघड सांगितली तर तो मनामध्ये द्वेष धरील, म्हणून संजय स्पष्ट बोलायला घाबरला.
8-6
परि आपण चित्ती आपुला । निकियापरि संतोषला । जे तो संवादु फावला । कृष्णार्जुनांचा ॥8॥
परंतु संजय मात्र आपल्याला श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवाद अनायासे प्राप्त झाला म्हणून अतिशय संतुष्ट झाला.
9-6
तेणे आनंदाचेनि धालेपणे । साभिप्राय अंतःकरणे । आता आदरेसी बोलणे । घडेल तया ॥9॥
त्या अलौकिक आनंदाच्या तृप्तीने आणि श्रीकृष्णाचा अभिप्राय अंतःकरणात दृढ झाल्यामुळे संजयकडून आता श्रद्धापूर्वक पुढील बोलणे घडेल.
10-6
तो गीतेमाजी षष्ठींचा । प्रसंगु असे आयणीचा । जैसा क्षीरार्णवी अमृताचा । निवाडु जाहला ॥10॥
त्याप्रमाणे हा सहावा अध्याय गीतेच्या अर्थाचे सार आहे. हा अध्याय विचाररूपी समुद्राचा पलीकडचा किनारा आहे. अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांगयोगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले भांडारच होय.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


11-6
तैसे गीतार्थाचे सार । जे विवेकसिंधूचे पार । नाना योगविभवभांडार । उघडले का ॥11॥
त्याप्रमाणे हा सहावा अध्याय म्हणजे भगवतगीतेच्या अर्थाचे सार आहे. हा अध्याय विवेकरूपी (विचाररूपी) सागराच्या पलीकडचा किनारा आहे. अथवा (श्रोत्यांना म्हणतात) हा अध्याय म्हणजे अष्टांगयोगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले भांडारच होय.
12-6
जे आदिप्रकृतीचे विसवणे । जे शब्दब्रह्मासि न बोलणे । जेथूनि गीतावल्लीचे ठाणे । प्ररोहो पावे ॥12॥
जे मूळ मायेचे विश्रांतीस्थान आहे, ज्याचे वर्णन वेदलाही करता आले नाही, जेथून गीतारुपी वेलीचा अंकुराचे वाढीला लागलेले आहे,
13-6
तो अध्याय हा सहावा । वरि साहित्याचिया बरवा । सांगिजैल म्हणौनि परिसावा । चित्त देउनी ॥13॥
असा हा सहावा अध्याय सर्व रस-अलंकारांनी युक्त अशा भाषेत सांगितला जाईल. म्हणून श्रीत्यांनी एकाग्र चित्ताने तो श्रवण करावा.
14-6
माझा मराठाचि बोलु कौतुके । परि अमृतातेही पैजासी जिंके । ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन ॥14॥
असे हे माझे मराठी प्रतिपादन मराठी भाषेत आहे. परंतु गोडीच्या बाबतीत ते अमृतादेखील प्रतिज्ञेने जिंकू शकेल. अशा तऱ्हेची रस-अलंकार युक्त अमृतमधुर शब्दांची रचना करेन.
15-6
जिये कोवळिकेचेनि पाडे । दिसती नादीचे रंग थोडे । वेधे परिमळाचे बीक मोडे । जयाचेनि ॥15॥
ज्या भावमधुर कोमल शब्दांच्या मनाने सप्तस्वरातून निर्माण होणारे स्वरदेखील कमी योग्यतेचे दिसतील आणि ज्या शब्दांच्या आकर्षणाने सुगंधाचे सामर्थ्यदेखील कमी भाषेल.


16-6
ऐका रसाळपणाचिया लोभा । की श्रवणींचि होति जिभा । बोले इंद्रिया लागे कळंभा । एकमेका ॥16॥
अशा रसमधुर्ययुक्त शब्दांच्या लोभाने कानांनादेखील जिभा निर्माण होतील. या अर्थपूर्ण शब्दांमुळे इंद्रियामध्ये परस्परात भांडण लागेल.
17-6
सहजे शब्दु तरि विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा । घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥17॥
वास्तविक पाहता शब्द हा कानाचा विषय आहे; परंतु जिव्हा म्हणेल, हा शब्द माझा रसविषय आहे. तसेच नाकाला वाटेल की, ह्या शब्दांच्या माध्यमातून मला विविध प्रकारचे सुवास प्राप्त होतील, तर हा शब्द रस आणि सुगंध होईल.
18-6
नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखता डोळ्यांही पुरो लागे धणी । ते म्हणती उघडली खाणी । रुपाची हे ॥18॥
आश्चर्य असे की, या काव्यशब्दांतील भावंचित्रांची मालिका पाहून डोळ्यांनाही तृप्ती लाभेल आणि डोळे म्हणतील, ही तर रूपाची खाणच उघडली आहे.
19-6
जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धावे बाहिरे । बोलु भुजाहि आविष्करे । आलिंगावया ॥19॥
ज्या वेळी मधुर शब्द जुळून अमृतमय वाक्य मुखातून प्रगटेल, त्या वेळी त्याला जाणण्यासाठी मन बाहेर धावेल आणि बाहुदेखील त्या चैत्यन्यमय शब्दांना आलिंगन देण्याकरिता सरसावतील.
20-6
ऐशी इंद्रिये आपुललिया भावी । झोंबती परि तो सरिसेपणेचि बुझावी । जैसा एकला जग चेववी । सहस्त्रकरु ॥20॥
याप्रमाणे सर्व इंद्रिय आपल्या विषयांच्या भावनेने या शब्दांना झोंबतील; परंतु ते शब्द सर्वाचे सारखे समाधान करतील. ज्याप्रमाणे एकटाच सूर्य आपल्या हजारो किरणांनी सर्व जगाला जागे करतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


21-6
तैसे शब्दाचे व्यापकपण । देखिजे असाधारण । पाहातया भावज्ञा फावती गुण । चिंतामणीचे ॥21॥
त्याप्रमाणे या भावमधुर शब्दांचे व्यापकपण असामान्य आहे, असे जाणावे. या शब्दांचे चिंतन करून त्यातील अभिप्राय जाणणाऱ्यास यामध्ये चिंतामणीसारखे अलौकिक गुण दिसून येतील.
22-6
हे असोतु या बोलाची ताटे भली । वरी कैवल्यरसे वोगरिली । ही प्रतिपत्ति मिया केली । निष्कामासी ॥22॥
हे असो. सारांश, ही शब्दरूपी उत्तम ताटे आहेत आणि त्यामध्ये मोक्षरूपी मिष्टान्न वाढलेली आहेत. निष्कमी लोकांना या ग्रंथरूपी मेजवणीची पर्वणी आहे.
23-6
आता आत्मप्रभा नीच नवी । तेचि करुनी ठाणदिवी । जो इंद्रियाते चोरुनि जेवी । तयासीचि फावे ॥23॥
या मेजवणीच्या उजेडासाठी नित्यनुतन अशी आत्मज्योतीची चिमणीसारखी दिवटी करून त्या प्रकाशात जो इंद्रियांना न कळत मेजवाणीचे सेवन करतो, त्यालाच मोक्षरूप आनंदाचा लाभ होतो.
24-6
येथ श्रवणाचेनि पांगे- । वीण श्रोतया होआवे लागे । हे मनाचेनि निजांगे । भोगिजे गा ॥24॥
शब्दाचे प्रयेक्ष ज्ञान होण्यासाठी श्रोतेंद्रियाची आवश्यकता असते, परंतु शब्दांचा जो अर्थ ब्रम्हरूप मोक्ष, त्याचा अनुभव होण्यासाठी मन अंतर्मुख करावे लागते.
25-6
आहाच बोलाचि वालीफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि आंगाघडिजे । मग सुखेसी सुरवाडिजे । सुखाचिमाजी ॥25॥
वरवर असलेले शब्दाचे कवच फोडले पाहिजे आणि आत असलेल्या ब्रम्हस्वरूपाशी एकरूप झाले पाहिजे. म्हणजे शब्दश्रवणजन्य सुखासह ब्रम्हसुखात रंगून जात येते.

दिवस ५४ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ६३७ ते ४४८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ६३७
कांडील्या कुटिल्या होतो मांडा । आळसे धोंडा पडतसे ॥१॥
राग नको धरू मनी । गांडमणी सांगतो ॥धृपद॥
तरटापुढे बरे नाचे । सुते काचे मुसळ ॥२॥
तुका म्हणे काठी सार । करी फार शाहाणे ॥३॥
अर्थ
चांगले कणिक असले तरच मांडा हा पदार्थ चांगला होतो. अन्यथा कनिकाचा धोंडाच पदरात पडतो. आम्ही जे तुम्हाला काही सांगतो त्याचा राग मनात धरू नको. तरट संबंध घेतले तर मुसळ त्यामुळे झिजत नाही. पण दोरीचे वेढे मुसळाला असले आणि दोरी सतत फिरवली तर त्या मुळे मुसळाला काचे पडतात. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या मूर्ख मनुष्याला जर वठणीवर आणायचे असेल तर काठी हे त्याचे सार आहे.
अभंग क्र. ६३८
कळो येते तरि का नोहे । पडती गोवे भ्रमाचे ॥१॥
जाणताचि होतो घात । परिसा मात देवा हे ॥धृपद॥
आमिषासाठी फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥२॥
तुका म्हणे होणार खोटे । कर्म मोठे बळीवंत ॥३॥
अर्थ
सर्व काही समजते तरीदेखील काहीच न समजल्या सारखे काही लोक करतात असे ते का करतात ते काही कळत नाही परंतु असे केल्याने ते भ्रमाच्या बंधनात गुंतून पडतात. देवा तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्यावे की सर्व काही समजत असून देखील काही लोक न समजल्या सारखे करतात त्यामुळे त्यांचा घात होतो. मासा अडकवण्यासाठी गळाच्या टोकाला आमिष लावले जाते आणि त्या आमिषा पोटी मासा गळाला लागतो त्याप्रमाणे मनुष्य इच्छा आणि धन या दोन गोष्टींमुळे भ्रमात गुंततो व बंधनात अडकतो. तुकाराम महाराज म्हणतात जे होणार आहे ते होणारच कारण पूर्व कर्म हे फार बलवंत असते.
अभंग क्र. ६३९
मोकळे मन रसाळ वाणी । याचि गुणी संपन्न ॥१॥
लक्ष्मी ते ऐशा नावे । भाग्ये ज्यावे तरि त्यांनी ॥धृपद॥
नमन ते नम्रता अंगी । नेघे रंगी पालट ॥२॥
तुका म्हणे त्याच्या नावे । घेता व्हावे संतोषी ॥३॥
अर्थ
मनुष्याचे मन मोकळे असावे वाणी रसाळ असावे याच गुणानी मनुष्य संपन्न असावा. यालाच लक्ष्मी संपन्न म्हणावे त्यांचे जगणे म्हणजे भाग्याचे आहे. सतत नम्रता त्यांच्या अंगी असते, ती नम्रता कधी बदलत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अश्या लोकांचे नांव घेतेले, तरी मानला संतोष होतो.
अभंग क्र. ६४०
शेवटीची विनवणी । संतजनी परिसावी ॥१॥
विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हासी ॥धृपद॥
पुढे फार बोलो काई । अवघे पायी विदित ॥२॥
तुका म्हणे पडिलो पाया । करा छाया कृपेची ॥३॥
अर्थ
शेवटची विनवणी हि संताना आहे ती तुम्ही संतजनांनी ऐकावी एवढेच माझे म्हणणे आहे, माझा विसर तुम्हाला कधीच पडू देऊ नका. याच्या पुढे अधिक काय बोलू ? तुम्हाला सारे काही कळत आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्या पाया पडलो आहे, माझ्या वर कृपेची सावली करा.
अभंग क्र. ६४१
करितो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥१॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥धृपद॥
काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तेचि वदे ॥२॥
निमित्त मापासी बैसविलो आहे । मी तो काही नव्हे स्वामिसत्ता ॥३॥
तुका म्हणे आहे पाईकचि खरा । वागवितो मुद्रा नामाची हे ॥४॥
अर्थ
मी माझ्या बुद्धीने अभंग रुपी कवित्व करत आहे असे जर कोणी म्हणत असेल तर त्यांनी लक्षात घ्या की मी माझ्या वाणीने जे काही बोलतो आहे ती वाणी माझ्या स्वतःची नाही. माझ्या युक्तीने मी काहीच बोलत नाही मला प्रत्यक्ष विश्वंभर बोलवितो आहे. मी तर पामर आहे. मी पामर आहे मला अर्थभेद काय कळणार गोविंद जसा माझ्या वाणीला वदवून घेत आहे तशी माझी वाणी वदत आहे. निमित्त मात्र म्हणून मला बसविले आहे, तेथे मी म्हणून काही नाही सारी स्वामी सत्ता आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी खरोखर भगवंताचा पाईक आहे त्याचा सेवक आहे हरिनामाची मुद्रा मी माझ्या जवळ बाळगीत आहे.
अभंग क्र. ६४२
आह्मी गावे तुह्मी कोणी काही न म्हणावे । ऐसे तव आम्हा सांगितले नाही देवे ॥१॥
म्हणा रामराम टाळी वाजवा हाते । नाचा डोला प्रेमे आपुलिया स्वहिते ॥धृपद॥
सहज घडे तया आळस करणे ते काई । अग्नीचे भातुके हात पाळिता का पायी ॥२॥
येथे नाही लाज भक्तीभाव लौकिक । हासे तया घडे ब्रम्हहत्यापातक ॥३॥
जया जैसा भाव निरोपण करावा । येथे नाही चाड ताळविताळ या देवा ॥४॥
सदैव ज्या कथाकाळी घडे श्रवण । तुका म्हणे येर जन्मा आले ते पाषाण ॥५॥
अर्थ
आम्हीच हरीचे गुण गावे आणि तुम्ही ऐकणाऱ्या श्रोत्यांनी देवाचे नाम न घ्यावे असे काही देवाने सांगितले नाही. म्हणून तुम्ही हि रामराम म्हणा आणि हाताने टाळी वाजवा, तसेच आपल्या स्वहितासाठी प्रेमाने नाचा, डोला. जी गोष्ट सहज होत आहे ती करण्यास आळस काय म्हणून करावा ? हात व पाय हे शेवटी अग्नीच खाऊन घेणार आहे. भक्ती भावात येथे काही लाज धरायची नसते, जो कोणीही हसेल त्याला येथे ब्रम्हहत्येचे पातक लागेल. जसा ज्याचा भाव असेल तसे त्याने निरोपण करावा, देवाला तुमचा गाण्यात ताल बरोबर आहे कि नाही यांची काळजी नसते, तुकाराम महाराज म्हणतात ज्याला नेहमी हरी कथा श्रवण करण्यास मिळते तो खरा भाग्यवान आहे इतर सर्व केवळ दगड म्हणूनच जन्माला आलेले आहेत.
अभंग क्र. ६४३
देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥१॥
देव न लगे देव न लगे । साठवणाचे रुधले जागे ॥धृपद॥
देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करू ॥२॥
देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल काही ॥३॥
दुबळा तुका भावेविण । उधारा देव घेतला ऋण ॥४॥
अर्थ
आहो, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी तो देव आयता घर विचारीत आला आहे असे मी म्हणले तर मला लोक म्हणाले देव नको, देव नको कारण आमच्या घरी देवाला राहण्यासाठी जागा शिल्लक नाही असे लोक मला म्हणू लागले. आहो, लोकहो देव मंदावला, देव मंदावला म्हणजे देवाचा भाव कमी झाला मी काय करू ? आहो, लोकहोदेव फुकट घ्या, देव फुकट घ्या त्याला काही दमडी किंमत नाही. तुकाराम महाराज म्हणतात भावेविण मी दुबळा आहे, उधार मागून घेतला आहे, केवढे हे ऋण माझ्या डोक्यावर आहे.
अभंग क्र. ६४४
विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावे । येरांनी वाहावे भार माथा ॥१॥
साधने संकट सर्वालागी शीण । व्हावा लागे क्षीण अहंभाव ॥धृपद॥
भाव हा कठीण वज्र हे भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥२॥
तुका म्हणे वर्म भजनेचि सापडे । येरांसी तो पडे वोस दिशा ॥३॥
अर्थ
संपूर्ण जग म्हणजे विष्णूचे स्वरूप आहे हे केवळ वैष्णवांना माहित आहे इतर ज्ञानाचा भार वाहणाऱ्या लोकांनी आपल्या माथ्यावर भार (ज्ञानाचा) वहावा. अनेक प्रकारचे साधने म्हणजे संकटच आहे त्यामध्ये अहंभाव हा शिण झाला पाहिजे. अहंकारचाम्हणजेच अहम भावाचा नाश करणे हे फार कठीण आहे. एक वेळ वज्राचा नाश करता येईल पण मायाजाल तोडता येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरी भक्तीचे खरी वर्म तुम्हाला केवळ भजनातच सापडते बाकीच्यांना मात्र दिशा ओस पडतील.
अभंग क्र. ६४५
कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥१॥
कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरी देईल ॥धृपद॥
अंगी वैराग्याचे बळे । साही खळ जिणावे ॥२॥
उरेल ना उरी । तुका करी बोभाट ॥३॥
अर्थ
परमार्थ करताना इतर साधनांपैकी देवाने हरिकीर्तनाची गोडी निवडली आहे त्याला हरिकीर्तन अतिशय आवडते. मग तुम्ही हरिभक्त आणि आपल्या बळावर अधिकार संपन्न व्हा मग हरी तुम्हाला त्याची गोडी देईल. वैराग्याच्या बळावर सहा विकारांना (काम क्रोध लोभ मत्सर अहंकार) यांना जिंकावे. तुकाराम महाराज म्हणतात अहो तुम्ही कीर्तनाची गुडी लावून घ्या हरिकीर्तन करा आणि अधिकार संपन्न होऊन हरित च्या प्रेमाची गोडी चाखा असे मी ओरडून सांगत आहे.
अभंग क्र. ६४६
कायावाचा मन ठेविले गाहाण । घेतले तुझे रिण जोडीलागी ॥१॥
अवघे आले आत पोटा पडिले थीत । सारूनि निश्चिंत जालो देवा ॥धृपद॥
द्यावयासी आता नाही तोळा मासा । आधील मवेशा तुज ठावी ॥२॥
तुझ्या रिणे गेले बहुते बांधोनी । जाले मजहूनी थोरथोर ॥३॥
तुका म्हणे तुझे खती जे गुंतले । करूनि आपुले घेई देवा ॥४॥
अर्थ
माझे काय वाचा मन हे तुझ्याकडे गहान ठेवले आहे. तुला साधावा यासाठी मी तुझे प्रेम रुपी कर्ज घेतले आहे. आता अवघे माझ्या पोटात आहे बाकीचे सर्व प्रकार बाजूला ठेवून मी निश्चिंत झालो आहे. आता तुला देण्यासाठी माझ्याकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही हे तुला आधीच्या परिस्थितीवरून ठाऊक आहे. तुझ्या कर्जाला बरेच जण बांधून गेले तुझ्या कर्जत गुंतले आहेत आणि माझ्या पेक्षाही ते मोठे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुझ्या खतामध्ये (खातावनी) जे जे असे गुंतले आहे त्यांना तू आपले से करून घे.
अभंग क्र. ६४७
आले भरा केणे । येरझार चुके जेणे ॥१॥
उभे केले विटेवरी । पेठ इनाम पंढरी ॥धृपद॥
वाहाती मारग । अवघे मोहोरले जग ॥२॥
तुका म्हणे माप । खरे आणा माझे बाप ॥३॥
अर्थ
पंढरीच्या बाजारात जन्म मरण चुकते असा माल आला आहे. तो तुम्ही घ्या जेथे पुंडलीकाने पांडुरंग पपरमात्म्याला विठेवर उभा केला आहे अशा पंढरी गावात इनामाची पेठ भरले आहे. तो माल घेण्याकरता सर्व जण सरसावले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात बापहो, तुम्हाला जर हा माल हवा असेल तर तुम्ही खरे माप (म्हणजे भक्ती भावाने तिथे जा. ) घेवून या.
अभंग क्र. ६४८
लक्ष्मीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा ॥१॥
सुख वसे तुझे पायी । मज ठेवी तेचि ठायी ॥धृपद॥
माझी अल्प हे वासना । तू तो उदाराचा राणा ॥२॥
तुका म्हणे भोगे । पीडा केली धाव वेगे ॥३॥
अर्थ
हे लक्ष्मी वल्लभा, दिनाच्या नाथा हे पद्मनाभा तुझ्या पायी सुख आहे मला त्याच ठिकाणी ठेव. माझी एक छोठीशी इच्छा आहे तू तर फार उदार आहेस, तू उदारांचा राजा आहेस. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या भोगाने मला फार पिडा होत आहे म्हणून तू त्वरेने धाव घे.

फेब्रुवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading