ग्रामगीता अध्याय सातवा – 7 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषयओवी संख्या
ग्रामगीता अध्याय सातवा- 7
Gram Gita Chapter 7 – 7
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
१११
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजनेहिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय ७ आचार प्राबल्य
आचार-प्राबल्य

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय सातवा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ७
Gram Gita chapter seven starts

—-🕉ग्रामगीता अध्याय ७ आचार प्राबल्य

आचार-प्राबल्य
एका सज्जने प्रश्न केला । लोकरहाटी कळली आम्हाला । पुढारी नेतेच सुधारती गावाला । सत्य हे सारे ॥१॥
परि भल्यांनीच गोंधळ घातला । पुढारी पुढिलाचा अरि झाला । तयाच्या नगार्‍यापुढे कसला । आवाज आमचा ताण मारी ? ॥२॥
न्यायदेवता सिंहासनी बसविली । तीच अन्याय करून गेली । मग कैची सुव्यवस्था आली ? सांगा सांगा ॥३॥
सत्संगतीसि पंडित बोलाविला । त्यानेच गावी कलह केला । शहाणा म्हणावा तोच निघाला । महामुर्ख जैसा ॥४॥
प्रसन्नतेकरिता ठेवले गायन । तेथे ऐकावे लागले रुदन । आपल्या पोटाची सोय व्हावी म्हणून । अडे ओरडे ॥५॥
घोडे शिकवाया आणला स्वार । तोचि पडला मोडोनि कंबर । कैसे बसतील मग इतर । घोडयावरि ? ॥‍६॥
इमानदार म्हणोनि पाहिला धनी । त्यानेच केली बेइमानी । आता विश्वास ठेवावा कोणी । कोणावरि ? ॥७॥
मुले शिकविण्या ठेविला मास्तर । त्यानेच केला दुर्व्यवहार । शिक्षकासीच शिक्षणाची जरूर । ऐसे झाले ॥८॥
औषधि द्याया आणिला डॉक्टर । त्याने रोग्यासि दिले जहर । आता कोणी करावा उपचार ? सांगा सांगा ॥९॥
ऐसे झाले आमुच्या गावी । सांगा काय व्यवस्था करावी ? कोणास हाक मारूनि घ्यावी । विश्वासाने ? ॥१०॥

जन मनात येईल ते करिती । दारू पिती तमाशे नाचविती । पुढारीच पुढाकार घेती । ऐशा कामी ॥११॥
गुंडास धरोनिया हाती । करिती मनी येईल त्याची फजीती । त्यावाचोनि पुढार्‍याची गति । म्हणती प्रगतिपथा येईना ॥१२॥
ऐसेचि धरिले त्यांनी मनी । नाश केला गावी फिरूनि । आता चोरचि झाले धनी । सज्जन मेले उपवासी ॥१३॥
गाव सगळेचि बिघडले । आपल्यापरी स्वैर झाले । नाही कोणाचे वर्चस्व राहिले । कोणावरि ॥१४॥
सांगा सांगा काय करावे ? तुम्ही म्हणता गाव सुधारावे । कोण्या मार्गे आपण जावे । ऐशा स्थिती ? ॥१५॥
आपण करावे काही साधन । हसती टिंगल करोनि जन । म्हणती हा साधू आला कुठोन । पोट भरावया ॥१६॥
खराटा घेवोनि झाडझूड करावी । तेथेचि मलविसर्जना बसवी । म्हणती तुमची सेवा तुम्ही चालवावी । आम्ही करू ऐसेचि ॥१७॥
काही सांगावे शहाणपण । म्हणती तुम्ही सांगणारे कोण ? खुशी वाटेल तैसे करोन । राहू आम्ही ॥१८॥
ऐसी झाली गावाची स्थिती । वाईट वाटते हृदयाप्रति । सोडूनि जावे गावा येई चित्ती । परि जीवा आवडेना ॥१९॥
शेवटी आलो तुम्हासि शरण । तुम्ही गाव केले आदर्श म्हणोन । कैसे वळविले तेथील जन ? सांगा आम्हालागोनि ॥२०॥

मित्रा ! तू विचारला प्रश्न बरवा । अति हर्ष झाला माझ्या जीवा । मी सांगेन धरोनि भावा । वर्म माझे ॥२१॥
प्रथम कळू दे तुझी साधना । काय ठेवितोसि आपुली धारणा ? दिनचर्येंची कैसी रचना । आहे तुझ्या ? ॥२२॥
हेचि मुख्य खूण । जोवरि वक्त्याचे न दिसे आचरण । तोवरि लोक वागतील म्हणोन । समजू नये ॥२३॥
लोकासि जे जे शिकवावे । ते आधी आपणचि आचरावे । नुसते पुढारी म्हणोनि मिरवावे । तेणे आदर न वाढे ॥२४॥
एकेक विषयाचे पुढारीपण । घेवोनि तैसे केले आचरण । त्यांनीच बिघडवू शकले गाव पूर्ण । गुंड व्यसनी व्यभिचारी ॥२५॥
तैसेचि गाव सुधाराया आपण । विशेष केले पाहिजे आचरण । जेणे येईल अंगी आकर्षण । गावास वेधून घेणारे ॥२६॥
येर पुढारी असोत सर्वहि । परंतु आपला मार्ग खुंटला नाही । लोक जणु वाटचि पाहती सदाहि । कोण होतो पुढे म्हणोनि ॥२७॥
यासाठी निराशेचे नाही कारण । आचरणे साधावे पुढारीपण । सत्यचि प्रभावी सर्वाहून । ही अमोल खूण विसरू नये ॥२८॥
ज्याने सत्याशी नाते जोडले । त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले । सांगण्याहूनिहि सामर्थ्य चाले । त्याच्या शुध्द जीवनाचे ॥२९॥
यासाठी प्रथम पाहिजे इंद्रियनिग्रह । खानापानादिकी नियमाग्रह । सर्वचि विषयी असंग्रह । आपुल्यासाठी म्हणोनि ॥३०॥

पवित्र मित आहार-विहार । निद्रा थोडी शांती फार । सदा प्रसन्नता मुखावर । बोलता चालता ॥३१॥
यमनियमादि तैसी आसने । साधोनिया आरोग्य राखणे । बुध्दि-बल-चातुर्ये वर्तने । तेजोमय असावे ॥३२॥
आपुल्या कष्टावरीच जगावे । कुणाचे उपकार अंगी न घ्यावे । कमीत कमी खर्चाने रहावे । साध्या घरी ॥३३॥
अंग झाकण्यापुरते कपडे । शिवले असावेत साधे भाबडे । शौकपाणी न आवडे । राहावे ऐसे ॥३४॥
आपुले परक्याचे हित । दोन्ही असावेत लक्षात । जेणे परक्यासि वाटे पसंत । तैसा व्यवहार असावा ॥३५॥
आपुल्या कोणत्याहि कारभारी । अन्याय न व्हावा कोणावरी । सावधानी असावी हृदयातरी । सर्वकाळ सत्याची ॥३६॥
दयाक्षमा शांति नम्रता । प्रत्येक जागी प्रामाणिकता । सरळपणा आणि प्रेमळता । ही दैवी संपत्ति साधावी ॥३७॥
सार्वजनिक कामी जाऊनि । कष्टत जावे निःस्पृहपणी । जाति-पक्ष-मित्रशत्रु म्हणूनि । पक्षपात कोठे नसावा ॥३८॥
असभ्य हेकट नसावे वर्तन । कर्कशता न दिसावी वागण्यातून । कुणाचीहि निंदास्तुति ऐकोन । दुराग्रही मन न करावे ॥३९॥
प्रत्यक्ष दोष पाहिल्याविण । अथवा न समजता विश्वसनीयाकडून । करू नये न्यायदान । शोधल्यावाचून सर्व पक्ष ॥४०॥

सामुदायिक जबाबदारी । असेल जी जी नागरिकावरि । न चुकता पाळावी ती निर्धारी । स्वार्थ उरी न ठेविता ॥४१॥
न करावी कोणाची निंदास्तुति । आपण आदर्श करावी कृति । स्त्रियामुलेवृध्दादि सर्वासांगाती । वागावे प्रेमे विश्वासे ॥४२॥
राखावी शब्दांची किंमत । वेळेचे महत्त्व सदोदित । दुसर्‍याचे सुखदुःख आघातहित । आपणाइतुकेचि जाणावे ॥४३॥
हे सर्व जव पाहतील जन । म्हणतील हाचि आहे सज्जन । वाढेल तुमच्या कार्यांचे महिमान । हळूहळू ॥४४॥
लोकासि कळेल तुमचे वर्तन । अंतबार्ह्य सात्विक पूर्ण । मग पाहतील देवाप्रमाण । तुम्हालागी ॥४५॥
मित्रा ! ऐसे जव तू करिशी । तव लोक राहतील प्रसन्न तुजशी । ऐकण्याची वाटेल खुशी । लोकांना तुझे ॥४६॥
म्हणतील तुम्ही सांगावे । तैसेचि आम्ही वागावे । तुमच्या बोलण्यातून निघावे । तरि मरण होईल आमुचे ॥४७॥
तेव्हा प्रथम करावा विचार । आपण घ्यावा की नाही पुढाकार । एकदा पाऊल टाकता समोर । मागे घेऊ नये कल्पांती ॥४८॥
ज्यासि वाटे जनसेवा करावी । त्याने प्रथम लोकलाज सोडावी । आपुल्या आत्माची ग्वाही घ्यावी । कार्य सत्य म्हणोनिया ॥४९॥
ज्यात आहे सर्वाचे सुख । ते सत्कार्य न करिता राहावे विन्मुख । हे तो आहे घोर पातक । समजोनि घ्यावे ॥५०॥

साहेल तैसी करावी सुरवात । मुरवावया जनलोकात । हृदयात आणि इंद्रियात । मेळ राहू शके ऐसी ॥५१॥
क्रमाने पाऊल पुढे घ्यावे । कार्य करिता समाधान मानावे । विरोधकासि उत्तर द्यावे । नम्रतेने ॥५२॥
लोकासि बोलणे शिकवावे । तरि आपण उत्तमचि बोलावे । बोलण्यात माधुर्य ओतावे । आपुल्या प्रेमे ॥५३॥
आपुल्या बोलण्याने उबगतील जन । ऐसे कधी न करावे भाषण । कोणचेही पूर्ण ऐकल्याविण । न द्यावे मधून उत्तर ॥५४॥
आपुले बोलणे प्रेमाचे । दुसर्‍याचे बोलणे क्रोधाचे । परि ते सहन करावे त्याचे । वार अंगी ॥५५॥
दुसर्‍याने कितीही क्रोध केला । तरी हसोनि पाहिजे मावळिला । उत्तर देता यावे शांतीने त्याला । आपुल्यापरी ॥५६॥
शंका विचारावयाची दाटी । लागेल पदोपदी पाठी । सहन करोनि ही आटाआटी । पाय पुढे टाकावा ॥५७॥
एकदा झालिया निश्चय । मग लोकचि होती साहाय्य । कामे करावयाची सोय । सोपी होते ॥५८॥
आपोआपचि होतो निर्वाळा । तांडा जमतो भोवती सगळा । निवडावा त्यातूनि जिव्हाळा । आहे कोणा ॥५९॥
त्यासचि साथी करावे । शक्तियुक्तीने मन भरावे । कार्य करावयासि सोपवावे । आपुल्या जैसे ॥६०॥

ऐसे मिळता काही जन । आरंभ झाला सत्कार्या पूर्ण । मग सहजचि घ्यावे महत्पुण्य । गाव-सेवेचे ॥६१॥
याहून नाही दुसरा उपाय । आपुल्या गावाची लागया सोय । हाचि मंत्र आहे सिध्दांतमय । गाव आपुले सुधारावया ॥६२॥
हे ऐकोनिया माझे उत्तर । प्रश्नकर्ता बोलला चतुर । यासि लागतील दिवस फार । तोवरि गावाचे होईल कैसे ? ॥६३॥
आपण सांगितले जे साधन । तेहि आहे महाकठिण । कोण साधील यमनियम आसन । ध्यानादि सर्व ? ॥६४॥
त्यासि वर्षेहि बरीच लोटती । तोपर्यंत आमुची गात्रे शिथिल होती । मग कोण पाहील गावाप्रति । उत्तम आहे की वाईट ? ॥६५॥
आम्ही मध्येच गेलो मरून । मग इच्छा राहील अपूर्ण । काय सांगावे पुढे कोण । करील कार्य आमुचे ? ॥६६॥
यासाठी सांगा सोपा उपाय । ज्याने साधेल सर्व सोय । देऊ आम्ही खर्च जरी ये । त्यासाठी काही ॥६७॥
मित्रा ! ऐक याचे उत्तर । तुज सोडोनि गाव व्हावे सुंदर । ऐसी इच्छा धरिशील तीव्र । तरि ती वेडेपणाची ॥६८॥
माझे गाव सुंदर व्हावे । मी चोरजारचि राहावे । ऐसे विसंगत दिसते आघवे । म्हणणे तुझे ॥६९॥
व्यक्तिशुध्दीविण दुसरा उपाय । काय आहे व्हाया साहाय्य ? । टिकविण्यास गावी उत्तम सोय । याविण मजला दिसेना ॥७०॥

तू म्हणशील सत्तेने सुधारावे । तांबडतोब कायदे करावे । तुझ्यासारखे टाळतील आघवे । ते तैसेचि ठेवावे स्वार्थीजन ॥७१॥
हे म्हणणे कोण ऐकेल ? कितीहि उदार बोलले बोल । तरी जनमन ते ओळखील । छीथू करील आमुचीहि ॥७२॥
आणि तैसेचि करू जावे । तरि गाव कैसे सुधारावे ? । व्यक्ति मिळोनीच गाव आघवे । हे विसरता सर्व फोल ॥७३॥
लोक सुधारणेच्या रेखा फाडती । पैसा देऊन करू म्हणती । परि पैसा घेऊनि फसविती । ऐसे लोक उभेच तेथे ॥७४॥
करू म्हणती व्याख्याने देऊन । तरि लोकहि शिकती व्याख्यान । काय होय यातूनि निष्पन्न ? जोवरि मानव ना बदले ॥७५॥
त्यास मुख्य पाहिजे अंतःकरण । जिव्हाळ्याची सेवा पूर्ण । तरीच ग्राम होईल नंदनवन । अवडंबरावाचूनि ॥७६॥
वास्तविक त्यासि वेळहि नाहि । सवेच चालेल सुधारणाहि । सुरू करोनि सांगत जाई । शिकवी मनासहित जना ॥७७॥
बोल बोल याचे उत्तर । तुझी तयारी आहे काय सत्त्वर ? नाहीतरि वेळ मात्र । गमावू नकोस आमुचा ॥७८॥
तेव्हा तो निराशेने वदला । अपरिग्रह जरि आम्ही केला । काय करील मुलाबाळाला ? मग काय झाला फायदा माझा ? ॥७९॥
कासया करावे एवढे कठीण ? चालू द्या जैसे चालती जन ? आपणचि दुःखी होऊन । का मरावे यासाठी ? ॥८०॥

ऐसे बोल ऐकता प्रश्नकर्त्याचे । बोललो तुम्हीच गुंड गुंडाचे । पुन्हा त्यातहि आमुचे । साहाय्य घेता बुडवाया ॥८१॥
तुम्हीच गाव बुडविला । सांगायासि आले बोलबाला । ऐसाचि वाटे घात झाला । सर्व गावदेशाचा ॥८२॥
तुमच्यावरूनि मज बोध झाला । देश अशांनीच गर्तेत घातला । शहाणे म्हणवून नाश केला । गावाचा तुम्ही ॥८३॥
प्रथम जे तुम्ही ऐसे बोलले । जे जे जन सुधारण्यास आणले । त्यांनीच गाव बुडविले । आमुचे सर्व ॥८४॥
हे म्हणणे सारे लटके । तुम्हासीच द्यावे वाटे फटके । नाहीतरि करा आता निके । सांगतो तैसे ॥८५॥
तो भला काही पाय घेईना । फसला मोह-कर्दमी नाना । म्हणे आलो होतो आपुल्या दर्शना । लाभ होईल म्हणोनि ॥८६॥
गावी येती साधु-महंत । कार्यकर्ते विद्वान पंडित । त्यांचे संगती तैसा तैसा शास्त्रार्थ । करावा हीच रुचि मज ॥८७॥
जैसे आम्ही पोथीपुराण वाचतो । तैसीच त्याची चर्चा करतो । कोण शहाणा हे पाहतो । वरच्या वरि ॥८८॥
तैसा बोललो आपला ज्ञानचर्चा । नेहमीच चालती गप्पा आमुच्या । होतील कधीकाळी मनाच्या । भावनाहि ऐशा ॥८९॥
तुम्ही तर नेटचि लाविला । सांगता सुरवातचि करावयाला । यास पाहिजे विचार केला । काही वर्षे ॥९०॥
मी ऐकले त्याचे म्हणणे । विव्हळ झालो जीवेप्राणे । ऐसेहि जन निर्मिले भगवंताने ! वाटले मना ॥९१॥
हात जोडले तयाप्रति । म्हणालो आता नको आपुली संगति । बहू ज्ञान दिले तुम्हाप्रति । वस्तादाने ॥९२॥
परंतु यापेक्षा मूर्ख बरे । ते ऐकोनि घेती विचारे । आम्ही प्रयत्न करू म्हणोनि सारे । घरी जाती सदभावे ॥९३॥
तुम्ही दिसता पढतमूर्ख । दुसर्‍या दुखवोनि घेता सुख । कळोनि न वळे याचे कौतुक । करावे तरि लाजिरवाणे ॥९४॥
परि आता एक ध्यानी ठेवावे । याने आपुले भले कधीहि नव्हे । परि कुणातेहि समाधान पावे । या चर्चेने क्रियायोगे ॥९५॥
असो मजसी जैसा प्रश्नकर्ता भेटला । तैसा का कोणी शहाणा उठला । तरि त्याने घातचि झाला । ग्रामसेवाकार्याचा ॥९६॥
बोलण्यात ते अति शहाणे । परि कार्य त्यांचे ओंगळवाणे । कैसे गाव सुधारेल याने ? सांगा मज ॥९७॥
न सोडताहि पेंढारीपण । त्यांना पाहिजे पुढारीपण । इच्छिती संन्याशाचा सन्मान । पत्नी घेऊनी खांद्यावरि ॥९८॥
साधूशी भाविकपणे बोलती । मूर्खापाशी महंत होती । व्यसनी लोकामाजी मिळूनि जाती । व्यसने भोगता ॥९९॥
आपणा सर्वत्र मान मिळावा । धनाचाहि संग्रह व्हावा । आणि जरा न ताणहि न लागावा । ऐसा व्यापार हवा त्यासि ॥१००॥

हेचि ओळखावे धू्र्तपण । यासीच पढतमूर्ख म्हणती शास्त्रज्ञ । त्यालागी करूनहि प्रयत्न । असाध्य त्यांचा खातारोग ॥१०१॥
त्यापासोनि ग्राम वाचवावे । खरे सात्विकपण गावी भरावे । सरळपणासाठीच प्रयत्न करावे । सुधारकांनी ॥१०२॥
यासि मज एक साधन सुचे । जे जे असतील गावी ऐसे । आधी त्यांचेच लागावे कासे । ससेमिरा घेऊनिया ॥१०३॥
जे जन बोलण्यात जिंकती । आचरणात मागे राहती । त्यांची घ्यावी चातुर्ये झडती । ग्राम हाती घेवोनि ॥१०४॥
फुकी ज्ञानचर्चा नाही झाली । म्हणोनि ज्ञानशक्ति कमी पडली । ऐसी कधी न पडावी भुली । लोकास माझ्या ॥१०५॥
अदंभ दया अभयादि गुण । त्यासीच गीता म्हणे ज्ञानखूण । क्रियावान तोचि पंडित पूर्ण । सर्वभूतहिती रत ॥१०६॥
लाख बोलक्याहून थोर । एकचि माझा कर्तबगार । हे वचन पाळोनि सुंदर । गाव सुधारावे कार्याने ॥१०७॥
सुधारणेची करिता बोलणी । म्हणावे, चला कामे करू मिळोनि । घ्या हे टोपले माती भरोनि । शिरावरि आपुल्या ॥१०८॥
सर्वासीच लावावे काम । हाचि मार्ग सर्वात उत्तम । यानेच बनेल आदर्श ग्राम । सहाय्य देता सत्कार्या ॥१०९॥
आदर्श न करिता जीवन । कैसा मिळेल आदर्शाचा मान ? कैसा जगी आदर्श होय निर्माण ? तुकडया म्हणे ॥११०॥
इति श्री ग्राम-गीता ग्रंथ । गुरू शास्त्र स्वानुभव-संमत । कथिला ग्रामोन्नतीचा आचारपथ । सातवा अध्याय संपूर्ण ॥१११॥


ग्रामगीता अध्याय सातवा समाप्त
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading