ग्रामगीता अध्याय चौथा – ४ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्याय चौथा- ४
Gram Gita Chapter 4 – ४
ओवी संख्या :- १२६
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय ४ संसार परमार्थ
संसार परमार्थ

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
ग्रामगीता अध्याय चवथा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ४
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
Gram Gita chapter IV begins

–🕉ग्रामगीता अध्याय ४ संसार परमार्थ 🕉–


संसार परमार्थ
मागे झाले निरूपण ! चार आश्रमांचे वर्णन । त्यातील तत्त्व आहे सनातन । सर्वासाठी ॥१॥
त्यांची करू जाता योजना । उत्तम चाले समाजधारणा । ऐहिक उत्कर्ष अधात्मसाधना । सर्वासि साधे ॥३॥
व्यक्तीचीहि पूर्ण उन्नती । समाजाची उत्तम स्थिती । आश्रमधर्मी साधे निश्चती । आजहि सर्व ॥३॥
लहानपणी ब्रह्मचर्य पाळावे । गुरुघरी विद्यार्जन करावे । पुढे मग्न करोनि निभवावे । पुत्रपौत्रा ॥४॥
ब्रह्मचर्ये घ्यावी धर्मसंथा । गृहस्थे साधावी अर्थव्यवस्था । काम जिंकणे वानप्रस्था । मुक्त व्हावया ॥५॥
पुत्र कामाकाजी लागले । की वैराग्य घ्यावे आपण भले । सेवासाधनार्थ सोडिले । पाहिजे घर ॥६॥
करावी ग्रामसेवा ज्ञानसेवा । वानप्रस्थवृत्ति बाणवूनि जीवा । आणी मोक्षासाठी साधावा । संन्यासभाव ॥७॥
संन्यासी सर्वासीच होणे आहे । त्याविण नाही मोक्षाची नाही सोय । मोक्षावाचूनि तरणोपाय । दुसरा कोठे ? ॥८॥
वासना हाचि भवसागर । आसक्ति हाच खरा संसार । ज्ञाने त्यांचा पावणे पार । हाचि मोक्ष ॥९॥
झाला वासनेचा नाश । त्यासीच नाम असे संन्यास । मग त्यांचे सर्व करणे निर्विष । आदर्श लोकी ॥१०॥

मुक्त तो वासनेतूनि मोकळा । कोठे नाही आसक्तीचा लळा । ओळखोनी आत्मस्वरूपी सकळा । विलीन होई ॥११॥
हीच जगाची अंतिम धारणा । कर्म कराया निर्मळ बाणा । यातचि वसते उपासना । उध्दाराची ॥१३॥
ही भूमिका ज्यासी गवसली । त्यांची कर्मे योगरूप झाली । ही संन्यासदशा साधिली । पाहिजे सर्वानी ॥१३॥
चौथा आश्रम वृध्दपण । ऐसे असले जरी वचन । तरी या आत्मविकासासि बंधन । लागु नसेचि वयाचे ॥१४॥
हे सर्वकाहि वृत्तीवरि । वृत्तीच करावी लागे सुसंस्कारी । बाह्यदीक्षा सहायकारी । म्हणोनि वर्णिली धर्मग्रंथी ॥१५॥
कल्पिले आयुष्याचे चार भाग । भोगातूनि साधाया त्याग । परि शतवर्षाचे आयुष्य अव्यंग । कोणास लाभे ? ॥१६॥
म्हणोनि प्रथा न पाहता दीक्षांची । तत्त्वे चारहि आश्रमाची । आचरावी जीवनी साची । तातडीने सर्वानी ॥१७॥
मात्र ज्या क्षणी वैराग्य आले । तेव्हाचि घर सोडुनि पळाले । ऐसेहि नाही पाहिजे केले । वेडयापरी ॥१८॥
कोणी वैराग्य येता घर सोडती । तीर्थाटनी भटकाया जाती । जीवन दुसर्‍यावरि जगविती । भीक मागती दारोदारी ॥१९॥
पुन्हा वाढती क्रोध कामभाव । भोगूनि दुःख पाहूनि गौरव । संसाराचा पुन्हा प्रभाव । पडे त्यावरि ॥२०॥

यासाठी दीक्षा संस्कारे घेणे । उचित जीवाच्या प्रगतीकारणे । परि बहिरंग दीक्षेचे सोंग धरणे । व्यर्थचि आहे ॥२१॥
माझा विश्वास आहे संस्कारावरि । परि व्यवस्था लागते तैशापरी । नाहीपेक्षा उपेक्षाचि बरी । ऐशा दीक्षेची ॥२३॥
मग तो असो आश्रमदीक्षा । संप्रदायदीक्षा गुरूदीक्षा । व्रत्तदीक्षा वा कार्यदीक्षा । धर्मदीक्षेसहित ॥२३॥
दीक्षेने मन तयार होते । परि कर्म पाहिजे नित्य केले ते । आचराविण फजीती होते । दीक्षितांची ॥२४॥
एकादशीची घेतली दीक्षा । भोजन करी मागोनि भिक्षा । लोक पाहूनि हा तमाशा । हासती वेडा म्हणोनिया ॥२५॥
दीक्षा घेतली व्रतबंधाची । नाही संध्या नित्यनेमाची । काय करावी संस्कारांची । व्यवस्था तेथे ? ॥२६॥
ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली । संयमदृष्टीच बिघडली । तैसीच गृहस्थाश्रमाची झाली । उलटी रीति ॥२७॥
आश्रमपण निघोन गेले । तमाशाचे भाव वाढले । तत्त्वाविण सामर्थ्य कुठले । दीक्षेमाजी ? ॥२८॥
वानप्रस्थ म्हणोनि घर सोडले । बाहेर व्यापार करू लागले । संन्यासी मानासाठी झगडले । तरि ते व्यर्थ ॥२९॥
घातली भगवी वस्त्रे अंगावरि । परि क्रोध भरला अंतरी बाहेरी । लंगोटीसाठी झगडा करी । यजमानापाशी ॥३०॥

चुंगी मागूनि धन जमवी । झोपडी बांधूनि वैभवे सजवी । राख फासूनि संन्यासी म्हणवी । दासचि तो संसाराचा ॥३१॥
न सुटे झोपडीचा अभिमान । मांजरी -श्वानावरि प्रेम पूर्ण । वेळ न फावे ब्रह्मज्ञान । सांगावया अनुभवावया ॥३३॥
ही कसली आहे दीक्षा । नाही सेवा नाही तितिक्षा । पशूजैसे शोधती भक्ष्या । मागती भिक्षा चैनीसाठी ॥३३॥
जी दीक्षा जयाने घ्यावी । त्याने ती पथ्थे सांभाळावी । वृत्ति वाकडी होऊ न द्यावी । वाईट कर्मी ॥३४॥
नाहीपेक्षा ऐसेचि जगावे । काम करोनि न्याये वागावे । नांव बदनाम होऊ न द्यावे । दीक्षा घेऊनि कोणती ॥३५॥
सुखे संसार करावा । साधेल तैसा परोपकार । चारहि आश्रमांचा सार । आचरणी आणावा ॥३६॥
बायकामुलांची चिंता लागली । म्हणोनि वैराग्याची दीक्षा घेतली । ते वैराग्य नव्हे कुचराई केली । सोंग घेवोनि वैराग्याचे ॥३७॥
एका साधकास वैराग्य आले । त्याने घरदार सोडूनि दिले । लंगोटी लावून स्नान केले । अरण्यामाजी ॥३८॥
रोज रोज स्नान करी । लंगोटी सुकवी झाडावरि । तेथे उंदीर जाऊनि कातरी । लंगोटी त्याची ॥३९॥
तो लंगोटी मागाया गाव जाय । म्हणे काय करावा उपाय ? लंगोटी आमुची खाऊनि जाय । उंदीरराजा ॥४०॥

लोकांनी बैराग्यास सुचविले । तेथे पाळा मांजरीची पिले । म्हणजे लंगोटी राखाया झाले । सेवकचि ते ॥४१॥
घेतले बैराग्याने मना । आणले मांजरीच्या धना । मग त्याची खाण्याची विवंचना । लागली मागे ॥४३॥
लोक म्हणती गायी पाळा । म्हणजे त्यांचा निर्वाह सगळा । आपणासहि मिळेल गोळा । दहीदूधलोण्याचा सात्विक ॥४३॥
तेहि त्याच्या मना आले । लोकासि मागूनि गोधन केले । पुढे चार्‍याची चिंता चाले । मनी त्याच्या ॥४४॥
चार्‍या गवताची मागे भीक । लोक म्हणती बाबा ! हे दुःख । करा तेथेचि शेती आणिक । थोडीबहू ॥४५॥
तेहि पटले त्याचे चित्ती । मिळविली मनमाने शेती । राबविली गडीमाणसे, पूर्ति । करावया तिची ॥४६॥
अधिकाधिक तेचि केले । धनधान्य जमा झाले । सांभाळायाचे कोडे पडले । मनामाजी ॥४७॥
कोण मिळेल इनामदार । नसावा ऐदी अथवा चोर । आपला म्हणोनि करील व्यवहार । ऐसा कोण शोधावा ? ॥४८॥
लोक म्हणती कोणी ठरवावे ? बुवा म्हणे लग्नचि करावे । म्हणजे होईल आता बरवे । धना मना सांभाळाया ॥४९॥
बिचार्‍याचे वैराग्य गेले । पुन्हा संसारबंधन गळी पडले । याचे कारण संस्कार पालटले । नव्हते पूर्वीहि ॥५०॥
म्हणोनि म्हणतो वैराग्यासाठी । घर सोडणे नको उठाउठी । त्यासाठी पाहिजे बुध्दि गोमटी । सेवाभावना त्यागवृत्ति ॥५१॥
आपुले घर सोडूनि द्यावे । गावचि घर समजोनि रहावे । सर्व गावाचे काम करावे । देवसेवा म्हणूनि ॥५३॥
मनी ठेवावे ईश्वरभजन । काम करावे गावाचे पूर्ण । फुकाचे न करावे भोजन । वैराग्याने कधीहि ॥५३॥
वैराग्य अथवा संन्यासी बाह्य त्यागचि नको त्यासि । त्यागवृत्तीने गृहस्थासी । वैराग्य साधे संसारी ॥५४॥
वैराग्य म्हणजे आसक्तित्याग । संग्रहत्याग उपभोगत्याग । लागावी अंगी कार्यास आग । ग्रामसेवा करावया ॥५५॥
आपुल्या मुलासारखीच सर्व मुले । होवोत ऐसे मनी आणिले । त्यांच्या जोपासनेचे व्रत घेतले । तोचि विरागी म्हणावा ॥५६॥
आपल्या अंगी असो फाटके । परि गावलोक राहोत नेटके । हे साधावया जो कवतुके । कार्य करी जोमाने ॥५७॥
त्यासी म्हणावे वैरागी । जो सर्व लोभांचा परित्यागी । सेवेसाठी कष्ट घे अंगी । नेहमीच लोकांच्या ॥५८॥
अनेक साधिती स्वावलंबन । दानी दुसर्‍यास पुरवी धन । जो सर्वस्व आपुले दे अर्पोन । तोचि संन्यासी म्हणावा ॥५९॥
ऐसा संन्यास सर्वानी घ्यावा । आधी आपुला प्रपंच सावरावा । मुरलिया फळापरी सुखवावा । समाज मग ॥६०॥

काही मुलांनाच संन्यास देती । त्यांची असते कोवळी स्थिती । ते जव भरवयात येती । पापे करिती मनमाने ॥६१॥
संन्यास घेतलिया स्वये । मग लग्नहि करिता नये । मग शोधती नाना उपाय । उपद्रव बनती गावाचा ॥६३॥
संन्याशाने संन्यास द्यावा । गावकर्‍यांनी जाच सोसावा । ऐसा बुध्दिहीनपणा का करावा । समाजाने ? ॥६३॥
म्हणोनि हे चूकचि आहे । तो संन्यास संन्यासचि नोहे । वानप्रस्थचि संन्यासी राहे । धोका न होय मुलांऐसा ॥६४॥
संन्यास म्हणजे थकता काळ । आत्मचिंतनी जीवा वेळ । आशीर्वाद मिळावा सकळ । जनलोकासि ॥६५॥
परि ज्यांनी कष्टचि नाही केले । गृह्स्थी जीवन नाही अनुभविले । ते संन्यासी म्हणती झाले । आश्चर्य वाटे ! ॥६६॥
ही घडी जेव्हापासूनि चुकली । ग्रामाग्रामाची फजिती झाली । प्रजा सर्व भिके लागली । गृहस्थाश्रमाची ॥६७॥
झुंडच्या झुंड मुले नेती । कोणी बैरागी संन्यासी करिती । आणि मग बोके होऊनि फिरती । लोकामाजी ॥६८॥
त्यांना नसतो सेवेचा आदर । नसतो कळला काही व्यवहार । मनास येईल तो उपकार । करिती लोकी ॥६९॥
म्हणोनि हे पाहिजे बदलले । अल्पवयी न पाहिजे मुंडले । त्यास अभ्यासोनीच काढले । पाहिजे आधी ॥७०॥

कोणी असती महासंस्कारी । कोणी उपजत अनुभव -थोरी । त्यांनी इच्छेप्रमाणे संसारी । व्हावे न व्हावे ॥७१॥
त्यांना नसे आडकाठी । परि हे सुत्र नव्हे सर्वासाठी । याने मोडेल परिपाठी । उत्तम गुणांची ॥७३॥
हे संतजनांनी जाणले । म्हणोनीच कळवळोनि सांगितले । रांडापोरे सोडू नका बोलिले । परमार्थासाठी ॥७३॥
करावा सुखाने संसार । करावा अतिथींचा सत्कार । बांधा सोपे माडया घर । उत्तम व्यवहारे धन जोडा ॥७४॥
वैराग्य वाढवा त्यातूनि । सेवा परोपकार साधूनि । रंगा सदाचारे भक्तिरगंणी । हाचा राजमार्ग संतांचा ॥७५॥
ऐसेचि संती सांगितले । कितीतरी संत ऐसेचि वागले । त्यानेच नांव अमर झाले । तयांचे लोकी ॥७६॥
हे जाणूनि वागावे आपण । गृहस्थाश्रमचि उज्ज्वल करून । वैराग्याचे तत्त्व सांभाळून । लोकसेवा साधावी ॥७७॥
सवे घेवोनि आपुली पत्नी । सेवा करिती मिळोनी दोन्ही । हेचि आहे वैराग्याची निशाणी । संसारसंग सुटावया ॥७८॥
यातूनचि प्रकटे खरा संन्यास । नाहीतरि अवघा त्रास । आपण न तरे, न तारी कोणास । आसक्त नर ॥७९॥
आणि कोणी निरासक्त असला । संन्यास घेवोनि वनी गेला । तोहि नाही उपयोग आला । समाजाच्या ॥८०॥

गृहस्थाश्रमासि नाही जाणले । ज्याने त्याने मनानेच केले । यानेच कार्य विस्कळीत झाले । समाजाचे ॥८१॥
गीतेने यथार्थ ज्ञान दिले । परि ते जनमनाने नाही घेतले । रूढीच्या प्रवाही वाहू लागले । विसरले सर्वभूतहित ॥८३॥
ब्रह्मचारी अभ्यासचि करी । वानप्रस्थ वनींच विचरी । संन्यासी निरासक्तीच्या भरी । विटाळ मानी जगाचा ॥८३॥
ऐसेचे झाले धोरण आजचे । त्यामुळे ओझे वाढले गृहस्थाश्रमाचे । प्रत्येकाने प्रत्येकाचे । पूरकत्व सोडले ॥८४॥
सर्वानी सर्वचि सोडले । परि गृहस्थाने अधिक जोडले । कष्ट करिता करिता मोडले । हाड त्याचे ॥८५॥
सर्वानाचि मदत करावी । पुन्हा दीनताचि अंगी घ्यावी । वरोनि त्यासि म्हणे गोसावी । ” लटका संसार छोड दे ” ॥८६॥
हे सर्व सहन करोनी । आपुली हौस त्रास विसरोनि । जगाची राखी लाज देऊनि । धनमानादि ॥८७॥
स्वतः शरीराने राबावे । आपुले जीवन आपण निभवावे । अधिकाधिक देतचि जावे । गावासाठी ॥८८॥
साधु आला संत आला । राजा आला रंक आला । अतिथि पाहूणा भुकेला । सर्वासाठी गृहस्थाश्रम ॥८९॥
करी आलेल्यांचा सत्कार । संतसाधूंचा सन्मान सुंदर । सार्वजनिक कामाचाहि बोझा वर । सांभाळीतसे प्रेमाने ॥९०॥
आला जातिदंड राजदंड । तोहि भरतसे उदंड । मुंगीपासूनि सर्व ब्रह्मांड । जीवजन त्याचेवरि ॥९१॥
हे सर्व गृहस्थाश्रम करी । मुलेबाळे पोसोनि घरी । काटकसरीने उरवूनि करी । अन्न्दान नम्रतेने ॥९३॥
गृहस्थधर्म म्हणजे जबाबदारी । स्त्रीपुत्रांपरीच सर्वतोपरी । देश -भेष सांभाळणारी । वृत्ति असे त्याची ॥९३॥
येरव्ही असोत सर्व आश्रम । सर्वात मोठा गृहस्थधर्म । गृहस्थधर्मावरील योगक्षेम । चालतसे सर्वाचा ॥९४॥
ब्रह्मचर्याची शिक्षादीक्षा । वानप्रस्थांची तितिक्षा । संन्यासी ज्ञात्यांची समीक्षा । गृहस्थधर्माच्याचि योगे ॥९५॥
त्यासचि लोक फजूल म्हणती । आणि त्याचेवरीच जगती । ही कैसी आहे रीति संसाराची ! ॥९६॥
म्हणोनि संती गृहस्थ गौरविला । धन्य धन्य म्हणितले त्याला । तोचि जगाचा मातापिता ठरला । पालनपोषण करणारा ॥९७॥
त्याचे उपकार येरव्ही फिटेना । एकचि आहे त्याची साधना । गृहस्थाचे पुत्र जाणा । शिकवोनि स्थाना बसवावे ॥९८॥
लहानपणीच आश्रमी न्यावी मुले । जैसे विश्वमित्रे रामलक्ष्मण नेले । सांदीपनी द्रोणांनी शिकविले । तैसे विविध ज्ञान द्यावे ॥९९॥
माधुकरीपुरतेचि गावी न यावे । गावाचे जीवन सुधारावे । घृणा करिता नरकी जावे । लागेल अहंकारे ॥१००॥

जोवरि हवे आहे शरीर । आवश्यक वाटे अन्नवस्त्र । तोवरि न म्हणावा मिथ्या संसार । सेवा करावी सर्वाची ॥१०१॥
गुरु म्हणोनि न गुरगुरावे । आत्मवत सर्वासि जाणावे । उठण्या बसण्यापासूनि शिकवावे । आईसारिखे अज्ञजना ॥१०३॥
आपापले कार्य सर्वानी करावे । परस्पराना पूरक व्हावे । म्हणजे जगाचे ओझे जावे । झेलले सहज ॥१०३॥
आश्रमांनी मुले शिकवावी । गृहस्थांनी मदत पुरवावी । मुले वाढता पित्याने घ्यावी । परवानगी पुत्रांची ॥१०४॥
जावे देशपर्यटनी । अथवा राहावे ग्रामसुधारणी । पुढे संन्यासीहि होऊनी । सेवाभावेचि वागावे ॥१०५॥
आपले पोट सर्वानी भरावे । वृत्तीसि कार्ये वाढवीत न्यावे । म्हणजे गृहस्थावरि अवलंबावे । ऐसे नव्हे ॥१०६॥
आपपले कार्य सांभाळावे । जीवमात्रासि संतुष्ट करावे । कोणीच कोणावरि न राहावे । विसंबोनि ॥१०७॥
मग पुढे सर्वचि आहे सेवा । कार्य करावे जीवाभावा । उरला असेल तो सगळा ठेवा । वाटूनि द्यावा गावासि ॥१०८॥
कोण कोण देतो सेवाधन । आपुले कार्य सांभाळून । यावरीच खरे महिमान । लौकिकाचे आपुल्या ॥१०९॥
ऐसी आहे परंपरा । जेणे चाले जगाचा पसारा । वेगवेगळ्या कामाचा बटवारा । सारखाचि व्हावा ॥११०॥

जेथे सर्वासीच काम करणे । कोणीच उत्तम कनिष्ट न म्हणे । सर्व मिळोनी जग साजविणे । आपुल्यापरी ॥१११॥
मानावे सकलांचे आभार । करावा परस्परासि पूरक व्यवहार । असो संन्यासी वा गृहस्थ नर । सारखा अधिकार सर्वाचा ॥११३॥
गृहस्थ तनुमनाने कष्ट करिती । संन्यासी त्यांना दिशा दाविती । मग का उगेचि पाया पडती । एक -एकाच्या ? ॥११३॥
मला हे काही उमजेना । कोणाचे उपकार आहेत कोणा ? सर्वचि आपापुल्या स्थाना । धन्य असती ॥११४॥
पुत्रधर्म पाळता पुत्र श्रेष्ठ । पितृधर्म पाळता पिता वरिष्ठ । तेथे म्हणावे श्रेष्ठ कनिष्ट कोणी कोणा ? ॥११५॥
पाया तयानेच पडावे । ज्याने आपुल्या कर्मासि चुकावे । नाहितरि प्रेम ठेवावे । परस्पराचे दोघांनी ॥११६॥
कोणी कोणासि न लेखावे हीन । तो असे सर्वेश्वराचा अपमान । अभिमानि संन्याशाहूनि महान । ठरे लीन पतिव्रता ॥११७॥
येरव्ही कोणाचाहि आदर । सर्वानी करावा होऊनि नम्र । हा तव आश्रमधर्माचा सार । अहंकार नसावा ॥११८॥
हीनतेची भावनाहि नसावी । निष्ठेने सत्कार्ये करावी । सहकार्य द्यावे आपुल्या गावी । गृहस्थाने ॥११९॥
आपुला साधावा गृहस्थाश्रम । पाळावा ग्रामसेवाधर्म । गावाकरिताच आपुला नेम । सांभाळावा ॥१२०॥
कष्ट करोनि धन जोडावे । ते धन सत्कार्यींच लावावे । कधीहि निरर्थक न वेचावे । छंदी कुणाच्या लागूनि ॥१२१॥
याचे मिळावया शिक्षण । व्हावे गावोगावी कथाप्रवचन । वाढवावा गृहस्थाश्रमाचा मान । नीटनेटका करावया ॥१२३॥
नेटका ऐसा प्रपंच झाला । तरि परमार्थ त्यातचि साधला । हा समन्वय संती सांगितला । तोचि खरा ग्रामधर्म ॥१२३॥
आमुचा गृहसंसारचि सार । आहे सहकार्याचे भांडार । सर्व मिळोनि उजळू सुन्दर । ग्रामधर्म आपुला ॥१२४॥
ग्रामधर्माचे महत्त्व थोर । त्यात गृहस्थधर्मांचा मोठा अधिकार । महातीर्थाचे तीर्थ सुन्दर । तुकडया म्हणे ॥१२५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु -शास्त्र -स्वानुभव संमत । निरूपला संसारांत परमार्थ । चौथा अध्याय संपूर्ण ॥१२६॥

ग्रामगीता अध्याय चवथा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading