ग्रामगीता अध्याय छत्तिसावा – 36 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्याय छत्तिसावा – 36
Gram Gita Chapter 36
ओवी संख्या :- १०६
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 36

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय छत्तिसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ३६
Gram Gita Chapter Thirty Six Commencement

—-🕉ग्रामगीता अध्याय 36 जीवन – कला

जीवन – कला
ईश्वर-अंश सर्व जीव । यत्न तोचि जणावा देव । ऐसे वदती संतग्रंथ, मानव । सर्वचि नित्य ॥१॥
परंतु पाहता जगाकडे । दिसती प्रकृति-भेदाचे पोवाडे । व्यक्ति तितक्या प्रकृतीचे पाढे । ठायी ठायी ॥२॥
वाटे ही निसर्गाचीच रचना । तेथे ठाव नाही प्रयत्ना । ऐसी धारणा बसली मना । श्रोतियांच्या ॥३॥
म्हणोनि करू निरूपण । ऐका ऐका श्रोतेजन ! प्रकृति ठायी ठायी दिसे भिन्न । परि ती स्वतंत्र म्हणो नये ॥४॥
प्रकृति पुरुषाच्या आधीन । त्याच्या इशारे करी नर्तन । बहु होण्याचा संकल्प पूर्ण । तीच भिन्न प्रकृति ही ॥५॥
परम पुरुष जो परमात्मा । त्याच्या शक्तीसि नाही सीमा । मानव त्याचीच प्रतिमा । अंशरूप निश्चये ॥६॥
म्हणोनि जीवात सामर्थ्य अनंत । अभ्यासाने प्रकटे निवांत । नलगे आत्मशक्तीचा अंत । कोणासहि ॥७॥
सर्व होते केले असता । सर्व मिळते धरिता हाता । अभ्यासे तव ब्रह्मसत्ता । पावती योगी ॥८॥
आणि अभ्यासाच्याचि बळे । भिन्न मार्गी वाढले जीव सगळे । जैसी श्रध्दा तैसी फळे । श्रध्दामय पुरुष म्हणोनि ॥९॥
जैसी श्रध्दा जैसा संकल्प । जैसा यत्न पुण्यपापरूप । तैसाचि जीव होई आपोआप । अभ्यासाने तयार ॥१०॥
नैसर्गिक दिसे प्रकृति-भेद । तो पूर्व अभ्यासानेच सिध्द । मुळी एक परि कलांनी विविध । जाहले जीव ॥११॥
पूर्व जन्मींची अभ्यासकला । तैसा या जन्मीचा यत्न आपुला । यांनीच भिन्नत्व आणिले जीवाला । नानापरी ॥१२॥
आपुली आपणा कला फळली । म्हणोनि प्रकृति भिन्न झाली । येथे निसर्गावरि बोली । देवोचि नये ॥१३॥
देवाने निर्मिली ही क्षिती । जिच्या पोटी अनंत जीव होती । न करवे तयांची गणती । गणित-मार्गाने ॥१४॥
निसर्गत: लाभले सारखे जीवन । परि कलेने भरले भिन्नपण । एक-एकशी मिळते गुण । क्वचितचि आढळती ॥१५॥
एकचि वस्तु विश्वी संचली । परि प्रकृतिगुणे भिन्न भासली । रचना बोली निराळी झाली । कला केली जीवांनी ॥१६॥
प्रत्येक जीवचि अवतार पाही । परि कोठे काही कोठे काही । एक आहे एक नाही । ऐसे वैशिष्टय सर्वत्र ॥१७॥
प्रत्येक जीव आपुल्यापरी । कलापूर्णतेने खेळे भूमीवरि । एक-एकाची स्वभाव-कुसरी । दुसरा पाहता दिसेना ॥१८॥
सृष्टीत खेळती जे जीव । पहा तयांचे लीलालाघव । अंग-अंग अभिनव । नाना तर्‍हा तयाच्या ॥१९॥
नाना कला नाना रंग । नाना स्वभाव नाना उद्योग । नाना वस्त्रे, भूषणे, उपभोग । भोगणारे निर्मिले ॥२०॥
निसर्ग नानापरी नटला । तो भिन्न जीवांच्या वाटयासि आला । प्रकृतीकडोनि साथ मिळाला । जीवाचिया कलेऐसा ॥२१॥
जीवात नखशिखान्त भरली कला । गुणावगुणांचा मेळा झाला । इंद्रिये भोगती वस्तूला । आपुलाल्या भिन्न भावे ॥२२॥
जीव आपणचि संकल्प करी । कल्पोनि आरोप वस्तूवरि । मग तदाकार होवोनि व्यवहारी । रागद्वेष पाहतसे ॥२३॥
ईश्वरनिर्मित एकचि सृष्टि । परि पाहणाराची भिन्न दृष्टि । आपुल्या भावे सुखी-कष्टी । होय व्यष्टि-समष्टीने ॥२४॥
ईश्वरनिर्मित स्त्रीरूप सत्ता । ती कुणाची माता कुणाची कांता । आपुल्या भावे सुखदु:खभिन्नता । भोगी जीव ॥२५॥
एकाच निसर्गसृष्टीवरि । जीव आपली सृष्टि करी । तैसेचि सुखदु:ख भिन्न अंतरी । अनुभवा येई ॥२६॥
रागद्वेषादि दृढ विकार । ऐकिले भोगिले त्यांचे संस्कार । हे घेवोनि जन्मती पुन्हा नर । आपापल्या कलेसह ॥२७॥
पूर्व अभ्यास, प्रयत्न, संकल्प । त्यापरी लाभे वेगळे रूप । जीवांच्या अनंत कलांचा गोफ । ती ही सृष्टि ॥२८॥
” बहु व्हावे ” हा ईश्वरी संकल्प । जीवांद्वारे घेई रूप । म्हणोनि दुजियांची ओढ आपोआप । जीवाअंगी ॥२९॥
एका जीवाचा भिन्न संकल्प । दुसर्‍या जीवाचा निराळा व्याप । परि प्रबल शक्तीचा कार्यकलाप । ओढोनि नेतो दुसर्‍यासि ॥३०॥


एकाहूनि दुसरा कलाधिकारी । अधिक टाकी मोहनी समाजावरि । आपुले मंत्र साजवी मधुरी । वाणी-वीणा वाजवोनि ॥३१॥
कोणी कल्पिली गायनकला । वाद्यकला चित्रकला तंतुकला । शब्दकला नृत्य शृंगारकला । मोहावया अन्य जीवांसि ॥३२॥
राहणे कला पाहणे कला । बोलणे कला हसणे कला । सर्वामाजी सौंदर्य-कला । ओतप्रोत दर्शवी ॥३३॥
कुणाचे मंजुळ बोल गोजिरवाणे । कुणाचे व्याघ्रापरी गर्जणे । रणकर्कशता जीवी बाणे । कलंकशोभा कोणाची ॥३४॥
कुणास पाहोनि मोह वाटे । कुणास पाहता येती काटे । कुणाचे देखता मुखवटे । छाती फाटे धीरांची ॥३५॥
कुणाची गंभीर मुद्रा सजली । वैराग्य येते दृष्टीच पडली । कुणाकडे पाहता वृत्ति गेली । विषय-वाटेने ॥३६॥
कुणास पाहता चीड दाटे । कुणाचा संग सोडता न सुटे । जीवभाव ओवाळावा वाटे । चरणी तयाच्या ॥३७॥
हा सर्व निसर्गचमत्कार नोहे । प्रत्येक कलेचे सामर्थ्य आहे । प्रयत्नशील मानवचि राहे । परि देव म्हणती तयासि ॥३८॥
कृष्णाचाचि मामा कंस । परि एक देव एक राक्षस । मुळी पाहता एकचि वंश । परि भेद केला कलांनी ॥३९॥
कला मानवासि देव बनविते । परि अवकळा नसावी जरा तेथे । पूर्णताहि कलेनेच येते । रमता अंगी आत्मबोध ॥४०॥
अवकलेने छी:थू: होते । कला येता देवत्व लाभते । जैसा प्रयत्न करावा तयाते । फळ येते याच देही ॥४१॥
विश्वामित्रे केली कला । राजर्षीचा ब्रह्मर्षि झाला । ब्रह्मवंशीय रावण राक्षस ठरला । मेला आपुल्या कलेने ॥४२॥
रावणे कला संपादिली । देवदेवता प्रसन्न केली । आपुली शक्ति वाढवोनि घेतली । कलाकुसरीने ॥४३॥
परि ती पचविता नाही आली । उपभोगाची भावना झाली । म्हणोनि कला अवकळा पावली । अहंकारे ॥४४॥
कुंभकर्णे सुखमार्ग धरिला । आहारनिद्रेची वाढविली कला । क्रूरपणाचा खेळचि झाला । नाश पावला सर्वासह ॥४५॥
तोचि बिभीषण कला शिकला । रामनामी रंगोनि गेला । राम धावोनि घरी आला । सौख्य दिले अंतर्बाह्य ॥४६॥
दिले लंकेचे राज्य हाती । परि नाही उपभोगाची प्रीति । म्हणोनीच आजवरि कीर्ति । अमर तया सज्जनाची ॥४७॥
कलेचे ऐसे तीन प्रकार । राजस, तामस, सात्विक सुंदर । जो जयासि सजवी चतुर । तो ओळखावा त्या गुणाचा ॥४८॥
या सकळामाजी जीवनकला । सात्विकतेचा प्रवाह भरला । मोहवूनि प्रेमाने सकला । कीर्तिमार्ग दावी भूलोकी ॥४९॥
एरव्ही सर्वातचि आहे कला । एक चातुर्ये खाय एकाला । मोठी खातो लहानाला । नियम ऐसा जीवनी ॥५०॥


परि हा नियम मानवी नाही । पशुपक्ष्यांना शोभे सर्व काही । अंडज जारज उदभिज स्वेदजहि । याच मार्गी ॥५१॥
याच मार्गे मानव गेला । तेणे जगी हाहा:कार झाला । ” बळी तो काळ पिळी ” या बोला । जीवनकला म्हणो नये ॥५२॥
सामुदायिक वृत्तीविण । जगी टिकले प्राणी कोण ? जगावे जगवावे जीवजन । हीच खरी जीवनकला ॥५३॥
हेच वैशिष्ठय मानवाचे । जगी सौख्य नांदवी साचे । त्याविण सार्‍या प्रगतीचे । मंदिर मिळे धुळीमाजी ॥५४॥
म्हणोनि सर्व जीवांची कला वेगळी । जगावे दुसरे घेवोनि बळी । परि मानवांची कला निराळी । उन्नत करी दुर्बलाहि ॥५५॥
पशुपक्ष्यांचे नर्तन गायन । मानव सर्वातचि झाला निपुण । परि तयाचे मानवपण । असे भिन्न सर्वाहूनि ॥५६॥
तो कातिणीपरी काती-विणी । कोकिळेपरी गाई गाणी । मत्स्यापरी तरे जीवनी । उडे गगनी पक्ष्यांपरी ॥५७॥
मधमाशीपरी संचय करी । मुंग्यासारिखे किल्ले उभारी । रंग बदली सरडयापरी । नृत्य करी मोराऐसे ॥५८॥
फुलपाखरांचे धरी वेष । चिमण्यांपरी घरटयांची हौस । ऐशा सर्वचि कला साधती त्यास । परि त्याची कला निराळी ॥५९॥
तो राहतो नीटनेटका । वाया न धाडी आपुला पैका । सर्वा सांभाळितो सारखा । आपुल्यापरी ॥६०॥
मनुष्य स्वभावेचि भिन्न पडतो । तो सर्वासीच सांभाळितो । मर्यादेने वागत जातो । सदधर्माच्या ॥६१॥
विवेक-बुध्दीने चालतो । पडलेल्यासि उचलोनि घेतो । दुसर्‍याचिया हितास्तव जातो । बळी प्रसंगी ॥६२॥
देतो सर्वासि आपुला हिस्सा । गावी न यावी म्हणोनि अवदशा । त्याचे कुटुंब गावचि सहसा । वाटे तया ॥६३॥
आपण जे जे काही करावे । त्याने इतरासि दु:ख न व्हावे । अहर्निशी ऐसेचि वर्तावे । आवडे तया ॥६४॥
दूरदृष्टीचा विचार धावे । कार्यकारण तयासि ठावे । व्यक्तिऐसे विश्व सुखी व्हावे । म्हणोनि करी कष्ट नाना ॥६५॥
ऐसे करन्यासि जे जे चुकले । ते मानवचि नव्हती भले । मानवदेही जन्मासि आले । परि राहिले पशूचि ते ॥६६॥
जे जे असेल माझ्या घरी । सगळया सुख लाभावे तयाचि परी । ऐसी चिंता नित्य करी । तोचि धन्य मानव ॥६७॥
तो आपुली कलाकुसरी । सर्वाचिया जीवनी भरी । शोषण पतन कुणाचे न करी । आपुल्या कलेने ॥६८॥
कलेकरिता कला न ठेवी । जीवनासि कला भूषवी । आपण सजवूनि दुसर्‍या दाखवी । मनुष्यपण गोड शब्दे ॥६९॥
लोभासाठी गोड बोलणे । ही जरी कला घेतली कोणे । तरि ते जाणावे दु:खदवाणे । प्रेमळपण दिसे जरी ॥७०॥


कोणी विषयासाठी नटला थटला । तोंडा रंग फासोनि फिरला । तरी अंतरीच्या काळिमेला । बघती जन तयाच्या ॥७१॥
कोणी शिकला चातुर्यकला । साहित्य अभिनय मोही जगाला । परि तेणे स्वार्थापायी घातला । समाज पतनी ॥७२॥
कोणी नृत्यगायन नटविले । चित्रादि कलांना शृंगारिले । म्हणती आम्ही मानवा केले । उन्नत ऐशा कलांनी ॥७३॥
परि पाहता अनुभव आला । मानव क्षुद्र वृत्तींनी घेरला । याचे कारण बाजार झाला । स्वार्थापायी कलांचा ॥७४॥
प्रत्येक कलाकौशल्यामागे । सदगुणांची असती अंगे । परि तेवढेच विसरती जन संयोगे । घेती त्यातूनि वाईट ॥७५॥
याचे कारण एक आहे । समजदार प्रलोभनी दंग राहे । तेथे उपायचि होती अपाय । रंगविले किती तरी ॥७६॥
परि ती कला नव्हे-करंटेपण । तो शृंगार नव्हें-ते मरण । मधुर बोलणेहि जहरासमान । वाटे कळता अंतरीचे ॥७७॥
अंतरीचे दिसती डोहाळे । क्षणोक्षणी वरि उफाळे । काय होते बोलोनि प्रेमळे । कलाकुसरीचे ? ॥७८॥
हा दंभ विसरायाची कला । जो कोणी साधकजन शिकला । त्यासीच लोक मानिती भला । सदभावाने ॥७९॥
त्याची प्रत्येक कला निर्मळ । अनुपाने विषहि दे अमृतफळ । मानवतेचे वाढवी बळ । तीच कला महाथोर ॥८०॥
मुख्य कलेची सांगता । असावी लागते तारतम्यता । सदा सावध असावा माथा । उन्नतीसाठी सर्वाच्या ॥८१॥
मग कला मागे धावती । न कळत्या खुणा कळो येती । जीवनकला पाववी सुमति । सर्वागीण उध्दाराची ॥८२॥
कुणाचे बिघडले सुधारावे । कुणाचे भांडण तोडोनि द्यावे । कुणासाठी योजनाबध्द व्हावे । मार्ग सांगावया ॥८३॥
हीच खरी कला शिकावी । यानेच जीव तरतील भवी । मरणावरीहि कीर्ति रहावी । कलाकाराची ॥८४॥
एरव्ही चौदा विद्या चौसष्ट कला । काय करावे शिकोनि गलबला ? जो दुसर्‍याच्या कामी न आला । व्यर्थ मेला अभिमानाने ॥८५॥
कमीत कमी गरजात राहिला । अधिकात अधिक उपकार केला । समाजाशी समरस झाला । तोचि खरा कलावंत ॥८६॥
ही जीवनकला ज्यांना गवसली । त्यांची मानवता विकास पावली । ” मानवी देव ” पदवी लाभली । सात्विक कलावंतासि ॥८७॥
जो ही ऐसी कला चुकला । तो गावी जगण्यासचि मुकला । सर्व संसार फाटका झाला । सहकार्याविण बिचार्‍याचा ॥८८॥
म्हणोनि बोललो मुख्य कला । मानवतेने सजविणे विश्वाला । सर्व मिळोनि संसार केला । पाहिजे हा स्वर्गापरी ॥८९॥
आपुले आपुले सर्व करा । सर्वाच्या सुखाचाहि मार्ग धरा । सर्वात आपुल्याहि सुखाचा झरा । दिसो लागे ॥९०॥


सर्व कलांहूनि श्रेष्ठ कला । सर्वात समरसता लाभावी जीवाला । दृष्टीसि जो जैसा दिसला । आनंद वाटला पाहिजे मना ॥९१॥
मनचि न व्हावे वेगळे । जे दिसते ते सुंदरचि सगळे । हे कळावया आत्मबळे । पाहिजे कला बोधाची ॥९२॥
आत्म्याची ओळखी ही कला । साधूनि विश्वाशी समरस झाला । तोचि कसोटीला लागला । शेवटी पूर्णत्वाच्या ॥९३॥
पूर्णत्वी दु:खदोषादि काही नाही । परि ही कला विरळाचि घेई । दु:खदोष निवारूनि जना पाही । तोहि थोर कलावंत ॥९४॥
ज्यासि आहे जगाचे भान । त्यावरि जगाची जबाबदारी पूर्ण । त्याने केलेचि पाहिजे दु:ख निवारण । समाजाचे स्वकलेने ॥९५॥
म्हणोनि ऐका करा उल्हासे । मानवमात्र सुखी व्हावे ऐसे । उणीव दिसता सहकार्य हर्षे । नेहमी करा सर्वाशी ॥९६॥
सर्वाशी सर्वाचा सहकार । हाचि आहे मार्ग थोर । गावी ये स्वर्गीयता सुंदर । याच कलेने निश्चयेसि ॥९७॥
ही मानव्याची जीवनकला । गावी शिकवा सर्वाला । मग उणे न पडे कोणाला । कधी काही ॥९८॥
योगियांची जीवनकळा । सत्रावीचा अमृतसोहळा । तैसी सुखी अमर करील मानवकुळा । कला ही गावी ॥९९॥
गाव होईल आरोग्यवंत । ज्ञानवंत सदभाग्यवंत । सहकार्यावरीच जग जिवंत । विचारे पाहता ॥१००॥
हजार साधनांहूनि अमोल । एक सहकार्यवृत्ति निर्मल । ही गावी फोफावू द्या अमरवेल । नाना प्रयत्ने ॥१०१॥
याने मानवा अंगीची शक्ति । प्रकट होईल महादीप्ति । सेवा करील निसर्ग-प्रकृति । सर्व जीवांची ॥१०२॥
जीव ईश्वराचे अंश । त्यांचे गावचि का राक्षस ? जिकडे तिकडे सुखसंतोष । नांदेल या प्रयत्नांनी ॥१०३॥
म्हणोनि शिका मानव्यकला । आत्मविकास साधा आपुला । आता पुरे हा गलबला । दैववादाचा ॥१०४॥
अनुभवे सांगतो तुम्हाप्रति । करू म्हणाल ते साधेल निश्चिती । करा करा आत्मोन्नति । तुकडया म्हणे ॥१०५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । जीवनकला कथिली उन्नत । छत्तिसावा अध्याय संपूर्ण ॥१०६॥
ग्रामगीता अध्याय छत्तिसावा समाप्त

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading