ग्रामगीता अध्याय एकोणतिसावा- 29 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्याय एकोणतिसावा – 29
Gram Gita Chapter 29
ओवी संख्या :- ११५
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 29

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय एकोणतिसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय २९
Gram Gita Chapter Twenty-Nine Beginning

—-🕉ग्रामगीता अध्याय 29 दलीत सेवा

दलीत सेवा
श्रोती शंका विचारिली । आपण सर्वधर्मी समानता केली । परंतु ” परधर्म भयावह ” बोली । गर्जविली गीतेने ॥१॥
स्वधर्मी मरण्यातहि श्रेय । परि परधर्मी आहे भय । मग धर्मांचा समन्वय । करिता कैसा ? ॥२॥
ऐका ग्रंथीचा दाखला । परधर्म भयावह जरी ठरला । तरी त्याचा अर्थ पाहिजे जाणला । श्रोतयांनी ॥३॥
हिंदु बुध्द मुसलमान । ख्रिस्ती पारशी अथवा जैन । ऐसे नव्हते नामाभिधान । धर्मासि तेव्हा ॥४॥
भिन्न धर्मांचा जन्महि नव्हता । मग परधर्म का सांगे गीता ? तेथे कर्तव्याचीच भिन्नता । ध्यानी तियेच्या ॥५॥
एकाची प्रकृति ज्या कार्याची । ज्या गुणांची स्वभावेचि । त्यासि गुणकर्मे दुसर्‍याची । साधती केवि ? ॥६॥
कोणात शक्ति कोणात युक्ति । कोणात ज्ञान, सेवावृत्ति । साधे त्याचि साधने करावी भक्ति । जनताजनार्दनाची ॥७॥
त्याने आपल्या प्रकृतिपरी । करावी राष्ट्राची चाकरी । दुसर्‍याचे कर्तव्य घेता शिरी । विनाश त्याचा ॥८॥
म्हणोनि परधर्म भयावह । ऐसे कथिले नि:संदेह । तुपात नोहे मत्स्याचा निर्वाह । पाण्याहूनि उत्तम जरी ॥९॥
स्वधर्म म्हणजे आत्मधर्म । आत्म्याचा स्वभाव सत्य ज्ञान प्रेम । यासाठीच करणे जीवनाचा होम । श्रेयस्कर हे सर्वा ॥१०॥
असत्य, अज्ञान, भेद-वैर । अन्याय, अत्याचार, दुराचार । हा अनात्मधर्म दु:खकर । परधर्म हा भयावह ॥११॥
आत्मवश ते ते सुख । परवश परतंत्र ते दु:ख । ऐसेहि धर्मग्रंथी अनेक । कथिले थोरांनी ॥१२॥
परधर्म म्हणजे विकरांधता । स्वधर्म म्हणजे न्यायसिध्दता । हे समजण्याचे तत्त्व हाता । दिले तयांनी ॥१३॥
आपुला म्हणोनि हृदयी धरावा । परका म्हणोनि दूर लोटावा । ऐसा ऋषिमुनींचा गवगवा । कोठेचि नाही ॥१४॥
मुसलमान म्हणता मारावा । ख्रिश्चन म्हणता हाकूनि द्यावा । आपला पापीहि छातीशी धरावा । हा नव्हे अर्थ स्वधर्माचा ॥१५॥
कोणी म्हणती आम्ही हिंदु । मुसलमानांचा अतिविरोधु । ख्रिश्चनासि कधी न वंदू । भाऊ म्हणोनि आपुला ॥१६॥
मी म्हणतो वंदन गुणासि आहे । जातिधर्मावरि काय ? हिंदु उघड पाप करिताहे । त्यासि मान का द्यावा ? ॥१७॥
मुसलमानाचे उत्तम वर्तन । तरी तो निंद्य मुसलमान म्हणोन । हे कोणी दिले न्यायदान ? सांगा सांगा श्रोतेहो ! ॥१८॥
ख्रिश्चन दूरदेशाहुनि आला । सेवा करता करता मेला । त्याने जरि धर्म नाही बिघडविला । तुमचा काही ॥१९॥
तरी त्यासि तुम्ही अव्हेरावा । हे म्हणणे नाही पसंत जीवा । तो आपुलाचि म्हणोनि राखावा । बंधुसखा ॥२०॥
जो कोणी सत्य सिध्दांती । ज्याची विश्वव्यापी प्रीति मति । तो असो कोणत्याहि धर्मजमाती । समजावा चित्ती आपुलाचि ॥२१॥


धर्म माणुसकीसि म्हणती । माणुसकी न्यायावरि शोधिती । न्याय कोणाच्याहि प्रति । एकचि राहतो सर्वदा ॥२२॥
परि ही दृष्टि मंद झाली । आप-पर भावना बळावली । तेणे धर्मपंथात फूट पडली । आत्मीयता दिसेना ॥२३॥
मूळतत्त्वे विलया गेली । महंती-बुवागिरी वाढली । सांप्रदायिक वृत्ति फोफावली । अज्ञानयोगे ॥२४॥
ऐसा प्रकार होत आला । म्हणोनि खरा धर्म मातीत मिळाला । आता उठणेचि त्या धर्माला । कठीण झाले ॥२५॥
गुणकर्माचा लोप झाला । स्वधर्म-परधर्म ठरेल कोठला ? गोंधळोनि समाज गेला । गर्तेमाजी भेदभ्रमे ॥२६॥
” विष्णुमय जग ” हाच स्वधर्म । ऐसे संती कथिले वर्म । तरीहि आमुचा न जाय भेदभ्रम । अमंगळ ऐसा ॥२७॥
” मानव ” हेचि आपुले नाम । मग स्वधर्म म्हणजे ” मानवधर्म ” । हे तरी ध्यानी घ्या सत्य वर्म । साध्या बोली ॥२८॥
आपण आहोत मानव । मानव्याचा वाढवावा गौरव । सुखी राहावेत आबालवृध्द सर्व । हेचि कार्य आपुले ॥२९॥
मज मान्य धर्म न्यायनीति । शुध्द चारित्र्य, प्रेमस्फूर्ति । करी जो समाजाची धारणास्थिति । समान भावे ॥३०॥
हे जोवरि वर्म नेणे । तोवरि धर्म हो कोणी म्हणे । ती अपूर्णतेची धर्मलक्षणे । समजो आम्ही ॥३१॥
मग घ्या कोणत्याहि ग्रंथाचे वचन । परि वर्म याहूनि नाही भिन्न । मानवता हीच आहे खूण । सर्व धर्म-समन्वयाची ॥३२॥
ज्या ज्या धर्मी मानवता । ते सर्व धर्म एकचि तत्त्वता । यासि विरुध्द नाही गीता । समतावादी कृष्णाची ॥ । ३३॥
कृष्ण म्हणे ” समं हि ब्रम्ह ” । समता हाचि ईश्वरी धर्म । समदर्शी तोचि पंडित उत्तम । योगाचे मर्म समत्वचि ॥३४॥
सर्वठायी वासुदेव । ऐसा भाव नव्हे अनुभव । दुर्लक्ष तो महात्मा, देव । बोलूनि गेला गीतेमाजी ॥३५॥
सर्व धर्म सोडोनिया । शरण जावे एका देवराया । सर्वव्यापक जाणोनि तया । हेचि वर्म उध्दाराचे ॥३६॥
सर्वाविषयी समभाव । सर्वाभूती वासुदेव । हे जाणे तोचि खरा मानव । सत्य धर्म हाचि त्याचा ॥३७॥
या दृष्टीने करी जे जे काही । ती सर्वेश्वराची पूजाच होई । जेथे आप-पर भेद नाही । समन्वयी चित्त आले ॥३८॥
मग तो असो कोणत्या जातीचा । पंथाचा वा धर्मजमातीचा । तो खरा स्वधर्मी सखाचि आमुचा । मानू आम्ही ॥३९॥
यावरि श्रोती विचारिले । आपण सर्व धर्मी समत्व कथिले । परि याचे फायदे घेतले । कुटिल जनांनी आजवरि ॥४०॥


कोणी युध्द करोनि लोका जिंकिले । बळेचि आपुल्या धर्मी ओढिले । कोणी प्रलोभनांनी मोहविले । वाटे का हे योग्य तुम्हा ? ॥४१॥
काही दूरदेशीचे लोक येती । सेवा करोनि प्रवेश मिळविती । भोळया जना नागविती । धर्मान्तरा करवोनिया ॥४२॥
वाढवोनि आपुले संख्याबळ । करावी सत्तेसाठी चळवळ । ऐसा डाव साधती सकळ । विधर्मी हे सेवेतूनि ॥४३॥
सर्व धर्मी समभाव । म्हणता धर्मान्तरासि मिळे वाव । येणे बुडेल राष्ट्राची नाव । सांगा उपाव यासि काही ॥४४॥
यावरि ऐकावे उत्तर । धर्म-समभाव आणि धर्मान्तर । ह्या गोष्टीत असे बहु अंतर । खरोखर नव्हे हे ॥४५॥
धर्मान्तराचा करिता विचार । ज्ञात्याचेचि योग्य धर्मान्तर । परि ज्यासि कळले सारासार । त्यासि धर्मान्तर कशासाठी ? ॥४६॥
ज्यासि कळले धर्मसमत्व । त्यासि बाह्य भेदांचे नुरे महत्त्व । मग तो स्वधर्मीच आचरील तत्त्व । पाहिजे ते ते ॥४७॥
न करील कोणावरि आक्रमण । न होईल कोणाच्या आधीन । लोभे भये परधर्मग्रहण । हे अध:पतन वाटे तया ॥४८॥
दुसर्‍या धर्मासि युध्दे छळिले । त्यासि धर्मसेवा नाम दिले । हे महापातक असे बोलिले । यापूर्वीहि निश्चयाने ॥४९॥
तैसाचि जो समान अज्ञानी । त्यासि विधर्मी नेले मोहवूनि । त्यायोगेहि उन्नति कोठूनि ? ते तो सोंग बहुरूप्याचे ॥५०॥
मानवी स्वभाव प्रेमाचा भुकेला । काही गरजांमुळे वश झाला । तरी त्याचा फायदा असला । घेऊ नये दुसर्‍यांनी ॥५१॥
कोणीहि सेवा करायासि यावे । परि धर्मान्तर मोहाने करवावे । आपले जनगण वाढवावे । हे तो दुष्ट राजकारण ॥५२॥
धर्मवर्मे एकचि असती । परि हे राजकारण त्यात गोविती । संख्याबल वाढवोनि करिती । परस्पराचा वैरभाव ॥५३॥
धर्मप्रचाराचे नांवाखाली । राज्यसाधना आतूनि घाली । त्याची जातचि समजावी भ्रष्ट झाली । धर्मातूनि ॥५४॥
तो नव्हे कोणत्याहि धर्माचा । स्वार्थ साधणेचि धर्म त्याचा । अव्हेरूनि द्यावा जिवाभावाचा । असला तरी ॥५५॥
तैसाचि न ओळखता स्वत्व । दुसर्‍यांचे मानोनि महत्त्व । उगीच परधर्मी घे धाव । नाही ठाव त्यासि कोठे ॥५६॥
समजोनि तत्त्व सर्वात मिळावे । परि पोटाकरिता धर्मा न सोडावे । आत्ममार्ग न समजताचि करावे । कासयासि हे सारे ? ॥५७॥


ऐसे जेथे जेथे झाले । त्यांना कलंकचि लागले । पाहतांना आजहि दिसले । अनुभवियासि ॥५८॥
येथे आपणहि आहो कारण । याचे असू द्यावे स्मरण । खर्‍या धर्माचे सक्रिय ज्ञान । कोण देतो दीन जना ? ॥५९॥
लोक धर्म-धर्म ओरडती । प्रसंग पडल्या कामी न येती । संग्रह असोनि चित्त पाहती । आपुलियांचे ॥६०॥
धर्माचा बाळगती अभिमान । परि धर्मबांधवा नाही स्थान । कुत्र्यामांजराइतुकाहि मान । न देती तया धर्मलंड ॥६१॥
मानवाचा स्पर्शहि पाप । मानूनि त्यासि करिती दु:खरूप । विधर्मी जाता मानिती बाप । त्यासीच मग ॥६२॥
दीनदलितांची तहानभूक । दीनदलितांचे सुखदु:ख । काहीच नेणती अभिमानी मूर्ख । स्वधर्म-घोक चालविती ॥६३॥
सर्वाठायी म्हणती ब्रह्म । परि भ्रमासारिखे करिती कर्म । ऐसे नाही धर्माचे वर्म । बोलिले संती कोठेहि ॥६४॥
परि हे शिकवाया उपदेशक कुठले ? कोण लोकास समजावी भले ? हे तो सर्वाचि लागले । पोटापाण्यासि धर्मनावे ॥६५॥
पोटपुजार्‍यांनी केला प्रचार । आपुल्या लाभाचा व्यवहार । मानवांमाजी पाडले अंतर । व्यक्तिसुखासाठी ॥६६॥
हे सर्व आडाणपण । जोवरि जाणार नाही मानवांतून । तोवरि जगाची उन्नति पूर्ण । होणे कठिण समजावे ॥६७॥
त्यासाठी एकचि करावे । आपापले धर्मक्षेत्र सुधारावे । सकळांसीच सकळाचे द्यावे । तत्त्वज्ञान समजावोनि ॥६८॥
हे ज्या धर्मास जातीस फावे । तेणेचि सुखसोहळे बघावे । यासाठी अनेक प्रयत्न करावे । जाणत्या जनांनी ॥६९
काहीनी करावा आदिवासी-सुधार । जावोनि रानी खेडयांवर । पाहावे गरीब लोकांचे कुटीर । कैसे आहे ॥७०॥
गरीब जंगली आदिवासी जाती । झाडपालेचि नेसोनि राहती । झाडाखालीच असते वसती । कित्येकांची ॥७१॥
त्यासि बोलणे चालणे समजेना । भिवोन पळती बघताचि आपणा । प्रेम लावोनि त्या कुटुंबांना । करावे आपण आपलेसे ॥७२॥
त्यांना औषधपाणी पुरवावे । लिहिणे वाचणेहि शिकवावे । उत्सवी सहभोजनी मिसळावे । कार्यकर्त्यांनी ॥७३॥
जनी भोजनी मंदिरी । अस्पृश्यतेचीहि न उरावी उरी । स्थान-मान सर्वतोपरी । एक करावे सर्वाचे ॥७४॥
स्वच्छ राहणी निर्व्यसनी । शिकवावी स्वये त्यात मिसळोनि । तुच्छ न मानावे दुरोनि । उणीव दावोनि परभारे ॥७५॥
दूर कराव्या अडी-अडचणी । सुविचारांची करावी पेरणी । सर्वचि समाज समानगुणी । करावा नाना प्रयत्ने ॥७६॥
आजवरि यांची केली उपेक्षा । प्रायश्चित्त म्हणोनि सेवादीक्षा । घेवोनि त्यांची वाढवावी कक्षा । संधि देवोनि सदभावे ॥७७॥
जे कोणी असती अडले-नडले । रंजले-गांजले रोगे पिडले । त्यासाठी पाहिजे धाम निर्मिले । सुखशांतीचे, आरोग्याचे ॥७८॥
क्षय अथवा कुष्टरोग । हे न मानिता दैवाचे भोग । त्यांच्या निवारणाचे प्रयोग । केले पाहिजे गावोगावी ॥७९॥
भंगलेल्या मानवी मूर्ति । यांच्या सेवेतचि ईश्वरभक्ति । आर्तासि दिल्यावाचूनि शांति । मागता मुक्ति मिळे कैसी ? ॥८०॥


जीवनातूनि जे जे उठले । त्याशी सहृदयपणे पाहिजे भेटले । अनाथांचिया सुखास्तव झटले । तेचि आवडले देवधर्मा ॥८१॥
अंध पंगु मूक बधीर । अशक्त अपंग निराधार । या ईश्वरी चित्रा रंगविती सुंदर । ते ते थोर धर्मशील ॥८२॥
विधर्मी लोक हे कार्य करिती । म्हणोनि जनांची जडते प्रीति । किळस आळस आमुच्या चित्ती । अधोगति आमुची ही ॥८३॥
सोडोनिया ऐसा स्वभाव । आपण सेवेसि अर्पावा जीवभाव । दलितसमाजा मानोनि देव । सेवा करावी हाचि धर्म ॥८४॥
हाचि धर्म संती आचरिला । जनी जनार्दन ओळखिला । निर्लोभ प्रेमे सजविला । विश्वबगीचा ॥८५॥
धर्मावतार रामकृष्ण । जटेने झाडी अस्पृश्यांचे अंगण । एकनाथ केले भोजन । कडे मिरवोन बाळ त्यांचे ॥८६॥
चैतन्य महाप्रभूने हृदयी । आलिंगिले दलित, रोगीहि । गांधी येशूने तोषविले कुष्टदेही । सेवा करोनि ॥८७॥
विधवा अनाथ-अपंगसेवा । पैगंबरे मानिला पुण्यठेवा । जातिभेदाचा झुगारिला गवगवा । बुध्द गौतमाने ॥८८॥
श्रीरामे शबरीची खादली बोरे । गुहका आलिंगिले प्रेमभरे । मित्र केली आदिवासी वानरे । अहिल्येसि उध्दरिले ॥८९॥
श्रीकृष्ण गोवळयात नांदला । स्त्रीशूद्रांचा कैवारी झाला । जांबवतीशी विवाह केला । आदिवासी जमातीच्या ॥९०॥
भीष्माचिया वडिलाने । वरिले कोळियाच्या कन्ये । ऐसी शेकडो प्रमाणे । सापडती पूर्व ग्रंथी ॥९१॥
सीता शकुंतला कर्ण कबीर । ऐसे अनाथ कन्यापुत्र । समाजे सांभाळिता झाले थोर । तैसेचि अपार ऋषिजन ॥९२॥
ज्ञानदेव नामदेवादि संती । आलिंगिले दलित समाजाप्रति । किती प्रगटल्या भक्तमूर्ति । मागासलेल्यात त्याकाळी ॥९३॥
संत चोखोबाचे सारे घर । झाले भक्तीचे मंदिर । उपेक्षिल्या समाजी देवत्व थोर । देता संस्कार प्रगटे ते ॥९४॥
सजन कसाई, रविदास चांभार । दादू पिंजारी, गोरा कुंभार । कान्होपात्रा, जनी, वंका महार । उदया अपार आले ऐसे ॥९५॥
तैसेचि आजहि उदया येती । घरोघरी नामांकित पुरुष-युवती । त्यासाठी केली पाहिजे उन्नति । गादलेल्या समाजांची ॥९६॥
महात्मा गांधी, ज्योतिबा फुले । यांनी मर्म हे ओळखले । दलितोन्नतीचे कार्य केले । कर्तव्य आपुले तेचि असे ॥९७॥
मानवे मानवा समान समजणे । परस्परा उन्नत करणे । संसारासि या आनंदे भरणे । हीच खरी धर्मसेवा ॥९८॥
कोणी कोणास त्रासवू नये । कोणी कोणास फसवू नये । कोणी कोणास दुरावू नये । आपुले म्हणावे सगळेचि ॥९९॥
पाहाव्या त्यांच्या सुखसोयी । वागणूक सर्वाशी ठेवावी न्यायी । भेदभावना समूळ जाई । जीवन ऐसे निर्मावे ॥१००॥


मग त्यांचा विश्वास जडे । त्यांना आपला स्वभाव आवडे । वळेल तुम्ही म्हणाल तिकडे । मन तयांचे ॥१०१॥
हेचि आहे धर्मसेवा । करावी आपण धरोनि सदभावा । मागासल्या सर्वचि बांधवा । बंधु समजोनि शिकवावे ॥१०२॥
पडित रान हे उठवावे । फुलाफळांनी बहरू द्यावे । आहारी जाऊच न द्यावे । कोणाचिया कोणा ॥१०३॥
परि अन्य धर्मांशी वितंडावे । कोणी कोणाचे दोष मांडावे । हे स्वार्थबुध्दीचे वणवे । चेतवू नयेत सेवकांनी ॥१०४॥
आपुला पिता जरी वंद्य । तरी इतरांचा तो न होय निंद्य । हेचि धर्माचे सूत्र आद्य । सर्व धर्मी समभावनेचे ॥१०५॥
ही दृष्टि सर्वासीच द्यावी । समाजी मानवता वाढवावी । म्हणजे धर्म-भेदांची भ्रांति गावी । उरणार नाही ॥१०६॥
साधनांमाजी उत्तम साधन । संस्कारे तयार करावे मन । सेवामार्गे मनी घुसोन । सर्व लोकांच्या ॥१०७॥
कलापथक प्रवचन कीर्तन । तुंबडया पोवाडे पुराण । नाटकादि प्रत्येक साधन । याच कार्यी योजावे ॥१०८॥
जे जे ज्यासि असेल ठावे । ते ते समाजा शिकवीत जावे । जीवजनास फायदे द्यावे । मानवधर्म म्हणोनि ॥१०९॥
खरा धर्म जाणतील लोक । तरि अनेकांतहि पाहतील एक । मग न गडेल परकीयांची मेख । स्वार्थभावनेची ॥११०॥
यासाठी भजन-संकीर्तन । उत्तम लोकशिक्षणाचे साधन । प्रपंच-परमार्थ धर्म-ज्ञान । शिकवावे संपूर्ण त्यातूनि ॥१११॥
आपुल्या गावचा कोणी प्राणी । मुळीच न ठेवावा अज्ञानी । हीच खरी गावाची बाणी । पुरवा झटूनि सेवकांनो ! ॥११२॥
हेलावता सदधर्माचा सागर । धर्मनद्या होतील एकाकार । मग कोठे धर्म धर्मान्तर ? द्या संस्कार ऐसे सर्वा ॥११३॥
भ्रामक रूढयांच्या कल्पनांतून । वर येऊ द्या धर्मनिधान । त्यासाठी योजा भजनादि साधन । जागवा जन तुकडया म्हणे ॥११४॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । दलित सेवा कथिली येथ । एकोणतिसावा अध्याय संपूर्ण ॥११५॥

ग्रामगीता अध्याय एकोणतिसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading