ग्रामगीता अध्याय पंचविसावा – 25 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्याय पंचविसावा – 25
Gram Gita Chapter 25
ओवी संख्या :- ११६
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 25

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय पंचविसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय २५
Gram Gita chapter twenty-fifth beginning

—-🕉ग्रामगीता अध्याय 25 देव-देवळे


देव-देवळें
विचारांनी असती उदार । साधुसंत थोरथोर । तेथे नाही भेद-संचार । कोण्याहि प्रकारे ॥१॥
परंतु त्यांचे पंथानुयायी । आपुलालीच लाविती घाई । भिन्न भिन्न त्यांचे देवहि । एक न मिळती एकाशी ॥२॥
वेगळे देव वेगळे धर्म । वेगळाले त्यांचे उपासनाकर्म । सांगा होईल कैसा संगम । भावनांचा त्यांच्या ? ॥३॥
संतांचे घेतले संमेलन । तेवढयापुरते झाले मिलन । परंतु नित्याच्या उपासनेने । वाढे अंतर सर्व जनी ॥४॥
ज्याचा विशेष बोलबाला । जेथे संपत्तीचा पेल झाला । लोक भजती त्याचि दैवताला । कोणी दूजाला कवटाळिती ॥५॥
यासि नित्यासाठी उपाय । सांगा सहजप्रभावी काय ? जेणे संस्कारचि होतील एकमय । आत्मीयतेचे ॥६॥
श्रोतियाचा प्रश्न मार्मिक । गाव-हितासि आवश्यक । संतांऐसेचि देवाचे ऐक्य । साधले पाहिजे ॥७॥
आपापले धर्म-कर्म-देव । भिन्न समजती मानव । तेणे असोनि एकचि गाव । झाले भाव वेगळे ॥८॥
आपुलाले चिन्ह ठेवावे । त्यावरोनि संप्रदाय ओळखावे । म्हणोनि मांडिले दुकान बरवे । आपापले या पंथांनी ॥९॥
एक म्हणे राम मोठा । दुसरा म्हणे कृष्ण मोठा । तिसरा म्हणे शंकरचि मोठा । सर्वाहूनि आमुचा ॥१०

कोणी म्हणती देवी मोठया । कोणी पूजिती मानविणी नरोटया । कोणी म्हसोबा-बहिरम-सोटया । थोर म्हणोनि तंडती ॥११॥
कोणी म्हणती हरिहर । कोणी वंदिती नाल्याहैदर । कोणी पूजिती सर्पव्याघ्र । कोंबडी-बकरी देवोनि ॥१२॥
काही सोनियाचे देव करिती । वेळ पडल्या विकोनि खाती । ऐसी आहे देवाची फजीती । पूजकांमागे ॥१३॥
काही देवासि बलिदान देती । देवीच्या मिसे मांस खाती । तीर्थ म्हणोनि मद्य पिती । पिसाळलेले ॥१४॥
देव देवळी दगडाचा । देवपाट करिती सोनियाचा । धाक पडे चोरटयांचा । म्हणोनि पहारे देवुळी ॥१५॥
आपापल्या हौसेचे शृंगार । चढवोनि देती देवावर । मग शृंगारावरीच टपती नेत्र । देव काही दिसेना ॥१६॥
एक म्हणती गळा सुंदर माळ । एक म्हणती रत्नमुकुट झळाळ । एक म्हणती सोनियाची प्रभावळ । देवाभवती शोभली ॥१७॥
एक म्हणती सुवर्ण-सिंहासन । एक म्हणती भरजरी शालू पूर्ण । एक म्हणती केशर कस्तुरीलेपन । कंठी नवरत्न देवाच्या ॥१८॥
काही म्हणती देव उठला । आता बसला आता जेवला । विश्रांति आता करू लागला । विडा घेवोनि एकांती ॥१९॥
देवासि झोपवा मखमलीवरि । दारे लावूनि घ्या बाहेरि । पाउले न चुरता कोमल करी । झोप त्यांना लागेना ॥२०॥

सारांश आपणासि जे आवडे । तेचि देवादिकासि पुरवावे लाडे । मगचि देवाची प्रसन्नता घडे । ऐसे काही मानिती ॥२१॥
मग ते असोत दुर्गुण सदगुण । याचा विचार करतो कोण ? अंधश्रध्देच्या प्रवाही लागून । तैसेचि चालती पुढे पुढे ॥२२॥
पदसेवन, अर्चन, वंदन । दास्य, सख्य, आत्मनिवेदन । यांचा बहिरंग अर्थ घेवोन । भक्ति करिती सोंगाऐसी ॥२३॥
कोणी विरहभक्तीत रंगती । कोणी संगभक्ति अवलंबिती । कोणी आत्मभक्तीची करिती स्तुति । वाटेल तैसी ॥२४॥
कोणी अल्ला बडा की राम बडा । हेचि वितंडिता धरिती नरडा । फोडिताति कडाकडा । मूर्ति हाती धरोनिया ॥२५॥
येशूभक्त निंदा करी । म्हणे हिंदूचा देव व्यभिचारी । सोळा हजार करी नारी । कसला देव ? ॥२६॥
करावयाचे ते कोणी न करी । भांडणे करिती घरोघरी । वा रे ! मूर्तिपूजेची थोरी । कळली लोका ॥२७॥
देवाकरिता करोनि भांडणे । कोर्ट-कचेरीमाजी जाणे । ” सत्य बोलतो ” म्हणोनि शपथ घेणे । देवादिकांची ॥२८॥
ऐसे ज्याने त्याने असत्य केले । म्हणोनि जन नास्तिक झाले । म्हणती काय होते देव पूजिले । कितीहि तरी ? ॥२९॥
समजण्याची दृष्टीच गेली । म्हणे देवाची प्रतिष्ठा काय उरली ? वरि बैसोनि लघवी केली । उंदिराने ॥३०॥

उलट कोणी म्हणे देव जागृत । भाव धरिल्या पावे त्वरित । मी म्हणेन भाव तेचि दैवत । का न म्हणावे ? ॥३१॥
एके ठिकाणी देव जागृत । बाकी ठिकाणी काय भूत ? । कैसी झाली समजूत । उलटी आमची ! ॥३२॥
लोकी जो हा दुजाभाव झाला । तो पुजारी-पंडेगिरीने केला । शास्त्रेहि लावोनि आधाराला । समाज नेला अधोगती ॥३३॥
यासीच म्हणविले देवपूजन । पुजारी सांगतील जे जे कथून । भाविक ठेवोनि बुध्दि गहाण । करिती, कळे देव कैसा ? ॥३४॥
जैसी ज्याची भावना । तैसाचि देव त्याचा जाणा । तेथे भावनेसि प्रमुखपणा । सहजचि येतो ॥३५॥
आणखी एक मुख्य खूण । ज्या संताने केले देवस्थान । त्याच्या थोरपणावर मोठेपण । मानिले लोकी देवाचे ॥३६॥
सज्जनाने दगड पूजिला । इतरांना तो मोठा देव झाला । वाढला त्याचा लौकिक भला । यात्रा भरली त्यापरी ॥३७॥
पंढरीसि ज्ञानदेव न जाता । संतांचा मेळा न भरता । कोण तेथीचा देव पूजिता ? सांगा मज ॥३८॥
देव सर्वाठायी सारखा । परि संगतीने भासे प्रियसखा । उत्तम असोनिहि होतो पारखा । लोभीलबाड पुजार्‍यामुळे ॥३९॥
ऐसे झाले आम्हामाजी । म्हणोनि भावना वाढली दुजी । चुकली देवभजनाची अर्जी । वाढली मर्जी धनाची ॥४०॥

जे धनसंपन्न देवस्थान । त्यासि आले मोठेपण । उपासनेसाठी खर्चावे धन । देव प्रसन्न म्हणती तेणे ॥४१॥
परि देव मोठा नव्हे श्रृंगाराने । देव मोठा नव्हे भव्य देवळाने । देव मोठा नव्हे घंटे वाजविल्याने । अहोरात्र ॥४२॥
देव मोठा नव्हे नंदादीपाने । देव मोठा नव्हे होम-हवनाने । देव मोठा नव्हे साळुंकेने । पर्वता एवढया ॥४३॥
देव मोठा नव्हे निसर्गशोभेने । देव मोठा नव्हे महायात्रेने । देव मोठा नव्हे वैभवप्रतिष्ठेने । पूजकांच्या ॥४४॥
देव मोठा भावनेने । भावनेच्या उच्चतेने । अंतरींच्या उपासनेने । सर्वासि सारिखा ॥४५॥
मग तो असो कोणीहि देव । तेथे वाया भेदभाव । एकाचि चैतन्याचे ओतीव । अलंकार ते ॥४६॥
देव एक असोनि अनंत झाला । नाना रूपे धरोनि नटला । परि तो पाहता एकचि दिसला । कार्यरूपाने ॥४७॥
हरिहरा भेद नाही । एक एकाचे हृदयी । रामरहीम एकचि पाही । देवी-देवहि एकात्मक ॥४८॥
धनुर्धारी झाला राम । मुरली धरता मेघश्याम । कटी कर ठेविता सगुणब्रह्म । विठ्ठल म्हणवी ॥४९॥
सर्व देव एकचि असती । भिन्न साधना करोनि स्मरती । भिन्न रूपे धरिली किती । तरी तत्त्वत: एकी तयांची ॥५०॥

एकचि व्याप्ति एकचि दीप्ति । प्रसंगे नानारूपे धरिती । एकाच ध्येयासाठी लाविती । प्राण पणी देव सर्व ॥५१॥
कोणा सज्जना दु:ख न व्हावे । कोणी दीन भुकेले न राहावे । यासाठी प्राण समर्पावे । प्रसंग पडता ॥५२॥
ऐसे ज्यांनी अंगे केले । त्याच कारणी धारातीर्थी पडले । ते सर्व देवदेवता झाले । मृत्युलोकी ॥५३॥
सज्जनांचे परित्राण । कंटकांचे निर्दालन । सत्य न्याय सदगुणांचे रक्षण । कार्य हे सर्व देवाचे ॥५४॥
ऐसे असता वितंडणे । देवादेवांची करावी भांडणे । आपुल्या हौसेसाठी का बुडविणे । चरित्र दैवतांचे ? ॥५५॥
सज्जने टाळावी ही वृत्ति । आदर द्यावा सर्वाप्रति । भिन्न न ठेवावे कोणी पंथी । एकचि असती म्हणोनिया ॥५६॥
सर्वाना मंदिराचे मूळतत्त्व । आणि उपासनेचे महत्त्व । समजावोनि द्यावे देवत्व । कवण्या कार्यी असे ते ॥५७॥
तेणे निरसू लागेल भेद कल्पना । आकळेल यथार्थ उपासना । साधेल आपापल्या देवस्थाना । मूळतत्त्वी सार्थक ॥५८॥
यावरि एकाने केला प्रश्न । देवस्थानांचे मूळतत्त्व कोण ? ही मंदिरंचि भिन्न भिन्न । झाली कारण पंथभेदा ॥५९॥
यांच्यावरोनि फिरवावा ट्रॅक्टर । म्हणजे सर्वचि होतील एकाकार । काय मंदिरांवाचूनि पडेल अंतर । भक्तीत काही ? ॥६०॥
याचे ऐका समाधान । ऐक्य न साधे भावना दुखवून । त्यासाठी मंदिराचे तत्त्वज्ञान । उजळणे हेचि उचित ॥६१॥
सुंदर निसर्गरम्य स्थान । तेथेहि साधे देवाचे भजन । मठमंदिर नसताहि मोहून । मन पाही देवाकडे ॥६२॥
परि समाधिस्थाने मठमंदिरे । देवदेवळे देव्हारे । यांच्या स्थानप्रभावे स्फुरे । सदभाव मनी सकळांच्या ॥६३॥
म्हणोनि संती घातला पाया । लोकी चारित्र्यनीति वाढाया । अभ्यासियासि एकान्त द्याया । मंदिरायोगे ॥६४॥
पुरुष व्यवहारी भांबावती । कोठे पुत्रपौत्रामाजी कलह होती । क्षणभरीहि न मिळे शांति । विचारासाठी ॥६५॥
ऐशावेळी उपासनास्थळी जावे । महापुरुषांचे स्मरण करावे । त्यांचे धारिष्टय चिंतोनि घ्यावे । समाधान ॥६६॥
वेळोवेळी विसरे वृत्ति । विचारांचा आठव मंदिरे देती । सतकर्तव्य-भावना जागविती । स्थळे ऐसी ॥६७॥
वार्षिकोत्सव, पुण्यतिथि । चातुर्मास्य आणि जयंती । सामुदायिकपणे होती । मंदिरस्थानी ॥६८॥
सामुदायिकतेचे साधन । गावाच्या आनंदाचे स्थान । पावित्र्याचा उगम पूर्ण । स्थानी ऐशा ॥६९॥
मंदिरे म्हणजे पाठशाळा । चाले शिक्षणाचा सोहळा । झाला निधि सर्व गोळा । याच कार्यी लावावा ॥७०॥

जागवावी गाव-संस्कृति । वाढवावी सर्वात प्रीतिनीति । यांची केंद्रे म्हणोनि होती । मठमंदिरे सर्वहि ॥७१॥
सर्वाभूती प्रेमभाव । वाढवावा गुणगौरव । यासाठीच गावोगाव । मंदिरे केली निर्माण ॥७२॥
ऐसी उच्च धरोनि भावना । झाली मंदिरांची स्थापना । परि आज तयांची रचना । विपरीत दिसे ॥७३॥
मंदिरे क्षेत्रे दुकाने झाली । पूजा कमाई करू लागली । दक्षणापात्रे पुढे आली । पोटासाठी ॥७४॥
मंदिरी बांधती म्हशीगायी । घाण दिसे ठायी ठायी । कसली पूजा धूपदीपहि ? सारा धुव्वा तंबाखूचा ॥७५॥
पुजारी खेळती चौसरी । वेश्यादिकांचे गाणे मंदिरी । होती तमाशे-दंढारी । परोपरी देवळामाजी ॥७६॥
मंदिराचा भव्य वाडा । झाला गुंडांचा आखाडा । धाक पडे घालाया मोडा । सज्जनासि ॥७७॥
स्त्रिया बापडया मंदिरी जाती । अंधानुकरणे ऐकती पोथी । सर्व लक्ष रंजनाप्रति । स्थिरत्वे कोणी ऐकेना ॥७८॥
पदोपदी भांडणे होती । भोळया भक्तांची फजीती । धनासाठी ओढाताण करती । पंडेपुजारी ॥७९॥
ऐशा स्थितीला बसाया आळा । सर्व लोकांनी करावा निर्वाळा । मंदिराचा निधि सगळा । समाज-कार्या लावावा ॥८०॥

पुजारी असतील बेढंगे । सांगोनियाहि सरळ न वागे । ते बदलावे संघटनेयोगे । सर्व गाव मिळोनि ॥८१॥
पुन्हा सुधारावी मंदिर-योजना । सुरू करावे लोकशिक्षणा । गांभीर्य आणावे तया स्थाना । सदविचार वाढावया ॥८२॥
नवे मंदिर न बांधावे । जुने ते स्वच्छ सुंदर करावे । आहेत्यासचि लावावे । पुन्हा सत्कार्यी ॥८३॥
सांवरोनि गलिच्छ पसारा । निर्मळ करावे देवद्वारा । प्रसन्न फुले झाडे वारा । शांति द्याया उपासका ॥८४॥
उघडावी त्यात वाचनालये । औषधालये, योगविद्यालये । उपासनेची ठेवोनि सोय । सर्वाकरिता ॥८५॥
आपुले आपुले देवुळीच जावे । इतरांनी दुरूनीच पहावे । देव वाटेल ऐसे बरळावे । हे तो असे वेडेपण ॥८६॥
एकाचा देव दुसर्‍यासि शिवे । तरि पाप वाढेल गाडे पेवे । म्हणोनि ज्याचे देव त्यानेच पुजावे । म्हणती न मानावे येरांनी ॥८७॥
हे तो म्हणणे सांप्रदायिकांचे । अल्पज्ञानी व्यापारियांचे । माझ्या मते हे विकासाचे । धोरण नव्हे ॥८८॥
ऐसे करणे सोडोनि द्यावे । असतील त्या देवळा निर्मल ठेवावे । सर्व लोकासि खुले असावे । दर्शनासाठी स्थान ते ॥८९॥
देव असे पतितपावन । तो न पळे पतिताला भिऊन । सर्वचि त्याची लेकरे समान । तयालागी ॥९०॥
देवासि नाही जातपात । देव भक्ताचाचि जातिवंत । तेथे नसावा अभक्ताचा पंथ । देवळामाजी ॥९१॥
देव महार मांग चांभार । देव भंगी लभाणी वडर । देव माळी ब्राम्हण कुंभार । सर्व जाती ॥९२ll
देव क्षत्रिय वैश्य गोवळी । देवे सृष्टि व्यापली सगळी । देवचि देव भूमंडळी । संचला आहे ॥९३॥
म्हणोनि असावे सर्वाचे मंदिर । ब्राह्मण असो वा महार । शुध्द करील जो आचार । त्यासि अधिकार मंदिराचा ॥९४॥
देवळाचे पंच गाव । गावचा प्रत्येक मानव । मानवांचा वाढेल गौरव । प्रचार व्हावा ऐसाचि ॥९५॥
सर्वानी एक वेळ ठरवावी । मिळोनिया प्रार्थना करावी । प्रार्थनी उत्सवी भाषणे द्यावी । योग्य ऐसी ॥९६॥
प्रत्येकाला बोलता यावे । सर्वानी हे अभ्यासावे । आपुले सुखदु:खहि मांडावे । भाषणायोगे ॥९७॥
तैसीच ठेवावी प्रवचने । राष्ट्रीय वृत्ति वाढे जेणे । माणसासि माणसाने । पूरक व्हावे म्हणोनिया ॥९८॥
प्रमाणे द्यावी ऋषिजनांची । आठवण मागच्या इतिहासाची । तैसीच बांधावी धारणा पुढची । भाषणायोगे ॥९९॥
कीर्तन, उत्सव, प्रवचन । नुसते नसावे मनोरंजन । गावकर्‍यांचे उजळेल जीवन । ऐसे कार्यक्रम करावे ॥१००॥

ऐसे हे मंदिर सजवावे । उपद्रवी लोक बाहेर करावे । सत्कीर्ति सुबुध्दीने भरावे । देवस्थानासि ॥१०१॥
मानवता-विकासाचे केंद्र । सात्विक संपत्तीचे आगर । ऐसे ठेवावे गावी मंदिर । ग्रामसंस्कृति राखाया ॥१०२॥
शुध्द प्रेम वाढावया । मंदिरांची उपासना या । उपासनेसि सक्रियता द्याया । लागा सर्व गावकरी ॥१०३॥
नका पाहू पंथ-भेद । नका उकरू नसते वाद । मंदिरादिकाचा हेतु हाचि शुध्द । जवळ यावा मानव ॥१०४॥
म्हणोनीच देवाची मध्यस्थी । एरव्ही देवाचीच सर्व क्षिति । परि जाणिवेने जन लाभ घेती । एरव्ही नाडती प्राणी सारे ॥१०५॥
ती जाणीव द्याया देवस्थान । साधुसंती केले निर्माण । तेथे शिकावे ” जनी जनार्दन ” । हेचि सूत्र ॥१०६॥
कोणत्याहि देवुळी जावे । तेथे आपुले उपास्यचि पाहावे । सर्व रूपी अवलोकावे । एक तत्त्व, हीच निष्ठा ॥१०७॥
सर्व देवांसि आदरावे । जेथे सात्विक पूजेचे गोडवे । दिव्य गुणकर्मानेचि देवत्व पावे । प्रत्येक व्यक्ति ॥१०८॥
तेथे भेद का मानावा ? कोणीहि भजो कोणत्या देवा । ” भावचि देव ” कळता ठेवा । एकचि लाभे सर्वासि ॥१०९॥
शंकराचार्ये देव-पंचायतन । मांडोनि साधिले भक्तसंघटन । इष्टदेवासह इतरांचे पूजन । कुठले स्थान विरोधासि ? ॥११०॥
विरोध देवांचा तर काय । परि जीवांचाहि येथे न साहे । सर्व जीवी देवचि आहे । म्हणोनि प्रेम द्यावे तया ॥१११॥
सुखी-समृध्द करावे गावा । यासाठीच मंदिर-निधि योजावा । ही सेवाचि आवडे देवा । आपुलिया जीवांची ॥११२॥
जीवांचिया सेवेचे तत्त्व । तैसेच कार्याचे महत्त्व । आणि स्वरूपाचे दिव्यत्व । सर्वचि देवाचे समान ॥११३॥
ऐसी समान धारणा मनी । धरोनि वागता सर्वानी । मठमंदिरे पंथभेद कोणी । आड न येती विकासाच्या ॥११४॥
ऐक्य वाढवाया कारण । होईल प्रत्येक देवस्थान । करिता शुध्द तत्त्वे पुनरुज्जीवन । तुकडया महणे ॥११५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-सानुभव संमत । मंदिर-मर्म कथिले येथ । पंचविसावा अध्याय संपूर्ण ॥११६॥


ग्रामगीता अध्याय पंचविसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading