ग्रामगीता अध्याय तेरावा – 13 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषयओवी संख्या
ग्रामगीता अध्याय तेरावा- 13
Gram Gita Chapter १३ – 13
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
११८
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजनेहिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय १३ ग्राम निर्माणकला
ग्राम निर्माणकला

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय तेरावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय १३
Gram Gita Chapter Thirteenth Commencement

—-🕉ग्रामगीता अध्याय १३ ग्राम निर्माणकला

ग्राम निर्माणकला
हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे । हे सूत्र ध्यानी ठेवोनि खरे । आपुले ग्रामचि करावे गोजिरे । शहराहूनि ॥१॥
हे गावीचे लोक विसरले । आळसाद्वारे दुर्दैव शिरले । दैन्य दारिद्रय सर्वत्र भरले । गावामाजी ॥२॥
शहरी यंत्रादिके आली । गावची उद्योगकला मेली । कुशल माणसे शहरी गेली । उद्योगासाठी ॥३॥
शहरी गेली गावची बुध्दि । शहरी गेली गावची समृध्दि । कष्टाळू शक्ति, हस्तकलासिध्दि । तेहि गेली ॥४॥
गावी उरली मुख्यत: शेती । ती कशीबशी चालविती । विशेष बुध्दि, शक्ति, संपत्ति । यांचा ओघ दुसरीकडे ॥५॥
उत्तम शिक्षित, सामर्थ्यवान । ते नोकरीसाठी फिरती वणवण । उद्योगधंदे वा शेती कोठून । होईल उन्नत गावची ? ॥६॥
हे सर्व जरि लक्ष पुरविती । तरि छोटे उद्योग आणि शेती । निश्चये सर्वासि पोषिती । बेकार दीन कोणी नुरे ॥७॥
कारण, गावीच कच्चा माल । ज्यावरि जगता येई खुशाल । तो गावी पक्का नोहे म्हणोनि हाल । गावाचे आमुच्या ॥८॥
कच्चा माल मातीच्या भावे । तो पक्का होता चौपटीने घ्यावे । मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे ? पिकवोनीहि ते उपाशी ॥९॥
त्यांच्या सुखाचे मुख्य साधन । सर्वतोपरी स्वावलंबन । शहरावरि न राहता अवलंबून । काम करावे सर्वानी ॥१०॥

उत्तम बुध्दि कौशल्य ज्ञान । शक्ति सामर्थ्य इकडे योजून । गावी वाढवावे स्वावलंबन । आळस झाडून सर्वाचा ॥११॥
जिकडे तिकडे स्वावलंबनप्रेम । घरोघरी चालावे काही काम । आपुले करोनि दुसर्‍यासि निष्काम । मदत करावी मानवांनी ॥१२॥
घरी मुलाबाळांनीहि राबावे । शेती कामधंदे हस्ते करावे । बायकापोरांसहित सुखी व्हावे । कष्ट करोनिया ॥१३॥
हाती उद्योगाचे साधन । मुखी रामनामाचे चिंतन । हाचि धर्म आहे महान । गावकरी लोकाचा ॥१४॥
गावचा एकेक घटक । बनवावा कलावंत सेवक । जो आपुले घर सुरेख । करोनि गावा शोभवी ॥१५॥
कष्ट करणाराचे जीवन । शोभा देते देवाप्रमाण । स्वत: स्वावलंबी होऊन । सहकार्य करी जो गावाशी ॥१६॥
पहिले पाऊल घरचा धंदा । दुसरे पाऊल दारच्या प्रबंधा । पुढे ग्रामसफाईच्या छंदा । लावोनि घ्यावे आनंदे ॥१७॥
असे हे कष्टाचे स्वरूप । वाढवीत जावे आपोआप । नाना कलांचे देणे रूप । कष्टालागी शिकावे ॥१८॥
कला असे मानवासि भूषण । परि पाहिजे जीवनाचे त्यात स्मरण । जगावे सुखसमाधान । धरोनिया अंतरी ॥१९॥
ऐसी असावी सर्व कला । नाहीतरि वाया गेला । प्राणी जन्मला आणि मेला । नाहकचि ॥२०॥

कलेनेच माणसाची ओळख । एरव्ही कोण पुसतो आणिक ? तुम्ही आहात रांव की रंक । आता कोणी पुसेना ॥२१॥
जरी असले कोणी धनवान । तरी व्हावे त्यांनी कलापूर्ण । यातचि आहे शहाणपण । श्रीमंतांचे ॥२२॥
नाहीतरि घरचे सर्वचि बेताल । समजेना गाणे-वाजवणे समकाल । परि गाणारे आणोनि खुशाल । जागरण करविती प्रयासे ॥२३॥
म्हणती आमुचा उत्सव महान । करावे काही नवरात्र म्हणोन । यासाठी आणिले गाणारे कलावान । देवापाशी ॥२४॥
आम्हास काहीच कळेना । म्हणोनि बोलाविले ऐकणारांना । त्यांनी ऐकाव्या गाण्याच्या ताना । आम्ही हसावे पाहोनि ॥२५॥
काय करावी ऐसी रीति ? आपणासि नसे ज्याची मति । त्यापेक्षा आपणहि शिकावी कोणती । कला अंगी ॥२६॥
दुसर्‍याचा राजहंसा बरवा । आपला असेनाका पारवा । परि स्वावलंबी कलेचा रावा । बोलवावा प्रत्येकाने ॥२७॥
अहो ! जीवनाची एक तरी कला । असावी लागते मानवाला । तरीच तो ” मानव ” शोभला । नाहीतरि कल्ला जीवनाचा ॥२८॥
गोड बोलण्याची कला । नेटके राहण्याची कला । अंग-मेहनतीची कला । आवश्यक आहे जीवनासि ॥२९॥
सुंदर लिहिणे अक्षरओळी । स्पष्ट वाचणे पुस्तके सगळी । जरा न दिसे टाळाटाळी । कोठेहि कलावंताची ॥३०॥

जीवनात यावा सरळपणा । साधा सात्विकतेचा बाणा । हृदय-निर्मळतेचा निशाणा । कलावंताचा धर्म हा ॥३१॥
एरव्ही कला सर्वानाच येते । कलेवाचून नाही रिते । परि तारतम्य पाहिजे तेथे । लोकापुढे न्यावया ॥३२॥
कष्ट करोनि आपुल्या हाते । आदर्श करावे घराते । असेल जरी झोपडी ते । भासवावी नंदनवन ॥३३॥
माती मिळवोनि घरे बांधली । परि चुन्यापेक्षाहि सुंदरता आली । थोडके पैसे लावोनि केली । रचना सगळी घराची ॥३४॥
आपुल्या गावीच विटा केल्या । मडकी-सुरया ओतल्या भाजल्या । कवेलू-कुंडयांसहित निर्मिल्या । आपुल्या गावी ॥३५॥
लाकडे तासोनि सरळ केली । त्यात सात्विकतेची प्रतिभा भरली । गावाच्या सुताराला आली । कला आमुच्या ॥३६॥
गावीच केले हातोडे-खिळे । ऐरणी-कुर्‍हाडी सापळे-विळे । पावडे-कुदळया शिंके आदि सगळे । सामान जीवनाचे ॥३७॥
दगड फोडोनि फाडी केली । सरळ चिरेदार टापोनि छाटली । इमारतीस बसविता दिसली । सुंदर सगळी ॥३८॥
फडे झाडणी चटई नवार । पलंग पायपूस मोटसंदोर । सुंदर केले डवरे वखर । नव्या धर्तीचे ॥३९॥
कापूस पिंजोनि सूत कातले । सुंदर वस्त्र स्वेटर विणले । बेरडया मुसके दोर बनविले । जाळे उतारीसहित ॥४०॥

कोणी केली शेतीची रचना । धुरेबंधारे वाफे नाना । पाहता दिसती सरळ लैना । शेतीमाजी ॥४१॥
झाडे दिसती ओळीत बध्द । सरळ सुंदर हिरवी शुध्द । घरमालकचि करी खुद्द । काम आपुल्या हातांनी ॥४२॥
घराभोवती बाग केली । सांडपाण्यावरि झाडे वाढली । फळाफुलांची रोपे वेली । भाजीपाला नित्याचा ॥४३॥
घरातूनि बाहेर दिसेना पाणी । प्रवाह करीतसे आतूनि । धूर जातसे धुराडयातूनि । गोठयात गोमूत्र न साचे ॥४४॥
घरामाजी निर्मळपण । टापटिपीचे वर्तन । प्रत्येक वस्तु ठेविल्याचे स्थान । सरळ दिसे पाहताचि ॥४५॥
सर्व वस्तूंची लिहिली नांवे । सामान घेता नलगे सांगावे । घरी येताचि दिसते बरवे । काय आहे ॥४६॥
दारासमोर जे जे दिसले । ते ते कलेनेचि सुंदर सजले । आपुल्याच गावी निर्मिले । कलाकारांनी ॥४७॥
जरा न दिसते उसनी ऐट । परकीयाकडोन करविला थाट । सामान आणले भरमसाट । परदेशीचे ॥४८॥
जे दिसले ते आपुल्याच गावीचे । अथवा प्रांतीचे देशीचे । तेणे कौतुकचि आमुचे । सर्व करिती ॥४९॥
ऐसी घरादारांची सुंदरता । आपणचि आणावी स्वता । कोणीहि डोळे भरोनि पाहता । प्रसन्न होती अंतरी ॥५०॥
ऐसी कला असावी कष्टार्जित । स्वावलंबी उद्योगे उन्नत । नखशिखान्त ओजहि त्यात । जो जीवन जागवी देशाचे ॥५१॥
कुणाची कला शरीर भूषवी । कुणाची घरी टापटीप दर्शवी । कुणाची कला गावचि सजवी । हौसेने आपल्या ॥५२॥
मानवी कला गाव शोभवी । गावाची कला प्रांत जागवी । प्रांताची कला देश भूषवी । वैशिष्टयाने ॥५३॥
ही सर्व कलाकुसरी । मानवासचि साधे बरी । परि योजकता असावी अंतरी । कलावंताच्या ॥५४॥
नाहीतरि टोप शिरी विदेशी । आणि खादीपंचा कटीसि । मारूतीचे तोंड लंबोदरासि । ऐसे होते ॥५५॥
एकाने दिवाणखाना सुंदर केला । पाहतांना आनंद झाला । परि शौचकूपचि बिघडला । होता त्याचा ॥५६॥
परिचय घेणारा आला घरी । प्रथमचि चढला शौचगृहाभीतरी । आत पसरली घाणचि सारी । स्वच्छता खरी दिसेना ॥५७॥
मग पाहिले स्वयंपाकघर । कांदे बटाटे यांचे फोतर । चुलीआतचि राख-केर । झाडूनि नव्हता लागला ॥५८॥
पानाचा पीक कोपर्‍यात । कपाटामागे घाण बहुत । दुमडूनि बघता सुंदर बिछायत । कचराकागद त्याखाली ॥५९॥
म्हणे वा हो कलावंत ! बघा जरा जावोनि आत । सारवण झाले नाही सात । दिवसापासोनि दिसतसे ॥६०॥

बाकी सगळे केले सुंदर । परि एवढेचि गालबोट त्यावर । ऐसे असो नये अंतर । कलेमाजी ॥६१॥
कला असावी सर्वनिपुण । आंतबाहेर निर्मळ पूर्ण । हात फिरे तेथे लक्ष्मी धावोन । येते मग ॥६२॥
यापरी कलेने घर सजविले । आपुले जीवन सुंदर केले । परि गाव असेल बिघडले । तरि ते सौंदर्य टिकेना ॥६३॥
काळया शरीरावरि कोड । तैसे दिसेल ते एकटे धेंड । म्हणोनि गाव करावे आदर्श सुघड । कलांनी आपुल्या ॥६४॥
गावी असावी सेवकमंडळे । ज्यांना ” मुखी राम हाती काम ” हे कळे । अखंड चालविती कामाचे सोहळे । ग्रामसेवेसाठी ॥६५॥
श्रमदानाचे सप्ताह घेवोनि । रस्ते दुरुस्त करावे सर्वानी । शोषक खड्डे मोर्‍या करोनि । सांडपाणी थांबवावे ॥६६॥
रस्त्यामाजी एकार्‍या असती । पांदण झाली निमुळती । गोखरू काटे झुडपे वाढती । सर्व व्यवस्था लावावी ॥६७॥
डोब साचते पडती डेरे । ठीक करावे मार्गी सारे । शौचगृहेहि नव्या प्रकारे । निर्मावी सर्वासाठी ॥६८॥
नदी तळयाकांठची स्वच्छता । तेथे पार घाट आदींची व्यवस्था । उत्पादन वाढवाया तत्त्वता । उपयोग घ्यावा जलाचा ॥६९॥
गावातील मार्ग विहिरी घरे । सुंदर सजवावी पशूंची कुटीरे । ठायी ठायी मुत्रीघरे । नाल्या करणे निर्माण ॥७०॥

सडकांचिया दुतर्फा छान । सर्वानी करावे वृक्षारोपण । ढोले ठेवावे मधामधातून । कचरा त्यात टाकावया ॥७१॥
चहू दिशांनी गाव सुंदर । वारे करोत जीवनसंचार । कोठेहि घाण घर । पाहतांना न दिसावे ॥७२॥
घरे मोडकी असतील कोठे । सर्वानी जावे तया वाटे । मिळोनि करावे चोखटे । ” हाहि आमुचा ” म्हणोनिया ॥७३॥
घरे खिडक्यावीण अंधारी । कोंदट दमट बसकी सारी । गुरांचा गोठा घराभीतरी । ऐसे राहू न द्यावे ॥७४॥
गोटे ओटे करावे दुरुस्त । कोपरे खंडारे गैरशिस्त । राहू न द्यावे अस्ताव्यस्त । वाकडे तिकडे ॥७५॥
हे सर्व खणोनि काढावे । दोरीलैन धरोनि नवे । मोकळेचाकळे मार्ग करावे । उल्हासवावे जनलोका ॥७६॥
मार्गी असावा लाकूडगोटा । साफ दिसाव्या चारी वाटा । कोणी अडला असेल करंटा । त्यास वळवावे गावाने ॥७७॥
कुंपकाटी गवती शाकार । गावी नसावा शक्यतोवर । उडवे-हुडे पुंजा-केर । भलतैसा न राहू द्यावा ॥७८॥
फास गवतगंजी कडबागूड । भूस उपणणे अथवा खळवाड । कुंभार-आवा अग्निकुंड । सुरक्षित जागा नेमाव्या त्यांच्या ॥७९॥
मेली जनावरे कोठेहि नेली । गावभरी घाण मांसहाडे आली । ऐसे न व्हाया पाहिजे नेमिली । जागा उघडण्या-गाडण्याची ॥८०॥
जेथे तेथे सूचनाफलक । लाविले पाहिजेत मार्गदर्शक । शोभवावेत रस्ते चौक । थोरांचिया नांवांनी ॥८१॥
मार्गावरि अंधार पडे । तेथे प्रकाशाची व्यवस्था घडे । ऐसे करावे चहूकडे । कार्यकर्त्यांनी ॥८२॥
गावी शाळा निर्माण करावी । कोंडवाडयाचीहि व्यवस्था व्हावी । बाजारगुजरी अवश्य असावी । सोयीसाठी व्यवस्थित ॥८३॥
नाहीतरि गावी बाजार भरला । शिस्त नाही दुकानाला । कोणताहि माल कोठे ठेवला । झाला सगळा कल्लोळ ॥८४॥
लोक एकमेकास खेटती । काहीकांचे खिसे कापती । नाही समजली चालरीती । माणुसकीची ॥८५॥
तरुण पाहती भलतीकडे । बोल बोलती वेडेवाकडे । चालती इकडे पाहती तिकडे । तेणे धक्के बसती लोका ॥८६॥
कोणी मधेच माल उपणती । खुंटया गाडती गाडया सोडती । बकर्‍या-गायी मोकाट फिरती । मधेच मांडती मिरच्याहि ॥८७॥
लैन नाही दुकानांप्रति । कोणीहि कोठे माल मांडती । या सर्वामुळे होते फजीती । घेणारा आणि देणारांची ॥८८॥
त्यात माशांचा अवघा घोळका । कोणी म्हणेना कोणा एका । सर्वत्र पैसा कमावण्याचा झोका । चालतसे हौसेने ॥८९॥
कोणी म्हणेल ऐसे का करतो ? दुकानदार म्हणे आम्ही कर देतो । मग आम्हाला कोण काय म्हणतो । सांगा सांगा ! ॥९०॥

ऐसे जेथे जेथे होते । दुरुस्त करावे सगळे तेथे । प्रेमाने सांगून पाहता सर्वानुमते । कोणी हट्ट करीना ॥९१॥
आपुले जेव्हा जन न ऐकती । तेव्हा सभाद्वारे करावी दुरुस्ती । सांगून पाहावे सरकारप्रति । दुरुस्त कराया गाव सारे ॥९२॥
मुख्य आपुली असावी समिति । जी सुंदर ठेवील बाजाराप्रति । वजने, मापे, माल, जागा, पध्दति । सर्व चोख करावया ॥९३॥
सर्वाच्या पिकांचिया रक्षणा । गावी येऊ न द्याया वानरसेना । ऐशाहि कराव्या समित्या संघटना । नाना कार्यास्तव ॥९४॥
सर्वागीण असावी ग्रामरचना । मनोरंजनासहित पुरावाव्यात भावना । जेणे करून ग्रामवासीयांना । आठव ना ये शहराचा ॥९५॥
व्याख्याने कीर्तने कलापथक । वादविवाद पोवाडे नाटके सात्विक । ऐसी नित्य नवनवी करमणूक । गावी चालवावी सर्वानी ॥९६॥
एक असावा सुंदर बाग । त्यात मनस्वाथ्याचेचि असावे अंग । प्रसन्नता वाढाया नाना रंग । वृक्षवेली लताकुंज ॥९७॥
त्यात क्रीडांगणे पाळणे । बालक-युवकांची प्रसन्नविती मने । जातीपातीचे विसरोनि रडगाणे । सहजभावे चालवावी ॥९८॥
गावी विश्रामगृह असावे । ज्यात पाहुणे उत्साही बरवे । सर्वास मुक्तद्वार ठेवावे । उतरविण्यासाठी ॥९९॥
तेथे असावी सुंदर विहीर । पाणी पिण्यासि थंडगार । वचने असावी उदबोधक सुंदर । भिंतीवरि सर्व ॥१००॥

सुंदर करावा आखाडा । मुले बागडती उल्हासे तडतडा । आदर्श मल्ल-खेळाडूंचा धडा । गिरवावया ॥१०१॥
सुंदर मुलांची शरीरे । दिसती गुलाब जैसे गोजिरे । बागचि फुलले हरेभरे । सुपुत्रांचे ॥१०२॥
सुंदर असावे वाचनालय । नाना ग्रंथ ज्ञानमय । करावया सुबुध्दीचा उदय । गाव-लोकी ॥१०३॥
काय चालले जगामाजी । कळावे गावी सहजासहजी । म्हणोनि वृत्तपत्रे असावी ताजी । आकाशवाणीहि त्याठायी ॥१०४॥
तैसेचि असावे हस्तलिखित मासिक । अक्षर गावाचे व्हाया सुरेख । लेखनचित्रादि कलांचे कौतुक । वाढेल गावी ॥१०५॥
सहज कळावे विचार आणि वृत्त । म्हणोनि फळा असावा चौकात । ती जणू ज्ञानेश्वराची भिंत । ज्ञान देई सर्वासि ॥१०६॥
अक्षरशत्रूंना सामर्थ्य यावे । म्हणोनि प्रौढशिक्षण चालवावे । घराघरावरि नंबर द्यावे । नामपाटी लावोनिया ॥१०७॥
गुराढोरांची औषधे जाणती । साह्य द्यावे त्या ग्रामीणांप्रति । अनुभूत नुसखे लोकगीतादि किती । संग्रह त्यांचा करावा ॥१०८॥
गावचे आरोग्य असावे उत्तम । सर्व प्राणीमात्रासि लाभावे क्षेम । म्हणोनि चालवावे आरोग्यधाम । गावामाजी ॥१०९॥
आपुल्याच गावची वृक्षवल्ली । कंदमुळे आणोनि औषधे केली । निसर्ग-उपचारासहित दिली । पाहिजेत वैद्ये ॥११०॥
चालवावे ऐसा वैद्याप्रति । सर्पादि विषे उतरविती । घाव बुजविती हाड जुळविती । औषधे ऐसी अनुभवोनि ॥१११॥
जेथे पुरुषांचा दवाखाना । तेथे हवी सूतिकागृहाचीहि योजना । दोहोंचीहि आवश्यकता ग्रामजना । भासतसे अत्यंत ॥११२॥
गावचे वैद्य गावच्या सुईणी । गावे घ्याव्या तयार करोनि । नवनवी ज्ञानसाधने देवोनि । सर्वतोपरी ॥११३॥
गावी असावे पोस्टस्थान । त्वरित कळावया वर्तमान । परस्पराचा व्यवहार पूर्ण । पत्रोपत्री चालावया ॥११४॥
ऐशा सर्वचि सुखसोयी । लोक करू शकतील निश्ययी । स्वावलंबी राहूनि सर्वहि । देतील जेव्हा सहकार्य ॥११५॥
प्रत्येकाचा कितीतरि वेळ । श्रमशक्ति आणि बुध्दीचे बळ । व्यर्थ जातसे ते उपयोगी सकळ । लाविता गाव सुखी होई ॥११६॥
ऐसे गाव होता आदर्शपूर्ण । शहराहूनीहि नंदनवन । सर्वाचे करील आकर्षण । सुंदर जीवन तुकडया म्हणे ॥११७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । स्वावलंबी ग्रामनिर्माणकला-कथित । तेरावा अध्याय संपूर्ण ॥११८॥

ग्रामगीता अध्याय तेरावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading