आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

ग्रामगीता अध्याय अकरावा – 11 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय | ओवी संख्या |
|---|---|---|
| ग्रामगीता अध्याय अकरावा- 11 Gram Gita Chapter ११ – 11 | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book | १०९ |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने | हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—–🕉ग्रामगीता अध्याय ११ ग्राम रक्षण
ग्राम रक्षण
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय अकरावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ११
Gram Gita Chapter Eleventh Commencement
—-🕉ग्रामगीता अध्याय ११ ग्राम रक्षण
ग्राम रक्षण
॥ श्रीगुरुदेवाय नम: ॥
ईश्वरसेवाचि गाव-सेवा । तो सर्वाच्याचि सुखाचा ठेवा । परि काही असुरहि असती गावा । यज्ञभंग करावया ॥१॥
एका सज्जने प्रश्न केला । गावी बाग फुलू लागला । परि दुष्ट लाविती आग त्याला । काय उपाय नित्यासाठी ? ॥२॥
आम्ही केली संघटना । निवडोनि आणिले सज्जना । परंतु दुर्जनापुढे बनेना । काही केले तरीहि ॥३॥
त्यांना दावा आदर्श जीवन । अथवा प्रचारे द्या पटवून । किंवा सेवा रात्रंदिन । करा त्यांची हवी ती ॥४॥
परंतु ते न जुमानिती । उपदेश देता उलटे चिडती । कार्यकर्त्यासि हाणूनि पाडिती । पदोपदी अडवोनिया ॥५॥
चांगल्यातूनहि काढिती वाईट । हवा फैलाविती रोगट । सज्जनांवरि आणिती संकट । कारस्थाने करोनि ॥६॥
कमलकसाई बोलभांड । मुडदेफरास गावगुंड । कज्जेदलाल धनाढय धेंड । हाती तयाच्या ॥७॥
सत्तेचाहि पाठिंबा सतत । घेवोनि आणिती पेचात । बसली लोकांना त्यांची दहशत । सांगा काय करावे ? ॥८॥
मित्रा ! जो जो जेयीचा रोग । तेथेचि त्याची औषधि सांग । योजकचि पाहिजे कराया उपयोग । कुशलपणाने ॥९॥
सत्य पडताहे कमजोर । म्हणोनीच असत्य होई शिरजोर । यास्तव सत्यासि करावे कठोर । सामर्थ्यशाली सेवेसाठी ॥१०॥
सत्याचे बळ वाढेल कैसे । तेहि सांगतो ऐका शांतसे । सज्जनांनी न बसावे आळसे । अथवा हताश होवोनि ॥११॥
लोकांचिया मनी जरी दहशत । तरी तुमच्यासारिखेचि काही त्यात । असतील हृदयी तळमळत । चांगले व्हावे म्हणोनि ॥१२॥
ऐसी ज्यांना ज्यांना आवडे सेवा । जे सत्याचा जपती ठेवा । त्या लोकाचा करोनि मेळावा । सक्रिय संघटन वाढवावे ॥१३॥
जनतंत्राचा हा काळ । शक्ति लोका अंगीच सकळ । जनतेच्या निश्चयाचे बळ । साम्राज्यासहि नमवू शके ॥१४॥
हत्तीस आवरी गवती दोर । मुंग्याहि सर्पासि करिती जर्जर । व्याघ्रसिंहासि फाडिती हुशार । रानकुत्रे संघटोनि ॥१५॥
संघटनेने काय नोहे ? । बिंदू मिळता सिंधुपणा ये । गावचा बाग बहरोनि जाय । फुलाफळांनी संघटनेच्या ॥१६॥
ग्रामसुधारणेचा मूलमंत्र । सज्जनांनी व्हावे एकत्र । संघटना हेचि शक्तीचे सूत्र । ग्रामराज्य निर्माण करी ॥१७॥
गाव करी ते राव न करी । ऐसे सांगोनि ठेविले चतुरी । जरी दाद न घेतील अधिकारी । तरी गाव तय सुधारू शके ॥१८॥
यासाठीच पाहिजे सशक्त संघटन । जे करी अन्याय-निर्मूलन । देवोनिया न्यायदान । करी रक्षण गावाचे ॥१९॥
संघटन गावी मजबूत असावे । आपापले दु:ख त्यासि सांगावे । कोणावरि अन्याय होऊ न द्यावे । कार्य संघटनेचे ॥२०॥
त्यासाठी मिळोनि लोक नेमावे । जे असतील इमानी बरवे । त्यागी निर्भय, चरित्र असावे । उज्जल ज्यांचे ॥२१॥
गावाचे जे पवित्र सेवक । तेचि प्रसंगी होती सैनिक । ज्या गावी ऐसे सावध पाईक । तेथ विघ्न न ठाके ॥२२॥
काही अपराध घडता गावात । त्वरित कळवावी खबरमात । सर्वानी भाग घेवोनि त्यात । ठीक करावे बिघडेल ते ॥२३॥
गावचा प्रत्येक सज्ञान । यांचे असावे सहकार्य पूर्ण । हाक देता सर्वजण । जमोनि यावेत एकत्र ॥२४॥
एकाने कोणी गुन्हा केला । शहाणपण सांगावे सकळांनी त्याला । गुन्हेगार ऐकेनासा झाला । शिक्षा द्यावी गावाने ॥२५॥
जेथे समजदार प्रलोभनी पडला । सोंग करोनि घोरू लागला । चिमटे घेवोनीच त्याला । उठविले पाहिजे ॥२६॥
कोळसा साबूने धुवा उगाळा । परि तो शेवटवरि काळा । अग्निसंस्कारी जळता उजाळा । येई त्यालागी ॥२७॥
म्हणोनि बहिष्कार असहकार । करोनि त्याचे तोडावे आधार । नाक दाबता तोंड सत्वर । उघडो लागे ॥२८॥
ऐसी सर्वानी पाठ पुरवावी । जो कोणी गावास बिघडवी । ऐकेनासा होता सत्ताप्रभावी । मुक्त करावा गावातूनि ॥२९॥
उत्तमांचाचि संग्रह बरवा । वाईटाचा निषेध करावा । जराहि पनपू न द्यावा । वृक्ष वाईटाचा ॥३०॥
सर्वानी झटावे यासाठी । करावी लागेल ती आटाआटी । प्राण गेला तरी संकष्टी । सहन करावे सेवेस्तव ॥३१॥
ऐसी असावी गावाची तयारी । तरीच गाव बनेल स्वर्गपुरी । नलगे सत्ताधीशांची तुतारी । पाठीमागे ॥३२॥
ऐसा होता आचार-विचार । गाव होईल न्यायभांडार । जागृत असता सज्जन चतुर । सेवेसाठी ॥३३॥
ऐसे जे जे गाव वागले । त्या गावाचे भाग्य उघडले । नाहीतरि टक्केटोणपे आले । नशिबी त्याच्या ॥३४॥
हे ऐकोनि एक बोलला । म्हणे तुम्ही शांतीचा पुरस्कार केला । आणि तुम्हीच ससेमिरा लाविला । दुराचार्यांपाठी ॥३५॥
सज्जन आणि दुर्जन । सर्वात सारखाचि भगवान । एकासि देता दंड धावोन । तेव्हा सेवा कुठे राहे ? ॥३६॥
दया क्षमा आणि शांति । हीच सात्विकाची संपत्ति । निष्ठुरपणे दंडावे विरोधकाप्रति । हे सज्जनपण कशाचे ? ॥३७॥
ऐका ऐसी विचारसरणी । ऐकोनि भुलू नये कोणी । तारतम्यचि ठेवोनि मनी । गाव सुधारावे विचारे ॥३८॥
काय केले म्हणजे होतो सज्जन । याचे आहे मोजमाप जाण । हे प्रथमक्षणीच ओळखोन । हुशार व्हावे गावाने ॥३९॥
सेवा द्यावी कोणे ठायी । हे तारतम्य असावे हृदयी । याची दृष्टि ज्यास नाही । होतील फजीत ते प्राणी ॥४०॥
ज्यासि करणे चोरबाजार । त्यासहि नोकर पाहिजे इमानदार । त्यासि देता सेवा सुंदर । पुण्य लाभेल कोणासि ? ॥४१॥
साधुसंते जनसेवा केली । परि सत्यासाठीच काया झिजविली । कधी आसचि नाही ठेविली । राजेरजवाडयांची ॥४२॥
जगी अनंत राजे झाले । परि सर्वचि नाही पूजिले । संतसज्जनचि देव मानले । हृदयमंदिरी तयांनी ॥४३॥
म्हणोनि कोणी कोणास सेवा द्यावी । हेचि प्रथम दृष्टी यावी । मग सेवेसाठी उडी घ्यावी । हाचि धर्म मानवाचा ॥४४॥
सदैव दया असावी चित्ती । मनास परोपकाराची प्रीति । राहू न द्यावी उणीव कोणती । दिसता कोठे ॥४५॥
क्षमाशांतिमय हृदय । विश्वासूपणाचे वर्तन निर्भय । प्राण गेलियाहि निर्दय । न व्हावे आम्ही ॥४६॥
परि जेथे निर्दयपण हवे । तेथे दगडापेक्षाहि कठिण व्हावे । हेहि सांगणे लक्षात घ्यावे । तारतम्याने ॥४७॥
नाहीतरि दया केली । उलट आपुल्यासचि भोवली । जिने गावाची नासाडी झाली । नव्हे ती दया ॥४८॥
भिकार्यास भीक दिली । त्याने दारू-गांजांत उडविली । सांगा काय दया घडली । ऐशियापरी ? ॥४९॥
काही चोरटे गावी फिरती । दिवसा साधुवेष घेती । रात्रौ तेचि डाका मारिती । वेषभूषा बदलोनि ॥५०॥
ते लोकांनी सहन करावे । साधु म्हणोनि सोडोनि द्यावे । ऐसे दयेचे वेडे गोडवे । गाऊ नयेत वीरांनी ॥५१॥
दयाधर्म दानधर्म । यांचे ओळखावे वर्म । वेडयापरी न करावे कर्म । पोषक आळसा विकारा ॥५२॥
एरव्ही संसार सोडोनि बुवा झाले । दारोदारी भिकेसि लागले । सदाचार सर्व बुडविले । ऐसे झाले याच गुणे ॥५३॥ .
कष्ट नाही करणे अंगी । नाही संग्रहाचे खरे त्यागी । वेष घेवोनि फिरती ढोंगी । नांव बुडवाया संतांचे ॥५४॥
यांना दानधर्म द्यावे । तरि सर्व पापासि स्थान मिळावे । म्हणोनि तारतम्य ठेवावे । दानधर्मियाने ॥५५॥
गावी मागती माधुकरी । खुशाल खेळती फिचर जुगारी । दारूगांजा भांग पोरी । गुप्त राखती मठामाजी ॥५६॥
ऐशा लोका दान द्यावे । गाव बुडवावे, बदनाम व्हावे । ऐसा धर्म कोणत्या देवे । सांगितला सांगा ? ॥५७॥
दया हे मुख्य धर्मलक्षण । परि दया म्हणजे प्राण्यांचे पालन । आणि कंटकांचे निर्दालन । बोलिले संती ॥५८॥
सज्जनांचे संरक्षण । आणि दुर्जनांचे दमन । हेचि अवतारांचेहि कार्यलक्षण । न्यायसंगत ॥५९॥
म्हणोनि गावी कोणी अन्याय केला । दु:ख दिले कोणा गरिबाला । त्याचा प्रतिकारचि पाहिजे झाला । गावामाजी ॥६०॥
नाहीतरि गुंडास फावे । सुटती जैसी स्वैर गाढवे । दुष्टासि दया करोनि सोडोनि द्यावे । नव्हे हा धर्म ॥६१॥
अन्याय होता प्रतिकारचि करावा । प्रथम अन्याय समजूनि घ्यावा । निश्चित कळता आवाज द्यावा । संघटनेचा ॥६२॥
अन्याय नाना तर्हेचे असती । काही धनाचे मानाचे दिसती । काहीनी वाढे व्यसन अनीति । लोकामाजी ॥६३॥
त्या सर्वातूनि मार्ग काढावा । गावी दुराचार होऊ न द्यावा । हाचि खरा धर्म ओळखावा । विचारवंताने ॥६४॥
न्यायाचा कांटेकोरपणा । भिनावा आपुल्या हृदयी जाणा । एका बाजूने दयेचा बाणा । दुसर्या बाजूने न्यायदंड ॥६५॥
हेचि खरे मानवाचे लेणे । उगीच आहे सोने मिरविणे । अंगी वीरता नसता मरणे । चोराहाती ॥६६॥
काहीलोक भोळे असती । आपुले मानव्यभूषण खोविती । लोक त्यासीच सात्विक म्हणती । वेडयापरी ॥६७॥
ज्यास करवेना ब्रीदाचे रक्षण । नाही अंगी न्यायाचे भूषण । तो कैसा सात्विकजन । म्हणावा आम्ही ? ॥६८॥
जो चोरांनी नागवावा । गुंड लोकांनी फसवोनि द्यावा । परस्त्रियेने भोंदवावा । तो सात्विक कैसा ? ॥६९॥
तोंडावरची न उडवी माशी । दच्के पाहताचि पोलिसासि । न कळे आपुला हक्कहि ज्यासि । सात्विक त्यासि म्हणो नये ॥७०॥
त्यास म्हणावे दुबळा प्राणी । भित्रा विकासहीन अज्ञानी । ज्यात नाही पुरुषार्थाचे पाणी । रक्षणासाठी ॥७१॥
त्यास कोणीहि उचलोनि न्यावे । दारूगांजादिक पाजोनि द्यावे । त्याने भोळा म्हणोनि पिऊनि घ्यावे । वारे भोळा ऐसा ॥७२॥
हा तो निर्बुध्दसा पाषाण । उत्तम वागण्याचे नाही ज्ञान । गंभीर शांत म्हणती जन । मुकामैंद म्हणोनिया ॥७३॥
खरा शांत तोचि नेमाने । जो न फसे कोणाच्या फसविल्याने । कधीहि चकाटया पिटणे ज्याने । पाहिले नाही ॥७४॥
परनिंदा नावडे ज्यासि । परदु:ख न पाहवे डोळयासि । धावोनि जाय अडल्या-पडल्यासि । सहकार्य द्याया ॥७५॥
उगीदुगी ऐकता कानी । लगेच जाय तेथोनि उठोनि । लोका सांगे उगीच बोलणी । बोलू नयेत ॥७६॥
कोणाची लपोनि टीका न करी । बोलणे ज्याचे तोंडावरि । निर्भय निर्मळ अंतरी । स्फटिक जैसा ॥७७॥
गंदेपणा मुळीच नावडे । सुजनांचे गातो सदा पवाडे । सत्संगतीसि जीव धडपडे । सदैव ज्याचा ॥७८॥
सर्वाशी बंधुत्वाचे वागणे । मन-मिलाफ संपादणे । लोकसंग्रह कुशलतेने करणे । जागृतीसाठी ॥७९॥
सुखी अहंकारे न चढावे । संकटी घाबरोनि न जावे । न्यायाने वागावे वागवावे । सर्व जना ॥८०॥
हे ज्यांनी अंगी बाणविले । तेचि शांतसात्विक बोलिले । तयांनीच गावाचे हित झाले । समजतो आम्ही ॥८१॥
याऐवजी दुबळेपण आले । तरि गावचि मग विलया गेले । सांभाळिता न जाय सांभाळिले । कोणाकडोनि ॥८२॥
म्हणोनि पाहिजे न्यायनिष्ठुरता । दयेमाजीहि तारतम्यता । उन्नति करील तीच सेवा तत्त्वता । हरप्रकारे ॥८३॥
द्वेष न करिता दुर्जनदमन । हे त्यांच्याहि उन्नतीसचि कारण । डॉक्टरे करावे अवयवच्छेदन । ती दयाचि तयाची ॥८४॥
सर्वाभूती परमेश्वर । त्यासि बाधक नसे सत्यव्यवहार । करावे संघटनेने गाव सुंदर । ही पूजाचि तयाची ॥८५॥
सर्वाभूती प्रेमभाव । वाढवावा गुणगौरव । दूर सारोनि उपद्रव । गावचे आपुल्या ॥८६॥
” जग तरि आम्हा देव । परि हा निंदितो स्वभाव ” । म्हणोनि गुंडासि आणिला खेव । संत तुकारामांनी ॥८७॥
” हरिभक्त राहती जेथे । परचक्र यावे कैसे तेथे ? ” ऐसे म्हणोनि लाविला पणाते । जीव त्यांनी ॥८८॥
आपुले वारकरी भाविक । तेचि वारकर्ते पाईक । करोनि दुष्टांसि लाविला धाक । शिवाजीच जणु सर्वहि ॥८९॥
तीच घेवोनि प्रेरणा । गावी उभारावी न्यायसेना । जेणे काही नुरे धिंगाणा । गावी आपुल्या ॥९०॥
दारू गांजा भांग अफीम । जुगार वेश्यादि वाईट काम । यांचे उरू न द्यावे नाम । आपुल्या गावी ॥९१॥
त्यासाठी गावच्या काही सज्जनांनी । लागावे व्यसन-निर्मूलनी । उत्तम गुणांच्या अनेक श्रेणी । वाढवाव्या गावी ॥९२॥
गावचे चार सज्जन मिळोनि । अनिष्टप्रथा बंद कराव्या त्यांनी । ज्याने गावास पावे नुकसानी । न ठेवावे ते ॥९३॥
काही उन्मत्त शेतकरी । टोचती बैलासि तुतारी । रक्त काढूनि वासना पुरी । करिती आपुली ॥९४॥
देवाचिया नांवाखाली । काही देतात जीव बळी । बंद करावी प्रथा असली । भावना सुधारोनि लोकांची ॥९५॥
कोणी घुमारे लुबाडिती । बुवा लोकास फसविती । भ्रमिष्ट मते व्रते शिकविती । सावध करावे त्याठायी ॥९६॥
परस्पराना मदत करावी । अडीअडचण ती निभवावी । सर्वाकडोनि करोनि घ्यावी । योग्य सेवा ॥९७॥
गावसेवेत आली अडचण । तिला द्यावे अग्रस्थान । आपापली जागा-जमीनहि देऊन । सोय करावी सर्वाची ॥९८॥
सर्वाकडोनि ऐसी सेवा नव्हे । तरि गरजूंना सहकार्य द्यावे । होईल तेवढे तरी करावे । निष्कपटपणे ॥९९॥
मुलाबाळाचे असता लग्न । सर्वानी जावे धावोन । पडोचि न द्यावे ओझे, न्यून । आईवडिलासि तयाच्या ॥१००॥
थोडेथोडे सर्वानी आणावे । वरवधूना साहित्य द्यावे । भोजनापासोनि उरकवावे । सर्वतोपरी ॥१०१॥
मांडवावरी पांच डहाळे । टाकावे हा धर्म गावकर्या कळे । तैसेचि निभवावे प्रसंग सगळे । सहकार्याने ॥१०२॥
जैसे जैसे सहकार्य वाढे । तैसे गाव उन्नतीस चढे । न पडे विपत्तीचे कोडे । गावी कोणा मानवासि ॥१०३॥
ऐसी सेवा बिंबता जीवनी । काहीच गावी न पडे उणी । तरीहि असावा स्वतंत्रपणी । सेवकाचा विभाग ॥१०४॥
सुसज्ज असावेत गावचे तरुण । कोणतेहि संकट येता ऐकून । आपुली सर्व कामे सोडून । धाव घ्यावी तयांनी ॥१०५॥
आग लागणे, विहिरीत पडणे । कॉलरा होणे, मूर्च्छा येणे । प्रत्येक प्रसंगी धावून जाणे । कर्तव्य त्यांचे ॥१०६॥
ऐसी ग्रामसेवेची योजना । जागृत जेथे ग्राम-सेना । तेथे स्वर्गीच्या नंदनवना । बहर येई सहजचि ॥१०७॥
ऐसे संघटनांनी गाव । भोगू लागेल दिव्य वैभव । ग्रामराज्यचि सुखाची ठेव । तुकडया म्हणे ॥१०८॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्रस्वानुभवसंमत । ग्रामरक्षणाचा वर्णिला पंथ । अकरावा अध्याय संपूर्ण ॥१०९॥
ग्रामगीता अध्याय अकरावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

