९ फेब्रुवारी, दिवस ४०, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था, ओवी ५१ ते ७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ४६९ ते ४८०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“९ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 9 feburvari

राम कृष्ण हरी आज दिनांक ९ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

51-4
ते वेळी आपुल्याचेनि कैवारे । मी साकारु होऊनि अवतरे । मग अज्ञानाचे आंधारे । गिळूनि घाली ॥51॥
त्या वेळी माझ्या भक्तांच्या कैवारासाठी मी देह धारण करून अवतरतो; आणि मग हा अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो.
52-4
अधर्माचि अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ॥52॥
अधर्माची मर्यादा तोडून टाकतो, दोषाने (उत्कर्षासंबंधी) लिहिलेले लिखाण फाडून टाकतो आणि सज्जनांकडून (त्यांच्या हातून) सुखाची ध्वजा उभारवितो.
53-4
दैत्यांची कुळे नाशी । साधूंचा मानू गिंवशी । धर्मासी नीतीशी । शेज भरी ॥53॥
दैत्यांच्या कुळाचा नाश करतो, साधूंचा गेलेला मान पुनः मिळवून देतो आणि धर्म व नीतीची सांगड घालतो.
54-4
मी अविवेकाची काजळी । फेडूनी विवेकदीप उजळी । तै योगिया पाहे दिवाळी । निरंतर ॥54॥
मी विवेक दिपाला आलेली अविचाराची काजळी नाहीशी करतो आणि विवेकदीप प्रज्वलित करतो. त्या वेळी योगी लोकांना अखंड आनंदाच्या दिवाळीचा अनुभव येतो.
55-4
स्वसुखे विश्व कोंदे । धर्मचि जगी नांदे । भक्ता निघती दोंदे । सात्विकाची ॥55॥
तेंव्हा सर्व जग हे आत्मसुखाने भरून जाते. फक्त धर्मच जगात नांदत असतो. भक्तांच्या हृदयात सात्विकतेचे भरते येते.


56-4
तै पापाचा अचळु फिटे । पुण्याची पहाट फुटे । जै मूर्ति माझी प्रगटे । पंडुकुमरा ॥56॥
हे अर्जुना, ज्या वेळी मी अवताररूपाने प्रकट होतो, त्यावेळी पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याची पहाट होते.
57-4
ऐसेया काजालागी । अवतरे मी युगी युगी । परि हेचि वोळखे जो जगी । तो विवेकिया ॥57॥
अशा या कार्यासाठी मी प्रत्येक युगांत अवतार घेतो, माझे हे कार्य जो जाणतो, तो या जगात खरा विवेकी होय.

जन्म कर्म च ने दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥4. 9॥
भावार्थ :-

हे अर्जुना ! या प्रमाणे माझे दिव्य जन्म व कर्म जो यथार्थपणे जाणतो, तो पुरुष देहत्यागानंतर पुनः जन्मास येत नाही, तर मला येऊन मिळतो.
58-4
माझे अजत्वे जन्मणे । अक्रियताचि कर्म करणे । हे अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥58॥
मी उत्पत्तीरहित असूनही माझे जन्म घेणे आणि निष्क्रिय असूनही कर्म करणे, हे अविकारस्वरूप जो जाणतो, तो परममुक्त आहे. (तोच श्रेष्ठ प्रतीचा मुक्त आहे. )
59-4
तो चालिला संगे न चळे । देहीचा देहा नाकळे । मग पंचत्वी तव मिळे । माझाचि रूपी ॥59॥
तो इंद्रियाने कर्म करीत असला, तरी कोणत्याही प्रकारच्या आसक्तीने बांधला जात नाही. (व्यवहारात वागला तरी आसक्तीने, अहंकार वृत्तीने वागत नाही असा तो) देहधारी असूनही देहभावाला वश होत नाही. (देहभावाने बध्द होत नाही). त्याचा (असा जो आहे त्याचा) देह ज्यावेळी पंचतत्वांत विलीन होतो, त्या वेळी तो माझ्या स्वरूपी एकरूप होतो. (माझ्यात रूपात येऊन मिळतो)

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥4. 10॥
भावार्थ :-

आसक्ती, भय व क्रोध ही ज्याच्यापासून निघून गेली आहेत, माझाच आश्रय घेतलेले, असे तप व ज्ञान यांनी पवित्र झालेले अनेक अनन्यभक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत.
60-4
एर्‍हवी परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती । वाटा केवेळी न वचती । क्रोधाचिया ॥60॥
एरव्ही जे आपल्याबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल शोक करीत नाहीत, ज्यांचे मन वासनारहित झालेले असते, (त्यांच्या कामना नाहीशा झालेल्या असतात). जे केंव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


61-4
जे सदा मियाचि आथिले । माझिया सेवा जियाले । का आत्मबोधे तोषले । वीतराग जे ॥61॥
जे माझ्या भावनेने सदैव संपन्न असतात, माझ्या सेवेसाठी ज्यांचे जगणे असते, (माझ्या सेवेसाठीच जन्म झाला आहे असे मानुन जे जगतात), आत्मज्ञानाने जे संतुष्ट असतात; आणि ज्यांची विषय- आसक्ती नष्ट झालेली असते,
62-4
जे तपोतेजाचिया राशी । का एकायतन ज्ञानासी । जे पवित्रता तीर्थांसी । तीर्थरूप ॥62॥
जे तपरूपी तेज्याच्या राशी आहेत, जे ज्ञानाचे एकमेव ठिकाण आहे, जे तीर्थानादेखील पवित्र करणारे तिर्थरूपच आहेत,
63-4
ते मद्भावा सहजे आले । मी तेचि ते होऊनि ठेले । जे मज तया उरले । पदरु नाही ॥63॥
ते सहजच माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. जे मीच होऊन राहतात. त्यांच्यात आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाचा पडदा राहत नाही.
64-4
सांगे पितळेची गंधिकाळिक । जै फिटली होय निःशेख । तै सुवर्ण काई आणिक । जोडू जाईजे ॥64॥
सांग बरे, हिणकस सोन्यामधील असलेला पितळेचा गंज आणि काळेपणा हे दोन दोष पूर्णपणे नाहीसे झाले, तर शुद्ध असे सोने काही वेगळे मिळवावे लागते काय ?
65-4
तैसे यमनियमी कडसले । ते तपोज्ञानी चोखाळले । मी तेचि ते जाहले । एथ संशयो कायसा ॥65॥
त्याप्रमाणे जे यम-नियमांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने आचरण करतात, जे तपाने आणि ज्ञानाने शुद्ध झाले आहेत, ते आणि मी एकरूप झालो आहोत, यामध्ये संशय तो कसला ?

ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥4. 11॥
भावार्थ :-

हे अर्जुना ! जे लोक मला जसे भजतात, मीही त्यांना तसाच भजतो. हे तत्व जाणून ज्ञानी लोक सर्व प्रकारे माझ्या मार्गाचे अनुकरण करतात.


66-4
एर्‍हवी तरी पाही । जे जैसे माझा ठाई । भजती तया मीही । तैसाचि भजे ॥66॥
दुसरे असे पाहा की, जे लोक माझी अनन्य भावाने जशी भक्ती करतात, त्याप्रमाणे मीही त्यांच्यावर प्रेम करतो.
67-4
देखे मनुष्यजात सकळ । हे स्वभावता भजनशीळ । जाहले असे केवळ । माझा ठायी ॥67॥
पाहा, जेवढे म्हणून मनुष्यप्राणी आहेत, तेवढ्या सर्वाच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो.
68-4
परी ज्ञानेवीण नाशिले । जे बुद्धिभेदासि आले । तेणेचि या कल्पिले । अनेकत्व ॥68॥
परंतु ज्ञान नसल्यामुळे बुद्धीच्या ठिकाणी अनेक भेद निर्माण होतात. वास्तविक मी जो एक आहे, त्या माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात.
69-4
म्हणऊनि अभेदी भेदु देखती । यया अनाम्या नामे ठेविती ॥ देवी देवो म्हणती । अचर्चाते ॥69॥
म्हणून वास्तविक जे अभेद आहे तेथे ते भेद पाहतात. मी नामरहित असताना मला अनेक प्रकारची नावे देतात. मी चर्चेचा विषय नसताना मला देव-देवी म्हणतात.
70-4
जे सर्वत्र सदा सम । तेथे विभाग अधमोत्तम । मतिवशे संभ्रम । विवंचिती ॥70॥
भेदबुद्धीने संभ्रमित झालेले लोक, मी (परमात्मा) सर्वत्र सम प्रमाणात (सर्व ठिकाणी) सारखा आहे, त्याच्या ठिकाणी ते चांगला व वाईट असे भेद करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
काङक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥4. 12॥
भावार्थ :-

कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची उपासना करतात. कारण, या मनुष्यलोकात कर्मापासून सिद्धी लवकर प्राप्त होत असते.


71-4
मग नानाहेतुप्रकारे । यथोचिते उपचारे । मानिली देवतांतरे । उपासिती 71॥
मग नाना प्रकारचे हेतू मनामध्ये धरून आपण मानलेल्या निरनिराळ्या देव-देवतांची योग्य उपचारांनी विधिपूर्वक उपासना करतात.
72-4
तेथ जे जे अपेक्षित । ते तैसेचि पावति समस्त । परी ते कर्मफळ निश्चित । वोळख तू ॥72॥
मग जे जे (त्यांच्या) मनात असते, (ज्या फळाची अपेक्षा ठेऊन ते कार्य करतात), ते ते सगळे (फळे) त्यांना प्राप्त होतात; परंतु ही त्यांनी केलेल्या कर्माची फळे आहेत, हे तू निश्चितपूर्वक जाण.
73-4
वाचूनि देते घेते आणिक । निभ्रांत नाही सम्यक । एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकी ॥73॥
खरे पाहता देणारा किंवा घेणारा कर्माशिवाय दुसरा कोणीही नसून या मनुष्यलोकात कर्मापासूनच फलप्राप्ती होते.
74-4
जैसे क्षेत्री जे पेरिजे । ते वाचूनि आन न निपजे । का पाहिजे तेचि देखिजे । दर्पणाधारे ॥74॥
शेतामध्ये आपण जे पेरतो, तेच उगवत असते; त्याशिवाय दुसरे काही उगवत नाही. अथवा आरशात जे पाहावे, ते आरशाच्या उपाधीमुळेच दिसत असते.
75-4
ना तरी कडेयातळवटी । जैसा आपुलाचि बोलु किरीटी । पडिसादु होऊनि उठी । निमित्तयोगे ॥75॥
किंवा अर्जुना ! पर्वताच्या कड्याच्या तळाशी आपण जे मोठयाने बोलतो, तेंव्हा त्या कड्याच्याच निमित्तमात्राने बोलण्याचा प्रतिध्वनी निर्माण होत असतो.

दिवस ४० वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४६९ ते ४८०
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. 469
दर्पणासी नखटे लाजे । शुद्ध खिजे देखोनि ॥१॥
ऐसे अवगुणाचे बाधे । दिसे सुदे विपरीत ॥धृपद॥
आंधळ्यास काय हिरा । गारा चि तो सारिखा ॥२॥
तुका म्हणे भुंके सुने । ठाया नेणे ठाव तो ॥३॥
अर्थ
आरश्यामध्ये नकटा माणूस स्वतःचे रूप पाहून लाजतो आणि एखाद्या चांगल्या मनुष्याचे नाक पाहून त्याच्यावर विणाकारण चिडत असतो. अवगुणाची ज्याला बाधा आहे, त्याला वरील उदाहरणा प्रमाणे जे सरळ आहे, ते वाकडे भासते. आंधळ्या माणसाला मौल्यवान हिरा जरी दिला, तरी त्याला गारगोटीच वाटणार. तुकाराम महाराज म्हणतात वाटेल त्या ठिकाणी कुत्रे भुंकते, तशातलाच हा प्रकार आहे.
अभंग क्र. 470
नावडे तरि का येतील हे भांड । घेउनिया तोंड काळे येथे ॥१॥
नासोनिया जाय रस या संगती । खळाचे पंगती नारायणा ॥धृपद॥
तोंडावाटा नर्क काढी अमंगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुने ॥२॥
तुका म्हणे नाही संतांची मर्‍यादा । निंदे तोचि निंदा मायझवा ॥३॥
अर्थ
अहो भांडखोर लोकांना जर परमार्थ करणे आवडत नसेल तर हे त्यांचे काळे तोंड घेऊन आमच्याकडे काय येतात. हे नारायणा अध्यात्म रस परमार्थ रस या दुष्ट लोकांच्या संगती मध्ये नष्ट होतो. तोंडातून नर्कासारखे घाणेरडे शब्द काढतात. कुत्रे चांगल्या अन्नला तोंड लावून ते अन्न दुषित करते, तसेच हे आहे. तुकाराम महाराज म्हणतात जो संताची मर्‍यादा (मर्यादा) राखत नाही त्याला शिवी देवून महाराज म्हणतात तो निंद्य आहे तुम्हीदेखील अशा दुष्ट लोकांची निंदा करा.
अभंग क्र. 471
लेकरा आईते पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥१॥
त्यापरि आमुचा जालासे सांभाळ । देखिलाचि काळ नाही आड ॥धृपद॥
भुकेचे संन्नीध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाही ॥२॥
आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगे ॥३॥
अर्थ
लेकराला पित्याचे सर्व आहे ते धन तो जाणता झाला की त्याच्या स्वाधीन करतो तेही लेकरांनी काहीही नष्ट करतातअगदी त्याप्रमाणेच देवा तुम्ही आमचा सांभाळ केला आहे काळाचे तोंड देखील आम्ही आतापर्यंत पाहिले नाही तो आम्हाला आडवा देखील आला नाही. भूक लागताच स्तनपान उपलब्ध असेल, तर धावा धाव करावीच लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी अशा प्रकारे पांडुरंगाला ओवाळून पैलतीरावर उभा राहिलो, तेंव्हा पांडुरंगाने मला जवळ घेण्या करता धाव घेतली.
अभंग क्र. 472
शुद्धचर्या हे संताचे पूजन । लागतचि धन नाही वित्त ॥१॥
सगुणाचे सोई सगुण विश्रांती । आपणचि येती चोजवीत ॥धृपद॥
कीर्तनींच वोळे कृपेचा वोरस । दुरीपणे वास संन्नीधता ॥२॥
तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे । मन लावा लागे स्वहिताच्या ॥३॥
अर्थ
संतांचे पूजन म्हणजे शुद्ध आचरण करणे हेच आहे, संतांचे पूजन करण्यासाठी काही धन वित्त लागत नाही. हरीची सगुण स्वरूपाच्या भक्तीने सगुण स्वरुपाची विश्रांती आपल्याला मिळते आणि ती विश्रांती आपल्याला शोधत आपोआप आपल्याकडे येते. देव जरी दूर आहे तरी कीर्तनाने कृपाप्रसाद होतो त्यामुळे तो दूर असला, तरी समीपच असतो. तुकाराम महाराज म्हणतात मी हे माझ्या जीवीचे रहस्य तत्परतेने तुम्हाला सांगत आहे. कारण तुम्ही तुमचे जीवन स्वहिताच्या मार्गाकडे लावावे.
अभंग क्र. 473
जीवीचे जाणावे या नावे आवडी । हेकड ते ओढी अमंगळ ॥१॥
चित्ताच्या संकोचे काहीच न घडे । अतिशये वेडे चार तेचि ॥धृपद॥
काळाविण काही नाही रुचो येत । करूनि संकेत ठेवियेला ॥२॥
तुका म्हणे काळे वचने चांचणी । काय बोलवूनि वेळोवेळा ॥३॥
अर्थ
देवाच्या आणि गुरूच्या मनातील परमार्थ विषयी मत जाणून घेणे त्यालाच खरी परमार्थाची आवड असे म्हणावे आणि जे हेकड आहेत ते त्यांच्या मनाने कसेही वागतात ते अमंगळ कृत्य करण्याकडे आपोआप ओढ घेतात. त्यांचे मन अमंगळाकडेच वळते. चित्ताच्या अप्रसंन्नतेने कार्य होत नसतो. दुराग्रहाने काही करणे म्हणजे वेडाचार होय. ईश्वर करता आहे. योग्य काळा वाचून काहीही जमत नाहि, रुचत नाही असा त्याने नियम करून ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला मनुष्याच्या केवळ एकाच वाक्याच्या बोलन्या वरूनच त्याची चाचणी होते तो मनुष्य कसा आहे हे मला चांगले कळते त्याला वेळ वेळा बोलायला लावण्याची गरज पडत नाही.
अभंग क्र. 474
कामातुर चवी सांडी । बरळ तोंडी बरळे ॥१॥
रंगले ते अंगी दावी । विष देववी आसडे ॥धृपद॥
धनसोसे लागे वेड । ते बडबड शमेना ॥२॥
तुका म्हणे वेसने दोन्ही । नर्कखाणी भोगावया ॥३॥
अर्थ
कामातूर मनुष्य लोकराज्य सोडून जे मनाला येईल तशी बडबड करत असतो. ज्या विचाराने मन भरलेले असते, तशी चिन्ह मनुष्य आपल्या शरीरावर दाखवितोच. विष पोटात गेले तर मनुष्य आचके देऊ लागतो. धनाच्या लोभाने माणूस वेडा झाला म्हणजे त्याची बडबड थांबत नाही. तुकाराम महाराज म्हणतात स्त्री आणि पैसा हि दोन्ही नरकखाणी भोगावयास लावणारी आहे.
अभंग क्र. 475
कृष्णांजने जाले सोज्वळ लोचन । तेणे दिले वान निवडुनी ॥१॥
निरोपाच्या मापे करी लडबड । त्याचे त्याने गोड नारायणे ॥धृपद॥
भाग्यवंतांघरी करिता विश्वासे । कार्य त्यासरिसे होईजेते ॥२॥
तुका म्हणे पोट भरे बऱ्या वोजा । बिज ठाव निजा निजस्थानी ॥३॥
अर्थ
कृष्ण रूपी अंजन माझ्या बुद्धी रुपी डोळ्यात घातले त्यामुळे सत्य काय आहेअसत्य काय हे मला निवडता आले आणि कृष्ण रुपी अंजनाने मला मदत केली माझी बुद्धी रुपी डोळे आता स्वच्छ झाले आहेत. नारायणाचा संदेश सांगण्याची मी खट पट करत आहे. नारायणाला ती खटपट गोड वाटते. भाग्यवंताच्या घरी नौकरी केली की, त्या नौकाराचा कार्यभाग अपोआप होतो. तुकाराम महाराज म्हणतात चांगल्या भोजन व्यवस्तेने पोट भरते, आणि जीवात्म्याला बोध झाला म्हणजे तोही मुक्त होतो.
अभंग क्र. 476
मैंद आला पंढरीस । हाती घेउनि प्रेमपाश ॥१॥
पुढे नाडियले जग । नेतो लागो नेदी माग ॥धृपद॥
उभारोनि बाहे । दृष्टादृष्टी वेधीताहे ॥२॥
वैकंठीहुनि येणे । केले पंढरीकारणे ॥३॥
पुंडलिके थारा । देउनि आणिले या चोरा ॥४॥
तुका म्हणे चला । तुम्ही आम्ही धरू त्याला ॥५॥
अर्थ
पांडुरंग रुपी मैंद म्हणजे लबाड चोर त्याच्या हातामध्ये प्रेमाचा घेऊन पंढरपुर क्षेत्र मध्ये आलेला आहे. तो सर्व जगाला फसवून अशा ठिकाणी घेऊन जातो की ज्या ठिकाणी कोणीही पोहोचू शकत नाही त्याचा शोध कोणालाही लागत नाही. आपले बाहु वर करून तो भक्ताची नजरबंदी करतो. या कामासाठी तो वैकुंठावरुन येथे आला आहे. या चोराला पुंडलीकाने आपल्या घरी थारा दिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात चला तुम्ही व आम्ही जाऊ व त्याला धरू.
अभंग क्र. 477
भांडवी माउली कवतुके बाळा । आपणा सकळा साक्षित्वेसी ॥१॥
माझी माझी म्हणे एकएका मारी । हे ती नाही दुरी उभयंता ॥धृपद॥
तुझे थोडे भाते माझे बहु फार । छंद करकर वाद मिथ्या ॥२॥
तुका म्हणे एके ठायी आहे वर्म । हेचि होय श्रम निवारिते ॥३॥
अर्थ
आई आपल्या दोन बाळांमध्ये कौतुकाने भांडण लावून देते आणि साक्षित्वाने त्यांची मजा बघत असते एकाला मार देते तर एकाला जवळ घेते परंतु असे असले तरी देखील त्या दोघावरही तिचे प्रेम सारखेच असते त्यामध्ये ती भेदभाव करत नाही. तुझा खाऊ थोडा आहे आणि माझा पुष्कळ आहे असा हट्ट धरून मुले उगाच भांडण करतात. तुकाराम महाराज म्हणतात या सर्वाचे वर्म आईच्या ठिकाणी असते त्यामुळेच त्या दोघाना होणारे श्रम ती निवारण करते.
अभंग क्र. 478
लटिकियाच्या आशा । होतो पडिलो वळसा । होउनिया दोषा । पात्र मिथ्या अभिमाने ॥१॥
बरवी उघडली दृष्टी । नाही तरी होतो कष्टी । आक्रंदते सृष्टी । मात्र या चेष्टांनी ॥धृपद॥
मरणाची नाही शुद्धी । लोभी प्रवर्तली बुद्धी । परती तो कधी । घडेचि ना माघारी ॥२॥
सांचूनि मरे धन । लावी पोरांसी भांडण । नाही नारायण । तुका म्हणे स्मरला ॥३॥
अर्थ नाही टाका
अभंग क्र. 479
जवळी मुखापाशी । असता नेघे अहर्निशी ॥१॥
भवनिर्दाळण नाम । विठ्ठल विठ्ठल नासी काम ॥धृपद॥
सुखाचे शेजार । करू का नावडे घर ॥२॥
तुका म्हणे ठेवा । का हा न करीच बरवा ॥३॥
अर्थ
अहो हरीचे नाम अगदी मुखाजवळ आहे तरीदेखील तुम्ही रात्रंदिवस त्याचे नाम का घेत नाहीत ? विठ्ठलाचे नाम हे संसाराचा निरास करून अनेक कामाचा नाश करणारे आहे. हे नाम सुख मय शेजार आहे, ते तुला का आवडत नाही ? तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही हरिनामाचा हा उत्तम प्रकारचा ठेवा जतन करून का ठेवत नाही ?
अभंग क्र. 480
बरवे देशाउर झालो । काय बोले बोलावे ॥१॥
लाभे लाभ दुणावला । जीव धाला दरुषणे ॥धृपद॥
भाग्ये झाली संतभेटी । आवडी पोटी होती ते ॥२॥
तुका म्हणे श्रम केला । अवघा आला फळासी ॥३॥
अर्थ
संत संगतीचा व्यवहार हा उत्तम आहे, तो शब्दाने काय सांगावा ? मनुष्य देह मिळाला हा लाभ झाला, त्यानंतर संतांचे दर्शन झाले हा दुसरा लाभ अशाप्रकारे लाभाने लाभ वाढतच गेला दुप्पट झाला, या सर्वान मुळे जीव सुखावला हा तीसरा लाभ झाला मला संतांच्या भेटीची ओढ होती. ती भेट मोठ्या भाग्याने घडून आली. तुकाराम महाराज म्हणतात आज पर्यंत मी परमार्थाचा जो श्रम केला, तो सफल झाला.

फेब्रुवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading