२५ फेब्रुवारी, दिवस ५६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ५१ ते ७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ६६१ ते ६७२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२५ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 25 feburvari

राम कृष्ण हरी आज दिनांक २५ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

51-6
म्हणौनि अग्निसेवा न सांडिता । कर्माची रेखा नोलांडिता । आहे योगसुख स्वभावता । आपणापाचि ॥51॥
म्हणून ग्रहस्थाश्रमात अग्निहोत्र न त्यागता, कर्मचरणाची मर्यादा उल्लंन्घन न करता योगसुख स्वभावतःच आपल्या ठिकाणी सहजच मिळणारे आहे.

यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विध्दि पाण्डव ।
न ह्यसंन्यस्त्यसंकल्पो योगी भवनि कश्चन ॥6. 2॥
भावार्थ :-

हे अर्जुना ! ज्याला संन्यास म्हणतात, त्यालाच तू योग असे समज. जो कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग करत नाही, तो कोणी योगी होत नाही.
52-6

ऐके संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगी । गुढी उभविली अनेगी । शास्त्रांतरी ॥52॥
हे अर्जुना ! ऐक. जो संन्यासी, तोच योगी होय, अशी अनेक शस्त्रांनी एकवाक्यतेची गुढी उभारली आहे.
53-6
जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथचि योगाचे सार भेटे । ऐसे हे अनुभवाचेनि धटे । साचे जया ॥53॥
ज्या वेळी कर्म करीत असतानाही फळाचा त्याग करणारा संकल्प नाहीसा होतो, त्यावेळी कर्मसंन्यास योगाचे तत्व अनुभवाच्या तराजूने तंतोतंत प्राप्त होते.

आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारुढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥6. 3॥
भावार्थ :-

योगप्राप्तीची इच्छा करणाऱ्या मुनीला कर्म हे साधन आहे. योगप्राप्ती झाल्यानंतर त्यालाच शम हे साधन आहे.

54-6
आता योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था । तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणी ॥54॥
अर्जुना ! योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्याला पोहचावयाचे असेल, त्याने कर्ममार्गाच्या पायर्यांनी चढून जाण्यास चुकू नये.
55-6
येणे यमनियमाचेनि तळवटे । रिगे असनाचिये पाउलवाटे । येई प्राणायामाचेनि आडकंठे । वरौता गा ॥55॥
तो यम- नियमाच्या पायथ्यापासून निघून आसनांच्या पायवाटेने प्राणायामाच्या कड्याने चढून वर येतो.


56-6
मग प्रत्याहाराचा आधाडा । बुध्दीचियाहि पाया निसरडा । जेथ हटिये सांडिती होडा । कडेलग ॥56॥
नंतर प्रत्याहार हा तुटलेला कडा लागतो. त्यावरून बुद्धीचेही पाय निसटतात. त्या ठिकाणी कडा चढून जाणारे हटयोगीदेखील योगपर्वताच्या माथ्यावर चढून जाण्याची प्रतिज्ञा मागे घेतात.
57-6
तरी अभ्यासाचेनि बळे । प्रत्याहारी निराळे । नखी लागेल ढाळे ढाळे । वैराग्याची ॥57॥
तरी आत्मस्वरूपाच्या अभ्यासाच्या बळाने, चढण्यास आधार नसलेल्या प्रत्याहाररुपी कड्यावर वैराग्यरूपी नखी ही घोरपडीसारखी हळूहळू चिकटेल; त्यामुळे वर चढण्यास आश्रय लाभेल.
58-6
ऐसा पवनाचेनि पाठारे । येता धारणेचेनि पैसारे । क्रमी ध्यानाचे चवरे । सांडे तव ॥58॥
अशा प्रकारे प्राण व अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारनेच्या विशाल मार्गाने वाटचाल करून तो ध्यानाचे शिखर गाठतो.
59-6
मग तया मार्गाची धाव । पुरेल प्रवृत्तीचि हाव । जेथ साध्यसाधना खेंव । समरसे होय ॥59॥
मग त्या योगमार्गाची धाव पूर्ण होते; मनाची हाव संपून जाते. त्या अवस्थेत ब्रम्हाशी एकरूपता प्राप्त झाल्यामुळे साधना व साध्य हे मिटून जातात.
60-6
जेथ पुढील पैस पारुखे । मागील स्मरावे ते ठाके । ऐसिया सरिसीये भूमिके । समाधी राहे ॥60॥
ज्या अवस्थेत पुढील भविष्यकाळाचा विस्तार बंद पडतो आणि भूतकाळात घडलेल्या गोष्टींचे स्मरण बंद होते, अशा ऐक्याच्या भूमिकेवर समाधी लागते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


61-6
येणे उपाये योगारूढु । जो निरवधि जाहला प्रौढु । तयाचिया चिन्हांचा निवाडु । सांगेन आइके ॥61॥
जो (यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी) या उपायांनी / मार्गानी योगनिष्णात / योगारुढ झाला, त्या योगी पुरुषाची चिन्हे तुला निवडून सांगतो, ती श्रवण कर.

यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।
सर्वसंकल्पसंन्यासी योगारुढस्तदोच्यते ॥6. 4॥
भावार्थ :-

जेंव्हा इंद्रियांच्या उपभोगात तो आसक्त होत नाही आणि कर्मातदेखील आसक्त होत नाही, त्या सर्व संकल्पाचा त्याग करणाऱ्या पुरुषाला / योग्याला योगारुढ म्हणतात.

62-6
तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा । नाही विषयांचिया येरझारा । जो आत्मबोधाचिया वोवरा । पहुडला असे ॥62॥
तर ज्याच्या इंद्रियरूपी घरात विषयांचे येणे- जाणे होत नाही. आणि जो आत्मबोधाच्या घरात शांत निजलेला असतो,
63-6
जयाचे सुखदुःखाचेनि आंगे । झगटले मानस चेवो नेघे । विषय पासीही आलिया से न रिगे । हे काय म्हणउनि ॥63॥
ज्याच्या मनाला सुख दुःखाणी कितीही धक्के दिले, तरी ते मन जागृत होत नाही. विषय जवळ आले तरी देखील हे काय आहे, म्हणून ज्याला स्मरणही होत नाही;
64-6
इंद्रिये कर्माच्या ठायी । वाढीनली परी कही । फळहेतूची चाड नाही । अंतःकरणी ॥64॥
ज्याची इंद्रिये कर्मे करीत असली परंतु ज्याच्या अंतःकरणात फलाची इच्छा कधीही उत्पन्न होत नाही,
65-6
असतेनि देहे एतुला । जो चेतुचि दिसे निदेला । तोचि योगारूढु भला । वोळखे तू ॥65॥
जो देहधारी असला, तरी विदेही अवस्थेला पोहचलेला असतो, जो व्यवहाराने जागा असूनदेखील परमात्म्यामुळे वृत्तीशून्य अवस्थेला पोहचलेला असतो, त्यामुळे तो निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य दिसतो, तोच श्रेष्ठ योगारूढ आहे, असे जाणावे.


66-6
तेथ अर्जुन म्हणे अनंता । हे मज विस्मो बहु आइकता । सांगे तया ऐसी योग्यता । कवणे दीजे ॥66॥
त्यावेळी अर्जुन म्हणाला, हे अनंता, तुझे बोलणे ऐकून मला अतिशय आश्चर्य वाटत आहे. एवढी महान योग्यता त्या योगारूढाला कोणी दिली, ते आपण मला सांगा.

उध्दरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत ।
आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ॥6. 5॥
भावार्थ :-

मानवाने स्वतः स्वतःचा उद्धार करावा. आपण आपला घात करू नये. मानव आपणच आपला हितकर्ता मित्र आहे आणि आपणच आपला अहितकर्ता शत्रू आहे.
67-6
तव हासोनि श्रीकृष्ण म्हणे । तुझे नवल ना हे बोलणे । कवणासि काय दिजेल कवणे । अद्वैती इये ॥67॥
त्यावेळी भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, तुझे हे बोलणे आश्चर्यकारक नाही का ? अरे ! या अद्वैत स्थिती मध्ये कोणाकडून कोणाला काय देणे घडेल ?
68-6
पै व्यामोहाचिये शेजे । बळिया अविद्या निद्रित होइजे । ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूंचा ॥68॥
अविवेकरूपी भ्रमाच्या शय्येवर प्रबळ अज्ञानाने जेंव्हा मनुष्य निजतो, त्यावेळी हे जन्ममरणरूपी दुःस्वप्न तो अनुभवत असतो.
69-6
पाठी अवसांत ये चेवो । तै ते अवघेचि होय वावो । ऐसा उपजे नित्य सद्भावो । तोहि आपणपाचि ॥69॥
ज्यावेळी स्वरूपाविषयी अकस्मात जागृती येते, तेंव्हा ते पूर्वीचे सर्व स्वप्न मिथ्या आहे, असे त्याला ज्ञान उत्पन्न होते. ते ज्ञानदेखील आपल्याच ठिकाणी आपणास प्राप्त होते.
70-6
म्हणऊनि आपणचि आपणपेया । घातु कीजतु असे धनंजया । चित्त देऊनि नाथिलिया । देहाभिमाना ॥70॥
म्हणून हे धनंजया ! खोट्या /मिथ्या देहावर भरवसा ठेवला, म्हणजे आपणच आपला घात करत असतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत ॥6. 6॥
भावार्थ :-

ज्याने स्वतः स्वतःला जिंकले आहे, तो स्वतः आपणच आपला मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियासहित शरीर जिंकले नाही, तो आपणच शत्रूप्रमाणे आपले शत्रुत्व करतो.


71-6
हा विचारुनि अहंकारु सांडिजे । मग असतीच वस्तु होइजे । तरी आपली स्वस्ति सहजे । आपण केली ॥71॥
सूक्ष्म विचाराने देहावरील अहंकार त्यागावा. त्यामुळे आपले मूळचे ब्रम्हस्वरूप प्रकट होते. असे झाले, म्हणजे आपले कल्याण आपणच केल्यासारखे होते.
72-6
एऱ्हवी कोशकीटकाचिया परी । तो आपणया आपण वैरी । जो आत्मबुध्दी शरीरी । चारुस्थळी ॥72॥
जो वरून दिसणाऱ्या शरीरालाच आत्मा मानतो, तो स्वतःच्या अंगाभोवती स्वतःला राहण्यास तयार केलेल्या कोशातील किड्याप्रमाणे आपणच आपला शत्रू होतो.
73-6
कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे । की असते आपुले डोळे । आपण झांकी ॥73॥
लाभाच्या वेळी दुर्दैवी माणसाला आंधळेपनाचे डोहाळे कसे प्राप्त होतात, ते बघ. तो आपले डोळे आपणच झाकून घेतो.
74-6
का कवणु एकु भ्रमलेपणे । मी तो नव्हे गा चोरलो म्हणे । ऐसा नाथिला छंद अंतःकरणे । घेऊनि ठाके ॥74॥
किंवा एखादा वेड लागलेला मनुष्य, जो मी पूर्वीचा होतो, तो मी आता नाही, मी चोरला गेलो, असे म्हणतो आणि अंतःकरणात तोच खोटा भाव धरून बसतो.
75-6
एऱ्हवी होय ते तोचि आहे । परि काई कीजे बुध्दी तैशी नोहे । देखा स्वप्नीचेनि घाये । की मरे साचे ॥75॥
एरव्ही हल्ली तो जो आहे, तो पूर्वीचाच आहे; पण काय करावे ? त्याच्या बुद्धीला तसे वाटत नाही; पहा, स्वप्नातील तलवारीच्या वाराने कोणी खरोखर मरतो काय ?

दिवस ५६ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ६६१ ते ६७२
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ६६१
समर्थाचे बाळ केविलवाणे दिसे । तरी कोणा हासे जन देवा ॥१॥
अवगुणी जरी जाले ते वोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥२॥
तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालो तुझा ॥३॥
अर्थ
एखाद्या श्रीमंताचे मुल जर केविलवाणे दिसले, तर लोक कोणाला हसतील राजाला हसतील की मुलाला. ते मुल ओंगळ असले, तरी त्याचा पिता प्रेमाने सांभाळ करतो. तुकाराम महाराज म्हणतात तसाच मी पतित असलो, तरी तुझ्याच नावाचा शिक्का धरण करून तुझाच झालो आहे.
अभंग क्र. ६६२
गाढवाचे अंगी चंदनाची उटी । राखेसवे भेटी केली तेणे ॥१॥
सहज गुण जयाचीये देही । पालट तो काही नव्हे तया ॥धृपद॥
माकडाचे गळा मोलाचा मणि । घातला चावुनी थुंकोनि टाकी ॥२॥
तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवीत आपुले मते ॥३॥
अर्थ
गाढवाला जरी चंदनाची उटी लावली तरी तो उकिरड्यात जाऊन राख अंगाला लावून घेणार. त्या प्रमाणे ज्याचा स्वभावी गुण जसा असेल तसा तो सहज बदलू शकत नाही. माकडाच्या गळ्याला जर मौल्यवान मनी बांधला तरी तो चावून थुंकोन टाकणारच. तुकाराम महाराज म्हणतात त्या प्रमाणे वाईट माणसाला आपले हित कळत नाही, तो आपल्या मताने अज्ञान वाढवीत असतो.
अभंग क्र. ६६३
नेणे सुने चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥१॥
शिकविले काही न चलती तया । बोलियेले वाया बोल जाती ॥धृपद॥
क्षीर ओकुनिया खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊ नेदी ॥२॥
वंदू निंदू काय अभक्त दुराचार । खळाचा विचार तुका म्हणे ॥३॥
अभंग क्र. ६६४
जन मानविले वरी बाह्यात्कारी । तैसा मी अंतरी नाही जालो ॥१॥
म्हणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलता लाज वाटे ॥धृपद॥
संता ब्रम्हरूप जाले अवघे जन । ते माझे अवगुण न देखती ॥२॥
तुका म्हणे मी तो आपणासी ठावा । आहे बरा देवा जैसा तैसा ॥३॥
अर्थ
माझी भक्ती पाहू लोक मला मान देतात, परंतु माझ्या अंतरंगात मी तसा झालो नाही असे मला वाटते. देवा म्हणून माझा उद्धार कसा होईल यांची मला चिंता वाटते. सर्वाच्या देखत माझे अंतरंग तुझ्या समोर प्रकट करण्याची मला लाज वाटते. संताना सर्व जग हे ब्रम्हरूप दिसते, त्यामुळे माझे अवगुण त्यांना दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला मी तर कसा आहे हे ठाऊक आहे, तुम्ही सर्व जाणता आहात.
अभंग क्र. ६६५
काम क्रोध माझे जीताती शरीरी । कोवळे ते वरी बोलतसे ॥१॥
कैसा सरता जालो तुझ्या पायी । पांडुरंगा काही न कळे हे ॥धृपद॥
पुराणीची ग्वाही वदतील संत । तैसे नाही चित्त शुद्ध झाले ॥२॥
तुका म्हणे मज आणूनि अनुभवा । दाखवी हे देवा साच खरे ॥३॥
अर्थ
काम क्रोध हे माझ्या शरीरात भरलेले आहे पण मी मात्र वरवर कोवळे (मृदू) बोलतो. मी असा असून सुद्धा तुमच्या पायाशी बसण्याची परवानगी मला कशी मिळाली, हे माझे मलाच कळत नाही. संतानी पुराणातील अनुभव देवून चित्त शुद्ध कशा प्रकारे असले पाहिजे हे सांगितले आहे परंतु माझे चित्त अजून शुद्ध झाले नाही. तुकाराम महाराज म्हणतात चित्त शुद्धी कशी असते हे मला अनुभवाद्वारे दाखून द्या.
अभंग क्र. ६६६
स्तुति करी जैसा नाही अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥१॥
तुमचे मी दास संतांचे दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायी ॥धृपद॥
रामकृष्णहरी मंत्र उच्चारणा । आवडी चरणा विठोबाच्या ॥२॥
तुका म्हणे तुमचे सेवितो उच्छिष्ट । क्षमा करी धीट होऊनिया ॥३॥
अर्थ
हे संत जन हो तुमची स्तुती करण्याचा माझा अधिकार नाही, तुमचा योग्यतेचा विचार सुद्धा मला कळत नाही. तुम्हा संतांचा दुर्बल असा मी दास आहे. तुमच्या चरणांवरजवळ ठेवून तुम्ही माझे माझे रक्षण करा. रामकृष्ण हरी या मंत्राचा मी आवडीने उच्चार करतो. त्या विठोबाचे चरण मला आवडते. तुकाराम महाराज म्हणतात हे संत जनहो तुमचे उच्छिष्ट मी सेवन करतो, तरी तुम्ही मला क्षमा करवी.
अभंग क्र. ६६७
बहु दूरवरी । वेठी ओझे होते शिरी ॥१॥
आता उतरला भार । तुह्मी केला अंगीकार ॥धृपद॥
बहु काकुलती । आलो असे मागे किती ॥२॥
तुका म्हणे देवा । आजि सफळ झाली सेवा ॥३॥
अर्थ
अनेक जन्मापासून जन्म मृत्यू चे ओझे माझ्या माथ्यावर होते. आता तो भार उतरला कारण तुम्ही माझा अंगीकार केला. मी जन्मो जन्मापासून काकुळतीला आलो आणि तुमची किती वेळा विनंती केली देवा. तुकाराम महाराज म्हणतात तुझी भेठ झाल्या मुळे माझी या जन्मात सेवा सफल झाली आहे.
अभंग क्र. ६६८
बुद्धीचा पालट धरा रे काही । मागुता हा नाही मनुष्यदेह ॥१॥
आपुल्या हिताचे न होती सायास । गृहदारा आस धनवित्त ॥धृपद॥
अवचित निधान लागले हे हाती । भोगावी विपत्ती गर्भवास ॥२॥
यावे जावे पुढे ऐसेचि कारण । भोगावे पतन नरकवास ॥३॥
तुका म्हणे धरी आठव या देही । नाही तरि काही बरे नव्हे ॥४॥
अर्थ
तुम्ही तुमच्या बुद्धीत बदल अवश्य करा, कारण हा नर देह पुन्हःपुन्हः मिळत नाही. आपुल्या हितासाठी तुम्ही काहीच सायास म्हणजे प्रयत्न करत नाही, तुमचे चित्त घर, दार, पत्नी, मुले, बाळे या कडे लागले आहे. अवचीत तुम्हाला हे मनुष्य जन्माचे भाग्य लागले असून, मग पुढे गर्भावासाची विपत्ती का भोगता ? जर मनुष्य जन्म मिळाला नाही तर, इतर प्राणी मात्रांच्या जन्मात फिरावा लागेल व नरक वास भोगावा लागेल. तुकाराम महाराज म्हणतात यांची सर्वानी आठवण धरावी व हरी नामाचे स्मरण करा नाही तर तुमचे काही बरे नाही.
अभंग क्र. ६६९
आह्मी पतितांनी घालावे साकडे । तुम्हा लागे कोडे उगवणे ॥१॥
आचरता दोष न धरू सांभाळ । निवाड उकल तुम्हा हाती ॥धृपद॥
न घेता कवडी करावा कुढावा । पाचारिता देवा नामासाठी ॥२॥
दयासिंधु नाम पतितपावन । हे आम्हा वचन सापडले ॥३॥
तुका म्हणे करू अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटी तूम्ही देवा ॥४॥
अर्थ
आम्ही पतीतांनी पातके करावे आणि तुम्ही पतितपावन आहात आणि आम्हाला तुम्ही संकटातून मुक्त करावे. आम्ही मर्‍यादा न ठेवता पापे वाढवितो, आणि तू त्यातून मुक्त करतोस. कधीही काहीच अपेक्षा न करता संकटात तू भक्तांचे रक्षण करतोस. तू दयासिंधु आहेस, पतितांना पावन करणारा आहेस हिच वचने आम्हाला अनेक ग्रंथातून सापडली आहेत. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कितीही अन्याय केले तरी तू कृपावंत आहेस आमचे दोष तू पोटात घेतोस.
अभंग क्र. ६७०
जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धावा ॥१॥
हाती प्रेमाचे भातुके । मुखी घाली कवतुके ॥धृपद॥
भवसिंधू सुखे । उतरी कासे लावूनि ॥२॥
थोर भक्तांची आस । पाहे भोवताली वास ॥३॥
तुका म्हणे कृपादानी । फेडि आवडीची धणी ॥४॥
अर्थ
जो परमात्मा असा विठ्ठल हा भक्तांचा विसावा आहे, त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याच्या कडे धावा घ्यावा. त्या परमात्म्याच्या हाती भक्ती प्रेमाचा खाऊ आहे, तो मोठ्या कौतुकाने तुमच्या मुखी घास भरविणार आहे. देव आपल्या भक्तांना कासेला लावून विनासायास भव सागरातून पार करतो. देवाला थोर भक्तांची फार आस आहे आवड आहे, तो सभोवताली दृष्टी ठेऊन त्या थोर भक्तांची एकसारखी वाट पाहत असतो. तुकाराम महाराज म्हणतात हा विठ्ठल कृपादानी कृपेचे दान देणारा आहे तो आपल्या प्रेमाची तृप्ती करत असतो.
अभंग क्र. ६७१
अखंड जया तुझी प्रीति । मज दे तयाची संगति ।
मग मी कमळापति । तुज बा नानी काटाळा ॥१॥
पडोन राहेन ते ठायी । उगाचि संताचिये पायी ।
न मागे न करी काही । तुझी आण गा विठोबा ॥धृपद॥
तुह्मी आह्मी पीडो ज्याने । दोन्ही वारती एकाने ।
बैसलो धरणे । हाका देत दाराशी ॥२॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावे बा विठ्ठला ।
न पाहिजे केला । आता माझा आव्हेर ॥३॥
अर्थ
ज्यांना अखंड कायम तुझी प्रीती लाभली आहे मला त्याची संगती लाभू दे. आणखी दुसरे काही मागून मी तुम्हाला त्रास देणार नाही. या संताच्या पाया पुढे मी उगाचच पडून राहीन, मग काही मागणार हि नाही काही करणारही नाही. तुझी आण शपथ घेऊन मी सांगतो देवा. तुमच्या दाराशी मी धरणे धरून बसलो आहे, त्यामुळे तुम्हाला व आम्हाला पिडा होते ती नाहीशी करा. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे विठ्ठला, तुम्ही माझा अव्हेर कधीही न करावा.
अभंग क्र. ६७२
पुनीत केले विष्णुदासी । संगे आपुलिया दोषी ॥१॥
कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढे । शुभ होउनिया ठाके ॥धृपद॥
प्रेमसुखाचिया रासी । पाप नाही ओखदासी ॥२॥
तुका म्हणे त्यांनी । केली वैकुंठ मेदिनी ॥३॥
अर्थ
या विष्णुदासांनी आपल्या संगतीने दोषी पातकी असलेल्या लोकांना पवित्र केले. त्या वीर विठ्ठल भक्तांकडे कोण वाकड्या नजरेने पाहीन ते विठ्ठलाचे प्रेम भरलेले शूर वीर आहेत. त्यांच्या पुढे काही अशुभ जरी आणून ठेवले तरी ते शुभ होऊन त्यांच्या पुढे येऊन उभे राहते. त्या विष्णूदासंकडे प्रेम सुखाच्या राशी असतात त्यामुळे त्यांच्या कडे पाप औषधाल देखील मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात या हरी दासाने नामघोषाने सारी पृथ्वी वैकुंठ मय केली आहे.

फेब्रुवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading