आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२२ फेब्रुवारी, दिवस ५३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा, ओवी १५१ ते १८० सार्थ तुकाराम गाथा अभंग ६२५ ते ६३६
“२२ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 22 feburvari
राम कृष्ण हरी आज दिनांक २२ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रवोः ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥5. 27॥
यतेद्नियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥5. 28॥
भावार्थ :-
बाह्य शब्दादी विषयांना दूर करून व नेत्रांची दृष्टी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून नाकातून वाहणाऱ्या प्राण व अपान वायुना सम करून ज्याने इंद्रिये, मन यांना जिंकले आहे व ज्याच्या इच्छा, भय आणि क्रोध नष्ट झालेले आहेत, तो मोक्षपरायन मुनी सदा मुक्तच आहे. 27॥28॥
151-5
तरी वैराग्यचेनि आधारे । जिही विषय दवडुनि बाहिरे । शरीरी एकंदरे । केले मन ॥151॥
ज्यांनी वैराग्याच्या आधाराने सर्व विषयांना मनातून बाहेर घालविले आहे व मन अंतर्मुख केले,
152-5
सहजे तिही संधी भेटी । जेथ भ्रुपल्लवा पडे गाठी । तेथ पाठमोरी दिठी । पारुखोनिया ॥152॥
त्यांचा प्राण इडा-पिंगळा सोडून सुषुम्नामध्ये नेला जातो आणि स्वरूपामध्ये आणि स्वरूपामध्ये दृष्टी मागे वळवून स्थिर केली जाते.
153-5
सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम । चित्तेसी व्योम- । गामिये करिती ॥153॥
उजव्या म्हणजे पिंगळा व डाव्या म्हणजे इडा नाकपुडीतून वाहत असलेल्या वायूची गती म्हणजे रेचक-पूरक बंद करून, कुंभक करून प्राण व अपान यांची सुषुम्नेत समगती म्हणजे ऐक्य करून चित्तास ते व्यमोगामी म्हणजे मुर्धन्योकाशकडे जाणारे करतात.
154-5
तेथ जैसी रथ्योदके सकळे । घेऊनि गंगा समुद्री मिळे । मग एकैक वेगळे । निवडु नये ॥154॥
जशी गंगानदी ही रस्त्यातून वाहणारे सर्व पाणी आपल्यामध्ये सामावून घेऊन सागरात मिळते, तेंव्हा त्या सागरामध्ये हे रस्त्यावरचे अशुद्ध पाणी आणि गंगेचे शुद्ध पाणी असा भेद करता येत नाही.
155-5
तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे अर्जुना । जे वेळी गगनी लयो मना । पवने कीजे ॥155॥
त्याप्रमाणे हे अर्जुना ! ज्यावेळी मनाचा प्राण – अपणाच्या निरोधाने
मुध्र्नी-आकाशात लय केला जातो, त्यावेळी वैषयीक वासनांचा विचारचक्रे आपोआप बंद पडतात.
156-5
जेथ हे संसारचित्र उमटे । तो मनोरुपु पटु फाटे । जैसे सरोवर आटे । मग प्रतिमा नाही ॥156॥
ज्या मनोरुप पटावरती संसाररूपी अनेक प्रकारची चित्रे उमटत असतात, तो पटच फाटून जातो. ज्याप्रमाणे सरोवर आटल्यावर त्यात प्रतिबिंब दिसत नाही,
157-5
तैसे मन येथ मुद्दल जाय । मग अंहभावादिक के आहे । म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥157॥
त्याप्रमाणे मनाचा मनपणाच नाहीसा झाला, तर कोणत्याही प्रकारचे अहंभाव, भ्रम वगैरे कसे शिल्लक राहतील ? म्हणून तो अनुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रम्हरूप होतो.
भोक्तारं यज्ञतपसा सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृद सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥5. 29॥
भावार्थ :-
यज्ञ आणि तप यांचा भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वराचाही ईश्वर तसेच सर्वभूत प्राण्यांचा मित्र, अशा मला जाणून तो मुनी मोक्षरूप अखंड शांतीला प्राप्त होतो.
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगोनाम पंचमोऽध्यायः ॥5॥
158-5
आम्ही मागा हन सांगितले । जे देहीचि ब्रह्मत्व पावले । ते येणे मार्गे आले । म्हणऊनिया ॥158॥
जे पुरुष देहधारी असतानाच ब्रम्हस्वरूपाला प्राप्त झाले, ते ह्या योगमार्गाने आले, म्हणून आम्ही याआधी मार्गविषयक निरूपण केले आहे.
159-5
आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर । क्रमोनि हे पार । पातले ते ॥159॥
ते पुरुष यम, नियम यांचे पर्वत ओलांडून, आणि योग- अभ्यासाचा सागर ओलांडून मोक्षाला प्राप्त झालेले असतात.
160-5
तिही आपणपे करुनि निर्लेप । प्रंपचाचे घेतले माप । मग साचाचेचि रुप । होऊनि ठेले ॥160॥
त्यांनी आपले अंतःकरण पूर्ण शुद्ध करून प्रपंचाला जाणून घेतलेले असते; आणि विश्वाचे सत्य अधिष्ठान जे परब्रम्ह, याच्याशी ते एकरूप होऊन राहिलेले असतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-5
ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु । तेथ अर्जुनु सुदंशु । म्हणोनि चमत्कारला ॥161॥
जेंव्हा भगवान श्रीकृष्णांनी योग मार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला. तेंव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्याकारणाने आश्चर्यचकित झाला.
162-5
ते देखिलिया कृष्णे जाणितले । मग हासोनि पार्थाते म्हणितले । ते काई पा चित्त उवाइले । इये बोली तुझे ॥162॥
श्रीकृष्णानी अर्जुनाच्या मनाची ही अवस्था जाणली व मग हसून अर्जुनाला म्हणाले, ‘आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का ?
163-5
तव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणांचा रावो । भला जाणितला जी भावो । मानसु माझा ॥163॥
तेंव्हा अर्जुन म्हणाला, ” हे देवा ! दुसऱ्याच्या मनातील भावभावना जाणणारे तुम्ही राजे आहात; त्यामुळे तुम्ही माझ्या मनातील भाव उत्तम प्रकारे जाणल
164-5
म्या जे काही विवरुनि पुसावे । ते आधीचि कळले देवे । तरी बोलिले तेचि सांगावे । विवळ करुनि ॥164॥
हे देवा ! मी काही चिंतन करून तुम्हाला विचारावे, ते तुम्ही आधीच जाणलेले आहे. तरी आता आपण मागे जे योगासंबंधी सांगितले, तेच आता अधिक स्पष्ट करून सांगावे.
165-5
एऱ्हवी तरी अवधारा । जो दाविला तुम्ही अनुसारा । तो पव्हण्याहूनि पायउतारा । सोहपा जैसा ॥165॥
एरवीसुद्धा असा विचार करा की, तुम्ही जो योगशास्त्राचा मार्ग सांगितला, तो पोहून जाण्यापेक्षा पायउताराने जाणे जसे सोपे असते,
166-5
तैसा सांख्याहूनि प्रांजळा । तरी आम्हासारिखिया अभोळा । एथ आहाति काही परि काळा । तो साहो ये वर ॥166॥
तसा हा अष्टांगयोग सांख्ययोगा पेक्षा सोपा आहे. परंतु आमच्यासारख्या दुर्बलांना तो राजयोग समजण्यास काही काळ विलंब लागेल; पण तो विलंब सहन करता येईल.
167-5
म्हणोनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा । विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि ॥167॥
म्हणून हे देवा ! एक वेळ त्या अष्टांगयोगाचा अनुवाद करावा. जरी त्याचा विस्तार झाला, तरी चालेल; परंतु तो योगमार्ग आरंभापासून शेवटपर्यंत सांगावा.
168-5
तव कृष्ण म्हणती हो का । तुज हा मार्ग गमला निका । तरी काय जाहले ऐकिजो का । सुखे बोलो ॥168॥
तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, असे का ! ! तुला हा मार्ग चांगला वाटतो, तर सांगायला आमची काय हरकत आहे ? ऐक, आम्ही तो तो आनंदाने सांगतो.
169-5
अर्जुना तु परिससी । परिसोनि अनुष्ठिसी । तरी आम्हासीचि वानी कायसी । सांगावयाची ॥169॥
हे अर्जुना ! तू ऐकतोस आणि त्याप्रमाणे आचरण करतोस करतोस, असे असताना आम्ही तुला सांगण्याची कमतरता का बरे करावी ?
170-5
आधीच चित्त मायेचे । वरी मिष जाहले पढियंताचे । आता ते अद्भुतपण स्नेहाचे । कवण जाणे ॥170॥
(ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ) आगोदरच आईचे अंतःकरणं, त्यात आवडत्या लेकाराचे आवडतेपणाचे निमित्त झाले; मग त्या ममतेच्या अद्भूततेची कल्पना कोणाला येईल ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-5
ते म्हणो कारुण्यरसाची वृष्टि । की नवया स्नेहाची सृष्टि । हे असे नेणिजे दृष्टी । हरीची वानू ॥171॥
त्या अद्भुत प्रेमाला करुण्यरूपी जलाचा वर्षाव म्हणता येईल अथवा नूतन प्रेमाची सृष्टी म्हणता येईल. परंतु हे असो, श्रीकृष्णाच्या कृपादृष्टीचे वर्णन कोणत्या शब्दात करावे, हे कळत नाही.
172-5
जे अमृताची वोतली । की प्रेमचि पिऊन मातली । म्हणोनि अर्जुनमोहे गुंतली । निघो नेणे ॥172॥
ही कृपादृष्टी अमृताच्या मुशीत ओतली अथवा प्रेम पिऊन मस्त झाली होती, म्हणून अर्जुनाविषयीच्या मोहमध्ये गुंतली असून तिला बाहेर येता येईना.
173-5
हे बहु जे जे जल्पिजेल । तेथे कथेसि फाकु होईल । परि स्नेह रुपा नयेल । बोलवरी ॥173॥
या कृपादृष्टीसंबंधी जास्त बोलावे, तर कथेचे विषयातर होईल. श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या अलौकिक प्रेमाचे वर्णन शब्दांनी करता येणार नाही.
174-5
म्हणोनि विसुरा काय येणे । तो ईश्वरु आकळावा कवणे । जो आपुले मान नेणे । आपणचि ॥174॥
म्हणून हा विचार का बरे करावा ? जो ईश्वर आपल्या अनंत स्वरूपाचे मोजमाप आपणच करू शकत नाही, तो ईश्वर कोणी बरे आकलन करावा. ?
175-5
तरी मागीला ध्वनीआंतु । मज गमला सावियाचि मोहितु । जे बलात्कारे असे म्हणतु । परिस बापा ॥175॥
तरी मागे सांगितलेल्या अभिप्रायावरून असे वाटते की, श्रीकृष्ण सहज मोहित बलात्काराने अर्जुनास असे म्हणेल की, ” अरे बाबा ! मी सांगतो, ते ऐक. “
176-5
अर्जुना जेणे भेदे । तुझे का चित्त बोधे । तैसे तैसे विनोदे । निरुपिजेल ॥176॥
हे अर्जुना ! ज्या प्रकाराने तुझ्या चित्ताला पटेल, त्या त्या प्रकाराने तुला कौतुकाने सोप्या मनोरंजक भाषेत सांगेन.
177-5
तो काइसया नाम योगु । तयाचा कवण उपेगु । अथवा अधिकारप्रसंगु । कवणा येथ ॥177॥
तो योग कशाला म्हणतात ? त्या योगाचा उपयोग काय ? आणि त्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो ?
178-5
ऐसे जे जे काही । उक्त असे इये ठाई । ते आघवेचि पाही । सांगेन आता ॥178॥
याप्रमाणे जे जे काही या बाबतीत (शास्त्रात) सांगितले असेल, ते सर्वच मी तुला आता सांगेन, पाहा.
179-5
तू चित्त देऊनि अवधारी । ऐसे म्हणोनि श्रीहरी । बोलिजेल ते पुढारी । कथा आहे ॥179॥
तू मन लावून ऐक. असे म्हणून भगवान श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे, ती सांगण्यात येईल.
180-5
श्रीकृष्ण अर्जुनासी संगु । न सांडोनि सांगेल योगु । तो व्यक्त करु प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु ॥180॥
अर्जुनाशी असलेल्या द्वैत न मोडता श्रीकृष्णाने अर्जुनाला जो राजयोग सांगितला, तो प्रसंग आम्ही स्पष्ट करून सांगतो, असे निवृत्तींनाथांचे शिष्य श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणाले.
॥ इति श्री ज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकायां – कर्मसंन्यासयोगोनाम्
पञ्चमोऽध्यायः ॥5॥
॥ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु॥
॥ भगवद्गीता श्लोक :- 29॥ ॥ज्ञानेश्वरी ओव्या :-180॥
दिवस ५३ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ६२५ ते ६३६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ६२५
जळो तैसा प्रेमरंग । जाय भुलोनि पतंग ॥१॥
सासूसाठी रडे सून । भाव अंतरीचा भिन्न ॥धृपद॥
मैंद मुखीचा कोवळा । भाव अंतरी निराळा ॥२॥
जैसी वृंदावनकांती । उत्तम धरू नये हाती ॥३॥
बक ध्यान धरी । दावी सोंग मस्य मारी ॥४॥
तुका म्हणे सर्प डुले । तैसा कथेमाजी खुले ॥५॥
अर्थ
पतंगाला दिव्या विषयी प्रेम असल्याने तो दिव्यावर झडप घालतो, व जळून जातो. हे कसले प्रेम ? सासू मेली म्हणजे सून रडते पण तिच्या मनात वेगळाच भाव असतो. कपटी मनुष्य वरवर गोड बोलतो, त्याच्याही मनात भाव निराळाच असतो. वृंदावन नावाचे फळ बाहेरून गोजिरवाणे असते, पण ते आतून कडू असते ते हातात घेऊ नये. नदीच्या तीरावर बक (बगळा) ध्यानस्त बसलेला असतो पण तो मासे पकडण्यासाठी बसलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्या प्रमाणे नाग डोलतो त्या प्रमाणे ढोंगी माणूस हरीची कथा चालू असताना मान डोलवण्याचे सोंग आणतो.
अभंग क्र. ६२६
वेशा नाही बोल अवगुणा दूषीले । ऐशा बोला भले झणी क्षोभा ॥१॥
कोण नेणे अन्न जीवाचे जीवन । विषमेळवण विष होय ॥धृपद॥
सोने शुद्ध नेणे कोण हा विचार । डाके हीनवर केले त्यासी ॥२॥
याती शुद्ध परि अधम लक्षण । वाया गेले तेणे सोंगे हीत ॥३॥
तुका म्हणे शूर तोचि पावे मान । आणीक मंडण भार वाही ॥४॥
अर्थ
साधुसंतांनी घातलेल्या वेशेला मी दोष देत नाही तर त्यांच्या अंतकरणात जे अवगुण आहे त्याला मी दूषण देत आहे. माझ्या बोलण्याचा राग माणू नका. अन्न जीवन जगण्याचे मुख्य साधन आहे हे कोणाला कळत नाही परंतु त्याचा अन्नामध्ये विष कालवले तर ते अन्न आपल्या जिवास घातक ठरेल. सोने शुद्ध आहे हे कोणाला माहित नाही, पण जर सोन्याचे अलंकार करणाऱ्या कारागिराने सोन्याला इतर धातू चा डाग लावला तर ते सोने शुद्ध राहत नाही. एखाद्या मनुष्याची जात उच्च कुळातील आहे परंतु त्याच्या अंगामध्ये अवगुण असतील अधम लक्षण असतील तर तो उच्च कुळात जन्माला आलेला असून देखील वाया जातो त्याचे उच्च कुळात जन्माला येणे म्हणजे एक प्रकारचे सोंग घेतल्यासारखे आहे. तुकाराम महाराज म्हणतात रणांगणामध्ये जो शुर पणे लढाई करतो तोच खरा शूर असतो नुसतेच वर शिपायाचे कपडे घातलेले किंवा वस्त्र परिधान केले तर तो शूर ठरत नाही तो केवळ व शस्त्राचे भार वाहणारा ठरतो.
अभंग क्र. ६२७
अणुरेणुया थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुनि सांडिले कलेवर । भव भ्रमाचा आकार ॥धृपद॥
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटी ॥२॥
तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता ॥३॥
अर्थ
मी अणुरेणु पेक्षाही सूक्ष्म व आकाश ऐवढा मोठा आहे. मी भ्रम रुपी आकार सर्व गिळून टाकला आहे. ज्ञेय, ज्ञाता व ज्ञान हि त्रिपुटी मी सांडली आहे आणि अंतकरण रूप घाटाच्या ठिकाणी नीज बोधाचा दीप प्रकाशित केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता मी केवळ लोकांवर उपकार करण्यासाठी उरलो आहे.
अभंग क्र. ६२८
धन्य आजि दिन । झाले संताचे दर्शन ॥१॥
जाली पापातापा तुटी । दैन्य गेले उठाउठी ॥धृपद॥
जाले समाधान । पायी विसावले मन ॥२॥
तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळी दसरा ॥३॥
अर्थ
आजचा दिवस धन्य आहे संताचे दर्शन झाले म्हणून. त्यांच्या दर्शनाने पाप, ताप, तसेच दैन्य याचे तुटातुटी झाली आहे. माझे समाधान झाले असून तुमच्या पायाशी माझे मन विसावले आहे. तुकाराम महाराज म्हणतात ज्या दिवशी संत घरी येतात, तो दिवस दिवाळी व दसरा आहे.
अभंग क्र. ६२९
हेचि माझे धन । तुमचे वंदावे चरण ॥१॥
येणे भाग्ये असो जीत । एवढे समर्पूनी चित्त ॥धृपद॥
सांभाळिले देवा । मज अनाथा जी जीवा ॥२॥
जोडूनिया कर । तुका विनवितो किंकर ॥३॥
अर्थ
देवा तुमचे चरण वंदन करणे हेच माझे धन आहे. आमचे चित्त तुम्हाला अर्पण करून आम्ही जीवन व्यतीत करू. देवा माझ्या सारखा अनाथ जिवाचा तुम्ही सांभाळ केला. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला हात जोडून विनंती करतो की, तुम्ही माझ्या जवळ राहा मी तुमचा दिन दास आहे.
अभंग क्र. ६३०
फजितखोरा मना किती तुज सांगो । नको कोणा लागो मागे मागे ॥१॥
स्नेहवादे दुःख जडलेसे अंगी । निष्ठुर हे जगी प्रेमसुख ॥धृपद॥
निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरी चाड या सुखदुःखा ॥२॥
योगिराज का रे न राहाती बैसोनी । एकिये आसनी याचि गुणे ॥३॥
तुका म्हणे मना पाहे विचारून । होई रे कठिण वज्राऐसे ॥४॥
अर्थ
हे माझ्या फजित खोर मना तुला किती सांगावे, कोणाच्याही मागे मागे जाऊ नकोस. आपण आपल्या देहा संबंधितांशी स्नेह धरला की आपल्याला दुःख होते अशा प्रकारचे प्रेमसुख हे फार कठोर असते. कोणी निंदा करो स्तुती करो किंवा दया माया करो, या सुखः दुःखा चि चाड मी धरणार नाही. योगी राज लोक जे आहे ते एकातात आसनावर बसून राहतात, ते याच साठी. त्यांना इतर जनाशी सानिध्य नको असते. तुकाराम महाराज म्हणतात अरे मनात संसार संबंधितांची उपाधी किती कठीण आहे याविषयी स्वतःशीच विचार करून पहा आणि वज्रा सारखा कठीण तू व्हावे.
अभंग क्र. ६३१
जळो माझी ऐसी बुद्धी । मज घाली तुजमधी । आवडी हे विधि । निषेधीच चांगली ॥१॥
तू स्वामी मी सेवक । उंच पद निच एक । ऐसे करावे कौतुक । नको करू खंडणा ॥धृपद॥
जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोक्ता तो निराळा । तेणे गोडी निवडिली ॥२॥
हिरा शोभला कोंदणे । अळंकारी मिरवे सोने । एक असता तेणे । काय दुजे जाणावे ॥३॥
उष्णे छाये सुख वाटे । बाळे माते पान्हा फुटे । एका एक भेटे । कोण सुख ते काळी ॥४॥
तुका म्हणे हित । हेचि मानी माझे चित्त । नव्हे आता मुक्त । ऐसा जाला भरवसा ॥५॥
अर्थ
तुझ्या मध्ये मी एकरूप व्हावे, अशी माझी बुद्धी असेल तर त्या बुद्धीला आग लागो. मला विधी निषेधाचे पालन करणे याविषयीच आवड आहे. हे देवा, तू माझा स्वामी आहे आणि मी तुझा सेवक आहे. तू उच्च पदावर आणि आम्ही खाली असावे असे तू कौतुक तू करावे, ह्यात काही भेद नसावा. पाणी पाण्यास कधी पीत नाही, वृक्ष कधी आपली फळे खात नाही. त्याला खाणारा म्हणजे त्याचा भोक्ता हा वेगळा असतो, तो त्याचि गोडी जाणतो. हिरा हा कोंदणात शोभून दिसतो. सुवर्णाची शोभा दागिन्याच्या रूपाने दिसते. या प्रमाणे सर्व व्यवहार भेदात होतात. जर ते एकच असेल, तर दुसरे कसे बरे जाणावे ? उन्हात तापल्यावर थंडगार सावलीत सुख लाभते. बालकाच्या योगाने आईला पान्हा फुटतो. एकाला दुसरे न भेटता त्यांना सुख कसे प्राप्त होईल ? तुकाराम महाराज म्हणतात असे वेगळे राहण्यातच मला हित वाटते. मी तुझ्याशी एकरूप होऊन मुक्त होणार नाही. एकत्व जाणून आणि त्याचा अनुभव घेऊन, तू देव आणि मी भक्त बनून मी सदैव तुझ्यावर निस्वार्थ प्रेम करत राहणार आहे.
अभंग क्र. ६३२
मनी वसे त्याचे आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसे ॥१॥
मनी वसे त्याचे आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसे ॥१॥
जातीचे ते झुरे येर येरासाठी । वियोगे ही तुटी नेघे कधी ॥धृपद॥
भेटीची अपेक्षा वारता आदर । पुसे नव्हे धीर मागुताले ॥२॥
तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन । सोइरे हरीजन प्राणसखे ॥३॥
अर्थ
आपल्याला ज्याच्या बद्दल आवड आहे, त्याचे बोलणे हे नेहमी आवडते. असे वाटते कि, त्याचा समाचार घ्यावा. एका जातीचे म्हणजे एकाच आवडीचे दोघे एक मेकांसाठी झुरत म्हणजे झिजत असतात. ते शरीराने दूर पण मनाने एक असतात. एकमेकांच्या भेटीची ते अपेक्षा धरतात, त्यांना कुणी थांबविले तर ते त्यांच्या विषयी पुन्हा पुन्हा विचारतात, तुकाराम महाराज म्हणतात हरीभक्त हे माझ्या जीवाचे जीवन आहे. ते माझे प्राण साखेच आहेत.
अभंग क्र. ६३३
नव्हे आराणूक परि मनी वाहे । होईल त्या साहे पांडुरंग ॥१॥
पंढरीसि जावे उद्वेग मानसी । धरिल्या पावसी संदेह नाही ॥धृपद॥
नसो बळ देह असो पराधीन । परि हे चिंतन टाको नको ॥२॥
तुका म्हणे देह पडो या चिंतने । पुढे लागे येणे याजसाठी ॥३॥
अर्थ
प्रपंचात राहून समाधानी राहतो, जो पांडुरंगाचे चिंतन करतो, त्याला पांडुरंगच साह्य करतो. पंढरीला जावे असे जो मनात ठरवतो, त्याला पांडुरंग भेटल्या शिवाय राहत नाही. जरी देहात बळ नसले, देह पराधीन असला तरी पांडुरंगाचे चिंतन कधीही सोडू नये. तुकाराम महाराज म्हणतात चिंतन करता करता देह पडला तरी त्याची परवा करू नये. परत पांडुरंगाची भक्ती करण्या साठी मनुष्य जन्म मिळतो.
अभंग क्र. ६३४
कोठे देवा आले अंगा थोरपण । बरे होते दीन होतो तरी ॥१॥
साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीने नाम गाईन ते ॥धृपद॥
न पुसते कोणी कोठे ही असता । समाधान चित्ताचिया सुखे ॥२॥
तुका म्हणे जन अव्हेरिते मज । तरी केशीराज सांभाळिता ॥३॥
अर्थ
माझ्या अंगी मोठेपणा का आला ? मी दिन होते तेच बरे होते देवा. संतांची सेवा हे उत्तम साधन आहे, आणि आवडीने मी हरी नाम गाईन. मी कोठे हि गेलो, तरी मला कोणी विचारले नसते त्या योगाने मी समाधानी झालो असतो सुखी झालो असतो. तुकाराम महाराज म्हणतात लोकांनी माझा अव्हेर केला असता तर केशीराजाने माझा सांभाळ केला असता.
अभंग क्र. ६३५
चतुर मी जालो आपुल्या भोवता । भावेविण रिता स्फुंद अंगी ॥१॥
आता पुढे वाया जावे हे ते काई । कामक्रोधे ठायी वास केला ॥धृपद॥
गुणदोष आले जगाचे अंतरा । भूताच्या मत्सरावरी बुद्धी ॥२॥
तुका म्हणे करू उपदेश लोका । नाही जालो एका परता दोषा ॥३॥
अर्थ
मी चतुर झालो असा मोठा अभिमान माझ्या अंगी आला आहे, पण तो माझ्या अंगी देवाविषयी भाव नसल्या मुळे रिता म्हणजे पोकळ आहे. आता पुढे मी वयाला जाईल हे काही नवल नाही, कारण माझ्या मध्ये काम क्रोध यांनी वास केला आहे. जगाच्या मधील सर्व गुणदोष एकत्र होऊन माझ्या मनात ते शिरले आहे. भुताच्या म्हणजे प्राणीमात्रांचे मत्सर करावा आशी माझी बुद्धी झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी लोकांना उपदेश करतो पण मात्र मी एकाही दोषापासून सुटलो नाही.
अभंग क्र. ६३६
धन्य ते संसारी । दयावंत जे अंतरी ॥१॥
येथे उपकारासाठी । आले घर ज्या वैकुंठी ॥धृपद॥
लटिके वचन । नाही देही उदासीन ॥२॥
मधुरा वाणी होटी । तुका म्हणे वाव पोटी ॥३॥
अर्थ
ज्यांच्या अंगी दया आहे ते या जगात धन्य आहे. कारण ते येथे फक्त उपकारासाठी आलेले आहेत, त्यांचे घर हे वैकुंठा मध्ये आहे. ते कधी लटिके (खोटे) बोलत नाही, ते देहासंबंधी उदास असतात. तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या ओठात कायम मधुर वाणी असून, त्याच्या पोटी लोकांचे गुणदोष सहन करण्या इतकी भरपूर जागा आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















