आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२ फेब्रुवारी, दिवस ३३, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा, ओवी १५१ ते १७५ + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३८५ ते ३९६
“२ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 2 feburvari
राम कृष्ण हरी आज दिनांक २ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
151-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
जे स्वकर्मे निष्कामता । अनुसरले पार्था । कैवल्य पर तत्वता । पातले जगी ॥151॥
हे पार्था ! जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात, ते श्रेष्ठ अशा कैवल्यपदाला प्राप्त होतात.
152-3
कर्मणैव हि संसिद्धीमास्थिता जनकादयः ।
लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि ॥3. 20॥
भावार्थ :-
कारण, आसक्ती रहित कर्म करूनच जनकादिकांना सिद्धी प्राप्त झाली. यासाठी तू सुद्धा लोकसंग्रहाकडे (लोकहिताकडे) लक्ष देऊन कर्मच करणे योग्य आहे.
देखे पा जनकादिक । कर्मजात अशेख । न सांडिता मोक्षसुख । पावते जाहले ॥152॥
असे पाहा की, कर्माचा मुळीच त्याग न करता, जनकादिकांना मोक्षाचे सुख प्राप्त झाले.
153-3
याकारणे पार्था । होआवी कर्मी आस्था । हे आणिकाही एका अर्था । उपकारेल ॥153॥
हे अर्जुना ! यासाठी कर्म करण्याविषयी तू आस्था ठेव. कारण त्या आस्थेपासुन आणखी एक उपयोग होणार आहे.
154-3
जे आचरता आपणपेया । देखी लागेल लोका यया । तरी चुकेल हा अपाया । प्रसंगेचि ॥154॥
त्या कर्माचे आचरण केले असता या लोकांना तसे आचरण करण्याची सवय लागेल, आणि कर्मलोपाने होणारी दुःखे सहजच नाहीशी होतील.
155-3
देखे प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयाही कर्तव्य असे उरले । लोकालागी ॥155॥
असे पाहा की, जे कृतकृत्य झाले आहेत आणि निष्काम स्थितीला पोहचले आहेत, (म्हणजे मिळवायचे ते ज्यांनी मिळविले व निरिच्छ झाले), त्या महान पुरुषांनादेखील लोकांना सदाचाराच्या मार्गाकडे आणण्यासाठी कर्म करावे लागते.
156-3
मार्गी अंधासरिसा । पुढे देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनि ॥156॥
आंधळ्या माणसाला सांभाळून नेणारा डोळस माणूस हा आंधळ्या माणसाप्रमाणे सावकाश चालत असतो, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाने सादाचाराने आणि धर्माचे आचरण करून अज्ञानी माणसास मार्ग दाखवावा.
157-3
हा गा ऐसे जरी न कीजे । तरी अज्ञाना काय वोजे । तिही कवणेपरी जाणिजे । मार्गांते या ॥157॥
ज्ञानी माणसाने धर्माचे आचरण करून धर्माचा मार्ग सांगितला नाही, तर अज्ञानी माणसाला कसे बरे समजेल ? त्यांनी कोणत्या मार्गाने या धर्माला जाणावे ?
(आपल्याला योग्य असलेला मार्ग त्यांना कसे बरे समजेल)
यद् यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥3. 21॥
भावार्थ :-
श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, त्याचेच अनुकरण इतर लोक करतात. तो पुरुष जे काही प्रमाण मानतो, लोकदेखील त्याला अनुसरून वर्तन करतात.
158-3
एथ वडील जे जे करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥158॥
या जगात थोर लोक जे कर्म आचरतात, त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात; आणि इतर सामान्य लोक त्याचेच आचरण करतात.
159-3
हे ऐसे असे स्वभावे । म्हणोनि कर्म न संडावे । विशेषे आचरावे । लागे संती ॥159॥
जगाचा असा स्वभावच आहे. म्हणून श्रेष्ठ लोकांनी (ज्ञानी पुरुषाने) कर्माचा त्याग करू नये. एवढेच नाही, तर संतांनी तर त्यांचे आचरण जगाच्या कल्याणासाठी विशेष काळजीने केले पाहिजे.
न मे पार्थस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥3. 22॥
भावार्थ :-
हे अर्जुना ! या त्रैलोक्या मध्ये मला कर्तव्य असे काही नाही, किंवा प्राप्त न झालेली अशी गोष्ट मला प्राप्त करावयाची राहिलेली नाही, तरीपण मी कर्म करतच आहे.
160-3
आता आणिकाचिया गोठी । तुज सांगो काय किरीटी । देखे मीचि इये राहाटी । वर्तत असे ॥160॥
हे अर्जुना ! आता आणखी गोष्टी (दुसऱ्याच्या गोष्टी) तुला कशाला सांगू ? मी देखील कर्ममार्गाने वागतो, हे प्रत्येक्ष बघ.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-3
काय सांकडे काही माते । की कवणे एके आर्ते । आचरे मी धर्माते । म्हणसी जरी ॥161॥
मला काही कमी आहे किंवा कोणत्या एखाद्या फळाची इच्छा धरून मी धर्माचे आचरण करत आहे, असे जर म्हणशील,
162-3
तरी पुरतेपणालागी । आणिकु दुसरा नाही जगी । ऐसी सामुग्री माझा अंगी । जाणसी तू ॥162॥
तर पूर्णतेच्या दृष्टीने पहिले असता माझ्यासारखा दुसरा जगात कोणीही नाही; किंवा सर्व प्रकारचे सामर्थ्य माझ्यामध्ये वसलेले आहे, हे तू जाणतोस.
163-3
मृत गुरूपुत्र आणिला । तो तुवा पवाडा देखिला । तोही मी उगला । कर्मी वर्ते ॥163॥
मी आपल्या (संदीपनी) गुरूचा मेलेला मुलगा परत आणून दिला, तो पराक्रम तू पहिला आहेस. तो मी इतका सामर्थ्य संपन्न असूनही कर्ममार्गाचे आचरण करतो.
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
मम वर्त्मानुवर्तंते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥3. 23॥
भावार्थ :-
हे पार्था ! जर मी सावधपणे कर्मे केले नाहीत, तर लोक देखील माझ्या वागण्याचे आचरण करतील.
164-3
परी स्वधर्मी वर्ते कैसा । साकांक्षु का होय जैसा । तयाचि एका उद्देशा – । लागोनिया ॥164॥
जसा सकाम पुरुष केवळ एका फळाच्या उद्देशानेच तत्पर असतो, त्या तत्परतेने मी स्वधर्म आचरण करीत असतो.
165-3
जे भूतजात सकळ । असे आम्हाचि आधीन केवळ । ते न व्हावे बरळ । म्हणोनिया ॥165॥
कारण सर्व प्राणीसमूह आमच्या आधीन आहेत. मी जसे कर्म करतो, तेही करतात. तरी हे लोक कर्मभ्रष्ट होऊ नयेत; म्हणून मी सदैव कर्ममार्ग आचरीत असतो.
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्या कर्म चेदहम् ।
संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥3. 24॥
भावार्थ :-
जर मी कर्म करणार नाही, तर हे सर्व लोक भ्रष्ट होतील; आणि मी वर्णसंकर करणारा होईन, व या लोकाचा नाश करण्यास मी कारण होईन.
166-3
आम्ही पूर्णकाम होऊनी । जरी आत्मस्थिती राहुनी । तरी हे प्रजा कैसेनि । निस्तरेल ॥166॥
जर आम्ही निरिच्छ होऊन आत्मस्थितीत शांतपणे बसून राहिलो, तर ही प्रजा भवसागरातून कशी पार पडेल ?
167-3
इही आमुची वास पाहावी । मग वर्तती परी जाणावी । ते लौकिक स्थिती अवघी । नासिली होईल ॥167॥
प्रजेने आमच्या मार्गाकडे पाहावे आणि आचरणाची पद्धत समजून घ्यावी, असा प्रकार असल्यामुळे आम्ही जर कर्माचा त्याग केला, तर लोकांचे जीवन सर्व प्रकारे बिघडून जाईल.
168-3
म्हणोनि समर्थु जो एथे । आथिला सर्वज्ञते । तेणे सविशेषे कर्माते । त्यजावे ना ॥168॥
म्हणून या लोकी जो समर्थ आहे आणि सर्वज्ञान संपन्न आहे, त्याने विशेष करून कर्माचा त्याग कधी करू नये.
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वंति भारत ।
कुर्याद्विवांस्तथाऽसक्तश्चिकीर्षुर्लोकलोसंग्रहम् ॥3. 25॥
भावार्थ :-
हे अर्जुना ! ज्याप्रमाणे अज्ञानी लोक कर्माच्या ठिकाणी आसक्त होऊन कर्म करतात, त्याप्रमाणे लोकसंग्रहांची इच्छा करणाऱ्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्मे करावीत.
169-3
देखे फळाचिया आशा । आचरे कामुकु जैसा । कर्मी बहरु होआवा तैसा । निराशाही ॥169॥
असे पाहा की, फळाच्या आशेने सकाम पुरुष जेवढ्या उत्सहाने कर्माचे आचरण करतो, तेवढ्या उत्सहाने फलाशा नसलेल्या पुरुषांनीही कर्मे केली पाहिजेत.
170-3
जे पुढतपुढती पार्था । हे सकळ लोकसंस्था । रक्षणीय सर्वथा । म्हणऊनिया ॥170॥
कारण अर्जुना ! लोकांचे हे आचरण सर्व प्रकारे नेहमी जतन करून ठेवणे योग्य असते. म्हणून,
171-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
मार्गाधारे वर्तावे । विश्व हे मोहरे लावावे । अलौकिक नोहावे । लोकांप्रति ॥171॥
शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्ममार्गाचे आचरण करून सर्वाना सन्मार्ग दाखवावा आणि आपण सामान्य लोकांप्रमाणे राहून आपले जीवन आचरावे. आपले अलौकिकत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये.
न बुद्धिभेदं जनयेदज्ञाना कर्मसंगिनाम् ।
जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् ॥3. 26॥
भावार्थ :-
ज्ञानी पुरुषाने कर्मामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी लोकाचा बुद्धिभेद करू नये; तर आपण स्वतः परमेश्वराशी एकरूप होऊन सर्व कर्मे उत्तम प्रकारे करावीत आणि अज्ञानी लोकांकडूनही तशीच करवून घ्यावीत.
172-3
जे सायासे स्तन्य सेवी । ते पक्वान्ने केवी जेवी । म्हणोनि बाळका जैशी नेदावी । धनुर्धरा ॥172॥
लहान बालक मोठ्या प्रयत्नाने आईचे दूध पिते, तो पक्वान्ने कसे बरे खाईल ? म्हणून अर्जुना ! ती पक्वान्ने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलांना देऊ नयेत;
173-3
तैशी कर्मी जया अयोग्यता । तयाप्रति नैष्कर्म्यता । न प्रगटावी खेळता । आदिकरूनी ॥173॥
त्याप्रमाणे ज्याच्या अंगी कर्मे चांगल्या तऱ्हेने करण्याची योग्यता नाही (शास्त्रात सांगितल्या प्रमाणे कर्मे न करणाऱ्या), त्याना कौतुकानेदेखील नैष्कर्म्यता सांगू नये.
174-3
तेथे सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी । नैष्कर्मींही दावावी । आचरोनि ॥174॥
त्यांना योग्य कर्माची वागणूक लावून देणे हे योग्य आहे. त्यांच्याजवळ सतक्रियेची स्तुती करावी आणि निष्काम पुरुषाने सतकर्माचे आचरण करून दाखवावे.
175-3
तया लोकसंग्रहालागी । वर्तता कर्मसंगी । तो कर्मबंधु आंगी । वाजेलना ॥175॥
सत्पुरुषाने लोकांच्या कल्याणासाठी जरी कर्मे केली, तरी त्याला कर्माचे बंधन लागत नाही.
दिवस ३३ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३८५ ते ३९६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 385
वंदीन मी भूते । आता अवघीचि समस्ते ॥१॥
तुमची करीन भावना । पदोपदी नारायणा ॥धृपद॥
गाळुनिया भेद । प्रमाण तो ऐसा वेद ॥२॥
तुका म्हणे मग । नव्हे दुजियाचा संग ॥३॥
अर्थ
यापुढे आता या भुतलावर जी काही भूत मात्र आहेत ती सर्व देवाचीच रुप समजून त्यांना मी वंदन करेन. अहो नारायण सर्व प्राणीमात्र म्हणजे तुम्हीच आहात अशी भावना मी धरीन. लहानमोठा भेद बाजूला सारून पदोपदी मी सर्वत्र तुम्हाला पाहीन. तुकाराम महाराज म्हणतात याविषयी वेद मला प्रमाण आहेत. असे झाल्यावर कोणताही दुजेपणा मनात उत्पन्नच होणार नाही.
अभंग क्र. 386
पूजा पुज्यमान । कथे उभे हरीजन ॥१॥
ज्याची कीर्ती वाखाणिती । तेथे ओतली ती मुर्ती ॥धृपद॥
देहाचा विसर । केला आनंदे संचार ॥२॥
गेला अभिमान । लाज बोळविला मान ॥३॥
शोक मोह चिंता । यांची नेणती ते वार्ता ॥४॥
तुका म्हणे सखे । विठोबाचि ते सारिखे ॥५॥
अर्थ
हरी कथे मध्ये जे हरिभक्त उभे आहेत ते खरोखर पूज्य आहेत पूज्यमान आहेत. ज्या हरीची कीर्ती ते वाखाणित आहेत, तो हरीच त्यांच्या शरीरात मूर्तिमंत वास करीत आहे. त्यांच्या ठिकाणी देहाची आठवण सुद्धा नाही. आणि केवळ शुद्ध आनंदात ते मग्न आहेत. त्यांना देहाचा अभिमान नाही. हरीनाम घेण्यात लाज नाही, आणि मानसन्मानाचा विचार तर त्यांनी हाकलून दिला आहे. ऐवढेच काय शोक मोह चिंता यांचे नावही ते जाणत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात माझे सखे हरीभक्त खरोखर प्रत्यक्ष विठ्ठलासारखेच आहेत.
अभंग क्र. 387
भाव तैसे फळ । न चले देवापाशी बळ ॥१॥
धावे जातीपाशी जाती । खुण येरयेरा चित्ती ॥धृपद॥
हिरा हिरकणी । काढी आतुनि आइरणी ॥२॥
तुका म्हणे केले । मन शुद्ध हे चांगले ॥३॥
अर्थ
ज्याचा जसा भक्तांचा भक्तिभाव असेल तसाच देव त्या भक्तांसाठी होत असतो बळेच शक्ती दाखवून देव प्रसन्न करता येत नाही. जात जाती कडे धावते कारण एका जातीच्या माणसांना परस्पराची खुण कळते. खरा हिरा ऐरणीवर ठेऊन त्याच्या वर घाव घातला, तरी तो फुटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हिरा असो, हिरकणी असो, तो ऐरणीत शिरतो. मन असे हिऱ्यासारखे शुद्ध करावे ते फुटता कामा नये.
अभंग क्र. 388
वरीवरी बोला रस । कथी ज्ञाना माजी फोस ॥१॥
ऐसे लटिके जे ठक । तया इह ना पर लोक ॥धृपद॥
परिस एक सांगे । अंगा धुळीही न लगे ॥२॥
तुका म्हणे हाडे । कुतर्या लाविले झगडे ॥३॥
अर्थ
वरवर ब्रम्हज्ञानाचा किंवा ज्ञानाच्या कितीही रसभरीत बोल बोलले तरी अनुभवाचुन ते बोल टरफला सारखे आहेत. अशा ठक लोकांना इह लोकात सुख मिळत नाही व परलोकातही चांगली गती मिळत नाही. दुसऱ्याने सांगितलेलं ऐकून जो तेच बडबडतो त्याला परमार्थाचा अंशही लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात असे नुसतेच शब्द वाचाळपाणाने बोलने, म्हणजे हाडासाठी कुत्री भांडतात तशी भांडणे अशी अवस्था विद्वानांची होत असतात.
अभंग क्र. 389
हेचि तुझी पूजा । आता करीन केशीराजा ॥१॥
अवघी तुझीच ही पदे । नमस्कारीन अभेदे ॥धृपद॥
न वर्जीत दिशा । जाय तेथेचि सरिसा ॥२॥
नव्हे एकदेशी । तुका म्हणे गुणदोषी ॥३॥
अर्थ
हे केशिराजा आता मी तुझी अशाप्रकारे पूजा करणार आहे. जे काही समोर दिसते ते तुझे स्वरूप आहे असे समजून मी अभेद बुद्धीने त्याला नमस्कार करीन. कोणतीही दिशा वर्ज्य न करता जिकडे जाईन तिकडे तुझ्या सरस अश्या रुपाला जाणीन. तुकाराम महाराज म्हणतात मी कधीही कोणत्याही गोष्टीत जे गुणदोष असतील, त्याकडे लक्ष देणार नाही.
अभंग क्र. 390
आपुले तो काही । येथे सांगिजेसे नाही ॥१॥
परि हे वाणी वायचळे । छंद करविते बरळे ॥धृपद॥
पंचभूतांचा हा मेळा । देह सत्यत्वे निराळा ॥२॥
तुका म्हणे भुली । इच्या उफराटया चाली ॥३॥
अर्थ
या प्रपंचामध्ये एखादी गोष्ट आपली आहे असे सांगण्यासारखी एकही गोष्ट किंवा काहीच नाही म्हटले तरी चालेल, असे काहीही नाही. परंतु हे सर्व माहीत आहे तरी देईल वाणीला व्यर्थच ‘मी आणि माझे ” असे म्हणण्याचे चाळे लागले आहे छंद लागलेला आहे आणि ती व्यर्थ काहीतरी बरळत असते. हा देह पंच भुतांचा मेळ आहे आणि सत्य काय असेल तर आत्मा आहे तो आत्मा आणि देह हे निराळे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात परंतु वाणीला “मी आणि माझे” असे म्हणण्याची सवयच लागलेली आहे खरेतर हे सर्व उफराटे आहे.
अभंग क्र. 391
विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साठी वाचा ॥१॥
कटी कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥धृपद॥
न पाहे सिदोरी । जाती कुळ न विचारी ॥२॥
तुका म्हणे भेटी । हाका देता उठाउठी ॥३॥
अर्थ
हा भव समुद्र तरून जाण्यासाठी विठ्ठल नावाचा फुकटचा नावाडी आपल्याला लाभला आहे त्याला जर आपल्या वाचणे आपण आळविले तर तो लगेच आपल्या मदतीसाठी धावून येतो. हा देव कटे वर हात ठेऊन उभाचा उभा राहिलेला आहे, कायम सज्ज कधीहि बसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हा भक्तांच्या पाप पुण्याची शिदोरी पाहत नाहि, त्यांची जात बरी वाईट अगर कुळ उच्च नीच आहे, असा विचार करत नाही. त्याच्या नावाने हाक मारली की तो ताबडतोब भेट देतो.
अभंग क्र. 392
कृपावंत किती । दीन बहु आवडती ॥१॥
त्यांचा भार वाहे माथा । करी योगक्षेमचिंता ॥धृपद॥
भुलो नेदी वाट । करी धरूनि दावी नीट ॥२॥
तुका म्हणे जीवे । अनुसरल्या एक भावे ॥३॥
अर्थ
भक्त जणहो पहा हा देव किती कृपाळू आहे त्याला केवळ दिन भक्तच आवडतात. त्यांच्या संसाराचा सर्व भार आपणच घेऊन त्यांच्या योग क्षेमाची चिंता तोच करतो. भक्त ऐखाद्यावेळी चुकले आणि आडमार्गाला लागले तर त्यांना हाताला धरून सरळ मार्गाला आणतो. तुकाराम महाराज म्हणतात जे भक्त एकनिष्ठपणाने देवाला अनुसरतात, त्यांच्यासाठी तो वर मी सांगिलेल्या सर्व गोष्टी करतो.
अभंग क्र. 393
मन गुंतले लुलया । जाय धावोनि त्या ठाया ॥१॥
मागे परतवी तो बळी । शूर एक भूमंडळी ॥धृपद॥
येऊनिया घाली घाला । नेणो काय होईल तुला ॥२॥
तुका म्हणे येणे । बहु नाडिले शाहाणे ॥३॥
अर्थ
हे मन कसे विषयाच्या ठिकाणी गुंतले आहे ते पहा सारखे विषयाकडेच ते धाव घेते. जो या मनाला मागे खेचू शकतो, तो या जगात खरा शूर आहे. हे मन ज्यावेळेस विषय सक्तीचा घाला घालील, त्या वेळेस तुझी दशा काय होईल, ते कळणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात आज पर्यंत या मनाने जगात कित्येक शहाण्या लोकांना नाडले (फसविले) आहे.
अभंग क्र. 395
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥१॥
तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचे मुख ॥धृपद॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥२॥
मना तेथे धाव घेई । राहे विठोबाचे पायी ॥३॥
तुका म्हणे जीवा । नको सोडू या केशवा ॥४॥
अर्थ
हे माझी वाणी तू अवीट अशा गोड विठोबाचे नाम सतत घेत रहा. आणि आपल्या डोळ्यांना सांगतात, तुम्ही विठोबाचे मुख दर्शन घेण्याचे सुख नित्य घ्या. अहो कानांनो तुम्ही विठोबाचे गुणानुवाद श्रवण करा. हे मना, तू निरंतर तिकडेच धाव घे आणि विठ्ठलाच्या पायाशी सतत राहा. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवा, या केशवाला तू सोडू नकोस.
अभंग क्र. 396
धणी न पुरे गुण गाता । रूप दृष्टी न्याहाळिता ॥१॥
बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥धृपद॥
सकळ मंगळाचे सार । मुख सिद्धीचे भांडार ॥२॥
तुका म्हणे सुखा । अंतपार नाही लेखा ॥३॥
अर्थ
तुझी स्तुती करतांना व गुण वर्णन करताना तृप्तीच होत नाही असे म्हणून महाराज सांगत आहेत. हा पांडुरंग खरच फार सुंदर आहे स्वरूपाने सावळा सुंदर आहे. या भगवंताचे रूप सर्व मंगलाचे सारतत्व आहे व सर्व सिद्धीचे भांडार म्हणजे याचे मुखआहे. तुकाराम महाराज म्हणतात या हरीच्या ठिकाणी जे सुख आहे, त्याची सीमाच नाही व त्याचे वर्णनही करता येणार नाही.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















