आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१८ फेब्रुवारी, दिवस ४९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा, ओवी ५१ ते ७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ५७७ ते ५८८
“१८ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 18 feburvari
राम कृष्ण हरी आज दिनांक १८ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
51-5
देखे बुध्दीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे । ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥51॥
ज्याची बुद्धी हे चांगले, हे वाईट हि द्वैतभावना जाणत नाही, जेथे मनाला अंकुर उत्पन्न होत नाही, असे द्वैतभावणारहित व इच्छारहित कर्माला कायिक व्यवहार म्हणतात.
52-5
हेच मराठे परियेशी । तरी बाळकाची चेष्टा जैशी । योगिये कर्मे करिती तैशी । केवळा तनू ॥52॥
हेच उदाहरण देऊन मराठी भाषेतून सांगत आहे. लहान बाळ हे ज्याप्रमाणे द्वैतभावणारहित व इच्छा रहित कर्म करते, त्याप्रमाणे योगी शरीराने कर्म करीत असतात.
53-5
मग पांचभौतिक संचले । जेव्हा शरीर असे निदेले । तेथ मनचि राहाटे एकले । स्वप्नी जेवी ॥53॥
पंच महाभूतांनी बनलेले हे शरीर ज्यावेळी झोपी गेलेले असते, त्या वेळी एकटे मनच स्वप्नात भटकत असते.
54-5
नवल ऐके धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा । देहा होऊ नेदी उजगरा । परि सुखदुःखे भोगी ॥54॥
हे धनुर्धरा ! एक आश्चर्य पाहा. जागृत अवस्थेत या वासनेचा केवढा विस्तार आहे ! ही वासना देहाला जागे होऊ देत नाही; परंतु सुख दुःखाचा भोग भोगावयास लावते.
55-5
इंद्रियांचा गावी नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे । तो केवळु गा म्हणिजे । मानसाचा ॥55॥
इंद्रियांना ज्याची माहितीदेखील नसते, असे जे कर्म निर्माण होते, त्यास मानसिक कर्म म्हणतात.
56-5
योगिये तोही करिती । परि कर्मे तेणे न बंधिजती । जे सांडिली आहे संगती । अंहभावाची ॥56॥
अंतःकरणाने योगी असणारे मानस कर्म करतात; परंतु ते कर्मानी बध्द होत नाहीत. कारण त्यांनी अहंकाराची संगती सोडून दिलेली असते.
57-5
आता जाहालिया भ्रमहत । जैसे पिशाचाचे चित्त । मग इंद्रियांचे चेष्टित । विकळु दिसे ॥57॥
एखाद्या मनुष्याचे चित्त भ्रमिष्ट झालेले असते किंवा पिशाच्याची बाधा झाल्यावर जसे चित्त असते, तसे त्याचे सर्व व्यवहार विसंगत दिसतात.
58-5
स्वरूप तरी देखे । आळविले आइके । शब्दु बोले मुखे । परि ज्ञान नाही ॥58॥
त्यास समोरचे रूप दिसत असते, कोणी हाक मारली तर ऐकूदेखील येते, तो स्वतः बोलतही असतो; परंतु या सर्व कर्माची त्याला जाणीव नसते.
59-5
हे असो काजेविण । जे जे काही कारण । ते केवळ कर्म जाण । इंद्रियांचे ॥59॥
असो, त्यातील सूत्र असे आहे की, प्रयोजनावाचून जे जे काही केवळ विषयांशी संयोग पावून कर्म घडते, ते केवळ इंद्रियांचे कर्म जाणावे. असे तू समज.
60-5
मग सर्वत्र जे जाणते । ते बुद्धीचे कर्म निरूते । वोळख अर्जुनाते । म्हणे हरि ॥60॥
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व विषयांचे जे ज्ञान होते, ते केवळ बुद्धीचे कर्म आहे, असे तू जाण.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-5
ते बुद्धी धुरे करुनी । कर्म करिती चित्त देऊनी । परि ते नैष्कम्यापासुनी । मुक्त दिसती ॥61॥
जे कर्मयोगी बुद्धीला पुढे करून चित्त देऊन कर्म करतात, नैष्कम्यर्य अवस्थेला गेलेल्या मुक्त पुरुषांपेक्षाही अधिक मुक्त दिसतात.
62-5
जे बुद्धीचिये ठावूनि देही । तया अंहकाराची सेचि नाही । म्हणोनि कर्म करिता पाही । चोखाळले ॥62॥
कारण त्यांच्यामध्ये बुद्धिपासून देहापर्यंत कोठेही मीपणाच्या अहंकाराचे स्मरण नसते. म्हणून कर्म करीत असताही ते शुद्ध असतात.
63-5
अगा करितेनवीण कर्म । तेचि ते नैष्कर्म्य । हे जाणती सुवर्म । गुरुगम्य जे ॥63॥
अर्जुना ! कर्तेपणाचा अभिमान त्यागून जे कर्म केले जाते, तेच खरे नैशकर्म्य होय. हे सतगुरुकडून कळणारे खरे वर्म हे ज्ञानी पुरुष जाणत असतात.
64-5
आता शांतरसाचे भरिते । सांडीत आहे पात्राते । जे बोलणे बोलापरौते । बोलवले ॥64॥
आता या शांतरसाचे बोलणे आपल्या पात्राची मर्यादा सोडून उचंबळून येत आहे; कारण शांत रसाने बोलण्याच्या पलीकडे असलेले विचार माझ्याकडून बोलले जात आहेत.
65-5
एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु । तयासीचि आथी लागु । परिसावया ॥65॥
ज्याचा इंद्रियासंबंधीचा पराधीनपणा उत्तमप्रकारे नाहीसा झाला आहे, त्यालाच हे अनुभवाचे विचार ऐकण्याचा अधिकार आहे.
66-5
हा असो अतिप्रसंगु । न संडी पा कथालागु । होईल श्लोक संगति भंगु । म्हणोनिया ॥66॥
श्रोते म्हणाले, आता हे विषयातर पुरे करा. कथेचा मूळ संबध सोडू नका; कारण श्रोत्यांच्या संगतीचा भंग होऊन जाईल.
67-5
जे मना आकळिता कुवाडे । घाघुसिता बुद्धी नातुडे । ते दैवाचेनि सुरवाडे । सांगवले तुज ॥67॥
जे मनाला आकलन करण्यास अत्यन्त कठीण आहे, बुद्धीने कितीही विचार केला, तरी सापडत नाही, ते तुला भाग्याच्या अनुकूलतेमुळे सांगता आले.
68-5
जे शब्दातीत स्वभावे । ते बोलीचि जरी फावे । तरी आणिके काय करावे । सांगे कथा ॥68॥
जे स्वभावतःच शब्दांच्या पलीकडे आहे, ते शब्दामध्ये जर सापडले, तर इतर आणखीन काय पाहिजे ? या करिता तुम्ही प्रस्तुत कथा सांगावी.
69-5
हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृतीचा । म्हणे संवादु दोघांचा । परिसोनि परिसा ॥69॥
ही श्रोत्यांची उत्कट अशी इच्छा जाणून निवृत्तींनाथांचे दास श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणाले, तुम्ही एवढा वेळ भगवान श्रीकृष्ण व अर्जुनाचा सुखसंवाद ऐकलं आहे, पुढे तोच ऐका.
70-5
मग कृष्ण म्हणे पार्थाते । आता प्राप्ताचे चिन्ह पुरते । सांगेन तुज निरुते । चित्त देई ॥70॥
मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, कृतार्थ अवस्था प्राप्त झालेल्या पुरुषाचे लक्षण सांगतो, तरी एकाग्र चित्ताने ऐकावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोप्ति नैष्ठीकीम् ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥5. 12॥
भावार्थ :-
निष्काम कर्मयोगी माणूस कर्मफल ईश्वराला अर्पण करून अखंड शांती अनुभवतो (प्राप्त करतो) आणि सकामी पुरुष मात्र फलाच्या ठिकाणी आसक्त होऊन वासनेने बांधला जातो.
71-5
तरी आत्मयोगे आथिला । जो कर्मफळाशी विटला । तो घर रिघोनि वरिला । शांति जगी ॥71॥
तरी या जगात जो आत्मज्ञानाने जो संपन्न झाला आहे, ज्याला कर्मफलाचा वीट आला आहे, त्याच्या घरात येऊन शांती त्याला वरते.
72-5
येरु कर्मबधे किरीटी । अभिलाषाचिया गाठी । कळासला खुंटी । फळभोगाचा ॥72॥
यापेक्षा दुसरा जो कर्मे करणारा आहे, तो इच्छेच्या दाव्याने फळाच्या खुंटयाला बांधला कर्मबंधाने बांधला जातो.
सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् न कारयन् ॥5. 13॥
भावार्थ :-
ज्याची इंद्रिय आणि मन वश झालेली आहेत, असा देहधारी आत्मज्ञानी पुरुष नऊ दारे असलेल्या या शरीरात संपूर्ण कर्मचा विवेकी मनाने त्याग करून, निःसंदेह बनून, न करता किंवा करविता सत-चित्-आनंदरूप परमेश्वराशी एकरूप होऊन राहतो.
73-5
जैसा फळाचिया हावे । तैसे कर्म करि आघवे । मग न कीजेचि येणे भावे । उपेक्षी जो ॥73॥
फलाच्या इच्छेप्रमाणे कर्माचे आचरण करणाऱ्याप्रमाणे तोही सर्व कर्मे करतो; परंतु त्या कर्माचा मी कर्ता नाही, हे जाणून तो त्याकर्माची उपेक्षा करतो.
74-5
तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टी होये । तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ॥74॥
तो ज्या मार्गाकडे बघेल, तेथे सृष्टीतील सत्य-शिव-सुंदरतेचे त्याला दर्शन होऊ लागते. तो म्हणेल, तेथे ब्रम्हज्ञान प्रकट होत असते.
75-5
नवद्वारे देही । तो असतुचि परि नाही । करितुचि न करी काही । फलत्यागी ॥75॥
तो नवद्वारांच्या देहात राहूनदेखील त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो सर्व कर्मे करतो; परंतु त्याला फलाची इच्छा नसल्यामुळे तो काहीच करत नाही.
न कर्तृत्वत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥5. 14॥
भावार्थ :-
परमात्मा भूतमात्रांचे कर्तेपण निर्माण करत नाही, तो कर्मही उत्पन्न करत नाही व त्यांचा कर्मफलाशी संयोगही उत्पन्न करत नाही. तो स्वरूपतः काहीच करत नसला, तरी त्याचा स्वभाव म्हणजे उपाधीभूत असलेली प्रकृतीच सर्व कार्य करत असते.
दिवस ४९ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ५७७ ते ५८८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 577
विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥१॥
अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥धृपद॥
तोचि शरणागता विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या संतांसमागमे ॥२॥
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धी । लागली समाधि विठ्ठलनामे ॥३॥
विठ्ठलाचे नाम घेता जाले सुख । गोडावले मुख तुका म्हणे ॥४॥
अर्थ
विठ्ठल हेच गाणे गावे, ध्यान करायचे असेल तर विठ्ठ्लाचेच करावे. तो विटेवर उभा असलेला विठ्ठल डोळ्याने पाहावा. हा विठ्ठल अनाथाचा बंधू आहे, कृपेचा सागर आहे. संसाराचे बंधन तोडतो. आणि यम पाश तोडतो. तो शरण आलेला कोणीही असो त्याला मुक्ती देतो. हा विठ्ठल संताच्या संगतीत राहतो. विठ्ठल हा सर्व सद्गुणाचा ठेवा आहे. आणि सर्व सिद्धी म्हणजे हा विठ्ठल आहे. विठ्ठलाच्या नामाने माझी समाधी लागली. तुकाराम महाराज म्हणतात मला सुख झाले आणि त्या नामाने माझ्या मुखाला देखिल गोडी लागली.
अभंग क्र. 578
विठो सापडला हाती । ठावी झाली एक गती । न धरी भय चित्ती । बळ किती तयाचे ॥१॥
लागे आपणचि हाती । किंव भाकावी काकुलती । करी मग चित्ती । असेल ते तयाचे ॥धृपद॥
एकलिया भावबळे । कै सापडे तो काळे । वैष्णवांच्या मेळे । उभा ठाके हाकेसी ॥२॥
बांधा माझिया जीवासी । तुका म्हणे प्रेमपाशी । न सोडी तयासी । सर्वस्वासी उदार ॥३॥
अर्थ
माझ्या हाती आता विठ्ठल सापडला आहे त्याला कसे प्राप्त करून घ्यावयाचा मार्ग मला सापडला आहे. आता मी त्याचे भय धरणार नाही आणि माझ्या भक्ती बाळाचे पुढे त्याचे बळ तरी किती आहे. ते विठ्ठलाला आपण करू नका गावी मग तो आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतो. मग त्याच्या आवडीस येईल तसे तो आपल्या भक्तांचे काम करतो. जर आपण एकट्यानेच भक्ती केली तर खूप काळानंतर त्याची प्राप्ती आपल्याला होते. पण वैष्णवांच्या समुदाय मध्ये त्याला हाक मारल्या बरोबर लगेच येऊन उभा रहातो. तुकाराम महाराज म्हणतातहे भाविकांना प्रेमरूपी दोरीने देवाला माझ्या जीवाशी बांधून टाका. मी त्याला कधीच सोडणार नाही. विठ्ठलाची प्राप्ती होण्यासाठी मी सर्वस्व उधार करेन.
अभंग क्र. 579
वाट वैकुंठी पाहाती । भक्त कै पा येथे येती । तया जन्ममरणखंती । नाही चित्ती परलोक ॥१॥
धन्यधन्य हरीचे दास । तया सुलभ गर्भवास । ब्रह्मादिक करिती आस । तीर्थवास भेटीची ॥धृपद॥
कथाश्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस । पाहे रात्रंदिवस । वाट कर जोडोनि ॥२॥
रिद्धिसिद्धी न पाचारिता । त्या धुंडिती हरीभक्ता । मोक्ष सायुज्यता । वाट पाहे भक्तांची ॥३॥
असती जेथे उभे ठेले । सदा प्रेमसुखे धाले । आणीक ही उद्धरिले । महादोषी चांडाळ ॥४॥
सकळ करिती त्यांची आस । सर्वभावे ते उदास । धन्यभाग्य त्यास । तुका म्हणे दर्शने ॥५॥
अर्थ
भू लोकातील भक्तजन वैकुंठामध्ये केव्हा येतील अशीच वैकुंठातील लोक वाट पाहत असतात. परंतु भक्तांच्या मनामध्ये जन्ममरणाची खंत नसते आणि वैकुंठाची किंवा परलोकाची चिंताही नसते. खरोखर हरीचे दास अतिशय धन्य आहेत कारण त्यांना जन्म-मरणाचा गर्भवास देखील सुलभ वाटतो कारण जन्माला येऊन त्यांना हरीचे नाम घेण्यास मिळते. ब्रह्मादिक देव सुद्धा वैष्णवांची देवाच्या भक्तांची असं करतात इच्छा करतात तीर्थ-क्षेत्र देखील त्यांच्या भेटीसाठी इच्छा मनात धरतात. त्यांच्या मुखाने हरी कथा श्रवण करायला मिळावी म्हणून यम धर्म देखील मोठी इच्छा धरून असतो. आणि भक्तांची रात्रंदिवस हात जोडून तो वाट पाहत असतो. हरी भक्तांना धुंडाळीत धुंडाळीत रिद्धी सिद्धी देखील न बोलताच हरिभक्ता जवळ जाते. सायुज्य मुक्तीही भक्तांची वाट पाहत असते. हरी भक्त जेथे कोठे असतात, तेथे ते हरीच्या प्रेमसुखाने नेहमी सुखी असतात. आणि आपल्या संगतीने इतर दोषी महादोषी चांडाळानाही उद्धरून नेतात. तुकाराम महाराज म्हणतात सर्वजण त्यांना भेटण्याची आशा धरतात. पण हरिदास सर्व बाबतीत उदास असतात त्यांचे दर्शन ज्या कोणालाही होते ते खरोखर धन्य आहे.
अभंग क्र. 580
सोने दावी वरी तांबे तयापोटी । खरियाचे साठी विकु पाहे ॥१॥
पारखी तो जाणे तयाचे जीवीचे । निवडी दोहीचे वेगळाले ॥धृपद॥
क्षीरा नीरा कैसे होय एकपण । स्वादी तोचि भिन्न भिन्न काढी ॥२॥
तुका म्हणे थीता आपणची खोटा । अपमान मोठा पावईल ॥३॥
अर्थ
तांब्याच्या एखाद्या वस्तूला वरती सोन्याचा मुलामा दिला, तर खरा सोनार त्या दोन्हीतील फरक ओळखतो. आणि दोन्हीही ते वेगवेगळे करतो. पाणी आणि दुध हे एकत्र असले तरी दोन्हीचाही स्वाद मात्र वेगवेगळा आहे आणि एखादा जाणकार मनुष्य दूध आणि पाणी हे दोन्ही एकत्र आहे हे लगेच ओळखतो. तुकाराम महाराज म्हणतात या वरून आपण असे समजावे की, जो खोटा आहे त्याचा मोठा अपमान होईल.
अभंग क्र. 581
फोडूनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजी ॥१॥
आपला घात आपणचि करी । आणिका सांगता नाइके तरी ॥धृपद॥
भुकेभेणे विष देऊ पाहे आता । आपलाचि घात करू पाहे ॥२॥
तुका म्हणे एक चालतील पुढे । तयांसी वाकडे जाता ठके ॥३॥
अर्थ
चांगल्या मार्गाने प्रगती करणाऱ्या लोकांना उपद्रव करून त्यांच्या वाटेत अडथळे निर्माण करणाऱ्या लोकांची कशी अवस्था होते ते महाराज सांगत आहेत, पाण्यात तरण्यासाठी भोपळ्याची सांगड घेतली आणि ती जर फोडली आणि पोटावर बांधली तर नदीच्या पलीकडे कसे जाता येईल ? तसे जो करील तो स्वतःचा घात स्वतःच करणारा असतो. आणि दुसऱ्याने सांगितले तरी ऐकत नाहि. भूक भागविण्या साठी एखादा जर विषाच खाऊ लागला तर तो कसा जगेल ? म्हणजे तो स्वतःचाच घात करू पाहतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात जे लोक सन्मार्गाने पुढे चालत असतात परमार्थात चांगली वाटत धारण करतात मोक्षाची वाटचाल करत असतात त्यांच्यामध्ये आडकाठी करणारे उपद्रव आणणारे अनेक लोक आहेत परंतु त्यामध्ये ते स्वतःच फसले जातात.
अभंग क्र. 582
उपकारासाठी केले हे उपाय । येणेविण काय चाड आम्हा ॥१॥
बुडता हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणउनि ॥२॥
तुका म्हणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येईल कळो ॥३॥
अर्थ
आम्ही जे उपाय सांगितले ते केवळ दुसऱ्यावर उपकार घडावा म्हणून आमचे त्या वाचून काय नडले होते ? लोक भवसागरात बुडत आहेत ते मला देखवत नाही म्हणून त्यांचा कळवळा येतो. तुकाराम महाराज म्हणतात पण माझ्या डोळ्याने मी या भवसागरात गुंतलेले लोक भोग भोगतानी पाहणार आहे करणात भोग भोगतानाच त्यांना आम्ही केलेल्या उद्देशाची आठवण येईल मग त्यांना चांगल्याप्रकारे कळेल.
अभंग क्र. 583
आठवे देव तो करावा उपाव । येर त्यजी वाव खटपटा ॥१॥
होई बा जागा होई बा जागा । वाउगा का गा सिणसील ॥धृपद॥
जाणिवेच्या भारे भवाचिये डोही । बुडसी तो काही निघसि ना ॥२॥
तुका म्हणे देवा पावसील भावे । जाणता ते ठावे काही नव्हे ॥३॥
अर्थ
ज्या उपायाने देवाची आठवण येते तोच उपाय कर. बाकीच्या खटपटी तू टाकून दे. जागा हो रे बाबा, जागा हो रे बाबा, व्यर्थ कशाला शिन करतोस. तू ज्ञानाच्या ओझ्याने भवरूपी डोहात बुडालास तर वर निघू शकणार नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात तुला जर वाटत असेल देवाची प्राप्ती व्हावी तर देवाविषयी दृढ भक्तिभाव ठेव ज्ञानी पणाच्या अहंकाराने तुला काहीही प्राप्त होणार नाही.
अभंग क्र. 584
माझ्या मुखावाटा नयो हे वचन । व्हावे हे संतान द्रव्य कोणा ॥१॥
फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळे त्यासी तेचि साधे ॥धृपद॥
नाइकावी निंदा स्तुति माझ्या काने । सादर या मने होऊनिया ॥२॥
तुका म्हणे देव असाध्य यामुळे । आशामोहजाळे गुंतलिया ॥३॥
अर्थ
माझ्या मुखावाटे कोणाला संतती किंवा धन मिळावे हे वाचन कधीच निघू नये. कारण संपत्ती आणि संतती या गोष्टींमुळे तो मनुष्य विनाकारण पतन होऊन दुखाचा भागीदार होईल. माझ्या मनाने कधीही कोणाची निंदा किंवा स्तुती अगदी तत्परतेने कधीही ऐकू नये. तुकाराम महाराज म्हणतात देवाची प्राप्ती होणे असाध्य होते कारण मनुष्य आशा मोह यांच्या जाळ्यात गुंतलेला असतो.
अभंग क्र. 585
चित्त ग्वाही तेथे लौकिकाचे काई । स्वहित ते ठायी आपणापे ॥१॥
मनासी विचार तोचि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाही ॥धृपद॥
शुद्ध भावा न लगे सुचावा परिहार । उमटे साचार आणिके ठायी ॥२॥
भोगित्यासी काज अंतरीचे गोड । बाहिरल्या चाड नाही रंगे ॥३॥
तुका म्हणे भाव शुद्ध हे कारण । भाट नारायण होईल त्यांचा ॥४॥
अर्थ
देवाची भक्ती करणे विषय आपले चित्त जर आपल्याला साक्षी असेल तर इतरांच्या साक्षी काय गरज आहे आपल्या सहित आपल्याजवळच आहे. आत बाहेर सर्व ठिकाणी देव व्यापून आहे असा विचार मनात सतत असणे हाच खरा भाव. आपल्या ठिकाणचा शुध्द भाव दुसऱ्याला सांगण्याचे कारणच नाही. तो अपोपच लोकांना समजून येत असतो. जो परमानंद रस भोगत आहे आपल्या अंतरंगात रममाण आहे त्याला बाहेरील रंगाची चाडच नसते. तुकाराम महाराज म्हणतात ज्यामध्ये शुध्द भाव आहे त्याचा स्तुती करणारा भाटच नारायण होईल.
अभंग क्र. 586
नव्हती माझे बोल । अवघे करितो विठ्ठल ॥१॥
काही न धरावी खंती । हित होईल धरा चित्ती ॥धृपद॥
खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगता ॥२॥
ज्याचे तोचि जाणे । मी मापाडे तुका म्हणे ॥३॥
अर्थ
मी तुम्हाल जे काही सांगत आहे ते मी स्वतःच बोलत नसून विठ्ठलच तुम्हाला उपदेश करत आहे. या बद्दल तुम्ही काहीच खंती धरू नका, मी जे सांगतो तसे वागा यातच तुमचे हित आहे. एखाद्याने जर चांगली वाट सांगितली तर ती वाट टाकून जाणारा माणसाच्या अंगी अहंभाव आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे हित तोच जाणतो माझ्या मुखा वाटे विठ्ठल बोलतो आहे त्याचे सत्यत्व तो विठ्ठल जाणतो. मी केवळ मापाडी आहे.
अभंग क्र. 587
वासनेच्या मुखी आदळूनि भीते । निर्वाहा पुरते कारण ते ॥१॥
या नावे अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥धृपद॥
सर्वकाळ हाचि करणे विचार । विवेकी सादर आत्मत्वाचे ॥२॥
तुका म्हणे जो जो भजनासी वळे । अंगे तो तो कळे सन्निधता ॥३॥
अर्थ
वासनेच्या मुखामध्ये भत्ता टाकावा व आपल्या निर्वाहा पुरतेच मनुष्याने कार्य करावे. चित्तात कायम समाधान असणे हिच खरी नारायण आपल्या अंतरात असल्याचि खरी खुण आहे. आणि सर्व काळ हाची विचार करावे. आत्मत्वाचा विचार करण्यासाठी आपली विवेकबुद्धी नेहमी तत्पर असावी. तुकाराम महाराज म्हणतात जसे जसे आपण हरिच्या भजना कडे वळू तसे तसे आपल्याला देवाची सान्निध्यता झाली की नाही ते कळते.
अभंग क्र. 588
चिंतने अचिंत राहिलो निश्चळ । तेचि किती काळ वाढवावे ॥१॥
अबोल्याचा काळ आता ऐशावरी । वचनाची उरी उरली नाही ॥धृपद॥
करू आला तो तो केला लवलाहो । उरोचि संदेहो दिला नाही ॥२॥
तुका म्हणे मोह परतेचि ना मागे । म्हणउनि त्यागे त्याग जाला ॥३॥
अर्थ
हरीच्या चिंतनेने मी अश्या ठिकाणी स्थिर झालो आहे की, आता चिंतन किती वेळ वाढवावे हेच कळत नाही. याबद्दल अबोलना धरण्याची वेळ आली आहे. माझ्या कडून जितका परमार्थ करवा तितका मी केला आहे मना मध्ये आता कोणताही संशयच राहिला नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या आतला जो मोह आहे तो आता गेला आहे, तो परत माघारी येतच नाही. म्हणून मला आता त्यागाचाही त्याग झाला आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















