आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१७ फेब्रुवारी, दिवस ४८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा, ओवी २६ ते ५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ५६५ ते ५७६
“१७ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 17 feburvari
राम कृष्ण हरी आज दिनांक १७ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
26-5
एऱ्हवी तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा । ते सांख्यकर्मसंस्था । जाणती केवी ॥26॥
एरव्ही तरी अर्जुना, जे विचाराने पूर्णपणे अज्ञानी आहेत, ते सांख्ययोग व कर्मयोग यांचे स्वरूप कसे जाणू शकतील ?
27-5
सहजे ते अज्ञान । म्हणोनि म्हणती हे भिन्न । एऱ्हवी दीपाप्रती काई अनान । प्रकाशु आहाती ॥27॥
ते स्वभावतः मूर्ख असतात, म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. एरवी प्रत्येक दिव्याचे प्रकाश काय वेगवेगळा असतो काय. ?
28-5
पै सम्यक् एके अनुभवे । जिही देखिले तत्व आघवे । ते दोन्हीतेही ऐक्यभावे । मानिती गा ॥28॥
परंतु दोन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाच्या साधनेत ज्यांनी परब्रह्मचा अनुभव घेतला आहे, ते लोक फलाच्या दृष्टीने दोन्ही मार्गांना एकच मानतात.
यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तत योगैरपि गम्यते ।
एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥5. 5॥
भावार्थ :-
सांख्यमार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होते, तेच निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्यांनाही प्राप्त होते. सांख्ययोग आणि कर्मयोग हे एकच आहेत असे जाणणारा खरा ज्ञाता होय.
29-5
आणि सांख्यी जे पाविजे । तेचि योगी गमिजे । म्हणोनि ऐक्यता दोहीते सहजे । इयापरी ॥29॥
सांख्ययोगापासून जे फल प्राप्त होते, तेच कर्मयोगापासून होते; म्हणून या दोघांची अशा प्रकारे सहजच एकरूपता आहे.
30-5
देखे आकाशा आणि अवकाशा । भेदु नाही जैसा । तैसे ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो ॥30॥
असे पाहा की, आकाश आणि पोकळी यात जसा भेद नाही, तसा ज्ञानयोग आणि कर्मयोग यांमध्ये भेद नाही, हे ज्याला पटलेले असते,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-5
तयासीचि जगी पाहले । आपणपे तेणेचि देखिले । जया सांख्ययोग जाणवले । भेदेविण ॥31॥
ज्याने सांख्ययोग आणि कर्मयोग यामध्ये काही भिन्न भाव नाही, हे जाणले, त्याला ह्या जगतामध्ये ज्ञानसुर्याचा प्रकाश दिसतो आणि त्यालाच आत्मसाक्षात्कार होतो.
संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः ।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिच्छति ॥5. 6॥
भावार्थ :-
हे अर्जुना ! निष्काम कर्मयोगाखेरीज संन्यास घेणे म्हणजे मन, इंद्रिय व शरीर यांना होणाऱ्या सर्व कर्माच्या कर्तेपणाच्या त्याग करणे. हे कठीण आहे; परंतु ईश्वराच्या स्वरूपाचे सदैव मनन करणारा निष्काम कर्मयोगी परब्रम्हाला त्वरित प्राप्त करून घेतो.
32-5
जो युक्तिपंथे पार्था । चढे मोक्षपर्वता । तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ॥32॥
जो निष्काम कर्म करण्याच्या युक्तीने मोक्षरूपी पर्वतावर चढतो, तो आनंदरूपी शिखर त्वरेने प्राप्त करून घेतो.
33-5
येरा योगस्थिति जया सांडे । तो वायाचि गा हव्यासी पडे । परि प्राप्ति कही न घडे । संन्यासाची ॥33॥
जो आपले अंतःकरण शुद्ध न करता कर्मयोगाचा त्याग करतो, तो व्यर्थच संन्यासी बनण्याचा प्रयत्न करतो; परंतु त्याला खऱ्या संन्यासाची प्राप्ती कधी होत नाही.
योगयुक्तो विशुध्दात्मा विजितात्मा जितेद्रियः ।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥5. 7॥
भावार्थ :-
जो निष्काम कर्मयोगी आहे, ज्याचे चित्त पवित्र आहे, ज्याने मन ताब्यात ठेवले आहे, ज्याने इंद्रिय जिंकली आहेत आणि भूतमात्रांचा ठिकाणी समानरूप असणाऱ्या आत्मतत्वाशी ज्याच्या आत्म्याचे ऐक्य झाले आहे, असा पुरुष कर्म करीत असूनही त्या कर्माने बध्द होत नाही.
34-5
जेणे भ्रांतीपासूनि हिरतले । गुरुवाक्ये मन धुतले । मग आत्मस्वरुपी घातले । हारौनिया ॥34॥
ज्याने सर्व प्रकारच्या भ्रमापासून हिरावून घेतलेले मन सद्गुरुंच्या उपदेशाने शुद्ध केले आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केले,
35-5
जैसे समुद्री लवण न पडे । तव वेगळे अल्प आवडे । मग होय सिंधूचि एवढे । मिळे तेव्हा ॥35॥
जोपर्यंत समुद्रात मीठ पडले नाही, तोपर्यन्त समुद्रपेक्षा भिन्न व अल्प वाटत असते. एकदा का ते मीठ समुद्रात पडले, की ते समुद्राएवढे होते.
36-5
तैसे संकल्पोनि काढिले । जयाचे मनचि चैतन्य जाहले । तेणे एकदेशिये परि व्यापिले । लोकत्रय ॥36॥
त्याप्रमाणे ज्याने आपल्या मनातील सर्व प्रकारचे भ्रम काढले आहेत, ज्याचे मन चैतन्यस्वरूप झाले आहे, तो पुरुष देहाने परिच्छिन्न असला, तरी त्याने तिन्ही लोक व्यापलेले असतात.
37-5
आता कर्ता कर्म करावे । हे खुंटले तया स्वभावे । आणि करी जऱ्ही आघवे । तऱ्ही अकर्ता तो ॥37॥
मी कर्ता आहे, मी कर्म करतो, हा त्याचा स्वभाव नाहीसा झालेला असतो आणि त्याने सर्व कर्मे जरी केली, तरी तो अकर्ता असतो.
नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्वचित् ।
पश्चन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् ॥5. 8॥
प्रलपन् विसृजन् गृण्हन्नुन्मिषन् निमिषन्नपि ।
इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥5. 9॥
भावार्थ :-
पाहात असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, चालत असता, झोप घेत असता, बोलत असता, देत असता, घेत असता, डोळ्यांची उघडझाप करीत असता, विषयांची ठिकाणी इंद्रयांची प्रवृत्ती असते, असे लक्षात आणून खरे स्वरूप जाणणाऱ्या कर्मयोग्याने ” मी काही करीत नाही ” असे लक्षात ठेवावे. (असेच निःसंदेह मानत असतो). ॥8॥9॥
38-5
जे पार्था तया देही । मी ऐसा आठऊ नाही । तरी कर्तृत्व कैचे काई । उरे सांगे ॥38॥
त्या आत्मज्ञानी पुरुषाच्या मनात/देहात मी पणाची आठवण नसते, तर मग कर्तृत्वाचा अहंकार कसा राहील, हे तूच सांग.
मी म्हणजे देह अशी आठवनच नसते, तर मग कर्तेपणा कसा बरे राहील ?
39-5
ऐसे तनुत्यागेवीण । अमूर्ताचे गुण । दिसती संपूर्ण । योगयुक्ता ॥39॥
याप्रमाणे शरीराचा त्याग न करता त्या योगयुक्त पुरुषाच्या ठिकाणी अमूर्त ब्रम्हाचे सर्व गुण दिसून /अनुभवास येतात.
40-5
एऱ्हवी आणिकांचिये परी । तोही एक शरीरी । अशेषाही व्यापारी । वर्ततु दिसे ॥40॥
एरव्ही इतर सर्व सामान्य माणसाप्रमाणे तोही शरीरधारी दिसतो आणि सर्व व्यवहार करीत असलेला दिसतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-5
तोही नेत्री पाहे । श्रवणी ऐकतु आहे । परि तेथीचा सर्वथा नोहे । नवल देखे ॥41॥
इतर सर्व लोकांप्रमाणे तोही डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो; पण त्याकर्माचा मी कर्ता आहे, असे त्याला मुळीच वाटतं नाही, हे आश्चर्य आहे.
42-5
स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणे । अवसरोचित बोलणे । तयाहि आथी ॥42॥
त्याला स्पर्श कळत असतो, नाकाने तो गंधाचा अनुभव घेत असतो, तसेच प्रसंगप्रमाणे तो बोलतही असतो.
43-5
आहाराते स्वीकारी । त्यजावे ते परिहरि । निद्रेचिया अवसरी । निदिजे सुखे ॥43॥
तो आहाराचे सेवन करत असतो, जे त्यागावयाचे आहे ते तो त्यागतो, झोपेच्या वेळी सुखाने शांत झोप घेतो
44-5
आपुलेनि इच्छावशे । तोही गा चालतु दिसे । पै सकळ कर्म ऐसे । रहाटे कीर ॥44॥
तो आपल्या इच्छेप्रमाणे चालत असतो, अशा प्रकारे तो सर्व कर्मे करत असतो.
45-5
हे सांगो काई एकैक । देखे श्वासोच्छासादिक । आणि निमिषोन्निमिष । आदिकरुनि ॥45॥
हे एकेक काय सांगावे ? पाहा, श्वास घेणे व सोडणे आणि डोळ्यांची उघडझाप करणे वगैरे सर्व कर्मे करतो
46-5
पार्था तयाचे ठायी । हे आघवेचि आथि पाही । परि तो कर्ता नव्हे काही । प्रतीतिबळे ॥46॥
हे पार्था ! ही सर्वच कर्मे तो करत असतो; परंतु आत्मज्ञानमुळे या सर्व कर्माचा कर्ता मात्र तो होत नाही.
47-5
जै भ्रांती सेजे सुतला । तै स्वप्नसुखे भुतला । मग तो ज्ञानोदयी चेइला । म्हणोनिया ॥47॥
जेंव्हा तो भ्रमाचा शय्येवर (भ्रांतिरुपी अंथरून) झोपी गेलेला असतो, तेंव्हा स्वप्नांच्या सुखाने भुलला होता, परंतु आत्मज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो आपणास कर्माचा कर्ता मानत नाही.
ब्रह्मण्याधाय कर्माणि संग त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भ्सा ॥5. 10॥
भावार्थ :-
जो ईश्वराच्या चरणी सर्व कर्मे अर्पण करून फळाची इच्छा न करता कर्म करीत राहतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो पापापासून अलिप्त असतो.
48-5
आता अधिष्ठानसंगती । अशेषाही इंद्रियवृत्ती । आपुलालिया अर्थी । वर्तत आहाती ॥48॥
अधिष्ठान म्हणजे देहाच्या संगतीने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयांकडे धाव घेत असतात.
49-5
दीपाचेनि प्रकाशे । गृहीचे व्यापार जैसे । देही कर्मजात तैसे । योगयुक्ता ॥49॥
दिव्याच्या प्रकाशाच्या आधारे, घरातील सर्व व्यवहार ज्याप्रमाणे होत असतात, त्याप्रमाणे ज्ञानप्रकाश पसरला, तरी योगयुक्ताची सर्व कर्मे देहात सुरु असतात.
50-5
तो कर्मे करी सकळे । परी कर्मबंधा नाकळे । जैसे न सिपे जळी जळे । पद्मपत्र ॥50॥
ज्याप्रमाणे कमळाचे पान सदैव पाण्यात असूनदेखील ते पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे सदैव करून देखील कर्मबंधाने बध्द होत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्त्वात्मशुद्धये ॥5. 11॥
भावार्थ :-
निष्काम कर्मयोगी आसक्तीचा त्याग करून केवळ इंद्रिय, शरीर, मन, आणि बुद्धीने अंतः करणाच्या शुद्धीसाठी कर्म करीत असतात.
दिवस ४८ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ५६५ ते ५७६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 565
न मनावी चिंता तुम्ही संतजनी । हिरा स्फटिकमणि केवि होय ॥१॥
पडिला प्रसंग स्थळा त्या सारिखा । देखिला पारिखा भाव काही ॥२॥
बहूतांसी भय एकाचिया दंडे । बहुत या तोंडे वचनासी । ॥३॥
तुका म्हणे नाही वैखरी बासर । करावया चार वेडे वेडे । ।४॥
अर्थ
हे संतजन हो तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका कारण स्फटिक मनी कधीही हिऱ्या याप्रमाणे होत नाही तोच स्फटिकच राहतो आणि हिरा हिराच राहतो. मी प्रसंग स्थळी परकेपणाचा भाव पाहिला त्यामुळे बोलत आहे. एका दुष्टला जर खडसावले दंड केला तर त्याचे भय सर्व दुष्टांना होते आणि एकमेकांशी चर्चा करून दंड केला दंड केला असे सर्वत्र बोल ते दुष्ट लोक करून दाखवतात. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या तोंडून कधीही वाईट विचार बाहेर येत नाहीत वेडेचारपणा तर संतांकडून कधीही घडत नाही. ( एका ठिकाणी संतांच्या वचनाला प्रतिउत्तर केले त्यामुळे तुकाराम महाराजांनी त्या दुष्ट व्यक्तीला चांगलेच खडसावले आणि संतांनी सांगितले बोल हे बरोबर आहे की संत हे कधीही चुकीचा उपदेश करत नाहीत असे अभंगातून महाराजांनी सांगितले आहे. )
अभंग क्र. 566
यथाविधि पूजा करी । सामोग्री तोवरी हे नाही ॥१॥
आता माझा सर्व भार । तू दातार चालविसी ॥धृपद॥
मंगळ ते तुम्ही जाणा । नारायणा काय ते ॥२॥
तुका म्हणे समर्पीला । तुज विठ्ठला देहभाव ॥३॥
अर्थ नाही टाका
अभंग क्र. 567
भवसिंधूचे हेचि तारू । मज विचारू पाहाता ॥१॥
चित्ती तुझे धरिन पाय । सुख काय ते तेथे ॥धृपद॥
माझ्या खुणा मनापाशी । ते या रसी बुडाले ॥२॥
तुका म्हणे वर्म आले । हाता भले हे माझ्या ॥३॥
अर्थ
देवा तुमचे चरण म्हणजे याभवसिंधु मधून तारून नेणारी नौकाच आहेत. त्यामुळे मी तुमचे चरण माझ्या हृदयात साठवून ठेवले आहे कारण सुख म्हणजे काय आहे ते सर्व काही या तुमच्या चरणामध्ये आहे. या परमार्थाच्या खुणा माझ्याजवळ आहेत आणि माझे मन तर आता हरी रसात अगदी बुडून गेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुझे चरण म्हणजे सुखाचे साधन आहे आणि आता हे वर्म माझ्या हाती लागले आहे ते बरे झाले.
अभंग क्र. 568
पाहाता श्रीमुख सुखावले सुख । डोळियांची भूक न वजे माझ्या ॥१॥
जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिके पुढे ॥धृपद॥
श्रवणीची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद निवारोनि ॥२॥
महामळे मन होते जे गादले । शुद्ध चोखाळले स्पटिक जैसे ॥३॥
तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन । विठ्ठल निधान सापडले ॥४॥
अर्थ
या श्रीहरीचे मुख इतके सुंदर आहे इतके सुंदर आहे कि ते सुखालाही सुख देणारे आहे मी श्रीहरीचे मुख कितीही वेळा पाहिले तरीही माझ्याडोळ्यांची भूक भागत नाही. माझ्या जिभेला विठ्ठल या तीन अक्षरांचा रस फार गोड वाटतो व त्या रसा पुढे मला अमृतही पिके वाटते. मी माझ्याच श्रवणाच्या मार्गाने म्हणजे ऐकण्याच्या मार्गाने ऐकण्याची शक्ती ज्या मार्गाने असते तो मार्ग चोखाळून म्हणजे शुद्ध करून घेतलेला आहे व त्याच मार्गाने मी श्रीहरीचे गुणगान संतांच्या मुखाने ऐकत असतो व त्यामुळे माझ्या मनातील भेद व अभेद हे सर्व नष्ट झालेले आहेत. माझे मन हे महा मळाने म्हणजे अशुद्ध विचाराने मळाले होते व ते आता स्फटिकाप्रमाणे शुद्ध झालेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवाचे जीवन म्हणजे तो विठ्ठल आहे व तो विठ्ठलरूपी ठेवा आता मला सापडला आहे.
अभंग क्र. 569
हाचि परमानंद आळंगीन बाही । क्षेम देता गाठी ठायी द्वैत तुटे ॥१॥
बोलायासि मात मन निवे हर्ष चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥धृपद॥
जनांत भूषण वैकुंठी सरता । फावले स्वहिता सर्वभावे ॥२॥
तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पारुषला ॥३॥
तुका म्हणे तो हा विठ्ठलचि व्हावा । आणिक या जीवा चाड नाही ॥४॥
अर्थ
माझ्या परमानंदाय हरीला मी माझ्या दोन्ही बाहु ने मी आलिंगन देईन त्यामुळे माझ्या ठिकाणच्या द्वैताचा निरास होईल. माझ्या हरी विषयी कोणी बोलू लागले तर, माझ्या मनाला शांती मिळते. विठ्ठला विषयी माझे प्रेम द्विगुणीत होते लौकिक जीवनही धान्य होते. कारण ते विठ्ठलाच्या चिंतनेनेच भरलेले असते. लोकांनी मला भक्त म्हणून ओळखावे अशी माझी इच्छा नाही तरी कौतुक होतेच. शिवाय वैकुंठाचाहि लाभ होतो. स्वहिताचा मार्ग या भक्ती प्रमाणे आहे. या विठ्ठलच्या भक्ती मुळे मायेचा लौकिक व्यवहार असा जो संसार त्याचे रूपच पालटले. तुकाराम महाराज म्हणतात तेथे विठ्ठलाच विराजमान झाला कि अजून दुसरे मला काहीच नको आहे.
अभंग क्र. 570
आमुची कृपाळू तू होसी माउली । विठ्ठले साउली शरणांगता ॥१॥
प्रेमपान्हा स्तनी सदा सर्वकाळ । दृष्टि हे निर्मळ अमृताची ॥धृपद॥
भूक तहान दुःख वाटो नेदी सीण । अंतरीचा गुण जाणोनिया ॥२॥
आशा तृष्णा माया चिंता दवडी दुरी । ठाव आम्हा करी खेळावया ॥३॥
तुका म्हणे लावी संताचा सांगात । तेथे न पवे हात कळीकाळाचा ॥४॥
अर्थ
तू आमुची कृपाळू आई आहेस. संसाररूपी त्रासातून त्रस्त होऊन भक्त तुला शरण येतात. त्यांच्यावर प्रेमाची साउली तू घालते. तूझ्या दोन्ही स्तना मध्ये सदासर्वदा प्रेमरूपी दुधाचा पान्हा असतो. तुझ्या दृष्टीतून स्वच्छ अमृत वाहते. तू आपल्या मुलाचे अंतःकरण जाणते. त्यांना तहान भूक, दुख होऊच देत नाही. आमच्या मनातील आशा, तृष्णा, माया, चिंता सर्व काही घालव. व मग आम्हाला तुझ्या स्वरुपात खेळावयास ठाव (जागा) दे. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला संतांची संगती दे. संतांच्या संगतीत काळाचे हात पोहचत नाही.
अभंग क्र. 571
जेथे जावे तेथे कपाळ सरिसे । लाभ तो विशेषे संतसंगे ॥१॥
पूर्व पुण्ये जरि होती सानकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथे ॥धृपद॥
भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायी ॥२॥
तुका म्हणे हेचि करावी मिरासी । बळी संतांपाशी द्यावा जीव ॥३॥
अर्थ
जिथे जिथे आपण जाऊ तिथे प्रारब्ध आपल्याबरोबरच येत असते परंतु संतांच्या संगतीने आपल्याला एक प्रकारचा विशेष लाभ होतो. आपले जर पूर्वपुण्य अनुकूल असेल तरच आपल्याला संत संगतीचे लाभ घडतो संतांचे संगतीत खंड कधीही घडत. संतांचा वियोग करणारे बीजच उत्पन्न होणार नाही. लोकांना वाटेते की पत्नी, पुत्र, द्रव्य यांचा लाभ म्हणजे मोठे भाग्य. पण खरे भाग्य म्हणजे संतांच्या पाया पाशीच राहावे आणि त्यांची सेवा करावी. तुकाराम महाराज म्हणतात मी संतांच्या पाया पाशी वतनदारी असून त्यांच्या पायापाशी जीव हि अर्पण करीन अशी भक्ती दे.
अभंग क्र. 572
आता काही सोस न करी आणीक । धरीन ते एक हेचि दृढ ॥१॥
जेणे भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥धृपद॥
जोडीन ते आता देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥२॥
तुका म्हणे बरा जोडला हा देह । मनुष्यपण इहलोका आले ॥३॥
अर्थ
आता मी कोणताही सोस हव्यास करणार नाही. फक्त विठ्ठलाचे चरण दृढ धरीन. म्हणजे संसार सागरतून पलीकडे उतरता येईल. व दुस्तर असा गर्भवास टळेल. अविनाशी परमार्थाचे धन म्हणजेच देवाचे पाय त्यास हात जोडीन. तुकाराम महाराज म्हणतात जो दूर्लभ असा मनुष्य देह आहे या मनुष्यलोकात मी आलो हा मोठाच फायदा मला प्राप्त झाला आहे.
अभंग क्र. 573
जतन करीन जीवे । शुद्धभावे करूनी ॥१॥
विठ्ठल विठ्ठल हे धन । जीवन अंतकाळीचे । ध्रु. ॥
वर्दळ हे संचित सारू । बरवा करू उदिम हा ॥२॥
तुका म्हणे हृदयपेटी । ये संपुटी साठवू ॥३॥
अर्थ
विठ्ठल नाम हे अतिशय दुर्लभ आहे ते मी व्यवस्तीत जतन करून ठेवीन. विठ्ठल हे धन देहाच्या अंतः काळी सुद्धा उपयोगी पडणारे धन आहे माझे परम जीवन आहे. संचित कर्म ची बाकी सर्व वर्ग बाजूला सारून विठ्ठलनामाचा उत्तम प्रकारचा व्यवहार करू. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल रुपी धन आम्ही आमच्या छोट्याशा हृदय पेटीमध्ये साठवून ठेवू.
अभंग क्र. 574
एवढा प्रभु भावे । तेणे संपुष्टी राहावे ॥१॥
होय भक्ती केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥धृपद॥
एवढा जगदानी । मागे तुळसीदळ पाणी ॥२॥
आला नावा रूपा । तुका म्हणे झाला सोपा ॥३॥
अर्थ
हरी हा फार प्रचंड आहे. तरीही तो भक्तांच्या लहान अश्या हृदयात वास करतो. त्याची भक्ती आपण कशाप्रकारे करू अशाप्रकारे तो आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतो. संपूर्ण विश्वाचे दान देणारा एवढा महान देव भक्तांना केवळ तुळशीचे पत्र आणि पाणी मागतो. तुकाराम महाराज म्हणतात भक्तांच्या भक्ती करताच देव निर्गुण अवस्थेतून सगुण रूपात आला आहे नाम व रूप त्याने धारण केले आहे.
अभंग क्र. 575
भाग्ये ऐसी झाली जोडी । आता घडी न विसंबे ॥१॥
विटेवरी समचरण । संती खुण सांगितली ॥धृपद॥
अवघे आता काम सारू । हाचि करू कैवाड ॥२॥
तुका म्हणे खंडू खेपा । पुढे पापपुण्याच्या ॥३॥
अर्थ
माझे भाग्य आहे की मला पांडुरंगाच्या चरणाची जोड लाभली आहे. या लाभ झालेल्या क्षणाला विसंरणार नाही. विटेवर असलेले विठ्ठलाचे समचरणच ध्यानी धरावे. अशी खुण मला संतानी सांगितली आहे. आता मी सर्व इतर कामे आणि साधना बाजूला ठेवीन आणि विठोबाच्या चरणाचे चिंतन करण्याचा विचारच सतत बाळगीन. तुकाराम महाराज म्हणतात पाप आणि पुण्याच्या येरझाऱ्या आपल्याला सोसावे लागतील जन्म-मृत्यूचा त्रासही आपल्याला सोसावा लागेल तोच आता आपण नाहीसा करू.
अभंग क्र. 576
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हा नारायण तैशापरी ॥१॥
सर्वभावे लोभ्या आवडे हे धन । आम्हा नारायण तैशापरी ॥२॥
तुका म्हणे एकविध जाले मन । विठ्ठलावाचून नेणे दुजे ॥३॥
अर्थ
पतिव्रता स्त्रीला तिचा नवराच सर्व प्रमाण असतो त्याप्रमाणेच आम्हाला नारायणा विषयी भक्तिभाव आहे. लोभी माणसाला सर्वतोपरी धनाची जवळ असते अगदी त्याप्रमाणे आम्हाला नारायणाची आवड आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझे मन आत एकविध म्हणजे एक निष्ठ झाले आहे. ते विठ्ठला वाचून दुसरे काही जाणत नाही.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















