११ फेब्रुवारी, दिवस ४२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था, ओवी १०१ ते १२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ४९३ ते ५०४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“११ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 11 feburvari

राम कृष्ण हरी आज दिनांक ११ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

101-4
तेणे न पाहता विश्व देखिले । न करिता सर्व केले । न भोगिता भोगिले । भोग्यजात ॥101॥
त्याप्रमाणे चर्मचक्षुने विश्व पहिले नसले, तरी दिव्य चक्षुने तो सर्व काही पाहत असतो. तो काही न करताही सर्व कर्मे केल्याप्रमाणे आहे आणि भोग्य वस्तूंचा उपभोग न घेतासुद्धा त्याने भोगल्याप्रमाणेच आहेत.
102-4
एकेचि ठायी बैसला । परि सर्वत्र तोचि गेला । हे असो विश्व जाहला । आंगेचि तो ॥102॥
तो एके ठिकाणी तो बसून असला, तरी आतून सर्वत्र संचार करीत असतो. त्याच्याबद्दल आणखीन काय सांगावे ? तो सम्पूर्ण विश्वचैतन्याशी एकरूप झालेला असतो.

यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः ॥4. 19॥
भावार्थ :-

ज्याची सर्व कर्मे कर्तृत्व अहंकार रहित आणि फलाच्या इच्छेरहित आहेत आणि ज्ञानरूपी अग्नीने ज्याची कर्मे भस्म झालेली आहेत, अशा पुरुषाला ज्ञानी लोक पंडित असे म्हणतात.
103-4
जया पुरुषाचा ठायी । कर्माचा तरी खेदु नाही । परी फळापेक्षा कही । संचरेना ॥103॥
ज्या पुरुषाच्या मनामध्ये कर्म करण्यासंबधी कोणत्याही प्रकारचा खेद नसतो, अतिशय तत्परतेने तो कर्म करीत असतो; त्यांच्या मनामध्ये फलाची इच्छा चुकून केंव्हाही प्रवेश करीत नाही;
104-4
आणि हे कर्म मी करीन । अथवा आदरिले सिद्धी नेईन । येणे संकल्पेही जयाचे मन । विटाळेना ॥104॥
आणि हे कर्म मी करीन, अथवा आरंभिलेले कर्म सिद्धीस नेईन, ह्या कल्पनेनेही ज्याचे मन विटाळले जात नाही,
105-4
ज्ञानाग्निचेनि मुखे । जेणे जाळिली कर्मे अशेखे । तो ब्रह्मचि मनुष्यवेखे । वोळख तू ॥105॥
ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहेत, तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्येक्ष परब्रम्हच आहे, असे तू जाण.

त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः ॥4. 20॥
भावार्थ :-

जो कर्माच्या फळाची इच्छा संपूर्णपणे सोडून देतो आणि ब्रह्मनंदामध्ये नित्य तृप्त असतो, जो कोणत्याही गोष्टीचा आश्रय (निराश्रय) करीत नाही, तो बाह्यतः सर्व कर्मे करीत असला, तरी वस्तुतः काहीचं करत नाही.

106-4
जो शरीरी उदासु । फळभोगी निरासु । नित्यता उल्हासु । होऊनि असे ॥106॥
जो शरीराविषयी उदास असतो, (मनात शरीराबद्दल कसलाही अहंकार नसणे), फळाच्या (उपभोगा विषयी) प्राप्तीविषयी जो निरिच्छ असतो व सत्- चित् – आनंदरूप होऊन राहिलेला असतो,

107-4
जो संतोषाचा गाभारा । आत्मबोधाचिया वोगरा । पुरे न म्हणेचि धनुर्धरा । आरोगिता ॥107॥
अर्जुना, जो संतोषाच्या गाभाऱ्यात बसून ब्रम्हरसाचे भोजन करीत असताना ‘ पुरे ‘ असे कधीच म्हणत नाही,

निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिशम् ॥4. 21॥
भावार्थ :-

ज्याने आपले शरीर व अंतःकरण वश केलेले आहे व ज्याने सर्व भोगांच्या सामग्रीचा त्याग केलेला आहे, असा तो आशारहित पुरुष केवळ देहस्थितील उपयोगी असे कर्म करीत असला, तरी तो पापाला प्राप्त होत नाही.

यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः ।
सम सिद्धावसिद्धौच कृत्वाऽपि न निबध्यते ॥4. 22॥
भावार्थ :-

सहजपणे जे काही प्राप्त होईल, त्यातच संतुष्ट असणारा, हर्ष, शोक इत्यादी द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला, ईर्ष्यारहित सिद्धी व असिद्धीमध्ये समभाव ठेवणारा पुरुष कर्मे करूनदेखील बंधनात गुंतून राहत नाही.

108-4
कैसा अधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी । सांडोनिया आशा कुरोंडी । अहंभावेसी ॥108॥
तो अहंकाराला सुद्धा आशेची ओवाळणी करतो आणि ब्रम्हानंदाची गोडी अधिक प्रमाणात चाखत असतो.
109-4
म्हणोनि अवसरे जे जे पावे । तेणेचि तो सुखावे । जया आपुले आणि परावे । दोन्ही नाही ॥109॥
म्हणून, ज्या वेळेस जे जे प्राप्त होईल, त्यातच तो सुख मानत असतो. त्याच्या मनात हा परका व हा आपला, अशा प्रकारचा कोणताही भेदभाव नसतो.
110-4
तो दिठी जे पाहे । ते आपणचि होऊनि जाये । आइके ते आहे । तोचि जाहाला ॥110॥
तो डोळ्यांनी जे जे पाहतो, ते दृश्य आपण स्वतः होऊन जातो. आणि तो जे ऐकतो तेच तो झालेला असतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


111-4
चरणी हन चाले । मुखे जे जे बोले । ऐसे चेष्टाजात तेतुले । आपणचि जो ॥111॥
तो पायांनी चालत असतो, तोंडाने बोलत असतो आणि शरीराने जे जे कर्म करीत असतो, ते सर्व आपणच बनतो.
112-4
हे असो विश्व पाही । जयासि आपणपेवाचूनि नाही । आता कवण ते कर्म कायी । बाधी तयाते ॥112॥
हे असो; संपूर्ण विश्व ज्याला आपल्या स्वरूपावाचून वेगळे दिसत नाही, (विश्व आपल्याहून वेगळे दिसत नाही) आता त्याला कर्म ते कसले व ते त्याला बाधा काय करणार ?
113-4
हा मत्सरु जेथ उपजे । तेतुले नुरेचि जया दुजे । तो निर्मत्सरु काइ म्हणिजे । बोलवरी ॥113॥
मी आणि विश्व वेगळे मानले, तर द्वैत निर्माण होतो आणि मत्सर प्रकट होतो. ज्याच्या हृदयात द्वैतच नाही, तो पुरुष निर्मत्सर आहे, असे शब्दाने बोलून दाखवण्याची आवश्यकता आहे काय ? (अर्थातच नाही)
114-4
म्हणोनि सर्वापरी मुक्तु । तो सकर्मुचि तो कर्मरहितु । सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाही ॥114॥
म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे; कर्म करीत असताहि कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनहि गुणातीत आहे; ह्यात शंका (संशय) नाही.
{ बाह्यतः कर्म करीत असला, तरी आतून कर्मरहित असणे. देहाने सगुण असला, तरी ब्रम्हरूपाने गुणातीत असणे, }

गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित्चेतसः ।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥4. 23॥
भावार्थ :-

ज्याची कर्मफलाविषयी आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो मुक्त झाला आहे, ज्याचे चित्त ब्रह्मज्ञानात स्थिर झाले आहे, जो यज्ञाकरिता कर्म करणारा आहे, त्याचे ते सर्व कर्म (त्याच्याच ठिकाणी फलासह) लय पावते.

115-4
तो देहसंगे तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे । पाहता परब्रह्माचेनि कसे । चोखाळु भला ॥115॥
तो देहधारी असला, तरी (निर्गुण) चैतन्यरूप दिसतो. परब्रह्मच्या कसोटीने त्याला जाणून घेतले असता, तो अगदी शुद्ध दिसतो. (शुद्ध आहे असे आढळून येते. )


116-4
ऐसाही परी कौतुके । जरी कर्मे करी यज्ञादिके । तरी तिये लया जाती अशेखे । तयाचाचि ठायी ॥116॥
असे असूनही त्याने जर कौतुकाने कर्मे केली, तिरीपण ती कर्म त्याच्या ब्रम्हस्वरूपामध्ये लीन होऊन जातात.
117-4
अकाळीची अभ्रे जैसी । उर्मीविण आकाशी । हारपती आपैशी । उदयली सांती ॥117॥
आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता (वृष्टी), आले, तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात;
118-4
तैशी विधीविधान विहिते जरी आचरे तो समस्ते । तरी तिये ऐक्यभावे ऐक्याते । पावतीचि गा ॥118॥
त्याप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या एकूण एक विधानांचे यथासांग जरी तो अनुष्ठान करतो, तरी त्याच्या ऐक्य भावनेमुळे ती शेवटी ऐक्यालाच मिळतात. (त्याच्या ठिकाणी दुजाभाव नसल्यामुळे त्याच्याच ठिकाणी लय पावतात. )

ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥4. 24॥
भावार्थ :-

होमाची सर्व प्रकारची साधना, होम द्रव्य, अग्नी आणि हवनक्रिया ही त्या ब्रम्ह जाणाऱ्या पुरुषाच्या दृष्टीने ब्रम्हच आहेत. सर्व कर्माच्या ठिकाणी ज्याची दृष्टी ब्रम्हस्वरूप झाली आहे, त्या ज्ञानाकडून प्राप्त करून घ्यावयाचे फलही ब्रम्हच आहे.
119-4
जे हे हवन मी होता । का इये यज्ञी हा भोक्ता । ऐसीया बुद्धीसि नाही भंगता । म्हणऊनिया ॥119॥
ही हवनक्रिया आहे, मी हवन करणारा आहे, तसेच या यज्ञामध्ये ईश्वर हा भोक्ता आहे, अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा भेद ब्रम्हज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी नसतो. म्हणून
120-4
जे इष्टयज्ञ यजावे । ते हविर्मंत्रादि आघवे । तो देखतसे अविनाशभावे । आत्मबुद्धि ॥120॥
जे जे इष्ट यज्ञ तो करतो, त्यातील होमद्रवे व मंत्र इत्यादी सर्व ब्रम्हस्वरूप आहेत, असे जो समजतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


121-4
म्हणऊनि ब्रह्म तेचि कर्म । ऐसे बोधा आले जया सम । तया कर्तव्य ते नैष्कर्म्य । धनुर्धरा ॥121॥
म्हणून ब्रम्ह तेच कर्म, अशी समत्वबुद्धी ज्याच्या अंतःकरणात स्थिर झाली, त्याने कर्म केले, तरी नैष्कर्म्य होय.
122-4
आता अविवेककुमारत्वा मुकले । जया विरक्तीचे पाणिग्रहण जाहले । मग उपासन जिही आणिले । योगाग्नीचे ॥122॥
ज्याचे अविवेकरूपी बालपण संपून गेले आणि विवेकरूपी तारुण्याचे वैभव ज्याला प्राप्त झाले, ज्याचे विरक्तिरूपी वधुशी लग्न झाले आणि ज्याने योगरूप अग्नीची उपासना सुरु केली.

दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥4. 25॥
भावार्थ :-

अन्य योगी लोक भगवत-अर्पणरूपी यज्ञानेच अनुष्ठान करतात आणि कित्येक योगी लोक ब्रह्मरूपी अग्नीच्या ठिकाणी यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात.
संदर्भित अन्वयार्थ
अपरे = दुसरे, योगिनः = योगी लोक, दैवम्‌ = देवतांचे पूजनरूपी, यज्ञम्‌ एव = यज्ञाचेच, पर्युपासते = चांगल्याप्रकारे अनुष्ठान करीत राहतात, अपरे = दुसरे (योगी लोक), ब्रह्माग्नौ = परब्रह्म परमात्मरूप अग्नीमध्ये, यज्ञेन एव = (अभेद दर्शनरूपी) यज्ञाच्या द्वारेच, यज्ञम्‌ = आत्मरूप यज्ञाचे, उपजुह्वति = हवन करतात ॥४-२५॥
दुसरे काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात. तर इतर योगी परब्रह्म परमात्मारूपी अग्नीत अभेददर्शनरूप यज्ञाच्या द्वारेच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात. ॥४-२५॥
123-4
जे यजनशील अहर्निशी । जिही अविद्या हविली मनेसी । गुरुवाक्यहुताशी । हवन केले ॥123॥
ते रात्रंदिवस ज्ञानयज्ञ करणारे आत्मज्ञानी लोक आहेत आणि त्यांनी गुरुबोधरूपी अग्नीत मनासह अज्ञानाचे हवन केले आहे.
124-4
तिही योगाग्निकी यजिजे । तो दैवयज्ञु म्हणिजे । जेणे आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ॥124॥
अशाप्रकारे योगरूप अग्निमध्ये जे हवन करतात, त्याला ” दैवयज्ञ ” असे म्हणतात. हे अर्जुना ! त्या दैवयज्ञाने आत्मसुख प्राप्त होते.
125-4
दैवास्तव देहाचे पाळण । ऐसा निश्चयो परिपूर्ण । जो चिंतीना देहभरण । तो महायोगी जाण दैवयोगे ॥125॥
देहाचे पालन हे प्रारब्धाप्रमाणे होत असते, असा ज्याचा दृढनिश्चय असतो, तो देहाच्या पोषणकरता मनात चिंता करत नाही. तो दैवयोगाने महायोगी आहे, असे तू जाण..

दिवस ४२ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४९३ ते ५०४
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. 493
दंभे कीर्ती पोट भरे मानी जन । स्वहित कारण नव्हे काही ॥१॥
अंतरती तुझे पाय मज दुरी । धरिता हे थोरी जाणिवेची ॥धृपद॥
पिंडाच्या पाळणे धावती विकार । आहे दावेदार मजमाजी ॥२॥
कैसा करू घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥३॥
तुका म्हणे मज दावी तो सोहोळा । देखे पाय डोळा तुझे देवा ॥४॥
अर्थ
दांभिक वृत्तीने किर्ती होते पोट भरते जनमानसामध्ये मान-सन्मान मिळतो परंतु दांभिकपणा स्वहित होत नाही. मी मोठा जानता आहे, असा अभिमान धरला तर तुझ्या चरणांचा वियोग होतो. या शरीराचे पालन-पोषण केले तर यामध्ये अनेक प्रकारचे विकार असतात ते बळावले जातातआणि सर्व विकार माझे दावेदार आहेत परमार्थ करण्यासाठी यांचा विरोध असतो. लोकांची पर्वा करून संसारकरून मी आपला घात कशाला करून घेऊ ? तुकाराम महाराज म्हणतात तू अशी युक्ती कर की मी तुझे पाय पाहीन.
अभंग क्र. 494
धिग जिणे ज्याचा स्वामी हीन वर । मरण ते बरे भले मग ॥१॥
आईका जी देवा ऐसी आहे नीत । काय ते उचित सांभाळावे ॥धृपद॥
देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे । तयाचे कुतरे तरि भले ॥२॥
तुका म्हणे हे का सुचले उत्तर । जाणोनि अंतर ओळखावे ॥३॥
अर्थ
अहो ज्याचा स्वामीचा दुर्बळ आहे हिन आहे त्या माणसाचे जगणे व्यर्थ आहे त्यापेक्षा त्याला मरण आलेले बरे. म्हणून देवा तुम्ही ऐका नीती अशीच आहे म्हणून जे योग्य असेल, उचित असेल तेच तुम्ही करावे. ज्याच्या शब्दाचा दरारा देशोदेशी आहे, त्याच्या घरी श्वान होणे ही बरे. तुकाराम महाराज म्हणतात मी असे कठोर का बोलतो, असे बोलावेसे मला का वाटले, ते आपण जाणून घ्यावे.
अभंग क्र. 495
आता गाऊ तुज ओविया मंगळी । करू गदारोळी हरीकथा ॥१॥
होसि निवारिता आमुचे सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥धृपद॥
भोगिले ते भोग लावू तुझे अंगी । अलिप्त या जगी होउनि राहो ॥२॥
तुका म्हणे आम्ही लाडिकी लेकरे । न राहो अंतरे पायांविण ॥३॥
अर्थ
देवा आता तुझे मंगलमय गाणे ओव्याने गाऊ आणि गदारोळ करून हरिकथा करू. कारण आमची सर्व संकटे तूच निवारण करतोस. भय, तळमळ, पापाची भावना, पुण्याचा मार्ग सर्व तुच निवारण करतोस. आम्ही जे काही भोग भोगतो, ते तूच भोगतोस अशा श्रद्धेने आम्ही ते सर्व तुझ्याकडे लावून मोकळे राहू. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तुझी लाडकी लेकरे आहोत तुझ्या पाया पासून वेगळे आम्ही राहू शकत नाही.
अभंग क्र. 496
सर्व सुखे आजी येथेचि वोळली । संतांची देखिली चरणांबुजे ॥१॥
सर्वकाळ होतो आठवीत मनी । फिटली ते धणी येणे काळे ॥२॥
तुका म्हणे वाचा राहिली कुंटित । पुढे झाले चित्त समाधान ॥३॥
अर्थ
आज मी संतांची चरणकमले पाहिली त्यामुळे सर्व सुख येथे आली आहेत. सर्वकाळ सारखे संतांचे चरणाची मी आठवत होतो आता त्यांचे दर्शन झाले त्यामुळे यावेळी माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. तुकाराम महाराज म्हणतात आता या संबंधी काहीच बोलता येत नाही. माझे चित्त समाधान पावले आहे.
अभंग क्र. 497
विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्ती बैसलासे ॥१॥
विठ्ठले हे अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥धृपद॥
बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथा । न वदे अन्यथा आन दुजे ॥२॥
सकळा इंद्रिया मन हे प्रधान । ते ही करी ध्यान विठोबाचे ॥३॥
तुका म्हणे या हो विठ्ठलासी आता । नये विसंबता माझे मज ॥४॥
अर्थ
विठ्ठल हा माझा सोयरा सज्जन सोबती असून विठ्ठलच माझ्या जगतामध्ये दृढ बसलेला आहे. विठ्ठलाने माझे सर्व अंग व्यापून टाकले असून माझी सावली हि विठ्ठलच झाला आहे, असे मला वाटू लागले आहे. माझ्या जीव्हेवर विठ्ठलच बसलेला आहे त्यामुळे विठ्ठला वाचून इतर काहीही दुसरे माझी जीव्हा बोलत नाही हे मी शपथ घेऊन सांगतो. सगळ्या इंद्रियात मन श्रेष्ठ आहे आणि ते देखील विठोबाचे ध्यान करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता या विठ्ठलाला मी विसंबूम्हणजे विसरू शकत नाही.
अभंग क्र. 498
होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥१॥
काय करावी साधने । फळ अवघेचि येणे ॥धृपद॥
अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥२॥
तुका म्हणे डोळा । विठो बैसला सावळा ॥३॥
अर्थ
वारकरी व्हा वारकरी व्हा आणि प्रत्यक्ष डोळ्याने पंढरी पहा. बाकीचे साधने काय करायची आहे ? सर्व काही फळ यानेच मिळते. असे केल्याने अभिमान नाहीसा होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुकाराम महाराज म्हणतात डोळ्यांमध्ये सावळा विठ्ठल बसून राहतो त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्येय येतो.
अभंग क्र. 499
पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥१॥
अवघा होय पांडुरंग । राहे धरूनिया अंग ॥धृपद॥
न लगे धन मान । देहभावे उदासीन ॥२॥
तुका म्हणे मळ । नासी तात्काळ ते स्थळ ॥३॥
अर्थ
पंढरीला जातो त्याला त्याच्या माय बापाची देखील आठवण राहत नाही. तो स्वतःच पांडुरंगरूप होतो आणि त्याच स्थितीत राहतो. मग त्याला कोणत्याही प्रकारचा मान-सन्मान धन द्रव्य लागत नाही कारण तो देहा विषयी उदासीन झालेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूर हे क्षेत्र त्रिगुणरुपी मलाचा तात्काळ नाश करणारे आहे.
अभंग क्र. 500
बळे बाह्यात्कारे संपादिले सोंग । नाही जाला त्याग अंतरीचा ॥१॥
ऐसे येते नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥धृपद॥
जागृतीचा नाही अनुभव स्वप्नी । जातो विसरुनि सकळही ॥२॥
प्रपंचा बाहेरि नाही आले चित्त । केले करी नित्य वेवसाव ॥३॥
तुका म्हणे मज बहुरूप्याचि परी । जाले सोंग वरी आत तैसे ॥४॥
अर्थ
अहो बळेच मी बाह्य रंगाने साधू पणाचे संत पणाचे सोंग घेतलेले आहे पण माझ्या अंतःकरणा मध्ये विकारांचा विविध प्रकारच्या विषयांचा त्याग तसेच संसाराचा देखील माझ्या अंतकरणातून त्याग अजूनही झालेला नाही. माझ्या नित्य अनुभवला हीच गोष्ट येत आहे आणि खरा हा काय प्रकार आहे, ते माझे मला माहित आहे. मला जो अनुभव जागृतीती येतो तो पूर्ण पणे मुरलेला नसतो त्यामुळे स्वप्नात तो मी विसरून जातो. माझे चित्त खरोखर प्रपंचातून अजून बाहेर पडलेलेच नाही. मी पूर्वीचेच व्यवसाय पुढे करी राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझा प्रकार बहुरुप्याप्रमाने झाला वरच्या बाजूने जगाला सोंग मात्र दिसत आहे.
सार्थ तुकाराम गाथा 401 ते 500 समाप्त.

सार्थ तुकाराम गाथा 501 ते 600
अभंग क्र. 501
म्हणवितो दास ते नाही करणी । आत वरी दोन्ही भिन्न भाव ॥१॥
गातो नाचतो ते दाखवितो जना । प्रेम नारायणा नाही अंगी ॥धृपद॥
पाविजे ते वर्म न कळेचि काही । बुडालो या डोई दंभाचिया ॥२॥
भांडवल काळे हातोहाती नेले । माप या लागले आयुष्यासी ॥३॥
तुका म्हणे वाया गेलो ऐसा दिसे । होईल या हासे लौकिकाचे ॥४॥
अर्थ
मी स्वतःला हरिदास म्हणून घेत आहे पण माझ्या बोलण्यात माझ्या वागण्यात व माझ्या अंतरंगात फरक आहे मी बोलतोय एक आणि वागतो एक. मी हरीचे गुणगान गातो व त्या छंदांमध्ये नसतो परंतु ती केवळ लोकांना दाखविण्यासाठी खरेतर हे नारायणा माझ्या अंगामध्ये तुझ्याविषयी प्रेमच नाही. जे खरे वर्म आहे ते वर्म व त्याचे ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे परंतु ते काही कळत तर नाहीच परंतु तुम्ही दंभाच्या डोहामध्ये मी बुडालो आहे. माझ्या हातामध्ये जे आयुष्य रुपी भांडवल होते ते काळाने हातोहात नेले व माझ्या आयुष्याला आता माप लागले आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी तर वाया गेलो आहे असेच मला दिसत आहे परंतु जगामध्ये मी हरीचा मोठा दास आहे असा जो माझा लौकिक झाला आहे त्याचे हसू होईल जर मी वायाला गेलो तर.
अभंग क्र. 502
न कळे तो काय करावा उपाय । जेणे राहे भाव तुझ्या पायी ॥१॥
येऊनिया वास करिसी हृदयी । ऐसे घडे कई कासयाने ॥धृपद॥
साच भावे तुझे चिंतन मानसी । राहे हे करिसी कै गा देवा ॥२॥
लटिके हे माझे करूनिया दुरी । साच तू अंतरी येउनि राहे ॥३॥
तुका म्हणे मज राखावे पतिता । आपुलिया सत्ता पांडुरंगा ॥४॥
अर्थ
देवा तुझ्या पायाच्या ठिकाणी माझा भक्तिभाव स्थिर रहावा असा उपाय कोणता करावा तेच मला काही कळेना. देवा तु माझ्या हृदयामध्ये येऊन वास्तव्य करशील असे केव्हा कधी आणि कोणत्या उपायाने घडेल ? देवा खऱ्या भक्तिभावाने माझ्या मनामध्ये तुझेच चिंतन राहील अशी माझी स्थिती तू केव्हा करशील ? देवा या संसारातील सर्व खोट्या गोष्टी माझ्यापासून तू दूर कर व माझ्या अंतरंगात येऊन राहा. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तुझ्या सत्तेने माझ्यासारख्या पतीताचा सांभाळ करावा.
अभंग क्र. 503
चिंतिले ते मनिचे जाणे । पुरवी खुणे अंतरीचे ॥१॥
रात्री न कळे दिवस न कळे । अंगी खेळे दैवत हे ॥धृपद॥
नवसियाचे पुरवी नवस । भोगी त्यास भिन्न नाही ॥२॥
तुका म्हणे समचि देणे । समचरण उभा असे ॥३॥
अर्थ
आपण मनामध्ये जी काही गोष्टीचे चिंतन करतो ते सर्व देव जाणतो व आपल्या अंतरंगातील सर्व खुणा तो ओळखून पूर्ण करतो. असे हे पांडुरंग नावाचे दैवत आहे त्याला रात्र ही कळत नाही आणि दिवसही कळत नाही ते माझ्या अंगामध्ये सारखे खेळतच असते. परमार्थामध्ये जो कोणी परमार्थासाठी उपयुक्त असणारा नवस बोलतो त्याचे नवस हे दैवत पूर्ण करते व त्या भक्तांचे सर्व सुख दुखादी भोग हे दैवत स्वतः भोगते व त्यांच्यापासून भिन्न राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरीचे देणे हे सारख्या प्रमाणात आहे अगदी तो जसा विटेवर त्याचे समचरण ठेवून उभा आहे अगदी तसेच.
अभंग क्र. 504
उद्धाराचा संदेह नाही । याच्या काही सेवका ॥१॥
पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥धृपद॥
बुडता जळी जळता आगी । ते प्रसंगी राखावे ॥२॥
तुका म्हणे आम्हासाठी । कृपा पोटी वागवी ॥३॥
अर्थ
देव आपला उद्धार करील की, नाही याची सेवकाच्या मनात कधी शंका येत नाही. आपल्या भाक्तांबद्द्ल पांडुरंगाला अभिमान असतो. संकट काळी तो भक्ताला जीव दान देतो. पाण्यात बुडण्याच्या वेळी, अग्नीत जाळन्याच्या प्रसंगी हा भक्तांचे नेहमीच संरक्षण करत असतो. भक्त प्रल्हादाचे त्याने संरक्षण केले. तुकाराम महाराज म्हणतात हा देव, आमच्यावर देखील कृपेचा वर्षाव करत असतो.

फेब्रुवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading